आमेरिकन बिवटी - येक पिक्चर...

फटू's picture
फटू in जनातलं, मनातलं
2 Jun 2008 - 5:27 am

(हा लेक म्हंजे 'आमेरिकन बिवटी ' ह्या इंग्लिस पिक्चरचा परीक्शन हाय. ह्ये परीक्शन वरिजनल आमेरिकन पिक्चरवर आदारीत हाय. (मना आसा म्हनायचा हाय का हा परीक्शन भारतीय शेंसॉर बॉर्डाने शेंसॉर केलेल्या 'आमेरिकन बिवटी' चा नाय. असो.) तर सांगायचा मुद्दा हा हाय की पिक्चरमदी काय पन दाकवलेला असला तरी मी लेक लिवताना लय संबालून लिवलाय. तरीपन सरपंचाना किवा कुना आदर्नीय मिपा कराना काय आब्जेक्शन आसला तं मना काय नं सांगता हितना हा लेक काडून टाकला तरी माजा काय म्हनना नाय...)

...गावाकड दुपारच्या टायमाला जोरान हुती येते. हुती म्हनजे वा~याचा भवरा. घोल घोल फिरत तो जो काय भेटल त्याला आपल्यामदी उचलुन घेत फुडं सरकत जातो. जर ह्या हुतीमदी कागदाचा कपटा भ्याटला त तो पन त्या हुतीबरोबर कुटल्याकुटं भरकटून जातो. मानसाचा आयुष्य पन आसाच हाय ना ? नियती नावाची हुती येते आनी आयुश्याला कुटल्याकुटं भरकटत न्हेते... त हीच आय्ड्या ह्या आमेरिकन बिवटीमदी हाय...

...पिक्चर चालु व्हतो येक शुटींगनी. येक पोरगी खाटंवर झोपलेली आसते आनी ती शुटिंग करना~या पॉरग्याला आपल्या बापसाबद्दल सांगत आसते का तिचा बापुस जाम बोरिंग हाय. त्याला लोकांमदी मिसलायला नाय आवडत. आसा बराच काय काय ती त्याला सांगते. त तो पॉरगा तीला यिचारतो मी तुज्या बापसाला मारु काय ? ती पोरगी बिंदास हो म्हनते. आनी वरना त्याला यिचारते पन, का खरज तो तिज्या बापसाला मारील काय म्हनुन. (आनी हितपसना आपल्याला आमेरिकन लोकान्च्या र्हानीमानाचा दर्शन व्हयाला सुरवात व्हते...)

लेस्टर बर्न्हम, त्या पोरीचा बापुस. सादारन च्यालीसच्या आसपास आसावा. तो यका पेपरमदी कामाला आसतो आनि त्याज्या बायकोचा रियल यिश्टेटचा धन्दा आसतो. हा हावा, तो हावा म्हननारी बायको, न्हेमी सोताबद्दल डावुट आसलेली, गोन्दलून गेलेली पोरगी ह्या सगल्याला बिच्यारा जाम वयतागलेला आसतो. तसा तो सोताला मेल्यात जमा हाव आसाच समजत आसतो. बिच्याराला ह्रावुन ह्रावुन वाटत आसतो का त्यानी काय तरी हारवलाय. आनी परत सोताचीच सम्जुत घालीत आसतो का आजुन पन टाइम गेलेला नाय. आजुन पन तो ते मिलवु शकतो...

त ह्या लेस्टरचा दिवस सुरु व्हतो सकालच्या आंगोलीने. नागव्याने आंगोली करीत आसताना तो आजुन बराच काय काय करतो. ह्या सगल्याला तो पु~या दिवसाचा हायलाइट म्हनतो. ह्यानंतर शिन येतो तो लेस्टरच्या हापिस मदला. त्याज्या सायबाबरोबरचा. त्याजा सायेब त्याला सांगतो का हापिसमदली बिनकामाची मानसा तो काडुन टाकनार हाय. हिकडं कॅरोल म्हनजे त्या पोरीची आइस किंवा लेस्टरची बायको येक घर यिकायचा प्रयत्न करत आसते. ब~याच गिरायकाना घर दाकवुन व्हतो. पन घर काय कोन घ्यायाला तयार व्हइत नाय. म ती सोतालाच काय काय बोलते आनी सोतालाच मारुन घेते.

आसा आला दिवस ढकलत बर्न्हम कुटुम्ब आयुश्य जगत आसतो...

येक दिवस जेनच्या, त्या पोरीच्या शालेमदी गॅदरिंग आसतो. पोरीचं आइस बापुस पोरीचा नाच बगायला तिज्या शालेत जातात... आनि हितंच पिक्चरच्या हिरोनीची येन्ट्री व्हते... जेन आपल्या मयतरनींसोबत डॅंस करत आसते. तिज्यासोबत यांजेला म्हनुन तिजी येक खास मयतरीन सुदा आसते. ( ही पिक्चरची हिरोनी हाय.) पोरीच्या बापसाला ही पोरीची मयतरीन जाम आवडते. तो आपल्या पोरीचा नाच बगायचा सोडुन तिज्या मयतरनीची सोपनं बगायला लागतो. नाच संपतो. सगल्यांच्या वलकी बिलकी व्हतात. पोरीचा बापुस यांजेलावर शायनिंग मारायला बगतो. पन जेनला, त्याज्या पोरीला तो सगला काय आवडत नाय. (कुटल्या पोरीला आपला बापुस आपल्या मयतरनीवर लाइन मारतो हा आवडंल ?)

नंतर सगली घरी येतात. ती यांजेला पन जेनच्या घरी येते. जेन आनि यांजेला ह्यांच्या येका शेपरेट खोलीत गप्पा चालु व्हतात. ती यांजेला लय चालु पोरगी आसते. तिजा आसा म्हनना आसातो का की सर्व सामान्य आयुश्य जगन्यासारका वाइट दुसरा कायच नाय. त त्यांच्या त्या गप्पा फाजिल गप्पा आसतात ह्या सांगायची काय गरज नाय. ती यांजेला इतकी पोचलेली आसते का ती जेनसमोरच तिज्या बापसाच्या आंगामासाबद्दलपन बिंदास बोलते. आनी वरना म्हनते काय जर जेनच्या बापसान येवस्तीत तब्येत बनवली त ती त्याज्याबरोबर झॉपायला पन तयार व्हइल. जेन मातर आपल्या कानावर हात ठेवते. (पोरगी किति पन पोचलेली आसली तरी आसला काय आपल्या बापसाबद्दल नक्किच आयकुन घ्यानार नाय ना ). हा सगला बोलना जेनचा बापुस चोरुन आयकत आसतो. जाम बरा वाटतो त्याला तो सगला आयकुन... त्याजा जो काय हारवलेला आसतो तोच मिलाला आसा त्याला वाटतो...

आसा सगला चालत असताना त्यांच्या समोरच्या घरात नविन मानसा ह्रायाला यतात. त्यांचा पोरगा आल्या आल्याच जेनवर लाइन मारायला सुरुवात करतो. आगदी तिजा शुटींग बिटींग पन करतो. सुरुवातीला जेन काय त्याला भाव देत नाय. नंतर मात्र पागालते आनि त्याला लाइन द्यायाला सुरवात करते. यांजेला, जेनची मयतरीन तिला जाम समजवायाला बगते. तो पॉरगा तिज्या वलकीचा हाय, तो जरा याडा हाय आसा काय काय ती जेनला सांगते. पन जेन तिजा काय पन आयकत नाय. ती त्या पॉराला लाइन द्याना चालुच ठेवते. ( तो कसा पन आसु दे, माजा त्याजावर पिरेम हाय. लय भारी ना ?)

हिकडं लेस्टर, जेनचा बापुस आपली नोकरी सोडुन देतो. नोकरी सोडताना सायबाला म्हनतो का मना येक वर्श्याचा पगार दे नाय त तु माज्याशी येडावाकडा वागलास आसा मी तुज्यावर आरोप करीन. सायेब घाबरुन लेस्टरला पयशे देवुन टाकतो. मग लेस्टर एक दुसरी कमी तरासाची हाटेलातली नोकरी बगतो. रिकी, जेनचा लवर ह्याच दर्म्यान लेस्टरशी वलक करुन घेतो. त्यासाठी तो लेस्टरला काय तरी आफु सारकी नशा आननारी मारिजुआना नावाची वस्तु देतो. लेस्टर हालु हालू सोताच्या गोन्दललेल्या आवस्तेतुन भाइर पडत आसतो. तो मस्त यायाम बियाम करायला लागतो. आपल्याला हावी आसलेली गाडी इकत घ्येतो.

कॅरोल, जेनची आइस येक दिवस तिज्या एका जुन्या मयतराला भेटते. तो तिजा मयतर त्याजी बायको त्याला सोडुन ग्येली म्हनुन सांगतो. तो सांगत आसताना त्याज्या डोल्यात पानी बीनी येतो. मग कॅरोल पन त्याला आपल्या आयुश्यातली सुकदुक्कं सांगते. आनी मग सा~या जगाला इसरुन त्या दुक्की जिवांचा मिलन व्हतो. कॅरोलचं म तिज्या मयतरासोबत रंगढंग चालु व्हतात. येक दिवस आशीच कॅरोल आनी तिजा तो मयतर गाडीतना येका हाटेलाच्या ड्राइव थ्रु समोर येतात आनी आडर देतात. त्याच बरोबर त्यांची चुम्मा चाटी पन चालु आसते. ( आता ह्या ड्राइव थ्रुला आपल्याकड काय म्हनतात नाय म्हायती बा. खरा त आपल्याकड आसा काय नसतो. पन आसा आसतो का आपुन येका खिडकी समोर गाडीतना वरडुन आडर द्यायाची आनी फुडच्या दुस~या खिडकीतना आपल्या खायच्या वस्तु घ्यायाच्या). कॅरोलचा ब्याड लक आसा की लेस्टर न्यामका ह्याच हाटेलात कामाला आसतो. तो ड्राइव थ्रु मदना आलेला आवाज आपल्या बायकोचा हाय हा लगेच वलकतो. आनी खायाच्या वस्तु द्यायाच्या खिडकीत तो सोता येतो. बगतो त काय त्याजी बायकोची दुस~याच बाप्प्याच्या गाडीत आसते आनि तिजी त्याज्याबरोबर चुम्मा चाटी चालु आसते. लेस्टर हा सगला आगदी थंड डोक्यान घेतो. पन कॅरोलची, त्याज्या बायकोची आवस्ता लय वाइट व्हते. ती आगदी पार तुटून जाते...

येक दिवस जेनच्या घरी यांजेला येते. जेन आनी तिजा बापुस घरी आसतात. आइस कुटंतरी भाइर गेलेली आसते. यांजेला आनी जेनच्या बाता चालु व्हतात आनी न्यामका त्याच टायमाला रिकी, जेनचा लवर त्याज्या बापसाशी भांडून घर सोडुन येतो. तो जेनच्या घरी येतो आनी जेनला यिचारतो का मी पलुन जाताय तु येशील काय माज्या सोबत. तो तिला आसा पन सांगतो का त्याज्याकड चालिस हाजार रुपय हायेत त्यामुल काइच आडचन नाय. जेन पन त्याज्याबरोबर पलुन जायाला तयार व्हते. यांजेला जेनला जाम सम्जावुन बगते पन जेन काय तिजा आयकत नाय. शेवटी जेन आनि रिकि दुस~या खोलीत जातात...

हा सगला बगुन यांजेलाला कायपन सुचत नाय. ती टेपवर येक क्याशेट लावते. त्या क्याशेट मदी आयुश्याबद्दल कुनीतरी बराच काय सांगत आसतो. यांजेला सोताशीच म्हनते का जेन पन पलुन जातेय तिज्या लवर सोबत. म्हनजे ती सर्व सामान्य नाय. मग यांजेलाला ती सोताच सर्व सामान्य हाय आसा वाटायला लागतो. यांजेला ती क्याशेट आयकत आसतानाच लेस्टर तिज्या खोलीत येतो. तिला समजावुन सांगतो, का ती सर्व सामान्य नाय म्हनुन. तिला समजावत आसतानाच तो तिजं कपडं काडतो. आता मातर यांजेला घाबरुन त्याला सांगते का आसा काय करायचा हा तिजा पयलाच टाइम हाय. म लेस्टर पन काय करीत नाय. तो तिज्यासाटी मग खायाला बनवतो. मग यांजेला त्याला यिचारते का त्याला आता कसा वाटताय म्हनुन ( काय शिन हाय पिक्चरमदी ). आनी लेस्टर म्हनतो का त्याला आसा ह्याज्याआदी कुनी इचारलाच न्हवता. त्याला एकदम बरा वाटतो. आनी लेस्टर आपल्या खोलीत जावुन त्याज्या बायको आनी पोरीसोबतच्या फोटुसोबत बोलायला लागतो...

... ह्याच टायमाला हिकडं कॅरोल भाइर गाडीत आसते. जाम जोरात पावुस पडत आसतो. ती यिचार करुन करुन हायरान झालेली आसते. (न्हव~यान दुस~याच बाप्प्याबरोबर चुम्माचाटी करताना बगितल्यावर ती तरी काय करील...)

... हिकडं लेस्टरचा फोटुशी बोलना चालुच आसतो. इतक्यात पाटीमागना येक बंदुकवाला हात येतो आनी लेस्टरच्या डॉक्यात गोली घालतो. लेस्टर आडवा होतो. रगताने भिजुन जातो. त्याज्या मेलेल्या च्या~यावर पन हासु आसतो...

आनी बाकी सगले म्हनजे यांजेला, कॅरोल, रिकि आनी जेन, रिकिचा बाप हे तेव्हा काय करत आसतात हे येकदा दाकवुन लेस्टरच्या आवाजात त्याज्या आयुश्याची कहानी थोडक्यात सान्गुन पिक्चर संपतो...

(लेख ज्या बोली भाषेत लिहिला आहे, ती रायगड जिल्ह्याच्या माणगाव, महाड, म्हसळा, श्रिवर्धन, पोलादपुर आणि रोहा या तालुक्यांच्या खेड्यांमध्ये बोलली जाणारी बोली भाषा आहे. लेख लिहिताना कुठलाच उद्देश नजरेसमोर नव्हता. फक्त त्या चित्रपटावर जे लिहावंसं वाटेल ते लिहायचं एव्हढंच ठरवलं होतं. नाही म्हणायला एक अँगल जरुर होता... मी अमेरिकेतून काम करणारा संगणक अभियंता ही माझी आजची ओळख बाजुला ठेवुन जर मी माझ्या काल परवापर्यंतच्या नजरेनं म्हणजेच कोकणातल्या एका खेड्यात वाढलेल्या मुलाच्या नजरेतुन या सिनेमाचं वर्णन केलं तर ते कसं असेल... बघुया किती मिपाकर या ओळीपर्यंत वाचतात...)

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

2 Jun 2008 - 8:14 am | मदनबाण

सतीश राव लय मस्त लिवल हाय तुम्ही..काय पन बोला पण ही अमेरिकेतील लोक हाय मात्र फारच मोकळी...कोणाच्या बायको बरोबर कोणाचा नवरा !!!!! (बहुतेक ह्यालाच 'आमेरिकन बिवटी ' म्हणत असणार)
व्वा र गड्या बाकी ह्या इंग्लिस पिक्चरचा परीक्शन तु लई झ्याक लिवल हायस..आणि ते म्या अगदी शेवट्च्या ओली पर्यंन्त वाचल्,,,नाही म्हणजे पोचलो तिथपर्यंन्त........

(बिवटी बिवटी म्हणतात ती अशी हाय काय) या इचारामंदी हरिवलेला..
मदनबाण.....

मुक्तसुनीत's picture

2 Jun 2008 - 8:25 am | मुक्तसुनीत

गावडे यांनी आपल्याला परिचित अशा भाषेत चित्रपटाची कथा सांगितली. एका हॉलीवूडपटाची कथा लोकभाषेमधे ऐकण्यात जी मजा असते ती आणि तितकी या लेखामधे आहे खरी. परंतु "गावकर्‍याच्या" दृष्टिकोनातून अत्याधुनिक अमेरिकन मूल्यांवर भाष्य करताना त्यातून काहीतरी चमकदार , चटकदार , खुसखुशीत लिहीण्याची संधी त्यानी गमावली असे वाटले. भाषिक नमुन्याचे प्रदर्शन इतपतच परिणाम त्यानी साधला ; "साध्याभोळ्या नजरेतून अमेरिकन गुंतागुंत" असे काहीतरी केले असते तर त्याचा परिणाम कितीतरी जास्त मनोरंजक झाला असतासे वाटले.
रायगड भागातल्या भाषेच्या लडिवाळपणाकरता मात्र हे लिखाण जरूर वाचावे !

यशोधरा's picture

2 Jun 2008 - 8:27 am | यशोधरा

वाचलां हां मीनीपन, अगदी शेवटापर्यंत वाचलां!! जल्लां सगलां गोंधलच हाये म्हनायाचा हा पिच्चर म्हंजे!!

विसोबा खेचर's picture

2 Jun 2008 - 8:41 am | विसोबा खेचर

वा गावडेशेठ, ष्टोरी बाकी मस्तच लिवली हाय!

बोलीभाषेत वाचायला मजा वाटली...! :)

अजूनही अशी परिक्शणं येऊ द्या...

आपला,
(चुम्माचाटीचे शीन चवीचवीने बघणारा!) तात्या.

अनिल हटेला's picture

2 Jun 2008 - 10:27 am | अनिल हटेला

च्या मारी!!

असली कथा ,आणी ह्याला सिनेमा म्हणतात व्हय?

बाकी सतिश राव लिहीलये ,एक दम झ्याक मधी काय!!!!

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2008 - 4:18 pm | भडकमकर मास्तर

असली कथा ,आणी ह्याला सिनेमा म्हणतात व्हय?
एक विनंती....नुसत्या कथेवर जाऊ नका साहेब... (तेसुद्धा अशा स्टाईलने सांगितलेल्या...)
आपण स्वतः सिनेमा पहा आणि मग ठरवा...
या सिनेमाला १९९९ सालची ( लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, अभिनेता, आणि बेस्ट फिल्म ) अशी ऑस्कर आहेत...
त्याची पटकथा, संवादही वाचून पहा...
...
तुम्ही सिनेमा पाहून नंतरही तुमचे असेच मत झाले तर मात्र आमचे काही म्हणणे नाही...
तुमच्या मताचा आदर करतो...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा's picture

2 Jun 2008 - 10:39 am | ऋचा

लै भारी लिवलयं तुमी

पण त्ये ष्टोरी म्हंजी येकदम माल हाय बगा :(

आनंदयात्री's picture

2 Jun 2008 - 10:49 am | आनंदयात्री

काय राव गावडेराव ... गोळी घालणारा म्हणजे रिकीचा बाप असतो अन तो का गोळी घालतो ते सांगितलेच नाही राव .. शेवटचे नाट्य अजुन नीट उलगडुन मांडायला हवे होते असे वाटले .. असो चांगला प्रयत्न.

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2008 - 4:11 pm | भडकमकर मास्तर

स्पॉइलर... अटेन्शन...
तो गोळी घालणारा रिकीचा बाप होमोफोबिक असतो....
त्याचा गैरसमज असा होतो की आपल्या चांगल्या (!!) मुलाकडून हा शेजारचा लेस्टर काही अनैतिक वगैरे काम करवून घेतो आहे त्यामुळे {जुना ( बहुतेक जर्मन ) सैनिक असणारा }तो तिरीमिरीत जाऊन लेस्टरला गोळी घालतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चेतन's picture

2 Jun 2008 - 10:51 am | चेतन

काय बा इस्टोरी!

बाकी लिवलास मात्र झकास ! लय बेस

आता आमचि भाषा ऐकायला कशी लै भारी

च्यायला तिथे जाउन पण असले पिक्चर बघतोस हत तिच्या....

गावरान चेतन

गिरिजा's picture

2 Jun 2008 - 10:59 am | गिरिजा

काय पन बोला पण ही अमेरिकेतील लोक हाय मात्र फारच मोकळी...कोणाच्या बायको बरोबर कोणाचा नवरा !!!!! (बहुतेक ह्यालाच 'आमेरिकन बिवटी ' म्हणत असणार)

माझ्या मनातही हेच आल अगदी..

वाचल हो शेवटपर्यन्त..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

मयुरयेलपले's picture

2 Jun 2008 - 11:10 am | मयुरयेलपले

आमाला वाचायचा लय याड .. त्यात तुमि लिवलाय म्हटल्यावर मंग काय इचारायचा.. काय ष्टोरि लिवलिय .. काय ती जेन , तिची आईस , अन काय त्या आईशिचा घो (नवरा).. आमेरिकेत हाव ना तुमि संभालुन रा रे पुता (मुला).. वयाचा विचार करुन सगला कर नाय तर तुजि ष्टोरि (इंडियन गाय).. मला ल्यावि लागण.. बाकि सगला मामला बेस जमलाय
आपला मयुर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2008 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिन्माची ष्टोरी लै आवडाली.
अझून सांग इंग्लीश पीच्चरच्या ष्टो-या.

कथा म्हणुन काही ध्येनात नै आलं, म्हंजी गोष्ट अर्धीच सांगली की काय कनु आस्स वाट्लं, हळू हळू उमजन म्हणा तेबी.

वेताळ's picture

2 Jun 2008 - 1:13 pm | वेताळ

//......पण त्ये ष्टोरी म्हंजी येकदम माल हाय बगा .....//

का तुला असे म्हणायचे होते त्या पिक्चर मध्ये खुप छान 'माल' आहेत.

(मालामाल) वेताळ

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2008 - 3:52 pm | भडकमकर मास्तर

सतीश,
गोष्ट छान सागितली आहेस... मजा आली वाचून... तेव्हा २००० सालामध्ये दोन वेळा थिएटरला पाहिला होता... यावर पुन्हा कधीतरी लिहावे असे मनात होते, तेव्हा फारच आवडला होता हा सिनेमा ...

या सिनेमाला मिळालेली ऑस्कर्स...Oscars for Best Actor (Kevin Spacey),
Best Director (Sam Mendes),
Best Picture (Bruce Cohen and Dan Jinks),
Best Original Screenplay (Alan Ball), and
Best Cinematography (Conrad L. Hall)

त्यातले काही फोटो आणि कलाकारांची नावे देतो इथे...
लेस्टरबाबा... केव्हिन स्पेसी...आणि कॅरोलिन बाई ..ऍनेट बेनिन्ग

रिकी ( वेस बेन्टली) जेन ( थोरा बिर्च ) आणि ऍन्जेला ( मेना सुवारी)

केव्हिन स्पेसीने या सिनेमात खरंच अप्रतिम काम केले आहे...मिडलाईफ क्रायसिसमधला वैतागलेला बाप, कंटाळलेला नवरा, ज्याचा त्याची मुलगी प्रचंड तिरस्कार करते, नंतर अँजेला भेटल्यानंतर त्याच्यात झालेले बदल ( तो म्हणतो, " जणू २० वर्षे मी कोमात होतो आणि आत्ताच जागा झालो"..)त्याने फारच छान दाखवलेले आहेत... आयुष्य तो नव्या उत्साहाने आणि आनंदाने जगायला लागतो...
केव्हिन स्पेसी ऒस्कर स्वीकारताना (अशा अर्थाचं काही ) म्हणाला होता, " ही व्यक्तीरेखा करताना मला खूप छान वाटलं कारण त्याचं वाईट वागणं,त्याचे सगळे दुर्गुण समजूनसुद्धा लेस्टर एकदम लव्हेबल वाटतो"...
... कॆरोलीनची व्यक्तिरेखा त्यापेक्षा अधिक अवघड होतं साकारणं... , खरं सांगायचं तर लेस्टर आणि कॆरोलीन एकाच वाटेवरचे प्रवासी आहेत पण गोष्ट लेस्टरची असल्याने लेखनात तिला सहानुभूती नाही , तरीही ऎनेट बेनिन्गने फ़ार छान केलं आहे काम...
यातले काही आवडते सीन...
१.लेस्टर बॉसला ब्लॅकमेल करून जास्ती बेनेफिट्स घेतो ते दृश्य
२. लेस्टर करोलिन दोघे प्रेमात आल्यानंतर लेस्टरच्या हातातली बीअर महागड्या सोफ्यावर सांडेल म्हणून कॅरोलीन लेस्टरला दूर ढकलते आणि त्याच्या मूडचा विचका होऊन तो थयथयाट करतो...
३. ( साक्षात्कारानंतर) घरात डिनरच्या वेळेला " आय रूल" असं हात उंचावून तो ( पूर्वी त्याला काडीची किंमत न देणार्‍या) दोघींना बजावून सांगतो ..

याच्या दिग्दर्शकाविषयी थोडेसे...
स्पीलबर्ग ने सॅम मेंडेस या लंडनमध्ये ब्रिटिश रंगभूमीवर दिग्दर्शन करणार्‍या ( नाटकवाल्या!! बहुतेक ब्लू रूम नावाचे निकोल किडमन अभिनीत नाटक त्याचे होते) दिग्दर्शकाकडे ही कामगिरी सोपवली त्यावेळी बर्‍याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या...
पण त्याचे या माणसाने चीज केले, आणि ऑस्कर मिळवले......
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2008 - 4:08 pm | भडकमकर मास्तर

या सिनेमाचा हा एक दुवा..
http://www.dreamworks.com/ab/

या सिनेमाची संपूर्ण पटकथा संवादासहित वाचा इथे...
http://www.script-o-rama.com/movie_scripts/a/american-beauty-screenplay-...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/