त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (बेल्लुर) भाग - ३

दशानन's picture
दशानन in भटकंती
21 Dec 2011 - 7:17 pm

मागील भागात आपण होयसाळ / होयसाल साम्राजाची राजधानी द्वारसमुद्र (हैलेबिडु) बद्दल माहिती व छायाचित्रे पाहिली आता त्रिकोणातील २रा कोन. बेल्लुर.


मंदिराचे प्रवेशद्वार

द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक कलांचा प्रसार होयसाळ साम्राज्यात झाला. अत्यंत भरभराटीच्या काळात बेल्लुर व द्वारसमुद्र मध्ये शेकडो मंदिरांची उभारणी केली गेली, शिल्पकलेला राजमान्यता होतीच पण त्याच्या सौंदर्यामुळे जनमान्यता देखील लवकरच मिळत गेली.


अर्जून

आताच्या काळात मुख्य मंदिरे व वस्तूसंग्रहातील अनेक शिलालेख, मुर्ती व त्या काळातील संपन्नतेचे पुरावे सोडले तर बेल्लुर / द्वारसमुद्र फक्त एका साम्राज्याच्या काही अंश शिल्लक राहिले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने प्रचंड काम या दोन मंदिरावर केलेले आहे. एकेकाळी पुर्ण नष्ट व विद्रुप केलेली ही मंदिरे भारतीय पुरातत्व विभागाने जसेच्या तसे पुर्ण अभ्यास करून उभे केले व त्यामुळे आपल्याला होयसाळ साम्राज्याच्या काही खाणाखुणा स्वतःच्या डोळ्यानी पाहता येतात हे आपले भाग्य.

मुख्य मंदिर

बेल्लुर मंदिराची रचना दक्षीणेत प्रसिध्द असलेल्या शिल्प प्रकारात आहे म्हणजेच विमान प्रकारात. प्रशस्थ पटांगण, उत्तुंग असे प्रवेशद्वारावरील शिखर, मुख्य मंदिर व त्याला सलग्न अशी उजवी/डावी कडे तेवढीच भारदस्त मंदिरे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर नजरेत भरतात ते दोन स्तंभ. ३०-४० फुटी उचं व एका अखंड शिळेतून निर्माण केलेले हे स्तंभ कुठल्याही आधारावीना उभे आहेत. ( आपल्याकडील मंदिरात जसे दगडी दिपमाळ दिसते तसेच दक्षीणे कडील मंदिरामध्ये असे स्तंभ दिसतात, याचे धार्मिक कारण माहिती नाही आहे, पण एखाद्या मोठ्या विजयाची आठवण रहावी म्हणून असे मोठ मोठे स्तंभ त्याकाळात उभे केले जात व त्यावर राजाने मिळवलेल्या विजयाची गाथा लिहली जात असे) मंदिराच्या दोन्ही बाजूला धर्मशाळा सदृष्य तात्पुरती राहण्याची सोय ( हा प्रकार याच काळात सर्वमान्य झालेला दिसतो आहे, कारण अश्या प्रकारची सोय द्वारसमुद्रला होती असे शिलालेखाच्या माहिती वरून समजते तशीच सोय, श्रवणबेलगोळ, हंप्पी व दक्षिणेतील अनेक मंदिरात दिसते तसेच आपल्या जवळच्या महालक्ष्मी मंदिरात देखील त्या प्रकारची सोय होती पण कालांतराने त्या तात्पुरत्या निवार्‍याचे छोट्या छोट्या मंदिरात रुपांतर बडव्यांनी केले.)


स्तंभ


तात्पुरते निवास्थान

बेल्लुरची मंदिरे देखील द्वारसमुद्रामधील मंदिरासारखी शिल्पकलेचा खजीना आपल्या अंगावर घेऊन उभे आहेत. चन्नकेशवाचे (कृष्ण) मुख्य मंदिर व डाव्या बाजूला असलेले मंदिर बंद आहे तर उजव्या बाजूचे रंगनायकी मंदिर. गोलाकार व लेअर पध्दतीचे नक्षीकाम असलेले स्तंभ, प्रशस्थ असा पाषाण मंडप, त्यानंतर विषेश कक्ष व मग गाभारा अशी संरचना असलेली ही तिन्ही मंदिरे आतून व बाहेरून अत्यंत रेखीव व सुरेख अश्या शिल्पांनी मढवलेली आहेत. जगप्रसिध्द आरश्यात आपले रूप निहारणारी नर्तिका हे शिल्प देखील येथेच आहे तसेच गरूडेश्वराची पुर्णाकृती मुर्ती देखील येथील वैशिष्ट आहे. मंदिर परिसरामध्ये जलकुंड व ४ विहीरी आहेत त्यापैकी जलकुंड उपयोगी राहिलेले नाही आहेत तर चार पैकी २ विहीरी अजून ही वापरत येतात, देवाच्या अभिषेकाच्या वेळी तेथीलच पाणी वापरले जाते.


चबुतरा / मंडप ???


स्तंभ


मंदिराचे बाह्य स्वरूप

मंदिराच्या पटांगणामध्येच पुष्करणी पध्दतीने येथे एक उत्तर दिशेला थोडे छोटे असे कल्याणी नावाचे कुंड / चौकोण विहीर / तळे आहे. ११७५ मध्ये याचे निर्माण केले गेले, उत्तर व दक्षिण दिशेला असलेली दोन प्रवेशद्वारे आहेत व प्रवेशद्वार दोन्ही हत्तीचे सुरेख शिल्प व तेथून पुढे मध्यभागी निमुळती होत जाणार्‍या चौकोणी पायर्‍या अशी रचना आहे. वरून पाहताना या तळ्याची वैशिष्टपुर्ण बांधणी लक्ष्यात येते. काही शतकापुर्वी बेल्लुर हे धार्मिक स्थळ म्हणून पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले होते व तेथे रथयात्रा व इतर धार्मिक उत्सव याचे प्रस्थ वाढले होते तीच पध्दत अजून ही सुरू आहे त्यामुळे आहोरात्र येथे भाविकांचे येणे जाणे सुरू असते त्यातूनच अस्वच्छता निर्माण होऊ लागली व एकेकाळी आपल्या गोड व रुचकर अश्या पाण्यासाठी प्रसिध्द असलेली कल्याणी शेवटी लोकांसाठी बंद करण्यात आली आता फक्त बाहेरून दर्शन घेता येते, कधी एकेकाळी निळसर असलेले वाहते पाणी आता हिरवेगार पडलेले आहे.


कल्याणी जलकुंड


जलकुंड


गरुडदेव

ज्या दिवशी आम्ही बेल्लुरला गेलो तो दिवस तेथील धार्मिक जत्रेचा होता व रथयात्रेची सुरवात होण्याच्या वेळीच तेथे पोहचल्यामुळे हजारो लोकांच्या गर्दीने आमचे स्वागत केले व गर्दीमध्ये मनसोक्तपणे फिरता येत नाही व हवे ते पाहता येत नाही. त्यामुळे बेल्लुरचा प्रवास लवकर संपवून आम्ही आमच्या प्रवासातील तिसरे टोक म्हणजेच श्रवणबेलगोळ च्या दिशेने वाटचाल चालू केली.

क्रमशः

प्रतिक्रिया

चित्रा's picture

21 Dec 2011 - 8:47 pm | चित्रा

लेख आवडला. चित्रेही सुंदर आहेत.

कल्याणी जलकुंड सुरेख आहे.

पैसा's picture

21 Dec 2011 - 8:59 pm | पैसा

फोटो खूपच छान आलेत. बरीच माहिती नवी मिळाली. धन्यवाद!

प्रचेतस's picture

21 Dec 2011 - 9:17 pm | प्रचेतस

अप्रतिम शिल्पकला.

अन्या दातार's picture

21 Dec 2011 - 9:53 pm | अन्या दातार

हळेबीड, बेल्लूर, श्रवणबेलगोळ ही ठिकाणे लहान असताना हिंडलो होतो. तुमच्या धाग्याने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मस्त फोटो व माहिती. पुन्हा जाईन तेंव्हा गाईडची गरज पडणार नाही. :)

सविता००१'s picture

22 Dec 2011 - 9:13 am | सविता००१

अप्रतिम आहे शिल्पकला. जायलाच हवे असे प्रकर्षाने वाटते आहे.

जयंत कुलकर्णी's picture

22 Dec 2011 - 9:29 am | जयंत कुलकर्णी

सुंदर फोटो !

५० फक्त's picture

22 Dec 2011 - 6:23 pm | ५० फक्त

जायलाच पाहिजे, कसे जायचे याबद्दल सुद्धा लिहा ना जरा..

दिपक's picture

23 Dec 2011 - 10:13 am | दिपक

बेल्लुरदर्शन आवडले. शिल्पांची छायाचित्र अप्रतिम आहेत राजे!