साहित्यः
काळे वाटाणे - २ वाट्या
तिखट - १ लहान चमचा (टी स्पून)
आख्खे धणे - १ मोठा चमचा (टेबल स्पून)
काळी मिरी - ५ नग
लवंग - ३ नग
दालचिनी - १ इंच
खसखस - १ लहान चमचा
जायपत्री - १ फूल
हळद - १/४ लहान चमचा
खवलेला नारळ - अर्धा
आमसुले - ३ नग
कांदा - १ मध्यम, उभा चिरुन.
मीठ - चवीनुसार
तेल - अर्धी वाटी.
काळे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजत टाकून सकाळी पाणी बदलून कुकर मध्ये ५ ते ७ शिट्या घेऊन शिजवून घ्या.
कढईत तेल तापवून त्यात धणे, काळी मिरी, लवंग, दालचीनी, खसखस, जायपत्री टाकून मध्यम आंचेवर खरपूस तळून घ्या. मसाला जळता कामा नये. धण्यांना जरा तांबूस रंग यायला लागला की मसाला तळला गेला आहे हे समजावे. मग त्यात उभा चिरलेला कांदा टाकून परतावा. कांदा परतला गेला की त्यात खवलेला नारळ टाकून परतावे. मध्यम आंचेवर सतत परतत राहून सर्व नारळ लाल रंगावर परतून घ्यावा. आता हे वाटण ताटात काढून थंड होऊ द्यावे. हा मसाला मिक्सर मध्ये एकदम मुलायम वाटून घ्यावा.
वाटाणे अगदी मऊ नाही पण व्यवस्थित शिजलेले असले पाहिजेत. जर शिजले नसतील तर अजून २ शिट्या घेऊन पूर्ण शिजवावे. ह्या शिजलेल्या वाटाण्यात हळद, तिखट, आमसुले आणि वाटलेला मसाला घालावा. उसळ जेवढी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे. एक दोन चांगल्या उकळ्या आल्या की उसळीखालील आंच बंद करावी. कोथिंबीर घालून उसळ सजवावी.
ही उसळ घावन आणि लोणच्यासमवेत वाढावी.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
29 Apr 2013 - 4:08 pm | गणपा
घावनं ही सुरेख दिसतायत.
परवाच केली होती. :)
आंबोळ्यांसोबत हाणली.
29 Apr 2013 - 4:10 pm | धनुअमिता
गणपा दादा प्लीज आंबोळ्याची पाककृती देशील का?
29 Apr 2013 - 4:20 pm | गणपा
सोप्पय की.
एक वाटी (उकडा) तांदुळ, अर्धी वाटी उडीद डाळ वेगवेगळी भिजत ठेवायची (किमान ४-५ तास.)
नंतर दोन्ही मिक्सरमध्ये वेगवेगळे वाटुन घ्यायच. (डोश्याच्या पीठागत.)
दोन्ही पीठं एकत्र करुन उबदार ठिकाणी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवावी.
सकाळपर्यंत जर पीठ फुलून आलं नाही तर आंबोळ्या करण्या आधी थोडं ईनो घालून पीठ चमच्याने हलकच फेटुन घ्यावं.
निर्लेपच्या (वा तत्सम) तापलेल्या तव्यावर नारळाच्या शेंडीने थोडसं तेल लावून घ्यावं आणि पोळे काढावे.
30 Apr 2013 - 1:51 pm | धनुअमिता
धन्यवाद
2 May 2013 - 4:46 pm | पिलीयन रायडर
ह्या प्रमाणे करुन पाहीले.. पण जमलं नाही.. :(
एकतर तेल टाकुन मग पीठ टाकल्यावर झाकण ठेवुन ४-५ मिनिटे ठेवले.. तरी ते काही तव्यावरुन सुटेना.. सुटलं तर तुकडा पडायचा.. नाही पडला तरी ते थोडसं कच्चं लागत होतं..*
दुसरं असं की तुमच्या फोटो मधले आंबोळी / घावन पांढरे शुभ्र दिसते.. पण एकदा तव्यावर टाकले की ते भाजले जाणार नाही का? माझे तरी पांढरे धिरडे झाले.. खालुन मस्त खर्पुस ब्राऊन भाजलेले.. तर ह्या पांधर्या शुभ्र आंबोळिचे रहस्य काय?
*डाळीचे प्रमाण कमी पड्ले असल्यामुळे असे झाले असेल का?
2 May 2013 - 4:57 pm | पैसा
झाकण ठेवायचे नाही. त्यामुळे आतून वाफ धरून तव्याला चिकटते. पीठ तव्यावर जाड घालायचे नाही. कडांनी सुटते तसे लगेच परतून घ्यायचे. कच्चे रहात नाही. दुसरे म्हणजे यांचा आकार फार मोठा करायचा नाही. फुलक्याएवढा. म्हणजे उलटायला सोपे जाते. आम्ही पानपोळे करतो त्यात तर डाळ अजिबात नसते. थोडेसे ओले खोबरे वाटताना घालायचे. तरी चिकटत नाही.
2 May 2013 - 5:07 pm | पिलीयन रायडर
अगं आई ग.. मी काय काय नाही करायचं ते सगळं केलं..!!
मोट्ठे मोठ्ठे पोळे, जाड -जुड - झाकण ठेवुन ५ मिनटं भाजले!!!
आणि आज शेवटी ते आंबटढोण झालेलं पीठ वॉचमन ला दिलयं... :)
2 May 2013 - 8:28 pm | सूड
हे असलं काही करायचं असेल तेव्हा निर्लेपचा पॅन घ्यावा, नायतर डोक्याला नसता ताप होतो.
2 May 2013 - 8:29 pm | जेनी...
बिडाच्या तव्याबद्दल काय मते तुमचं ??
2 May 2013 - 8:35 pm | सूड
आमच्याकडल्या बिडाच्या तव्याचं असं गणित आहे की त्यावर पहिले दोन घावन तरी बिघडतातच!! नंतर अगदी मस्त होतं सगळं. पण मला त्या पहिल्या दोनाची नासाडी बघितली तरी पण नको वाटतं आणि दुसरं म्हणजे आत्मविश्वास जातो, तो एकदा का गेला की साध्या वरणाची सुद्धा चव बिघडू शकते. त्यामुळे निर्लेपचा पॅन जिंदाबाद. अजूनतरी त्याने दगा दिलेला नाही, टचवूड !! ;)
2 May 2013 - 8:39 pm | जेनी...
माझ्या माहितीप्रमाणे बीडाचा तवा वापरण्यापूर्वी त्यावर एक दोन दीवस आधी कांदा भाजुन घेतात ....
मग एकहि घावणं बिघडत नाहि ..
2 May 2013 - 8:45 pm | सूड
>>एक दोन दीवस आधी कांदा भाजुन घेतात
रोजच्या वापरातल्या तव्यासाठी नाही.
2 May 2013 - 8:50 pm | जेनी...
बीडाचा तवा रोज नाहि वापरत निदान आमच्याकडे तरि ... तो स्पेशली घावणं ,आंबोळ्यासाठिच वापरला जातो ...
आणि भाजका मसाला आयमीन वाटपाचा मसाला भाजण्यासाठी ... तोहि कधितरीच केला जातो नॉनवेज जेवणासाठी .
2 May 2013 - 9:00 pm | सूड
दोनेक महिन्याआड म्हणायचं होतं. अगदी नवा कोरा तवा असेल तर कांदा भाजतात त्यावर माझ्या माहितीप्रमाणे.
2 May 2013 - 9:02 pm | जेनी...
दोनेक महिन्याड म्हणजे रोज ??
बरं बरं :D
2 May 2013 - 8:32 pm | पिलीयन रायडर
निर्लेपच्या तव्याला घट्ट मिठी मारलेली आंबोळी पाहिलीये का कधी तुम्ही?
मी काल बनवलीये..!!
2 May 2013 - 8:36 pm | जेनी...
=)) =))
ऑर तुमने उसे ज्युदा कर्नेकी कोशिश की ?? :-/
:D
2 May 2013 - 8:42 pm | सूड
मग गॅसची आच मोठी राहिलेली असण्याची दाट शक्यता आहे. हा सगळा प्रकार मंद ते मध्यम आचेवरच करावा असं माझं तरी गणित आहे. तव्यावरुन आंबोळी/घावन/दोसा सहीसलामत सुटले की मग वाटल्यास आच वाढवावी. बरं आता हे तव्यावरुन नीट सुटेल हे कसं ओळखावं? तर, एकदा का घावन टाकला तव्यावर की मध्यम आचेवर त्याला शेकू द्यावं असं होताना कडा सुटू लागतील. कड सुटलेल्या दिशेने कालथा त्याखाली सरकवा, अलगद निघतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्लेपच्या पॅनवर कधीही धातूचा कालथा वापरायचा नाही. आमच्याकडे एक सेपरेट लाकडी कालथा आहे. धातूचा कालथा लावलात की तव्याची वाट लागलीच समजा. असो, फार लिहीलं नै. ;)
2 May 2013 - 8:44 pm | सानिकास्वप्निल
सहमत
2 May 2013 - 8:51 pm | जेनी...
कालथा म्हण्जे उलतान काय ??
2 May 2013 - 8:58 pm | सूड
कालथा म्हणजे काविलता. घाटवळणाची लोक उलाथनं म्हणतात त्याला!!
2 May 2013 - 9:01 pm | जेनी...
ओ घातवळणाची लोकं कुणाला म्हणता वो ?? :-/
आम्ही सातार कडची लोकं उलतान किंवा उलातनंच म्हणतो ..
2 May 2013 - 8:58 pm | पैसा
उलथणे/काविलथा/कलथा/कालथा हा शब्द माहित आहे.
2 May 2013 - 8:03 pm | जेनी...
प्रमाण तीनास एक ठेवायचं ...
तीन वाटी तांदुळ .... एक वाटी डाळ .... मग छान होतात ... पांढरे शुभ्र ..
बाकिचं सासुबैनाच माहित ... त्याच करतात :D
2 May 2013 - 8:21 pm | पिलीयन रायडर
बरय बै तुझं..
माझ्या सासुबै तर "जाऊ दे बै.. धपाटेच करु" म्हणून निघुन गेल्या..!! मराठवाड्याच्या आहेत न.. असं जास्त कुटाणखोर काम असेल तर डोकंच उठत त्यांच!!
2 May 2013 - 9:17 pm | अभ्या..
मराठवाड्याला काय म्हणायच्या आधी तेथे एक घागरभरुन पाणी आणून दाखवा. मग सांगा.
कुटाणा काय अस्तो ते तेव्हा कळेल. तरी बरय सासू मराठवाड्याच्या आहेत म्हणून असे बोललेलं चालतंय. ;)
2 May 2013 - 9:33 pm | सूड
मराठवाडा?
2 May 2013 - 10:22 pm | अभ्या..
का सुडक्या, मुंबई पुणे धाग्यावरचा बाटगेपणाचा शाप संपलेला दिसतोय तुझा? ;)
राहतो ते गाव आपलेसे करावे आधी मग प्रदेशाला हात घालावा.
2 May 2013 - 11:44 pm | बॅटमॅन
+१.
यग्झ्याक्टली. असा बाटगेपणा करू नै सुडक्या.
पण बाकी सुडक्याच्या पाककलानिपुणतेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. च्यायला, आम्ही विडंबनातील जिलब्यांच्या शब्दयोजनेबद्दल जिलब्या पाडाव्यात तितक्या सहजतेने म्हैलावर्गाशी अधिकारवाणीने पाककलाविषयक टिप्सची देवाणघेवाण करताना पाहून काँप्लेक्स आला बॉ आपल्याला. :)
2 May 2013 - 11:59 pm | प्यारे१
कूल ठाकूर कूल...
-शोलेच्या शेवटच्या सीन मध्ये इन्स्पेक्टर ठाकूरला. ;)
3 May 2013 - 1:33 pm | पिलीयन रायडर
पुण्या -मुंबई च्या पलिकडेही जो महाराष्ट्र आहे ना, तिथे असतं..
3 May 2013 - 1:30 pm | पिलीयन रायडर
ओ अभ्या...(अभिजित.. जे काही असेल ते..)
काही बोलायच्या आधी नीट समजुन घ्या.. वाचा न मग बोला..
जन्म मराठवाड्यातला आहे माझा.. रक्त पण तिथ्लच.. आणि संस्कार पण..तुम्ही काय सांगताय मला पाण्याचं..??
नसतातच मराठवाडी पदार्थ जास्त कुटाणखोर.. काय म्हणणं आहे??
कोकणस्थी पदार्थ जास्त निगुतीनं होतात त्या मानानी..
आणि हो... मराठवाड्यातली काय किंवा कुठलीही काय.. सासु ऐकुन घेती की नाहि हे माझं मला ठावुक.. तुम्हाला कशाला नस्त्या उठाठेवी..
3 May 2013 - 1:48 pm | अभ्या..
=)) =)) =)) =)) =))
2 May 2013 - 8:40 pm | सानिकास्वप्निल
घावन हे तांदळाच्या पिठापासून बनवतात तर आंबोळी वर गणपाभौंनी दिल्याप्रमाणे.
घावन करायचे असल्यास सुवासिक तांदूळ स्वच्छ धुवून ५-६ तास भिजत घालावे व नंतर वाटून घ्यायचे (एकदम फाईन ) त्यात पाणी किंवा दूध किंवा नारळाचे दूध , मीठ घालून पातळ मिश्रण तयार करायचे. नॉन-स्टीक तव्यावर कांद्याने तेल पसरवून घावने घालावीत. कोकणात बिडावर घावने बनवली जातात.
आम्ही घावन करताना वाटलेले थोडे ओले खोबरे ही कधी कधी घालतो खासकरून घाटल्यांबरोबर खायला.
मस्तं मऊ-मऊ, लुसलूशीत होतात.
हल्ली सुवासिक तांदळाची (बासमती) मोदक पिठि विकत मिळते बाजारात, चांगल्या प्रतिची घेऊन त्यात दुध्/पाणी, मीठ घालून ही घावने बनवता येतात.
2 May 2013 - 8:57 pm | पैसा
घावन म्हणजे धिरडी. ही पिठाची डायरेक्ट करतात. आंबोळ्या म्हणजे "आंबवलेल्या" अर्थात धान्य्/कडधान्य/रवा/पोहे/भात यांचे मिश्रण भिजत घालून आणि वाटून बनवलेल्या.
2 May 2013 - 9:36 pm | जेनी...
असेलसेल !!
आता सासुबैंच्यापूढे कोण बोल्नार :-/
2 May 2013 - 11:40 pm | पैसा
मग सुड माझ्या माहेरचा माणूस है. तो तुला घाटवळणी म्हणू नैतर घाटीण म्हणू, गपगुमान ऐकून घ्याच्चं.
3 May 2013 - 12:10 am | जेनी...
:-/ :-/ :-/
2 May 2013 - 9:08 pm | पिलीयन रायडर
एक तर मी मोठे मोठे आंबोळे बनवले!! त्या वर झाकण ठेवलं..!!
म्हणुन असं झालं माझं..!!
असो..इतक्या सुचना नीट वाचुन परत करुन दाखविनच!!!
2 May 2013 - 10:29 pm | प्यारे१
>>>परत करुन दाखविनच!!!
हाण्ण्ण्ण्ण. :)
3 May 2013 - 9:30 am | इरसाल
ते वाचमनाकडुन डबल आंबटढोण पीठ परत आणा पाहु.
3 May 2013 - 1:41 pm | मैत्र
खूपदा नुसतं या जोडीचं नाव ऐकलं आहे घावन घाटले..
घावन कळले वर दिल्याप्रमाणे.. घाटले म्हणजे काय?
3 May 2013 - 2:52 pm | सानिकास्वप्निल
घावन-घाटले गौरी येतात तेव्हा नैवेद्यला बनवतात कोकणात. माझी पध्दत सांगते घाटले बनविण्याची.
एका नारळाचे घट्ट दूध काढून गॅसवर मंद आचेवर गरम करावे,सतत ढवळावे. त्यात साधारण वाटीभर चिरलेला गुळ घालून तो विरघळेपर्यंत ढवळावे. आता त्यात चमचाभर कोरडी भाजलेली तांदूळपिठी घालून घट्टसर/ दाट (कस्टर्डप्रमाणे) होईपर्यंत शिजवावे.जायफळपूड व वेलचीपूड घालून एकत्र करुन घावनाबरोबर खावे.
29 Apr 2013 - 4:08 pm | धनुअमिता
मस्त..........
29 Apr 2013 - 4:10 pm | विसोबा खेचर
केवळ सुरेख..!
29 Apr 2013 - 4:12 pm | बॅटमॅन
मस्त दिसतोय प्रकार एकूण! पण हरभरे आवडत नसल्याने त्याच्या जागी छोले किंवा तत्सम काही खायला जास्त आवडेल.
अवांतरः केरळातील आप्पम विथ कडल/कडला करी हा पदार्थ म्हंजे याच पदार्थाचे केरळी क्लोन आहे.
29 Apr 2013 - 6:44 pm | सस्नेह
हरभरे नव्हे हो, का ळे वा टा णे !
खाउन बघा एकदा, छोले बिले विसरून जाल !
29 Apr 2013 - 11:39 pm | बॅटमॅन
च्यायला.....आय माय स्वारी :) स्वयंपाकघरात निस्ते हादडायला गेले की असेच होते. पण हेही खाल्लेले आहेत, अन नै आवडत आज्याबात.
29 Apr 2013 - 11:45 pm | श्रीरंग_जोशी
होस्टेलच्या मेसवर ही उसळ बरेचदा असायची. कदाचित खूप वेळ भिजवल्याने असेल पण बहुतांशवेळा जरा वास यायचा अन चवही यथातथाच असायची. त्यामूळे एकदोनदा प्रयत्न केल्यावर मेसच्या जेवणात या उसळीकडे नेहमीच दुर्लक्ष केले.
3 May 2013 - 1:44 pm | मैत्र
अवांतर होतंय पण काय जबरा काँबिनेशन असतं हे..
आणि ती करी जरा झणझणीत.. काहि वेळा कांदा वगैरे.. अहाहा..
पुणे / बंगळूरात मिळेल का कुठे मस्तपैकी..
3 May 2013 - 2:01 pm | बॅटमॅन
पुण्यात युनिव्हर्सिटी रोडला पुने शेंट्रलला लागून सौथ इंडीज नामक हाटेल आहे त्यात हे मिळतं. बंगळूरचं गोत्तिल्ला.
29 Apr 2013 - 4:23 pm | सामान्य वाचक
नीट मिसळ्तात का हो? का रस्सा आणि वाटाणे वेगळे राहतात?
29 Apr 2013 - 4:28 pm | प्रभाकर पेठकर
खोबर्याचे वाटण 'मुलायम' वाटून घेतले तर एकजीव होते उसळ, नाहीतर वाटाणे आणि पाणी वेगळे राहण्याची शक्यता असते. थोडेसे वाटाणे बाजूला ठेवायचे. जर उसळीतील वाटाणे आणि पाणी वेगवेगळे राहात आहेत असे वाटले तर हे बाजूला ठेवलेले, शिजवलेले, वाटाणे मिक्सरमधून वाटून उसळीत मिसळावे. समस्या दूर व्हावी.
29 Apr 2013 - 4:49 pm | राही
थोडेसे वाटाणे थोडेसे झेजरून घेतल्यास काम भागावेसे वाटते.
29 Apr 2013 - 5:02 pm | पिलीयन रायडर
मी परवाच खरडफळ्यावर विचारलं म्हणुन दिलीत न!!! खुप खुप छान.. आणि खुप खुप धन्यु!!!!
29 Apr 2013 - 5:05 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा....उसळिचा खमंगपणा वाचुन जितका जाणवला,तितकाच फोटुमधुनही... पाहुन समाधान वाटले. :)
29 Apr 2013 - 5:05 pm | अस्मी
छान पाकृ...माझी एकदम आवडती उसळ.
29 Apr 2013 - 5:08 pm | सानिकास्वप्निल
फोटो व कृती दोन्ही छान आहे :)
अवांतरः मागे माझ्या नीर डोश्याच्या धाग्यावर बर्याच जणांनी ह्या उसळीची कृती तुम्हाला विचारली होती, तेव्हा तुम्ही तिथे कृती दिली होती, मला वाटतं रेवतीने तुम्ही सांगितल्याप्रमाणे उसळ बनवून फोटो ही दिला होता :) आता का कुणास ठाऊक ते सगळे प्रतिसाद उडवलेले दिसतायेत. असो.
29 Apr 2013 - 5:17 pm | सानिकास्वप्निल
ती कृती तुम्ही माझ्या ह्या धाग्यावर दिली होती. नक्की कुठल्या धाग्यावर दिले हे लक्षात नव्हते म्हणून क्षमस्व .
तेव्हा ही आवडली व आत्ता ही.
29 Apr 2013 - 6:03 pm | अनिता ठाकूर
करुन पाहीन.
29 Apr 2013 - 6:13 pm | जेनी...
वाव ! मस्तच
आमच्याकडे ... मोस्ट्ली सातारा भागात काळ्या वाटान्याची उसळ सुकी करतात
तेही लोखंडी काळ्या तव्यात किंवा कढईत .. बाजरीच्या भाकरीसोबत भन्नाट लागते
एकदा गावी खाल्ली होती ... तसच रात्रीच्या जेवनातले पूरुन उरलेले भजी , त्याचं पातळ
कालवन तर भारी लागतं पण बनवता येत नाहि :( .. कुरडयाच्या चुर्याची सुकी भाजी तर
मस्त होते तीहि बनवता येत नाहि :( ...
काकांनी दीलेला वरचा घावणं न काळ्या वाटाण्याची उसळ एका मैत्रीणीकडे खाल्ली होती
कनकवलीची आहे ती ... छान मेणू :)
29 Apr 2013 - 6:31 pm | प्यारे१
सातारा?
पूजातै गाव कोणतं?
काका,
उसळ मस्त.
पण काळ्या वाटाण्याची उसळ कॉलेज मेस मधे एवढी खाल्ली आहे की तिचा नॉशिया आलाय.
- व्हीजे ए, सी१,सी२, डी नि जिमच्या मागची मेस(स्टाफ मेंबर कोण रे 'तुम्चा अभिषेक' )चा मेंबर प्यारे१
29 Apr 2013 - 6:47 pm | जेनी...
ओ काकु व्यनीत सांगते .. नैतं माझ्या गावच्या घरी उगा गर्दी व्हायची :-/
:P
29 Apr 2013 - 6:34 pm | Mrunalini
आई गं... काका काय मस्त दिसतीये ती उसळ आणि घावन प्॑ण.. इथे हे वाटाणे मिळणे म्हणजे खुप कठिण.. काळ्या घेवड्याची करुन बघितली पाहिजे.
29 Apr 2013 - 6:50 pm | रेवती
सानिकेच्या एका मांसाहारी पाकृच्या धाग्यावर आपण ही पाकृ आम्हा शाकाहारींसाठी सुचवली होती. त्यावेळी ती करून पाहिली व फोटू दिला होता. गणपानेही दिला होता असे आठ्वते आहे.
29 Apr 2013 - 8:19 pm | सुहास झेले
जबरदस्त.... तोंपासु :) :)
29 Apr 2013 - 8:28 pm | अनन्न्या
घावनांसोबत खाल्ली नाहीय कधी!
29 Apr 2013 - 8:29 pm | श्रीरंग_जोशी
कालच काळ्या वाटाण्यांची उसळ (या पाकॄइतकी साग्रसंगीत नसली तरी) खाल्ली. अजूनही चव जीभेवर आहे.
घावन मात्र ठावूक नाहीये. कोकणातले आहे का?
जालावर शोध घेतला तर ही पाकॄ मिळाली.
29 Apr 2013 - 11:22 pm | अभ्या..
मस्त पाककृती झालीय पेठकरकाका.
धन्यवाद.
30 Apr 2013 - 3:23 am | प्रभाकर पेठकर
गणपा, धनुअमिता, विसोबा खेचर, बॅटमॅन, स्नेहांकिता, श्रीरंग_जोशी, सामान्य वाचक, राही, पिलीयन रायडर, अत्रुप्त आत्मा, अस्मी, सानिकास्वप्निल, अनिता ठाकूर, पूजा पवार., प्यारे१, Mrunalini, रेवती, सुहास झेले, अनन्न्या, श्रीरंग_जोशी आणि अभ्या.. मनःपूर्वक धन्यवाद.
बॅटमॅन, श्रीरंग जोशी - काळे वाटाणे मलाही सुरुवातीला आवडायचे नाहीत. मी देशावरचा तर बायको कोकणातील. तिच्या मुळेच ह्या उसळीची तोंडओळख झाली. तरी पण तितकासा प्रेमात नाही पडलो (उसळीच्या). पुढे स्वतःच करायला सुरुवात केली आणि हळू हळू मसाल्याचे प्रमाण लक्षात येऊ लागले आणि पाककृती सुधारत गेली. आता भरपूर आवडते. मी दिल्या प्रमाणे पाककृती करून पाहा कदाचित आवडू लागेल.
पिलीयन रायडर - होय. कोणीतरी विचारणा केली आहे एवढेच लक्षात होते. तेंव्हा केली ही उसळ आणि चढवली पाककृती मिपावर.
सानिकास्वप्नील आणि रेवती - हल्ली हे असं होतय. लक्षातच राहात नाही. त्यामुळे पूर्वी मिपावर ही पाककृती देऊनही पुन्हा चढवली. अर्थात, दोन्हीत किंचित फरक असणारच. मला वाटतं मी पूर्वी करायचो त्यापेक्षा ही जरा उजवी पाककृती आहे.
Mrunalini - काळ्या घेवड्याची करण्यापेक्षा कॉलीफ्लॉवर, गाजर, फरसबी, मटार अशा भाज्या, पुलावसाठी चिरतो तशा चिरुन, वाफवून वरील मसाल्यात मिसळून भाजी केल्यास मस्तं लागते. पण, पाणी कमी ठेवून, अंगचाच मसाला ठेवायचा. करून पाहा.
श्रीरंग_जोशी - होय घावन कोकणात - गोव्यात करतात. काळ्या वाटाण्याची उसळ, मालवणी चिकन, मटण, सागुती बरोबर खातात मस्तं लागतात. मला तेवढी जमत नाहीत. मुळात त्यासाठी लागणारा नवा तांदूळ इथे मिळत नाही. आणि माझ्या जवळ तेवढे कौशल्यही नाही. पण, गोव्याच्या वाटेवर पत्रादेवी सीमेवर पोहोचण्या आधी, उजव्या हाताला 'सावली' नांवाची (की असेच कांहीसे नांव असलेली) टपरी आहे तिथे काळ्या वाटाण्याची उसळ आणि घावन्/णे खाल्ले होते. ते आजही लक्षात आहेत.
30 Apr 2013 - 3:48 am | श्रीरंग_जोशी
घावनच्या माहितीबद्दल धन्यवाद, प्रभाकरराव.
बाकी मला केवळ होस्टेलच्या मेसमध्ये मिळणारी काळ्या वाटाण्यांची उसळ आवडत नसे. घरी बनवलेली काळ्या वाटाण्यांची उसळ हा आवडीचा पदार्थ आहे.
30 Apr 2013 - 6:30 am | रेवती
कॉलीफ्लॉवर, गाजर, फरसबी, मटार अशा भाज्या, पुलावसाठी चिरतो तशा चिरुन, वाफवून वरील मसाल्यात मिसळून भाजी केल्यास मस्तं लागते.
भारी आहे कल्पना! मी तश्याप्रकारे करून बघणारच. धन्यवाद काका.
30 Apr 2013 - 2:34 pm | बॅटमॅन
धन्यवाद सरजी, आऊसाहेबांना आता कधीतरी हे प्रकर्ण बनवायला सांगतो. :)
30 Apr 2013 - 9:13 am | अर्धवटराव
काका, तुम्ही आमचे वन ऑफ द मोस्ट फेव्हरेट मिपाकर.
अर्धवटराव
30 Apr 2013 - 9:37 am | इरसाल
घावन खायची मजा एक्तर काळे वाटाणे, किंवा चहा किंवा मग मटणाबरोबर.
30 Apr 2013 - 10:20 am | किलमाऊस्की
अतिशय आवडते. आम्ही वड्यांसोबत खातो ही.

30 Apr 2013 - 11:36 am | दीपा माने
एकदम छान पाकृ टाकलीत. मला आपल्या पाकृ नेहेमीच आवडतात.
30 Apr 2013 - 11:37 am | दिपक.कुवेत
भाकरीसोबत तर फार आवडते. मित्राच्या घरी हमखास असायची. मागे एकदा भारतातुन येताना आणलेले पण बरेच दिवस न केल्यामुळे त्यात पोरकिडे झाले :D
30 Apr 2013 - 1:09 pm | सुधीर
कोकणात ही डिश खूप फेमस आहे. काळ्या वाटाण्याचं सांबार/उसळ, घावने किंवा वर हेमांगीके यांनी दाखविलेले वडे हा "खास बेत" असतो.
30 Apr 2013 - 1:36 pm | Mrunalini
धन्स काका... मला त्या घावन्यांची पण पाकृ द्या ना..
30 Apr 2013 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर
गरजेनुसार बासमती तांदूळ रात्री भिजत घालायचे. सकाळी एकदम मऊ मुलायम वाटून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं. पाणी घालून आवश्यकतेनुसार पातळ करून घ्यायचं. नॉन्-स्टीक तव्यावर घावणे करायचे.
पाण्या ऐवजी नारळाचे दूधही वापरतात.
ही माझी पद्धत आहे.
30 Apr 2013 - 1:40 pm | दिपक
मस्त रेशीपी काका!
कोंबडी वड्यांबरोबर बर्याच वेळी खाल्ली आहे. छान लागते.
30 Apr 2013 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार
महानिर्वाण !
1 May 2013 - 12:24 am | प्यारे१
महा'परि'निर्वाणदिनाच्या शुभेच्छा !
1 May 2013 - 6:49 pm | पैसा
एकदम आवडता मेनु!
2 May 2013 - 4:52 pm | पिलीयन रायडर
काका,
उसळ करुन पाहिली.. सगळ्यांना खुप आवडली..
फक्त आंबोळी काही जमली नाही..
कुणी सानिका गुरुमाते सारखं डिटेलात पाकृ देईल का? (सानिकामाय.. तुम्हीच द्या ना त्या पेक्षा!!)
धन्यवाद..
2 May 2013 - 5:11 pm | चिंतामणी
कोकणात, विशेषत: तळ कोकणात मस्त मिळते.
वेंगुर्ल्याला खाल्लेली आठवत आहे.
2 May 2013 - 5:29 pm | अजो
छान रेसेपी.
मी अशीच ग्रेवी तयार करून पाटवडी रस्सा करते. आता उसळ पण करून बघणार.
4 May 2013 - 1:21 pm | श्रिया
लाजवाब रेसिपी! घावनं सुरेख दिसत आहेत.