प्रतिबिंब

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
30 Mar 2011 - 12:54 am

माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात

धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे.

नितळ आणि रिक्त आरशात

तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे.

---

माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात

धीरोदात्तपणे प्रतीक्षा करत आहेत.

हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले.

जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात

सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो.

---

आज इथे संतजन लोटले आहेत.

एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत.

त्यांचा आनंद... त्यांचे हास्य पहाटेच्या शीतल वार्याच्या झुळूकेवर स्वर होऊन

माझ्या रिकाम्या खोल्यांमधून गुंजते आहे.

---

जिथे काल मी अत्यवस्थ, मरणासन्न पहुडलो होतो ...

कुणीतरी धूपदाणीतला धूप प्रज्वलित केला.

तसे काहीच बदललेले नाही

फक्त यापुढे हे 'माझे घर' नाही.

---

धूप मंदगतीने जळतो आहे.

आणि उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर

आज न उद्या माझ्या आठवणी पुरत्या विस्मृतीत जातील.

धुनीवर टांगलेला आरसा पुन्हा तेजाने न्हाऊन निघेल

पुन्हा एकदा नितळ आणि रिक्त आरशात

तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल .....

तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल.....

(पुन:प्रकाशित भावानुवाद - मूळ संकल्पना एका पाश्चात्य कवीची आहे)

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

कविता (भावानुवाद )खुपच आवडली .. अतिशय छान

कवितानागेश's picture

30 Mar 2011 - 2:48 pm | कवितानागेश

सुंदर.

पुष्करिणी's picture

30 Mar 2011 - 2:52 pm | पुष्करिणी

मस्त भावानुवाद

पैसा's picture

30 Mar 2011 - 3:47 pm | पैसा

एकदम शांत वाटतं वाचून.