शापित गंधर्व

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
11 Aug 2012 - 8:54 am

अनिल परांजपे नावाच्या असामीचं वर्णन एवढ्याच शब्दांत करता येईल.
गंधर्व म्हणण्याएवढा तो देखणा नव्हता, पण व्यवस्थित राहिला तर बरा दिसेल, असं नक्कीच वाटायचं. स्वर्गीय सौंदर्य नसलं, तरी स्वर्गीय बुद्धिमत्ता त्याच्याकडे होती. मी बारावीनंतर पत्रकारितेत (धड)पडलो, तेव्हा अनिल परांजपेच्या नावाची रत्नागिरीत जोरदार हवा होती. रत्नागिरी टाइम्समध्ये तो नोकरी करायचा. तेव्हा फक्त त्याच्या टिंब टिंब स
्वरूपातील लिखाणाच्या शैलीवरून आणि आक्रमक, थेट बातम्यांवरून तो माहिती होता. 1993 मध्ये मी दै. सागर साठी रत्नागिरीत काम करू लागलो, तेव्हा पत्रकार परिषदेत कधीतरी त्याची भेट झाली असावी. खोल गेलेले पण भेदक डोळे, डोळ्याला लोकमान्य टिळकांच्या फ्रेमचा जाड भिंगांचा चष्मा, गोरा वर्ण, तपकिरी पडलेले दात. अंगात मळकट आणि बिनइस्त्रीचा बुशशर्ट आणि पॅंट असा त्याचा अवतार असायचा. कुणाच्या तरी गळ्यात पडून त्याच्या स्कूटरवरून तो पत्रकार परिषदेत किंवा एखाद्या घटनास्थळी पोहोचण्याच्या गडबडीत असायचा. तिथे पोहोचल्यावर मात्र पत्रकार परिषद घेणा-याची काही धडगत नसायची. त्यांच्याकडून एखादं चुकीचं विधान झालं, तर अनिल त्यांच्यावर तुटून पडायचा. सागरनंतर मी सकाळच्या रत्नागिरी कार्यालयात काम करायला लागलो. त्यावेळी रोज पोलिस स्टेशनमध्ये फेरी मारावी लागायची. कधीकधी पोलिस अधीक्षकांकडेही आम्ही जायचो. तिथे अनिल परांजपे हमखास भेटायचा. आम्ही ज्या माणसाला भेटायला जायचो, त्यालाच भेटल्यानंतर अनिलने दिलेली बातमी वेगळीच असायची. ही त्याची खासियत मला बुचकळ्यात पाडायची. रत्नागिरीत तेव्हा स्टरलाइट या कापर स्मेल्टिंग प्रकल्पाविरुद्ध जोरदार आंदोलन सुरू होतं. रत्नागिरी टाइम्सने स्टरलाइटच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. अनिल परांजपे हा मोहराच तेव्हा त्यांना हाताशी मिळाला होता. अनिल परांजपेच्या बायलाइनखाली रोज धडाक्यात अऩेकांच्या प्रकल्पविरोधी मुलाखती, बातम्या छापून यायच्या. जवळपास महिना-दोन महिने रोज त्याचंच नाव आणि आठ कालम हेडिंग, असा नियम ठरून गेला होता. (तसंही रत्नागिरी टाइम्सला आठ कॅलमपेक्षा कमी हेडिंग असू शकतं, हे मान्यच नाही. अपवाद फक्त सणांच्या दिवशी गळ्यापर्यंत असलेल्या जाहिरातींचा.) अनिल परांजपेची प्रत्येक बातमी त्याच्या स्टाइलमध्ये असायची. बहुतेक ठिकाणी टिंब टिंबांचा वापर ही त्याची खासियत.
मला त्या वेळी त्याचं फार अप्रूप वाटायचं. पत्रकार म्हणजे केवढा मोठा माणूस, त्यातून मी पत्रकारिता करणार म्हणजे असाच मोठा माणूस होणार, अशा काहीतरी खुळचट कल्पना डोक्यात होत्या. त्यामुळे मी जसं अनिल परांजपेचं रोज पेपरमध्ये ठळकपणे येणारं नाव वाचून त्याच्याबद्दल आकर्षण बाळगून होतो, तसंच सर्वसामान्य नागरिकांनाही असेल, असं मला वाटायचं. एकदा तो आणि मी रिक्षातून कुठेतरी जात होतो. तो उतरून गेल्यावर मी रिक्षावाल्याला म्हटलं, ``माहितेय का, कोण बसलं होतं रिक्षात ते? ``
तो म्हणाला ``नाही.``
मी म्हणालो, ``अनिल परांजपे होते ते.``
त्यानं चेहरा तेवढाच निर्विकार ठेवत विचारलं, ``कोण अनिल परांजपे?``
मी खाऊ का गिळू नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. पण त्याला त्याचं सोयरसुतक नव्हतं. रत्नागिरीत रोज ज्याच्या बातम्या चवीचवीनं वाचल्या जातात, तो माणूस तुला माहित नाही का रे अडाण्या, असं माझं झालं होतं.
मी त्याला तोंडावर अहो-जाहोच करायचो, पण त्याला तसं अपेक्षित नव्हतं. पाठीमागे मात्र त्याचा उल्लेख एकेरीच व्हायचा.
रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये मी काम करायला लागल्यावर आम्ही सुदैवानं एकत्र आलो. त्यावेळी मी आपलं बरं, आपण बरं या प्रवृत्तीचा होतो. (आतासुद्धा फार बदल झालाय अशातला भाग नाही.) पण हा परांजपे अतिशय हरहुन्नरी आणि तेवढाच सटक, विक्षिप्त. तो तेव्हा रत्नागिरी टाइम्समध्ये भांडून एक्स्प्रेसकडे आला होता. त्याची बातम्यांची कॅपी अगदी पाहण्यासारखी असायची. डाव्या बाजूला दणदणीत समास सोडून आणि वर हेडिंगसाठी अर्धेअधिक पान जागा सोडून तो लिहायला सुरुवात करायचा. जवळपास एकटाकीच लिखाण असायचं. एका पानावर एकच परिच्छेद. शक्यतो एका परिच्छेदातलं वाक्य दुस-या पानावर जायचं नाही. खाडाखोड वगैरे असण्याचा तर संबंधच नाही.
त्याच्या वाचनाबद्दल मला फारशी माहिती नव्हती. पण लिखाण मात्र अफाट होतं. अर्थात, बातम्यांशी संबंधित विषयांच्या पलीकडे तो कधी काही लिहीत नसे. आम्ही त्या पेपरमध्ये असताना वाजपेयींचं तेरा दिवसांचं सरकार गडगडलं होतं. त्यावेळचं वाजपेयींचं भाषण टीव्हीवर एकदा ऐकून परांजपेनं एकटाकी जसंच्या तसं लिहून काढलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाबद्दलही तेच. रत्नागिरीत कधीतरी सठीसहामाशी एखादा खून व्हायचा. त्या घटनेपासून ते केसचा निकाल लागेपर्यंत त्याची चर्चा शहरभर असायची. रत्नागिरी टाइम्समधल्या खुनाच्या वर्णनाच्या, खटल्याच्या सुनावणीच्या रसभरीत बातम्यांचा ही चर्चा सुरू ठेवण्यात सिंहाचा वाटा असायचा. परांजपे ज्या प्रकारे खुनाच्या आणि त्यानंतरच्या तपासाच्या बातम्या इतक्या रसभरीत वर्णन करून लिहायचा, की त्यावरून तो त्या गुन्हेगारांबरोबरच राहत असावा की काय, अशी शंका यायची. अगदी त्यांनी कुठे चहा घेतला, कुठे मिसळ खाल्ली, त्यावेळी काय शेरेबाजी केली, याविषयीचा इत्थंभूत वृत्तांत त्यात असायचा. पेपर त्यामुळे हातोहात खपायचा, हे वेगळं सांगायला नकोच.
त्याचा विक्षिप्तपणा हासुद्धा आमच्या चर्चेचा विषय असायचा. आमच्या पेपरचं आफिस कुवारबावच्या एमआयडीसीमध्ये होतं. रस्त्याच्या पलीकडच्या वसाहतीत एका भाड्याच्या खोलीत तो राहायचा. त्याला व्यसनांचा भरपूर नाद होता. कधीकधी हुक्की आली, ती संध्याकाळी मला स्कूटर काढायला सांगून घरी घेऊन जायचा. तिथे बाटली ठेवलेली असायची. पाच मिनिटांत कच्चीच टकाटक मारायचा आणि लगेच माझ्याबरोबर आफिसला यायला तयार. परत येताना मध्येच कधीतरी खाली गावात जायची त्याला लहर यायची. मग जेके फाइल्सला सोड, मारुती मंदिरला सोड, जयस्तंभावर सोड, असं करत स्टॅंडपर्यंत त्याला लिफ्ट द्यायला लागायची. तिथून परत बोंबलत आठ किलोमीटर स्कूटर ताबडत येताना वैताग यायचा.
ज्यांच्या तोंडावरची माशी उडत नाही, अशा कथित नेत्यांच्या रत्नागिरी टाइम्समधील `स्टरलाइट`विरोधातील आवेशपूर्ण आणि आक्रमक मुलाखती वाचून त्या वेळी स्फुरण चढायचं. पण ही सगळी परांजपेच्या लेखणीची कमाल होती, हे नंतर त्याच्यासोबत काम करताना कळलं. एकदा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला मी त्याच्यासोबत गेलो होतो. त्या वेळी राजाभाऊ लिमये हे कसलेले कॅंग्रेस नेते अध्यक्ष होते. विरोधक अगदीच लिंबू-टिंबू होते. राजाभाऊ त्यांना सहज गुंडाळून ठेवत. त्या सभेतही असंच झालं. आम्ही संध्याकाळी आफिसात आलो. परांजपेनं बातमी लिहून टाकली. मी ती तेव्हा वाचली नव्हती. सकाळी पेपरमध्य बातमी वाचून मी हादरलोच. विरोधकांनी आक्रमकपणे सभागृह डोक्यावर घेतलं, राजाभाऊंना पळता भुई थोडी केली, असे उल्लेख त्यात होते. त्यामागचं प्रयोजन कळलं नाही, पण पराजंपेच्या बातम्यांमध्ये सगळेच जण `जळजळीत, कडक, निर्वाणीचा इशारा` कसे द्यायचे, याचं रहस्यही कळलं.
आमच्या आफिसच्या जवळपास कुठलंही हॅटेल नव्हतं. रात्री दहानंतर जेवायची बोंब व्हायची. मग आम्ही काम संपल्यावर रात्री माझ्या स्कूटरवरून बोंबलत स्टॅंडपर्यंत जायचो. तिथे मंगला हॅटेलमध्ये परांजपेबरोबर 15 रुपयांची पावभाजी खाल्लेलीही आठवतेय. एकदा रात्री उशिरा काम संपवून आम्ही स्टॅंडकडे निघालो होतो. ट्रिपलसीट होतो. सोबत परांजपेही होता. जयस्तंभाजवळ रात्रीच्या गस्तीवरील एका पोलिसाला आम्हाला पोलिसी खाक्या दाखवायची हुक्की आली. त्यानं लायसन्स दाखवा वगैरे सोपस्कार सुरू केले. परांजपे थेट तिथून कुठलातरी फोन शोधून डायरेक्ट एसपींना फोन करायच्या प्रयत्नाला लागला. त्याचं आणि पोलिसांचं आधीच वाकडं होतं. अनेक प्रकरणांत त्यानं पोलिसांचे वाभाडे काढले होते. आम्ही पोलिसांना आमच्याबद्दल सांगूनही ते बधायला तयार नव्हते. शेवटी माझी स्कूटर असल्यानं मला पोलिस स्टेशनला जावं लागलं. त्यावेळी रिपोर्टिंगसाठी रोजच स्टेशनला जात असल्यानं तिथे अनेक जण ओळखीचे होते. मला त्यांनी लगेच घरी जाऊ दिलं. दुस-या दिवशी सकाळी स्टेशनवर हजेरी लावायलाही सांगितलं. इन्स्पेक्टरना भेटून लगेच मी बाहेर पडलो. पण परांजपेवर पोलिसांना हूट काढायचा होता, असा अंदाज आला.
मी एक्स्प्रेसमध्ये सिनेमाच्या पुरवणीचं काम बघायचो. एका नववर्षाची पुरवणी खूप मेहनत घेऊन केली होती. भरपूर फोटो वापरून लेआऊटवर काम केलं होतं. उपसंपादक म्हणून माझं हे त्या वेळचं सगळ्यात महत्त्वाचं काम. पण कौतुकाऐवजी व्यवस्थापनाच्या एका शुंभानं एवढे फोटो वापरून निगेटिव्ह वाया घालवली म्हणून माझ्याविरुद्ध तक्रारच केली होती. माझं खरं कौतुक केलं ते परांजपेनं. त्यामुळे मला अगदी कृतकृत्य वाटलं.
परांजपे मधूनच गायब व्हायचा. त्याच्यावर भरवसा ठेवून एखादं काम केलं, तर आपण मातीत जाणार हे नक्की. पैसे उधार मागायचीही वाईट खोड त्याला होती. कुणापुढेही हात पसरायचा. बरं, पैसे परत केले नाहीत वगैरे खंत त्याच्या गावीही नव्हती. कधीतरी रस्त्यात नारायण राणेंची गाडी दिसली आणि ते अचानक मुंबईला घेऊन गेले, अशा कहाण्या सांगायचा. त्यात तथ्य होतं, हे नंतर समजलं.
मी रत्नागिरी सोडल्यानंतर मात्र त्याचा आणि माझा काहीच संबंध आला नाही. खरं तर त्याच्या एकदोन वर्षं आधीच तो रत्नागिरीतून गायब झाला होता. बहुधा राणेंच्या आफिसमध्ये असतो, असं ऐकलं होतं. राणे कुठलातरी पेपर काढणार आहेत, अशी चर्चा तेव्हापासून होती. परांजपे त्यात जाईल, असंही सांगितलं जात होतं. पुण्यात आल्यावर इथे `केसरी`मध्ये असतानाही त्याचं काम गाजलं होतं आणि त्यानं काही जणांकडे परतफेड न केली जाणारी उधारी केली होती, असंही कानावर आलं.
माझा रत्नागिरीच्या पत्रकारितेशी संबंध संपला आणि अनिल परांजपेशीही. आज अचानक त्याच्या मृत्यूची बातमी वाचून जुन्या आठवणी दाटून आल्या.
बुद्धिमत्तेला विक्षिप्तपणाचा, गूढतेचा शाप असावा, असं विधिलिखितच आहे काय?

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

व्यक्तिचित्र उत्तम उतरलं आहे.

अँग्री बर्ड's picture

11 Aug 2012 - 9:50 am | अँग्री बर्ड

मस्त ! आवडले

प्रभाकर पेठकर's picture

11 Aug 2012 - 10:06 am | प्रभाकर पेठकर

'व्यक्तिचित्र' थोडंफार जमलं आहे पण गंधर्व ही उपमा पटली नाही. गंधर्व हे स्वर्गातील गायक. त्यामुळे 'स्वर्गीय आवाज' लाभलेल्या गायकाला गंधर्व असं संबोधलं जातं.

श्री अनिल परांजपे ह्यांना फारातफार धडाडीचे यशस्वी पत्रकार असे म्हणता येईल.

आपला अभिजित's picture

11 Aug 2012 - 4:04 pm | आपला अभिजित

पृथ्वीवर अवतरणं हा ज्याच्यासाठी शाप आहे, अशा व्यक्तीला शापित गंधर्व म्हणतात. त्यामुळे हा उल्लेख मला चुकीचा नाही वाटला. गंधर्व म्हणजे गायक, ही व्याख्या प्रत्येक ठिकाणी लावणं योग्य नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Aug 2012 - 6:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शापित यक्ष चालेल का ?

बाकी लेख आवडला.

अप्पा जोगळेकर's picture

11 Aug 2012 - 4:46 pm | अप्पा जोगळेकर

व्यक्तीचित्र आवडले.

शैलेन्द्र's picture

11 Aug 2012 - 5:06 pm | शैलेन्द्र

शैली आणी चित्रण दोन्ही आवडलं.

मन१'s picture

11 Aug 2012 - 6:26 pm | मन१

आवडले. अशी माणसं पाहण्यात्/ऐकण्यात आहेत.
गंधर्व हे नाव मात्र पटले नाही.

आपला अभिजित's picture

14 Aug 2012 - 7:43 am | आपला अभिजित

यक्ष हे नाव आवडले. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Aug 2012 - 12:16 pm | llपुण्याचे पेशवेll

अनिल परांजपे यांच्या बद्द्ल कुतूहल वाटल्याने सहज या नावाने गूगलून पाहीले तर पहील्या पानावर केवळ एक बातमी दिसली. त्यातही
"रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अनिल परांजपे यांचे साखरपा येथील राहत्या घरी निधन झाले. आपल्या आगळ्यावेगळ्या लेखनशैलीने त्यांनी आपला स्वतंत्र वाचकवर्ग निर्माण केला होता. रत्नागिरी टाइम्समधून त्यांनी आपल्या आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. अन्यायाविरुध्द आवाज उठविताना त्यांची लेखणी अधिक आक्रमक व्हायची. धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वेगवेगळ्या रुग्णांलयांमध्ये त्यांच्यावर उपचार झाले होते. मृत्यूसमयी ते ५२ वर्षे वयाचे होते. "
इतकेच सापडले. आता जास्त खोलात जाऊन शोधावे लागेल.

पैसा's picture

14 Aug 2012 - 7:43 pm | पैसा

व्यक्तीचित्र उत्तम लिहिलं आहेत. रत्नागिरी टाईम्सच्या भुतेंबरोबर ओळख आहे. पण रत्नागिरी सोडून गेली २० वर्षं आता गोव्यात राहते त्यामुळे परांजपेंबद्दल माहिती नव्हती. रत्नागिरी टाईम्सच्या हेडलाईन्सबद्दल वगैरे वाचून हसू आलं, तो पेपर सुरुवातीपासून तसाच आहे! :)