सबनीसांचा वसंता

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
6 Jul 2008 - 12:28 am

आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणून हांक ऐकण्याची संवय झाली होती.
हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर, सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील, त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर, तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला. ग्रॅन्टरोड परीसरात, कुडाळदेशकर निवासातल्या एका चाळीत, वडीलांच्या ओळीखीने त्याची सोय झाली होती.
सोय कसली, त्यांच्या खोलीच्या समोरच्या व्हरांड्यात, एक माणूस झोपेल एव्हडी जागा, त्याला झोपायला मिळाली होती.पहाट झाल्यावर, लोकांची व्हरांड्यात जाययायची वर्दळ चालू झाल्यावर, सबसनीसला झक्कत उठावं लागायचं.
बिछान्याची वळकटी करून, घरातल्या आतल्या खोलीतल्या पोटमाळयावर ठेवून द्दयावी लागायची.बिछाना कसला, एका मोठ्या गोणपाटाच्या कपडयावर, एक सोलापुरची चादर पसरून, उशाला अशीच एक गुंडाळलेली जुन्या चादरीची वळकटी, आणि पांघरायला एक पातळशी चादर हाच बिछाना असायचा.
उठल्यावर लगेचच खाली जायच्या जिन्याच्या लगत असणाऱ्या, सामुदायीक संडास बाथरूमच्या जागेकडे, धांव घ्यावी लागायची. कारण, सकाळच्या घाईत तिकडे कोण गर्दी असायची,लाईन लावण्याला पर्याय नसायचा.न विसरता, तंबाखूची "मशेरी", डाव्या हातावर घेऊन, उजव्या हाताचं निर्देशक बोट, त्यावर लावून, दांतावर चोळता चोळता, उरलेल्या उजव्या हातांच्या बोटांच्या आधाराचा उपयोग करून, "टंबलेर" उचलून, बगलेत चटयापटयाची अंडरवेअर घेऊन, रांगेत उभं राहाण्याच्या सहजगत्या होणाऱ्या त्याच्या क्रियेत, कधीच खंड पडला नाही.
आंघोळीसकट सर्व नैसर्गिक क्रिया संपल्यावर, खोलीकडे धांव घेऊन, खाटेखालची ट्रंकओढून, त्यातला परीटघडीचा शर्ट आणि प्यॅन्ट काढून, केसावर सुगंधी तेल चोपडून, केसाचा कोंबडा काढून झाल्यावर, कांता सेंट मानेवर फासून,इंन्स्युरन्स एजंट घेतो, तशी ब्रीफकेस उजव्या हातात घेउन, (असल्या ब्यॅगेला तो "डुक्कर " म्हणायचा) स्वारी ग्रॅन्टरोड,चर्नीरोडच्या नाक्यावरच्या ईराण्याच्या हॉटेलात जाऊन, "ब्रुनमस्का पाव आणि पाणी कम चहा" ढोसून, खाडिलकर रोड वरच्या, मधेच उभ्या असलेल्या, बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरच्या, "बहिऱ्या मुक्याच्या" शाळेत चालत जायचा.ही शाळा, मेढेकर नावाच्या सदगृह्स्थानी, स्थापन केलेली होती.ते स्वतः असल्या मुलांना, खुणेच्या भाषेत शिक्षण देत असत.जवळपासच्या लोकांची मुलं ह्या शाळेत येत असत.

मधू सामंताच्या ओळखीने, सबनीसला ह्या शाळेत कारकून-वजा पैसे कलेक्ट करण्याची, नोकरी मिळाली होती.शाळेला, मुलांच्या आईवडीलांकडून, मासीक फी मिळायचीच, पण त्याशिवाय सबनीसला, श्रीमंताकडून देणगी आणण्याचं काम दिलं होतं.वार्षीक देणग्या वसूल करण्याचं काम होतंच,त्याशिवाय नविन देणग्याची पण, वाढ करण्याचं काम सबनीसला करावं लागायचं.ह्या असल्या कामामुळे पुढे सबसनीसला, " व्हेनीशन ब्लाइंडसची " ऑर्डर घेऊन विकण्याचा, आणखी एक धंदा करण्याचं काम, माझ्या ओळखीच्या माणसाकडून, मी त्याला दिलं होतं,त्याचा उपयोग पुढं संसार सांभाळताना त्याला झाला.

फोर्टविभागात हिंडून फिरून शाळेचं काम करीत असताना, मोठमोठया कंपनींच्या ऑफिसच्या खिडक्यांना, व्हेनीशन ब्लाइंडस (त्याला सबनीस "पडदे" म्हणायचा) विकण्याच्या ऑर्डरी घ्यायचाच, पण दुपारची जेवणाची वेळ झाल्यावर, कुठेही असला तरी,
खोताच्या वाडीतल्या "अनंताश्रमात " ,जेवायला यायला चुकत नसे.रात्रीच्या वेळी सुद्धा तिथंच जेवायला जायचा.
"बाबारे,दोन वेळच्या अन्नात चालढकल करणं योग्य नाही आधी प्रकृती मग सगळी सोंग"
असं मला म्हणायचा.
खाणावळीत जेवताना सुद्धा, त्याची जेवणात काटकसर नसायची.चार मुद भात,दोन वाटया माशाची आमटी, दोन तळलेली माशाची कापं,दोन चपात्या, आणि लाल भडक कोकमाचं सार ( तो सोल कढी म्हणायचा) हा त्याचा सकाळचा आहार. आणि रात्री परत माशाच्या डीश, फक्त फरक मग, तिसऱ्याची आमटी, पापलेटची तळलेली कापं , किंवा कुर्ल्याचं सुकं त्याला चालायचं.

दिवस निघून गेले. सडेफटींग रहाणं किती दिवस चालणार.नाडकर्ण्याच्या मुलीची लग्नाची ऑफर आली, तेव्हां कसलेच चोचले न करता, सबनीस लग्नाला तयार झाला. आता जागेची पंचाईत आली.
मला म्हणाला,
"सद्दयाच्या जागेत दिवस असला, तरी बत्ती लावावी लागायची एव्हडा घरात काळोख,लाईट गेल्यावर दिवसा सुद्धा माणसाला माणूस दिसत नाही, चुकून हात उचलला, तर कुणाच्या थोबाडात बसायची. तरूणपणात एव्हडा आजार येत नाही पण आता जरा "नज" आलं तर कुठे लेटणार ? " म्हणून सबनीस आता, गोरेगावात जागा शोधायला दर शनिवारी आणि रविवारी तिकडे जायचा.
मला म्हणाला
"एव्हडी पगडी द्दयाला कोणाकडे पैसे आहेत.शाळे कडून कितीसे लोन मिळणार?"
ह्या विचारात त्याने तीन महिन्याच्या डिपॉझीटवर, एका भय्याच्या चाळीत जागा घेण्याचं, अगदी नक्की केलं. आणि मला दाखवायला एकदा घेऊन गेला.
मी त्याला गम्मतीत म्हणालो,"सबनीस आपण पांढरपेशे लोक उद्दया तुम्ही नाडकर्ण्याच्या मुलीशी लग्न करणार,दिवसभर तुम्ही कामासाठी सकाळी निघून रात्री घरी येणार, पड्द्दयाच्या ऑरडरी घेता घेता घरी आल्यावर बायको तुम्हाला म्हणणार,
"पडदेमे रहने दो
पडदा न उठावो
पडदा जो उठजायेगा
तो
वंसता मेरी तोबा
वंसता मेरी तोबा "
ह्यावर सबसनीस एव्हडा हंसला की विचारू नका.खरं तर सबनीसचं हंसणं अगदी सात मजली असायचं."हो,हो,हो " म्हणून सुरवात झाल्यावर, शेवटी " खो, खो ,खो " करून खोकला संपल्यावर, त्यांच हंसणं बंद झालं अस समजायचं.
माझ्या वरील विनोदी उक्तीचा अर्थ न कळण्या इतका सबनीस बुद्दु नव्हता.नंतर गोरेगावातच पांडुरंगवाडीत त्याल्या, एका पांढरपेशे लोक रहात असलेल्या बिल्डींग मधे, थोडे जास्त पैसे देऊन, दोन खोल्यांची जागा मिळाली. सबनीसाने तिथं आपला संसार थाटला.त्याना एक मुलगी पण झाली.रोजची आठ बाराची गोरेगाव लोकल पकडून, जाणं आणि संध्याकाळी पाच दहाची गोरेगाव स्पेशल पकडून घरी येणं हा त्याचा नियमीत कार्यक्रम झाला.
बायकोने त्याला सिगरेट ओढण्याची संवय बंद करायला लावली.ह्यापुढं सात मजली फक्त हंसणं, नंतरचं खोकणं नाही.

अलिकडे बरीच वर्षे झाली.इकडे आल्यावर सबनीसची खबर नाही.
"सबनीसच्या मुलीचं लग्न झालं, सबनीस आता आजोबापण झाला.आता सबनीस "डुक्कर" हातात घेऊन, लोकल पकडायला जात नाही.त्याच्या मुलीनेच त्याला निवृत्त व्हायला लावलं."असं कुणीतरी मला सांगितलं.
हल्लीच माझी एका कॉमन मित्राची आणि माझी, भेट झाली.
तो म्हणाला
"सबनीस आता खूप थकला आहे.ही वामन मुर्ती हातात काठी घेऊन, डोक्यावर कानटोपी घालून, अंगात एक मिलट्रीचा खाकी स्वेटर,दांत सर्व काढलेले, पण तोंडात कवळी न घालता, संध्याकाळच्या थंड हवेचा अविर्भाव आणून, आल्या गेल्याकडे रसत्यात उभं राहून, बोलण्यात वेळ घालवत असतो.माझी भेट झाल्यावर मला म्हणाला, "सामंताना कधीतरी इकडे या म्हणावं डोळे भरून बघीन असं झालं आहे"

हे ऐकून मला पण खूप गहिवरून आलं.पण खरं सांगू का,ऐन तारुण्यात शिकार करणाऱ्या आयाळलेल्या सिंव्हाला, पाहिलेल्या मला, आता आयाळ विरहीत, आणि दात पडलेल्या सिंव्हाला, पाहायला कसंसंच वाटतं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

6 Jul 2008 - 10:17 am | प्रभाकर पेठकर

वसंता सबनिस ह्या व्यक्तीमत्त्वाची आयुष्याशी दिलेली चिवट झुंज वाखाणण्याजोगी आहे. कथानक २ भागात विस्तारून अधिक तपशीलवार केले असते तर वसंता सबनिस नांवाच्या आयुष्याचे विविध, सप्तरंगी कंगोरे वाचकांच्या समोर आले असते. (तसे ते येणे गरजेचे वाटते आहे).
लौकिक दृष्ट्या 'सामान्य' माणसाच्या आयुष्यातील 'असामान्य' धडपड हिच इतरांच्या 'उमेदवारी' कार्यकालातील प्रेरणा स्रोत ठरते. अशा धडपडीकडे 'डोळस' दृष्टीकोनाने पाहिल्यास कित्येक चिरकाल तत्वे नजरेस पडतात.असो.

ऐन तारुण्यात शिकार करणाऱ्या आयाळलेल्या सिंव्हाला, पाहिलेल्या मला, आता आयाळ विरहीत, आणि दात पडलेल्या सिंव्हाला, पाहायला कसंसंच वाटतं.

हे जरी खरं असलं तरीही, त्या वृद्ध सिंहाला आपल्या भेटीतून जुन्या स्मृतींना उजाळा मिळून, आपले ऐन तारुण्यातील काही क्षण पुन्हा जगल्याचा आनंद मिळतो. हाच आनंद त्यांच्या सद्य पोकळ परिस्थितीत उमेद जागृत ठेवण्यास आधारभूत असतो. त्यांची भेट जरूर घ्या. त्यांचे आयुष्य २-५ वर्षांनी नक्कीच वाढेल.

प्रभाकरपंतजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

खरं म्हणजे वसंत सबनीस त्याच्या ऐन उमेदीच्या पर्वा मधे माझ्या संपर्कात आला.त्यामुळे त्या पुर्वीचा त्याचा काळ हा मला फक्त त्याच्या तोंडून मिळालेल्या माहितीवर अगदी स्वल्प असा होता.आणि तो उतारवयात जाण्यापुर्वीच मी सात समुद्र पार करून त्याच्या पासून दूर आलो.आणि ह्या काळातलं त्याचं आयुष्य फक्त ऐकीवातलंच आहे.त्यामुळे आपल्या योग्य सुचनेची स्टेप घेऊ शकलो नाही.तरीपण माझ्या स्मरणशक्तिला थोडा ताण देऊन आपली सुचना विचारात घेण्याचा प्रयत्न करीन.आपल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद.
दुसरं "वृद्ध सिव्हा" बद्दलचं आपलं म्हणणं वाचून आपल्या विचाराने आता मी पण थोडा सद्गदीत झालो.नव्हे तर क्षणभर तसं मी कदाचीत लिहायला नको होतं असं ही वाटलं.पण खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्याच एव्हडा परतीचा प्रवास करण्याच्या असमर्थतेचे इंडायरेक्ट समर्थन करून समाधान होण्यासाठी लिहिलं असावं असं मला प्रांजाळपणे वाटतं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चित्रा's picture

6 Jul 2008 - 7:48 pm | चित्रा

लेखन आवडले. शेवट त्रोटक वाटला, पण त्याचे कारणही कळले.

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Jul 2008 - 9:34 pm | श्रीकृष्ण सामंत

आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

6 Jul 2008 - 8:02 pm | पिवळा डांबिस

माफ करा, सामंतजी, आमचा थोडा गोंधळ झाला.
आम्हाला शीर्षक वाचून हे सबनीस म्हणजे मराठीतले विनोदी नट/लेखक (विच्छा माझी पुरी करा चे लेखक) वसंत सबनीस वाटले. त्यांच्या आयुष्याशी थोडाफार परिचित असल्याने मग तुमच्या व्यक्तिचित्रातले सगळेच सूर मनात वेगळे लागत गेले.
पण ते सबनीस ते हेच का? नसावेत! नांवासारखी नांवं असतात म्हणा! त्यातून वसंत आणि सबनीस ही दोन्ही नांवं अगदी कॉमन आहेत कोकणात...

गोंधळलेला,
पिवळा डांबिस

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Jul 2008 - 9:42 pm | श्रीकृष्ण सामंत

आपला गोंधळ करायला मीच कारणीभूत आहे.त्या बद्दल क्षमस्व.
खरं सांगू का ते सबनीस पण मझ्या चांगले परिचयाचे आहेत्.पण ते माझ्याहूनही वयाने आणि कर्तुत्वाने मोठे आहेत्.हा आमचा मित्र एक सामान्य माणूस पण तो "माणूस" होता ह्यामुळेच त्याची आठवण काढून मी त्याच्या बद्दल लिहायला उद्युक्त झालो एव्हडेच
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रियाली's picture

6 Jul 2008 - 11:14 pm | प्रियाली

ग्रँटरोड, निवास सोडल्यावर सर्व कुडाळदेशकरांनी गोरेगावात मुक्काम ठोकला हे खरेच. लेख आवडला पण थोडा लहान वाटला. अधिक विस्तृत आवडला असता.

मधू सामंत कोण? मधुकर सामंत तर नव्हेत?

चार मुद भात,दोन वाटया माशाची आमटी, दोन तळलेली माशाची कापं,दोन चपात्या, आणि लाल भडक कोकमाचं सार

हे वाचून आजीची (वडलांची आई) आठवण येते. ती अस्सल कुडाळी कोकणी. बाकी, आमच्या मातोश्रींकडील वसईचे लोक माशाचे काप आणि कोकमाचं सार कधी म्हणणार नाहीत.

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Jul 2008 - 11:27 pm | श्रीकृष्ण सामंत

आपल्या मनात आहेत तेच असावेत्.मधूकर सामंत काही लोकांचे मास्तर गुरूजी ज्यांची संगीत क्लासेस आहेत तेच का आपल्या मनात आहेत? तेच माझे भाऊजी माझ्या बहिणीचे यजमान्.विरेंद्र सामंतचे वडिल.
वसईचे लोक मुंबईच्या संपर्कात असल्याने जरा जास्त माहिती असलेले कुडाळदेशकर.

आजीची आठवण कुणाला येणार नाही?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रियाली's picture

6 Jul 2008 - 11:30 pm | प्रियाली

नावाच्या ३-४ जणांना मी ओळखते :) त्यापैकी संगीत क्लासेस चालवणारे सामंतसरही ओळखीचे आहे. त्यांच्याकडे काही काळ मी पेटी शिकले होते. नंतर अभ्यासामुळे सोडून दिले.

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Jul 2008 - 11:40 pm | श्रीकृष्ण सामंत

दुसरे मधूकर सामंत माझे चुलत भाऊ ज्यानी "बॉम्बेचे " "मुंबई "असे कोर्टात जावून शिवसेनेची मदत घेवून बदलून घेतले ते.ते पण गोरेगावात राहतात.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रियाली's picture

6 Jul 2008 - 11:42 pm | प्रियाली

आमच्याच बिल्डींगमध्ये राहात. त्यांना सर्व एम. एल. सामंत (मधुकर लक्ष्मण सामंत) म्हणून ओळखत. काही वर्षांपूर्वी वारले. मी अगदी बॉम्बेचे मुंबईबद्दल लिहिणारच होते पण संगीत शिकवणार्‍या सामंत गुरूजींचा उल्लेख झाल्याने मी ते टाळले.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Jul 2008 - 10:08 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रियाली,
खरंच काय हा योगायोग.माझ्या सख्या चुलत भावाचं निर्वतणं काही वर्षापूर्वी झालं हे मला आज कळावं.मी त्यांच्यावर यापूर्वीच "बॉम्बेचे मुंबई"आणि माझा भाऊ मधूकर सामंत असा लेख माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर लिहिला होता.आणि मी त्याला शुभ चिंतलं होतं.
आपणाकडून कळल्या बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

7 Jul 2008 - 9:03 am | विसोबा खेचर

पैकी संगीत क्लासेस चालवणारे सामंतसरही ओळखीचे आहे. त्यांच्याकडे काही काळ मी पेटी शिकले होते

पण पुढे सोडून दिल्यामुळे भारतीय संगीत प्रियालीच्या तावडीतून बचावलं म्हणायचं! नायतर काय खैर नव्हती! :)

आपला,
(कुडाळ देशकरी सारस्वत प्रियालीचा मित्र) तात्या.

प्रियाली's picture

7 Jul 2008 - 2:40 pm | प्रियाली

पण पुढे सोडून दिल्यामुळे भारतीय संगीत प्रियालीच्या तावडीतून बचावलं म्हणायचं! नायतर काय खैर नव्हती!

अगदी अगदी! भारतीय संगितावर माझे किती थोर उपकार आहेत याची जाणीव आजच झाली. ;)