ठकू आणि लच्छी!

नीधप's picture
नीधप in जनातलं, मनातलं
9 Apr 2011 - 10:20 am

माझाच एक जुना लेख टाकतेय इथे.
------------------------------------------------
एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.

ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत. कांदबरीच्या सुरूवातीलाच ही गोष्ट येते आणि मग पुर्ण कांदंबरीतली सगळी पत्रे म्हणजे लच्छीचा मोर नाचताना पडलेली मोरपिसं व्हायला लागतात.

"... माझ्या नाचण्याचा ताल आता बरा जमायला लागलाय...."

गोष्टीत आहे एक म्हातारी आणि तिची नात लच्छी. त्यांच्या झोपडीशी एकदा मोर येतो. त्याला बघून लच्छी नाचायला लागते मग मोरही नाचायला लागतो. लच्छी हट्ट धरते की ह्याला इथंच बांधून ठेवावं. पण घरात मोराला घालायला काही दाणापाणी नसतो म्हणून म्हातारी नको म्हणते. शेवटी मोरच म्हणतो मी इथंच राहीन, मला दाणापाणी काही नको पण एक अट आहे. मी येईन तेव्हा लच्छीनं नाचलं पाहिजे. ती नाचायची थांबेल तेव्हापासून मी येणार नाही. लच्छी कबूल होते. पण असं हुकुमी नाचायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. मनही तसंच आनंदी हवं तेव्हापासून लच्छी आनंदीच राहू लागली. मोर कधी केव्हा येईल याचा नेम नसे. पुढे पुढे मोर येऊन गेला की काय याचं तिला भान रहात नसे.

पूर्ण कादंबरी पत्ररूपात आहे. कुण्या एका सावूने कुण्या एका सुहृदाला लिहिलेली पत्रे. यामधे तो सुहृद काहीच बोलत नाही. बोलताना, व्यक्त होताना दिसते ती सावित्रीच. त्यामुळे कादंबरीच्या सुरूवातीलाच आलेल्या या गोष्टीचं प्रयोजन उमजूनच जातं.

".... कसं करतेस तू लच्छी? आधी डावा की आधी उजवा?.. "

लच्छी मोरासाठी नाचत रहाते. मोर येतो आणि जातोही पण ती नाचतच रहाते. हे नाचणंच महत्वाचं होऊन जातं मोर येण्यापेक्षा. मोर यायलाच हवा याची गरज वाटेनाशी होते कारण नाचता नाचता ती स्वत:च मोर होते. हेच तर सावू सांगते कादंबरीत.. 'मोर हवा तर आपणंच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणंच व्हायचं. मोराला आपल्यातंच कुठेतरी ठेवून द्यायचं मग तो जाईलच कुठे? पण मोर आत भिनायला हवा तर मग आनंदी राह्यलंच पाहिजे.

".. छे मला जमतच नाहीये हा तुझा पदन्यास.."
" माझ्या हातात हात दे.. जमेल.."

ही लच्छी आनंदभाविनी (रेग्यांचाच शब्द पण किती चपखल). मोरासाठी का होईना पण कायम आनंदात असणं हेच तिचं प्राक्तन. आणि मोर हवासा झाला की त्या आनंदातच आपणच नाचून आपल्यातल्या मोराचा पिसारा फुलवणं हे ही. हे तिचं आनंदभाविनीपण खूप काही सांगून जातं. सुंदर आयुष्याच्या सुंदर तालावर डौलात पावलं टाकत जगणं हे खरं जगणं. असं जगता यायला हवं. असं सगळ्यांनीच जगायला हवं हेच तर लच्छी सांगत रहाते. अर्थात यासाठी खूप मोठं बळ लागतं. लच्छी हे बळ मिळवते मोराच्या आशेमधे. पण नंतर या बळाला, आशेला कसलाच अर्थ उरत नाही. एकदा नाचायची, तालाची सवय होण्यापुरतं हे बळ. मग नाचण्याची नशाच तुम्हाला पुढे घेऊन जाते. यामधे नशा आहे पण ती उन्मत्त नाही. काहीही जिंकण्याची ओढ, मिळवण्याची लसलस नाही. जी काय आशा आहे ती आपल्या मोराची जी पुढे गळून जाते. असं जगणं जमलं पाहिजे.

".. अशी सुंदर लवलवते लच्छी. मला कधी जमेल?.."
"थांबू नकोस! पावलं टाकत रहा... "

"आयुष्याला सुंदर नाच म्हणणं सोपं आहे गं बये पण ताल बिघडायला काय वेळ?"
"तुमचा ताल तुम्हीच ठरवायचा, मग इतर कोण कशाला बिघडवेल तो?"

आपलं जगणं हे काही सतत सुंदर कुठे असतं? ते तसं करणं हे आपल्या हातात असतं. या जगण्याला कसं सामोरं जायचं हे महत्वाचं. शेवटी ताल कधीच सुटता कामा नये.

"... पावलामागून पावलं.. कित्ती मज्जा!!.."

माझा माझा मीच ठरवलेला ताल तो जपत मापत नाचत रहायचं. सतत तालाकडे लक्ष. काळाचा एक ठराविक तुकडा संपला की मगच पाय पडला पाहिजे. आधी नाही आणि नंतरही नाही. किती लक्षपूर्वक केलं तरी चुकतोच, सटकतोच ताल, तुटतेच लय. मग लयीचे तुटलेले छोटे छोटे तुकडेच आयुष्यात उरतात.

"..पावलांच्या या उचलण्याला नी परत टाकण्याला पदन्यास म्हणतात का?.."
"जास्त विचार करू नकोस मार एक गिरकी. नको करू काळाच्या तुकड्यांची काळजी!.."

जगण्याची लय शोधायची नाही, आपणच बनवायची आणि मग सोडून द्यायचं स्वत:ला त्या लयीबरोबर. लयीचं ओझं नाही होऊ द्यायचं. ते भान सुटलं पाहिजे. भान विसरता आलं पाहिजे तरंच लय सुटणार नाही. आयुष्याचा ताल चुकणार नाही. म्हणजे भान सुटलं तरी नाचत रहायचं..

".. जमायला लागलंय का गं मला?.."
"विचारतेस म्हणजे नसावंच जमत अजून!"
"..मग कसं करू आता?.."
"मी कसं सांगणार? तुला लच्छी व्हावं लागेल त्यासाठी."
"............."
"अगं नाचाकडे का लक्ष तुझं?"
"..मग?.."
"कुठे आलीस बघ तरी तू! कसं वाटतंय आता?"
"... अरे हो!.."
"आनंदभाविनी हा तुलाच आवडणारा शब्द ना?"

तसं पाह्यलं तर खुद्द मोराला तरी नाचता कुठे येतं. एक पाय उचलला की तोल जातो. तो सावरायला म्हणून तो लगेच पाय खाली टेकतो आणि दुसरा पाय उचलतो. पुन्हा तीच तर्‍हा... असं add infinitum. बघणारे त्यालाच नाच म्हणतात...

- नी

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

9 Apr 2011 - 10:54 am | विसुनाना

भान विसरता आलं पाहिजे तरंच लय सुटणार नाही. आयुष्याचा ताल चुकणार नाही.

मूळ कथा आणि त्याचे योग्य रसग्रहण आवडले. (-असा शाब्दिक प्रतिसाद देतो..)

नंदन's picture

9 Apr 2011 - 11:17 am | नंदन

आवडलं. रेग्यांच्याच त्रिधा राधा मधली 'संसिद्ध' राधा आठवली.

सुधीर१३७'s picture

9 Apr 2011 - 11:28 am | सुधीर१३७

आवडेश......................., सुंदर लेखन........... :)

sneharani's picture

9 Apr 2011 - 11:33 am | sneharani

मस्त मुक्तक!

सहज's picture

9 Apr 2011 - 1:13 pm | सहज

>'मोर हवा तर आपणंच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणंच व्हायचं. मोराला आपल्यातंच कुठेतरी ठेवून द्यायचं मग तो जाईलच कुठे? पण मोर आत भिनायला हवा तर मग आनंदी राह्यलंच पाहिजे.

मुक्तक आवडले.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Apr 2011 - 5:20 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम! लेख / मुक्तक आवडले.

पैसा's picture

9 Apr 2011 - 8:50 pm | पैसा

लेख आवडला.

स्मिता.'s picture

9 Apr 2011 - 9:19 pm | स्मिता.

लेख खूप आवडला. वाचतानाच अंतर्मुख व्हायला होतं.

मोर हवा तर आपणंच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणंच व्हायचं. मोराला आपल्यातंच कुठेतरी ठेवून द्यायचं मग तो जाईलच कुठे? पण मोर आत भिनायला हवा तर मग आनंदी राह्यलंच पाहिजे.

आणि

तसं पाह्यलं तर खुद्द मोराला तरी नाचता कुठे येतं. एक पाय उचलला की तोल जातो. तो सावरायला म्हणून तो लगेच पाय खाली टेकतो आणि दुसरा पाय उचलतो. पुन्हा तीच तर्‍हा... असं add infinitum. बघणारे त्यालाच नाच म्हणतात...

या ओळी सुरेख!

प्रास's picture

9 Apr 2011 - 10:12 pm | प्रास

वाचून..... :-)

सुनील's picture

10 Apr 2011 - 5:47 am | सुनील

सुंदर रसग्रहण!

मोर हवा तर आपणंच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणंच व्हायचं
Be the change you want to see in the world ह्या महात्मा गांधी यांच्या वाक्याची आठवण झाली.

तसं पाह्यलं तर खुद्द मोराला तरी नाचता कुठे येतं. एक पाय उचलला की तोल जातो. तो सावरायला म्हणून तो लगेच पाय खाली टेकतो आणि दुसरा पाय उचलतो. पुन्हा तीच तर्‍हा... असं add infinitum. बघणारे त्यालाच नाच म्हणतात...
छान!

राजेश घासकडवी's picture

10 Apr 2011 - 9:15 am | राजेश घासकडवी

छान मुक्तक. आवडलं.

इटॅलिक्स/ आयटॅलिक्स मधल्या ओळी माझ्या नाहीत. पुस्तकातल्या आहेत. :)

स्वाती दिनेश's picture

10 Apr 2011 - 10:43 am | स्वाती दिनेश

मुक्तक आवडले,
स्वाती

मुलूखावेगळी's picture

10 Apr 2011 - 8:47 pm | मुलूखावेगळी

सुंदर आहे.

प्राजु's picture

10 Apr 2011 - 10:21 pm | प्राजु

सुंदर रसग्रहण!!

आनंदभाविनी हा शब्द खुपच मनात घर करुन गेला...
पहिल्यांदाच वाचला आहे हा शब्द ..

रसग्रहन छानच ..