निष्पर्ण

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
14 Sep 2011 - 3:38 pm

"बाबा, आईला पण घेऊन जा ना आज; तिची खूप इच्छा आहे..."

"असं काय करतोस, गौतम? तुला माहिती आहे ना काय होतं ते?"

"मला माहिती आहे हो...पण...अपूर्वापण मला सांगत होती की आज बाबांना आईला सोबत घेऊन जायला सांग म्हणून...आई रडली तिच्याजवळ काल दुपारी."

"गौतम, मला वाटत नाही का तिला सोबत घेऊन जावं म्हणून? मागच्या वेळेस मी आणि ती गेलो होतो सुधाकरच्या घरी. मग घरी परत आल्यावर ती कितीतरी वेळ रडत बसली होती कुणी तिच्याशी बोलत नाही म्हणून..."

"मग तुम्ही तिला सहभागी करून घेत जा ना तुमच्या गप्पांमध्ये. म्हणजे आपोआप सगळे बोलतील, बरं वाटेल तिला...सुधाकरकाका, विमलकाकू, अजय, स्मिता...सगळ्यांना माहिती आहेच ना. तुम्ही सुरुवात केलीत तर सगळे बोलतील."

"मी प्रयत्न केले नसतील असं वाटतं का तुला? आणि फक्त बोलण्याचाच प्रश्न नाहीये रे...तुला ऑफीस असल्यामुळे तिच्यासोबत कुठे जाण्याचा फारसा प्रसंग येत नाही. मला चोवीस तास तिच्यासोबत रहावंच लागतं."

"......"

"मागच्या वेळेस सुधाकरच्या घरी गेलो. गाडी तू नेलेली होतीस. फारतर एक किलोमीटर अंतर. पायीच निघालो. किती वेळ लागला पोहोचायला माहिती आहे? तब्बल एक तास! एकदा तर सुधाकरच्या सोसायटीजवळ पोहोचल्यावर म्हणाली की परत घरी जाऊ म्हणून. मी खूप समजावून सांगीतलं; पण तिने ऐकलं नाही. देवळात जाऊ म्हणालो तर त्यालाही नाही म्हणाली. काय करणार? आलो पुन्हा घरी. मागच्या वेळेस कसेबसे सुधाकरकडे पोहोचलो पण तुझ्या आईला लिफ्टमध्ये पाऊलच टाकता येत नव्हतं. सुधाकरच्या फ्लॅटजवळ आलो आणि दारावरची बेल वाजवली. आईला उंबरठा ओलांडता येईना. दहा मिनिटं खटपट केल्यावर आत गेलो."

"मला माहितीये हो बाबा सगळं; पण काय करणार? पण म्हणून तिने बाहेरच जायचं नाही का?"

"असं नाही रे, गौतम. मी नेतो तिला, पण नंतर तिलाच खूप वाईट वाटतं. ठीक आहे, आज तू पण चल सोबत. कारने घेऊन जाऊ तिला."

"पण मला एक-दोन फोन कॉल्स आहेत क्लायंटचे साडेआठ वाजल्यापासून..."

"ठीक आहे, मग मी, आई, आणि अपूर्वा जातो. तू आम्हाला सोडून दे सुधाकरच्या सोसायटीपर्यंत. काय करणार रे घरात तरी बसून? इथं कुणाला ओळखत नाही, कुणाकडे गप्पा मारायला जाता येत नाही...कंटाळा येतो. आपल्या गावात वेळ कसा जातो कळत नाही. अपूर्वाला म्हणावं पोरांना पण घेऊन चल म्हणून. तू कसं काय सांभाळणार त्यांना?"

"ठीक आहे, चला मग लवकर..."

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"या या"

"आलो, आलो. काय चाललंय? सुधाकर, तुझ्या पोराचा फ्लॅट गौतमच्या फ्लॅटजवळ आहे हे किती बरं आहे! मी काय केलं असतं इथं हा एक प्रश्नच आहे बाबा."

"दादा, अरे आमची पण हीच गत होते इथे. छान वाटतं तुम्ही येता किंवा आम्ही येतो तुमच्या घरी. तेवढाच वेळ जातो. वहिनी, अपूर्वा, तेजस, आयुष सगळेच आलेत...गौतम नाही आला?"

"अरे त्याला कॉल्स होते बाबा कसलेतरी...त्याचा एक पाय घरात असतो आणि एक ऑफीसात..काही विचारू नकोस. बाकी काय अजून? अजय कुठे आहे?"

"काही नाही. निवांत. अजय ऑफीसामधून आला नाही अजून. रात्रीचा दिवस करतात आजकाल पोरं."

"खरंय. काल आम्ही सिंघम पाहिला टीव्हीवर. तेजस, आयुष झोपले होते म्हणून वेळ मिळाला. दणादण मारामारी होती. पण 'आता वाजले की बारा' सारखं एकही गाणं नव्हतं. म्हटलं निदान 'कजरा रे, कजरा रे...' सारखं तरी असेल तर ते ही नाही..."

"वहिनी, बघा दादाला काय आठवतंय. तरुणपणात चोरून पाहिलेले तमाशे आठवतायत बहुतेक...काय दादा?"

"कसलं काय रे सुधाकर. ठेका असतो तो मस्त. बाकी मजेचे होते ते दिवस...ए स्मिता, काहीच करू नकोस खायला."

"असं कसं काका, तुम्ही सगळेच खूप दिवसांनी आलात. घ्या..."

"स्मिता, तुला किती वेळा सांगीतलंय मी, रिटायर्ड माणसाला जास्त खायला-प्यायला देऊ नये...काय सुधाकर? जास्त टिकलो तर तुम्हालाच त्रास होईल."

"हाहाहा...खरंय दादा."

"घ्या काकू, गरमागरम पोहे!"

"थांब, थांब स्मिता. दे माझ्याकडे. अपूर्वा कुठाय?"

"वहिनी बेडरूममध्ये पोरांना झोपवताय...."

"शुभदा, खाता येईल का तुला? थांब..हे घे, चमचा घे तोंडात...थांब ओठांना लागलेलं पुसून घेतो. किती लाळ गाळतेस, शुभे? लहान झालीस अगदी. सुधाकर, मागे हिची आई आली होती भेटायला. मी म्हटलं की घेऊन जा हे पार्सल परत तर म्हणल्या कशा, आम्ही जसं दिलं होतं तसच परत करत असाल तर घेऊन जाते..हाहाहा..."

"काय हो भावजी, असं काय बोलता? चेष्टेला काही मर्यादा?"

"तिची चेष्टा करायची हिम्मत नाही माझी, विमल. तिला पेंशन मिळतं, मला नाही."

"हाहाहा...दादा, पेंशन कसं घेता मग तुम्ही वहिनींचं?"

"अरे, सिव्हील सर्जनचं सर्टिफिकेट घेतलयं आणि तहशीलदाराचा दाखला..."

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"अरे दादा, ये ये, एकटाच आलास? वहिनी नाही आल्या?"

"नाही रे सुधाकर. ती सकाळी बाथरूममध्ये पडली. थोडं लागलं. डॉक्टरांना दाखवलं, औषधं दिलीयेत. आता झोपलीये. मला संध्याकाळी घरी कंटाळा येतो. अपूर्वा आहेच घरी म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ थोडा वेळ..."

"अरे बाप रे, भावजी फार नाही ना लागलं?"

"नाही, तसं विशेष नाही. अजय, स्मिता कुठे आहेत?"

"अरे ते अजयच्या मित्राच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेलेत. दहा-अकरापर्यंत येतील. तू जेवूनच जा आता. आम्ही दोघंच आहोत जेवायला..."

"नाही, मला जेवायचा आग्रह नका करू. मला शुभदासोबत जेवावं लागतं. माझ्याशिवाय ती जेवत नाही आणि माझ्याशिवाय तिला कुणी जेऊ घातलेलं आवडतही नाही...अपूर्वाला आधीच पोरांना सांभाळून दमायला होतं, गौतम घरी नसतोच; शिवाय कुणाला आपल्यामुळे त्रास होतोय ही कल्पनाच तिला सहन होत नाही...हं...असं आहे...त्यामुळे जेवायचा आग्रह करू नका. विमल, मस्त चहा कर फक्त अर्धा कप, चहा आपल्याला केव्हाही चालतो. चाय नहीं तो, दुनिया नहीं..."

"दादा, कसं आहे रे आता वहिनींचं?"

"काय सांगू, सुधाकर? ती अक्षरशः लहान बाळ झालीये रे. जीव तुटतो माझा. एका शाळेची मुख्याध्यापिका म्हणून शाळेला कडक शिस्त लावणारी माझी शुभदा आता एक बाळ झालीये. आम्हाला सुरुवातीला कळलंच नाही रे. दोन वर्षांपूर्वी डॉक्टरांना दाखवलं तेव्हा फक्त थोडं बोलतांना अडखळत होती. आता तिला कपडे घालता येत नाहीत, आंघोळ करता येत नाही, खुर्चीत बसता येत नाही, कारमध्ये बसायला तिला दहा-दहा मिनिटे लागतात..."

"दादा, तुझी काय अवस्था झालीये...किती बारीक झालायस तू..."

"माझ्या बारीक होण्याचं काही वाटत नाही, सुधाकर. माझी एकच इच्छा आहे; शुभदा माझ्या आधी जावी."

"असं काय बोलताय भावजी? तुम्हाला देव उदंड आयुष्य देवो..."

"नको विमल, निदान शुभदेला तरी उदंड आयुष्य मिळू नये अशी मी प्रार्थना करेन. माझ्यामागे कोण करेल शुभदेचं? सुधाकर, मागच्या आठवड्यातली गोष्ट सांगतो. गौतम ऑफीसला गेलेला होता. अपूर्वा पोरांना झोपवून बाहेर काहीतरी आणायला गेली होती. आम्ही दोघं टीव्ही बघत बसलो होतो. मी शुभदेला सांगून आंघोळीला गेलो. शुभदेला त्यानंतरच शौचास जावे लागले. मी आंघोळ करून बाहेर आलो. शुभदा हॉलमध्ये नव्हती. हॉलमध्ये येताच मला घाण वास आला. शुभदेने हॉलमध्येच दोन-तीन ठिकाणी..."

"अरे बाप रे...रडू नकोस, दादा! काय करणार?"

"मी पळतच बाथरूमकडे गेलो तर शुभदा कमोडजवळ बसली होती आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. मी तिला स्वच्छ केलं आणि बाहेर आणलं. हॉल स्वच्छ केला. खूप वाईट वाटलं रे...कुठल्या पापाची शिक्षा देव देतोय कळत नाही."

"कठीण आहे रे..."

"कोण करणार हे सगळं माझ्यामागे? गौतम करेल? अपूर्वा करेल? ते खूप करतात. अपूर्वा अगदी मनापासून करते तिचं. शुभदा मी नसेल तर फक्त अपूर्वाकडूनच सगळं करून घेते. गौतमकडून करून घ्यायला लाज वाटते तिला. पण हे असं कधीपर्यंत चालणार?"

"......"

"अल्झायमर्सवर उपाय नाही रे. डॉक्टर म्हणतात आता हळू-हळू तिच्या सगळ्या संवेदना विझत जातील. माझी शुभदा विझतेय रे...ती आमच्यात असूनदेखील अनोळखी वाटते. तिचे डोळे विझत चाललेत. माझ्याकडे शून्य नजरेने बघते. मला आठवते आमची काश्मिरची सहल. काय धमाल केली होती आम्ही. आता गावी जातो तरी पाहुण्यासारखी बसून असते. घराची एक-एक भिंत, छोट्या-छोट्या वस्तू मला पूर्वीच्या शुभदेची आठवण देतात...ती मात्र शांत बसून असते. अगदी निश्चल! तिची स्मृती अजून तरी व्यवस्थित आहे असं वाटतं. पण तिच्या चेहर्‍यावरून जाणवतच नाही की तिला काही आठवतयं. असं वाटतं जणू मागची सगळी वर्षे तिच्या मेंदूमधून झपकन पुसली गेली आहेत. लहान पोर जसं पाटीवर लिहिलेल्या पाढ्यांवरून सर्रकन बोळा फिरवून ते पाढे मिटवून टाकतं, तसं देवाने तिच्या मेंदूमधले काही पाढे पुसून टाकले आहेत...."

"आयुर्वेदिक काही उपाय नाही का?"

"सगळं करून पाहिलं. आता काहीच उपयोग नाही. तिला कळतं सगळं, आठवतं सगळं पण ते सगळं व्यक्त करण्याची तिची क्षमता आता हळू-हळू नष्ट होतेय. अगदी वर्षापूर्वीपर्यंत ती शब्दकोडं सोडवायची हळू-हळू. डॉक्टरांनी सांगीतलं होतं तिला. शब्दकोडी सोडवा, वाचन करा, पोथ्या वाचा, जप करा, गणितं सोडवा...मी शब्दकोड्यांच्या मासिकांचा ढीग घेऊन आलो होतो, पाचवी-सातवीच्या गणिताची पुस्तके घेऊन आलो होतो, पोथ्या घेऊन आलो होतो...हळू-हळू ते ही बंद होत गेलं. आता तर तिला बोलताच येत नाही. बोलायचं खूप असतं, मनातून ऊर्मी दाटून येते, खूप बोलावं...पण शब्दच फुटत नाहीत. मग समोरची व्यक्ती तिच्याशी फारसं बोलू शकत नाही. मग तिला खूप वाईट वाटतं..."

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"आलात, बाबा? बसा.."

"हो आलो...बरं वाटतं सुधाकरकडे जाऊन आल्यावर...गौतम आला नाही अजून?"

"नाही तासाभरात येतो म्हणला..."

"हम्म...शुभदा कुठे आहे?"

"त्या पोरांजवळ आहेत. खेळवतायत तेजसला आणि आयुषला. तुम्ही या माझ्यासोबत. खूप छान रमल्यायत."

"अरे वा, छानच सूत जुळलयं की यांचं. शुभदाचा चेहरा ही फ्रेश दिसतोय. शुभे, काय करतेस?"

"ते........खे.....मश्ती........"

"हो, हो, खेळतेय त्यांच्यासोबत? शुभे, त्यांच्यातलीच एक झालीस गं बाई, तशीच निर्व्याज, निर्मळ, निष्पाप....पण अशी निष्पर्ण का गं झालीस?"

--समीर

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

प्रास's picture

14 Sep 2011 - 4:22 pm | प्रास

कथा छान मांडली आहे.

अल्झायमर्स पीडित लोकांपेक्षाही त्यांच्या आजूबाजूच्यांचं समुपदेशन करणं जास्त महत्त्वाचं असतं ते प्रकर्षाने नमूद झालं आहे. आपली प्रिय व्यक्ती इतक्या वर्षांच्या सहवासानंतर आपल्याला ओळखेनाशी होते, येवढंच नाही तर साध्या साध्या प्रतिक्रिया देणंही विसरते आणि आपण काहीच करू शकत नाही हे वास्तव जाणता येतं पण मानता येणं कठीण होतं हेच खरं!

कथा आवडली.

समीरसूर's picture

15 Sep 2011 - 12:13 pm | समीरसूर

आणि आपण काहीच करू शकत नाही ही भावना खूप भयंकर असते.

--समीर

जाई.'s picture

14 Sep 2011 - 5:12 pm | जाई.

कथा आवड्ली. वाचताना सतत आजी आठवत होती.

नगरीनिरंजन's picture

14 Sep 2011 - 6:55 pm | नगरीनिरंजन

कथा आवडली. जरी तुम्ही सगळे जवळचे प्रेमळपणे सगळं करतात असं चित्रण केलंय तरी इतकं वाईट वाटलं. ज्यांच्या जवळचे लोक असे नसतात त्यांचे काय हाल होत असतील या विचाराने काटा आला अंगावर. इतकं जगूच नये माणसानं असं वाटतं कधी कधी.

समीरसूर's picture

15 Sep 2011 - 12:16 pm | समीरसूर

थोडं फार जीव लावून करणारे मी पाहिलेत...पण ज्यांचं कुणी प्रेमानं करत नाही त्यांचे हाल असह्य असतात. वाईट वाटतं. शेवटी 'भोग' म्हणून बाजूला सरकायचं आणि उसासा टाकून कामाला लागायचं...

जगरीत अशी निराळी...

लेख वाचुन 'सुखांत'ची आठवण झाली.

रेवती's picture

14 Sep 2011 - 7:50 pm | रेवती

हम्म...
कथा आवडली.
आयुष्याच्या उत्तरार्धात (खरेतर कधीही) आपले काय होणार आहे? असा प्रश्न मनात येवून गेला.
या केसमध्ये नवरा, सून इतर नातेवाईक बरीच मदत करताना दिसले म्हणून बरे वाटले.

कथा आवडली. आमच्या शेजारच्या आजींना पण हीच व्याधी जडली. दोन महिन्यांपूर्वी नर्सिंग होम मधे हलवावे लागले. ६-७ वर्षे आजोबांनी सेवा केली. पण आता ते ही ८५ पार केलेले, थकलेले. आता रोज संध्याकाळी भेटायला जातात.

मन१'s picture

14 Sep 2011 - 10:13 pm | मन१

दु:खद.....

आत्ता या क्षणाला ज्याचा जीव घ्यावा वाटतोय त्याला पण अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागु नये येवढीच सदिच्छा.

स्पंदना's picture

15 Sep 2011 - 4:46 am | स्पंदना

खरच अश्या वेळी मरण परवडल म्हणाव वाटत. आपल्याला त्रास होतो म्हणुन नाही पण जन्मभर ज्या रुबाबात ते माणुस होत, ती प्राईड हरवलेल व्यक्तिमत्व पहाण फार क्लेषदायक.

लिखाण सुरेख, विषय मनाला चटका लावुन गेला भाउ !

चतुरंग's picture

15 Sep 2011 - 6:23 am | चतुरंग

अशा रोग्यांची अवस्था बघितली की अल्झायमर हा जीवघेणा आजार आहे असेही म्हणता येत नाही हे दुर्दैव!

या रोगाची सुरुवात बरीच आधीच्या वयात होते असे हल्ली संशोधनात लक्षात येऊ लागले आहे.
http://www.alz.org/alzheimers_disease_know_the_10_signs.asp
वरच्या दुव्यावरती या रोगाच्या लक्षणांबद्दल माहिती आहे.

---------------------------------

एक तांत्रिक शंका - कथेच्या शेवटी शुभदा ही लहान मूल झाल्यासारखी दाखवली आहे. प्रत्यक्षात अल्झायमरचा रुग्ण असा होऊ शकेल का? संपूर्ण विस्मृती होत नंतर चेहर्‍यावरचे भावही न बदलता येणे इथपर्यंत अवस्था जाते असे ऐकून आहे. त्यामुळे लहान मुलासारखे खेळकर होणे अशक्य वाटते. वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी खुलासा केल्यास माहिती मिळेल.

समीरसूर's picture

15 Sep 2011 - 12:23 pm | समीरसूर

चतुरंग,

मी पाहिलेली व्यक्ती अगदी लहान मुलासारखी झालेली आहे. बोलता येत नसल्याने अगदी लहान मुलाप्रमाणे 'त..ता..ते..' असं बोलणं होतं, अल्झायमर्सची कुठली अवस्था आहे यावर चेहर्‍यावरचे हाव-भाव ठरतात. सगळं नीट लख्ख आठवत असेल तर ते चेहर्‍यावर दिसतं पण व्यक्त करता येत नसल्याने 'त त' असे फक्त आवाज काढता येतात, म्हणजे मी असं पाहिलेलं आहे...बाकी सगळ्याच हालचालींवर मर्यादा आल्याने त्या हालचाली लहान मुलासारख्या वाटतात...मी त्या अर्थाने खेळकर म्हटलं, म्हणजे आपण जसं नॉर्मली लहान मुलांना खेळवतांना त्यांच्यासारखं लहान होण्याचा प्रयत्न करून खेळतो, तोच सीनारिओ अशा व्यक्तींच्या बाबतीत जर इमॅजिन केला तर ते सगळं तसंच वाटत असावं....अर्थात, मी वैद्यकक्षेत्रातला जाणकार नाही...जाणकारांनी प्रकाश टाकावा...

--समीर

चतुरंगजी, लिंक बद्दल अतिशय धन्यवाद. ती १० लक्षणं वाचुन असं वाटतंय की यातली काही लक्षणं ही आताच अनुभवायला येत आहेत, विशेषतः मेमरीसाठी नोट्स किंवा इतर साधनांवर अवलंबुन राहणे.

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2011 - 2:31 pm | प्रभाकर पेठकर

कथा फारच अंगावर येणारी आहे.

अल्झमायर्सचा एक रूग्ण मी माझ्या नात्यातही पाहिला आहे. ते पन्नाशीत असताना सरकारात त्यांचा असणारा रुबाब, त्यांचा संतापी स्वभाव आणि धिप्पाड देहयष्टी जबरदस्त दरारा निर्माण करून होती. मी तर लहान होतो. पण मोठी माणसेही वचकून असायची. पण म्हातारपणी अल्झमायर्सने त्यांना गाठलं आणि त्यांची अवस्था आपल्या कथेत वर्णिलेल्या शुभदेसारखी झाली. ते दृष्य इतकं विदारक होतं की त्यांच्या ऐन वयातील दरार्‍याला घाबरणारेही असे म्हणायला लागले,'अण्णा, जसे होते तसेच चांगले होते ही अवस्था पाहवत नाही.'

कथेचे शीर्षक 'निष्पर्ण' अतिशय समर्पक आहे.

स्पा's picture

15 Sep 2011 - 2:38 pm | स्पा

क्या बात हे समीर

अगदी जीवघेण लिहिता तुम्ही.

प्राजक्ता पवार's picture

15 Sep 2011 - 4:50 pm | प्राजक्ता पवार

लिखाण आवडले ...