त्यांच्या कवितेतील पाऊस

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
6 Jun 2008 - 8:41 pm

त्यांच्या कवितेतील पाऊस

पाऊस आला आणि पाठोपाठ उगवल्या जिकडे तिकडे
पावसाच्या कविता...

त्यांच्या कवितेतला पाऊस रिमझिमत होता
मोत्यासारखे भासत होते टपोरे थेंब
हवेत दाटला होता सुखद गारवा
त्यांनी लपेटल्या काश्मिरी शाली
त्यांच्या अंगणात मोर नाचले पिसारा फुलवून.

पावसानं आधी आमचं छप्पर उडवलं
मग आमची पार दाणादाण उडवली.
माणसं, चूल, कापडं सगळंच चिंब भिजलं
छातीशी हात बांधून बसून राहिलो आडोशाला
उपाशी पोटानं, काकडत, कुडकुडत...

ज्यांच्या डोक्यावर असते छप्पर
त्यांच्या कवितेत नाचतात मोर
आमच्या कवितेत पावसानं फक्त चिखल केला
फक्त चिखल केला...

-अविनाश ओगले

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

वरदा's picture

6 Jun 2008 - 8:52 pm | वरदा

भयानक सत्य..छान मांडलय...

चतुरंग's picture

6 Jun 2008 - 8:58 pm | चतुरंग

अविनाशराव तुमच्या कवितेतल्या पावसाने डोळ्यात पाऊस आणायचा बाकी ठेवला!
कविता अचानक अंगावर आली!

चतुरंग

मनिष's picture

6 Jun 2008 - 9:18 pm | मनिष

कविता आवडली! :)

इनोबा म्हणे's picture

6 Jun 2008 - 9:28 pm | इनोबा म्हणे

कविता अचानक अंगावर आली!
असेच म्हणतो...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शेखस्पिअर's picture

6 Jun 2008 - 9:24 pm | शेखस्पिअर

एक आला पाऊस...
त्याने केला चिखल...
सकल झाले विकल...
डोक्यावर आमच्या विमानाची कलकल...

एक आला पाऊस...
कारखान्यात गेला ऊस...
साखर झाली ब़ख्खळ...
आमच्या पायाला अजूनही तोच चिखल...

एक आला पाऊस...
चारोळीची फिटली हौस...
करायची होती कविता...
चार ओळीतच निघतो आता...

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 12:09 am | विसोबा खेचर

छ्या! काय हे ओगलेसाहेब?!

नाही, तुमची कविता 'काव्य' म्हणून नेहमीप्रमाणेच छान आहे यात काहीच वाद नाही. त्यामुळे तिला आधी दाद देतो!

पण काय हो ओगलेशेठ, अहो आत्ता कुठे उन्हाळ्याच्या भयानक काहिलीनंतर चार सुखद तुषारांनी हजेरी लावली आहे. ते जरा घेऊ द्या की स्वच्छंदपणे अंगावर!

आपल्या कवितेत सांगितलेलं कटू सत्य आम्ही नाकारत नाही, पण ते सत्य मान्सून सक्रिय होण्याआधीच सांगायला पाहिजे होतं का हो? :)

छ्या...! हे कवी लोक काही वेळेला कविता करण्याच्या नादात भलताच काहीतरी विचका करून बसतात! :)

ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्यांच्याबद्दल आम्हालाही कणव आहे पण उगीच पावसावर राग का?

अहो त्याचं स्वागत करा की खुल्या दिलानं! च्यामारी, डोक्यावर छप्पर नसणार्‍यांची कणव आणि दोन कळश्यांकरता मैल मैल चालणार्‍या आमच्या आयाभणींकरता काहीच नाही? हा कुठला न्याय?

हो, आमचे मोर आनंदाने नाचतात, त्या आयाभणींकरता नाचतात!

आपला,
(पाऊसप्रेमी) तात्या.

धनंजय's picture

7 Jun 2008 - 12:28 am | धनंजय

एक भयाण मिष्किलपणा सुन्न करतो.

ज्याला संकटे नागडे करतात, त्यांना विनोदाचेच कवच वाचवू शकते.

("अंतू बरव्या"तील अशा आशयाचे काही वाक्य आहे...)

अरुण मनोहर's picture

7 Jun 2008 - 4:32 am | अरुण मनोहर

आमच्या कवितेत पावसानं फक्त चिखल केला
फक्त चिखल केला...

अविनाश, ह्या चिखलात देखील तुमच्या कवितेचे कमळ उगवलेच की नाही? तीच तर गम्मत आहे. पावसाला जे काय बरे वाईट परिणाम लोकांवर करायचे ते तो करत असतोच. (उदा. तात्यांना अनुष्काची याद आली....)

चांगल्या किंवा वाईट सर्वच अवलोकनांमधून साहित्याचा फुलोरा उमलू द्या.....

आपले मिपाकर प्रमोद देव म्हणतात "मराठी भाषा माझा प्राणवायू आहे"
त्याच धर्तीवर मी म्हणतो- "ललीत साहित्य माझे रक्त आहे आणि मराठी भाषा त्या रक्ताला प्राण पुरवत आहे"

बेसनलाडू's picture

7 Jun 2008 - 5:34 am | बेसनलाडू

पावसाच्या थेंबांचे/नी चटके बसवणारी कविता. दाहक असूनही आवडली.
(गंभीर)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

7 Jun 2008 - 7:45 pm | मुक्तसुनीत

सत्तरीच्या दशकातल्या एका कवितेची आठवण झाली .माझ्या अंधुक आठवणीनुसार ही कविता यशवंत मनोहरांची आहे.

ती कविता :

कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे .....