पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... पहिला दिवस - पुणे ते श्रीवर्धन

जानेवारीतला ३ रा आठवडा उजेडला आणि अजून फक्त ५ दिवसांनी ट्रीप सुरु होणार हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता... पण, नेमकं कधी नाही तर ह्याच आठवड्यात ऑफिसमधे भरपुर कामं आलं... कामाच्या गडबडीत ट्रीपसाठी खुपशी तयारी नाही करता आली, पण एका अर्थी ते बरच झालं कारण... "आपण ट्रेकला कसं खुप प्लान न करता जातो, अगदी तसंच ट्रीपला जावूया... सगंळच जरा फ्लेक्झीबल ठेवूया... मग जास्त मजा येते..." असं यशदीपच म्हणनं होतं...

२० जान ला ऑफिसहून घरी यायला रात्रीचे साडेसात होवून गेले... सोबत खूप सामान वाहायच नाही असं आधीच ठरलं होतं, म्हणून एक जोडी टी-शर्ट - हाफ चड्डी आणि एक टॉवेल पाठपिशवीत भरले आणि "ऑल सेट आणि रेडी टू हीट द रोड..." असं म्हणत ट्रीपची तयारी संपवली...

ठरल्या प्रमाणे पहाटे पावूणे-सहाला घराबाहेरच्या गणपती मंदिरा जवळ आम्ही तीघेजण आणि आमच्या घरची माणसं जमा झालो... गणपती-बाप्पाचा आशिर्वाद घेतला... घरच्यां कडून थोडं कौतुक, थोड्या सुचना आणि भरपूर शुभेच्छा घेवून बरोबर सहा वाजता ट्रीपचा श्रीगणेशा केला... तसा अजून काळोखच होता... रस्त्यावर खूपच कमी वाहनं होती... पहाटेच्या गारव्यात चांदणी-चौकाचा चढ चढू लागलो... छोटा असला तरी चांगलाच स्टीप आहे हा चढ... पेडलवर उभा राहीलो, मान खाली टाकली आणि हळू-हळू पेडल मारत पीरंगुटच्या रस्त्याला लागलो... गेले कित्येक दिवस ट्रीप बद्दल डे-ड्रिमींग चालू होतं... "सकाळ-दुपार-संध्याकाळ नुसती सायकल चालवायची... सायकलवर गोवा गाठायचं... गोव्याला पोचल्यावर काय भारी वाटेल..." असे बरेच विचार डोक्यामधे सारखे चालू असायचे आणि आज एकदाची ट्रीप सुरु झाली होती... भलत्याच आनंदात आणि उल्हासात एक-एक पेडल आम्हाला गोव्याच्या जवळ ढकलत होतं... मानस सरोवरचा चढ संपवला आणि काळोखातच पीरंगुट ओलांडून पौडच्या रस्त्याला लागलो... थंडी चांगलीच बोचत होती... हात तर खुपच गारठले होते... नारायणाच दर्शन झालं तेव्हा आम्ही पौड मागे टाकून मुळशीच्या दिशेने सुटलो होतो...

शनीवारचा दिवस आणि सकाळची वेळ असल्यामुळे, रस्त्यावर शाळेला चाललेल्या मुलांची किलबिल चालू होती... सायकलवर आम्हाला बघून काहीजण छानस हसत होते, काहीजण थोडावेळ सायकलच्या मागे धावत... 'डबल-सीट घे ना' म्हणत होते तर काहींना अजिबातच इंटरेस्ट नव्हता... त्यांना टाटा करत आम्ही पुढे निघालो... कोवळ्या उन्हात न्हालेला सभोवताल लोभसवाणा वाटत होता... गारठलेल्या हातांना उन्हामुळे जरा उब मिळत होती... कधी गप्पा मारत तर कधी एकमेकांना फॉलो करत मुळशी धरणाच्या भींतीजवळ पोहचलो... डावी कडे वळलो आणि चढ सुरु झाला... चढ तर होताच आणि त्यात रस्त्याचे बारा वाजलेले, त्यामुळे चढताना चांगलीच दमछाक होत होती... सगळ्यात पुढे यशदीप, मग मी आणि एकदम माघे प्रसाद असे आम्ही चढत होतो... चढावर यशदीप फॉर्मात असतो, त्यामुळे एका शार्प यू-टर्न नंतर तो दिसेनासा झाला... प्रसाद तर अगदीच हळू पुढे सरकत होता... मी सीट वरुन उठलो, शरीराचा तोल जरा पुढे टाकला आणि एका लयीत पेडलींग सुरु ठेवलं... त्या शार्प यू-टर्न नंतर तर चढ अजूनच वाढला... पाठीवरच्या पाठपीशवीमुळे चढताना अजूनच कस लागत होता... छातीची धडधड वाढत होती आणि पेडलींगचा स्पीड कमी होत होता... पण न उतरता तो चढ पार करुन हॉटेल Paradise cafe जवळ पोहचलो... चढावर सायकल चालवायला खरंच एक्स्ट्रीम एफर्स्ट लागतात... संपुर्ण शरीर एका लयीत काम करावं लागतं... आणि चढ सर केल्याच फिलींग तर भन्नाटच असतं... ही तर सुरुवातच होती, असे बरेच चढ पुढच्या सहा दिवसात चढायचे होते...

तीघांना पण भुक लागली होती, पण गर्दी असल्यामुळे 'इथं नको, जरा पुढे खाऊ...' असं करत-करत आम्ही पळसे गाव माघे टाकलं... आता तर हॉटेल्स पण नव्हती... मग एक छोटा ब्रेक घेतला आणि मुळशी काठी बसून सोबत आणलेल्या केळ्यांचा नाष्टा उरकला...

ह्या हंगामात पळसाला बहर येतो... हा संपुर्ण परीसर पळसांनी फुललेला असतो... आकाशाच्या निळ्या पार्श्वभुमीवर लाल-केशरी रंगानी बहरलेला पळस तर खासच दिसतो...

इथून पुढे ताम्हीणी पर्यंतचा रस्ता मुळशीच्या पाण्याला चिकटूनच जातो... वर्दळ अगदीच कमी होती... पळस, पाणी, जंगल आणि डोंगर ह्यांचे नजारे बघत निवांतपणे आम्ही पुढे सरकत होतो...

(यशदीप आणि प्रसाद )

(मी )

डोंगरवाडीचा स्टॉप आला आणि आम्हीपण ब्रेक घेतला... इथून खुपदा मी खालच्या दरीत उतरलोय...एकदा तर दरीत मुक्कामपण केलाय... पण इथून पुढचा रस्त्यावरचा प्रवास तर फार कमी वेळा केलाय...
(यशदीप आणि मी)

पुन्हा पेडलींग सुरु झालं आणि आम्ही माणगावच्या दिशेने पुढे सरकु लागलो... रोड खरंच खुप बाद होता... सारख्या, नेता लोक आणि गव्हर्मेंटला शिव्या घालतच होतो... खड्डा लागला कि एक शिवी, असं पार विळे फाट्याला पोहचे पर्यंत चालू होतं... माझ्या सायकलची तर सारखीच चैन (chain) पडत होती... एखादा मोठ्ठा घाट चढताना, 'हा घाट कधी संपेल?' असं जितक्या प्रखरतेने वाटत असतं... त्यापेक्षा कितीतरी पटीने हा ताम्हीणी घाट उतरताना मला तसं वाटत होतं... रस्त्यावरच्या खड्यांमुळे बसणारे हादरे सोसल्यामुले मनगटं आता दुखायला लागली होती... भर दुपारी साडे-बारा वाजता घाटाच्या पायथ्याशी विळे फाट्याला पोहचलो... आता तर भुकेने पुरते व्याकुळ झालो होतो, तरी माणगावलाच जेवण करु असं ठरवून पुढचा प्रवास सुरु केला... अर्ध्या तासात निजामपुर गाठलं... यशदीप आधीच पोचला होता आणि एका रसवाल्याशी गप्पा मारत आमची वाट पाहत होता... प्रत्येकी दोन ग्लास रस प्यायलो आणि माणगावचा रस्ता धरला... वाटेत काही दुचाकीवाले स्लो होवून आमच्याशी गप्पा मारत... 'कुठुन आलात? कुठे चाललात?' असे बरेच प्रश्न त्यांना पडलेले असायचे... उत्तरं मिळाली की प्रोत्साहन देवून पुढे निघून जायचे...

दुपारी दीड वाजता माणगावला पोहचलो... जेवणासाठी हॉटेलची शोधा-शोध सुरु केली आणि एका खानावळीत जेवणासाठी थांबलो... जेवता-जेवता बाहेर लावलेल्या सायकलवर पण लक्ष होतं... काही उत्साही आणि काही उपद्रवी मुलं आमच्या सायकलींशी खेळत होते... जेवण संपवल आणि गावा बाहेर एका झाडाच्या सावलीत विश्रांती साठी थांबलो... अजून बराच पल्ला गाठायचा होता म्हणून फक्त १०-१५ मिनीटं आराम केला आणि पुन्हा प्रवास सुरु केला... आधी म्हसळा आणि मग हरीहरेश्वर असा प्लान होता...

इथून पुढे आता घाट वगेरे लागणार नाहीत असा आमचा समज होता... पण माणगाव सोडलं आणि अर्धा-तासाच्या आत घाट लागला... दुपारच डोक्यावर आलेलं उन्ह, उघडा-बोडका घाट, एक इंच सुद्धा सावली नाही, नुकतच जेवण झालेलं आणि दमलेलं शरीर... अश्या अवस्थेत तो घाट चढताना प्रत्येक पेडलवर स्व:ताशीच झगडत होतो... घामाच्या धारा डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते... एका हाताने घाम पुसत पेडलींग चालूच होतं... कोणाच्या नावाने बोंब मारायला पण चान्स नव्हता, स्वःतालाच शिव्या घालत होतो... 'अरे, कोणी सांगीतलं होतं?... इतक्या उन्हात झाडाखाली निवांत झोप काढायची सोडून, असं हे हा-हू करत सायकल चालवायची कसली हौस?...' अश्या अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची डोक्यात मारामारी चालू होती... पण कसाबसा तो घाट सर केला आणि मघाशी चालू असलेल्या मारामारीत उत्तरांचीच जीत झाली हे कन्फर्म झालं...

घाट संपला आणि साई नावाच गाव लागलं... अजून थोडा चढ-उतार आणि मग एक मोठ्ठा घाट उतरुन म्हसळा गावात पोहचलो... थोडी चौकशी केल्यावर कळलं की दिवेआगारला सरळ सपाट रस्ता आहे आणि श्रीवर्धन-हरीहरेश्वरला अजून एक घाट चढावा लागेल... खरंतर अंगात अजिबात त्राण नव्हते, पण ठरलेल्या जागीच मुक्काम करु म्हणून घाटाचा रस्ता धरला... वाटलं होतं की हा तरी छोटा असेल, पण नाही इथे सुद्धा बराच चढ होता... आता सुर्य पण कलायला लागला होता... ट्रीपच्या पहिल्याच दिवशी काळोखात सायकल चालवायची वेळ येते कि काय असं वाटू लागलं... पण परत एक-एक पेडल वर कॉन्संट्रेट करुन स्वःताशीच झगडायला सुरुवात केली... मान खाली घालूनच प्रवास चालू होता... असंच जरा मान वर केली आणि समोर खूपच सुंदर नजारा होता...

दिवसभर आमची साथ देवून आता नारायण आपल्या घरी निघाला होता... आमचा प्रवास मात्र चालूच होता... चढ संपला आणि आम्ही जोरात सुटलो... उतारावर काही चार-चाकी वाहनांना मागे टाकून संध्याकाळी साडे-सहा वाजता श्रीवर्धनला पोहचलो... आता हरीहरेस्वर केवळ १५ कि.मी. होतं, पण काही केल्या प्रसाद पुढे यायला तयार होईना म्हंटल्यावर, श्रीवर्धनलाच मुक्काम करायच ठरवलं... घरगुती राहण्याची सोय झाली... तीघेजण मस्त गरम पाण्याने अंघोळ करुन रेडी झालो आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो... जवळच एका हॉटेलात जेवण केलं आणि रुम वर येवून आडवे झालो... 'पहिला दिवस संपला... खूपच दमलो राव आपण, पण ठीक आहे १६५ कि.मी. अंतर आपण एका दिवसात कापलं... बरेच घाट चढलो... ट्रीपची सुरुवात मस्तच झाली... उद्या पासून समुद्र किनारीपण सायकल चालवायला मिळणार... ' असे अनेक विचार करत शांतपणे झोपी गेलो...

विमुक्त
(http://murkhanand.blogspot.in/)

प्रतिक्रिया

मस्त रे विमुक्ता.
पुन्हा एकदा दमदार भटकंती.

बाकी इतके दिवस कुठे गायब होतास?

--------------------------------------------------------------
उत्तरतो हिमवन्तो दाहिणतो सालिवाहणो राञा
समभारभरक्लान्ता तेण न पल्हत्थ पुहवी ||

मस्त ....

Smile

9_9_2_5_8_, गाळलेल्या जागी योग्य अंक भरल्यास एक फोन नंबर मिळेल , त्यावर फोन करण्याचा प्रयत्न करु नये !

सही$$$$ ट्रिप.:)

एवढा लांब पल्ला सायकलवर.....बापरे, कौतुक वाटते तुमचे.

=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=

" I'm not a HANDSOME guy, but I can give my HAND-TO-SOME one who needs help. Beauty is in heart, not in face." ----- Dr. A. P. J. Abdul Kalam.

मस्तच Smile

अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा.

खूप दमवणारी आणि खूप आनंद देणारी मस्त भटकंती.

मी एका उन्हाळ्यात सायकलवरुन सोलापूर ते उजनी, भिगवणला गेलो होतो.
मध्ये एका खेड्यात रात्री थांबलो. सकाळी निघताना तर उन्हामुळं दोन्ही ट्यूबा बदलाव्या लागल्या.
शेवटी परत येताना एका सरदारजीच्या ट्रकमध्ये सायकल टाकून सोलापूर गाठलं Wink

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

मुळात सायकलवर गोव्यापर्यंत जायचं मनात आलच कस ? मागे एकदा तुला निळकंठेश्वरला असेच सायकल वर जातानाचे फोटो पाहुन बघणार्‍याची दमछाक झाली होती Wink .....येवु दे पुढचा भाग !!

वाश्या
उत्तना व कतं पापं अत्तना संकिलिस्सति ।
अत्तना अकतं पाप अत्तना व विसुत्र्झाति ।
सुद्धि असुद्धी पच्चतं नात्र्यमत्र्य विसोधये ।

जबराच रे, एकदम मस्त सुरुवात आहे आणि तुमच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

मस्तच रे विमुक्ता. भारी.

I am in competition with no one. I run my own race. I have no desire to play the game of being better than anyone, in any way, shape, or form. I just aim to improve, to be better than I was before. That's me and I'm free.
- Anonymous

विमुक्ता.. __/\__ Smile

च्यायला, सध्या सगळ्यांना सायकलिंगचे वेड लागलंय की काय?? माझे २ मित्र नुकतेच रत्नागिरी-जयगड-गुहागर-हर्णै करत दापोलीपर्यंत जाऊन पुण्यास परत गेले. (पुणे-रत्नागिरी व दापोली-पुणे बसने)

सायकलिंग करत जाणे हा एक खरंच मस्त अनुभव असतो. अशी लाँग ट्रिप करायचीच आहे एकदा. (मी नुकत्याच केलेल्या शॉर्ट ट्रिपचा वृत्तांतही टाकायचाय अजुन Wink )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand

मस्त फोटो आणि मस्त वृत्तांत! सायकलवरून एवढा प्रवास करायचं डोक्यात आलं म्हणजे तू खरोखरचाच "विमुक्त"!! दिवसात १६५ किमी सायकलिंग हे वाचूनच दमायला झालं!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(सूचना: कोणत्याही धाग्यावर मी जे प्रतिसाद देते ती सदस्य म्हणून माझी वैयक्तिक मते असतात. )
||मर्यादेयं विराजते||

असेच म्हणतो.

अमृत

आवडेश ..

नुकतेच आम्ही बाईक वर जाण्याचे फर्माण सोडले आहे..
बघु कधी पुर्ण होते आहे.

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "

तुमच्या या सायकल मोहिमेस शुभेच्छा.
अलिकदेच (डिसेम्बर पहिला आठवडा) मी यूथ होस्टेल आयोजित मुंबई-गोवा सायकल सफरीत अन्य ३० जणांसह यशस्वी सहभाग घेतला. ६ दिवसात हे अंतर पार केले. फार चांगला अनुभव होता.

स्वाक्षरी सुरु -
दुनिया वेड्याचा बाजार .... ...
स्वाक्षरी समाप्त.

मित्रांनो,
तुम्ही खरे मर्द मावळे शोभता.
भन्नाट!!!
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
खुशाली लेखरुपाने येत राहु द्यात.
जमल्यास गुगल मॅप वर नकाशा काढुन इथे टाकावा.
म्हणजे आम्हाला ही उपयोग होईल.

अभिनंदन.
"शुरा मी वंदिले" गाणारा.

-अभिजीत राजवाडे
(मालकंस)

एकदम भन्नाट!
चढणावरच्या प्रवासाचं वर्णन वाचतानाच पायात गोळे आले!

------------------------
मराठे
http://kaaheebaahee.blogspot.com
http://ikadetikade.blogspot.com

१६५ एका दिवसात????

मस्त रे विमुक्त !
अस वेगळ काही करण्यात एक जाम थ्रील असत ,अन ते पुर्ण झाल की जो आनन्द आणी समाधान मिळते ना तो केवळ अवर्णननिय Smile

पियुशा......

http://lovelypiyu.blogspot.com

जबरा.. खरी विमुक्त ट्रिप झाली असेल.. सायकलवरुन एकदोनदा, फार नाही फक्त २५-३० किमीची ट्रिप मारली आहे.. चढ चढून गेल्यावर उतारावर भण्ण ऽ ऽकिनी वारा पीत सुटायला लै मजा येते..

येऊ द्यात..

चिगो..

|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||

मायला मला इथे १ किलोमीटर सायकल चालवायचा कंटाळा.. तुला __/\__ दंडवत रे बाबा..

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

वर्णन घाबरवणारे नाही. स्वता: ला अनाठायी " ग्लोरीफाय करणारे ही नाही. वास्तव आहे. कारण वास्तवच दुसर्‍या इच्छुकाना खरे मार्गदर्शन
करते.
याच वेळी एक किस्सा पाहिलेला आठवला. काही तरूण लंडन हून केपटाऊन हा प्रवास आफिकेच्या पूर्व भागातून करीत होते, ( रिफ्ट व्हॅली वगैरे).वाळवंटी भाग पार करताना त्यांची पक्की वैतागवाडी झाली. तरी आपण काही तरी जगावेगळे करीत आहोत अशा थाटात ते चालले
असताना त्यांना समोरून एक सायकल वाला एकटाच सायकल वरून येताना दिसला. त्यानी चौकशी करता त्याने सांगितले ते ऐकून या मोटार सायकल स्वारांचा अभिमान वगैरे पार गळून पडला. तो काय म्हणाला त्याना
" मी एकटा गेले ९ वर्षे या सायकल वरून जगाचा प्रवास करीत आहे......" आता बोला.
( वरील वर्णन नॅट जिओ वरच्या एका डोक्युमेंटरीत पाहिले ) .

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

सायकल मोहिमेस अनेकोत्तम शुभेच्छा.
हे वाचूनच दमायला झालंय.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मस्तच...
असे गियरची सायकलवाले सायकलस्वार 'आमच्या' रस्त्यावर वीकेन्डला नेहमी दिसतात.
मस्त लाल टोमॅटो झालेले असतात.

लाल सलाम!

छान वर्णन! तुमच्या सायकल मोहिमेस शुभेच्छा!

मी केलेल्या पुणे-सातारा सायकल प्रवासाची आठवण झाली खूप वर्षानी....

मायला तुला जिवंत पाहुन खुप आनंद झाला.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
Smile

कित्येक महिने कुठे गायब होतास बाबा? मला वाटले तू कुठे जगाच्या सफरीवर गेला आहेस की काय!
झकास वर्णन केले आहेस Smile

असेच म्हणतो!

तुझा लेख आलेला पाहून आधी आनंद झाला! आणि संपूर्ण वाचल्यानंतर तर काय! १६५ किमी एका दिवसात? दंडवत रे बाबांनो तुम्हाला!

मालक, तुमची सैकल आम्हांस द्यावी ही इनंती करण्यात येते...
आम्ही तिच्यावर १६५ नाही तर नाही ६५ किमी तर अंतर कापु...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

तुमच्या या भटकंतीला सलाम!
मी जास्तीत जास्त ४७ किमी सायकल चालवली आहे, पण त्या सायकलला ८ गियर होते, पण तेवढ्यामधेच जाम फाट्ली होती. कधी एकदा उतरण लागते आणि निवांत बसुन प्रवास करावा इतका शीण येतो. १६५ किमी म्हणजे खुपच झाले राव! पाय हातात घेउनच बसावे लागेल!

जाम भारी वाटलं.
फोटो छान आलेत.
मलाही पुणे गोवा नाही पण पुणे मुळशी तरी सायकलवर जावसं वाटायला लागलय.
फोटोतील मोकळ्या आणि निसर्गसुंदर जागी काही वर्षात इमारती होतील अशी भिती वाटत आहे.
तुमच्या सायकली कोणत्या आहेत?
रात्रीच्या प्रवासासाठी काही स्पेशल तयारी केली का?

वेड किंवा ध्यास असल्याशिवाय असल्या उचापत्या माणसे करीत अ\नाही.
वेडेपणाबद्दल प्रचंड शुभेच्छा.
नवनवीन वाटा चोखाळत रहा....

--मनोबा
"The last Christian died on the cross".

विमुक्ताला भेटून आनंद झाला. मस्त ट्रिप हाणलेली दिसतेय.

काही शंका. मिपाकरांना अशा मोहीमांसाठी जाण्यासाठी उत्तरे हवीतच हा प्रेमळ आग्रह.

१) सगळ्यांच्या सायकली गियरवाल्या होत्या काय?
२) त्यात साधी सायकल असल्यास - साध्या अन गियरच्या सायकलींचा अशा मोठ्या मोहीमांत काय फरक जाणवतो?
३) प्रश्न क्र. २) चुकीचा असल्यास - असल्या मोठ्या मोहीमांत कुठल्या प्रकारची सायकल घ्यावी? गियरची किंवा बिगरगियरची साधी?
४) का?
५) साधी सायकल चालेल की केवळ MTB चालेल? त्याचा काय फायदा?
६) सायकलींची काळजी घेण्यासाठी काय काय केले? दुरूस्तीचे काय काय सामान जवळ बाळगले?
७) आणखी काही सल्ले देण्याचे असल्यास ते द्यावेत.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

वॉव... मस्तच रे मित्रा ! Smile

मदनबाण.....

Mere Khwabon Mein Tu - Gupt