च्याई.s.s.यला परत तिचा फोन आला..

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
15 Feb 2013 - 3:23 pm

सकाळी साडेसातच्या सुमारास घर सोडले. डॉकयार्डहून बेलापूर ट्रेन पकडली. फर्स्टक्लासचे कंपार्टमेंट अन नेहमीची विंडो सीट. कॉटन ग्रीन यायच्या आधी सवयीने डोळा लागला. अर्थात तेच बरे असते, कारण पुढे वडाळ्याला कॉलेजला जाणार्‍या अठरा ते चोवीस वयोगटातील ललना (गेली दहा वर्षे मी यांवरच डोळा ठेऊन असतो) चढल्या की पापणीला पापणी भिडवावीशी वाटत नाही तिथे झोपणार काय. मग बेलापूर आल्यावर परतीच्या एका प्रवाश्याने नेहमीसारखे माझी जागा पटकावण्यासाठी मला न चुकता उठवले तेव्हाच काय ती जाग आली. तसेच अर्धवट सर्धवट मिटलेल्या डोळ्यानी पाच-एक मिनिटांची पायपीट करत ऑफिसला पोहोचलो. कॉंम्प्युटर चालू करायची कळ दाबून, पोटात लागलेल्या कळीला न्याय द्यायला म्हणून वॉशरूमला होऊन आलो. फ्रेश झाल्यावर इकडले तिकडले मेल चेक करून अदमासे साडेनऊ वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तोच पाचदहा मिनिटांतच अपेक्षेप्रमाणे फोन खणखणला. ही दिवसातली पहिली घंटा होती. धोक्याची म्हणालात तरी हरकत नाही.

"कुठे आहेस?" हेलो बोलताक्षणीच समोरून हा पहिलाच प्रश्न.
"ऑफिसला, आणि कुठे?" गेल्या सहा महिन्यात माझे हे उत्तर (त्यातील "आणि कुठे?" सह) कधीच बदलले नाही. ना तेच तेच उत्तर रोज रोज काय द्यायचे या विचाराने त्रासलेला सूर कधी बदलला. आणि तरीही समोरच्याला आपला प्रश्न बदलावासा वाटला नव्हता, कदाचित याच रसायनाला बायको असे म्हणत असावेत.

"काय करतोयस?" पाठोपाठ त्याचाच जोडप्रश्न.
"काम करतोय. आणि काय करणार?" हे ही उत्तर ठरलेलेच. पण बर्‍याचदा मग मीच त्यापुढे, "आता ऑफिसमध्ये काय झक मारणार काय?" , "आम्हाला काम करायचेच पैसे मिळतात" , "बस तुझ्याच फोनची वाट बघत होतो" असे काहीबाही जोडून संवाद रुचकर(??) बनवायचा प्रयत्न करतो.

"अरे आज पेपरवाला वेळेवर आलाच नाही, मग पेपर न घेताच निघाले तसेच. ट्रेनसुद्धा लेट होती. नशीब माझी ठाण्याची ९.३८ वेळेवर मिळाली. नाहीतर आजही लेट झाला असता कालसारखा. उगाच लेटमार्क लागला काल. आधीच सुट्ट्या संपल्या आहेत माझ्या. प्रिन्सिपल मॅमनी नियमही हल्ली खूप स्ट्रिक्ट केले आहेत. दहाचे प्रॅक्टीकल सव्वादहापर्यंत सुरू झालेच पाहिजे...."
काल जेव्हा तिला लेट झाला होता तेव्हाही हीच सारी टेप चालू होती. आणि आज जेव्हा वेळेवर पोहोचतेय तेव्हाही कालचेच रडगाणे ऐकवत होती. काहीही डोक्यात शिरू न देता कानावर जे पडेल ते तिथवरच ठेवायचा माझा प्रयत्न चालू होता. पण आजही वेगळे काही ऐकण्यासारखे नाही हे लक्षात येता मध्येच तिला टोकून थोडक्यात दिवसभरात मला करायच्या असलेल्या ऑफिसच्या कामाची व्याप्ती सांगायचा प्रयत्न केला. अर्थात टेक्निकली ते तिला समजण्यासारखे नव्हते पण निदान आज(ही) मला खूप काम आहे या भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी केले जेणेकरून दिवसभरात येणार्या फोनच्या संख्येत थोड्याफार प्रमाणात घट होईल.

पण कसले काय.. रोज मरे त्याला कोण रडे.. मी रोजच ‘आज खूप काम आहे’ असे सांगतो याचा तिच्यावर फरक थोडी पडणार होता. अकराच्या सुमारास तिचा फोन परत खणखणला. म्हणजे फोन माझाच, पण समोरून कॉल तिचा. मध्यंतरी तिच्यासाठी म्हणून वेगळी रिंगटोन सेट केली होती. तिचा फोन आल्यास रोमॅंटीक फीलींग यावी म्हणून नाही काही, तर दुरूनही न बघता हा तिचाच फोन आहे हे आगाऊ समजावे आणि त्यानुसार घ्यावा की नाही, आणि घ्यावा तर थोडक्यात कसा निपटावा याचा विचार करायला पुरेसा वाव मिळावा म्हणून. पण नंतर मला हिचे किती फोन येतात याचा रेकॉर्ड माझ्या आजूबाजूच्यांना समजायला लागल्याने परत होती तशीच सेटींग केली. तरीही आता माझा फोन वाजताच आजूबाजुच्यांना समजलेच की हा ह्याच्या हिचाच असणार, कारण वेळ ठरलेली होती ना. अकरा म्हणजे तिची चहाची वेळ. आणि चहा’ड्या करायचीही.. हक्काचे गिर्हाईक असे मी एकच ना. यावेळी घरच्या चहाड्या केल्या जातात. सुदैवाने माझ्या बायकोचे तिच्या सासूशी असलेल्या संबंधांवर एकता कपूरच्या कोणत्याही मालिकेचा प्रभाव नसल्याने हे थोडक्यात निपटते. बर्याचदा हे, "अरे मी आज असे केले, आईला (आई म्हणजे माझी आई आणि तिची सासू) हे तसे मुद्दाम केले असे वाटले नसेल ना.. अरे काल आई मला अशी म्हणाली, काय असेल त्यांच्या मनात.." असेच काहीसे मिळमिळीत असते.

आजही काही वेगळे नव्हते. सकाळी घाई झाली म्हणून चार भांडी घासायची ठेऊन तशीच निघाली होती. आणि आता आईला राग तर येणार नाही ना, आपली सून कामचुकार तर वाटणार नाही ना अशी भिती व्यक्त करणे चालू होते. मलाही घरी फोन करून आईला हे समजावून सांगायची विनंती झाली. जवळच माझ्याबरोबर काम करणारा एक ड्राफ्ट्समन हातात ड्रॉईंगशीट घेऊन मी फोन कधी खाली ठेवतो याची वाट बघत उभा होता. त्याच्यासमोर काही बोलायचीही चोरी. नुसते ह्म्म ह्म्म करणे म्हणजेही याची बायको याला समोरून झापतेय की काय असा गैरसमज होण्याची शक्यताच जास्त. शेवटी संध्याकाळी आईशी या विषयावर बोलतो म्हणून फोन ठेवला एकदाचा.

आज खरेच खूप काम होते. बरोबरच्या ड्राफ्ट्समनच्या शंकाचे समाधान करून त्याला कटवले आणि पुन्हा कॉम्प्युटरच्या डब्ब्यात तोंड खुपसले. खरे तर ऑफिसची नऊ ते साडेपाच ही वेळ कशी एकदा भरभर संपते आणि दिवसाची सुट्टी होते हेच आपल्या मनात असते.. असायला हवे.. पण कधी काम जास्त आणि वेळीच करने गरजेचे असेल तर ऑफिसमधला वेळही सावकाश जावा असे वाटते आणि नेमके याच वेळी तो भरभर जातो. त्या तोंड खुपसलेल्या अवस्थेतच घड्याळ्याच्या काट्याने एक गिरकी घेतली आणि साडेअकराचे साडेबारा झाले. नेहमीप्रमाणे साडेबाराचा अलार्म वाजला. साडेबाराची जेवणाची सुट्टी झाली हे सार्‍या ऑफिसला माझा फोन वाजल्यावरच समजते. रीमाईंडर लाऊन फोन करते की काय माहीत नाही पण अचूक ठोक्यालाच रींग वाजते.

"जेवायला नाही गेलास?" टिपिकल प्रश्न क्रमांक..... असो,

"हा, निघतोय थोड्या वेळात", कॉम्प्युटर स्क्रीनवरची नजर न हटवताच माझे उत्तर..

त्यानंतर मग ठरल्याप्रमाणे आज जेवणात काय आहे याचे डीटेल्स दिले गेले. दररोजप्रमाणे डबा खायच्या आधीच त्यात झालेल्या चुका आणि त्यामागची कारणे सांगितली गेली. हे फार गमतीशीर प्रकरण असते, म्हणजे काही ना काही रोजचे असतेच. कधी काय तर आज घाईघाईत चपात्या गरमच भरल्या म्हणून त्यांना पाणी सुटले असेल, तर कधी आज माझा उपवास असल्याने मीठाचा अंदाज आला नाही, तर कधी कूकरची शिट्टीने कसा दगा दिला आणि उसळ जास्त शिजून तिचा कसा रगडा झालाय हे सांगितले जाते. पण काही ना काही रोजच असे सांगून माझी ते अन्न झेलायची मनस्थिती बनवायच्या नादात उगाच आधीच त्या जेवणाबाबत माझे मन कलुषित केले जाते. म्हणून हल्ली मी हे फारसे मनावर घेत नाही. आज काय म्हणाली तर, फोडनीच्या भातात घातलेला कांदा दगडासारखा होता म्हणून जरा कच्चाच राहिला. दाताला थोडीशी कचकच लागेल. आता काय बोलणार, काढून काढून खाईन म्हणालो. तर सॉरी बोलून माझी मनधरणी करणे सुरू झाले. बरे हे सॉरी देखील ‘एटीकेट्स अ‍ॅंड मॅनर्स’वाले नसते तर शोन्या, मोन्या, शोनुल्या, मोनुल्या नको नको त्या नावांचा उद्धार असतो ज्याने चीड खरे तर आणखी वाढतेच. म्हणतात ना भीक नको पण कुत्रे आवर.. आता अगदीच टोकाची म्हण वाटेल ही, पण खरेच हिचे ते क्षमायाचना ऐकण्यापेक्षा तिची चूक पोटात घालणे परवडते. (इथे शब्दश: पोटात घालणे हा अर्थ घेतला तरी हरकत नाही.)

माझा हा फोन आटोपला तसे शेजारच्या मुलीने (अरे हो, माझ्या उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही शेजारी मुलीच बसतात बरं का. अंह.. विषयाशी याचा काही संबध नाही तर सहज तुम्हाला जळवायला म्हणून आपले सांगितले) मला विचारले, "चला, मग जायचे जेवायला..!" हा प्रश्न नव्हता की सूचना नव्हती. तर माझ्या बायकोचा साडेबाराचा फोन आटोपला की जेवायला उठायचे हा आमचा शिरस्ताच होता.

तर.., कांदा एवढाही कच्चा नव्हता. किंबहुना नव्हताच. उगाच काहीतरी बोलायचे म्हणून हिने काहीतरी थाप मारली का अशी शंकाही आली. किंवा कदाचित आधीच तिची चेतावणी ऐकून दगडही पचवायची मनाची तयारी करून बसल्याने मला तो कच्चा कांदाही मुलायम वाटला असावा बहुतेक. आणि असे असेल तर तिचा हा तोडगा काम करून गेला हे कबूलही करावे लागेल. असो, जेवण तर झाले आता दुपारच्या दीडच्या फोनला याचा रीपोर्टही द्यायचा होता. यावेळचा फोन म्हणजे नुसता गोंगाट असतो. कारण आता तिच्याकडे जेवणाची सुट्टी असते. तिच्या मैत्रीणींचा ग्रूप म्हणजे नुसता चिवचिवाट. आता बायकांचा आवाज म्हणून चिवचिवाट असे गोंडस नाव दिले, अन्यथा कर्णकर्कश्य कावकावाट असतो. दोन घासांच्यामध्ये एखादे वाक्य बोलतात की दोन वाक्यांच्यामध्ये एखादा घास खातात, की बोलताना तोंडाची जी हालचाल होते त्याचाच वापर करून तोंडातील घासाचे चर्वण केले जाते देव जाणे, पण पार्श्वभूमीला त्यांची अखंड बडबड कानावर पडतच असते. आमच्या हिने एकदा स्वताचे दोन घास खाऊन जेवण नक्की कसे झालेय याचा अंदाज घेतला की मग मला फोन लागतो.

"जेवण कसे झाले होते..?"

अमिताभच्या (ज्यांना शाहरुखखान आवडतो त्यांनी शाहरुख घ्या.) कौन बनेगा करोडपतीमधील करोड रुपयांचा प्रश्न.
सर्व लाईफलाईन संपलेल्या आणि कोणताही पर्याय निवडला तरी हमखास चुकणार याची खात्री असलेला, तरीही खेळ सोडून जाण्याचा पर्याय नसलेला प्रश्न.

माझे उत्तर क्रमांक एक - "मस्त झाले होते, सर्वांना आवडले. तुझी बायको खूप मस्त जेवण करते असे म्हणाले सारे.."
(तिच्या पाककलेच्या स्टॅंडर्डचा विचार करता जेव्हाही ती ठिकठाक जेवण बनवते तेव्हा माझ्या तोंडातून अशीच प्रामाणिक(?) प्रतिक्रिया बाहेर पडते.)
यावर तिची प्रतिक्रिया - "मस्करी करतोयस ना माझी.. एवढे पण काही खास झाले नव्हते..??" पाठीमागून थंड उसासा.. स्वताच्या पाककौशल्यावर केवढा हा विश्वास.

माझे उत्तर क्रमांक दोन - "भाजी बरोबर नव्हती ग, जास्त खायला नाही झाले, दोनच चपात्या गेल्या.."
(खरेच केवळ दोन चपात्या खाल्या असल्याने आणि दोन डब्यात तश्याच शिल्लक असल्याने अर्ध-उपाशी पोटातून खरे काय ते बाहेर पडतेच.)
यावर तिची प्रतिक्रिया - "मी सकाळी उठून एवढे मेहनत करून बनवते आणि तू मात्र......." पुढचे आवाज कुठूनतरी दूरवरून आल्यासारखे मी ऐकतो.

माझे सुवर्णमध्य साधायच्या प्रयत्नात दिलेले सावध उत्तर - "ह्म्म ठिक होते, संपवला पूर्ण डबा"
यावरही विस्फोट - "बस्स... ठीक होते.. हम्मम.. ठीक आहे मग.."
आता तुम्ही म्हणाल यात कसला विस्फोट?
हे तर आता आयुष्यात एका तरी बाईचा जवळून अनुभव घेतलेलाच ओळखू शकतो की यांच्या मौनात केवढे रौद्र वादळ दडले असते.
अश्यावेळी मग फोन ठेवायच्या आधी तिने काहीतरी नेहमीसारखी किटकिटच करावी असे वाटून जाते.

आणि हो, या वेळच्या फोनच्या संवादामध्ये काही बिनसले तर चालू होते एक मोबाईल मेसेजची मालिका.. कधी नुसतेच खडूस.. तर कधी आय रीअली रीअली हेट यू पासून माझ्याशी परत कधी बोलू नकोस पर्यंतचे धमकीसत्र..

आज कच्च्या कांद्याबद्दल काय बोलायचे हा प्रश्नच होता. पण माझे नशीब पक्के होते जे तिच्या डोक्यातून कच्चा कांदा निघून गेला होता, अन्यथा काहीही तिच्या मनाविरुद्ध बोललो असतो तरी तिने मला कचाकचा खाल्ला असता.

तीन-सव्वातीन वाजले, म्हणजे माझी दुपारची चहाची वेळ झाली. तसा जागेवरच येतो चहा, पण काम तेवढ्यापुरते थांबवले जाते. वाटले आता हिला फोन करावा आणि तिला जे काही बोलायचे असते ते आताच बोलायला वेळ द्यावा म्हणजे नंतर कामाच्या वेळी हिचा फोन येणार नाही. पण हा असा साधासरळ हिशोब नसतोच मुळी. एकदा चार वाजले की हिचे संध्याकाळचे लगातार फोनसत्र सुरू होते ते ऑफिसमधून निघेपर्यंत चालूच राहते. प्रत्येक फोनमध्ये एकच ज्वलंत प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे, "काम कधी संपणार आणि कधी निघणार?" रोज संध्याकाळी मी तिला वाशी स्टेशनवरून पिक-अप करतो असे आमचे रुटीन आहे म्हणून ही माझा असा पिच्छा पुरवत असते. माझे ऑफिस साडेपाचला सुटत असले तरी साडेपाचच्याच टोल्याला निघणे आम्हा ईंजिनीअर्सच्या नशीबी असे कधी नसतेच. काम काय आहे आणि किती शिल्लक आहे यावर रोजच्या रोज निघायचा टाईम ठरतो. कधी चारलाच अंदाजा येतो तर कधी सहा वाजले तरी अजून किती थांबावे लागेल याचा पत्ता नसतो. त्यामुळे चार-साडेचार, पाच-साडेपाच असे दर अर्ध्या तासाने हिचे अपडेट्स घेणे चालूच असते.

कधी मी कामात व्यस्त असतो, कधी एखादी आकडेमोड अर्ध्यावर आली असते तर कधी बॉसच्या केबिनमध्ये असतो. कधी कधी मलाच लवकर जावेसे वाटत असते पण कामाच्या रगाड्याने लवकर पळता येणार नाही म्हणून हैराण असतो. अश्यावेळी अचानक हिचा फोन आला की नाही म्हटले तरी कधी सटकतेच. आजही तेच झाले. "उगाच डोके नको खाऊस यार.. सातच्या आधी मी नाही निघू शकत.." असे बोलून खटकन फोन कट केला.

थोडावेळ शांतता झाल्यासारखी वाटली. नाही म्हणाले तरी चुकचुकल्यासारखे वाटले. क्षणाला वाटले की परत उलटा फोन करावा, पण नकोच.., कामही तसे खूप होते, आणि फोन करूनही फायदा कितपत होईल याची खात्री नव्हती. ती समोरून मौनव्रत धारण करणार आणि फोनचे मीटर फुकट चालू राहणार. अश्यावेळी आपण संयम दाखवणे गरजेचे असते, आणि मी नेमका त्याच मनस्थितीत नव्हतो. म्हणून विचार केला की त्यापेक्षा आधी ऑफिसचे काम उरकून घ्यावे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष भेटूनच काय ती समजूत काढावी. सोबतीला एखादे डेअरी मिल्कचे चॉकलेट किंवा एक प्लेट पाणीपुरी पुरेशी होती. जर त्यानेही काम झाले नसते तर मग वाशी स्टेशनबाहेरच्या केक शॉपमधील पेस्ट्रीचा वार नक्कीच खाली गेला नसता.

संध्याकाळी काम संपेपर्यंत सातचे सव्वासात झाले. फोन चेक केला तर ना तिचा मिसकॉल दिसला ना मेसेज. म्हणजे बाईसाहेब जाम रागावलेल्या दिसत होत्या. भराभर टेबल आवरले, कॉम्प्युटर बंद केला. फ्रेश होऊन आलो आणि बॅग खांद्यावर लटकवून ऑफिसाच्या बाहेर तिला फोन लावतच पडलो.

"गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. वाट पाहते मी, एका इशार्‍याची..." पुर्ण गाणे ऐकवून फोन कट झाला पण समोरून काहीच उत्तर नाही. वैतागतच पुन्हा फिरवला, पण पुन्हा तेच.. अख्खे गाणे वाजले, पण फोन काही उचलत नव्हती. कदाचित राग जरा जास्तच आला असावा. म्हणजे नुसतीच रुसली नव्हती तर थोडीशी चिडलीही होती तर.. पाच-सहा वेळा फोन करून झाला, मग मोठ्या धीराने, दिल पे पत्थर ठेऊन तिला "आय अ‍ॅम सॉरी" असा मेसेज केला. थोडावेळ झाला तरी काहीच रीप्लाय नाही. पुन्हा फोन केला, तरी उचलला नाही. मग आता एक मेसेज ऑलरेडी केलाच आहे तर लगोलग "आय लव्ह यू" सुद्धा पाठवले. ‘मीच नेहमी हे असले मेसेज पाठवते, तुला काही पडलेच नसते,’ अशी रड नाहीतरी तिची नेहमी असतेच. माझ्याकडून असले मेसेज बघून कदाचित तिचा राग निवळण्यास मदत होईल. पण कसले काय, तरीही अप्लाय अप्लाय नो रीप्लाय चालूच होते.

एव्हाना मी बेलापूर स्टेशनला पोहोचलो होतो. ट्रेन येण्यास अजून वेळ होता. प्लॅटफॉर्मवरच्या बाकडयावर बसून पुन्हा पुन्हा तिला नाद लागल्यासारखा फोन लावत होतो. दुपारी चार वाजल्यापासून तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला नव्हता. एवढा वेळ तिचा आवाज ऐकल्याशिवाय राहण्याची सवय नव्हती. टेबलावर फोन ठेऊन इथेतिथे कामानिमित्त किंवा वॉशरूमला गेली असेल म्हणावे तरी एव्हाना परत तिने जागेवर यायला हवे होते. मुळात एवढ्या उशीरापर्यंत ती कॉलेजमध्ये थांबण्याची शक्यता कमीच होती. तिचे कॉलेज पाचलाच सुटते. माझ्या अंदाजाप्रमाणे आणि तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ती कॉलेजमधून फार तर फार सहालाच निघून वाशी स्टेशनवर माझी वाट बघत बसली असावी किंवा थोडी उशीरा निघाली अन ट्राफिकमध्ये फसली तरी रिक्षामध्ये असायला हवी. कोणत्याही स्थितीत फोन तिच्या जवळच असणारच, त्यामुळे उचलायला हा हवाच. जो फोन घेऊन ती दिवसभर मला सतत पिडत असते त्यापासून ती दूर कितीशी राहणार होती. तिच्या रागालाही मी गेले दीड वर्षापासून ओळखून होतो. माझे मेसेज बघून तो निवळून तिच्याकडून प्रतिसाद अपेक्षित होता. आता मात्र माझ्या मनात भलतेच विचार येऊ लागले.

दोन-चार दिवसांपूर्वीच तिने विषय काढला होता की तू ऑफिसमध्ये उशीरापर्यंत थांबतो तेव्हा स्टेशनवर तुझी वाट बघण्यापेक्षा कॉलेजमध्येच माझे पी.एच.डी. चे काम करत थांबत जाईन. पण कॉलेजमध्ये सहानंतर सारे निघून गेल्यावर सामसूम वातावरणात थांबणे सेफ नसते असेही काहीसे म्हणत होती. आज मी उशीर होणार आहे हे कन्फर्म सांगितल्यावर कदाचित थांबली असावी आणि... नाही नाही.. काहीही काय.. ती सर्व गेल्यावर नक्कीच निघाली असावी.. पण मग फोन का उचलत नव्हती.. रिक्षा तर कुठे उलटली नसावी.. गेले दोन आठवडे सारा हायवे खोदून ठेवला आहे त्यामुळे अश्या तुरळक घटना घडल्याही आहेत. पण अपघात झाला असेल तर आजूबाजुच्या कोणीतरी फोन उचलून सांगायला हवे ना. फोन बंद नाहीये त्याअर्थी कोणी तो चोरलाही नसावा.. नाहीतर चोरणार्‍याने लगेच स्विचऑफ केला असता. म्हणजे कॉलेजमध्येच काही बरेवाईट.. छे.. विचार परत फिरून तिथेच.. एका जागेवर बसवतही नव्हते. जागेवरून उठून मी प्लॅटफॉर्मवर फेर्‍या मारू लागलो. काय करावे हेच सुचत नव्हते.

अचानक तिच्या बहिणीची आठवण झाली. अरे हो, तिचे माहेरही वाशीलाच होते. पण जवळ असूनही माहेरी वरचेवर जाणे ती टाळते. आणि त्या ही स्थितीत फोन का उचलत नाही याचा संदर्भ लागत नव्हता. तरी तिच्या बहिणीला फोन लावायचे ठरवले. निदान थोड्या वेळासाठी तरी डोक्यातील विचारचक्र थांबेल, कोणाशी तरी बोलून मनावरचे दडपण तरी हलके होईल. पण बहिणीला देखील दिवसभरात तिचा फोन आला नव्हता, की ती माहेरी देखील गेली नव्हती. मी तिच्या बहीणीशी सहज बोलल्यासारखेच बोललो. माझ्या मनातील शंका मला तिच्या डोक्यात घालायच्या नव्हत्या. पण आता पुढे काय.. हिचा शोध कसा घेणार.. एवढ्यात पोलिसात जाण्याचा विचार करण्यात काही अर्थ नव्हता. तिच्या कॉलेजलाच जायचे ठरवले. त्या आधी फोन केला तर.. पण माझ्याकडे तिच्या कॉलेजचा नंबर होता कुठे..? कॉलेजचा काय साधा तिच्या एखाद्या मैत्रीणीचा नंबरही मला स्वताजवळ असण्याची कधी गरज भासली नाही. ती माझा नंबर काही कारणांमुळे लागला नाही तर माझ्या ऑफिसच्या फोनला दणाणून सोडते, तो ही नाही उचलला तर माझ्या बरोबर काम करणार्‍या मित्राला लावते.. आणि मी मात्र.. श्या.. स्वताच्या हलगर्जीपणाचा राग येऊ लागला.

ट्रेन आली तसा यांत्रिकपणे याच विचारांत आत चढलो. आत बर्‍यापैकी खाली असूनही तिथेच दाराजवळ उभा राहिलो. दर स्टेशनला फोन फिरवत होतो. सारा वेळ आशेने त्या फोनकडे नजर लाऊन होतो की आता अचानक तिचा फोन येईल आणि मी तिला एवढा वेळ फोन का नाही उचललास, कुठे कडमडायला गेली होतीस म्हणून मनसोक्त ओरडून घेईन.. पण च्यायला तिचा फोन का येत नव्हता.. स्टेशनमागून स्टेशन जातच होते. वाशी आले तसे मी ट्रेन थांबायच्या आधीच उडी मारून उतरलो आणि गेटच्या दिशेने पळत सुटलो. जितके लवकर जमेल तितके मला तिच्या शोधात तिच्या कॉलेजला पोहचायचे होते. घाईघाईत सहज सवयीप्रमाणे ती बसते त्या बाकड्यावर नजर टाकली आणि... क्षणभर तिथेच थबकलो. नकळत पावले त्या दिशेला ओढली जाऊ लागली. बाईसाहेब मस्तपैकी पर्स मांडीवर घेऊन पुस्तक वाचत बसल्या होत्या. तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. तिने वर पाहिले. नजरानजर होताच मी काही बोलणार, विचारणार याच्या आधीच हसत, दातओठ चावत म्हणाली की अरे आज फोन कॉलेजमध्येच विसरले.. हाह.. किती मुर्ख होतो मी.. हे असेही घडू शकते हे माझ्या डोक्यात कसे आले नाही. स्वतावर हसावे की रडावे कळत नव्हते. तरीही नकळत दोन थेंब गालावर ओघळलेच..!

...तुमचा अभिषेक

कथाअनुभव

प्रतिक्रिया

शिद's picture

15 Feb 2013 - 3:38 pm | शिद

सुंदर...ओघवते लिखाण, एका दमात वाचले.

मस्त! नेहमीचीच पण क्युट गोष्ट.

आधी नेहमीची भूणभूण करून झाल्यावर "अप्लाय अप्लाय नो रीप्लाय" चा ट्विस्ट टाकलात नि मग पुढचं आपोआप भरभर वाचलं गेलं.

'साथिया' सिनेमाची आठवण झाली.

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2013 - 3:40 pm | पिलीयन रायडर

हाच.. अगदी हाच त्रास देवा एकदा माझ्या नवर्‍याला पण होऊ दे..

दया येते हो त्या नवर्‍याची. पाऽपं की हो एकदम!!

(उपेक्षितपुरुषसदस्यांप्रति सदैव कणव जागी असलेला) बॅटमॅन.

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2013 - 4:44 pm | पिलीयन रायडर

कसला डोंबलाचा उपेक्षित.. चारदा बायको फोन करते... काळजी करते तर ह्या लोकांना त्रास वाटतो.. मग आम्ही नसलो की कसं वाटतं ते नको कळायला? आणि जशी आम्ही नवर्‍याच्या फोन्ची वाट पहतो तशी एक्दा तरी नवर्‍याने पहावी.. मग कळेल..

आयो....कै खरं नै त्या बिचार्‍या नवर्‍याचं.

बाकी नवर्‍याबद्दलच्या तक्रारी सांगताना जिभेवर सरस्वतीचा गणपती डान्स सुरू होतो असे एक निरीक्षण आहे.

सारे's picture

15 Feb 2013 - 4:43 pm | सारे

पिलीयन रायडर अगदी असेच वाट्ते मलाहि....

तुमचा अभिषेक's picture

15 Feb 2013 - 8:37 pm | तुमचा अभिषेक

आमीन.. :)

मन१'s picture

15 Feb 2013 - 4:22 pm | मन१

ओघवतं.

पैसा's picture

15 Feb 2013 - 4:39 pm | पैसा

पुनःप्रत्यय.

स्मिता चौगुले's picture

15 Feb 2013 - 4:48 pm | स्मिता चौगुले

खूप आवडला लेख

छान छान... (भविष्यात आम्ही येणार्‍या बायकोशी कसे वागावे याचे धडे मिळतायत) :)

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 5:07 pm | अभ्या..

लैच बोअर. कंटाळा आला. :(

तुमचा अभिषेक's picture

15 Feb 2013 - 9:03 pm | तुमचा अभिषेक

अरे मित्रा असा रिप्लाय देऊ नकोस नाहीतर लोकांना आपण दोन्ही अभी एकच वाटायचो. नाही, ऑर्कुटवर असे बरेच चालते की आपलेच दोन प्रोफाईल काढायचे आणि उगाच आपसात वाद घालत बसायचे. टीआरपी वाढवायचा पब्लिसिटी स्टंट बोलतात याला....

जोकस अपार्ट,
प्रामाणिक प्रतिसाद आवडला,

पण तरी असे वाटते की तू अविवाहित असावास म्हणून हे तितकेसे रीलेट झाले नसावे, तरी शक्य असल्यास हे खालचेही एकदा वाचून बघशील अन सांगशील,

http://misalpav.com/node/23912

थॅन्क्स इन अ‍ॅडव्हान्स.. :)

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 9:14 pm | अभ्या..

लोकांना आपण दोन्ही अभी एकच वाटायचो

ह्म्म आहे या म्हणण्यात तथ्य. पण बरेच आहे की तुझ्या निमित्ताने मला पण थोडीफार प्रसिध्दी मिळेल इथे. ;)
बाकी ते टीआरपी, पब्लिसिटी स्टंट वगैरे मला माहीत नाही रे. मी ऑर्कुटवर नसतोच. :(
तुझा पहिला धागा वाचलाय आणि त्यावर तुला माझ्याकडून शुभेच्छा पण होत्या. :)
हलके घेतल्याबद्दल धन्यवाद. :)
- अविवाहीत अभ्या

शुचि's picture

16 Feb 2013 - 3:38 am | शुचि

सहमत

किसन शिंदे's picture

16 Feb 2013 - 6:37 am | किसन शिंदे

मी पण सहमत.

लेखन थोडं कंटाळवाणं वाटलं.

मालोजीराव's picture

15 Feb 2013 - 5:13 pm | मालोजीराव

संध्याकाळी प्रत्यक्ष भेटूनच काय ती समजूत काढावी. सोबतीला एखादे डेअरी मिल्कचे चॉकलेट किंवा एक प्लेट पाणीपुरी पुरेशी होती. जर त्यानेही काम झाले नसते तर मग वाशी स्टेशनबाहेरच्या केक शॉपमधील पेस्ट्रीचा वार नक्कीच खाली गेला नसता.

हे बाकी बरोबरे...अणुभव हाये याचा !
बाकी आमच्यासारख्या ब्याचलर लोकांस लग्नासाठी उद्युक्त करणारा लेख वाटू र्हायला !

स्पंदना's picture

15 Feb 2013 - 5:17 pm | स्पंदना

पण एव्हढ सगळ होउनही उद्या जेंव्हा तिचा फोन येइल तेंव्हा फिरुन हेच सारे विचार नाही का?

आवडल! मस्त!

तुमचा अभिषेक's picture

15 Feb 2013 - 8:42 pm | तुमचा अभिषेक

अर्थात, हे काय सांगणे झाले.. आणि हे विचार नुसते मनात येत नाहीत तर तोंडावर बोलून दाखवतो तिला.. पण आम्हाला एकमेकांशिवाय पर्याय नाही, कारण आम्ही दोघेच आहोत जे एकमेकांना झेलू शकतो, अन हेच आमच्यातील नाते आहे.. :)

प्यारे१'s picture

15 Feb 2013 - 5:47 pm | प्यारे१

मी म वर वाचलेलं.
परत एकदा वाचलं.
पुन्हा एकदा आवडलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2013 - 9:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त. सुंदर लेखनशैली.

-दिलीप बिरुटे

श्रिया's picture

15 Feb 2013 - 9:06 pm | श्रिया

लेखनशैली आवडली.
सगळ्या मुलांचं लग्नानंतर हे असंच होतं का? हे गाणं आठवलं. (नक्की आठवत नाही कदचित पल्लवी जोशी ने गायले होते).
लग्नाआधी होणार्‍या बायकोशी तासंतास दिवस-रात्र गप्पा मारणारे , लग्न झाल्यानंतर बायकोने काळजीपोटी केलेल्या फोनला ही इतके कसे काय वैतागतात?

काळा पहाड's picture

15 Feb 2013 - 9:16 pm | काळा पहाड

पल्लवी जोशी ने गायले होते.

ती सारेगामापा वाली? युक, ती गाते पण?

छान लिहिलंय.. पण काही काही ठिकाणी आजकालच्या हिंदीमिश्रीत मराठी च्यानल्सवर जशी भाषा वापरतात तसं वाचताना उगाचंच खटकलं..
उदा:
१. मध्येच तिला टोकून थोडक्यात दिवसभरात मला करायच्या असलेल्या
२. कधी चारलाच अंदाजा येतो तर कधी
३. आम्ही दोघेच आहोत जे एकमेकांना झेलू शकतो,

पण इतका 'दाग' सोडून वाचताना छान वाटलं.

तुमचा अभिषेक's picture

16 Feb 2013 - 10:41 am | तुमचा अभिषेक

वाचन फारच कमी असल्याने शुद्धलेखनाची बोंबच आहे, त्यामुळे बंबैय्या स्टाईल शब्द सवयीने वापरले जातात.
तसेच लिहून झाल्यावर जिला पहिले वाचायला देतो ती देखील कॉन्वेंटची असल्याने तिला ही हे असले शब्द खटकण्याचा प्रश्नच येत नाही.. तरीहे हे टाळायचा प्रयत्न असतोच अन पुढेही राहील.. :)

अवांतर - काही लेखांत गरज म्हणून हे असले शब्द असावेत की कुठेच नसावेत यावर वेगळे चर्चासत्र घडू शकेल.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2013 - 9:36 pm | मुक्त विहारि

छान छान..

अधिराज's picture

15 Feb 2013 - 11:00 pm | अधिराज

खूप छान!

माझ्या नवर्‍याला मात्र काळजी वाटेल याची खात्री आहे. तो फारसा त्रास करून घेणार्‍यातला नाही तरीही बायको, मुलाबद्दल नक्कीच! चला, आता लगेच फोन करते. ;)
लेखन आवडले.

फोन करूनही फायदा कितपत होईल याची खात्री नव्हती, ती समोरून मौनव्रत धारण करणार आणि फोनचे मीटर फुकट चालू राहणार.

आमच्या कडे सौ नी २२ मिनट मौनव्रत धारण करण्याचे रेकॉर्ड केले आहे .........

हस्तलेखा's picture

15 Feb 2013 - 11:18 pm | हस्तलेखा

आमच्याकदे पन अगदि अस्सच असत हो राव...पन नवरा खुप कालजी करतो बरे का....:):)

खरं सागु, थोडं लांबल्यासारखं वाटलं, काही विनोद फारच ओढुन ताणुन आहेत,अगदी अपेक्षित.अर्थात लग्नाला माझ्या ९-१० वर्ष झालेली असल्यानं असं वाटलं असेल.

बाकी लिहायची पद्धत मस्त आहे.

उपास's picture

16 Feb 2013 - 3:20 am | उपास

मुलं झाल्यावर कम्युनिकेशनचे प्रमाण नक्कीच बदलते, तस्मात.. :)

Mrunalini's picture

16 Feb 2013 - 4:00 am | Mrunalini

खुपच छान लेख... आवडेश :)

गौरव जमदाडे's picture

16 Feb 2013 - 9:31 am | गौरव जमदाडे

थोडा लांबलाय पण छान जमलंय .

आणि शेवट आवडला ........

अविनाशकुलकर्णी's picture

16 Feb 2013 - 9:51 am | अविनाशकुलकर्णी

म्स्त अभि.. लाइक

मृत्युन्जय's picture

16 Feb 2013 - 11:08 am | मृत्युन्जय

खणखणीत लेख आहे. हा मी आधी ग्यारंटीड वाचला आहे. नक्कीच गविंनी आम्हाला लिंक दिली असावी. कॉलिंग गवि. कॉलिंग गवि.

तुमचा अभिषेक's picture

16 Feb 2013 - 2:04 pm | तुमचा अभिषेक

नक्कीच शक्य आहे.. गविंना ओळखतो मी, इतर संकेतस्थळांच्या माध्यमातून.. त्यांना जर या लेखाची लिंक शेअर करावीशी वाटली असेल तर कौतुकच समजतो मी यात माझे..
आणि स्वताच्या तोंडानेच आणखी जरा कौतुक करायचे झाल्यास बर्‍याच जणांनी या लेखाची लिंक खास आपल्या जोडीदाराला पाठवल्याचे आधीही मला सांगितले आहे.. अर्थात यामागे रीलेट होणे हा फॅक्टर मोठ्या प्रमाणात काम करतो.

प्रसाद गोडबोले's picture

16 Feb 2013 - 11:26 am | प्रसाद गोडबोले

ही कथा !!

मस्तच आहे ....( एकदा माझा फोन चुकुन स्विच ओफ्फ झालेला ... घरी आले तेव्हा "इकडुन" जो राग राग झाला ....तेव्हा काही कळालेच नव्हते की काय चाललय ...जेव्हा फोन बंद आहे त्यामुळे चिंता अन त्यामुळे हा राग राग चालु आहे हे कळाले तेव्हा आत खोलवर कुठे तरी फार छान वाटले होते ...आजही तो क्षन आठवुन भारी वाटते :) )

सुहास..'s picture

16 Feb 2013 - 11:33 am | सुहास..

मैत्रीण असो वा बायडी ...मी कॉल केला की ( तिला ईनकमिंग) भरभरून बोलणार , आणि तिने केला तर मुद्द्याच आणि कट ;)

अरे पण दोघींची बिल तूच भरतोस ना?

बर ..चौघींची नाही म्हणालीस ;)

आप्पा's picture

16 Feb 2013 - 12:47 pm | आप्पा

तुमचे तुमच्या पत्नीवर खुप प्रेम आहे. अभीनंदन

सानिकास्वप्निल's picture

16 Feb 2013 - 2:00 pm | सानिकास्वप्निल

लेख आवडला
छान लिहिले आहे :)

तुमचा अभिषेक's picture

21 Feb 2013 - 9:27 am | तुमचा अभिषेक

सर्व प्रतिसादांचे एकत्रित आभार मानतो.

ऋषिकेश's picture

21 Feb 2013 - 9:59 am | ऋषिकेश

लग्न झालेले आहे.. तरीही कंटाळा आला.. अधिक आटोपशीर हवे होते :(

सुमीत भातखंडे's picture

21 Feb 2013 - 1:53 pm | सुमीत भातखंडे

.

इशा१२३'s picture

22 Feb 2013 - 2:04 pm | इशा१२३

लेख आवडला..

उत्खनक's picture

11 Jan 2016 - 1:43 am | उत्खनक

एक मस्त लेख!!!

खूप आवडले ओघवते अन् मिस्कील लेखन! बायकोला वाचायला लावले पाहीजे!! :)

जव्हेरगंज's picture

11 Jan 2016 - 9:29 pm | जव्हेरगंज

सुपरक्लास!!!

Rahul D's picture

11 Jan 2016 - 10:56 pm | Rahul D

झकास...