सहवास

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
7 May 2008 - 10:09 am

अंगणाला लागून असलेली खोली साफ करतांना
नजर सहज खिडकीबाहेर गेली.
एक चिमुकला लव बर्ड खिडकीला लागून असलेल्या वेलासमोर उडतांना दिसला.
गर्द निळ्या पिवळ्या रंगाचे मऊशार स्वेटर घातलेला.
इतका चिमुकला कि तळहातावर बसवून चारी बोटांनी हळूवार लपेटता यावा.
त्याची आपली काहीतरी लगीनघाई सुरू होती.
मधूनच सुर् कन उडून जायचा.
परत येतांना चिमण्या चोचीत एखादेच लहानसे पीस किंवा काडी घेऊन यायचा.
तो जरा दूर गेल्यावर खिडकीच्या काचेजवळ जाऊन पहिले.
वाटले होते त्याप्रमाणे हा सारा उद्योग घरटे बांधण्याचाच होता.

वेलीवर फांद्यांच्या बेचक्यात नुकतेच सुरू केलेले बांधकाम दिसत होते.
बांधकाम कसले! नुसत्याच चार काड्या जमेल तशा खोचलेल्या वाटत होत्या.
कसा काय हा चिमणा घरटे पूर्ण करणार कोण जाणे!
त्याच्या पेक्षा जास्त मलाच त्या घरट्यात येणार्‍या बाळांची काळजी वाटू लागली.

त्यानंतर रोज मला एक चाळाच लागून गेला.
सकाळी व दुपारी स्वारीचे बांधकाम सुरू असायचे.
ते काचेच्या आतून टक लावून पहायचे.
अर्थात पडदा हळूच बाजूला सारून,
आपल्यावर कोणाची पाळत आहे ह्याचा त्याला पत्ता लागू नाही, अशा हळुवारपणे.

सकाल व दुपार मधले चार पाच तास कुठे गायब असायचा कोण जाणे!
काम देखील अगदी हळुहळूच सुरू होते.
म्हणावा तसा आकारही येत नव्हता.
त्यालाही ते कळत असावे.
कारण दोनदा त्याने रचलेले सारे उचकटून पुन्हा नव्याने सुरवात केली.
रोज पाच दहा मिनीटे काचेआडून का होईना, पण मिळणारा त्याचा सहवास मला खूप आवडू लागला.
कधी वाटायचे, ह्याचे घरटे पूर्ण होऊच नये व रोज मला त्याची ती धांदल बघायला मिळावी.
पण खरतर मलाही ते घरटे पूर्ण होऊन माझ्या अंगणात लव बर्डच्या पूर्ण कुटुंबाचा सहवास मिळावा अशी घाई होतीच.

एक दिवस मात्र काळजी घेऊनही न व्हावे ते झालेच.
लव बर्डचे जवळून दर्शन घडावे म्हणून
मी काचेच्या अगदी जवळ डोके नेले.
आणि हलकासा स्पर्श काचेला झालाच.
काचेचे तेवढेही स्पंदन लव बर्डला जाणवले.
त्याने एक घाबरी नजर आत टाकली.
माझा सर्रकन आत जाणारा चेहरा त्याने पुसटसा पाहीला असावा.
आणि तो भुर्रकन पसारच झाला.
पुन्हा कधीही तिकडे फिरकलाच नाही.
कुठे दुसरीकडे जागा घेतली कोण जाणे!

मला त्याचा सहवास हवाहवासा वाटला तरी, त्याला मात्र माझा सहवास पटला नव्हता.
माणसे पक्षांना सहवासासाठी कोंडून ठेवतात,
हे बहुदा त्या लहानग्या जीवाला माहीत असावे!
....................

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पक्या's picture

7 May 2008 - 11:31 am | पक्या

व्वा व्वा क्या बात है !!! छान वाटले वाचायला.
शेवट पण एकदम सही. Realistic .
लगे रहो.
- पक्या

मदनबाण's picture

7 May 2008 - 11:43 am | मदनबाण

माणसे पक्षांना सहवासासाठी कोंडून ठेवतात,
हे बहुदा त्या लहानग्या जीवाला माहीत असावे!

खरय..... पंख हे उडण्याकरताच असतात हे माहित असुन देखील माणुस हा पक्ष्यांबरोबर असा का वागतो हे उजुन तरी मला कळलेले नाही.....
ही कुठल्या प्रकारची करमणुक? आपल्यासाठी त्या पक्षाने आजन्म बंदिस्त राहाव.....छ्या.....

(नभात दुर उड पाखरा) असे म्हणणारा.....
मदनबाण.....

प्रणित's picture

7 May 2008 - 12:32 pm | प्रणित

छान आहे !!!!!!

ईश्वरी's picture

7 May 2008 - 12:40 pm | ईश्वरी

छान आहे ..आवडले.
शेवट ही छान केलात.
-- आपल्यासाठी त्या पक्षाने आजन्म बंदिस्त राहाव.....छ्या.....मदनबाण

अगदी बरोबर.
ईश्वरी

आनंदयात्री's picture

7 May 2008 - 1:44 pm | आनंदयात्री

सुरुवातीचे कडवे एकदम सुंदर !

अरुण मनोहर's picture

7 May 2008 - 1:48 pm | अरुण मनोहर

धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

7 May 2008 - 2:04 pm | भडकमकर मास्तर

छान कथा आहे...आवडली...

कडवे
ही कथा आहे, असे त्यांनीच वरती लिहिलंय...

आनंदयात्री's picture

7 May 2008 - 2:14 pm | आनंदयात्री

माफी असावी.

अरुण मनोहर's picture

7 May 2008 - 2:23 pm | अरुण मनोहर

आनंदयात्रीजी माफी नका मागू भॉऊ. मी गद्य कविता म्हणूनच ती लिहीली होती. पण म्ह्टले कविता म्ह्टले की दूर पळणारी काही वाचके असतील तर ती कथेला तरी जवळ करतील. इसलिये ये ट्रीक.

आनंदयात्री's picture

7 May 2008 - 3:01 pm | आनंदयात्री

आता .. साहित्याचे परिक्षण जनरली कंटेंट वरुन व्हावे असे वाटते, तुमचे मत ऐकण्यास उत्सुक आहे.

भडकमकर मास्तर's picture

8 May 2008 - 10:06 am | भडकमकर मास्तर

आवडलं असं आधीच लिहिलं होतं...
असो...

आता अजून लिहायलाच हवे म्हणून ही पद्यकविता...

गद्यकवितेचे पद्यकथात्मक परीक्षण...
आला असेल... असाही एखादा फ़ॊर्म... गद्यकविता नावाचा...किंवा असेलही प्राचीन काळापासून .पद्यकथा अस्तित्त्वात
कविता न आवडणार्‍यांना गंडवता गंडवता , टाकून जाईल संकट माझ्यावरती... ओळीओळींचं ....
आमच्या नशिबी कसली प्रेमपक्ष्यांची भावुक लगबग?
इकडे तर खिडकीत घरटी बनवून खालच्यांच्या गॆलरीत शिटून घाण करणारी , अत्यंत प्रजननक्षम कबूतरांची जोडी...
एकामागोमाग अंडी घालणारी कबुतरी आमच्या नशिबी...आणि जोडीला रोज खालच्यांच्या शिव्या...

बा पक्ष्या ....नाही, प्रेमपक्ष्या....तूच तो... पण कोण? कोण असशील तू?
तू म्हणजे एखादे स्वप्न तर नाहीस? पहाटेच्या थंडीत मऊमऊ दुलईसारखे... किंवा तुझ्या स्वेटर सारखेच असेल..छान छान, मृदू मुलायम...
तू आशा लावणार... गुंगवणार... कोणी शिकवलं तुला हे ? अं..अं.... लब्बाड...माणसांनीच ना??
या विचित्र दुनियेत माणसांजवळ फ़ार राहू नकोस हं... असलं काय काय शिकवतील तुला...
आणि फ़सवायलाही शिकवतील... का तू तिच्याकडूनच आला आहेस ? मला अजून दुख द्यायला...??
पाहिलंस? फ़सवणूक म्हटलं की तीच आठवते.... हस , हस रे तू हस... अजून दु:ख दे मला...
चालेल ..हरकत नाही... हरकत तरी का असावी? तिने दिलेले सारेकाही मनाच्या एक हळव्या आणि हवेशीर कोपयात अलगद लटकवून ठेवले आहे....
ख्रिसमस ट्री वरती लटकवलेल्या चमचमत्या खेळण्यांसारखे...
तसेच हे ही.... दे रे..दे .....तू मला दु:ख देच... कोळीष्टकांकडे जसे तटस्थपणे पाहतो ना मी, तसेच पाहत राहीन त्यांच्याकडे......

किंवा तू असशील विश्वास...कधीतरी मी घर बांधेनच,
जमवून आणून काडी काडी , तुमच्या आणि सार्‍या जगाच्या नाकावर टिच्चून..असा... .

असतं रे घर बांधायचं स्वप्न प्रत्येकाचंच... पण भेटतो प्रत्येकालाच कोणी एक तावदानावर टिचकी वाजवून पक्षी पळवून लावणारा...
...खोसल्याचा घोसला गेल्यावर तो जसा दु:खी झाला तसा तूही होशील का?
मी खुराणा नाही रे.. नाही.... मी नाही रे खुराणा...
का असा वागलास? इतका का मी वाईट आहे? ....ती खुणेची शीळ वाजवत पक्षिणींना बोलावणारा तूच ना?
तुला माझा टाहो का बरं ऐकू येत नाही ?
का गेलास असा सोडून?.. की उडून गेलास चित्रबलाकासारखा भलत्याच देशी?
गुलामा, आणि जायचंच होतं तर आलास का?.... की घाबरलास खिडकीवर झालेल्या आवाजाला ?
पुन्हा नाही रे आलास परत तो ? का एखाद्याला आशा लावतोस रे ?
हळहळतं..हृदय पिळवटून निघतं...आक्रंदतं माझं मन....
मी इतका वाईट नाही रे...मी तुला कोंडणार नाही रे....आवडत नाही मला असला जुलमाचा सहवास...
बोलवा रे त्याला कोणीतरी बोलवा...ढसाढसा रडतोय मी....
मीच असा भावुक, तडफ़डतोय जगाची पर्वा न करता तुझ्यासाठी ...
येशील ना रे ?
बा पक्ष्या...

आनंदयात्री's picture

8 May 2008 - 10:43 am | आनंदयात्री

माफ करा :)) ... लैच ठोकलं हो तुम्ही !

गणपा's picture

7 May 2008 - 3:35 pm | गणपा

मानल भौ तुम्हाला, आम्हाला गंडवलकी तुम्ही :)
आनंदयात्रीजी भौ की तै ? :/ :W
आनंदयात्री : चुकले बॉ
अरुण मनोहर : आनंदयात्रीजी माफी नका मागू भॉऊ.
(गोंधळलेला) गणपा.

ऋचा's picture

7 May 2008 - 1:46 pm | ऋचा

अप्रतीम..

गणपा's picture

7 May 2008 - 1:56 pm | गणपा

मनोहरपंत,
मस्त लिहिलयत.
माणसे पक्षांना सहवासासाठी कोंडून ठेवतात,
हे बहुदा त्या लहानग्या जीवाला माहीत असावे!

शेवट ही छान केलाय.
-गणपा.

प्रभाकर पेठकर's picture

7 May 2008 - 4:56 pm | प्रभाकर पेठकर

लेखकाने उभारलेल्या एकतर्फी प्रेमाचे शब्दचित्र अप्रतिम आहे.
पक्ष्यांचे गगन विहाराचे स्वातंत्र्य मनुष्य प्राण्याने हिरावून घेऊ नये. माझेही असेच मत आहे.
सुंदर शब्दचित्र, हार्दीक अभिनंदन.

शितल's picture

7 May 2008 - 5:15 pm | शितल

मला वाटते लव बर्ड पक्षी हा सदैव त्याच्या जोडीदारा बरोबर असतो, म्हणजे ते सर्वदा एकत्रच असतात. अजुन माहिती घेतली पाहिजे, कारण आमच्या शेजारी एका मुलाने ही दोन लवबर्ड जोड्या त्याच्या रुम मध्ये ठेवल्या होत्या, आणि एक दिवस एका मा॑जराने त्यातील एका पक्षाला खाल्ले तर दुसरा पक्षी दोन दिवसात मरून गेला कदाचित त्याचा साथिदार गेला म्हणुन त्याने काही खाल्ले नाही. कदाचित म्हणुन त्या॑ना लवबर्ड म्हणत असतील.
तुमचा लेख छान आहे.

अभिज्ञ's picture

7 May 2008 - 11:32 pm | अभिज्ञ

लेख/कडवे/कथा जे काहि असेल ते
अतिशय अप्रतिम झाले आहे.
असेच पुढचे हि येउ द्यात.

अबब.

चतुरंग's picture

8 May 2008 - 12:21 am | चतुरंग

साधा अनुभव ओघवत्या शैलीत चित्रित केलात.
(पक्षांना पिंजर्‍यात ठेवू नये असे मलाही वाटते. केविलवाणे वाटतात बिचारे.)
चतुरंग

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 8:13 am | विसोबा खेचर

मनोहरशेठ, सुंदर लिहिलं आहे..

औरभी लिख्खो....

आपला,
तात्या.

मन१'s picture

27 Feb 2013 - 11:07 pm | मन१

मस्तच.......

शुचि's picture

1 Mar 2013 - 12:10 am | शुचि

अतिशय गोड!!!!

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2013 - 8:17 am | नगरीनिरंजन

वा! अतिशय हृद्य!

बॅटमॅन's picture

5 Mar 2013 - 12:17 pm | बॅटमॅन

भारीच!!!