हझारो ख्वाहिशे ऐसी...

इष्टुर फाकडा's picture
इष्टुर फाकडा in जनातलं, मनातलं
1 Nov 2012 - 8:38 am

मित्रांनो, गविंच्या नावाने कानाची पाळी शिवून हि कथा लिहायला घेतली आहे. सुद्लेखनाच्या नावाने बोंबाबोंब आहे. हे असलं काही लिहिण्याचा फार आवाका नाही हे सांगून विनंती आहे कि ग्वाड मानून घ्या.

...म्हणून सुमे तुला सांगत होतो सोड त्या गोष्टी...नको त्या आठवणी. पर्वतीच्या एका अंधार्या कोपर्यात मी सुमीला वैतागून सांगत होतो. कदाचित तिला ते सांगत नसून स्वतःलाच समजावत होतो. कारण ती जे सांगत होती ते मला गेली सात वर्ष हवं होतं पण ते मिळण्याची वेळ चुकली होती इट वेन्ट राँग, वेरी राँग.
सुमी आणि मी माझ्या सातवीपासून एकत्रच वाढलो. आमची सोसायटी नवीन, लोक नवीन. कोवळं वय आणि तिचा सहवास. तीन वर्ष सगळं आपसूक होतं, त्यात वेगळ्या जाणीवा, 'खास' असं काही न्हवतं. पण जे माझ्या मनात आलं नाही ते पोरांनी ठरवून टाकलं. आता त्यांच्या दृष्टीने ती माझी 'स्पेशल' होती. माझ्याही काही लक्षात यायच्या आधीच मी तिच्यासाठी सारसबागेतल्या गणपतीचा प्रसाद वेगळा ठेवून देवू लागलो होतो. स्वप्नं, कविता वगैरे प्रवास इष्टमार्गाने सुरूही झाला होता. ती तशीच होती...'मोठी', समजूतदार...मला सांभाळणारी ! आताशा वाटतं कि तिलाही तेव्हाच कळाला होता बदल...कारण तिच्या सहज माझ्या डोक्यावर बसणाऱ्या टपला कमीच झाल्या होत्या. पण तिलाही ते हवं होतं. सहजसुख होतं ते. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असूनही ती अकरावीलाच होती आणि मी नववीमध्ये ! टिपिकल फिल्मी काकू, काका आणि चुलत भावंड घेवून आणि आई बाबांना लांब सोडून मी तिच्या जवळ आलो होतो. तिनेही अगदी सहजपणे मला जवळ केलं होतं. सुरुवात झाली ती पब्लिक फोनपासून ! माझ्याकडे आई ला फोन करण्यासाठी ठराविक पैसे दिलेले असायचे पण ते हलो हलो करण्यातच संपून जायचे आणि घरून फोन लावायला काकूची काचकूच असायची...साला जूनचा महिनाच भेंचोत गांडू एकदम...काय केमिकल लोचा होतो काय माहित पण त्यावेळेस घरची लय आठवण यायची. असाच एकदा टेरेस वर भोकाड पसरून रडत असताना तिने मला पकडला आणि मग तिच्या घरून फोन करणं सुरु झालं अर्थात, तिच्याकडे कोणी नसताना. पण पहिल्या फोनच्या वेळेस तिने करून दिलेला चहा अजूनही आठवतो साला. नाकाची फुर फुर, लाल डोळे, पाऊस आणि रडे आवरत बशीतून प्यायलेला तो दुधाळ चहा...च्यायला अख्या महिन्यात पहिल्यांदाच कोणीतरी एकाजागी बसवून फक्त माझ्यासाठी काहीतरी करून पुढे ठेवलं होतं...जुजबी बोलून आम्ही त्यादिवशी निरोप घेतला होता, पण आमच्या तारा नंतर जुळून गेल्या. ती तेव्हाही तशीच होती...'मोठी', समजूतदार ! कारण माझ्या आईलाही फोनवरून ती माझी काळजी करू नका असं सांगायची.
होता होता मी दहावीत गेलो आणि सगळं बदलायला लागलं. ती कॉलेज मध्ये होती आणि मी शाळेत ! तिच्याकडे सनी तर आमची कप्तान सायकल. ती लांब जातीये असं वाटयला लागलं तसं माझं निमित्त काढून भेटणं सुरु झालं. मग एस पी च्या गेटपाशी चाकातली हवाच काढून तिची वाट बघा, तिच्या दळण आणण्याची वाट बघा, तिच्या क्लासच्या आसपास घिरट्या मारा असले प्रकार सुरु झाले. अपोआपच तिच्या खिडकीच्या खालून तिला हाक मारायची लाज वाटायला लागली. तिचे फोन घरी आले कि काकाश्रीही डोळे वटारू लागले होते. मग तुटायला होत होतं...काहीतरी सुटत होतं..आणि मग ते पकडायची धडपड होत होती. अजूनही वाटतं कि का मला ती अर्चिस ची अवदसा आठवली आणि मी झक मारून तिला ते हात पकडणार अस्वल आणि ग्रीटिंग कार्ड गिफ्ट केलं? तिला ते आवडलं होतं पण तिच्या घरी येवून दिलेलं आवडलं न्हवतं. खरं तर लय लसूण करून ते सगळं जमवलं होतं, खूप काथ्याकुट करून ग्रीटिंग मधला मजकूर निवडला होता, पण काशी झाली होती. तिथून तिचं त्रयस्थ राहणं जाणवायला लागलं होतं. माझं तिच्या घरी जाणं तितकं सहज राहिलं न्हवतं तिथून पुढे. अशातच काकाश्रींनी दुसरं घर घेतलं आणि माझी दुनियाच कोसळली. आमची सोसायटी, फडक्या, राणा आणि सुमी सगळंच तुटणार होतं...आम्ही घर बदललं आणि मी फापललो. तोवर मी अकरावीला गेलो होतो आणि अजूनच वेगळ्या ठिकाणी फेकलो गेलो होतो. काकाने सायन्स घ्यायला लावलं होतं आणि वशिल्याने गरवारे मध्ये अडमिशन दिली होती. पाक भंजाळून गेलो, ते इंग्लिश घंटा कळेना. इथं तिच्यायला त्या हायफाय पोरांमध्ये जावून बोलायची सोडा पण त्यांच्या बाजूने जायचीपण हिम्मत होईना आणि त्यात ते केमिस्ट्री, फिजिक्स, बायो सगळंच अंगावर यायला लागलं. मग एकांगी व्हायला लागलो...सुमी बद्दल जे काही एकतर्फी होतं ते अजूनच इंटेन्स झालं. प्रतिसाद मिळेना आणि मग सुरु झाली गमे उल्फत ! सिगारेट, तंबाखू, खोटं बोलणं काही विचारू नका सगळं व्यवस्थित सुरु झालं. लेक्चर बंक मारून अल्पनाला जावून अचकट सिनेमे बघणे असली बंडखोरी करण्यात नाविन्य उरेनसं झालं. आणि परिणामस्वरूप आमचा दिव्य निकाल हाती आला. PCMB नापास आणि फक्त मराठी आणि इंग्रजी मध्ये ८० च्या पुढे मार्क !
दुसर्या दिवशी आमची रवानगी गावाला झालेली होती. गावतल्याच ज्युनिअर कॉलेज मध्ये पुन्हा अकरावीला प्रवेश. पूर्ण वेळ शेती आणि उरल्या वेळात कॉलेज आणि अभ्यास असा बाबांनी दट्ट्या दिला.
सुमीचा विसर पडला पण तो थोडेच दिवस. पुन्हा याही सगळ्याला रुळलो आणि येरे माझ्या मागल्या सुरु केलं. फोनवरून बोलणं सुरु होतंच. बुधवार हा गणवेशाला सुट्टीचा वार असायचा. मग झकपक कपडे घालून बिब्बेवाडीला जायला सुरुवात झाली. आमच्या गावापासून ती ३० किलोमीटरवर आणि खिशात बसला पैसे नाहीत. पण असले फालतू प्रोब्लेम मला थांबवणार न्हवते. मी मग मधल्या सुट्टीत सायकलवर टांग मारून तिच्याकडे भेटायला जाऊ लागलो. तिनेही मला त्यावेळेस का इंटरटेन केलं याचा उत्तर तिच्याकडे आजही नाहीये. पण तिने ते केलं म्हणूनच बहुतेक माझा पर्फोर्मंस सुधारला आणि अकरावीला ८८% मिळवून पहिला आलो. शिवाय महाराष्ट्र-गुजरात संयुक्त निबंध स्पर्धेमध्ये पहिला आलो. पुण्यात उत्सव मंगल मध्ये बक्षीस समारंभ झाला तेव्हा ती आली होती. काकाच्या कपाळावर आठ्या होत्या पण गेल्या टोकावर कारण तेव्हा मी सातवे अस्मान पार होतो. पार शेणात गेलेली इमेज आपण खेचून आणली होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुमी सर्वांसमोर माझ्यासाठी तिथे आली होती. तिथे फक्त तीच माझी म्हणजे माझीच पाहुणी होती बाकी सगळे फक्त होते. पुढे बारावीला बोर्डात आलो आणि पुन्हा साला गरवारेलाच काकाच्या नाकावर टिच्चून प्रवेश घेतला. आता आम्ही भेटत होतो. कधी अशोकाची सोफ्टी खायला तर कधी जयश्रीची पाव भाजी हाणायला. खरं सांगायचा तर बोलणं होतंच न्हवतं...नुसतंच सोबत असणं छान वाटायचं. एकदा कहो न प्यार हाई ला सेटिंग लावून लक्ष्मीनारायण ला तिच्याबरोबर गेलो. नंतर सारसबागेत पळण्याच्या रस्त्यावर आईस्क्रीम खात खूप वेळ चाललो. तिने गुलाबी ड्रेस घातला होता. मी काहीच बोलत नाही असं बघून तिने विचारला होतं कि बोलना काहीतरी...झाट आठवत नाही काय बोललो होतो ते. पण मी तिला सांगितलं होतं...जे काही साठवलं होतं ते, जसं जमेल तसं...आता फक्त तिच्या चेहऱ्यावरचं फुललेलं हसू आठवतं, तिचं मान वेळांवणं आठवतं, खालचा ओठ दाताखाली दाबून आकाशाकडे पाहून हसू दाबून ठेवणं आठवतं आणि बोलून बोलून माझ्या तोंडाला फेस आल्यावर तिने मला थांबवलं होतं इतकंच आठवतं.
पण त्या भेटीनंतर मी शमलो होतो. काहीतरी थंड झालं होतं. आता मी कशाच्या मागे न्हवतो. मला ती सोडून दुसरेही विचार सुचत होते. आता काही सिद्ध करायचं न्हवतं आणि काही कोणालाही करून दाखवायचं न्हवतं. पुन्हा एक शून्य पुढे आला आणि मग कलामंडळात गेलो. जाणता राजा बघून बघून ढोलकी डोक्यात गेली होती आणि ती शिकायचा मी क्लास लावला होता. शिवाय नकला, गाणे वगैरे उपजत उचापती होत्याच अंगात. सुमीला भेटत होतो पण आता ती गृहीत होती. भेटीतही मी कालामंडळ, आगम, मूड आय, फिरोदिया आणि पुरुषोत्तम हेच सांगत असे. बक्षिसे मिळत गेली आणि मी तिथे रमलो...सुमीही कोणीतरी समीर काळेचा विषय काढून बसत होती. आता आम्ही दोघांनाही हार जाणार न्हवतो. जो आधी कबूल होईल तो हरणार होता. आणि वयातल्या फरकामुळे किंवा तिच्या घरी कुणकुण लागल्यामुळे ती बोलणार न्हवतीच. बॉल माझ्या कोर्टात टाकून ती त्या सम्याचे विषय काढून मला टोचत होती पण मीहि माजलो होतो. आमच्या एस वायच्या परीक्षा आणि स्पर्धा आल्या आणि आमचं भेटणं कमी झालं. त्या शहाणीनेही भेटण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि मध्ये दोन महिने आम्ही भेटलोच नाही.
आणि एक दिवस अचानक मला अमितचा फोन आला कि सुमीला समीरचं स्थळ सांगून आलं आहे. माझ्या कपाळात गेल्या. हे होणं अतिशय नॉर्मल होतं. कारण ती मास्टर्स करत होती आणि मी थर्ड ईयर ला ! माझ्या पायाखाली पुन्हा जमीन हलली होती कारण माझं वय आडवं आलं होतं. मी बेटर अर्ग्युमेंट देवू शकतच न्हवतो. म्हणून मी नेहमीच्या सवयीप्रमाणे पुन्हा कोशात गेलो.

क्रमशः :)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Nov 2012 - 8:56 am | प्रचेतस

छान सुरुवात.

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Nov 2012 - 9:20 am | श्री गावसेना प्रमुख

येवु देत लवकर 1

गवि's picture

1 Nov 2012 - 10:11 am | गवि

वा... वाचतोय..

बाकी.. "पाक भंजाळून गेलो" ही वाक्यरचना वाचताच एकदम सांगलीच्या गावभागात पोचलो.. :)

बॅटमॅन's picture

1 Nov 2012 - 2:00 pm | बॅटमॅन

किंचित असहमत. भंजाळणे हे क्रियापद सांगली-मिरजेकडे तितकेसे प्रचलित नाही. बाकी "पाक ^&* झालो" ही रचना आहेच.

ते भंजाळणे बाबत नसून पाक बद्दल आहे. ;-)

बॅटमॅन's picture

1 Nov 2012 - 2:57 pm | बॅटमॅन

पाक सहमत हाय :)

नगरीनिरंजन's picture

2 Nov 2012 - 3:20 pm | नगरीनिरंजन

'भंजाळणे' हा प्रकार नगरसाईडच्या दुष्काळी भागात फार होतो.

एकदम सुपर फास्ट कथा. बरच काही पटल लिखाणातल. आवडल.
बाकि गुरु महाराज गवी की जय!

चिगो's picture

1 Nov 2012 - 12:29 pm | चिगो

सुटलायत तुफान.. पुढचा भाग टाका लवकर..

बॅटमॅन's picture

1 Nov 2012 - 2:01 pm | बॅटमॅन

कथा लै जिकलेय!!

५० फक्त's picture

1 Nov 2012 - 2:25 pm | ५० फक्त

छान सुरुवात,

परिच्छेद पाडायचं पहा तेवढं.

sagarpdy's picture

1 Nov 2012 - 3:13 pm | sagarpdy

पु. भा. प्र.

क्रमशः आवडलं. पुढचा भाग कधी टाकताय?

मी_आहे_ना's picture

2 Nov 2012 - 2:35 pm | मी_आहे_ना

भारी सुरुवात... पु.भा.प्र.
('पाक' वरून सांगली आठवली पण 'रां&&च्या', 'सु&&च्या' नसल्यानं थोडं चुकल्या सारखं वाटलं)
:)

सस्नेह's picture

2 Nov 2012 - 2:54 pm | सस्नेह

एकदम प्रॅक्टिकल आहे कथा.
पु.भा.प्र.
अवांतर : पहिलं वाक्य चुकून, 'गविंच्या कानाची पाळी शिवून हि कथा लिहायला घेतली आहे'
असं वाचलं....

इष्टुर फाकडा's picture

3 Nov 2012 - 3:06 pm | इष्टुर फाकडा

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद :)

अमृत's picture

6 Nov 2012 - 2:59 pm | अमृत

लिखाण आवडले...दोन परिछेदांमधे थोडी रिकामी जागा ठेवा की..पण दोन भागात मात्र नको :-)

अमृत