जंबो जेट -जंबोजेट

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
8 Nov 2011 - 1:00 pm

सत्तर साली भारतात आलेल्या जंबोजेटने जंबो शब्द वापरात आणला. जंबोजेटच्या कहाण्यांनी-फोटोंनी पेपरांची पाने भरून वाहत होती. लांब पल्ल्याच्या ताफ्यातले एअर इंडीयाचे पहीले विमान. एअर पोर्टवर ते बघायला प्रचंड गर्दी व्हायची. सुरुवातीचे काही महीने पार्ला अंधेरी -सांताक्रुझ मध्ये लोकं गच्चीवर उभी राहून जंबो दिसायची वाट बघायची. मग जंबो सगळीकडेच दिसायला लागलं.
अंधेरीला नविन सोसायटी आली तिचं नामकरण जंबोदर्शन -
बाजूलाच दुसरी सोसायटी आली तिचं नाव विमान दर्शन
मोठं मंत्रीमंडळ आलं ते पण जंबो मंत्रीमंडळ -
मोठ्ठ्या थैल्या आल्या त्या जंबो बॅग -
मोठा वडापाव जंबो वडापाव.
सगळीकडे जंबो जंबो.
या सुमारास एक बालगीत पण आलं .बघता बघता ते लोकप्रिय झालं . बालगीताचं पिकनीक साँग झालं . गाणं कुणी लिहीलं कुणालाच माहीती नव्हतं. कुण्या कविने ते लिहील्याचं श्रेय पण मागीतलं नाही .गाण्याची लोकप्रियता वाढत गेली आज त्या गाण्याला चाळीस वर्षं होत आली पण अजूनही जंबोजेट जंबोजेट -लंडन मुंबई प्रवास थेट अशी सुरुवात कोणी केली की टाळ्या वाजवत आपोआप ठेका धरला जातो.
या गाण्याची आणखी एक गोष्ट आहे. डोंबीवलीला एका सुप्रसिध्द गायकांचा कार्यक्रम होता. गायक छान गात होते. वादकही मन लावून वाजवत होते पण मैफीलीत काही केल्या रंग भरेना. शेवटी गायकांनी आप्पा वढावकरांना विनंती केली "आप्पा आता तुम्हीच काहीतरी करा " आप्पांनी जंबोजेट -जंबोजेट म्हणायला सुरुवात केली. मैफीलीचा मूड एकदम बदलला. पहील्याच ओळीनंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत ताल धरला. कार्यक्रम नंतर रंगतच गेला आणि या गाण्याची लोकप्रियता रातोरात वाढली.
असाच कधीतरी या गाण्याचा विषय निघाला तेव्हा एका पत्रकार मित्रानी माहीती पुरवली की हे गाणं भाऊ तोरसेकरांनी लिहीलं आहे . भाऊ तोरसेकरांनी आणि बालगीत -हे समिकरण काही जमेना.भाऊ तोरसेकरांचं लक्ष भोजनाचं गाणं फार लोकप्रिय होतं पण ते गाणं म्हणजे त्या वेळी झालेल्या लक्षभोजना बद्दल होतं .थोडी आणखी चौकशी केली तेव्हा या गाण्याची जन्मकथा कळली. भाऊंनी आपल्या मुलीला घरीच शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. अभ्यास घेणं सोपं होतं पण लहान मुलांना आवडतील अशी बालगीतं कोठून आणणार ? मग भाऊंनी पहीलं बालगीत लिहीलं जंबोजेट -जंबोजेट .
आज मला माहीती असलेलं गाणं तुमच्यासमोर ठेवतो आहे . जसं मी त्या काळी लिहून घेतलं तसंच .
कदाचीत काही शब्द चुकीचे असतील किंवा काही पदरचे असतील
( अक्षरे गाळून वाची का ते घाली पदरची -तो एक मूर्ख असे रामदासांनी म्हटले आहे ) पण ते न्यून माझे आहे असे समजून दुरुस्त्या सूचवाव्या ही विनंती.

या निमीत्ताने अशाच काही कवितांची चर्चा व्हावी हा पण एक उद्देश आहेच.

जंबोजेट जंबोजेट
लंडन -मुंबै प्रवास थेट
जगलो वाचलो पुन्हा भेट
जंबोजेट जंबोजेट झुईई...
घराला धडक दाराला कडक
पकडली गाडी आणि निघाला तडक
विमानतळावर शोधतोय स्थळ
भारत सोडून काढतोय पळ
उंच आकाशामधले ढग
चमकून पाही सारे जग
भेदून गेले एक विमान
पंखावरती देऊन ताण
पंखाला त्या पंखे नव्हते
विमानाला शेपूट होते
वायू सागरी तरते जेट
जंबोजेट जंबोजेट झुईइई

विमानात या यानात
नव्हती कसली यातायात
आकाशाला खिडकी होती
डोकावणारी डोकी होती
प्रत्येकाशी सलगी होती
खुर्चीला एक पट्टा होता
फास त्याचा पक्का होता
मुलगी आली माझ्याजवळ
म्हणते गेला विमान तळ
बिअर ड्रिंक्स ऑर्डर स्ट्रेट जंबोजेट जंबोजेट झुईईइ

इथे सेवेला सुंदर गाणी
इथे शिबंदी शौच नहाणी
बिअर ब्रँडी बाटली फुटली
लिंबू सरबत तहान मिटली
इंग्लीश टाईम्स भरपूर वाचा
महाराजाचा होऊन भाचा
एकच फेरी मोठं बजेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई

सगळे होते शांत शांत
विमान होते आकाशात
त्यात होतं माथेफिरू
त्यानी केलं काम सुरु
तो म्हणाला पायलटला
विमान वळव बैरुटला
विमान उतरव त्या शेतात
पिस्तूल आहे या हातात
त्यात आहेत सहा बुलेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईईई

प्रत्येक देशात कस्टम्स आहेत
तपासण्याच्या सिस्टीम्स आहेत
लगेज बॅगेज तपासतात
सारे प्रवासी तपासतात
त्यात असला स्मगलर तर
गोंधळामधे पडते भर
सोन्याची विट त्याच्याजवळ
सामानाची ढवळाढवळ
पोलीस त्याला पकडतात
सारे प्रवासी रखडतात
बाहेर पडायला होतो लेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईईईई

वाङ्मय

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

8 Nov 2011 - 1:12 pm | विनायक प्रभू

खुप दिवसांनी आलात राव.
ते अपुर्ण राहीलेले पण येउ द्यात.

मदनबाण's picture

8 Nov 2011 - 1:21 pm | मदनबाण

सध्या येव्हढेच म्हणतो...
जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई ;)

काका अहो ते सॉफ्टवेअर वाले गोडबोले राहिले की मागे ;) त्यांच्या विमानाचं तिकीट काटा बरं आता !
परत एकदा...
जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई ;)

(सुखोईत बसण्याची इच्छा असलेला) :)

इंटरनेटस्नेही's picture

8 Nov 2011 - 1:17 pm | इंटरनेटस्नेही

रामदास काकांनी एकदम भूतकाळात नेलं.. आता तर मुंबई - न्युयॉर्क प्रवास देखील थेट झाला आहे. :) पण हे गाणं म्हणजे खासच! जंबोदर्शन सोसायटीच्या नावापाठी हे गोष्ट आहे हे माहित नव्हतं.

पिंगू's picture

8 Nov 2011 - 2:12 pm | पिंगू

झकास आठवण आहे.

- पिंगू

चिरोटा's picture

8 Nov 2011 - 2:18 pm | चिरोटा

लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गच्चीतून पूर्ण विमानतळ दिसायचा. लॅन्डिंग केल्यापासून ते टेकऑफ पर्यंतचा.८१-८२ ला सहार विमानतळ झाला तरी रन वे एकच होता.लक्षात राहिलेली जंबो जेट्स(Boeing 747) म्हणजे- एयर इंडियाची. हर्षवर्धन, चंद्रगुप्त,कनिष्क,अशोक अशी राजांची नावे असायची.ईतर लहान विमानांच्या तुलनेत ही विमाने टेक ऑफ करताना शांत,थंडपणे टेक ऑफ करत आहेत असे वाटायचे.

सुहास झेले's picture

8 Nov 2011 - 2:17 pm | सुहास झेले

सही.. पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं :) :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Nov 2011 - 2:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

असेच म्हणतो.
बाकी काका तुमचे लेख आवर्जून वाचावे असेच असतात नेहमी.
वेगळे विषय, सुंदर मांडणी आणि तरीही मुद्देसुद!!

मैत्र's picture

8 Nov 2011 - 2:39 pm | मैत्र

मस्तच! ... काका जंबो जेट दोनदा लिहिलेलं वाचल्यावर झुंईई च मनात आलं होतं पण म्हटलं रामदासकाका काही तरी सॉलिड जंबोची माहिती लिहितील पण निघालं तेच गाणं !

खूप पूर्वी अशोक हांडेंच्या (मराठी बाणा वाले) कार्यक्रमात ऐकलं होतं... मस्त गाणं !

मराठी_माणूस's picture

8 Nov 2011 - 2:48 pm | मराठी_माणूस

छान गाणे. पहिल्यांदाच कळले ह्या गाण्याबद्दल.

प्यारे१'s picture

8 Nov 2011 - 3:17 pm | प्यारे१

+१.

वपाडाव's picture

9 Nov 2011 - 2:57 pm | वपाडाव

मी टु !!

झक्कास.. हे गाणं आम्ही चांगले मोठे झाल्यावर कँपिंगमधेही म्हणायचो.. कँपफायरला..

याच चालीवर "रेलगाडी"ही होतं.

जंबोजेट गाणं पूर्ण मात्र अजिबात माहीत नव्हतं. ते आत्ता कळलं.. धन्यवाद.. :)

सर्वसाक्षी's picture

8 Nov 2011 - 3:00 pm | सर्वसाक्षी

वा रामदासशेठ. भन्नाट लेख. हे गाणं संपूर्ण दिल्याबद्दल आभार, हे गाणं कोणे एके काळी सहलीमध्ये 'झालीच पाहिजेत' अशांपैकी एक गाण होत.

विमान ही आबालवृद्धांना भुरळ घालाणारी चीज. शेकडो वेळा बसुनही समोर उतरू पाहणारे वा नुकतेच झेपावलेले भले मोठे विमान दिसले की आपली नजर त्याचा वेध घेतेच. जंबोचा रुबाब काही वेगळाच. आकाशात सोडा, अगदी विमानतळावर देखिल ओळीने उभी असलेली जंबो नजर खेचतात. मध्यंतरी ए ३८० च्या जाहिराती उड्डाणात असताना पाहण्यात आल्या. त्यात अगदी अलिशान पलंगा पासुन ते प्रसाधना पर्यंत सोय असलेली दालनेसुद्धा आहेत. या महाकाय पक्षाने सगळ्या जगाला आ वासायला लावले, काही दिग्गजांनी तर ए ३८० हवेत झेपावु शकेल की नाही यावर शंका व्यक्त केल्या, एकंदरीत बराच गाजावाजा झाला. पण जंबोचे ते प्रसिद्धी वलय त्याला नाही.

पुन्हा एकदा धन्यवाद.

किसन शिंदे's picture

8 Nov 2011 - 3:47 pm | किसन शिंदे

:)

५० फक्त's picture

8 Nov 2011 - 7:00 pm | ५० फक्त

एक नविन गाणं माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद. आवडलं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Nov 2011 - 7:01 pm | निनाद मुक्काम प...

हे गाणे मी पहील्यांदा वाचले. आवडले.
कुर्ल्याहून विमानतळावर पूर्वी अर्ध्यातासावर होते.लहानपणी जंबो जेट नवीन आले तेव्हा चाळीतील अनेक जण गटागटाने ते पाहायला गेल्याचे ऐकले होते. उत्साही मंडळी तर जमेल तसे एअर इंडिया च्या भिंतीवरून उद्या मारून गेल्याचे कळते. पूर्वी माझ्या लहानपणी कुर्ला वेस्ट येथे स्टेशन पासून ५ मिनिटावर डोंगर लागायचा ( आता तो पोखरून काढल्याने त्याचे एका टेकडीत रुपांतर झाले आहे. ज्यावर झोपडपट्या उभारल्या आहेत) तेथे आम्ही होळी साठी गोवर्या चोरायला जायचो. आणी इतरवेळी विमानतळाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जायचो.

बाकी सर्वसाक्षी ह्यांनी सुद्धा ए ३६० ची आठवण करून मजा आणली. आजच्या पिढीसाठी तो हवेतला महाल ( त्यातिल मोठी दालने पाहून तर रंग महाल म्हंटले पाहिजे) म्हणजे कुहुतलाचा विषय आहे.

हे काका नेहमीच जुन्या आठवणी उकरून काढतात नी मग संपूर्ण दिवस त्याच आठवणीत रुंजी घालत असतो.

धमाल मुलगा's picture

8 Nov 2011 - 7:06 pm | धमाल मुलगा

:)

कँपफायर कधी करुया? :)

पैसा's picture

8 Nov 2011 - 7:13 pm | पैसा

पण मला कधी ऐकल्याचं आठवत नाही. नवी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! त्याची लय एकदम मस्त आहे. आवडली!

रेवती's picture

8 Nov 2011 - 8:39 pm | रेवती

गाणं पहिल्यांदाच वाचलं.
चांगलं ठेक्यात म्हणायला येतय.

योगप्रभू's picture

8 Nov 2011 - 9:59 pm | योगप्रभू

रामदास काका,
या गाण्याचा श्रोत्यांवर कसा जादुई प्रभाव पडतो, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. डोंबिवलीत घडलेला प्रसंग अगदी असाच कराडला घडला होता. ही साधारणतः १९८९-९० मधील गोष्ट आहे. कृष्णाबाईच्या उत्सवात एका ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. घाटावर खूप गर्दी झाली होती. संगीत संयोजन आप्पा वढावकरांकडे होते. त्या ग्रुपमधल्या गायक-गायिकांनी समोरचा समुदाय नीट लक्षात घेतला नाही. ते जुनी नाट्यगीते आणि भजने गायला लागले. थोडा वेळ ऐकून घेतल्यावर श्रोत्यांमधील तरुणाई अस्वस्थ झाली. त्यांना काही तरी चैतन्यदायी हवे होते. मग कंटाळून त्यांनी रसभंग करणार्‍या टाळ्या वाजवायला सुरवात केल्या. नंतर शिट्ट्या सुरु झाल्या. त्यामुळे गायकांचा गटही बिथरला. त्यातील एका गायिकेने आपला राग प्रकट करण्यासाठी 'रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही' हे गाणे म्हणायला सुरवात केली. त्याने तरुणांच्या रागात आणखी भर पडली. त्यांनी गाण्यांना टाळ्या वाजवायचेच थांबवले. एक विचित्र शांतता मंडपात पसरली. त्यातच विश्रांती जाहीर करुन गायक स्टेजमागे निघून गेले.

आणि अशा वेळी आप्पांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून माईक हातात घेतला आणि 'जंबोजेट जंबोजेट' सुरु केले. बघता बघता त्या गाण्याच्या ठेक्याने सगळ्यांच्या मनाची पकड घेतली. या गाण्यात जो 'झुइई..' हा ठेहराव आहे तेथे लोकच उत्साहाने 'झुइई' म्हणू लागले. हे अख्खे गाणे लोकांनी अप्पांना पुन्हा म्हणायला लावले. आप्पांनी माईक हातात घेतला आणि तरुणाईचे विशेष आभार मानले. त्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. आणि मग रुसून गेलेल्या गायकांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी झोकात एंट्री केली तीच मुळी 'ग साजणी' या गाण्यासह. पुढचा सगळा कार्यक्रम हिट्ट...

या गाण्याची आणि आप्पा वढावकरांची कमाल मी थक्क होऊन बघितली.

हे गाणे तपशिलासह सगळेच्या सगळे दिल्याबद्दल तुम्हाला एक सलाम!

पिवळा डांबिस's picture

9 Nov 2011 - 12:45 am | पिवळा डांबिस

वा, वा...
एके काळी हे गाणं खूप पॉप्युलर होतं. वर चिरोटा यांनी म्हटल्याप्रमाणे मीही माझ्या सांताक्रूझला रहाणार्‍या आतेभावाच्या गच्चीवर जाउन ही विमाने टेक्-ऑफ घेतांना बघत असे, त्यांच्या कडकडाटाने कान बधिर होत असत. कधीकाळी आपण त्यातून प्रवास केला तर आपणही त्यावेळेस जंबोजेट- जंबोजेट हे गाणंच म्हणायचं असं मी ठरवून टाकलं होतं....
चिरोटा यांनी म्हटल्याप्रमाणे एयर इंडियाने आपल्या जंबोजेटसना इतिहासकालीन राजांची नांवं दिली होती तेही लक्षात आहे. मला वाटतं की ती जेआरडी टाटांची आयडिया होती. (खरं तर नव्या सहार विमानतळाला जेआरडींचं नांव देणं अधिक सयुक्तिक ठरलं असतं, पण ते असो.)
सांगण्याची गोष्ट ही की पुढे बर्‍याच वर्षांनी जेंव्हा प्रथम परदेशप्रवास केला तेंव्हाही लुफ्तान्साचं प्रशस्त जंबोजेट होतं. ते गेटपासून टॅक्सी करत रनवेच्या टोकाला जाऊन थांबलं. आणि नंतर इंजिनांची पूर्ण ताकद लावून अगदी काळजापासून आक्रोश करत जेंव्हा प्रचंड वेगाने रनवेवरून झेपावलं तेंव्हा मात्र माझ्या मनात 'जंबोजेट- जंबोजेट' या गाण्याच्या ऐवजी, "च्यायला, ते एयर इंडियाचं एम्परर अकबर टेक ऑफ घेतांना इथेच या वांद्य्राच्या समुद्रात कोसळलं होतं, आता आपलं काय होणारे देव जाणे!!!" हेच विचार होते. सॉल्लिड फाटली होती....
:)
त्या जंबोजेट गाण्याची (आणि त्या फाटण्याची!!!:)) आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

कधीकाळी आपण त्यातून प्रवास केला तर आपणही त्यावेळेस जंबोजेट- जंबोजेट हे गाणंच म्हणायचं असं मी ठरवून टाकलं होतं....

आम्ही हे जंबीजेट कधीच ऐकलेलं नसल्या कारणाने "अ‍ॅम लीव्हिंग ऑन अ जेटप्लेन... डन्नो व्हेन अल्बी बॅक अगेन !!!" हेच गाणे म्हणनार असे ठरवलेले आहे....

धनंजय's picture

9 Nov 2011 - 5:04 am | धनंजय

मस्त

गणपा's picture

9 Nov 2011 - 3:35 pm | गणपा

काका हे गाणं पहिल्यांद्याच ऐकलं.

पण बाकी बालपणीच्या विमानांच्या आठवणीं मात्र तंतोतंत.
जेव्हा गोरेगाव सोडुन सांताकृझला एयर इंडियाच्या कंपनी क्वॉर्टर्स् मध्ये रहायला गेलो तेव्हा ईमारतीच्या गच्चीवरुन धावपट्टी, विमानांचे हँगर दिसायचे. तासन तास गच्चीवर तळ ठोकुन उतरणारी आणि उडणारी विमानं पहात वेळ घालवलाय. :)

NAKSHATRA's picture

23 Jan 2021 - 9:09 am | NAKSHATRA

काका , तुम्ही मिपा साठी जम्बो जेट आहात,
सगळे काही जम्बो आहे तुम्चाकडे,
कल्पनाशक्ती, लेखनशैली, विचारधारा,
खूपच छान , काका .....