द लँग्वेज ऑफ लाईफ : अ फेस्टिव्हल ऑफ पोएटस - पुस्तक ओळख

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
13 Aug 2011 - 9:18 am

मध्यंतरी भेटायला गेले होते मुलीला आणि नवर्‍याला आणि प्रेमात पडून आले एका पुस्तकाच्या. नवीन काहीच नाही म्हणा. कवितेचे आणि कवींचे इतके अजोड, अप्रतिम पुस्तक वाचनात आले तर दुसरे काय होणार? एक तर मुलीकरता म्हणून ग्रंथालयात गेले. ती तिच्या विभागात आ॓णि मी माझ्या विभागात असे आम्ही रमलो. नंतर मी हे पुस्तक घरी घेऊन आले पण वाचता वाचता माझी खरच तहान-भूक हरपली. मला ते खाली ठेववेना. आता काही काळाने तर मी ते विकतच घेतले आहे.

असे काय आहे या पुस्तकात? तर बिल मोयर्स या प्रथितयश मुलाखतकर्त्याने घेतलेल्या अनेक कवी-कवयित्रींच्या खूप वेगळ्याच वाटेवरील मुलाखती या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एकूण ३४ कवी-कवयित्री या पुस्तकात घेतले आहेत. अजून काही - जसे मिरना बॅड्ज्रो (myrna badgerow), इथन वॉकर (ethan walker), रिचर्ड्सन (E. W. Richardson) कवी -कवयित्री चालले असते असे वाटते पण जे काही नवीन कवी-कवयित्री वाचायला मिळाले त्याचाही मला आनंद आहे.

य पुस्तकाची धाटणी ही पुढीलप्रमाणे आहे - प्रत्येक नवा चॅप्टर हा कवी-कवयित्रीच्या ओळखीने सुरू होतो आणि मग लगेच पुढे प्रश्न-उत्तर या स्वरूपातील मुलाखती येतात. बिल मोयर्स हे स्वतः अतिशय उत्तम मुलाखतकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेतच त्यामुळे त्यांनी अतिशय विश्लेष्णात्मक, मार्मीक, योग्य प्रश्न विचारून बरोबर उत्तरे काढून घेतली आहेत यात वादच नाही. या प्रश्नोत्तरांमधून त्या त्या कवी/कवयित्रीच्या कविता , ती कविता लिहीण्यामागची भूमिका, मनस्थिती, कॉन्शस/सबकॉन्शस निर्णय आदि आणि कवितानिर्मीतीची प्रक्रिया स्पष्ट होत जाते.

काही उदाहरणे द्यायची झाली तर - जॉय आरजो (joy harjo) या कवयित्रीशी केलेल्या चर्चेमध्ये बिल मोयर्स तिला विचारतात - "तू लहानाची मोठी होताना एका वेगळ्याच भाषेने तुझ्यावर मोहीनी घातली होती. त्या भाषेबद्दल थोडं सांगशील काय?" आणि कवयित्री सांगते - "ही ती अर्वाचीन भाषा आहे - ती विशाल सबकॉन्शस नदी जिच्या तीरावर पूर्वापार नायक-नायिका आणि अनेक संस्कृती नांदल्या. सामान्य उथळ जीवनात ती आढळत नाही." अशा रीतीने वाचकाला गुंगवून ठेवून भुलवत भुलवत ती तिच्या अद्भुत कल्पनासृष्टीत आपल्याला कधी घेऊन जाते ते कळत सुद्धा नाही.आणि मग या कवयित्रीच्या काही कविता आपल्यापुढे खुल्या होतात. त्यांचे विश्लेषण ती करते तर कधी काही अवघड कवितांचे विश्लेषण "अनकॉन्शस मटीरीअल" या नावाखाली टाळते. पण प्रत्येक कविता अतिशय सुंदर आहे.

ल्युसिल क्लिफ्ट्न (lucille clifton) ह्या आफ्रीकन अमेरीकन कवयित्रीचे दोनदा पुलित्झर पारितोषिकाकरता नामांकन झाले आहे. या पुस्तकात तिची अतिशय दाहक विषयावरची कविता - shapeshifter's poem आपल्याला वाचायला मिळते. वडीलांनी वारंवार स्वतःच्या मुलीचे केलेले लैंगिक शोषण या विषयावरची ही कविता आपल्याला उन्मळवून टाकते. कवयित्रीचे अनुभव, या कवितेतील नायिका आदि चर्चा त्या अनुषंगाने पुढे येतात.

गॅरी स्नायडर (gary snyde)हे कवी त्यांची एक अप्रतिम कविता स्पष्ट करून दाखविताना सांगतात - माझ्याकडे धावत, अडखळत, कोसळत येणार्‍या सुंदरशा काव्यमय अनुभूतीस मी तर्काच्या भगभगीत प्रकाशात जाऊन भेटूच शकत नाही कारण ती बुजरी आहे, ती अशी प्रकाशात माझ्याकडे येणार नाही. - ही कविता आणि कवीचे २ शब्द मूळ इंग्रजीतून वाचण्यातच मजा आहे.-

I go to meet that blundering, clumsy,beautiful, shy world of poetic, archetypal,wild intuition that's not going to come outinto the broad daylight of rational mind but wants to peek in.

रक्तात कविता भीनलेल्या, या कवींच्या मुलाखती वाचून शेवटी त्यातील एका कवीप्रमाणेच म्हणावेसे वाटते - तुम्ही कला निवडत नाही तर कला तुम्हाला निवडते.
ज्यांना इंग्रजी कविता आवडतात, त्यांच्यासाठी १००% संग्राह्य असे हे पुस्तक आहे. मात्र सर्वच कवींची शैली, आवाका भिन्न आहे. तेव्हा सर्वच आपल्याला रुचतील असेही नाही. जसे - रॉबर्ट हास (robert haas ) म्हणून एक कवी आहेत ज्यांचा स्वत:चा आवडता हायकू आहे -

Even in Kyoto,
hearing cuckoo's cry,
I long for Kyoto

त्यांचे यावरील विवेचन असे की एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवत असताना, तीच गोष्ट अनुभवण्याची इच्छा होणे ही विसंगती हा हायकू दाखवतो.
मला तरी ते तितकसं पटलं नाही.
सांगण्याचा मुद्दा हा की १००% पुस्तक आवडणे जवळजवळ अशक्यच असेल पण तरीही काही मोजक्या कवींकरता हे पुस्तक घेणे तरीही आनंददायक ठरेल.
..

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

डॉ.श्रीराम दिवटे's picture

13 Aug 2011 - 2:51 pm | डॉ.श्रीराम दिवटे

पुस्तकाची उत्तम माहिती पुरवलीत. लेखात उल्लेखिलेल्या कविता विचार करायला लावणाऱ्‍या आहेत.