"वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता"

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
24 May 2008 - 6:15 am

अलिकडे काही नवीन कवींच्या आंतरजालावर वाचत होतो. एका कवितेपाशी आलो नि वाटले , काहीही झाले तरी या माणसाच्या कविता वाचल्याच पाहिजेत. कवीचे नाव : वर्जेश सोलंकी. सुदैवाने यांचा काव्यसंग्रह हाताशी लागला. कवितासंग्रहाच्या बाबतीत असे क्वचितच घडते की पहिली कविता वाचायला सुरवात करावी नि शेवटची कधी आली ते कळूच नये. प्रस्तुत संग्रहच निव्वळ ६०-६५ पानांचा आहे म्हणून असेल; पण एका बैठकीत वाचून झाला सुद्धा.

१९९० च्या दशकात भारताची व्यवस्था कूस पालटत होती. येणार्‍या नव्या युगाबरोबर नवे प्रश्नही आलेच. शासनाच्या, अर्थव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या बदलांची स्पंदने नव्वदीच्या दशकातल्या तरुण कवींच्या रचनांमधे ऐकू यायला लागली. वर्जेश सोलंकी याच पीढीचे कवी. एखाद दोन कवितांचा आस्वाद आपण घेण्याचा प्रयत्न करूया.

शीर्षक : व्हॅक्युमक्लीनर

पसरलो हॉलभर
सुगंधित स्प्रेच्या वासाबरोबर
म्हणून लक्षात नाही आली कुणाला
मोज्यातली दुर्गंधी.

मित्रानं दाखवली
एकेक खोली
कीचन
कोठेच खिडकी नसलेली
आली ऐकू
एक्झॉस्ट् फॅनची संथ घरघर
कण्हल्यासारखी
ताटंबिटं | ग्लासंबिसं | बशाकप | डबेबिबे
नावं लेबलासहित
व्यवस्थितपणे मांडून फडताळावर.

हॉलमधल्या भिंतीच्या रंगाला
मॅचिंग असलेलं सागवानी फर्निचर
बोन्सायची झाडं | शोभेच्या वस्तू
गणपतीची कलात्मक फ्रेम
एकंदर सगळं छानच.

आपण त्यात मिसमॅच की काय ?
या विचारानं मी एसीकंटेन्ड रूममधे
घामाघूम.

मित्र म्हणाला:
खिडकीतून पाऊस छानच दिसतो
आणि चंद्र
नुकताच पेंट दिलेल्या बंगल्यासारखा. उजळ.

मी जेवलो
सवय नसताना
काटेचमच्यातून
ताटाभोवती खरकटं पडू न देण्याची खबरदारी घेत.

इतपत सर्व ठीक होतं.
मात्र मित्राच्या बायकोनं कपाटातून व्हॅक्युमक्लीनर काढला
तेव्हा
लटपटलोच
निघालो घाई-घाई करत फ्लॅटबाहेर
वाटलं आता ओढला जाईन की काय ?
फोलपटासारखा
फरशीवरल्या धुळीबरोबर.

----------------------------------------------------------

कविता वाचली आणि त्यातील विनोदाने हसायला आलेच ; पण त्यात टिपलेली विसंगती , आपल्या आयुष्यातील साध्यासुध्या गोष्टींमधे माणसांपेक्षा वस्तूंना आलेले महत्त्व या गोष्टी नजरेआड कशा होतील. मुख्य म्हणजे अगदी नेहमीच्या आयुष्यातल्या संवादांसारखी कविता. ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस.

दुसरी कविता तुमच्यापुढे मांडतो.

शीर्षक : आपण कविता लिहाव्यात का ?

आपण कविता लिहाव्यात का ?
की न लिहाव्या
की लिहाव्याच
आपल्या लिहीण्या न लिहीण्यानं कोठे
फारसा फरक पडणारेय ?
उदा: पेरली जातील काय क्रांतीची बीजं
फ्रस्ट्रेटेड युवा पीढीच्या मनात
क्रीएट होईल काय एखादा पॉझीटीव्ह अप्रोच वगैरे
की आपलं लिहीणं म्हणजे
बापाच्या शब्दात
एकंदर भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं
की
कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या
की
उगाच आतलाबितला आवाज/हुक्की / उत्कटता
की
शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसारा
की
फलाणा-ढिकाणा.

------------------------------------------------------------------------

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 6:57 am | विसोबा खेचर

वाटलं आता ओढला जाईन की काय ?
फोलपटासारखा
फरशीवरल्या धुळीबरोबर.

ओहोहो! खल्लास...!

पण त्यात टिपलेली विसंगती , आपल्या आयुष्यातील साध्यासुध्या गोष्टींमधे माणसांपेक्षा वस्तूंना आलेले महत्त्व या गोष्टी नजरेआड कशा होतील.

सहमत..!

मुख्य म्हणजे अगदी नेहमीच्या आयुष्यातल्या संवादांसारखी कविता. ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस.

अगदी खरं!

की आपलं लिहीणं म्हणजे
बापाच्या शब्दात
एकंदर भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं
की
कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या
की
उगाच आतलाबितला आवाज/हुक्की / उत्कटता
की
शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसारा
की
फलाणा-ढिकाणा.

हा हा हा! सह्हीच करून टाकली आहे! अगदी जोड्यानेच मारलं आहे म्हणा ना! :)

'भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं' आणि 'कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या' हे तर खासच! :)

आमचा वर्जेश सोलंकी साहेबांना सलाम!

अवांतर - १

'भिकारचोट' ह्या आमच्या अत्यंत लाडक्या शिवीचा कवीने फार सुरेख वापर केला आहे! :)

अवांतर - २

खरं तर मिपावर मिपाबाह्य व्यक्तिंच्या साहित्याला बंदी आहे. मिपाबाह्य व्यक्तिंचे साहित्य मिपावर जर द्यायचेच असेल तर त्यात स्वत:चीही काही चांगल्या दर्जाची आस्वादात्मक भर हवी, अशी मिपाची अट आहे. सोलंकी साहेबांच्या कविता येथे देऊन मुक्तरावांनी स्वत:ही त्यावर काही उत्तम आस्वादपर भाष्य करून ही अट पाळली आहे याचे विशेष कौतुक वाटते!

अवांतर - ३

'भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं' हे शब्द आठवून अजूनही हसतो आहे! =))

आपला,
(शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसारा मांडणारा एक भिकारचोट नवकवी!) तात्या. :)

दरवाजा सताड उघडून बाहेर जावं आणि तुफान येणारे थेंब तोंडावर घेऊन एकदम फ्रेश व्हावं तसं वाटलं!
नेहेमीच्याच आयुष्यातल्या कल्पना पण वेगळ्या जाणिवेनं मांडल्या त्यामुळेच असावं.
ही ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद मुक्तसुनीत!

चतुरंग

सन्जोप राव's picture

24 May 2008 - 10:27 am | सन्जोप राव

'अंतर्नाद' च्या एप्रिल २००८ च्या अंकात वर्जेश सोलंकींच्या काही सुंदर कविता आहेत. त्यातली एकच इथे देतो:

आपल्या खिशातल्या पाकिटात

आपल्या खिशातल्या पाकिटात काय असतं
उदाहरणार्थः
संपत आलेला रेल्वेपास
कामाची व बिनकामाची व्हिजिटिंग कार्डस, रेव्हेन्यू स्टँपस, रबर बँडस
बँकेचा हप्ता भरल्याची रसीद
साईबाबाचं कवरेज असलेलं चालू वर्षाचं छोटेखानी कॅलेंडर
कालौघात गेलेलें पाच पैशाचं नाणं
बसतिकिट आणि त्यामागं घाईघाईनं लिहून घेतलेला मित्राचा
फोन कॉल व इ मेल ऍड्रेस
आईनं श्रद्धेनं ठेवायला लावलेली भस्माची पूड
लोकलच्या गर्दीतही सुचलेल्या कवितांचे काही चिटकोर
कॉलेजच्या जमान्यातला गालफडं आत गेलेला स्वतःचा
पासपोर्ट साईजचा पिवळा पडलेला स्वतःचा फोटो
अन पाकिटाच्या एका कोपर्‍यात निपचिप पडून असतं
नियतीशी उन्नीसबीस करीत घालवलेलं सडकछाप आयुष्य
नव्याकोर्‍या शर्टवर पडलेल्या डाळीच्या डागासारखं

या कवितेतल्या काही प्रतिमा - नियतीशी उन्नीसबीस, शर्टावरचा डाळीचा डाग - मला फार मजेशीर वाटल्या. याच अंकात या कवीच्या काही जाहीरातींच्या कविता आहेत. त्यात फक्त वेगवेगळ्या जाहिराती एकमेकासमोर मांडल्या आहेत. पण ती मांडणी फार आकर्षक आहे. अरुण कोलटकरांच्या कवितांची आठवण करुन देणारी.

सन्जोप राव

दंभकुठार's picture

24 May 2008 - 11:29 am | दंभकुठार

माझ्या मते , हे सर्व कवी आपल्या मुळांपासून भरकटलेले असून ,केवळ गटबाजीच्या जोरावर या टोळक्यातल्या कवींची दुकाने सुरू आहेत्. स्वतःच्याच मासिकांतून स्वतःच्याच मुलाखती छापणे,विविध फाऊंडेशनांची बक्षीसे मिळवणे ई .प्रकारांमध्ये तरबेज असणार्‍या शब्दजुळारर्‍यांचा हा एक गट आहे...साठोत्तरी पिढीतील साहित्यिक राजकारणात तरबेज असलेल्या काही कवींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व ढोंग सुरू आहे...

मुक्तसुनीत's picture

24 May 2008 - 11:56 am | मुक्तसुनीत

दंभकुठार यानी मूळा कवितेबद्दल कसलेही भाष्य न करता काही मते वर मांडली आहेत. कविबेद्दल बरे वाईट बोलणे न बोलणे हा शेवटी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न ठरतो (मूळ विषयाबद्दल काहीही न बोलणे हे जरी विपर्यस्त असले तरी.) बाकी त्यांच्या मतांचा निश्चितपणे उहापोह करता येईल.

एखाद्या गोष्टीवर इतक्या तीव्रतेने टीका करायची तर मग त्याबाजूने मुद्दे मांडणे आवश्यक ठरते. नाहीतर मग ते अरण्यरुदन ठरते. त्यांच्या टीकेमधे मला खालील मुद्दे दिसतात :

१. वर्जेश सोलंकी हे एक व्यक्तिगत काम करत नसून , कवींच्या एका "गटाचा" भाग म्हणून काम करतात.
- हा "गट" कुठला, काय याबद्दल दंकु यानी लिहिल्यास उत्तम.

२. हे सर्व कवी आपल्या मुळांपासून भरकटलेले आहेत.
- म्हणजे नक्की काय ? कशापासून भरकटले आहेत ?

३.केवळ गटबाजीच्या जोरावर या टोळक्यातल्या कवींची दुकाने सुरू आहेत्.
- कृपया आणखी प्रकाश टाकावा.

४. स्वतःच्याच मासिकांतून स्वतःच्याच मुलाखती छापणे,विविध फाऊंडेशनांची बक्षीसे मिळवणे ई .प्रकारांमध्ये तरबेज असणार्‍या शब्दजुळारर्‍यांचा हा एक गट आहे...
- विविध फाउंडेशनची बक्षिसे ही दाऊद इब्राहिम सारखी खंडणी वसूल केल्यासारखी त्यानी केली नसावीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. अधिक-उणे दंकु याना ठावे. प्रत्येक कवी शब्द जुळवतोच नि प्रत्येक संगीतकार स्वर-मेळ करतो (स्वर जुळवतो) . याहून अधिक-उणे दंकु याना ठावे.

५. साठोत्तरी पिढीतील साहित्यिक राजकारणात तरबेज असलेल्या काही कवींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व ढोंग सुरू आहे...
-बापरे. केव्हढे तरी गुंतागुंतीचे विधान.

माझी अशी प्रार्थना आहे की दंकुसाहेबानी आम्हाला समजेल अशा भाषेत , काहीशा सोप्या पायर्‍यांमधे मुद्दे मांडावेत. त्यांचा यथायोग्य परामर्श घेणाचा प्रयत्न केला जाऊ शकेल. घाऊक भावाने केलेली सरसकट विधाने शेवटी "बाराच्या भावात" जाण्याची शक्यता असते म्हणून हा प्रतिसादाचा प्रपंच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2008 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला तर दोनही कविता आवडल्या.
वर्जेश सोलंकी यांच्या कवितांचा परिचय करुन दिल्याबद्द्ल आपले आभार !!!
रावसाहेबांनी दिलेली कविताही छान आहे.

( नवकविता लिहिणा-या ब-याच कवींच्या कविता याच अंगाने जात आहेत असे वाटते.
उदा. दासु वैद्य यांचे तुर्तास )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यातल्या कोणत्याच कविता ; कविता या व्याख्येत बसत नाहीत.
उगाच र ला ट जुळवला नाही हे एकमेव चांगले लक्षण आहे.
आता ही अशीच आणखी एक कविता पहा............
एकदा मी माझाच स्वतःला आरशात पहात होतो
मनावर चढलेल्या धूळीच्या पुटाआडुन
फुटक्या चेहेर्‍याने स्वतःवरची नव्हाळी न्याहळत.....
एक कवडसा माझ्यावर पडला
दुपारच्या पिवळ्या उन्हाचा
प्रकाशात भयाण भासला
स्वतःचाच चेहेरा..
फिक्कट रोगट उदास ऍनिमिक विचारांचा
स्वतःचंच अस्तित्व लपवणारा.
खरकट्याच्या ढिगार्‍यात केसराचे धागे शोधणारा.....
....................................................
हे असले लिहिणारे कवी क दर्जाची वीण प्रसवत असतात
आणि तसल्याच समिक्षकांची डोकी बिघडवत असतात
रोगट मनस्थिती आणि नैराश्य हा असल्या कवितांचा स्थायीभाव असतो.
कोणत्याही क्षणात स्वतः आनन्द मानायचा नाही...इतर कोणी आयुष्याचा आनन्द घेत असतील तर त्याना तो घेउ द्यायचा नाही. ही असल्या कविंची काही व्यवच्छेदक लक्षणे....
असल्या कविता वाचुन सुकलेली बकुळफुले.....

सन्जोप राव's picture

24 May 2008 - 4:04 pm | सन्जोप राव

कवितेची व्याख्या काय? 'उत्कट भावनांचा लयबद्ध उद्गार' - आता हेच असेही लिहिता येईल ' एखादे दृष्य पाहून कवीला मळमळू लागते, आणि तो जे ओकतो, त्याला कविता म्हणतात. आता प्रत्येक कवीचा उद्गार वेगळा - किंवा प्रत्येकाची... जाऊ दे. आता यातल्या कुठल्या कविता अ दर्जाच्या, कुठल्या ब च्या हे कोण ठरवणार? अर्थात आपल्याला जे कळत नाही त्याला रोगट मनस्थिती, नैराश्य अशी लेबले लावणे हे अगदी सोपे. आणि कवी कविता लिहून इतरांना आनंद घेण्यापासून वंचित करतात या शोधाबद्दल तर अभिनंदनच. खरकट्याच्या ढिगातले धागे आणि वर्जेश सोलंकीच्या कविता यातला फरक कळत नसेल तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका दिवाळी अंकातील 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी ' ही नवकविता किंवा 'परवाच पाहिला गांधी रस्त्यावर हेमामालिनीच्या नावाने मुठ्ठी मारताना' ही अतिजहाल क्रांतिकारी कविता वाचून पहावी. सुकलेल्या मनस्थितीत फरक पडेल.
सन्जोप राव

भडकमकर मास्तर's picture

24 May 2008 - 4:36 pm | भडकमकर मास्तर

इतर कोणी आयुष्याचा आनन्द घेत असतील तर त्याना तो घेउ द्यायचा नाही
हे कसे काय बुवा?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 5:24 pm | विसोबा खेचर

खरकट्याच्या ढिगातले धागे आणि वर्जेश सोलंकीच्या कविता यातला फरक कळत नसेल तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका दिवाळी अंकातील 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी ' ही नवकविता किंवा 'परवाच पाहिला गांधी रस्त्यावर हेमामालिनीच्या नावाने मुठ्ठी मारताना' ही अतिजहाल क्रांतिकारी कविता वाचून पहावी.

हा हा हा!

आपला,
तात्या गांधी.

मुक्तसुनीत's picture

25 May 2008 - 10:15 am | मुक्तसुनीत

यातल्या कोणत्याच कविता ; कविता या व्याख्येत बसत नाहीत.

इंग्रजीमधे एक वचन आहे : "अ पोएम इज अ पोएम इज अ पोएम." यामागचा अर्थ असा की, कवितेची कुठली एक अशी व्याख्या अस्तित्वात नाही. "वाक्यं रसात्मकम् काव्यम्" अशी एक व्याख्या प्राचीन काळात होती. रससिद्धांताचे नेमनियम पाळणारे तेच एक काव्य. या आणि अशा नेमनियमांना कवितेने कितीतरी वेळा उल्लंघिलेले आहे. परंपरा छेदल्या जातात, नवीन संकेत बनत रहातात आणि तेही मागे पडतात. काव्य केवळ छंदात नाही , ते निव्वळ मीटर मधे नाही , ते केवळ रससिद्धांतामधे नाही , निव्वळ मुक्तछंदात नाही, आक्रस्तळेपणामधे तर नाहीच ; पण साचेबंद कल्पना आणि रचनांमधेही ते बद्ध नाही.

थोडे आपले क्षितीज रुंदावू द्या , थोडे नवीन युगजाणीवांची स्पंदने ओळखा, थोडे पूर्वग्रहांना बाजूला सारा. कदाचित नवीन कविता तुम्हाला दिसेल.

विजुभाऊ's picture

26 May 2008 - 11:42 am | विजुभाऊ

रससिद्धांताचे नेमनियम पाळणारे तेच एक काव्य.
काव्य जेवढे आत्मकेंद्रीत होते तेवढेच ते दुर्बोध होत जाते. आपल्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर त्या ज्यांच्यापुढे ज्यांच्यासाठी व्यक्त करायच्या त्याना कळाव्या. अन्यथा ते अरण्यरुदन असते.
दुर्बोध/ अगम्य असणे हा एक अलंकार/रस आहे. पण तोच रस जपणे म्हणजे जेवणात फक्त मीठच खाण्यासारखे आहे.
नवरसात बीभत्स हा ही एक रस आहे. पण म्हणुन केवळ बीभत्स रस वापरुन वाङ्मय होत नसते.
आपले क्षितीज रुंदावू द्या हे मान्य ...पण म्हणुन सौंदर्य ज्या निकषावरठरते ते कितीही बदलले तरी नाकीडोळी निटस असणारी स्त्रीच सुंदर ठरते. कुब्जा , खुरटलेली , रुक्ष , तोंडाला दुर्गंध असणारी भिकारीण स्त्री सुंदर होऊ शकणार नाही
नवीन युगजाणीवांची स्पंदने ओळखा, थोडे पूर्वग्रहांना बाजूला सारा हे कितिही केले तरी पंडुरोगाने फिक्कट झालेल्या रोगट व्यक्तीला नितळ सौंदर्याचा अविष्कार म्हणणे अवघड आहे

कोलबेर's picture

26 May 2008 - 11:50 am | कोलबेर

आपल्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर त्या ज्यांच्यापुढे ज्यांच्यासाठी व्यक्त करायच्या त्याना कळाव्या.

बरोबर! ज्यांच्यापुढे ज्यांच्यासाठी व्यक्त करायच्या त्याना कळाले म्हणजे झाले. बाकिच्यांना कळण्याची सक्ती नसावी. आणि बाकिच्यांनीही त्याला दुर्बोध/अगम्य असे शिक्के मारुन आपण 'बाकिचे' आहोत हे दाखवण्याचा हट्ट आवरता घ्यावा!

बकुळफुले's picture

24 May 2008 - 5:29 pm | बकुळफुले

=)) हा हा हा हा अतिजहाल क्रांतिकारी कविता ..आणि सर्वोत्तम सभ्य भाषा =))
टीका सहन न होणारी माणसे समिक्षक झाली की कसे होते याचे उत्तम उदाहरण
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

ऋषिकेश's picture

24 May 2008 - 6:21 pm | ऋषिकेश

वा! मुक्तसुनीतराव इतक्या सुंदर कवितांचा नेटक्या शब्दात परिचय करून दिल्याबद्दल अनेक आभार. तुम्हाला हा कवि जालावर मिळाला असे लिहिले आहे. यांच्या इतरही कविता जालावर वाचता येतील का कुठे?

बाकी दोन्ही कविता पुन्हा पुन्हा वाचण्यासारख्या आहेत हे नक्की!! काहितरी आहे खास!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत's picture

25 May 2008 - 8:07 am | मुक्तसुनीत

संजोपरावानी उल्लेखिलेल्या "जाहिरातीच्या" कविता :
http://india.poetryinternationalweb.org/piw_cms/cms/cms_module/index.php...

ऋषिकेश's picture

25 May 2008 - 10:41 am | ऋषिकेश

मानलं बॉ!! या जाहिरातींच्या कविता म्हणजे कल्पनाशक्तीचा सुंदर अविष्कार!
वा वा! सोलकींच्या कविता कुठे सिदल्या की आता वाचून टाकल्या पाहिजेत..

अतिशय आभार मुक्तसुनीत राव! अजून दूवे असतील/मिळाले तर जरूर कळवा!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

दंभकुठार's picture

25 May 2008 - 7:48 pm | दंभकुठार

"जाहिरातीच्या" कविता वाचल्या : अत्यंत सुमार आहेत.

विजुभाऊ's picture

26 May 2008 - 11:19 am | विजुभाऊ

बर्रोबर मी सहमत आहे. फक्त एक सुधारणा त्या कोणत्या प्रकाराने कविता ठरतात ( कदाचित क दर्जाची वीण या अर्थाने कवीता असाव्यात)

llपुण्याचे पेशवेll's picture

27 May 2008 - 8:32 pm | llपुण्याचे पेशवेll

जाहीरातींच्या कविता नामक प्रकरण अगदीच सुमार आहे. मग त्यापेक्षा वर दिलेली कवीता तरी ठीक वाटते.
पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत's picture

26 May 2008 - 7:47 pm | मुक्तसुनीत

दंभकुठार यांना उद्देशून लिहीलेले माझे वरचे पोस्ट त्यानी जरूर वाचावे. मी त्याना (त्यांच्याच टिपणाबद्दल) काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यानी या विषयावर थोडा उहापोह करावा.

A Letter to My Aunt ही कविता सर्वांनी अवश्य वाचावी ...

http://www.poemhunter.com/poem/a-letter-to-my-aunt/

विकेड बनी's picture

25 May 2008 - 9:07 pm | विकेड बनी

बोटात गेलेलं कूस
काढावं का
की न काढावं
काढावं म्हटलं का गाढवं का आठवावी?
कूसा सोबत गावकुसाची आठवण यावी

शर्टाला लागलेला शाईचा निळा डाग
नि़ळ्या काचेचं पेन टाकून दिलं तरी
तिथेच चिकटून राहिला आहे
थूत एरियलच्या जाहिरातीवर
ब्लीचला अद्यापही पर्याय नाही

कवितेतून गरळ किती ओकू
बोलू का
की न बोलू
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात
घाबरतो काय बोलन् की

आपला,

तेर्जेश बोलन्की

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 12:55 am | विसोबा खेचर

वा तेजराव,

आपली कविता मस्त आहे! :)

तात्या.

भोचक's picture

26 May 2008 - 12:18 pm | भोचक

कविता हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे. कुसुमाग्रजांनी छंदातही सुंदर लिहिलं आणि मुक्तछंदातही परिणामकारक लिहिलं. बाय द वे.

खरकट्याच्या ढिगातले धागे आणि वर्जेश सोलंकीच्या कविता यातला फरक कळत नसेल तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका दिवाळी अंकातील 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी ' ही नवकविता किंवा 'परवाच पाहिला गांधी रस्त्यावर हेमामालिनीच्या नावाने मुठ्ठी मारताना' ही अतिजहाल क्रांतिकारी कविता वाचून पहावी.

हे भारीच आवडलं. च्यायला अशा कवींची पैदास प्रचंड आहे. नाशिकमध्ये एकदा एका विभागीय आयुक्ताने (आता हे सचिव आहेत.) एक कविता वाचली होती. 'निरोधचा फुगा फुटला नि माझा जन्म झाला.' एका विद्रोही कवीने 'तो लालगांड्या सूर्य.... अशी सुरवात करून जी कविता म्हटली की त्यानंतरचा थरार अजूनही गेलेला नाही.

क्रांतीबिंतीला घाबरणारा (भोचक)

विजुभाऊ's picture

26 May 2008 - 12:25 pm | विजुभाऊ

विभागीय आयुक्ताने (आता हे सचिव आहेत.) हा उल्लेख विनोदाने केला वाटते =))

भडकमकर मास्तर's picture

26 May 2008 - 6:08 pm | भडकमकर मास्तर

फस्स...
कसलासा कडवट स्प्रे हिरड्यांवर आणि
वर आश्वासन " हे तर दुखणारच नाहीये"..
... मग डोळ्यांसमोर ती सुई नाचवत गोड हसणारा
तो माझा दु:खहर्ता...
गप्कन डोळेच मिटताना एक थंड सुईचा स्पर्श गाल आणि हिरडीच्या मध्ये
... मग खच्चून बोंबलताना
पुन्हा एकदा अनुभूती...
" साली झक मारली आणि इथे आलो"...
...आलेल्या मुंग्या , फुगलेला गाल, आणि ड्रिलची घरघर...
...देवा हे कधी संपणार ?...मला जीभ आहे का?
... घरघर घरघर पुन्हा पुन्हा घरघर.....विचित्र..डोकं बधीर...
छोट्या सुया, मोठ्या सुया..सतत खरवड आणि
सारखं "आ करा आ करा .."
... बरोबर
...मग सुया घालून एक्स रे...
फिल्म आत ..डोकं वर, मान खाली....
बीईईईईईप.....
एक्स रे...
..मग पुन्हा घरघर आणि खरवड...

"झालंच हां आता" चा जप..
कशाला खोटं बोलतो साल्या?..हे मनात...

मग कसल्याशा मशीनची बीपबीप...
ऍडव्हान्स्ड डेन्टिस्ट्रीच्या नानाची टांग...
फस्स... एक कडवट औषधाचा फवारा दातात, मग त्याच त्या गुळण्या...
.."हळू..."...
एवढ्या जोरात थुंकायला काय घरचं बेसिन वाटलं का? असा एक लूक...
..झक मारली आणि आलो.
...हे कितव्यांदा...
मग एक पांढरं मातीसारखं ढेकूळ ...
दातात थापलेलं...
"झालं..."
छान....
... डोकं हलकं एकदम ...
अन खिसाही...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

26 May 2008 - 6:17 pm | धमाल मुलगा

मास्तर...मास्तर....
इतकं शिघ्रकाव्य?
=))
=))
=))

चालुद्या...चालुद्या !!!

भडकमकर मास्तर's picture

27 May 2008 - 12:55 am | भडकमकर मास्तर

कविता बीभत्स नाही... :/

वेदनाहरण करणार्‍याकडूनसुद्धा ( वेदना घालवताना ) वेदना होणे आणि त्याची रग्गड भीती वाटणे हीच तर मुख्य विसंगती ...
डेंटिस्टकडे जाण्यासारख्या आयुष्यातील साध्या साध्या घटनेवर आधारित संवादासारखी कविता...ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस... :)) :)) :))
रूट कॅनाल करून घेतलेल्याला हे फारच जाणवेल... विशेषतः शेवटचा खिसा हलका करणारा संदर्भ.....

जाताजाता... वर्जेशभाउंच्या जहिरातींच्या ओळी ओळी त्यांच्याच वरच्या कवितांपेक्षा भलत्याच सुमार वाटल्या... ( रेडिओ स्टेशन बदलल्यानंतर होणारे विनोद किंवा नाटकाच्या नावापुढं बिछान्यात वगैरे लावून तयार होणार्‍या विनोदांइतपत मस्त...) असो... नवकवितेचे रसग्रहण करणार्‍यांइतपत आपण सुशिक्षित नाही...किंवा नवकवींचे पाय खेचण्याइतपत धीट नाही

वर्जेशभाऊला वाटेल ते लिहायचा अधिकार आहे...आणि वाचकांनाही त्यांना वाटेल तेच वाचायचा अधिकार आहे...
उत्तम तेवढे टिकेल आणि बाकीचे वाहून जाईल...

( कवीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता) भडकमकर

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मी आणि रस्ता एकमेकाना क्रॉस करत होतो
कर्र् किच्च @#!$ *ड्या.........** निजला होता का असा रस्त्यात
पोटात काळोख्............आणि गाभुळलेली जाणीव
गर्भपात ९० रुपये..........सरकारमान्य
पाणी गाळा नारु टाळा
हिवताप आणि स्वस्त धान्य दुकान
ऊष्ण कटीबंध थंड उसासे...
वितळलेलं डांबर .....भिणभिणलेलं डोके
शेंबुड ,बेडखा आणि सिगरेटचे थोटुक
उसवलेला खिसा विरलेले पाकीट
१२० ३०० चटणी मारके.
मेरेकु जैन सुपारी चुना मारके
एक संभाजी भीकुसा यामासा
ए फडका मार रे.
सामनेवाले टेबल पर एक चाय आन दो बश्या
दिवाल पर *** मत करो
सुभीक्षा मोबाइल्...
यामाहा बाइक
डॉमिनोज ;कोका कोला आणि फाटकी चड्डी
सूर्य पहातोय स्वतःचेच प्रतिबिम्ब..
मिटल्या डोळ्याने.......

मुक्तसुनीत's picture

26 May 2008 - 7:45 pm | मुक्तसुनीत

कुठलीही वाईट कविता ही "वाईट कविता"च असते. नवे-जुने असला भेद करण्यात काही अर्थ नाही. बालकवी थोर ; म्हणून मर्ढेकर लहान किंवा वाईट ठरत नाहीत. नवकवितेतील व्यंग दाखविण्याकरता उधृत केल्या गेलेल्या (आणि येथे काही लोकांनी लिहीलेल्या ) कविता या वाईट कविता होत. यात नवे-जुने असे काहीच नाही. मर्ढेकरांची कविता येऊन आता सुमारे ६० वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळचा गदारोळ आणि आताचा येथे उडत असलेला धुरळा यात फार फरक नाही. या कवितेवर टीका करताना तिच्यातील वर्मावर बोट ठेवायच्यऐवजी अतिशय वाईट, प्रसंगी बीभत्स (आणि प्रसंगी स्वरचित ) कवितांची उदाहरणे दिल्याने नवीन कविताना विरोध करणार्‍यांची बाजू थोडी कमजोर होते असे मला वाटते.

असो. नवनवीन कवितांचा प्रवास पुढे चालूच रहाणार. आणि या कवितांना विरोधही होणारच. जेव्हा जेव्हा मला एखादा नवोदित कवी सशक्त, दर्जेदार काम करताना दिसेल तेव्हा तेव्हा मी मिपावर येऊन वाचकांना त्याचा परिचय करून देण्याचे काम करेनच. विरोध झाल्याशिवाय अशा गोष्टी करण्यात मझा येत नाही खरा :-)

मन's picture

27 May 2008 - 5:52 pm | मन

आहे मुक्त सुनीत रावांनी दिलेली मूळ कविता.
आणि त्यानंतर उल्लेख केलेल्या "निरोधचा फुगा...","आय माय **न टाकावी" आणि इतरही सगळ्याच.
अगदि भन्नाट. तुमचे(मूळ /नव कवितेची टर उडवणार्‍यांचे) विचार पटले नाहित, पण दुसर्‍याची कशी खेचायची याचा जो वस्तुपाठ घालुन दिलाय्,त्याला सलाम.

आपलाच,
मनोबा

विजुभाऊ's picture

27 May 2008 - 10:07 am | विजुभाऊ

मन तुझ्याशी १०००% टक्के सहमत रे

धनंजय's picture

27 May 2008 - 5:32 pm | धनंजय

घडीव शब्द.

धन्यवाद, मुक्तसुनीत.

दंभकुठार's picture

1 Jun 2008 - 10:23 am | दंभकुठार

नवकविता ही अगदीच व्हेग संज्ञा आहे...शिवाय साठोत्तरी कवींच्या कवींच्या फसलेल्या कवितांच्या या नव्वदोत्तरी आवृत्त्या लिहून खाजगी फाऊंडेशनांचे किंवा टुकार सरकारी अकादम्यांचे पुरस्कार मिळण्या व्यतिरिक्त फार काही होईल असे वाटत नाही..

साठोत्तर्‍यांनी किती कोलांटउड्या मारल्या ..वाटेल ते लिहून पाहिलं..पण अद्याप ' हाऊल ' किंवा वेस्ट्ल्यांड सारखी एकही कविता मराठीत आलेली नाही...तुकारामाचा अनुवाद करून किंवा विठ्ठल -रखुमाई वर एखादी लांबलचक कविता लिहून काय हासिल ????

एकंदरीत काय ? चार दशकांचा गदारोळ ,पाच पन्नास भरकटलेले कवी...

कवितेचे काय ?

मुक्तसुनीत's picture

2 Jun 2008 - 1:01 am | मुक्तसुनीत

मला नव्वदोत्तरी कवितांची वकिली करायची नाही आहे. शेवटी एकेक कविता हाच एकेक अनुभव असतो. एखाद्या चळवळीचा भाग म्हणून काही आपण तिचा आस्वाद घेत नाही. सोलंकींच्या कविता मला आवडल्या. त्यामागे "ते कुठल्या चळवळीची निगडीत आहेत " असा विचार नव्हता. कुठल्याही कवितेकडे पहायचे तर आधी चष्मे उतरवायला हवेत. ("कविता कशी भोगावी ? तर कपडे काढून भोगावी !" असे करंदीकरांनी म्हणूनच म्हण्टले आहे. ) त्यामुळे साठोत्तरी/नव्वदोत्तरींनी कमावले काय नि गमावले काय याचा ताळेबंद माझ्या मनाशी नव्हता.

दंभकुठार यांच्यासारख्यांसमोर गेल्या ५० वर्षांतल्या मराठी कवितेचा विशाल पट असेल तर त्यांच्या मतप्रदर्शनाच्या झलकीवरून त्याची फार कल्पना येते असे मला वाटले नाही. गिन्सबर्ग आणि इलियट यांच्या कवितांशी ते गेल्या ५० वर्षांतल्या मराठी कवितेची तुलना करतात असे दिसते. ठीक. अशी तुलना थोडी बालीश आहे ही गोष्ट अलाहिदा. परंतु टीका करताना या नव्या कवितांमधे कमीत कमी नक्की काय कमी आहे किंवा नक्की काय वाईट आहे असे त्यांनी सांगावे अशी त्याना विनंती आहे. "कोलांटउड्या" मारणे म्हणजे काय या सारख्या गोष्टींच्या बाबतीत थोडे विस्ताराने लिहावे. केवळ निंदाव्यंजक मतांच्या पिंकानी फारसे काही साध्य होत नाही.

रामदास's picture

2 Jun 2008 - 11:36 am | रामदास

इलियट हा इलियट वेव्ह थेरी वाला तर नाही ना?

ॐकार's picture

2 Jun 2008 - 11:41 pm | ॐकार

कविता किंवा कवितेच्या काही ओळीदेखील मनात घर करून राहणार नसतील तर असल्या कवितांची भलावण करणे व्यर्थ आहे.

धर्मराजमुटके's picture

29 Jul 2014 - 9:30 pm | धर्मराजमुटके

सुंदर कविता. ही सोलंकी या गुजराती कवीची मुळ रचना आहे की भावानुवाद ?