मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काळ्या वाटाण्यांची उसळ

प्रभाकर पेठकर · · पाककृती
Kale-Vatane-Usal साहित्यः काळे वाटाणे - २ वाट्या तिखट - १ लहान चमचा (टी स्पून) आख्खे धणे - १ मोठा चमचा (टेबल स्पून) काळी मिरी - ५ नग लवंग - ३ नग दालचिनी - १ इंच खसखस - १ लहान चमचा जायपत्री - १ फूल हळद - १/४ लहान चमचा खवलेला नारळ - अर्धा आमसुले - ३ नग कांदा - १ मध्यम, उभा चिरुन. मीठ - चवीनुसार तेल - अर्धी वाटी. काळे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजत टाकून सकाळी पाणी बदलून कुकर मध्ये ५ ते ७ शिट्या घेऊन शिजवून घ्या. कढईत तेल तापवून त्यात धणे, काळी मिरी, लवंग, दालचीनी, खसखस, जायपत्री टाकून मध्यम आंचेवर खरपूस तळून घ्या. मसाला जळता कामा नये. धण्यांना जरा तांबूस रंग यायला लागला की मसाला तळला गेला आहे हे समजावे. मग त्यात उभा चिरलेला कांदा टाकून परतावा. कांदा परतला गेला की त्यात खवलेला नारळ टाकून परतावे. मध्यम आंचेवर सतत परतत राहून सर्व नारळ लाल रंगावर परतून घ्यावा. आता हे वाटण ताटात काढून थंड होऊ द्यावे. हा मसाला मिक्सर मध्ये एकदम मुलायम वाटून घ्यावा. वाटाणे अगदी मऊ नाही पण व्यवस्थित शिजलेले असले पाहिजेत. जर शिजले नसतील तर अजून २ शिट्या घेऊन पूर्ण शिजवावे. ह्या शिजलेल्या वाटाण्यात हळद, तिखट, आमसुले आणि वाटलेला मसाला घालावा. उसळ जेवढी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे. एक दोन चांगल्या उकळ्या आल्या की उसळीखालील आंच बंद करावी. कोथिंबीर घालून उसळ सजवावी. ही उसळ घावन आणि लोणच्यासमवेत वाढावी. शुभेच्छा....!

वाचन 26110 प्रतिक्रिया 0