The Shadow Of The Great Game: The Untold Story Of India's Partition: ले. नरेंद्र सिंग सरीला

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
31 Oct 2011 - 10:24 pm

The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला

प्रथम एक खुलासा: येथील (मराठी साईट्स) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्‍या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे :)

लेखकाची माहिती: नरेन्द्र सिंग नरीला हे मूळचे सरीला संस्थानचे वारस, नंतर लॉर्ड माउंट्बॅटन यांचे सहाय्यक (Aide-de-camp) आणि पुढे १९४८ ते १९८५ इतकी - तब्बल ३८ वर्षे- भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होते. या तीनही रोल्स मधे येथे उल्लेख केलेल्या 'गेम' मधल्या, त्यावर प्रभाव पाडणार्‍या असंख्य लोकांशी त्यांचा जवळून संबंध आलेला असेल. त्यांची राजकीय विचारसरणी माहीत नाही, पण निदान या विषयावर लिहीण्यासाठी फाळणीचे राजकारण इतक्या जवळून पाहिलेली व्यक्ती मिळणे अवघड आहे. तसेच ब्रिटन मधे नुकतीच काही वर्षांपूर्वी खुली झालेली तेव्हाची कागदपत्रे त्यांनी यासाठी वापरली आहेत.

या परीक्षणात पहिले १० मुद्दे ही लेखकाची मला समजलेली मते आहेत. पुढचे बाकीचे मुद्दे हे मला हे पुस्तक वाचल्यावर, त्यातील अनेक संदर्भांबद्दल आणखी माहिती वाचल्यावर काय वाटले, याबद्दल आहेत. प्रतिक्रियांत सोप्या संदर्भासाठी प्रत्येक मुद्द्याला वेगळा नंबर मुद्दाम दिला आहे.

द ग्रेट गेम
ब्रिटिश साम्राज्य भरात असताना ब्रिटन व रशिया यांच्यात भारत व मध्य आशिया वर सत्ता गाजवण्यासाठी वर्षानुवर्षे चाललेले डावपेच म्हणजे "The great game". विकीपेडिया व इतर ठिकाणी याची आणखी माहिती मिळेल.

लेखकाने भारताची फाळणी हा या गेमचा मुख्य भाग होता, या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहीलेले आहे. आत्तपर्यंत निदान मी तरी फाळणी फक्त काँग्रेस-जीना, हिंदू-मुस्लिम यातील सत्तास्पर्धेतून/वैमनस्यातून झाली असावी अशाच दृष्टिकोनातून पाहात होतो. या पुस्तकाने त्यावेळचे आंतरराष्ट्रीय राजकारण व भारतीय नेत्यांची त्याबाबतीत असलेली अनभिज्ञता/उदासीनता फाळणीला कशी कारणीभूत झाली हे पुढे आणायचा प्रयत्न केलेला आहे.

प्रथम लेखक काय म्हणतो ते मुद्दे:

१. १९४० च्या सुमारास ब्रिटिशांना भारताला कोणत्या तरी स्वरूपात स्वातंत्र्य लौकरच द्यावे लागेल याची जाणीव झाली होती. पण आपल्या साम्राज्याचा हा मोठा भाग सोडताना जवळच असलेल्या "तेल क्षेत्रा" च्या जवळचा भाग आपल्या हातात राहावा, आणि तेथे रशियाचा/कम्युनिझम चा प्रभाव वाढू नये हा त्या "ग्रेट गेम" चा एक मुख्य भाग बनला. अमेरिका, ब्रिटन आणि इतर बलाढ्य राष्ट्रे यांचे मुख्य उद्दिष्ट त्यावेळेस हेच होते (अजूनही हेच आहे).

२. जीनांच्या मुस्लिम लीग ला भारतात अगदी १९४०-४२ सालापर्यंत मुस्लिम लोकांचा अजिबात पाठिंबा नव्हता. वेगळ्या पाकिस्तान च्या मागणीत बहुसंख्य मुस्लिमांना रस नव्हता. तेव्हाच्या मुस्लिमांपैकी अगदी कमी लोकांचे ही मुस्लिम लीग प्रतिनिधित्व करत होती. "ब्रिटिश इंडिया" (नोट-१) मधे जे "प्रांत" होते त्यापैकी "वायव्य सरहद्द", "पंजाब", "बंगाल" ई. ठिकाणी मुस्लिम लोकांचा सत्तेत बराच वाटा होता, त्यामुळे आणखी वेगळे राष्ट्र काढण्याची मागणी त्यांची नव्हती. फक्त जेथे मुस्लिम अल्पसंख्य होते तेथेच आपल्याला वेगळे राष्ट्र हवे या मागणीला पाठिंबा मिळू शकत होता, पण तेथेही तो सरसकट जीनांना मिळत नव्हता. १९३७ सालच्या प्रांतीय निवडणुकांत मुस्लिम लीग ची धूळधाण उडाली होती. मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या जागांपैकी सुद्धा एक चतुर्थांश जागाही लीगला मिळाल्या नाहीत. या निवडणुकांमधे काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले होते आणि लीग कोठेच नव्हते. म्हणजे तोपर्यंत पाकिस्तानच्या मागणीला कोठेही पाठिंबा नव्हता.

३. १९३९ मधे (तेव्हा प्रांतीय निवडणुकांमुळे मर्यादित सत्ता असलेल्या) कॉंग्रेस ला न विचारता भारताला दुसर्‍या महायुद्धात खेचल्याचा निषेध म्हणून काँग्रेस पुढार्‍यांनी सरसकट राजीनामे दिले आणि ब्रिटिश सरकारच्या युद्धप्रयत्नांवर प्रभाव पाडण्याची संधी घालवली. आता ब्रिटिश सरकार त्यांच्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ शकत होते. तसेच १९४० मधे लॉर्ड लिनलिथगोशी बोलताना गांधींजींनी हिटलर बद्दल केलेले वक्तव्य (नोट-२) व एकूणच अहिंसेच्या धोरणामुळे युद्धाला विरोध यामुळे युद्धातील मदतीकरिता तेव्हाच्या काँग्रेस नेतृत्वाला पर्याय शोधण्याची गरज ब्रिटिशांना जाणवली.

४. थोडे नंतर सुद्धा महायुद्ध ऐन भरात असताना काँग्रेस नेतृत्त्वाने पुकारलेल्या चले जाव चळवळीमुळे ब्रिटनमधील जनमत भारताच्या विरोधात गेले. ब्रिटन त्यावेळेस (१९४२) प्रचंड अडचणीत होते. अशा वेळेस त्यांच्या भारतातून सैन्य उभे करण्याच्या व भारतातून रसद जाऊ देण्याच्या विरोधात झालेल्या हालचाली त्यास कारणीभूत होत्या. त्यात चले जाव मधले बरेचसे काँग्रेस नेते ब्रिटिशांनी लगेच तुरूंगात टाकले व काँग्रेस चा विरोध असून सुद्धा ब्रिटिशांना भारतातून सैन्यात लोक भरती करायला फारशी अडचण आली नाही.

५. अशा अनेक गोष्टींमुळे काँग्रेस नेतृत्व आपल्याला स्वातंत्र्यानंतर फारसे उपयोगाचे नाही हे ब्रिटिश व्हाईसरॉय व इतर मंडळींनी ब्रिटनमधे ठसवायला सुरूवात केली होती, त्यामुळे सगळा ब्रिटिश इंडिया काँग्रेसच्या हातात जाणे ब्रिटनच्या हिताचे नव्हते. येथेच "तेल क्षेत्रा" जवळचा भाग काहीही करून आपल्या कंट्रोल मधे ठेवायचा हे मुख्य सूत्र ठरले. मग भारताबद्दल उघडपणे वाईट बोलणारा चर्चिल असो की वरवर सहानुभूती दाखवणारा अ‍ॅटली असो, ब्रिटिशांचे हे धोरण कधीच बदलले नाही. मात्र हे जाहीर धोरण नव्हते हे येथे महत्त्वाचे आहे.

६. ब्रिटिश इंडियाचा थोडा भाग आपल्या कंट्रोल मधे ठेवायचा असेल तर फाळणी करणे आवश्यक आहे हे ब्रिटिशांनी ठरवले. पण फाळणीची जबाबदारी स्वतःकडे घ्यायची नाही (आंतरराष्ट्रीय प्रतिमा राखणे हे कारण, अमेरिकेचा दबाव हे दुसरे), उलट भारताच्या नेत्यांवर टाकायची हे ही ठरले.

७. त्यासाठी तेव्हा नगण्य असलेल्या जीनांना मोठे करणे चालू झाले. कारण जीनांची तेव्हाची महत्त्वाकांक्षा आणि ब्रिटिशांचे धोरण हे एकत्र जुळत होते. जीनांच्या मुस्लिम लीगला पाठिंबा नसलेल्या पंजाब, वायव्य सरहद्द ई. प्रांतांमधे त्यांना अनुकूल नसलेल्या तेव्हाच्या नेत्यांना हलवणे वगैरे फासे टाकणे चालू झाले. अगदी १९४३ पर्यंत ब्रिटिशांचा मुख्य इंटरेस्ट असलेले वायव्य सरहद्द व पंजाब प्रांत काँग्रेसबरोबरच होते. पण वायव्य सरहद्द प्रांतात निवडून आलेले सरकार "बायपास" करून सार्वमत घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसने मान्य करणे व पंजाबबाबत केलेल्या इतर काही "चालीं" मुळे तेथे ब्रिटिशांनी जीनांना पाठिंबा असलेले लोक सत्तेवर आणले. १९३९ मधे प्रांतिक सरकारांमधील काँग्रेस नेते राजीनामे देऊन गेल्याने तेथे (ब्रिटिश) गव्हर्नर रूल चालू होता व तेथे पाहिजे तसे बदल करायला ब्रिटिशांना मोकळे रान मिळाले. फाळणी चा मार्ग येथेच खुला झाला. त्यानंतर मग पाकिस्तान होत आहे कळल्यावर इतर लोक त्यामागे आले.

८. शेवटचे व्हाईसरॉय माउंटबॅटन सुद्धा ब्रिटिशांचा हा छुपा अजेंडा घेउनच आले होते. आणि याच माउंटबॅटनना "निष्पक्ष निवाड्यासाठी" काही ठिकाणी कॉंग्रेसने पाकिस्तानच्या मुद्द्यावर निवड करायची जबाबदारी दिली. (हवे असलेले दोन प्रांत नक्की ब्रिटिशांच्या कंट्रोल मधे राहतील हे पाहिल्यावर मात्र माउंटबॅटननी उरलेला भारत एकसंध राहील - तेव्हाची संस्थाने स्वतंत्र राष्ट्रे होणार नाहीत - यासाठी काँग्रेसला खूप मदत केली. किंबहुना संस्थाने भारताला मिळण्यात त्यांचाच मुख्य हात होता असे लेखकाचे मत आहे).

९. १९४५-४७ च्या सुमारास भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल आणि एकसंध ठेवण्याबद्दल अमेरिकन सरकारने ब्रिटिशांवर प्रचंड दबाव आणला होता. १९४१ साली ब्रिटन व अमेरिकेने केलेला "अटलांटिक करार" भारतालाही लागू असावा याबाबत अमेरिका आग्रही होती. या करारानुसार लोकांचा स्वतःचे सरकार स्वतः निवडण्याचा हक्क ही दोन्ही राष्ट्रे मान्य करत होती. पण ब्रिटनने भारतीय नेते जपानच्या बाजूने आहेत असे निर्माण केलेले चित्र, भारताच्या नेत्यांची अमेरिकेविषयी उदासीनता किंवा त्यांचे अमेरिकन लोकांना (सांस्कृतिकदृष्ट्या) तुच्छ लेखणे आणि त्यावेळेस कम्युनिस्ट विचार असलेल्या लोकांचा परराष्ट्र धोरणावर असलेला प्रभाव यामुळे हा दबाव हळुहळू कमी करण्यात चर्चिल्/ब्रिटिशांनी यश मिळवले.

१०. स्वातंत्र्यानंतर काश्मीरसाठी झालेल्या युद्धातही अत्यंत महत्त्वाचे असलेले "गिलगीट" वगैरे भाग भारताकडेच राहावेत यासाठी अमेरिका शेवटपर्यंत दबाव टाकत होती (हा भाग मूळचा काश्मीर संस्थानचा, मधे काही वर्षे ब्रिटिश ईंडियात होता, पण स्वातंत्र्याच्या वेळेस तो परत काश्मीरला दिला गेला होता त्यामुळे ते संस्थान भारतात विलीन झाल्यावर तो भागही भारतात जायला हवा होता). पण नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांनीच तो आग्रह सोडल्यावर यूनो मधे अमेरिकेच्या दबावातील हवा निघून गेली. (भारताच्या नकाशात हा भाग अजूनही भारतात दाखविला जातो. हा भाग जर भारतात राहिला असता तर पाक व चीन एकमेकांना जोडणारा जमिनीचा भाग शिल्लकच राहिला नसता.)

आता हे वाचल्यावर व यात असलेल्या संदर्भांबद्दल अजून माहिती काढल्यावर माझी काही मते:
११. नेहरू, कृष्ण मेनन वगैरे नेते इंग्लंड मधे शिकलेले, तेथे बराच काळ घालवलेले होते. मेनन तर युद्धाच्या काळात सुद्धा तेथेच होते व माउंटबॅटन वगैरे लोकांशी संपर्कातही होते. तेथील सर्कल्स मधून यांना या "गेम" ची काहीच कल्पना आली नसेल हे अवघड वाटते. कदाचित नेहरूंच्या डोक्यात असलेला अलिप्ततावाद किंवा आशियाचे नेतृत्व करून अमेरिका व रशियाला पर्याय म्हणून एक तिसरा दबावगट निर्माण करण्याच्या कल्पनेमुळे त्यांना असे वाटले असेल की अमेरिका/ब्रिटनच्या विरोधात राहूनही आपण पाहिजे ते मिळवू शकू

१२. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य हवे होते. पण ते मिळाल्यावर त्यांच्याशी वैर घेण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे त्यावेळच्या नेतृत्वाने भारत ब्रिटनला अनुकूल असणारी आंतरराष्ट्रीय धोरणे राबवेल (भारताच्या हिताला बाधा न येता, मुख्यतः तेलाच्या राजकारणाबद्दल) असे वातावरण का निर्माण केले नाही ते कळत नाही.

१३. त्यावेळेस अमेरिकेबद्दल दाखवलेल्या उदासीनतेमुळे भारताचे नुकसानच झाले असे वाटते. अमेरिकेचा पाठिंबा व नेहरूंसारखे निदान देशांतर्गत बाबतीत सुजाण नेतृत्व हे एकत्र झाले असते तर भारताचा फायदाच झाला असता. अमेरिकेलाही कम्युनिस्ट चीन पेक्षा लोकशाही असलेला भारत व्यापारासाठी, जे मोठे अमेरिकन उद्योग नंतर चीनकडून आपली उत्पादने बनवून घेऊ लागले त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय झाला असता. आणि नेतृत्व ब्रिटन ला अनुकूल आहे म्हंटल्यावर एकतर भारत एकसंध राहिला असता किंवा किमान नंतर अमेरिकेने पाकला जेवढे महत्त्व व साहाय्य दिले तेवढे दिले नसते.

१४. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका एवढा बलाढ्य देश असून व लोकशाही राष्ट्र असून सुद्धा भारताने अमेरिकेबद्दल एवढी उदासीनता का दाखवली असे मला नेहमी वाटते. त्याचे एक उत्तर या पुस्तकात मिळाले: तेव्हाचे बरेच भारतीय नेते इंग्लंडमधे शिकलेले होते, व त्यावेळेस ब्रिटिश लोकांचे अमेरिकनांबद्दलचे मत एकदम तुच्छता दर्शविणारे होते (संस्कृतीहीन, उर्मट लोक वगैरे). तेव्हाच्या भारतीय नेत्यांची मतेही त्याच सर्कल्स मधे वावरल्याने तशीच झाली होती असे दिसते.

१५. वायव्य सरहद्द प्रांत पूर्ण स्वतःच्या कंट्रोल मधे असताना १९४०-४५ च्या दरम्यान कॉंग्रेसने अचानक त्यावर पाणी का सोडले? (सरहद्द गांधी) खान अब्दुल गफारखानांना काँग्रेसने आवश्यक तेव्हा साथ दिली नाही असे पूर्वी वाचले होते. हा प्रांत व पंजाब प्रांत जर काँग्रेसकडे राहिला असता तर फाळणीला काही अर्थच राहिला नसता. पण या प्रश्नाचे नीट उत्तर या पुस्तकात तरी मिळाले नाही.

१६. सगळे मुस्लिम पाकमधे का गेले नाहीत असा प्रश्न कधीकधी विचारला जातो. हे पुस्तक वाचल्यावर असे वाटते की थोडेफार जीनांचे मूळचे समर्थक सोडले तर इतर कोणालाच असे फुटून जायचे नव्हते. हे भूत ब्रिटिशांनीच उभे केले नसते तर फाळणी झालीच नसती.

१७. वरती ४ नं च्या मुद्द्यात ब्रिटिश जनमत भारताच्या विरोधात गेले असा उल्लेख आहे. भारताला त्याची फिकीर करायची काय गरज? तर त्याचे कारण हे की तेव्हाच्या काँग्रेसच्या लढ्यात सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे व खुद्द ब्रिटनमधे आपले मित्र निर्माण करणे व ब्रिटिश सरकारवर अंतर्गत दबाव आणणे हे एक मुख्य उद्दिष्ट होते. जर तेथील जनमत विरोधात गेले तर ते साध्य होणार नव्हते.

१८. या सबंध राजकारणामधे भारताला स्वातंत्र्य म्हणजे एक Dominion State म्हणजे राणीचे नेतृत्व मानणारा घटक देश या स्वरूपातच द्यायचे असेच ब्रिटिशांचे ठरले होते. माउंटबॅटन भारतात आले ते हेच गृहीत धरून. पण भारत पूर्ण स्वतंत्र राष्ट्र होणार (Republic) हे काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या गळी कसे उतरविले याबाबत आता उत्सुकता आहे, या पुस्तकात ते मिळाले नाही.

नोट-१: फाळणीपूर्वीचा भारत म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर भारत, पाक व बांगलादेश एकत्र असलेला नकाशा उभा राहतो. पण याच नकाशात बरीच संस्थाने होती (एकूण ३५०), जी "ब्रिटिश इंडिया" मधे गणली जात नसत. त्यांच्यावर अंतिम सत्ता ब्रिटिशांचीच असली तरी बाकी ब्रिटिशांच्या थेट अंमलाखाली असलेल्या भागाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेली धोरणे या संस्थानांना आपोआप लागू होत नसत. उदा: प्रांतिक सरकारे ही फक्त मुंबई, मद्रास, बंगाल वगैरे प्रांतांमधे होती, हैदराबाद, काश्मीर, जुनागढ सारख्या संस्थानांमधे नाही. म्हणजे आजूबाजूला पसरलेला ब्रिटिश इंडिया व मधे मधे हे असंख्य स्वतंत्र पुंजके असा तो नकाशा होता.
नोट-२: १९४० च्या मध्यावर नाझी फौजा फ्रान्स काबीज करून ब्रिटनच्या जवळ पोहोचल्या होत्या तेव्हा ब्रिटिश सरकार युद्धाच्या तयारीत असताना गांधीजी लॉर्ड लिनलिथगो ला भेटले होते व हिटलरचा विरोध ब्रिटिशांनी शस्त्राने करू नये/अहिंसेने करावा अशा अर्थाचा सल्ला दिला होता. मौलाना आझादांच्या "India wins freedom" मधेही याचा उल्लेख आहे (पान ३५).

इतिहाससमीक्षा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

31 Oct 2011 - 10:29 pm | आत्मशून्य

.

रामपुरी's picture

1 Nov 2011 - 4:07 am | रामपुरी

हिटलरचा विरोध ब्रिटिशांनी शस्त्राने करू नये/अहिंसेने करावा अशा अर्थाचा सल्ला दिला होता
हे खूपच मजेशीर वाटले. हा सल्ला त्यावेळी हिटलर विरोधात लढणार्‍या सगळ्याच राष्ट्रांनी मानला असता तर काही वेगळेच जग दिसले असते.. :) :) :)
(अवांतर: गांधीप्रेमी याचा कसा प्रतिवाद करतात याची उत्सुकता लागून राहिली आहे :))

बाकी लेखातून बरीच नवीन माहीती मिळाली. धन्यवाद...

प्रास's picture

1 Nov 2011 - 12:08 pm | प्रास

अत्यंत माहितीपूर्ण लेखन. हा आणि असा वस्तुनिष्ठ इतिहास आपल्याला शिकवला गेला असता तर कदाचित इतिहासाकडे बघण्याची कोती दृष्टी नक्कीच बदलली गेली असती. अर्थात इतिहासातून शिकण्याची प्रवृत्ती आपण अजूनही दाखवू शकलेलो नाही तेव्हा त्याचा किती उपयोग झाला असता हा प्रश्न अलाहिदाच आहे.

आवडला लेख. अशा विषयांवर माहितीपूर्ण लेखांचे स्वागत आहे.

धन्यवाद!

:-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Nov 2011 - 1:55 pm | निनाद मुक्काम प...

अत्यंत वाचनीय लेख . ब्रिटिशांनी पाकिस्तान व व एकमेव ज्यू राष्ट्रे बनवणे हा त्याच्या डावपेचाचा भाग होता. आज त्यामुळे सीमा प्रश्न निर्माण झाला तो बहुदा जगाच्या अंतापर्यंत राहील .

अमेरिकेविषयी तत्कालीन भारतीय नेत्यांची मते अगदी मोजल्या शब्दात मांडली आहेत. ( दुसर्या महायुध्ध्चे प्रमुख परिणाम म्हणजे अमेरिकेचा उदय व वसाहतवादी ब्रिटीश राज चा अस्त होता. ह्याची जाणीव नेहरूप्रणीत नेत्यांना असून त्यांनी सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष्य केले . ) खुद्द पाकिस्तान मध्ये अनेक नामवंत पत्रकार १९४२ पर्यंत पाकिस्तान एक वेगळे राष्ट्रे हा विचारच नव्हता असे खुलेआम सांगत आहेत व द्विराष्ट्र थिअरी कालबाह्य झाल्याचे क्रांतिकारक मत व्यक्त करत आहेत.

ह्या पुस्तकाचे भाषांतर नक्कीच वाचायला आवडेल.

पु ले शु

नितिन थत्ते's picture

1 Nov 2011 - 8:27 pm | नितिन थत्ते

उत्तम लेख.

बर्‍याचश्या गोष्टी अचूक आहेत. अर्थात इंटरप्रिटेशनमध्ये फरक असणारच.

मुस्लिम लीगला भारतात १९४० पर्यंत अजिबात पाठिंबा नव्हता हे पटत नाही. अर्थात भारतात म्हणजे 'आताच्या उरलेल्या भारतात' असे म्हणायचे असेल तर ठीक आहे.

स्वातंत्र्य देणे भाग आहे हे जसे ब्रिटिशांना १९४० च्या दरम्यान कळून चुकले होते तसेच फाळणी अटळ आहे हेही भारतीय नेत्यांना बरेच अगोदर कळून चुकले होते. आणि त्याचे कारण हिंदू मुस्लिम तेढ (नैसर्गिक + वाढवलेली) हेच होते. डॉ राजेन्द्र प्रसाद यांनी इंडिया डिव्हायडेड हे पुस्तक १९४६ मध्ये लिहिले होते. त्यात फाळणी करणे कसे अहितकारक आहे याचा उहापोह आहे. त्याचे आर्थिक कारणही दाखवले आहे. त्यासाठी दोन्ही देशांचे उत्पन्न आणि खर्च जिल्हावार दाखवला आहे. याचाच अर्थ फाळणी होईल ती कोणत्या रेषांवर होईल हे चित्रही १९४६ मध्येच काँग्रेसनेत्यांना बर्‍यापैकी क्लिअर होते

मुस्लिमांची सत्ता सर्व जगावर असणे हे खरेतर न्याय्य आणि नैसर्गिक आहे (१०० : ०). तरीही आम्ही उदारपणे हिंदूंबरोबर सत्ता शेअर करण्यास तयार आहोत (५० : ५०) असे मुस्लिम नेत्यांचे म्हणणे होते. तर नव्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात सत्ता वाटप (आपोआप) होऊ शकेल असे हिंदूंचे (पक्षी- काँग्रेसचे) म्हणणे होते. या दोन्हीचा समन्वय शक्य नव्हता म्हणून फाळणी अटळ होती. लखनौ कराराच्या* पुढे जायला काँग्रेस (पक्षी- गांधी, नेहरू आणि पटेल) तयार नाही म्हणून फाळणी करवल्याशिवाय मुस्लिमांना पर्याय नव्हता.

डॉमिनियन स्टेटसचा प्रस्ताव १९३० मध्येच लाहोर अधिवेशनात काँग्रेसने फेटाळला होता. तरीसुद्धा १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० या काळात भारत (त्याचप्रमाणे पाकिस्तानची घटना बनेपर्यंत पाकिस्तान) हे ब्रिटनचे डॉमिनिअन होते. या काळातल्या भारत सरकारच्या काही कृतींचे परीक्षण करताना ही पार्श्वभूमीसुद्धा लक्षात ठेवायला हवी.

>>माउंटबॅटननी उरलेला भारत एकसंध राहील - तेव्हाची संस्थाने स्वतंत्र राष्ट्रे होणार नाहीत - यासाठी काँग्रेसला खूप मदत केली. किंबहुना संस्थाने भारताला मिळण्यात त्यांचाच मुख्य हात होता असे लेखकाचे मत आहे).

हे विधान खूपच रोचक आहे. असेच विधान फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट या पुस्तकात देखील वाचले होते.

अवांतरः
हिटलरचा विरोध ब्रिटिशांनी शस्त्राने करू नये/अहिंसेने करावा अशा अर्थाचा सल्ला दिला होता

हे खूपच मजेशीर वाटले. हा सल्ला त्यावेळी हिटलर विरोधात लढणार्‍या सगळ्याच राष्ट्रांनी मानला असता तर काही वेगळेच जग दिसले असते.. Smile Smile Smile

(अवांतर: गांधीप्रेमी याचा कसा प्रतिवाद करतात याची उत्सुकता लागून राहिली आहे Smile)

पटेलांनी सुद्धा शस्त्रबळाने जपानशी लढणार्‍या सरकारशी, अहिंसेचा पुजारी असल्यामुळे मी सहकार्य करू शकत नाही असे म्हटले होते.
राजकारणी लोक म्हणतात त्याचा शब्दशः अर्थ घेऊन "हे असे काय म्हणाले?" असा विचार करणार्‍यांची गंमत वाटते.

अतिअवांतर : गांधी, पटेल आणि स्वातंत्र्य लढ्यातील बरेच नेते हे बॅरिस्टर होते हे आपण विसरून गेलो आहोत का?

*टीप: लखनौ करार १९१६ मध्ये झाला. त्यात मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ असण्याची तरतूद होती. विभक्त मतदारसंघ हा प्रकार 'राखीव' मतदारसंघापेक्षा वेगळा आहे. राखीव मतदारसंघात उमेदवार विशिष्ट गटाचाच असू शकतो परंतु मतदार मात्र सर्व गटांचे असतात. या उलट विभक्त मतदारसंघात मतदार आणि उमेदवार दोघेही त्याच विशिष्ट गटाचे असतात. असा मतदारसंघच विभक्त असणे हे मुसलमान हे वेगळे राष्ट्र आहे या कल्पनेचाच आविष्कार होता. (त्यांना इतरांबरोबर क्लब करता येणार नाही).

रामपुरी's picture

1 Nov 2011 - 8:31 pm | रामपुरी

पटेलांनी सुद्धा शस्त्रबळाने जपानशी लढणार्‍या सरकारशी
पटेल व ब्रिटीश राष्ट्र आणि जपान व हिटलर हि तुलना बेहद्द आवडली... ROFL

नितिन थत्ते's picture

2 Nov 2011 - 6:05 pm | नितिन थत्ते

>>पटेल व ब्रिटीश राष्ट्र आणि जपान व हिटलर हि तुलना बेहद्द आवडली... ROFL

रिटायरमेंटनंतर मराठी वाचनाचे क्लास काढीन म्हणतो. ;)

पैसा's picture

1 Nov 2011 - 8:03 pm | पैसा

मूळ पुस्तकाचे लेखक लॉर्ड माउंटबॅटन याना जवळचे आणि भारतीय परराष्ट्र सेवेत बरीच वर्षं घालवलेले असल्यामुळे त्यांची या विषयांवरची मते वाचणं चांगलंच इंटरेस्टिंग ठरेल. राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय स्तरावर घडणार्‍या बर्‍याच गोष्टींत असे अनेक "गेम्स" चालू असतात, बरेचसे गेम्स आपल्याला कधीच कळत नाहीत.

लेख आवडला, आणि थत्तेंची प्रतिक्रियासुद्धा!

जयंत कुलकर्णी's picture

1 Nov 2011 - 8:14 pm | जयंत कुलकर्णी

//जीनांच्या मुस्लिम लीग ला भारतात अगदी १९४०-४२ सालापर्यंत मुस्लिम लोकांचा अजिबात पाठिंबा नव्हत/////

मला वाटते हे बर्‍यापैकी बरोबर आहे. आकडेवारी हेच म्हणते. १९३६ सालातल्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणूकीत लीगला अवघ्या १०९ जागा मिळाल्या होत्या तर १९४६ साली याच निवडणुकात लीगला मुसलमानांसाठी असलेल्या ४९२ जागांपैकी ४२८ मिळाल्या. लीगचे सामर्थ्य ४० नंतर जवळजवळ चौपट वाढले असे म्हणायला हरकत नाही.

//हिटलरचा विरोध ब्रिटिशांनी शस्त्राने करू नये/अहिंसेने करावा अशा अर्थाचा सल्ला दिला होता. मौलाना आझादांच्या "India wins freedom" मधेही याचा उल्लेख आहे (पान ३५//////

हा उल्लेख माझ्या मते पान क्र. ३९ वर आह ( अर्थात ते महत्वाचे नाही) आणि त्यांनी म्हटले आहे की "युद्धामुळे होत असलेला विनाश इ. थांबवता आला नाही तर आपण आत्महत्या करू" असे उद्गार गांधी वारंवार काढत आहेत" दुसरे म्हणजे आझादांनी असेही म्हटले की अहिंसा हे काँग्रेसचे ब्रीद नसून धोरण आहे. अन्य पर्याय उरला नाही तर जनतेने हाती शस्त्रे घेऊन स्वातंत्र्य मिळवले तरी चालेल" अर्थात या युद्धात भारताने सामील होऊ नये असे गांधीजींचे ठाम मत होते.

बाकी लेख चांगला आहे हे नमूद करतो.

राही's picture

1 Nov 2011 - 11:26 pm | राही

फाळणी, म. गांधी या दोन विषयांवर हजारो दस्तऐवज,शेकडो पुस्तके, तीही नामवंत आणि अभ्यासू लोकांनी लिहिलेली उपलब्ध आहेत.ज्याला सत्य जसे उलगडले तसे त्याने प्रामाणिकपणे मांडले आहे.(मला स्वतःला गोविंदराव तळवलकरांचे विवेचन सत्याला अधिक जवळचे वाटत आले आहे.)
शेवटी इतिहास स्वतःचा रस्ता स्वतःच निवडतो.(हिस्ट्री टेक्स इट्स ओन कोर्स). युद्धे, फाळण्या,नवराष्ट्रनिर्मिती अशा जगड्व्याळ घटना कोणा एकाच्या प्लॅन प्रमाणे तंतोतंत घडून येत नाहीत. त्यांचा एक स्वतःचा असा वेग असतो. कधीकधी तो इतका वाढतो की त्यामुळे निर्माण झालेल्या आवर्तामध्ये भवतालचे नेते, समाजधुरीण,राज्यकर्ते इतकेच नव्हे तर लोकसमुदायही वावटळीमध्ये पाने उडावीत तसे कुठल्याकुठे उडून जातात, वाहून जातात,वाहवतात.
साठ वर्षांनंतर आता सिंहावलोकनात फाळणी अपरिहार्य होती आणि ती झाली ते एका अर्थी बरेच झाले असे वाटते. पाकिस्तान, अफ्गानिस्तान सारखे धगधगते निखारे पदरात किंवा उशाशी बांधून घेऊन राहाणे भारताला कठिण गेले असते. फाळणी झाली नसती तर पाकिस्तान वगैरे मध्ये आज आहे तशी परिस्थिती उद्भवली नसती हे म्हणणे पटण्यासारखे नाही.पश्चिम आशियात ज्या घडामोडी घडल्या त्यांचा प्रभाव मुस्लिम जनतेवर पडलाच असता.

आशु जोग's picture

21 Aug 2015 - 11:28 pm | आशु जोग

ओके

पद्मावति's picture

22 Aug 2015 - 12:51 am | पद्मावति

हे पुस्तक वाचायला आवडेल. एखाद्या घटनेमागे खरोखर किती हितसंबंध गुंतले असतात, किती राजकारण, किती गेम्स खेळले जातात- सगळया सामन्यांच्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी.

तिमा's picture

22 Aug 2015 - 3:33 pm | तिमा

लेख आणि थत्ते व राही यांचे प्रतिसाद आवडले.
फाळणी झाली ते बरेच झाले, असे मत माझ्या वडिलांच्या आणि आजोबांच्या काळातल्या बर्‍याच लोकांचे होते. आत्ताची एकंदर परिस्थिती पहाता, हे मत योग्यच होते, असे वाटते. उरलेल्या भारतातही पाकिस्तानचे छुपे समर्थक बरेच आहेत. संपूर्ण प्रदेश एकत्र असता तर कदाचित या निष्ठा आजच्या आयसिसलाही वाहिल्या गेल्या असत्या. कारण धर्माच्या बाबतीत जराही लवचिकपणा नसेल तर अशा लोकांशी सर्वकाळ पटणे, केवळ अशक्य आहे. हे माझे मत, कुठल्याही धर्माचा तिरस्कार असण्याने नाही पण वस्तुस्थितीवर आधारित आहे.

गॅरी ट्रुमन's picture

22 Aug 2015 - 4:40 pm | गॅरी ट्रुमन

फाळणी झाली ते बरेच झाले, असे मत माझ्या वडिलांच्या आणि आजोबांच्या काळातल्या बर्‍याच लोकांचे होते. आत्ताची एकंदर परिस्थिती पहाता, हे मत योग्यच होते, असे वाटते.

सहमत आहे.फाळणी झाली हे एका अर्थी चांगलेच झाले.

विशाखा पाटील's picture

22 Aug 2015 - 4:33 pm | विशाखा पाटील

मुद्देसूद परिचय. पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाच्या एका परिक्षणात असाही मुद्दा होता, की 'ग्रेट गेम' हे नंतरच्या काळात केलेले इंटरप्रीटेशन असू शकते. मुळात त्यावेळी तसा हेतू ठेऊन झाले नसावे. परंतु या पुस्तकात जागोजागी संदर्भ दिले आहेत, त्यावरून तरी हा काही प्रमाणात 'ग्रेट गेम' होता, याची खात्री पटत जाते.

मुद्दा क्र. १३ आणि १४ - अमेरिकेचे दुसऱ्या महायुद्धपर्यंतचे धोरण अलिप्ततावादाचे होते. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या काळात भारत रशियाकडे झुकल्यावर अमेरिकेला पाकिस्तान जवळचा झाला. दुसरे, अमेरिकेचं लक्ष भारतापेक्षा तेलविहिरी असलेल्या देशांकडे होते.

पगला गजोधर's picture

22 Aug 2015 - 4:38 pm | पगला गजोधर

Another perspective is always treat for readers like me.
Plz plz plz also write movie-review in your style.
Your movie review fan,
Pagala