दुष्काळाच्या झळा
दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा
पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा
डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली
गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली
कुठून आणावे पाणी विहीर तर सुकली
बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली
कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून
पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून
दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी
तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई
कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना
दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा
पुर्वप्रकाशित
- पाषाणभेद
प्रतिक्रिया
24 Apr 2012 - 6:50 am | प्रचेतस
दुष्काळाचं दाहक वर्णन एकदम जीवंतपणे उतरलवत पाभे.
24 Apr 2012 - 10:00 am | मिसळलेला काव्यप्रेमी
भयावह परिस्थितीचे वर्णन यथार्थ उतरले आहे.
24 Apr 2012 - 12:37 pm | पियुशा
भिडल मनाला !!!!
24 Apr 2012 - 4:04 pm | प्रभाकर पेठकर
व्यथित मनाच्या वेदना. मन, सर्वार्थाने, हेलाऊन टाकणार्या.
24 Apr 2012 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा
@कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून
पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून... >>> हे तर तंतोतंत लागु पडणारं रुपक आहे. --^--
@दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी
तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई >>> दुष्काळग्रस्तांच्या उरातली धग समोर आणलीत पा.भे... सलाम तुम्हाला ...