फट्याक

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
25 Nov 2011 - 1:57 pm

"फट्याक" असाच आवाज असावा बहुतेक.. तिथे दिल्लीत वाजला आणि इथे पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटू लागले. झालं हाफिसांमधून "लवकर निघा सुरक्षित पोचा" चे निमित्त सुरू झाले. हाफीस बसकडे जाऊ लागलो तर बहुदा अख्खे हाफीस बस कडे जात असावे. चहुकडे अर्धी जनता मोबाईलला अन मोबाईल हा शरीराचा अवयव असल्याप्रमाणे कानाला चिकटलेले होते.
"जर आता गेलो नाही तर बहुदा बसेस सुटाच्याच नाहीत, तेव्हा मी निघतोय ती मिटींग ऑनसईट वरून अटेंड करा आणि काम चेन्नई डीसी वाल्यांना करायला सांग. उद्या ऑफीस असेल की नाही सांगता येत नाही. (!! ) म्यानेज कर तिथुनच" हे सांगून होताच घरी फोन "अगं उद्या दांडी मारतोय, तुही मार, उद्याच्या संध्याकाळची दोन तिकीटं काढ"

दुसरीकडून " हॅलो हा चढले बसमध्ये, नाही इथे अजून काही नाही" असं एक युवती चिंताग्रस्त सुरात पण तीव उत्साहात कोणालातरी सांगत होती.

बस एकदम प्याक होती! नशीब लोकांनी ड्रायवरसाठी जागा सोडली होती. वेळेवर बस सुटली आणि मी कानाला लावलेल्या गाण्याच्या लयीत पुढल्या दोन मिनीटात झोपी गेलो.

====

"ठाक ठाक"
'काय झालं? ' या विचाराने मी दचकून जागा झालो. दोन मिनीटे काही कळेचना. आजुबाजुची मंडळी आणि बस जागच्या जागी उभी राहिली होती. काहीच कळेना. मग जरा परिस्थितीचा अंदाज घेतला तर कळलं की कोणीतरी आमची बस अडवली आहे. बाहेर आमच्या पुढल्या बस निघून गेल्या होत्या आणि आमच्याच बससमोर साधारण १८-१९ वर्षाच्या दोन चार पोरांनी हातात काठी घेऊन बस अडवली. त्यांच्याकडे एक स्पेअर टायर तयारच होता. तो लगोलग पेटवून देण्यात आला; आणि रस्ता अडवला गेला.
गंमत अशी कोणीच घाबरल्यासारखे वाटत नव्हते. बाईकवाले तर त्या जळत्या टायरच्या बाजुने बाईक काढून निघून जात होते. त्या पोरांकडे बघून कोणाला भीती वाटावी असं काही त्यांच्यात नव्हतं. संध्याकाळी काहितरी टैमपास हवा म्हणून हे करताहेत असा काहिसा भाव होता.
गाडीतली मंडळी आता जरा गंभीर झाल्यासारखी भासली. एकाने डायवरला विचारले
"बाजुने निघेल का हो बस? "
"च्यॅक"
डायवरने एक नकारात्मक आवाज काढला आणि शांतपणे आगीकडे बघत बसला होता. त्याने गादीचे दार लॉक केले होते. त्यामुळे बाहेर पडता येत नव्हते. मग मागच्या सीटवरच्यांनाही आग बघाविशी वाटू लागली. त्यांची पुढे येण्यासाठी धडपड सुरू झाली. आधीच बसच्या प्यासेजात आम्ही पुढचे सगळे उभे होतो. आम्ही आमची 'बाल्कनी' सीट सोटायला तयार नव्हतो. समोर टायर जाळणारी पोरं नुसतीच उभी होती. ना ओरडत होती, ना घोषणा. अगदी 'अहिंसक' निषेध होता; ) काही क्षण अश्या विचित्र शांततेत गेल्यावर हाफिसात फोनाफोनी झाली. हाफीसने निघताना या घटनांची शक्यता लक्षात घेऊन एक Emergency Contact नंबर दिला होता. त्यांच्यावर फोनचा इतका भडीमार झाला की विचारायही सोय नाही. त्यांना परिस्थितीची कल्पना आलीच होती. ते आता सांगत होते बसमध्येच बसा आणि प्लीज अजून कोणी फोन करू नका. आम्ही योग्य सुत्र हलवतो :)
"आता काय? " हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात होता. दरम्यान काही मोबाईल फोटोग्राफर पुढे सरसावले. आपल्या मोबाईलच्या टिचभर क्यामेरातून जणूकाही ही आयुष्यातील शेवटची लावलेली आग बघतोय अश्याप्रकारे त्या गिचमिडीत जमतील तितक्या अँगलने फोटो काढण्याचा सपाटा सुरू झाला. एखाद्या जळत्या टायरच्या नशिबी असे 'पोर्टफोलियो शुट' कधी आले नसेल. आता मागच्या बसमधल्यांची भिड चेपू लागली होती. विविध कंपन्यांचे आयटी हमाल आणि आजुबाजुच्या गावातील, वस्तीतील मंडळी जणू काही होळी पेटल्यावर जमावं तसं त्या आगी भोवती जमली होती. अजून हे चाललं असतं तर बहुदा फेर धरून मंडळी नाचतील की काय वाटू लागलं.
आमच्या बसच्या बाहेरच टायर पेटवल्याने डायवरने दार उघडायला नकार दिला.
"बाहेर जाऊन काय करणार, हिथुनच बगा की" इति डायवर
समोर नवे काहिच घडत नसल्याने मंडळी आपापल्या शिटांवर परतली आणि मग अचानक बसमध्ये एक नवी साथ पसरली
"हॅलो! अरे यु नो व्हॉट! वी आर स्टक इन अ दंगल!" अश्या भाषेत भयंकर एक्साईटमेंटने भरलेल्या आणि भारलेल्या फोनचा महापूर आला. जो तो आपल्या "भयंकर" परिस्थितीचे वर्णन एकमेकांना अगदी चवीचवीने करून सांगत होता. माझ्या शेजारच्या तरुणीला तर आपण कोणीतरी सेलिब्रीटी झालोत असेच वाटू लागले होते. मोबाईलमध्ये जो नंबर असेल नसेल त्या प्रत्येक नंबरवर तिने बहुदा फोन केला असावा
"या! जस्ट इन फ्रंट ऑफ मी! यु नो इटस सो होरीबअल! हो मी काढलेत फोटो, या आयविल पुट इट ऑन फेसबुक. "
दुसरीकडून आवाज आला
"तेच म्हणतेय मी आम्हाल जाऊ द्या मग जाळा काय हवं ते! अगदी स्वतःलाही जाळून घ्या हवंतर! "
मी गार!
मागे कोणाला तरी आपण एखाद्या अॅक्शनपटाचे हिरो असल्यासारखं वाटत होतं
"च्यामारी! उतरू का खाली. सांगतो त्यांना अहिंसक आंदोलन म्हणजे काय असं टायर जाळणं का? स्वतः जाऊन ते टायर बाजुला करतो, बघू कोण काय करतं ते! मग जाऊ द्या बस! "
असं म्हणून तो तावातावाने डायवरकडे गेला. डायवरने शांतपणे त्याचं बोलण ऐकून फक्त "बसा मागं, माजी नोकरी घालवता काय! " असं म्हणून फक्त खिडकीबाहेर एक तमाखुची निषेधात्मक पिचकारी सोडली.
आता समोरच्या वस्तीतून काही बायका हातात कसलेसे डबे घेऊन येताना दिसल्या. अनेकांची उत्सुकता चाळवली. त्या तर तोंडानं काहितरी ओरडत होत्या. धुर येतो म्हणून खिडक्या बंद केल्या असल्याने काय ओरडताहेत कळत नव्हतं. आता या बायका काय करणार याची उत्सुकता बघ्यांमध्ये लागली. त्यांच्या हातात काय आहे हेही त्या अंधारात, धुरात कळेना. जसजसं त्या जवळ आल्या तसतसं चित्र स्पष्ट झालं. लोक थक्क होउन त्यांच्याकडे बघत होते. त्या बायकांनी नेत्याच्या नावाने दोनचार घोषणा दिल्या आणि चक्क हातात असलेला कचऱ्याचा डबा त्या आगीत ओतला. घरातील, वस्तीतील सगळा कचरा त्या आगीत ओतल्यावर त्या आल्या तशा वस्तीत लुप्त झाल्या! तो प्रसंग बघून हसावे का रडावे हे समजेना.
मग अचानक पोलिस अवतीर्ण झाले, त्यांनी त्या पोरांना कोपच्यात घेतलं. आत हे पोलिस आग विझवतात कशी हे बघण्यासाठी गर्दी पुन्हा बसच्या पुढल्या भागात गोळा केली. मग "पाणी पाणी" अश्या आरोळ्या झाल्या. त्याआगी भोवती असलेल्या एका सुबक ठेंगणीने हातातील बिसलरी बॉटल एका हवालदारापुढे केली. त्यानेही ती मिष्कीलपणे ती घेतली आणि एका टायरवर ओतून दिली! आता एवढ्याशा पाण्याने त्या आगीला काहिही झालं नाही!
"ओह मुझे लगा आपको पिने को पानी चाहिये"
"हॅ हॅ हॅ, काय म्याडम, छोडो, जाके बसो बस मे! "
मग रितसर रेती आली, आग विझली आणि आम्ही घराकडे मार्गस्थ झालो!
या प्रवासात गाडीतील समस्त स्त्रीवृंदाला कंठ फुटलेला होता. आणि "यु नो व्हॉट हॅपंड!.. ' अशी प्रस्तावना करून आपण जणू मोठे शौर्य गाजवून एका राजकीय दंगलीतून वाचून, राष्ट्रीय पसिद्धी मिळवून घरी चाललो आहोत, अश्या थाटात हा प्रसंग अगदी उत्साहात, चवीचवीनं अर्ध्या भारताला कळवला गेला असावा!

टीप: लेखनात टंकनदोष आहेत. ते वेळ मिळताच सुधारले जातील

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 2:13 pm | मदनबाण

काल लवकरच कलटी मारली,ठाणे-मुलुंड टोल नाका जाम केला होता म्हणे !

या प्रवासात गाडीतील समस्त स्त्रीवृंदाला कंठ फुटलेला होता.
हॅहॅहॅ यांना कधी कंठ फुटलेला नसतो ते आधी सांगा ! ;)

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2011 - 2:39 pm | टवाळ कार्टा

"हॅहॅहॅ यांना कधी कंठ फुटलेला नसतो ते आधी सांगा !"

+१

इन्दुसुता's picture

3 Dec 2011 - 9:12 am | इन्दुसुता

<<या प्रवासात गाडीतील समस्त स्त्रीवृंदाला कंठ फुटलेला होता.

हॅहॅहॅ यांना कधी कंठ फुटलेला नसतो ते आधी सांगा ! >>

मेल्यांनो जेव्हा बघावं तेव्हा आमच्या कंठावर टपलेले. आणि पुरुषवृंदाला कंठशोषच पडतो ना अगदी ?

विनोद अपार्ट, वाचुन अस्वस्थं झाले.

आयविल पुट इट ऑन फेसबुक :)

दादा कोंडके's picture

25 Nov 2011 - 2:20 pm | दादा कोंडके

मस्त. म्हैस ष्टाईल लिखाण वाचून मजा आली.
बंगळुर मध्ये राजकुमार दंगलीच्या वेळी. आमच्या डायवरने कुठुन तरी आणून राजकुमारचा फोटोच बसच्या काचेवर टांगून त्याला हारबीर घातला होता. नॉर्थइंडीयन पब्लिक, "ये कौन है" असं म्हणताच त्याने कन्नडमधुनच त्यांना यथेच्छ शिविगाळ केली होती!

परिकथेतील राजकुमार's picture

25 Nov 2011 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे ॠ.

साला आमचा ॠ म्हणजे भाईकाकांचा वारस आहे असे उगा म्हणत नाही आपण ;)

अवांतर :- 'हुच्चभ्रुंनी, आपल्याला क्षुद्र लोकांचा कसा त्रास होतो हे सांगण्यासाठी काढलेला धागा' अशी प्रतिक्रिया देऊन हा धागा पेटवावा काय ?' ;) अर्थात ह्या धाग्यावरून आम्हाला एका ताईनी काढलेल्या धाग्याची, त्यावरच्या प्रतिक्रियांची, बटाट्यांची आणि अजून कसली कसली आठवण झाली.

छोटा डॉन's picture

25 Nov 2011 - 2:42 pm | छोटा डॉन

पर्‍याशी सहमत आहे.
ज्यांना ही घटना 'इव्हेंट' वाटली त्यांचे खरोखर कौतुक आहे. :)

- छोटा डॉन

मन१'s picture

25 Nov 2011 - 5:20 pm | मन१

इव्हेंट हा शब्द अगदि चपखल शब्द.
बाकिच्यांनी लेखाला छान म्हटलेच आहे, तर आम्ही इथेही "आवडले" म्हणून घेतोय.

स्वैर परी's picture

25 Nov 2011 - 2:30 pm | स्वैर परी

एकदम भारी लेख! आवडेश!
अवांतर : आपण इन्फी चे का?

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2011 - 2:47 pm | टवाळ कार्टा

<<बस एकदम प्याक होती! नशीब लोकांनी ड्रायवरसाठी जागा सोडली होती>>

खीक :)

<<त्याआगी भोवती असलेल्या एका सुबक ठेंगणीने हातातील बिसलरी बॉटल एका हवालदारापुढे केली. त्यानेही ती मिष्कीलपणे ती घेतली आणि एका टायरवर ओतून दिली!>>

आइशप्पत...मठ्ठ्पणाची हद्द झाली ही :)

<<"छोडो, जाके बसो बस मे! ">>

"वो क्या हूआ...मै पैले पानी मे शीरा फिर पोहा और बादमे बुडा" याची आठवण आली :)

बस एकदम प्याक होती! नशीब लोकांनी ड्रायवरसाठी जागा सोडली होती.

क्खीक् क्खीक्...

एकदम भन्नाट.

पियुशा's picture

25 Nov 2011 - 2:57 pm | पियुशा

लिखाण मस्त :)

वसईचे किल्लेदार's picture

25 Nov 2011 - 3:07 pm | वसईचे किल्लेदार

थोड्याफार फरकाने सगळीकडेच हि परीस्थीती असते. पण वर्णन (ते ही अवर्णनीय) मात्र थोडक्यांनाच जमते.

पुष्करिणी's picture

25 Nov 2011 - 3:07 pm | पुष्करिणी

सह्हीच..मस्त लिहिलय

मैत्र's picture

25 Nov 2011 - 3:09 pm | मैत्र

मस्त लिहिलं आहे... मोकलाया दाही दिशा नंतर फार काळाने लोकांनी मला असं वेडयासारखं मॉनिटर कडे पाहून हसताना बघितलं असेल...

बस एकदम प्याक होती! नशीब लोकांनी ड्रायवरसाठी जागा सोडली होती

अजून हे चाललं असतं तर बहुदा फेर धरून मंडळी नाचतील की काय वाटू लागलं.

हॅलो! अरे यु नो व्हॉट! वी आर स्टक इन अ दंगल!" अश्या भाषेत भयंकर एक्साईटमेंटने भरलेल्या आणि भारलेल्या फोनचा महापूर आला

"या! जस्ट इन फ्रंट ऑफ मी! यु नो इटस सो होरीबअल! हो मी काढलेत फोटो, या आयविल पुट इट ऑन फेसबुक. "

"बसा मागं, माजी नोकरी घालवता काय! " असं म्हणून फक्त खिडकीबाहेर एक तमाखुची निषेधात्मक पिचकारी सोडली.

मस्त !!

कच्चा पापड पक्का पापड's picture

25 Nov 2011 - 3:18 pm | कच्चा पापड पक्क...

"हॅ हॅ हॅ, काय म्याडम, छोडो, जाके बसो बस मे! " :)

५० फक्त's picture

25 Nov 2011 - 3:37 pm | ५० फक्त

मस्त झालंय एकदम आवडलं.

मोहनराव's picture

25 Nov 2011 - 3:45 pm | मोहनराव

आवडेश!!

किसन शिंदे's picture

25 Nov 2011 - 3:45 pm | किसन शिंदे

अगदी झक्कास लिहलयं..

बाजुचाच सहकारी विचारतोय,"किसन एकटाच काय रे हसतोस?"

आता त्याला काय सांगु...?

योगी९००'s picture

25 Nov 2011 - 4:01 pm | योगी९००

मस्त मस्त मस्त...

पहिल्यांदा वाटले की "फट्याक" वर काही चर्चा आहे का...पण लेख त्यापेक्षा भारी निघाला..

दरम्यान काही मोबाईल फोटोग्राफर पुढे सरसावले. आपल्या मोबाईलच्या टिचभर क्यामेरातून जणूकाही ही आयुष्यातील शेवटची लावलेली आग बघतोय अश्याप्रकारे त्या गिचमिडीत जमतील तितक्या अँगलने फोटो काढण्याचा सपाटा सुरू झाला. एखाद्या जळत्या टायरच्या नशिबी असे 'पोर्टफोलियो शुट' कधी आले नसेल. आता मागच्या बसमधल्यांची भिड चेपू लागली होती. विविध कंपन्यांचे आयटी हमाल आणि आजुबाजुच्या गावातील, वस्तीतील मंडळी जणू काही होळी पेटल्यावर जमावं तसं त्या आगी भोवती जमली होती. अजून हे चाललं असतं तर बहुदा फेर धरून मंडळी नाचतील की काय वाटू लागलं.

हा पॅरा तर जबराच...

चिगो's picture

25 Nov 2011 - 4:21 pm | चिगो

एकदम "फटका" लेख.. होतंय हो, तेव्हढीच लाईफमंदी येक्साईटमेंट..

डायवर, सुबक ठेंगणी, गावातल्या काकवा, पाणी, पोलीस सगळ्या पात्रांसकट चांगला जमलाय.

पोरीने पाण्याची बाटली दिल्यावर मधेच कुणी तरी ती अडवून "एव्हढ्ढ्याश्श्या पाण्याने आगीचे काय होणारेय?" असं विचारतं की काय असं वाटून गेलं.

"तमाखुची निषेधात्मक पिचकारी" हे देखील...

आर्डर्ली पान खाऊन पचापच थुंकला होता हो श्रीरंग.

स्मिता.'s picture

25 Nov 2011 - 5:38 pm | स्मिता.

एकदम झ्याक झालाय लेख. काही काही वाक्य तर अगदी दाद देण्याजोगी. अश्यावेळी लोकांमध्ये दिसणारी एक्साईटमेंट मस्त पकडली आहे.

चिरोटा's picture

25 Nov 2011 - 7:03 pm | चिरोटा

भन्नाट जमलाय लेख.

हाफीसने निघताना या घटनांची शक्यता लक्षात घेऊन एक Emergency Contact नंबर दिला होता

Control room, Quick resposne team असे शब्द ह्यावेळी ऐकायला मिळतात. बर्‍याच्वेळा ह्यांचा सल्ला "जेथे आहात तेथेच रहा" असा असतो.

रघुनाथ.केरकर's picture

25 Nov 2011 - 7:14 pm | रघुनाथ.केरकर

बस डोळ्या समोर उभी केली

दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा

निवेदिता-ताई's picture

25 Nov 2011 - 8:57 pm | निवेदिता-ताई

मस्तच

अशोक पतिल's picture

25 Nov 2011 - 9:13 pm | अशोक पतिल

१०० % सहमत !
अहो असाच अनुभव आमच्या जळगाव जिल्ह्यात येतो आहे.
सध्या भाजप चे कापुस प्रश्नी आदोलन सुरु आहे. जिल्ह्यात दोन चार ठिकानी असेच २-४ जुने टायर मारुती वॅन मधुन २-४ टाळकी आणतात , जाळतात,४-५ जमा होतात्,फोटो प्रेसवाले काढतात व दुसर्‍या दिवशी पेपर मध्ये न्युज येते, जिल्हाभर शेतकर्‍याचे आदोलन, सर्वत्र जाळपोळ !

पैसा's picture

25 Nov 2011 - 10:27 pm | पैसा

२००६ साली आम्ही दिल्लीला गेलो होतो, तेव्हाच धनत्रयोदशीच्या संध्याकाळी दिल्लीत बॉम्बस्फोट झाले. आम्ही राहिलो होतो, तिथून ३/४ रस्ते सोडून एका रस्त्यावर पहाडगंज भागात एक मोठा बॉम्बस्फोट झाला होता. आमच्याबरोबर माझे ८० वर्षांचे सासरे होते. ते घाबरून त्यांचं बीपी वगैरे वाढेल या भीतीने आम्ही २ दिवस टीव्ही सुद्धा लावला नाही. त्याना पेपर्स पण वाचायला दिले नाहीत.

रेल्वेतून मुंबईला उतरायच्या आधी अर्धा तास त्यानी बॉम्बस्फोटाची बातमी वाचली. मग स्टेशनवर माझ्या नणदेचा नवरा उतरून घ्यायला आला होता त्याला स्फोटाच्या अशा काही गोष्टी सांगायला सुरुवात केली की ज्याचं नाव ते! अगदी थेट त्या प्रसंगाची आठवण करून दिलीस!

आशु जोग's picture

25 Nov 2011 - 11:00 pm | आशु जोग

अतिशय झ्यकास !

काल मिसळीवर झापड याच विषयावरचा एक वर वर चिन्ता करणारा आणि आतमधे सुखावलेला एक

गुळमुळीत लेख वाचला होता.

त्या धक्क्यातून सावरायला या लेखाने मदत केली आहे

मनापासून धन्यवाद ऋषिकेश !

प्यारे१'s picture

26 Nov 2011 - 10:04 am | प्यारे१

मस्त रे ऋ.... क ड क लिहिलं आहेस.

चांगल्याला चांगलंच म्हणतात हो आमच्यात.
-(अनुनासिक) प्यारे

वाहीदा's picture

26 Nov 2011 - 7:00 pm | वाहीदा

व्हॉट अ लेख ! व्हॉट अ लेख !
आय विल अलसो पुट द लिंक ऑफ धिस लेख ऑन माय ऑफीस सिग्नेचर सो ऑल माय फ्रेंन्डस विल रीड ईट ना एन्ड कॉम्लीमेंट मी फॉर ईट ;-)

धनंजय's picture

26 Nov 2011 - 8:23 pm | धनंजय

वाचताना मजा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2011 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त वर्णन. मजा आली. :)

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

27 Nov 2011 - 9:48 am | चिंतामणी

एकदम फर्मास.

चावटमेला's picture

27 Nov 2011 - 1:03 pm | चावटमेला

जबरदस्त लेख :)

मेघवेडा's picture

28 Nov 2011 - 1:33 am | मेघवेडा

खणखणीत! निरीक्षणं मस्त! मजा आली वाचताना!

माझीही शॅम्पेन's picture

28 Nov 2011 - 1:43 am | माझीही शॅम्पेन

ज ब रा :)

__/|\__

मराठे's picture

28 Nov 2011 - 2:52 am | मराठे

जबराट!

ऋषिकेश's picture

28 Nov 2011 - 8:38 am | ऋषिकेश

सगळ्या वाचकांचे अनेक आभार. आवर्जुन प्रतिसाद देणार्‍याचे विषेश आभार :)

नगरीनिरंजन's picture

28 Nov 2011 - 9:13 am | नगरीनिरंजन

लेख वाचताना मजाही वाटली आणि अस्वस्थही झालो.
पुणे फेस्टिवलमध्ये अमोल पालेकरांनी बसवलेलं बादल सरकारांचं 'जुलूस' हे नाटक पाहिलं होतं. त्याची आठवण झाली.
हलक्या फुलक्या भाषेत मांडलेल्या बारीक निरीक्षणांतून आंदोलनकर्ते आणि बघे या दोन्ही बाजूंकडे निर्माण झालेला कोडगेपणा अचूक टिपला आहे.

रेवती's picture

3 Dec 2011 - 9:45 am | रेवती

मजेदार.