कुर्डूगड ते रायगड - अंतीम भाग - दिवस दुसरा

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
25 Jan 2012 - 1:11 pm

पहील्या भागाला दिलेल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद.

पहिल्या भागातून
http://www.misalpav.com/node/20490

एवढे दमलो होतो की कसेबसे जेवण बनवले, जेवलो नि स्लीपिंग बॅग मध्ये शिरतानाच झोप लागली. झोपताना विचार केला की दिवसभरात आपली किती चाल झाली तर सकाळी ७ वाजता जीते गावापासून ते रात्री ८ वाजता घोळ गावापर्यंत एकूण १३ तासांचा ट्रेक झाला :).
सकाळी उठलो तेव्हा मस्त फ्रेश होतो आणी शाळेच्या बाहेर आलो तेव्हा कळले की घोळ गाव कसे वसले आहे

*****************************************************

जरी आदल्या दिवशी प्रचंड दमलेलो असलो तरी दुसर्‍या दिवशी भल्या पहाटेच जाग आली. शाळेच्या बाहेर आलो तेव्हा तोंडातून पहिलाच शब्द निघाला “वॉव्ह”....

समोरील डोंगररांगांच्या मागून सूर्योदय होत होता आणी त्याची पहीली किरणे घोळ गावावर पसरली होती. गावातले लोक थोडेसे कुतूहल मिश्रित नजरेने आमच्याकडे बघून आपापल्या कामाला जात होते. साधारण २५ ते ३० उंबर्‍याचे घोळ गाव हे दोन डोंगररांगांच्या मधल्या घळीत वसले आहे आणी गावात चौथीपर्यंत शाळा आहे. गावाच्या पाठीमागे कोकणदिव्याची रांग आणी समोर पानशेतची रांग आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा घोळपर्यंतच्या रस्त्याचे काम चालू होते आणी ते आता पूर्ण झाले आहे व माझ्या माहितीप्रमाणे सध्या स्वारगेटवरून संध्याकाळी घोळसाठी वस्तीची गाडी जाते.

समोर घोळ मधील शाळा व पाठीमागे घोळ गाव

काल जांच्याकडून जेवणासाठी लाकडे घेतली होती त्यांना पुढचा रस्ता विचारून ७ वाजता आम्ही घोळ गाव सोडले. आमचा पुढचा टप्पा होता गारजाईवाडी वाडी जी कोकणदिव्याच्या पायथ्याशी आहे. काल इतके चालून आल्यावर आता आम्हाला वाटले होते की पुढची वाटचाल सोपी नसली तरी कालच्यासारखी नसेल. पण तसे काही होणार नव्हते :(

गावातल्या लोकांनी सांगितले होते की गारजाईवाडी घोळ गावाच्या पाठीमागच्या डोंगराच्या पायथ्याला आहे पण तिथे जायला ५०० फुटाची दरी उतरून पुन्हा चढावी लागेल हे कळल्यावर आमची अवस्था अगदीच कठीण झाली. नशीब एवढेच होते की पूर्ण रस्ता जंगलातून होता त्यामुळे दमछाक कमी होणार होती.

गारजाईवाडीकडे जाणारा रस्ता

गारजाईवाडीकडे - समोरील दिसणार्‍या गवताच्या गंजीपाठीमागील जंगलात गारजाईवाडी वसली आहे.

घोळ गावाच्या पाठीमागची दरी उतरून चढल्यानंतर उजवीकडे वळून गारजाईवाडीकडे जायला लागते. वाटेत भाताची खाचरे लागतात. ही लागल्यानंतर आम्हाला वाटले की गारजाईवाडी जवळ आली पण कसचे काय आम्ही फक्त चालत होतो. घोळपासून साधारण अर्धातास चालल्यानंतर एक खिंड येते तिथे एक रस्ता डावीकडे जातो (हाच रस्ता पुढे ४ तासांच्या चालीने खानू गावात जातो व तेथुन बोचेघोळ नाळीने रायगड खोर्‍यात उतरता येते) व एक सरळ जातो. सरळ जाणारा रस्ता पुढे गारजाईवाडीकडे जातो. घोळ गावात आम्हाला ही खुण सांगितली होती पण आम्ही गप्पांच्या नादात ही खूण विसरलो आणी हे दोन्हीरस्ते सोडून तिसर्‍याच रस्त्याने पुढे गेलो. अजूनही हा रस्ता भाताच्या मळ्यांमधून पुढे एक दरी/घळीकडे जात होता पण तिथपर्यंत पोचल्यावर आम्हाला कळले की आम्ही रस्ता चुकलोय. मग काय आम्ही, दरीच्या काठावर पाठीमागे जंगल आणी गारजाईवाडी कुठच्या दिशेला आहे माहीत नाही अश्या कात्रीत सापडलो. शेवटी शोधाशोध करून परत आल्यारस्त्याने जायचे ठरवले. येताना गावावाल्यांच्या नावाने हाका मारत येत होतो तेव्हढ्यात खाली दरीतून एक प्रश्ण आला “कोण गाव?” हा डोंगरातील गावातला चिरपरीचीत प्रश्ण ऐकून आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. मग त्या गावावाल्यानेच आम्हाला वाडीपर्यंत रस्ता दाखवला.

आता गारजाईवाडीविषयी थोडेसे -
आतापर्यंतच्या एतक्या वर्षांच्या सह्याद्रीतील भटकंतीत अनेक अतिशय दुर्गम वाडी किंवा गावात भटकायला मिळाले. सह्याद्री कुशीतील अनेक वाड्या ह्या रस्त्यांपासून दूर व दुर्गम ठिकाणी वसलेल्या आहेत पण अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेल्या वाडीपैकी गारजाईवाडी नंबर बराच वरचा लागेल.

ह्या वाडीचे ठिकाण बघून आम्ही थक्क झालो. अत्यंत दुर्गम आणी वीज, रस्ता, शाळा, वैद्यकीय सुविधा ह्या सोयींचा अभाव आणी घनदाट जंगलातील अश्या ह्या २५ घरांच्या वाडीत अजूनही साधेपणाने जीवन जगणारी माणसे बघून आम्हाला भरून आले. कधीकाळी ह्यावाडीत ५० नांदती घरे होती पण काळाच्या रेट्याने सद्यस्थीतीला ह्यातील निम्मी बंद आहेत. जी चालू आहेत ती कधी बंद होतील ते सांगता येत नाही. सगळ्या घरांमधून एकही ४० वर्षे वयाच्या खालील माणूस नाही. आजूबाजूच्या उंचसखल पठारावरील पावसाळ्यातील पिकण्यार्‍या शेतीवर व शहरातून पाठवल्या जाणार्‍या मनीऑर्डरवर ह्या गावाची गुजराण होते.

ह्यावाडीतील गावातील लोकांना जवळचे गाव म्हणजे कोकणातील सांदोशी म्हणजे साध्या मीठ मिरचीसाठी पण २५०० हजार फुटाचा चढ उतार करायचा.

गारजाईवाडी

वरच्या फोटोतील गावाकर्‍याने आमच्याकडे प्रथमोपचाराच्या औषधाची मागणी केली व सांगितले की आठवड्यातून एकदा दापसर गावातून एक सरकारी डॉक्टर गावात तपासायला येतो. मधल्याकाळात कोणाला वैद्यकीय सुवीधेची गरज लागली तर दापसर पर्यंत चालत जायचे किंवा सगळा घाट उतरून कोकणात सांदोशीला उतरायचे :(

गावात पोचल्यानंतर साहजिकच पहीली विचारपूस झाली व "कोर्‍या" चहाची ऑफर करण्यात आली कारण गावात दुध नाही. आम्ही नम्रपणे नकार दिला व पुढची वाट विचारून घेतली. गावकर्‍यांच्या रोजच्या वाहिवाटेतील असलाने की काय कोण जाणे पुढची वाट मस्त मळलेली होती. ह्या वाटेने साधारण २० मिनिटे चालल्यानंतर आपण कोकणदिव्याच्या पायथ्याशी येतो येथे डावीकडे वळले तर कोकणदिव्यावर जाता येते व सरळ वाट कावळ्या घाटाने कोकणात सांदोशीला उतरते. आमच्या ओरिजनल प्लॅन मध्ये कोकणदिवा बघायचे पण होते पण आधीच वाडीपर्यंत रस्ता चुकल्याने आम्ही कोकणदिव्याला खालूनच वळसा मारून कावळ्या घाटाकडे निघालो.

कावळ्या घाटाकडे

कोकणदिवा पायथ्याकडून

घाट सुरु होईपर्यंत वाट सरळ व मळलेली आहे पण घाट सुरु झाल्यावर हीच वाट नागमोडी दगडगोट्यांची जंगलातील व प्रचंड उताराची होते. वाडीतील लोकांनी आम्हाला एक मोठ्या आंब्याची खुण सांगितली होती जिथे डावीकडे वळले की सांदोशीला जाता येते व उजवीकडे वळले की वाट भावले गावात उतरते. घाट उतरायला सुरु करून १ तास होउन गेलातरी तो आंबा काही येईना. आम्ही दगड गोट्यातून उतरतच होतो. वाटेत डोक्यावरून ओझे घेउन सांदोशीचा बाजार करून परत घरी वर चढणारी गारजाईवाडीतील माणसे भेटत होती पण कुणीही सांदोशीचे राहिलेले अंतर ३० मिनिटाच्या खाली आणेनात. मग मात्र आमचा धीर सुटला. एका गाववाल्याने तर सांदोशीचे अंतर किती राहिले विचारल्यावर “हे इथ २ मिनिटावर” सांगीतल्याला पण अर्धा तास झाला होता पण त्या गाववाल्याचे "२ मिनीटे" काय येईनात. शेवटी बराच उतार उतरल्यावर ते आंब्याचे झाड आले आणी अजून २० मिनिटे चालल्यावर सांदोशी गावाची घरे पण दिसायला लागली. पहिल्या प्लॅन प्रमाणे आम्ही १० वाजता सांदोशीला येण्यार्‍या गाडीने पाचाडला जाऊन पुढे रायगड चढणार होतो पण आम्हाला सांदोशी गावात उतरायलाच ११.०० वाजले आणी गाडी चुकली.

आंब्याच्या झाडाच्या इथून दिसणारा कोकण दिवा

सांदोशी गाव

सांदोशी गावातून रायगड दर्शन

सांदोशी गावातून दिसणारा कोकणदिवा (कोकणदिव्याच्या डाव्या उताराकडील पायथ्याच्या जंगलातील घळ म्हणजेच कावळ्या घाट)

कावळ्या घाट उतरताना रायगडचे समोरून जे दर्शन होते त्याला उपमा नाही. रायगडचे पुस्तकातून, फोटोग्राफीच्या प्रदर्शनातून जे चित्र मनात ठसले आहे त्यापेक्षा एकदम वेगळे व टकमकचे भेदकपण न जाणवणारे असे रायगड चे वेगळे रूप देखील मनाला भावते.

रायगड चहू बाजूंनी बघावाच हेच खरे.

गावात चौकशी केल्यावर कळले की पुढची गाडी ३ वाजताची आहे. ह्या गाडीसाठी थांबलोतर रायगडवारी चुकणार होती जे आम्हाला बिलकुल करायचे नव्हते. मग कळले की सांदोशीवरून अर्धा तास चालत गेलेतर छत्री-निजामपूर गाव लागेल व तिथे १.३० वाजता गाडी मिळेल मग आम्ही १२ वाजता सांदोशीवरून निजामपूरला निघालो (पुर्वीची महाड-रायगडवाडी गाडी आता छत्री-निजामपूर पर्यंत जाते). निजामपूरला जाताना वाटेत काळ नदीचे प्रचंड पात्र ओलांडायला लागते. साधारण २५-३० उंबर्‍याच्या निजामपूर गावाला शिवकालातील एका घटनेमुळे छत्री-निजामपूर असे नाव पडले. ह्या घटनेबद्दल जरी दुमत असले तरी गाव मात्र मस्त आहे यात दुमत नाही.

काळ नदीचे पात्र. माहीत नाही कसे ते पण फोटो काढताना थोडा गंडलाय :(

छत्री-निजामपूर गावाकडे जाताना

गावाच्या अगदी समोरच रायगडचा पहाड जो गावातून एका नजरेत मावत नाही. अगदी नाकासमोर टकमक टोक दिसते.

आपण नाट्यगृहात पहिल्या पाच रांगात बसावे आणी समोर भव्य बॅकड्रॉपचा पडदा असावा असा रायगड निजामपूर मधून दिसतो.

निजामपूर गावातून दिसणारा रायगड

गावात पोचल्यानंतर १.३० वाजेपर्यंत गाडीची वाट बघत थांबलो. थोडाजर वेळ हातात असेल तर गाडीची वाट न बघता निजापूर गावातून रायगडवाडीत चालत जायचे आणी तिथून चितदरवाजा गाठायचा. पण आमच्या हातात वेळ कमी होता त्यामुळे आम्ही गाडीने रोपवे पायथ्याला जाउन रोपवेने रायगड गाठायचे ठरवले.

निजामपूर गावातून रायगडवाडी कडे जाताना दिसणारे टकमक टोक

वाडीतून चितदरवाज्याकडे जाताना दिसणारा रायगड

२.३० वाजता जेव्हा रोपवे पायथ्याला उतरलो तेव्हा कळले की रोपवे साठी २ तासांचे वेटिंग आहे :( रायगड तर करायचाच होता त्यामुळे परत आम्ही चितदरवाज्यापाशी आलो. ३ वाजता रायगड चढायला सुरुवात केली आणी वरती पोचून राजदरबार, जगदीश्वराचे दर्शन घेउन परतीला निघालो तेव्हा ६.३० वाजले होते. गडावरच्या देशमुख हॉटेलमध्ये कळले होते की रायगडवरून महाडसाठी शेवटची ७.३० ची गाडी आहे. महादरवाज्यापाशी जेव्हा आलो तेव्हा पायथ्याच्या निजामपूर गावातून एस्टी परत निघालेली दिसली आणी शेवटचा उरलासुरला जोर काढून अक्षरश: धावत रायगड उतरायला सुरुवात केली. पायांनी कितीही कुरबुर केली तरी त्याकडे लक्ष न देता धावत जेव्हा चितदरवाज्यापाशी उतरलो तेव्हा ७.१५ झाले होते आणी गाडीचा रायगडवाडीतून चढ चढण्याचा आवाज येत होता. हुश्श करून बसतो न बसतो तोच गाडी आली आणी आम्ही महाडला रवाना झालो.

महाडवरून मुंबईला जरी परतायला पहाटेचे २ वाजले तरी पदरात पडलेल्या समाधानापुढे त्याचे कोणालाही काही वाटले नाही.

प्रचंड दमलेलो असूनही महाड ते मुंबई प्रवासात जेव्हा रायगडचा डोंगर रांगाकडे नजर गेली तेव्हा असे वाटले हा ट्रेक हा फक्त ट्रेक किंवा नुसती वाटचाल नव्हती तर ही सह्याद्रीच्या हाकेला दिलेली “ओ” होती.

असेच पुन्हा केव्हातरी पुढच्या ट्रेकला भेटूया.

धन्यवाद..

समाप्त.

*************************************************************

वरील सगळे फोटो माझ्या मोबाईल कॅमेराने काढले आहेत.

प्रतिक्रिया

मस्त वर्णन आणि फोटू.. मजा आली
थरारक ट्रेक झाला म्हणायचा

प्रचेतस's picture

25 Jan 2012 - 2:33 pm | प्रचेतस

फोटो आणि वर्णन सर्वच अप्रतिम.
सह्याद्रीच्या घाटवाटा चढाउतरायचा अनुभव वेगळाच, आनंददायी.

प्रचंड आवडलं सगळं लिखाण, कधी तरी जावं असंच फिरायला वेळ काळ आणि कसलंही बंधन न ठेवता, नुसती रायगडाला प्रदक्षिणा मारली ना तरी विश्व प्रदक्षिणॅचं पुण्य लाभेल. उरलेल्या १५ वर्षातले काही दिवस यासाठी फिक्स केले आता.

उदय के'सागर's picture

25 Jan 2012 - 2:45 pm | उदय के'सागर

अप्रतिम...... केवढे पायी फिरलात तुम्हि.. कमाल आहे!
छोट्या छोट्या गावांमधुन फिरणं, गावकर्‍यांचा आदरातिथ्याचा अस्वाद घेणं.. सगळंच किती छान! :) ... गड, ट्रेक, थरारक अनुभव ह्या सगळ्यांपलिकडे तुम्हि जे छोट्या-छोटया गावांमधुन फिरलात त्याचं खरंच कौतुक आणि हेवा वाटतो... व्वा खरंच 'दिल खुश हो गया' हे सगळं वाचुन :)

[विशेष म्हणजे हि सगळिच गावं किती स्वच्छं दिसत आहेत (निदान फोटोत तरी) ..अगदी ते गारजाईवाडी एवढं छोटं गाव असुनहि किती स्वच्छ दिसतंय (अर्थात तिथे पसारा करायलाच कोणि नाहिये हे ही एक विदारक सत्यं आहेच म्हणा) ... ]

मेघवेडा's picture

25 Jan 2012 - 2:58 pm | मेघवेडा

क्लासच! मजा आली वाचताना! मॅपवर बघून घेतली गावं तेव्हा अंदाज आला तुम्ही केवढी पायपीट केली होती याचा! ग्रेट!

हेवा वाटतो खरंच! :)

मनराव's picture

25 Jan 2012 - 3:53 pm | मनराव

मस्त ट्रेक........... झक्कास अनुभव.......

अन्नू's picture

25 Jan 2012 - 4:05 pm | अन्नू

फोट्टु बघुन त्यातच हरवून गेलो! भारी वाटल. :)

वपाडाव's picture

25 Jan 2012 - 5:19 pm | वपाडाव

तुमच्या वाक्यावाक्याला जगलो साहेब.... एकदातरी ही पायपीट करणे आहे.... भटकणे म्हणजे काय तर हे.... चला रे मुलांनो ४ दिवस वेगळे करा पाहु.... एक जंबो ट्रेक करुच आता...

अन्या दातार's picture

25 Jan 2012 - 5:51 pm | अन्या दातार

चला रे! कॉलिंग वल्ली गाईड ;)

विलासराव's picture

25 Jan 2012 - 7:55 pm | विलासराव

मी पण येतो.

आत्ता गाईड म्हणू नको रे...

एकदा ट्रेक मार्गाला लागला आणि मेंबरे वाटेला लागल्यानंतर अशी विशेषणे वापरायची.

;-)

प्रचेतस's picture

25 Jan 2012 - 9:37 pm | प्रचेतस

नक्कीच जाउ आणि एखादी अनवट घाटवाट पालथी घालू.

सुहास..'s picture

25 Jan 2012 - 8:02 pm | सुहास..

जबरा !!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2012 - 8:04 pm | अत्रुप्त आत्मा

एक जबरदस्त अनुभव...व्वा..! मजा आया पढने मे..।

मोदक's picture

25 Jan 2012 - 8:09 pm | मोदक

आम्ही ३१ डिसेंबर - १ जानेवारी २०१२ ला कोकणदिवा ट्रेक केला.

शनिवारी सकाळी पुण्यातून निघून पानशेत ला भरपूर वेळ घालवला व घोळ ला दुपारी पोहोचलो. (पानशेत -घोळ रस्ता डांबरी आणि चांगला झाला आहे)

घोळ ते गारजाईवाडी रस्ता करण्याचे काम सुरू आहे, निम्मे अंतर JCB ने केलेल्या मातीच्या रस्त्याने तर निम्मे जंगलातून जावे लागले.

गारजाईवाडीच्या मंदिरात मुक्काम केला व दुसर्‍या दिवशी कोकणदिवा.

३ वर्षांमध्ये वाडी थोडीदेखील बदललेली नाही.

बादवे - काळ नदीचे पात्र अंगावर काटा आणते आहे.

दोन्ही भाग वाचून काढले. फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.
पुलेशु

-रंगोजी

जाई.'s picture

25 Jan 2012 - 10:34 pm | जाई.

छान वृत्तांत

पैसा's picture

26 Jan 2012 - 12:20 pm | पैसा

मजा आली वाचायला! फोटोही क्लासच आलेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 12:42 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम फोटो, अप्रतिम लेखन.... खूप मजा आली.

फोटो आणि वर्णन दोन्ही छान.....

लेखनातूनच फोटोंच्या मदतीने ती पुरातन गावं आणि वाटा प्रत्यक्ष अनुभवतोय असेच वाटले.
आम्ही पाहीलेला रायगड रोपवेने जाऊन पाहीला होता. गडावरच्या गाईडने रायगडाचा संपुर्ण परिसर फिरवुन तेथील प्रत्येक स्थळांची साद्यंत माहीती दिली होतीच त्याशिवाय शिवाजीराजे दरबारात येण्याच्या वेळेची ललकारी आणि मराठेशाहीवरचा पोवाडाही म्हणून दाखवला होता. प्रत्येक स्थळी अंगावर रोमांच उभे रहात होते आणि अकस्मात वळीवासारखा पाऊस येतायेता एकदम जोराचा वारा आणि मुसळधार पाऊस पडायला लागला. सर्व परिसर धुक्यात गुडुप झाला. पाऊस संपेपर्यंत आमच्या गाईडसह आम्ही नगारखान्याच्या एकमेव आ़डोसा असलेल्या जागी थांबलो होतो. एकंदरीतच आमचे ते रायगड दर्शन निसर्गानेही अती संस्मरणीय केले आहे.