शुक् शुक्

आनंद भातखंडे's picture
आनंद भातखंडे in जनातलं, मनातलं
18 Jul 2012 - 2:50 pm

“सांजच्याला सूर्य बुडायची येळ आणि धोंडीबाची म्हस अडयची वेळ एकच येनार आणि वरून आज अमोश्या? मागच्या दोन चार टायमाला म्हशीची वीत जगतच न्हवती. कालच पारावर भेटला तवा उगा बोल लावत बसला होता. कुणाचा तरी कोप झालंय, मरीआईला बोकड द्यायला हवा. आणि नेमका मी भेटलो तसं लोटांगण घातलं, म्हनला या खेपेस या. तुमचा हात लागला तर ही वीत नक्की जगलं. आता मी काय द्येव हाय? जायला काय न्हाय पण येताना रातच्याला पंचायीत…. बरं घरी शहरातून पोरगं आलाय … कारभारणीने मस्त मटन केलंया. म्हन्जे रातच्याला परतायलाच हवं” सकाळचा बाजार उरकून घरी जाताना सदुभाऊ सवताशीच बडबडत जात होता.

गाव तसं लहानच ५ – ५० घरांच. गाव कसलं मोठा पडाच तो. शेती आणि जंगलामुळे विखुरलेली घरं. गावच्या मध्यभागी चावडी, पंचायत आणि बाजार. सरकारी परिवहनाचा लाल डब्बा दिवसातून ३ फेऱ्या मारायचा. गावात म्हातारी मंडळीच जास्त, तरुण मंडळी सगळी शहराकडे. गावात शहरीकरणाच्या दोनच खुणा, एक म्हणजे बेभरवशी वीज आणि हातावर मोजण्या इतके दूरध्वनी संच. “शेल्फोन” एकच, तो सुद्धा फक्त सरपंचांकडे. “ब्येश्नेल” ची कृपा. सदुभाऊ गावातला वैदू, अगदी माणसांपासून प्राण्यांवर उपचार करणारा. हाताला चांगलाच गुण होता त्याच्या. वैदू हा त्याचा पिढीजात धंदा, प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला दिलेला. अडल्या पडल्या माणसाला मदत करण्यात, त्याच्यावर उपचार करण्यात सदूने कधीही हयगय केली नाही. सदुभाऊच्या मुलाने, सखारामने अगदीच परंपरा सोडली नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी एका आयुर्वेदिक औषधांच्या कारखान्यात कामाला होता. सखाराम यशोदेला, आपल्या बायकोला आणि मुलगा किसन यांना घेऊन २-४ दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आला होता. रात्री मटणाचा बेत ठरवल्यामुळे सदू बाजारातून मटन घेऊन जात असतानाच धोंडीबाने संध्याकाळी त्याच्या कडे येण्यासाठी गळ घातली आणि धंद्याचे इमान राखण्यासाठी सदू तयार झाला. सदुभाऊ तसा धडधाकट, वयाच्या पन्नाशीत देखील २-४ जणांना लोळवेल असा गावरान गडी पण अंधाराला प्रचंड घाबरायचा. घरातली वीज गेली की झोपताना देखील ३-४ कंदील लावून झोपायचा. त्यात भर म्हणजे त्याचं घर गावाच्या वेशीवर, वस्तीपासून लांब. धोंडीबा कडून येताना अंधार पडेल म्हणून तो जरा कुरबुर करत होता.

संध्याकाळी ५:३० च्या सुमारास धोंडीबा धावत धावत सदुभाऊकडे आला. पडवीतून त्याने हाक मारली “सदू चल बिगीनं, म्हस लई वरडतिये. कुठल्याबी वाख्ताला वील”. काहीश्या नाखुशीनेच सदू धोंडीबा बरोबर निघाला. पडवीत उभं राहून एक तमाखुचा बार भरला. पाठीवर जडीबुटीची झोळी टाकली, हातात काठी आणि येताना अंधार पडेल म्हणून एक कंदील बरोबर घेतला, बायकोला हाकाटी केली आणि धोंडीबा बरोबर गावाकडे निघाला. मुख्य रस्त्याने जायला अर्धातास लागेल म्हणून आडवाटेने दोघे चालू लागले. ही पाऊलवाट बापदेवाच्या देवराई मधून जात होती. देवराईच्या घनदाट झाडीत सूर्याच्या किरणांना पण प्रवेश नव्हता. पायात घातलेल्या वाहाणांच्या आवाजा बरोबर सुकलेल्या पानांची कर कर, मध्येच वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ आणि या सगळ्यावर रातकिड्यांचे कर्कश्य आवाज वातावरणातील भेदकता वाढवत होते. धोंडीबाला काहीच वाटत नव्हतं. सदुभाऊ असल्याने तो मस्त शीळ घालत निश्चिंत चालत होता. आधीच भेदरलेला सदू वैतागून म्हणाला “जरा गप् रा की उगा त्वांडाची पिपानी कर्तुया. राना वनात शीळ घातली की कीडं माग काढतात म्हाईत न्हायी व्हय?” वाटेत लागलेल्या बापदेवाला नमस्कार करून २० मिनिटाच्या पायपिटीनंतर दोघे धोंडीबाच्या घरापाशी पोचले.

धोंडीबाच्या म्हशीची अवस्था एकंदरीत बिकट होती. पोट फुगलेलं, हंबरून दमल्या मुळे जीभ बाहेर लटकत होती. गोठ्यामध्ये शेणाचा सडा पडून राडा झाला होता. सदू ने तिला पाणी पाजलं आणि झोळीतून आणलेला कसला तरी पाला खायला दिला. म्हैस थोडी शांत झाली. धोंडीबा म्हणाला “चल कारभारणीने चा टाकलाय. चा पी, पान सुपारी घे आणि मग लागू कामाला”. चहा पिवून झाल्यावर सदू ने धोंडीबाला गोठ्यातले शेण काढून गोठा साफ करायला सांगितला. खराब झालेली चादर जमिनीवर घालायला सांगितली आणि २ हांडे गरम पाणी आणायला सांगितलं. परत सदूने म्हशीला काही खायला दिलं आणि कसलं तरी तेल तिच्या मागे लावलं आणि म्हणाला “धोंडीबा … काय बी कर पण प्वार हुईस्तो हिला बसू देऊ नगं”. “व्ह्यय, जी” म्हणता धोंडीबा लक्ष ठेऊन होता. म्हैस बसायला लागली की “च्याक च्याक, ए ह्या ह्या ह्या बसू नग … तरास हुईल” असं कधी प्रेमाने तर कधी “ए रांडे, बसू नग म्हनल तरी बसत्ये काय?” असं म्हणत तिच्यासमोर उगीच काठी हलवायचा. इथे सदुभाऊ बाकीची तयारी करत होता. तासाभराच्या प्रयत्ना नंतर एकदाची म्हैस व्यायली. सगळं व्यवस्थित आहे बघून घामाघूम झालेले सदू आणि धोंडीबा गोठ्याच्या पायरीवरच बसले. म्हशीच्या चिंतेतून मुक्त झालेल्या सदूला आता चिंता लागली होती पडलेल्या अंधाराची.

सदुभाऊ आणि धोंडीबा घरात आले. धोंडीबाच्या बायकोने आधीच कंदील साफ करून, वात लावून ठेवला होता. सदुभाऊ हळूच धोंडीबाच्या कानात कुजबुजला “लई घाम गाळला तुझ्या म्हशीनं. काही शेर पावशेर हाये काय जरा घसा गरम कराया? आता रानातून एकलाच जानार, जरा बर वाटतं”. धोंडीबा खुश “अरं, हाये मंजी? एकदम ताजी आनी पिवर, मोहाची हाय, कालच मंगू कातकरी देऊन गेलं” दोघांनी मिळून घसा गरम केला आणि सदुभाऊ वाटेला लागला. कडक मोहाच्या दारूची चांगलीच झिंग चढली होती. चालता चालता “असं पिलेल्या मानसास्नी द्येव बी बिचकून असत्यो असं म्हनत्यात. आता मला कुनाचीच भीती न्हायी मंजे न्हायीच” असं काहीतरी बरळत होता. “ह्यो रस्ता लई लांबचा हाय आणि त्यात मदोमद सम्शान बी लागतंय. अरे द्येवा मंजी अंधार बी आणि भूतं बी. चायला आली का पंचाईत … त्या परीस राईतली वाट बरी, बापदेव असल साथीला.” कंदील फुल मोठा करून सदू राईच्या वाटेला लागला.

गावचे दिवे दूर दूर जाऊ लागले आणि अंधार अधिक गडद झाला. कंदील, हातातली काठी सरसावली, झोळी काखेत घट्ट मारली आणि सदूभाऊ त्या अंधारात शिरला. अमावस्या असल्याने सगळी कडे मिट्ट काळोख आणि सदूच्या कंदिलाचा जेमतेम २-३ फुटावर पडेल इतका प्रकाश. मगाशी येताना वाटलेली राईतील परिस्थिती अजूनच भयाण वाटत होती. जमिनीवरचा पालापाचोळा तुडवताना होणाऱ्या त्याच्या वाहाणेच्या आवाजाबरोबरच अजून एक वेगळा आवाज आला म्हणून त्याने नीट बघितलं तर एक जनावर त्याच्या काठी जवळून सळसळत गेलं. सदूची मोहाची मारलेली सगळी एका हिसक्यात उतरली. “आताशा कुठे आत शिरलो तर जनावर आडवं गेलं, आजून अर्धी वाट पण न्हायी झाली. आज काय धड्या गांडीनं घरी पोचत नाय.” पुढची १५ – २० पाऊले तसं काहीच विशेष घडलं नाही त्यामुळे सदुभाऊला जरा हायसं वाटलं. सदुभाऊच्या पायाखालची वाट असली तरी रात्रीच्या अंधारात आणि वाटत असलेल्या भीती पोटी तो बरेच वेळा अडखळत होता. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात सदू राईतल्या दाट जंगलातील पायवाट तुडवतचालला होता तितक्यात पाठीमागून आवाज आला “शुक् शुक्” आणि पाठीवरची झोळी हलली, थरथरली. सदुभाऊ थांबला आणि मागे न पाहताच ओरडला “कोन हाये?” पण काहीच उत्तर नाही. कुणीच काही बोललं नाही. सदू परत चालू लागला आणि ५-६ पावलांनंतर परत एकदा तोच आवाज “शुक् शुक्” आणि तीच थर थर. आता मात्र सदूची बोबडीच वळली. दरदरून घाम फुटला. “गावची लोकं बोलत्यात त्ये काय खोटं न्हाय … बापदेवाची राई झपाटलेली हाय. कुठली अवदसा सुचली म्हनून या वाटनं आलो”

सदुभाऊ बापदेवाच्या देवळी पाशी आला. आत्ता पर्यंत मागे वळून बघायची एकदाही हिम्मत त्याला झाली नव्हती. दमलेला सदू देवळीच्या कट्ट्यावर बसला आणि घाबरत घाबरत आलेल्या वाटे कडे बघितलं तर तिथे साधी पानांची पण हालचाल नव्हती. २ मिनिटं स्थिरावून बापदेवाला नमस्कार करायला वळला. दिवा लावलेला, उदबत्तीचा वास येत असलेला बघून सदू चाट पडला “कुनी साधी सकाळची दिवाबत्ती करत न्हाई मग आत्ता हिथं दिवा कुनी लावला असल? …. आरं द्येवा या रानात खरंच भूत हाय” सदुभाऊ उठून चालायला लागताच परत एकदा “शुक् शुक्” ….. सदू सगळा ऐवज घेऊन कंदिलाच्या प्रकाशात पाळायला लागला. रानाची वाट काही संपत नव्हती क्षणभर सदूला वाटले चकवा लागला की काय? पण लगेच दूर वर त्याला त्याच्या घरच्या पडवीचा दिवा दिसू लागला. आता घर नजरेच्या टप्प्यात आल्याने सदूला थोडं हायसं वाटत होतं. पण तितक्यात पाठीमागे कुणीतरी त्याची झोळी पकडली. सदुभाऊ थबकला, पाठीमागे वळून बघायची पण भीती वाटत होती. आणि आता तर मागून वेगळाच आवाज येत होता “अरे! उचल मला उचल …… अरे! उचल मला उचल.” सदू जवळ जवळ किंचाळलाच “मी नाही … मी नाही …. सोड मला कोन तु …. म्या काय केलया तुझं” सदुभाऊ गयावया करत होता तर पाठीमागून काहीच आवाज नाही पण ज्या कुणी पाठीमागून पकडून ठेवलं होतं तो काही सोडत नव्हता. एक दोन वेळा झोळीला हिसडा देऊन सुद्धा काही उपयोग झाला नव्हता. रामाचं नाव घेत सदू तसाच उभा राहिला. पण आजूबाजूला काहीच हालचाल झाली नाही. शेवटी सगळा धीर एकवटून हातातली काठी त्याने मागे नं बघताच फिरवली. तशी ती काठी झाडांच्या पानांना घासून गेली. खांद्यावरच्या पंच्याने टकलावर निथळणारा घाम पुसला आणि सदुभाऊ ने हळू हळू मान वळवायला सुरुवात केली. कुणीच दिसलं नाही म्हणून कंदील वर केला आली लक्षात आलं झोळी कुणीही पकडलेली नसून घरी पोचण्याच्या धावपळीत हेलकावणारी झोळी बोरीच्या काट्यात फसली होती. सदूने झोळी सोडवून निघाला आणि राई च्या बाहेर असलेल्या धोंडीवर बसला. १५-२० मिनिटांची पायवाट पण पुरती दमछाक झाली होती. त्याला वाटलं आता राईच्या बाहेर पडलो म्हणजे सुटलो कुणी पकडणारा नाही की बोलावणारा नाही. खवीस मेला … त्याची हद्द राई पर्यंतच. तितक्यात परत तोच आवाज अंधार चिरत आला “शुक् शुक्” आणि त्याची झोळी थरथरली. “अरे द्येवा ह्यो खवीस राईच्या भायेर बी हाये?” असं म्हणत सदूने जिवाच्या आकांताने धूम ठोकली आणि तडक त्याच्या घरच्या पडवी पर्यंत आला आणि तिथेच कोसळला.

सदूला पडलेला बघताच त्याची बायको पळत बाहेर आली. “यशोदे लोटाभर पानी हान, तुज्या सासर्यास्नी फेफरं आलाया”. सूनबाईने पाण्याचा लोटाच उपडा केला आणि काहीही फरक पडत नाही हे बघून परत लोट्यात पानी घेऊन आली. तो ती ओतणार तितक्यात तिची सासू गरजली “हान इकडं त्यो लोटा. किती पानी घालशील? आन्घुल न्हाई घालायचीया सासऱ्यासनी”. १० – १५ मिनिटांनी डोळे उघडे करून बघतो तर आजू बाजूला त्याचा मुलगा, सून आणि ७ वर्षाच्या नातू त्याच्या भोवती कोंडाळ करून उभे होते. त्याचं डोकं कारभारणीच्या मांडीवर होतं आणि ती ओंजळीने त्याच्या चेहेऱ्यावर पाण्याचा शिडकावा करत होती. सदुभाऊ ला हुशारी आली आणि तो उठून सरकत सरकत भिंतीला टेकून बसला. हाता पायात जणू त्राणच नव्हता. नातवाने प्यायला पाणी दिलं, सुनबाई पदरानं वारा घालत होती आणि बायको जवळच्या पंच्याने अंग पुसत होती. आणि पुसता पुसता धुसफुस चालूच होती “इतकं का पानी वोतायचं? चार थेम शिपड म्हणले तर आखा लोटाच उलटा केला …. काय म्हनावं याला? आनी आमचं धनी … त्या धोंडीबा कड गेलं म्हंजी दारू ढोसली असल … येता येता तरास झाला असल … का उगी न्हाई झेपत तर पियाची म्हन्ते मी … उगा जीवाला घोर” तिची बडबड ऐकून मुलगा म्हणाला “आये गप् की जरा. भाऊ काय झालं इतकं आडवं पडाया”. सदुभाऊ अडखळत बोलू लागला “आता आयुष्यात कधीच रात्री त्या राईत जाणार न्हाई. राई मंदी भूतं हायेत. राईत शिरल्या पासून मागे लागली होती, सारखी हाकाटी करत होती. शुक् शुक् आवाज यायचा, झोळी थरथराची. लहानपणा पासून बापाने सांगून ठीवले होतं की रानावनातून जाताना मागून हाकाटी आली की लक्ष द्यायचं न्हाई म्हणून आज जीता राहिलो … न्हाईतर माजं बी भूत झालं असतंया”

सदुभाऊचा मुलगा हलकेच हसला….आणि त्याच्या मुलाला म्हणाला “किसन आता खर खर सांग माजा शेल्फोन कुट ठेवला हाये?” किसन ने सदुभाऊच्या झोळीत लपवलेला मोबाईल काढून सखाराम कडे दिला. “आता येण्याच्या काही दिवस आदुगर हा शेल्फोन घेतला. शिरप्यानं त्यात रिंगटोन का काय ते भरलं आणि म्हनला शुक् शुक् आवाज आलं की फोन आला समज.”असं सखाराम ने सांगताच सदू सकट सगळे खुदु खुदु हसायला लागले आणि सदूची बायको म्हणायला लागली “काय पण भित्रटपणा म्हनायचा. सादा शेल्फोन वाजलेला कळत न्हाई व्हय?” इतक्यात परत एकदा “शुक् शुक्” आवाज आला. सखारामने फोन घेतला “हा बोल रं शिरप्या” असं म्हणत घरात निघून गेला. सदूभाऊ ला चैन पडत नव्हती तो कसल्या तरी विचारात होता आणि अचानक “अरे द्येवा” म्हणत कपाळाला हात मारून खाली बसला “ह्यो शुक् शुक् आवाज या शेल्फोनचा….. मग ती दुसरी हाकाटी कुणाची हुती???”

कथाविनोद

प्रतिक्रिया

प्रास's picture

18 Jul 2012 - 3:02 pm | प्रास

हॅ! हॅ! हॅ!

आनंदराव, हे मस्तंच लिहिलंय की!

अवांतर - आमच्या एका ओळखीच्यांचा शेल्फोन, "काका, फोन उचल. काका, फोन उचल." अशी हाकाळी द्यायचा.

गणेशा's picture

18 Jul 2012 - 3:43 pm | गणेशा

मस्त आवडेश !

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2012 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार

भारीच की एकदम.

परांतर :- शिर्षकाने काही वेगळ्याच अपेक्षा वाढवल्या होत्या.

निराशा झाली.

असो...

आनंद भातखंडे's picture

18 Jul 2012 - 6:01 pm | आनंद भातखंडे

बर ... परिकथेतील राजकुमार ... आपल्या अपेक्षा सांगा ....पाहिजे तर खासगीत सांगा ...प्रयत्न करू पुढील लेखनात त्या भंग करण्याचा. ;)

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2012 - 2:59 pm | टवाळ कार्टा

हे वाचा ;)
http://www.misalpav.com/node/22316

किसन शिंदे's picture

18 Jul 2012 - 3:53 pm | किसन शिंदे

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....

एकदम मस्त कथा!!

@परा
आम्हाला कळलं तुमचा अपेक्शाभंग का झाला ते. ;)

लई भारी,

आता वेगवेगळ्या डायलर टोन आणि कॉलर टोन वर लेखाची वाट पहावी म्हणतो. बाकी लिखाण एकदम मस्त्च.

मृत्युन्जय's picture

18 Jul 2012 - 4:18 pm | मृत्युन्जय

एकदम बेष्ट. अतिशय सुंदर कलाटणी. म्हणजे शेवट विनोदी असणार याची खात्री होती पण हे शेल्फोन प्रकरण लै भारी :). एकदम आवडेश.

नि३सोलपुरकर's picture

18 Jul 2012 - 4:22 pm | नि३सोलपुरकर

मस्त.
मजा आली वाचून
पु ले शु.

बॅटमॅन's picture

18 Jul 2012 - 4:42 pm | बॅटमॅन

भारीच!!! एक लंबर लिवलायसा :)

स्पा's picture

18 Jul 2012 - 4:57 pm | स्पा

लिखाणाचा बाज आणि वातावरण निर्मिती मस्तच
शेवट अपेक्षित होताच.. पण मजा आली

आनंद भातखंडे's picture

18 Jul 2012 - 6:07 pm | आनंद भातखंडे

माझ्या मि.पा. वरील पहिल्याच लेखनाला उत्तमोत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल
प्रास, गणेशा, परिकथेतील राजकुमार, किसन शिंदे, ५० फक्त, मृत्युंजय, नि३सोलापूरकर, बॅटमॅन, स्पा यांचे धन्यवाद. आणि परा यांचा अपेक्षाभंग झाल्यामुळे सपशेल माफी.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2012 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार

परा यांचा अपेक्षाभंग झाल्यामुळे सपशेल माफी.

अहो उलट असे अपेक्षाभंग सुखद असल्यास आवडून जातात. तुमचा सुखद होता.

बाकी 'शुक शुक' शिर्षकाखाली फिट्ट बसणारी एखादी उबदार कथा येऊद्या ह्या पावसाळी गारठ्यात. ;)

रतीकथेतील कामदेवकुमार
संस्थापक अध्यक्ष
मिसळपाव चावट कथा विभाग

प्यारे१'s picture

19 Jul 2012 - 10:36 am | प्यारे१

जाहिर णिरोध!(मालक त्यो 'रो' न्हवं 'शे' आहे 'शे' ... आयचं भा*, नीट ल्हिऊन द्या की भ*व्यो ) णिशेध. ;)

शाळामास्तरीण मंदाकिनी बैचं काय झालं ???
(मारुती कांबळेचं काय झालं ? च्या चालीत)

अमृत's picture

19 Jul 2012 - 11:18 am | अमृत

मंदाकिनी मॅडमचं काय झालं जाणून घेण्यास उत्सुक... अजुनही वेळ गेलेली नाही कथा पूर्ण कर पराभाऊ...

अमृत

हाहाहा मस्त!!! एकदम बेष्ट!!

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2012 - 7:01 pm | प्रभाकर पेठकर

शेवट अपेक्षित होता पण 'शेल्फोन' चा अंदाज नाही आला. चांगली आहे कथा.

पैसा's picture

18 Jul 2012 - 7:12 pm | पैसा

लै भारी! मिरासदारांच्या कथांची आठवण झाली!

जे.पी.मॉर्गन's picture

19 Jul 2012 - 6:49 pm | जे.पी.मॉर्गन

छान खुसखुशीत कथा!

जे पी

कौशी's picture

18 Jul 2012 - 8:15 pm | कौशी

आवडले लेखन..

कौशी's picture

18 Jul 2012 - 8:15 pm | कौशी

आवडले लेखन..

जाई.'s picture

18 Jul 2012 - 8:43 pm | जाई.

भारीच

आर्‍ये द्येवा!!
लेखन झ्याक झालय पन ती दुसरी हाकाटी कुनाची त्ये तरी सांगा.
लय भ्या वाटून र्‍हायलय.

दिपक's picture

21 Jul 2012 - 1:49 pm | दिपक

त्या दुसर्‍या हाकाटीच सांगा.
कथा लिवण्याची ष्टाईल लै भारी.

मस्त अफलातून गोष्ट!
माझ्या एका मित्राची रिंगटोन आठवली.. कोणाचाही फोन आला की सिनेमातल्या हिरविणी किंचाळतात त्याप्रमाणे 'नssssssssss ही ssssssssss!' असं ओरडायचा.

सुधीर's picture

18 Jul 2012 - 10:22 pm | सुधीर

मिरासदारी आठवली.

प्रचेतस's picture

18 Jul 2012 - 10:30 pm | प्रचेतस

लै भारी.
मजा आली वाचून.

टुकुल's picture

18 Jul 2012 - 11:30 pm | टुकुल

लै मस्त, कथा तर आवडलीच पण वापरलेली भाषा जास्त आवडली, एकदम अस्सल गावरान बोलीभाषा.

--टुकुल

सुनील's picture

19 Jul 2012 - 12:42 am | सुनील

हा हा हा. मस्त कथा!!

वीणा३'s picture

19 Jul 2012 - 3:13 am | वीणा३

हेहेहेहे :) मस्त शेवट :))

नाखु's picture

19 Jul 2012 - 8:53 am | नाखु

पु.ले.शु.

सूड's picture

19 Jul 2012 - 9:33 am | सूड

मस्त !!

प्यारे१'s picture

19 Jul 2012 - 10:38 am | प्यारे१

मस्त कथा आहे भातखंडे भो!

अमृत's picture

19 Jul 2012 - 11:14 am | अमृत

मिपावर स्वागत!

अमृत

सुमीत भातखंडे's picture

19 Jul 2012 - 9:14 pm | सुमीत भातखंडे

मस्त....
आता असेच लिहित रहा. आम्हाला वाचायला आवडेल

मी_आहे_ना's picture

20 Jul 2012 - 3:33 pm | मी_आहे_ना

धमाल आली वाचताना, मस्त एकदम, आवडेश!

खेडूत's picture

20 Jul 2012 - 3:36 pm | खेडूत

:)

RUPALI POYEKAR's picture

20 Jul 2012 - 4:13 pm | RUPALI POYEKAR

खुप मज्जा आली वाचताना

सोत्रि's picture

21 Jul 2012 - 12:10 am | सोत्रि

भारीच!

एकदम खुशखुशीत!

- ( शेल्फोनच्या वेगवेगळ्या रिंगटोन्स आवडणारा ) सोकाजी

स्पंदना's picture

22 Jul 2012 - 12:04 pm | स्पंदना

चला म्हैस अन सदुभाउ दोघे सुखरुप सुटले. अन आमचाबी जीव भांड्यात पडला .

स्वाती दिनेश's picture

22 Jul 2012 - 6:03 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत कथा!
स्वाती

अतिशय विनोदी कथा वर आणतेय.