सरले ते पळ,......मन भरुनी
जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी
ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी
हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी
ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी
कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी
विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;..
शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी
बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी
मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी
लाटेस किनारा; किनार्यालगत; अगणित; व्रत लेणी
ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी
............................अज्ञात
प्रतिक्रिया
11 May 2012 - 11:06 am | प्रचेतस
कविता आवडली नाही.
प्रचंड यमकारी झाली आहे.
तुमच्या आधीच्या कविता छान होत्या.
11 May 2012 - 3:56 pm | यकु
सीएल, बर्याच कविता मधाळ शब्दच्छलात अडकल्यासारख्या वाटतात, अंगावर येणारा कंटेट दिसत नाही कधी.
11 May 2012 - 5:32 pm | अज्ञातकुल
आपलं म्हणणं मी अव्हेरू शकत नाही.
माझ्या भावना माझ्याजवळ. पण त्यांनी जर इतरांना अनुभूती दिली नाही तर त्या केवळ माझ्या संवेदना ठरतील. त्यांना कवितेचा दर्जा देता येणार नाही.
आपण नि:संकोचपणे ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्या सुचनेचा आदर होईल ह्याची ह्याची ग्वाही देतो. मात्र आपला लोभ असाच राहू देत.
धन्यवाद.
11 May 2012 - 5:48 pm | यकु
>>>आपलं म्हणणं मी अव्हेरू शकत नाही.
-- असंच काही नाही, पण आता संधी आहे तर सांगतो. इथे लिहिणार्या सदस्यांनी स्वत:चे लिखाण करण्यासोबत इतरांच्या लिखाणाचाही आस्वाद घेऊन त्याची पावती द्यावी असा एक विचार नेहमी बोलून दाखवला जातो.
>>माझ्या भावना माझ्याजवळ. पण त्यांनी जर इतरांना अनुभूती दिली नाही तर त्या केवळ माझ्या संवेदना ठरतील. त्यांना कवितेचा दर्जा देता येणार नाही.
--- भावनांना मुरड घालण्याची तयारी दाखवली जात असल्याने, मलाच अपराधी वाटत आहे.
>>आपण नि:संकोचपणे ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्या सुचनेचा आदर होईल ह्याची ह्याची ग्वाही देतो. मात्र आपला लोभ असाच राहू देत.
--लोभ आहेच, मूक वाचकांचाही वाढेल अशी ग्वाही देतो.
11 May 2012 - 5:20 pm | अज्ञातकुल
आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. मलाही कधितरी असं वाटतं पण मंडळींना आवडली की उगाच वहायला होतं. संयम पाळायलाच हवाय मी.
11 May 2012 - 6:54 pm | शुचि
मस्त!!!! गेय!!!
11 May 2012 - 8:39 pm | हारुन शेख
कविता हि आपोआप स्फुरते . ठरवून कथा लिहू शकाल, कादंबरी लिहू शकाल पण कवितेची जातकुळीच वेगळी. कधीकधी एखादीच ओळ लक्खकन उमटते आणि मनात रुंजी घालत राहते तिची कविता बनायला कदाचित एक वर्षही लागेल किंवा एक मिनिटही. पण हट्टाने तिला पूर्ण करू जाल तर फक्त यमकांची रास रचली जाते. त्यातली संवेदना जबरीने खुडलेल्या प्राजक्तकळीसारखी कोमेजून जाते. त्यामुळे शब्दांवर हुकमत गाजवणारे मोरोपंतासारखे कवी बासनात जातात आणि ज्ञानेश्वरांचं 'उड उड रे काऊ ' वारीतल्या चार वर्षाचं मुल गात असतं. मीराबाई अशीच. शब्द साधे कधी कधी अनोळखी,तरीही एकेक भजन आत्म्याच्या अगदी खोल गुलाबपाण्याची शिंपण करणारं. मी खूप कविता लिहिल्या नाहीयेत. कदाचित लिहिणारही नाही. पण या कवीचं नाव आकाशातल्या ताऱ्यालाच शोभून दिसेल असं एकातरी वाचकाला वाटावे अशी कविता लिहायचं स्वप्न उराशी बाळगून आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------