सोनेरी (पिकली) पाने २०११

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
30 Dec 2011 - 12:36 pm

पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता खच पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल.
पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. पूर्वी सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे. चिकित्सा आणि औषधोपचार यात झालेल्या प्रगतीमुळे आता सत्तरीपार गेल्यानंतरसुध्दा गोळ्या इंजेक्शने घेऊन लोक टुणटुणीत राहतात आणि सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करून तुकतुकीत दिसतात. पिकल्या पानांचा देठच नव्हे तर ते पानच हिरवे दिसण्याची सोय झाली आहे. रोजच्या जीवनात करावे लागणारे श्रम कमी झाल्यामुळे ते सहजपणे सहन करता येतात. या सगळ्या गोष्टींमुळे आता सत्तरी आणि ऐंशीच्या पार गेल्यानंतरसुध्दा लोक क्रियाशील असतांना दिसतात. अशी पाने गळून पडायच्या वेळी त्यांचे पिकलेपण लक्षात येते.

संगीत जगतावर तर या काळात एकामागोमाग एक आघात होत गेले. भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक पुन्हा दिसणार नाही. त्यांचे पट्टशिष्य माधव गुडी आणि श्रीकांत देशपांडे हे सुध्दा स्वर्गलोकांत त्यांची साथ करायला निघून गेले. पंडितजींच्या गडद सावलीत हे सुध्दा कधी पिकली पाने झाले होते हे समजलेच नाही.

स्व. सुधीर फडके, स्व.वसंत प्रभू, पं.हृदयनाथ मंगेशकर आणि श्री.यशवंत देव प्रभृतींबरोबरच श्रीनिवास खळे यांनी एकाहून एक सुरेल गाणी मराठी रसिक श्रोत्यांना दिली. या सर्व समकालीन संगीतकारांमध्ये खळे काकांनी सर्वाधिक काळ मराठी सुगमसंगीतावर अधिराज्य गाजवले असे त्यांच्याबद्दल सांगता येईल.

गजल म्हणजे जगजीतसिंग असे समीकरणच आजकाल बनले होते. गजल या प्रकारालाच त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती आणि गजलसम्राट असे मानाभिधान मिळवले होते.

आसाम या राज्यातील मधुर संगीत सर्व जगासमोर आणण्याचे काम पं.भूपेन हजारिका यांनी केले. त्यांच्याएवढा नावलौकिक आसाममधल्या दुसर्‍या कोणीच कुठल्याही क्षेत्रात कमावला नसेल.

नाट्यक्षेत्रानेही दोन अनमोल हिरे गमावले. प्रभाकर पणशीकर हे काही दशके मराठी रंगभूमीचे निर्विवाद सम्राट होते. त्यांच्या हयातीतच त्यांच्या नावाने श्रेष्ठ रंगकर्म्यांना पुरस्कार देण्यात येत होते.
सत्यदेव दुबे म्हणजे हिंदीच नव्हे तर जागतिक प्रायोगिक रंगभूमी म्हणता येईल. नाट्यक्षेत्रामधील कलाकारांच्या काही पिढ्या या थोर माणसाने निर्माण केल्या आणि प्रेक्षकांना दिल्या.
नाटकांपेक्षा आकाशवाणीवर ज्यांचा आवाज घरोघरी पोचला आणि सर्वांच्या ओळखीचा झाला असे करुणा देव यांच्याबद्दल म्हणता येईल.

नाटक आणि चित्रपट (नाटकसिनेमे) ही मनोरंजनाची जोडगोळी आहे. एका कालखंडातल्या तमाम तरुणींचा लाडका देव आनंद आणि सर्व तरुणांचा हीरो शम्मीकपूर या दोघांनाही सिनेमासृष्टीत त्यांच्या विशिष्ट स्पेशलायझेशनमध्ये तोड नव्हती.

पतौडीचे नवाब क्रिकेट जगतातसुध्दा नबाबाच्या रुबाबातच राहिले होते. वयाने जवळ जवळ सर्वात लहान असतांनासुध्दा त्यांना संघाचे कप्तानपद मिळाले आणि त्यांनी ते शानदार कामगिरी करून राखले. एकाक्ष असूनही धावांचे डोंगर रचले. शर्मिला टागोरसारख्या स्वरूपसुंदरीशी विवाह केला.

चित्रकलेच्या क्षेत्रात मकबूल फिदा हुसेन यांनी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. त्यांच्या चित्रांना लिलावांमध्ये कोट्यावधी डॉलर्स इतकी किंमत मिळाली, कधी अनवाणी फिरण्यामुळे, तर कधी लोकप्रिय नट्यांच्या चित्रांची मालिका आणि त्यांना घेऊन विचित्र प्रकारचे चित्रपट काढल्यामुळे किंवा वादग्रस्त विधाने करून ते सतत प्रसिध्दीच्या झोतात राहिले. तसेच ते अनेकांच्या तीव्र रोषालाही पात्र झाले. सर्वच बाबतीत त्यांच्यासारखे तेच होते.

व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी स्वतःची इतकी खास अशी शैली निर्माण केली की जिचे अनुकरणसुध्दा कोणी करू शकला नाही. मारिओने काढलेले चित्र पाहताच त्यानेच ते चित्र काढले आहे हे ओळखू येत असे.

डॉ.पी.के अय्यंगार यांनी भारताच्या अणुशक्ती विभागाचे प्रमुखपद सांभाळले होतेच, पण डॉ.भाभांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा पाया घालणार्‍या शास्त्रज्ञांमधले ते एक होते. वैज्ञानिकांच्या निवडीपासून त्यांचे प्रशिक्षण आणि प्रगती या सर्वांमध्ये ते जातीने लक्ष देत असत.

इंदिरा गोस्वामी ज्ञानपीठविजेत्या महान साहित्यिक होत्या.

सत्यसाईबाबांच्या एवढा अनुयायीवर्ग कोणालाही मिळाला नसेल. या काळामध्ये त्यांचे इतके असंख्य भक्तगण तयार झाले हाच त्यांनी दाखवलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल. दुसरा कोणताही बाबा किंवा स्वामी या बाबतीत त्यांच्या जवळपाससुध्दा येणार नाही.

अशा इतक्या सगळ्या लोकांना २०११ या एकाच वर्षाने काळाच्या पडद्याआड नेले. स्मरणमधून ही यादी तयार करतांना आणखी कोणी राहून गेले असतील त्यांच्या आत्म्यांनी मला क्षमा करावी आणि चाहत्यांनी त्यांची आठवण करून द्यावी.

जीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंद घारे's picture

5 Jan 2012 - 11:05 am | आनंद घारे

काही तांत्रिक अडचणीमुळे या लेखासाठी तयार केलेले चित्र दाखवता आले नव्हते. ते खाली दिले आहे.

piklee paane
मूळ चित्रात सुधारणा करून आणखी काही व्यक्तींची चित्रे दिली आहेत.

हृद्य संकलन...

धन्यवाद..

गणपा's picture

30 Dec 2011 - 1:30 pm | गणपा

हृद्य संकलन...

असेच म्हणतो.

दिपक's picture

30 Dec 2011 - 1:42 pm | दिपक

हृद्य संकलन...

खरयं. काल लोकमतमधले हे चित्र बघताना नेमका हाच विचार मनात आला होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2011 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हृद्य संकलन...

-दिलीप बिरुटे

निश's picture

30 Dec 2011 - 12:53 pm | निश

मस्त सुन्दर लेख

मन१'s picture

30 Dec 2011 - 2:41 pm | मन१

समयोचित लेख.
http://www.loksatta.com/lokprabha/20120106/athavani.htm इथे आपल्या लेखाचा प्रतिध्वनी ऐकूआला.

प्रभाकर पेठकर's picture

30 Dec 2011 - 1:14 pm | प्रभाकर पेठकर

लेख वाचून मन हेलावलेच होते त्यात त्या त्या दिग्गजांचे संकलीत केलेले छायाचित्र पाहून मनाला अतिशय जडपणा आला.

खरंच सर्व क्षेत्रातील सर्व रसिकांनी खूप काही गमावलं ह्या २०११ सालात.

अनवधानाने, छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्षांचे नांव राहून गेले. पण तेही त्यांच्या क्षेत्रातील सर्वोत्तम पातळी गाठलेले छायाचित्रकार होते. असो.

अन्या दातार's picture

30 Dec 2011 - 1:33 pm | अन्या दातार

>>त्या त्या दिग्गजांचे संकलीत केलेले छायाचित्र पाहून मनाला अतिशय जडपणा आला.

हेच व असेच म्हणतो.

सन्दीप's picture

30 Dec 2011 - 1:18 pm | सन्दीप

स्टीव चा उल्लेख राहुन गेला.

माझ्या मते घारे काकांनी केवळ भारयीय गळलेल्या पानां विषयी लिहिलय.
तुम्ही म्हणता तशी नावे जोडली तर यादी वरीच लांब होईल.

आनंद घारे's picture

30 Dec 2011 - 5:05 pm | आनंद घारे

गौतम राजाध्यक्षांचे नाव यायलाच हवे होते. ते मात्र कसे राहून गेले? कोण जाणे. त्यांचे छायाचित्र आता जोडले आहे.
स्टीव्ह जॉब्सचे नाव लक्षात होते, पण इतर काही परदेशी नावे येतील आणि बरीचशी सुटतील असे वाटले. शिवाय त्याला पिकले पान म्हणण्याएवढा तो वयस्क झाला नव्हता. शिवानंद पाटील यांचा उल्लेखही याच कारणामुळे केला नाही.

कॉमन मॅन's picture

30 Dec 2011 - 4:49 pm | कॉमन मॅन

सर्वांना विनम्र आदरांजली. हृद्य संकलन. घारेजींचे आभार.

-- कॉमॅ.

इरसाल's picture

30 Dec 2011 - 5:05 pm | इरसाल

वरील दोन्ही "ग" शी सहमत.

स्वाती२'s picture

30 Dec 2011 - 7:11 pm | स्वाती२

या वर्षात खूप काही गमावले याची या लेखाने पुन्हा एकदा जाणीव करुन दिली.

हा लेख छापुन आपण या सर्व महान आत्म्यांना एक प्रकारे मि पा तर्फे श्रद्धांजलीच आर्पण केली आहेत...

विकास's picture

30 Dec 2011 - 8:17 pm | विकास

धन्यवाद!

विनोद१८'s picture

30 Dec 2011 - 9:35 pm | विनोद१८

...घारेकाका...खरेच तुमचे आभार मानतो ....हे सगळे आज नाहीत याची जाणीव मनाला वेदना देते. बहुतेक सगळे आवडते तरी पन्डीत भीमसेन जोशी (बुवा) यान्च्याबद्दल मन खन्तावते...ते तर माझ्या विशेष आवडते.

एक समयोचीत धागा..

ध्न्यवाद.

विनोद१८

सुनील's picture

30 Dec 2011 - 10:00 pm | सुनील

२०११ सालचा धांडोळा सुंदर रीतीने घेतला आहे.

पैसा's picture

30 Dec 2011 - 10:44 pm | पैसा

२०११ त काय मिळालं हे शोधायला गेलं तर काय गमावलं याचं पारडं बहुतेक जास्त जड आहे. :( सर्व मावळलेल्या तार्‍यांना परत एकदा विनम्र श्रद्धांजलि!

सर्वसाक्षी's picture

31 Dec 2011 - 10:05 am | सर्वसाक्षी

समयोचित लेख. काळाबरोबर काय गमावले याचा सचित्र आढावा आवडला

आनंद घारे's picture

31 Dec 2011 - 10:11 am | आनंद घारे

थोडेसे ओरिजिनल वाटावे म्हणूनच मी हा लेख काल प्रसिद्ध केला होता. माझ्या यादीत असायला हवी अशी आणखी दोन सोनेरी पाने मला आजच्या वर्तमानपत्रात वर्तमानपत्रात दिसली.

स्व.पं.अशोक रानडे हे भारतीय संगीताचे ज्ञानकोश होते. संगीतशास्त्रावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन, अध्यापन, व्याख्यान वगैरे माध्यमातून केलेले प्रबोधन अतुलनीय असेच होते.

उस्ताद सुलतानखान यांनी सारंगी या भारतीय वाद्याची प्रतिष्ठा राखून ठेवली होती. परदेशातून आलेल्या व्हायोलिनपुढे सारंगी आता मागे पडत चालली असून दुर्मिळ होण्याच्या मार्गावर चालली आहे. सारंगीवादनाच्या कलेवर प्रभुत्व गाजवणार्‍या कलाकारांमध्ये उस्तादजींचे नाव प्रमुख होते.

सुप्रसिध्द छायाचित्रकार स्व.गौतम राजाध्यक्ष यांचे नाव राहून गेल्याचे काल एका प्रतिसादामधून लक्षात आले. इतर क्षेत्रामधील विशेषतः मनोरंजन आणि मॉडेलिंग मधील असंख्य तारकांना अत्यंत कुशलतेने सादर करून लोकाअंसमोरा आणता आणता ते स्वतःच स्टार झाले होते. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची प्रदर्शने पाहणेसुध्दा नेत्रसुख होते.

याशिवाय प्रसिध्द अर्थतज्ञ स्व.सुरेश तेंडुलकर हे सुध्दा २०११ मध्ये कालवश झाले.

वैशाली माने's picture

31 Dec 2011 - 11:15 am | वैशाली माने

सर्व मावळलेल्या तार्‍यांना परत एकदा विनम्र श्रद्धांजलि!
विट्ट्ल उमप यान्चे नाव राहुन गेले.

सुमो's picture

31 Dec 2011 - 12:06 pm | सुमो

अशी रत्ने आपण या वर्षी गमावली आहेत.

श्री.आनंद घारेंनी हे कंपायलेशन (एकत्रीकरण ??) केले त्याबद्दल त्यांचे अनेक आभार..

पि.सी अलेक्झांडर : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाची पदं भूषवलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी एकेकाळी देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ते खास विश्वासातले होते. त्यांचे प्रधान सचिव म्हणून ही ते काम पहात होते . पी.सी. अलेक्झांडर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील होते अन गांधी यांच्या महत्वाच्या निर्णयांवर पि.सी अलेक्झांडर यांचा प्रभाव होता.
त्यांनी लिहीलेले 'My Years With Indira Gandhi' हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे.

जहांगीर सबावाला : महान चित्रकार ! जे स्वतःबध्दल फार कमी बोलत पण त्यांची चित्रे हि बोलकी होती.

श्रीलाल शुक्ला : 'रंगदरबारी' चे लेखक ज्याचे अनुवाद १५ विविध भाषेत झाले ते हिंदी साहित्यातील महान लेखक यांचे ही निधन २०११ मध्येच झाले

मनी कौल : ज्यांनी बॉलीवूड मध्ये पैरलल सिनेमाचे पायाभरणी केली. त्यांची नाटक / चित्रपट ' दुविधा', 'उसकी रोटी' , 'आषाढ़ का एक दिन' यांनी कलेचे अतिउच्च शिखर गाठले होते

डॉ हरगोबिंद खुराना : भारतीय मूळ चे अमेरिकी वैज्ञानिक डॉ . हरगोबिंद खुराना यांनी नोबेल पारितोषिक मिळविले होते ज्यांनी जीव रसायन (बायोकेमेस्ट्री) मध्ये क्रांती आणली .

सत्यदेव दुबे : (अन माझे स्वतःचे आवडते नाट्यसृष्टीतील नाव - सत्यदेव दुबे )
इब्राहिम अलकाझी यांच्या नैशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये अनेक कलाकार दिग्गज यांनीच घडविले.तरुण कलाकारांना व्यासपिठ निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा होता. इब्राहिम अलकाझी यांच्या नाट्यसंस्थेत पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी एक वेगळीच नाट्यसृष्टी घडविली
'अलकाझी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'चे ते प्रमूख संचालक ही होते. दुबे यांचे रंगभूमी प्रेमाने रंगभूमीला एका नविन आयाम मिळवून दिला. श्याम बेनेगल याच्या 'भूमिका' या चित्रपटाची पटकथा ही दुबेंनीच लिहिली. ज्याला राष्ट्रीय पुरस्काराने संम्नानित करण्यात आले.. १९७१ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने संन्मानित करण्यात आले १९८० च्या 'जुनून' या चित्रपटाच्या संवादासाठीही त्यांना फ़िल्म फ़ेअर पुरस्काराने संन्मानित करण्यात आले .

मराठीतील विजय तेंडुलकर यांच्या 'गिधाडे’, ’शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकांसाठी त्यांनी उत्कृष्ठ दिग्दर्शन ही केले . पण त्यांना खरी प्रसिध्दी ’अंधा युग’ या नाटकानेच दिली.

या सर्वच कलाकारांना त्यांच्या आयुष्यातील कामगिरी बध्द्ल सलाम !! हैट्स ऑफ !!

सगळ्याच दिग्गजांना बोलवून परमेश्वर स्वर्गात काही नविन महेफिल(मराठी??) चा 'आगाज' (मराठी ?? )तर करत नाही ना ?

मन१'s picture

1 Jan 2012 - 10:34 pm | मन१

विषयानुरुप भर.

अनामिका's picture

31 Dec 2011 - 8:07 pm | अनामिका

वर्ष सरता सरता अखेरच्या दिवशी ख्यातनाम कवियत्री वंदना विटणकर यांनी देखिल जगाचा कायमचा निरोप घेतला........
'अंतरंगी रगलेले गीत झाले पोरके
दु:ख माझे हे मुके!'

प्रभाकर पेठकर's picture

1 Jan 2012 - 3:04 pm | प्रभाकर पेठकर

अरेरे फार दुर्दैवी बातमी. हयाहून दुर्दैव म्हणजे मराठी वाहिन्यांनीही त्याची दखल घेतलेली दिसत नाही. बातम्यात कुठे उल्लेख दिसला नाही. (तसाही, काल दूरचित्रवाणी संच बंदच होता. उपहारगृहाच्या इतर महत्त्वाच्या कामातच व्यसत होतो).

आनंद घारे's picture

2 Jan 2012 - 8:48 am | आनंद घारे

ज्या दिग्गजांची आठवण लेख लिहितांना राहून गेली होती अशांच्या छायाचित्रांची भर टाकून नवी आवृत्ती पोस्ट केली आहे . ती माझ्या वरील पहिल्या प्रतिसादात पहावी.

आनंद घारे's picture

7 Jan 2012 - 6:28 am | आनंद घारे

मी हा लेख लिहितांना मला १७ नावे आठवली होती. वाचकांनी त्यात भर घालावी अशी विनंती मी केली होती. त्यातून आणखी ७ नावे आली. तोपर्यंत आणखी ३ नावे माझ्या लक्षात आली म्हणून मी ती जोडली होती.
तरीसुध्दा काही महत्चाची नावे राहूनच गेली, गीतकार जगदीश खेबुडकरांची आठवण न येणे अक्षम्य होते. त्यांच्याशिवाय साधनाताई आमटे, वि.आ.बुवा, अजीजुद्दीन खान (बाबा), बादल आणि सुबल सरकार वगैरे आदरणीय व्यक्तींच्या निर्वाणाची माहिती मला होती. पैलवान हरिश्चंद्र बिराजदार, लहू खाडे(काळू), नवीम निश्चल आणि नेते महेंद्रसिंह टिकैत व वसंत साठे यांनीसुध्दा २०११ साली जगाचा निरोप घेतला.

मराठमोळा's picture

7 Jan 2012 - 6:39 am | मराठमोळा

चांगला लेख.
पाने गळतात पण अशी सोनेरी पाने पुन्हा कितपत जन्माला येतात?

सगळेचजण आपापल्या क्षेत्राततले हिरे होते.
२०११ सालचं वर्तमानपत्र तर दर थोडे दिवसांनी निधनाच्या बातम्यांनी ग्रासलेलंच होतं.

सुहास..'s picture

7 Jan 2012 - 3:22 pm | सुहास..

चांगला RETROVERT घेतला आहे, काही अजुन नावे घेतली असती तर बरे झाले झाले असते, उदा. जांभुळ आख्यान , ई,ई.

अर्थात तुमच्या सारख्या लेखका कडुन (थट्टा उडवत असलो तरी) आमच्या जरा जास्त च अपेक्षा आहेत ब्वा ;)