तहान !

चाफा's picture
चाफा in जनातलं, मनातलं
21 Nov 2011 - 3:02 pm

बराच काळ लोटला तरी अजुनही ते त्याच जागी अडकलेले, काळाची अर्थात त्यांना पर्वा नव्हती पण ज्या साठी ते आतुरले होते ती गोष्ट.....? कधी सुटका होणार? कधी ? अनेक प्रश्न त्या अंधारात उमटले. उत्तरादाखल एकच वाक्य. `लवकरच, सुरुवात तर झालेलीच आहे माध्यम मिळण्याचाच अवकाश'........................

*********

मुंबई- गोवा महामार्गावर पनवेल आणि पेणच्या मधे डाव्या बाजुला एक नर्सरी दिसते ती पाहिलीत का कधी ? ती माझीच आहे. इथे तुम्हाला फ़क्त फ़ुलझाडंच मिळतील, आगदी तुम्ही कधी पाहीली नसतील अशा फ़ुलांचीसुध्दा शेकडो प्रकारची कलमं आहेत माझ्या नर्सरीत, पण फ़क्त फ़ुलझाडंच, कारण बाकी कशात मला फ़ारशी रुची नाही.

तसं फ़ुलांचं वेड मला लहानपणापासुनच, आमच्या घराच्या इवल्याशा बागेत मी तर्‍हेतर्‍हेची फ़ुलझाडं लावायचो त्यातली कित्येक तर लोकांनी अशुभ म्हंटलेली, घरच्यांचा मार खाउन पण माझा छंद मी जोपासत होतो. सहाजिकच शिक्षणात फ़ारशी प्रगती नव्हतीच, जेमतेम पास होत होतो इतकंच. पुढे याचं काय होणार? हा प्रश्न मी घरच्या मंडळींना पडूच दिला नाही. हजार खटपटी करुन मी माझी स्वत:ची नर्सरी तयार केली. आता मला फ़ुलांच्या राज्यात सुखानं रहाता येणार होतं.

फ़ुलांचं राज्य, कल्पना जरी काव्यमय असली तरी, प्रत्यक्षात जगणं मात्र महाकठीण. नुसत्या फ़ुलझाडांमधुन उत्पन्न फ़ारसं मिळत नाही. इथे येणारी गिर्‍हाईकं म्हणजे काही शेकडोंच्या घरात रोपं नेत नसतात, नुसतीच फ़ुटकळ एक दोन रोपांची खरेदी, आणि अशी दिवसामागे चारपाच गिर्‍हाईकं, काय डोंबलं खर्च भागणार ? हौस म्हणुन ठीक आहे, पण धंदा म्हणुन पाहीलं तर मी दिवसेंदिवस तोट्यातच चाललो होतो. मग नेहमीचीच विवंचना, लोकांचे फ़ुकटातले सल्ले सगळं चालु होतं. तो दिवस मात्र जरा वेगळा निघाला, एका गडगंज श्रीमंत कुटूंबाच्या नव्या घराच्या बागेची रचना करुन देण्याचं काम मला मिळालं, आता तुम्ही विचार कराल की नर्सरीचा उद्योग करणारा माणुस आणि बागेची रचना ? पण मला ते शक्य आहे हे त्यांना कुठूनसं कळलं असावं, आणि घरचा गाडा रुळावर आणायचा तर मला नाही म्हणताच येणार नव्हतं.
असो, तर यथावकाश त्यांची बाग मी माझ्या कल्पकतेने सजवली, अर्थात त्यातही मधे मधे मोकळ्या सोडलेल्या जागेबद्दल त्यांनी मला भंडावुन सोडलं होतं, तरीही मी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. जस जसे ॠतु सरत गेले तसतसे त्या मोकळ्या जागेतुन बाहेर डोकावणार्‍या लिलीच्या तुर्‍यांनी आपले रंग उधळायला सुरुवात केली. मग काय विचारता, त्यांचे कौतुक आणि मला शाबासकी मिळतच राहीली. पटापट लोकांची बागेची रचना करुन घेण्याची आणि ती ही खास माझ्याकडून संख्या वाढायला लागली. हे लोक अक्क्षरशः चांगल्या जोपासलेल्या बागेवरुन नांगर फ़िरवायला सुध्दा मागे पुढे पहात नव्हते. आपण तरी काय करणार ? मोठे लोक मोठ्या गोष्टी.

शेवटी कधी ना कधी तरी हे ही काम संपणार होतंच, कारण कितीही झालं तरी सध्याच्या या गर्दीत बागं सांभाळू शकणारी घरं असुन असुन असणार किती? पुन्हा परवड सुरु झाली, पण या सगळ्याचा फ़ायदा एकच की लिलीसारख्या निव्वळ रानवट ( हे लोकांचं मत ) झाडांचं सौंदर्य आता लोकांना कळायला लागलं आणि माझ्याकडची लिलीच्या रोपांची मागणी वाढली. तुमच्या माहीतीसाठी सांगतो या लिलीच्या कित्येक जाती आहेत आणि एकाहुन एक सरस फ़क्त त्यासाठी तुम्हाला त्या शोधत फ़िरावं लागतं ते ही चांगल्या सरधोपट रस्त्याने नव्हे तर एखाद्या डोंगरदरीत. सहाजिकच मला डोंगरदर्‍यांतुन भटकंती करावी लागली. अशाच एका भटकंतीत मला ‘तीतु’ भेटला. विलक्षण नाव आहे `तीतु' पण याच नावानं त्याने आपली ओळख दिली.

त्याचं असं झालं, असाच भटकत असताना मी वाट चुकलो, एव्हाना अंधार पडायला लागला होता. अश्यावेळी आपल्याला आपलं एकटेपण जास्तच प्रभावीपणे जाणवतं रहातं. मी ही आजुबाजुला एखादी सोबत थोडक्यात मनुष्यवस्ती आहे का याचा शोध घेत राहीलो. दुरवर ऐन डोंगराच्या उतारावर मंदपणे प्रकाशणारी उजेडाची ठिणगी मला दिसली. ‘कुणीतरी रहातंय इथे’ मनाला तेवढाच दिलासा मिळाला. दुरवर दिसणार्‍या दिव्याच्या रोखाने पावले टाकत टाकत मी एकदाचा तिथवर पोहोचलो. त्या मिणमिणत्या प्रकाशाचे उगमस्थान म्हणजे एक मोडकळीला आलेली झोपडी होती. कसंबसं मन घट्ट करत एकदाचा त्या झोपडीत डोकावलो. आत बसलेला प्राणी जर त्या झोपडीचा मालकच असेल तर तो आगदी सार्थ होता.
मिणमीणत्या उजेडात शक्य तितकं मी त्याचं निरीक्षण केलं, एकदम हाडकलेलं शरीर, अंगावरचे कपडे, कपडे कसले चिंध्याच म्हणायचं त्यांना, आणि असलं हे गचाळ ध्यान कुठेतरी एकटक पहात बसलेलं, मी आत येउन उभा राहीलो तरी त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. शेवटी नाईलाजास्तव मी घसा साफ़ करुन त्याला ‘आत येऊ का ?’ असं विचारल्यावरच त्याची ती तंद्री भंगली. माझ्याकडे त्यानं चेहरा वळवला तेंव्हा सेकंदभर दचकायलाच झालं. त्याचं ते अस्ताव्यस्त दाढीचे खुंट वाढलेलं थोबाड, अर्धवट उघडे ओठ, डाव्या गालावर कुणीतरी पंजा मारावा तसे खोलवर उमटलेले तीन समांतर व्रण आणि सर्वात कळस म्हणजे त्याची ती शुन्यात हरवलेली नजर. ताबडतोब या ठीकाणावरुन पळ काढावा असा विचार मनात येउन गेला, पण पळूनपळून कुठे जाणार होतो मी ? एकतर हा प्रदेश अनोळखी त्यात पावलावरचं दिसणार नाही असा काळोख, बाहेर कुठेतरी भटकत जीव धोक्यात घालण्यापेक्षा इथे या वेडसराच्यासोबत राहीलं तर बरं. माणसाचे विचार किती उथळ असतात नाही? हा असला माणुस मला भर गर्दीत दिसला असता तर मी त्याला काहीही करुन टाळला असता पण आता परीस्थिती माझ्या विपरीत असल्यावर मला त्याचीही सोबत वाटायला लागली होती.
भकास नजरेनं तो माझ्याकडे बघत होता आणि त्याची परवानगी गृहीत धरुनच मी त्या लहानश्या झोपडीच्या दुसर्‍या कोपर्‍यात टेकलो. बराच वेळ नुसत्याच शांततेत गेल्यावर मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणुन त्याला नांव विचारलं,
" ती..तु " अडखळत्या आवाजात त्याचं उत्तर आलं. त्याचा तो खरखरता घोगरा आवाज ऐकुन कुणीतरी पाटीवर मोडक्या पेन्सीलचा तुकडा ओढल्यावर येतो तसा शहारा आला. तिथुन पुढे मी त्याला काहीच विचारायचं नाही असं ठरवुन टाकलं.त्याही परिस्थितीत केंव्हातरी झोपेने दिवसभराच्या पायपीटीमुळे थकलेल्या शरीराचा ताबा घेतला आणि माझ्याही नकळत मी झोपेच्या आधीन झालो.

`फार काळ वाट पहावी लागणार नाही रचलेल्या सापळ्यात सावज सापडतय, दुनियेचे दरवाजे आपल्या सगळ्यांसाठी लवकरच खुले होणार आहेत', समाधानाचे आनंदाचे अनेक चित्कार त्या अंधारात उमटले.

सकाळी केंव्हातरी थंडीच्या जाणिवेमुळे जाग आली. डोळे उघडताच क्षणभर आपण कुठे आहोत तेच कळेना, पण हळूहळू रात्रीचा प्रसंग आठवला आणि नकळतच नजर झोपडीच्या दुसर्‍या कोपर्‍यात गेली. तीतुच्या मळकट ध्यानाची अपेक्षा करत असताना ती जागा रिकामी बघुन जरा चक्रावल्यासारखं झालं. तीतु बसलेली जागा मला सकाळच्या प्रकाशात स्वच्छ दिसत होती, एक कळकट फ़ाटलेली सतरंजी, न रहावुन मी झोपडीवरुन नजर फ़िरवली. नावालाही इथे कुणी रहात असेल असं वाटत नव्हतं, मी नक्की कसली अपेक्षा करत होतो? चुल, भांडीकुंडी याची ? या असल्या भणंग माणसाकडे यातलं काहीच नसणार हे मी आधीच गृहीत धरायला हवं होतं. कसं का असेना, या मोडक्या झोपडीनं मला रात्रभर आसरा तर दिला, तीच्या मालकाला धन्यवाद देणं शक्य दिसत नव्हतं म्हणुन मी खिशातुन पन्नासची नोट काढून त्या फ़ाटक्या सतरंजीवर ठेवली आणि बाहेर पडलो.

अशक्य.. अशक्य दृष्य होतं समोरचं, या रानात मी बाकी कसलीही अपेक्ष केली असती तरी समोर दिसणार्‍या दृष्याची नक्कीच नाही. समोर डाव्या हाताला लालबुंद गुलाबाची फुलं आलेली आठ-दहा रोपं ओळीने लावुन ठेवलेली होती आणि बाजुलाच तो वेडसर वाटणारा तीतु एका गुलाबाच्या रोपट्याशी काहीतरी करत होता. आपण नेहमी बघतो ते गुलाब थोडे काळपट रंगाकडे झुकणारे असतात पण इथे तर एकदम लालचुटूक गुलाबाची फ़ुलं दिसत होती. कुठून आली असतील ही? या वेड्याने कुठून चोरली तर नसतील? मी याचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवलं आणि तिकडे वळलो.

जवळपास अर्धा- पाउणतास खर्ची घातल्यावर इतकं कळलं की हा तीतु जरी वेडसर दिसत असला तरी त्याला झाडांच्या कलमाचं चांगलच ज्ञान आहे, आणि आजुबाजुच्या गावातली बर्‍याशा आर्थिक परिस्थितीतली माणसं अन्नाच्या बदल्यात त्याच्याकडून झाडांवर कलमं करुन नेतात. इतकीच माहीती कळायला एवढा वेळ गेला कारण तीतुचं अडखळतं बोलणं समजायला बरेच कष्ट पडत होते. मी आजुबाजुच्या रोपट्यांकडे भारावुन बघत असताना तीतु कुठेतरी गायब झाला. त्याला शोधायला मी पुन्हा झोपडीत डोकावलो तर स्वारी पुन्हा त्या फ़ाटक्या सतरंजीवर पाय पसरुन बसलेली, मी मघा ठेवलेली पंन्नासची नोट अजुनही तिथेच पडून होती, जणु त्याला कसली पर्वा नव्हतीच. ‘हे असलं रत्न माझ्या नर्सरीत असलं तर?’ विचार जरा कठीणच होता, पण एकंदरीत हा प्राणी निरुपद्रवी दिसत होता त्यातुन नाहीच जमलं याच्याशी तर त्याला पुन्हा आणुन सोडता आला असता. मनाशी पक्का निर्णय घेउन मी तीतु कडे वळलो.

तीतुला मी कसाबसा समजाउन माझ्याबरोबर आणला खरा, पण एक महत्वाचा प्रश्न अजुनही होताच. या वेडसर दिसणार्‍या माणसाबरोबर काम करायला माझे कामगार तयार होतील ? आणि त्यांच्या प्रतिक्रीया न बोलताच खुप काही सांगुन गेल्या. शेवटी एका कोपर्‍यात तीतूला मी एक खास वेगळी अशी जागा तयार करुन दिली. तिथे त्याचे कलमं करण्याचे उद्योग निर्वेधपणे चालु राहीले असते. त्याची रहाण्याची सोय नर्सरीच्याच बाजुला एक तात्पुरती पत्र्याची खोली उभारुन करुन दिली. किमान आता तरी त्याचा इतरांना त्याचा त्रास वाटायला नको, हळूहळू सवय झाल्यावर बाकीचेही लोक त्याला सांभाळून घेतील अशी मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी आशा वाटत होती.

तीतुची काम करण्याची पद्धत जरा विचीत्रच होती हे खरं, दिवसभर ते येडं नुसतं रोपांकडे पहात बसत असायचं आणि संध्याकाळ झाली की त्याला कामाची आठवण यायची, मग रात्री उशीरापर्यंत तो कलमांवरच काम करत बसलेला असायचा. सुरुवातीला थोडं विचीत्र वाटलं पण नंतर एकुणच त्याच्या जुन्या रहाणीमानाची आठवण ठेवता त्याचं वागणं नॉर्मल वाटायला लागलं. त्याला आजुबाजुचा माणसांचा गलका कदाचीत पसंत नसावा.

आणखी एका गोष्टीनं मला जरा संभ्रमात पाडलं, ती म्हणजे तीतू कलमं करायला काहीतरी वेगळीच पध्दत वापरायचा. डोळा भरणे, फ़ांदीचे कलम असले प्रकार त्याने करताना मी कधी त्याला पाहीला नाही, अर्थात तसं पहाणं शक्यही नसायचंच कारण तो कुठल्याही व्यक्तीसमोर त्याचं काम करायचा नाही, आगदी तो काम करताना कुणी तीथं डोकावलं तरी ताबडतोब तो त्याचं काम थांबवायचा, पण कदाचीत तो साल वापरुन कलम करत असावा. रोपांना जखमी करणं कदाचीत त्याला आवडत नसेल, मग मी ही जास्त खोलात शिरायचा प्रयत्न करत बसलो नाही शेवटी मला रिझल्टशी मतलब होता. मात्र एक खरं की त्याने केलेलं एकही कलम कधी मेलं नाही. आता वाट पहात होतो तीतुच्या कलमांना कळ्या यायची, त्या आल्या पण मी बघितलेल्या तश्या लालचुटूक रंगाच्या फ़ुलांच्या नाही, तर पिवळ्याधम्मक रंगाच्या. बजावुन सांगितलेलं असतानासुद्धा त्यानं कलमं चुकीची केलेली दिसत होती. मी याबद्दल त्याला खडसावुन विचारलं तर तो नुसतंच हसला, तेच वेडसर हसु, बहुतेक याला परत नेउन सोडावा लागणार असे विचार मनात डोकावायला लागले.

तीतुनं केलेल्या कलमांना कळ्या येउन दोन- चार दिवस झाले असतीलं त्यानं पहील्यांदाच मला त्याच्या काम करायच्या जागेकडे नेलं, समोर दिसणारी रोपटी बघुन मी पहातच राहीलो, दोन दिवसांपुर्वी पिवळेधम्मक दिसणार्‍या गुलाबकळ्या आता गुलाबी रंगाची उधळण करत होत्या. मुख्य म्हणजे अजुन त्यांची फ़ुलं झालेली नव्हती. सर्वसाधारणपणे फ़ुल पुर्ण उमललं की मगच त्याचे रंग बदलायला सुरुवत होते अर्थात जर ते बदलणार असतील तर, पण ही काही वेगळीच कमाल दिसत होती. तीतुचं ज्ञान अचाट होतं खरं.

दिवस पसार होत गेले, गुलाबाची कलमं वाढून त्यांच्यावर एव्हाना फ़ुलं आपली अस्तित्व दाखवायला लागली, आणि थोडीथोडकी नव्हेत हं, एका झाडावर दहा-बारा फ़ुलं दिसायला लागलेली. नर्सरीत येणारा मग तो कुणिही असो आणि काहीही घ्यायला आलेला असो एखादे तरी रोपटे नेल्याशिवाय रहात नव्हता. तितूची अफ़ाट क्षमता, आणि वाढत जाणारी रोपटी बघुन मला नविनच कल्पना सुचली. नर्सरीच्या मागच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत मी गुलाबांची लहानशी शेतीच सुरु केली. आता शेती करायची म्हंटलं की रोपं लावण्याचे नियम, त्यातली अंतरं वगैरे तांत्रीक बाबी आल्या, पण इथेही तीतूने मला न जुमानता दोन रोपातलं अंतर निम्म्याहून जास्त कमी केलं त्यामुळे गुलाबही भरघोस यायला लागले.
आपण नेहमी पहातो त्या तांत्रीकदृष्ट्या अचुक शेतीत आणि माझ्याकडच्या एका गावंढळ माणसाने केलेल्या शेतीत फ़रक हे असायचेच. म्हणजे बघा माझ्याकडे असलेल्या चौरस जागेत रोपं अशी लावलेयत की फ़क्त त्यांच्या बाजुने निघुन संपुर्ण रोपांभोवती फ़ेरी मारता येईल इतकीच वाट आहे त्या वाटेला दोन्ही समोरासमोरच्या बाजुंच्या मधुन निघणारी एकएक वाट मिळते त्यामुळे त्या बागेचे चार वाफ़े असल्यासारखी रचना झालीये. सहाजिकच गुलाबांची रोपं वाढल्यावर तिथे त्यांची चक्क झुडपं तयार झाली, आता मला सांगा, या इतक्या गर्दीत कुणी घुसुन झाडांवरचे गुलाब सहजासहजी काढू शकतो का ? पण तीतू तिथेही शिरत होता पायांवर हातांवर गुलाबाच्या काट्यांचे ओरखाडे मिरवत तो बेधडक त्यातुन वावरायचा. तीतू रोपं सांभाळायचा, फ़ुलं काढायचा आणि आम्ही ती पॅकेजींग करुन मार्केटमधे पाठवायचो. सुरुवातीपासुनच आमच्या गुलाबांना मार्केटमधे चांगला भाव मिळायला लागला. माझे सुखाचे दिवस जवळ येत होते.

दिवसेंदीवस बाजारात माझ्या गुलाबांची मागणी वाढत चाललेली, तीतू एकटा अपुरा पडू नये म्हणुन मी त्याच्या हाताखाली दोन माणसं अजुन दिली वास्तविक त्याने कधीही तक्रार केली नव्हती पण तरीही मी त्याची इतकी सोय पाहीली त्यामागे अर्थात त्याच्या कलेचा तो एकटाच सुत्रधार असु नये हा एक छूपा हेतु होताच, पण काही दिवसांतच माणसं त्याच्या सोबत काम करेनाशी झाली. त्याचं ते निसर्गाच्या उलट रात्री जागुन काम करणं त्यांना सोसलेलं दिसत नव्हतं. आजारी असल्याचं कारण देउन ते दोघे सतत सुट्या घ्यायला लागले शेवटी कंटाळून मीच त्यांना काढून टाकलं. पुन्हा तितू एकटाच त्या बागेत खपायला लागला.

मधे किती दिवस, महीने गेले ते मला माहीत नाही पण एक दिवस ते घडलं खरं.......

झोप येत नव्हती म्हणुन मी त्या रात्री सहज नर्सरीकडे जायला गाडी काढली ( हो, आता माझ्याकडे स्वत:ची गाडी होती ) नर्सरीच्या आवारात काळोख दिसत होता. बहुदा तितू आज रात्री आराम करत असावा, खरंतर मी इथुनच मागे फ़िरायला हवं होतं पण सहज म्हणुन मी गेट उघडून आत गेलो. रात्रीच्या शांत वेळेत आजपर्यंत मला न दिसलेल्या माझ्या नर्सरीतल्या फ़ुलांचं मनमोहक रुप दिसलं, पांढ-या लिली नेहमी रात्री फ़ुलतात आणि त्यांच्या फ़ुलांच्या पाकळ्या इतक्या सुंदररीत्या उलगडतात की त्यातलं सौंदर्य वर्णन करता येत नाही, एव्हाना लिली उमलल्या होत्या आणि त्यांच्या त्या पांढर्‍या गर्दीत इतर रंगाची किंचीत कोमेजलेली फ़ुलं अप्रतीम दिसत होती. या सौंदर्यसृष्टीत मी कितीवेळ हरवलो होतो कोणजाणे पण नर्सरीच्या पाठीमागे मंदसा प्रकाश बघितल्यासारखा वाटला आणि मी जरा सावध झालो. माझ्या बहुमुल्य गुलाबांच्या शेतीत कुणीतरी घुसखोरी केल्याचा मला राग आला त्या भामट्याला पकडावं म्हणुन मी पाउलही न वाजवता मागच्या गुलाबांच्या विभागाकडे गेलो.

सुरुवातीला मला समोर दिसलं त्याचा अर्थच कळला नाही पण कळला तेंव्हा चांगलाच धक्का बसला. समोर एका कोपर्‍यात केरोसीनच्या दिव्याच्या उजेडात तीतु रोपांशी काहीतरी करत होता, त्याच्या आजुबाजुला कलम करण्यासाठी लागतात तसली धारदार पाती, दोरे पट्ट्या वगैरे पसरलं होतं त्यातलं नक्की त्याच्या हाताला काय लागलं असावं देव जाणे पण् त्याचे दोन्ही हात रक्तानं माखलेले होते आणि तरीही एकाग्रतेनं तो त्या रोपट्याशी काहीतरी करत होताच. सहसा आपण जरासं रक्त आलं तरी हातातलं काम टाकुन आधी उपचाराच्या धावपळीला लागतो पण हे वेडं तसंच काम करत बसलेलं. न रहावुन मी त्याला हाक मारली, आणि तो प्रचंड दचकला इतका की त्यानं हातात घेतलेलं रोप खाली पडलं आणि त्याची माती इतस्तत पसरली. माझ्याकडे वळून पहाताना त्याच्या नजरेत संतापाचे भाव स्पष्ट वाचता येत होते, कदाचित माझं असं अचानक येणं त्याला आवडलं नाही. माझ्याशी एक अक्षरही न बोलता तो उठून सरळ त्याच्या त्या पत्र्याच्या झोपडीकडे निघुन गेला. वास्तविक त्याला थांबवुन त्याच्या जखमेची चौकशी करुन त्याला मलमपट्टी करणं हे माझं कर्तव्य होतं पणं त्याची मघाची ती जळजळीत नजर माझ्या काळजाचे ठोके चुकवुन गेली आता त्याच्या मागे जायची माझी हिंमत नव्हती. ‘काय असेल ते सकाळी बघु’ असा विचार करुन मी सरळ घर गाठलं.

सकाळी तीतु कदाचीत कामावर येणार नाही असं वाटलेलं कारण तसाही तो सकाळी न येता दुपारी केंव्हातरी यायचा पण आज मात्र तो सकाळीच हजर होता. एरव्ही मी त्याला हटकलं ही नसतं पण आज मला त्याच्या जखमेची काळजी लागलेली, मी त्याला हाक मारली मात्र पुन्हा त्याने माझ्याकडे कालचाच संतप्त दृष्टीक्षेप टाकला आणि पुन्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. खरंतरं लोकांच्या संतापलेल्या नजरेची इतकी भिती कुणाला वाटत नाही पण तीतुच्या नजरेत काहीतरी वेगळेपण होतं नक्की. दिवसभरात मी त्याच्या पाळतीवर राहून त्याच्या हाताच्या जखमेचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला पण त्याच्या वागण्यात जखमी असल्याची कुठलीच खुण मला जाणवली नाही शेवटी न रहावुन मी त्याला कालच्या प्रसंगाबद्दल विचारलंच, काहीही न बोलता त्यानं आपले दोन्ही तळवे माझ्यासमोर पसरले, त्यावर कसलीही जखम मलातरी दिसली नाही मात्र त्याच्या चेहर्‍यावरचे संतप्त भाव आणि त्याची जाळून काढणारी नजर मला सहन होईना, म्हणुन कालच्या प्रकाराबद्दल काहीही न विचारता मी बाजुला सरलो. दिवसभर मला एकच गोष्ट सतावत राहीली ती म्हणजे जर तीतुच्या हाताला जर जखम नव्हती तर रात्री त्याचे हात रक्तानं भरलेले कसे काय दिसले?

`तयारी पुर्ण झाली आता बाहेरच्या मोकळ्या हवेत जायची वेळ जवळ आलीये, संधी केंव्हाही मिळेल तयार रहा' अधिरेपणाने केलेल्या कित्येक हालचाली अंधार ढवळुन काढत होत्या.

त्या दिवशीपासुन तीतुचं माझ्याबरोबरचं वागणं एकदम बदललं पुर्वी मी गुलाबांच्या शेताकडे गेलो की तितू आपलं वेडसर हसु चेहर्‍यावर आणुन माझ्या समोर यायचा पण आता जर मी तिकडे फ़िरकलोच तर तो डोळ्यात अंगार आणुन माझ्याकडे बघत बसतो, मी तिथुन निघेपर्यंत त्याची ती जळजळीत नजर माझ्यावरुन हलत नाही. त्यामुळे मी ही आजकाल तिकडे जाणं टाळतो. त्या दिवशीपासुन तितूचं इतरांशी वागणंही खटकण्यासारखंच झालं, एरव्ही तो इतरांपासुन अलिप्त असायचाच पण इतरांना किमान त्रास देत नव्हता पण आताशा तो कुणालाच त्याच्या त्या गुलाबांच्या रोपांकडे फ़िरकु देत नाही प्रसंगी शाररीक इजा करायलाही तो मागेपुढे पहात नाही. एकदा भर दुपारी गुलाबांच्या रोपासाठी गिर्‍हाईक आलं म्हणुन मी माझ्या दुसर्‍या एका माणसाला तिकडे पाठवलं तर त्याच्यावर तीतुनं चक्क झाडांचं कटींग करायच्या धारदार कात्रीनं हल्लाच चढवला तो बिचारा कसाबसा आपला जिव वाचवत पळून आला.

एकेकाळी तीतुबद्दल मला सहानुभुती, दया वाटत होती पण आता मला त्याचा राग यायला लागला. तीतुच्या वेडेपणात दिवसेंदिवस भर पडत चाललेली हल्ली तो कधी कुणाला इजा करेल हे सांगता न येण्याइथपत बिथरला होता. तो का इतका बिथरला याचं उत्तर शोधुनही मला सापडलं नाही कदचीत त्या रात्री मी त्याला हाक मारली तेंव्हाचं त्याचं दचकणं एखाद्या स्विच सारखं काम करुन त्याच्यातल्या वेडेपणाला जागृत करुन गेलं असेलं, पण त्याच आता इथे रहाणं ठीक नव्हतं हे खरं, पण माझं मनं मला टोचत होतं याच तीतुमुळे आज माझं आयुष्य जरा स्थिरावत होतं आणि मी त्याला सहजपणे बाजुला काढावं ? माझ्या सरळ मनाला हे पटत नव्हतं. अखेरीस मला मनावर दगड ठेउन त्याला परत त्याच्या जागी पाठवावं लागलं. त्याचं असं झालं की बाजुच्या झोपडपट्टीत खेळणार्‍या एका लहानग्या मुलानं नर्सरीच्या फ़ेंन्सींगमधुन कसा काय तो प्रवेश मिळवला, आणि चुकुन म्हणा किंवा उत्सुकतेनं म्हणा तो त्या गुलाबांच्या शेतात डोकावला, कसं काय देव जाणे!पण तीतुच्या ते नजरेत आलं आणि त्यानं सरळ हातातलं खुरपं त्या पोरावर फ़ेकलं. पोराचं नशिब चांगलं म्हणुन खुरप्याचा वार त्याच्या दंडावर पुसटसा झाला पण रक्त मात्र बरंच गेलं. त्या मुलांचं औषधपाणी मी केलं खरं, पण आजुबाजुची माणसं मात्र या असल्या वेड्याला आपल्यात राहुन द्यायला तयार नव्हती.
शेवटी मी तीतुला त्याच्या मुळच्या जागी परत नेलं. तिथं त्याच्या रहाण्यासाठी एक लहानशी पण विटांची खोली बांधुन दिली, गावात पैसे देउन त्याच्या अन्नाची सोय होईल असं पाहीलं आणि मी परतलो. मी परत निघताना मात्र तीतु माझ्याकडे बघुन हसला, हसला म्हणजे तेच त्याचं ते वेडसर हसु पण इतक्यानंही मी मनाची समजुत घातली आणि परत माझ्या नर्सरीकडे आलो.

तीतुला घालवुन दिला पण आता माझ्यासमोर एक गहन प्रश्न उभा राहीला माझ्या इतक्या विस्तारलेल्या गुलाबवाटीकेचं काय? कोण आणि कशी संभाळणार ती ? नविन कलमं कशी करणार ?
शेवटी माझ्याकडची दोन कुशल माणसं मी त्या कामाला लावली, अर्थात जुन्या रोपांचा वापर करुन नव्या रोपांवर पारंपारीक पध्दतीनं कलम करता आलं असतंच की.
त्या दोघांनी सुरुवात केली खरी पण बरेच हाल झाले बिचार्‍यांचे कारण तीतुनं दाटीवाटीनं लावलेल्या झाडांच्या मधुन जाताना त्यांचे चांगलेच तिक्ष्ण काटे अगदी रक्त येईपर्यंत दोघांना लागले. हुळहुळणारी शरीरं सांभाळत दोघे बिचारे काम करत राहीले.

जरा चमत्कारीकच म्हणावं लागेलं असलं काहीतरी त्या दिवशी घडलं. दोघांपैकी एक जण आजारी म्हणुन त्या दिवशी आला नाही आणि आदल्या दिवशी आलेली गुलाबाच्या रोपांची मोठी ऑर्डर पुर्ण करायची होती म्हणुन दुसरा एकटाच उशीरापर्यंत काम करत होता. करकरीत तिन्ही सांजा उलटल्यावर कशासाठीतरी म्हणुन तो उठुन जात असेल तेंव्हा घाईनं म्हणा किंवा आणखी कशानं त्याचा तोल गेला आणि तो सरळ त्या गुलाबांच्या झाडांच्या फ़ोफ़ावलेल्या झाडीतच पडला, सहसा अशावेळी माणुस काहीही करुन उठतो आणि तिथुन दुर व्हायचं बघतो पण हा मात्र तिथेच पडून राहीलेला, किती वेळ? ते त्याचं त्यालाच माहीत, पण कशासाठीतरी मी मागे गुलाबांच्या रोपांकडे गेलो तर मला तो दिसला. कसाबसा मी त्याला त्यातुन खेचुन काढला, पण एव्हाना तो शुध्द हरपुन बसलेला. एक अपघात म्हणुन मी ही घटना दुर्लक्षीत केली, पण काही दिवसातचं दुसराही कामगार असाच त्या गुलाबांच्या काटेरी ताटव्यात पडलेला सापडला, तो ही भर दुपारी. नक्की काय झालं हे त्याला काही केल्या आठवेना आता मला यात जरा संशयास्पद असं काहीतरी वाटायला लागलं. शेवटी ही जबाबदारी मी स्वत: स्विकारली.

सुरुवातीपासुनच मी त्या झाडांच्या फ़ार जवळ जाणं टाळलं, कलम करण्यासाठी डोळा असलेल्या फ़ांद्या काढायच्या म्हंटलं तरी मी संपुर्ण बागेचा फ़ेरा मारुन बाहेरुन सहजासहजी कापता येतील अशाच फ़ांद्या निवडायचो. इतकी काळजी घेउन सुध्दा हाताला चारदोन काटे लागायचेच, सहसा गुलाबाचा काटा लागला तर सुई टोचल्यासारखं थेंबभर रक्त येतं पण या झाडाचा काटा लागला की जखम झाल्यासारखं भळभळ रक्त यायचं. निरखुन पाहील्यावर या काट्यांमधलं वेगळेपण लक्षात यायचं. हे काटे एखाद्या लहानशा सुळ्याच्या आकाराचे दिसायला लागले होते निदान गुलाबालातरी असले काटे नसतात. आताशा काट्यांनी भरलेली जाडसर फ़ांदी बघितली की माझ्या वागण्यात सावधपणा यायला लागला, त्यांना हाताळण्यासाठी मी खास कातडी हातमोजे वापरायला सुरुवात केली. कितीही काळजी घेत असलो तरी मागच्या घटनांच्या वेगळेपणांमुळे म्हणा पण तिथे असताना मनाला स्वस्थता असायची नाही. आताशा आणखी एक नवी गोष्ट माझ्या लक्षात आली वारं आजिबात नसताना ही गुलाबाची रोपं डोलत असतात, आगदी सावकाशपणे पण निश्चीत दिशेने, आणि ती दिशा म्हणजे मी असलेली जागा, कल्पना करा अवाढव्य पसारा असलेल्या काटेरी जाळीसमोर तुम्ही उभे आहात आणि त्या जाळीचे काटेरी हात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत विचारानंच अंगावर शहारा येतो की नाही ? कदाचीत मागच्या दोन्ही वेळेस माझ्या कामगारांच्या बाबतीतही असेच काही घडले असु शकेल. चुकुन ते त्या जाळीच्या जास्त जवळ असतील आणि मग एखादी काटेरी फ़ांदी हळूच त्यांच्या पायाला.........

बाजारात जाणार्‍या आमच्या गुलाबांची संख्या आता रोडावली होती. मागणी अजुनही कमी झाली नव्हती पण मला त्या वळवळत्या काटेरी झुडपांमधे कुणाला पाठवायची हिंमत होत नव्हती, खास त्यांच्यासाठी बनवुन घेतलेल्या लांब दांड्यांच्या कात्र्या वापरुन आम्ही फ़ुलांची तोडणी करत असु. या झाडांमधे हा कृत्रीम जिवंतपणा का आला असावा? तितूने नक्की काय केलं ? प्रश्न अजुनही सुटले नव्हते. तीतुला शोधायचा प्रयत्नही निष्फ़ळ झालेला. माझ्याभोवती घडणार्‍या घटनांचा वेगळेपणा मला आता चांगलाच जाणवायला लागला होता.
.... अशातच ती घटना घडली आणि मीच माझ्या गुलाबवाटीकेचा कर्दनकाळ झालो.
डोक्यात बरेच विचार घेउन मी त्या दिवशी बेडवर पडलो होतो. विचारांच्या भरात मला झोप कधी लागली ते कळलंच नाही. मध्यरात्री केंव्हातरी मला ते स्वप्न पडलं असलं पाहीजे, स्वप्नंच म्हणायचं त्याला कारण मी माझ्या गुलाबांच्या शेतात मध्यभागी होतो आणि चारही बाजुने गुलाबांच्या लांबलांब काटेरी फ़ांद्या माझ्याकडे झेपावत होत्या, पहाता पहाता त्यांनी आपले काटेरी पाश माझ्यावर टाकले आणि .. आणि त्या वेदनेनं मी जागा झालो. अंगात शेकडो सुया शिरल्याची वेदना मला सहन होत नव्हती अंगावर उमटलेल्या रक्तरंजीत व्रणांतुन ठिबकणार्‍या रक्ताच्या थेंबांकडे पहाताना मला जाणवलं, मी खरंच स्वप्नात होतो ? जर स्वप्नात होतो तर माझ्या अंगातुन तरारुन आलेल्या रक्ताच्या थेंबांच काय? धडधडत्या काळजानं कशीबशी रात्र घालवली.

सकाळी नर्सरीत पोहोचल्यावर सर्वात आधी जे काही केलं असेल ते म्हणजे माझ्या स्वतःच्या हातानं मी त्या गुलाबांच्या झाडांवर कुदळ चालवली एक एक झाड मुळापासुन उखडून काढायचं होतं मला. एक वाफ़ा जमिनदोस्त केल्यावर माझा राग आणि शक्ती थोडी कमी झाली आणि मी थोडावेळ थांबलो. मघाशी रागाच्या भरात उपटून टाकलेल्या त्या झाडांच्या अस्ताव्यस्त पसार्‍याकडे पहात बसलो. त्याच्यावरचे गोंडस दिसणारे गुलाबकळे, त्यांची काळपट हिरवी पानं, शार्कच्या सुळ्यांसारखे ओळीनं असलेले ते अणुकुचीदार काटे, त्यांची लालसर मुळं ...? लालसर ..?
नक्कीच काही तरी चुकत होतं झाडाची आणि तीही गुलाबाच्या झाडाची मुळं लालसर ? तशी तर असायलाच नकोत. मी त्या पसार्‍याकडे आता काळजीपुर्वक पहायला लागलो, खरंच त्या झाडांची मुळं लालसर दिसत होती.
फ़टाफ़ट डोक्यात संदर्भ लागत गेले ती लालसर मुळं, त्या रात्री पाहीलेले तीतुचे रक्ताने भरलेले हात, त्याचं ते बिथरणं आणि इथेच याच मातीवर होत असलेला रक्तपात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फ़िक्कट गुलाबांचा दिवसेंदिवस बदलुन लालभडक होत जाणारा रंग याचा अर्थ एकच निघत होता कोणत्या ना कोणत्या प्रकारे तीतु त्या झाडांना रक्ताचं सिंचन करत होता ( त्यासाठी तो कोणते मार्ग वापरत होता ते त्यालाच माहीत ) आणि त्यामुळेच त्या झाडावरची फ़ुलं इतकी लालभडक दिसायची. तितू तिथुन गेल्यावर मग आपली तहान ती झाडं जवळपास येणर्‍याला जखमी करुन भागवायला लागली.

अरे देवा ! हे काय घडुन बसलं माझ्या हातुन? ही असली रक्तपिपासु झुडपं मी माझ्या जागेत रुजवली ? आजवर फार काही भयानक असं घडलं नाहीये पण तरीही...... मनाशी ठाम निश्चय करुन मी माझ्या गाडीकडे वळलो. गाडीत किमान एवढी गुलाब वाटीका संपवण्या इतपत पेट्रोल नक्की असणार..

समोर उसळणार्‍या आगीच्या डोंबाकडे पहात मी मनातल्या मनात निश्वास सोडला. एका येउ घातलेल्या भयंकर पर्वाची मी वेळेआधीच अखेर केलेली होती. ज्वालेचा एक लवलवता हात माझ्या दिशेला झेपावला आणि माझ्या मेंदुत हजारो वॅटचे दिवे लागले. मी माझ्याकडे असलेल्या या रक्तपिपासु झुडपांचा नाश केलाय पण ती सर्वस्वी नाहीशी झाली .....? माझ्याकडुन आवडली म्हणुन घरी घेउन गेलेल्या त्या शेकडो लोकांचं काय ? ते सुरक्षीत आहेत ? त्यापैकी कुठेतरी कधीतरी चुकुन जर यातल्या एखाद्या झाडाचं कलम दुसर्‍या झाडावर झालं असेल तर ?

लोकहो, जर तुमच्या नजरेत जर एखादं गुलाबाचं असं रोप असेल की ज्याने आपल्या काट्याने घायाळ करुन कुणाचं रक्त काढलं असेल तर या समस्त मानवजातीसाठी तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे ताबडतोब ते रोप नष्ट करा..... न जाणो त्याचे कितीतरी साथीदार आज तुमच्याच रक्तासाठी तहानलेले असतील.

*******

" डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पेशंट नं १०६ च्या रुम मधे कागद ठेवले होते. त्यावर त्याने हे पहा काहीतरी विचीत्र लिहीलेय " येरवडा मेंटल हॉस्पिटलचा तो वॉर्डबॉय सांगत होता.
" ठेव त्या टेबलावर "
" डॉक्टर, तुम्ही का इतके त्या वेड्याची काळजी घेताय? त्यानं तर त्याची आख्खी नर्सरी पेटवुन दिली, कोवळ्या फुलांवर असा अत्याचार ? हा माणुस एकदम कामातुन गेलेला दिसतोय" डॉ. नाईक विचारते झाले.
डॉक्टर मुजुमदारांनी यावर किंचीत मान हलवल्या सारखं केलं आणि त्या वॉर्डबॉयला जायची खुण केली आणि पुन्हा आपल्या विचारात गढुन गेले.
डॉक्टर मुजुमदार, गेल्या काही दिवसातच बदली डॉक्टर म्हणुन इथे आले होते. सडसडीत अंगकाठी, नेटकी वाढवुन ट्रीम केलेली दाढी, करारी चमकदार नजर आणि भारदार व्यक्तीमत्व असा हा माणुस. त्यांच्या रुबाबदार व्यक्तीमत्वात एक उणीव मात्र कायम राहुन गेलेली दिसत होती त्यांच्या डाव्या गालावर पंजा मारल्यासारखे दिसणारे ते तिन समांतर व्रण..

जगाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले होते..!!

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मन१'s picture

21 Nov 2011 - 3:48 pm | मन१

छान.
ह्यावरून दोन कथा आठवल्या मिपावरच्याच.
"एअरपोर्ट" (http://www.misalpav.com/node/16319) आणि
"वास्तव" (http://www.misalpav.com/node/17880) .
त्याही दोन्ही मस्त आहेत. अवश्य वाचा.

चाफा's picture

21 Nov 2011 - 4:12 pm | चाफा

थोडा प्रॉब्लेम झाला कथा एडीट करता येईल का ?

हो करता येईल.
काय बदल हवेत ते सांगा.
बाकी कथा आवडली.
मधे एकदोनदा भिती वाटली.

प्रास's picture

21 Nov 2011 - 4:32 pm | प्रास

अगदी खिळवून ठेवणारी झालीय बरं का ही कथा.... पण सुरूवात आणि शेवट यांची काहीशी सांगड नीट घातली गेली नाही असं वाटतंय. कथा संपादित करण्याचा प्लान कळतोय पण काही गोष्टी नीट स्पष्ट झाल्याचं जाणवत नाही आहे, तेवढं सुधारावं म्हणजे आणखी मजा येईल...

चाफा's picture

21 Nov 2011 - 4:41 pm | चाफा

आता एडीट केलेय आता ट्राय कर :) इथे थोडी कल्पनाशक्ती ताणावी लागेल पण ताळमेळ नक्की लागेल :)

प्रास's picture

21 Nov 2011 - 4:50 pm | प्रास

आता जमतंय चांगल्यापैकी....

गूड वर्क, दोस्त!

:-)

दादा कोंडके's picture

21 Nov 2011 - 6:38 pm | दादा कोंडके

भयकथा आवडली.

sagarpdy's picture

21 Nov 2011 - 7:54 pm | sagarpdy

लईच भारी जमली राव!

छान कथा आहे
शेवटपर्यत खिळवून ठेवलं

चाफा's picture

22 Nov 2011 - 10:50 am | चाफा

धन्यवाद मित्रमंडळ,
खरंतर हाच माझा लेखनप्रांत :) त्यामूळे जर कथा आवडली तर आणखीही लिहीन म्हणतो.

@ रेवती -- मदतीच्या विचारणेबद्दल धन्यवाद परंतु गणपा यांनी मला हवे ते बदल करुन दिले होते :)

पैसा's picture

22 Nov 2011 - 8:25 pm | पैसा

आम्हाला घाबरायला आवडतं, तेव्हा तुम्ही आणखी अशा घाबरवणार्‍या कथा जरूर लिहा!

स्मिता.'s picture

22 Nov 2011 - 9:38 pm | स्मिता.

कथा आवडली. शेवटपर्यंत गूढ उमगले नाही.

मस्त रे एकदम जबरा, गुलाबाची फुलं हे रुपक आहे असं समजुन वाचली तर भयकथा न राहता बरीच वेगळी होते आहे, एकुणच जबरा.