प्रेम दुसरं काय...!!!

उर्जिता's picture
उर्जिता in जनातलं, मनातलं
14 Feb 2013 - 8:25 pm

yes..! माझं प्रेम आहे..! म्हणजे माझं, प्रेम या कल्पनेवर आणि सतत प्रेमाच्याच प्रेमात पडुन आयुष्यभर प्रेमात डुंबुन राहण्यावर प्रेम आहे.प्रेम हे खरंतर नकळत ,आणि अगदी क्षणार्धापेक्षा कमी वेळामधे घडून जाणारं, आणि नंतर खोल खोल रुजत जाऊन प्रत्येक क्षण भारवून टाकणारं कोडं. त्याला कोडं म्हणा किंवा गणित(गणिताईतकी नीरस उपमा का देतात देव जाणे..! )ते सोडवण्यापेक्षा त्याच्या हातात हात घालून आयुष्यभर त्याच्या धुंदीत जगण्याईतकं सूख कशातच नाही.
मी सतत प्रेमात पडते.! हो ना .. कारण पडणं हीच एक अशी गोष्ट आहे जी झाल्यावरच कळते. बर आणि प्रेमात पडण्याचे माझे ठोकताळे , नियम (so called criteria)असं काही नाही. सजीव, निर्जीव , स्थुल, सूक्ष्म, साकार, निराकार अशा सर्व गोष्टी माझ्या यादीमधे येतात. म्हणजे पहा ना, ट्रॅफिकने खचाखच भरलेल्या रस्त्यावर मी गाडी वळवत असताना अचानक एक गुलाबी - जांभळं फूल सावकाश घिरटया घालत गाडीच्या काचेवर येऊन पडतं, आणि मग नियमाप्रमाणे मी त्याच्या हालचालींमधे आणि रंगात रममाण होते.दहा-वीस जणांचा घोळका करुन हॉटेल मधे गेल्या नंतर, अचानक आणखीन काही परिचयाचे चेहेरे दिसतात, आणि मग मिठया, टाळ्या, हशा, असा जल्लोष उसळतो, तो क्षण मला प्रेमात पाडून जातो. एखादी कादंबरी, कथा वाचताना त्यातील सगळी पात्रं आजुबाजुला वावरतायत असं अचानक कधी एकटी असताना वाटतं, आणि त्यांच्यातीलच एक होउन जाताना,भिती, आश्चर्य,कुतूहल अशा सगळ्या भावनांचं मिळून एक रोमांच उभं राहातं, ती जाणीव मला प्रेमात कायमची पाडून जाते. कपाट आवरत असताना नुकत्याच व्यवस्थीत घडी घालून ठेवलेल्या कपडयांची चळत चुकारपणे खाली पडते आणि खोलीभर नुसते रंग पसरतात, तेंव्हा ते इंद्रधनुष्य प्रेमात पाडतच! एखादी कविता सुचता सुचता अचानक मनासारख्या शब्दापाशी , शेवटापाशी आडते, ती हुरहूर तर अशक्य प्रेमात अलगद अडकवून टाकते.दरवर्षी वाजत गाजत येणार्‍या आणि तितक्याच धडाक्याने जाणार्‍या गणपती बाप्पांवर तर माझं हक्काचं प्रेम आहे!
प्रेम असं कोणाशी बोलायला गेलात ,तर बहुतेक वेळा सगळेच डोळे मीटून कुण्या एका व्यक्तीच्या ,कसल्याशा प्रेमात असफल झाल्याच्या आठवणींचे कढ काढण्यात मग्न होउन जातात. पण प्रेम म्हणजे केवळ ’ तडप तडप के’ कींवा ’द्रुष्टीआड होता’ अशी गाणी आठवुन ,गुणगुणत, मनात रडत कींवा कुढत बसणे नक्कीच नव्हे. मुळात आपलं स्वत:चं, स्वत:वरचं आणि जिवनावरचं प्रेम इतकं उदात्त आणि भरभरुन असावं की अशा तथाकथीत असफल प्रेमासाठी आपल्या निरागस मनात जागाच का ठेवायची? माझ्या मते प्रेम हे असफल कींवा फोल गेलेलं असुच शकत नाही, जे केवळ आनंद दायक आणि आनंद दायक आहे, ते असल्या कोत्या व्याख्यांमधे बसेलच कसं ! कारण प्रेमामधे विरह देखील आनंदच देउन जातो! कोणा एका व्यक्तीच्या प्रेमात असणं याला माझा विरोध आहे असं वगैरे नाही. ते नातं तर शब्दातीत आहे, त्या एकाच नात्यात मैत्र, जवळीक, काळजी, त्याग अशा कितीतरी भावनांचे पदर आहेत.पण त्यासुद्धा अनुभवण्यासाठी जीवनावर प्रेम असणं त्याविषयीची ओढ असणं महत्वाचं! अर्थात हे माझं पुर्णत: वैयक्तिक मत आहे, कारण मी म्हणल्याप्रमाणं मला तर प्रेमात पडायची सवयच आहे!
(मिपा वरील समिक्षकांनो क्रुपया शुद्धलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा..! )
ऊर्जिता.

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

14 Feb 2013 - 8:37 pm | अभ्या..

मिपा वरील समिक्षकांनो क्रुपया शुद्धलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा..!

काळजी करु नका. समीक्षकांचे नवीन सदस्यांवर, त्यांच्या लेखनावर फार प्रेम आहे. अगदी तुम्ही म्हण्ल्याप्रमाणे शब्दातीत आहे.

उर्जिता's picture

14 Feb 2013 - 8:58 pm | उर्जिता

अरे वा.. हे उत्तम आहे , माहितीसाठी धन्यवाद..!

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Feb 2013 - 8:59 am | श्री गावसेना प्रमुख

पण प्रेम म्हणजे केवळ ’ तडप तडप के’ कींवा ’द्रुष्टीआड होता’ अशी गाणी आठवुन ,गुणगुणत, मनात रडत कींवा कुढत बसणे नक्कीच नव्हे.

मग पुढे काय

मनोरा's picture

16 Feb 2013 - 10:52 pm | मनोरा

उर्जीता प्रेम हे काय असते गं? प्रेम म्हनजे "वेड" लागने. प्रेम म्हनजे "वेडं" करने. क्यान्सर पेक्शा घान रोग आहे हा. खल्लास!!