देव नाही देवालयी

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
24 Jan 2011 - 3:26 pm

पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या सिंहगडाकडून एकच रस्ता शहराकडे येतो. शहरात येताना आम्हाला हाच रस्ता घ्यावा लागतो. पण शहरात येताना दत्तवाडीपासून सरळ दांडेकर पुलाकडे न जाता आम्ही नेहमी आत वळतो, नि तेथील कॉलनी नर्सिंग होम जवळच्या लहान रस्त्याने पुढे जातो. हा जो थोडा दूरचा रस्ता आम्ही घेतो त्याला एक कारण आहे. या आतल्या रस्त्याला एक देवालय आहे. जाताजाता त्या देवालयातील देवाचे - ओझरते का होईना - दर्शन घडावे म्हणून. गेले चार वर्ष मात्र या देवाचे दर्शन दुर्मिळच झाले होते. असे म्हणतात की तुमच्या आमच्या पापांचे हलाहल पचवणार्‍या देवालाही कधी कधी ते भोवतेच नि त्यालाही काही त्रास सहन करावाच लागतो. देवालाही भूतलावरच्या त्याच्या वास्तव्यात मातीच्या माणसाचे काही भोग भोगावेच लागतात. रामकृष्णांचीही यातून सुटका झाली नाही तिथे या कलियुगातील देवच याला कसा अपवाद ठरेल?

आज सकाळीही आम्ही देवळात गेलो, अखेरचे! मैफल संपवून निवांत पहुडलेल्या देवाच्या चेहर्‍यावर मैफलीची एक सफल सांगता झाल्याची चित्कळा पसरली होती. आमच्यासारखे अनेक भक्त येऊन नव्या देशी 'बदली' झालेल्या या भास्कराचे अखेरचे दर्शन घेत होते. अर्थातच त्यांचे ध्यान त्या पुढच्या मैफलीकडे लागले होते. कदाचित त्या मैफलीत कोणत्या रागांची बरसात करायची याची जुळणीही चालू झाली असेल. तंबोरे गवसणीत गेले असले तरी अंगभूत लय आपल्याबरोबरच नेणार होते त्यामुळे साथ कोणाची हा तसा प्रश्न नव्ह्ताच. प्रयाणाची तयारीही चालू झाली होती. अनेकानेक सहकारी, साथीदार त्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला येऊन जात होते. प्रभा अत्रे यांच्यासारख्या किराणा मार्गाच्या सहप्रवासी आल्या, उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्यासारखे सहप्रवासी विद्यार्थी आले होते, अमजद अली खां आले, इतरही कलाकार मंडळी येत होतीच. प्रवासाला जाताना सामान्यपणे काही शिदोरी घेऊन जायची पद्धत असते. निरोप देणार्‍याने ती द्यायची असते. पण खुद्द देवालाच तुम्ही काय शिदोरी देणार? उलट त्यानेच जाण्यापूर्वी तुमच्या-आमच्यासाठी प्रचंड वारसा ठेवून दिला आहे. याच्या आधारे जगण्याचे आनंदनिधान व्हावे इतका. त्यांचा पूरिया धनाश्री आहे, एकमेवाद्वीतीय असा आसावरी तोडी आहे, 'करीम नाम' सारखी अजरामर बंदिश आहे, कलाश्री आणि ललत-भटियार सारखा याच भूतली निर्माण केलेला वारसा आहे, मालकंस रुंजी घालतोय, मारव्याचे हळवे सूरही आसमंती भरून राहिले आहेत,विस्मयचकित करणार्‍या विलक्षण ताकदीच्या काही ताना सणाणून सुटल्या आहेत, देसच्या धीरगंभीर स्वरात राष्ट्रभक्तीचे एक गीतही तरंगत येते आहे आणि या सार्‍यांबरोबर आता एका करूण भैरवीचे सूरही ऐकू येत आहेत. ही भैरवी खरंच कुणी गातंय की आपला भास आहे हा? असा संकेत आहे की भैरवी ही मैफलीच्या अंताची सूचक असते. म्हणून येताहेत का हे भैरवीचे सूर? पण मग भैरवी हा सकाळचा राग, भास्कराच्या अस्ताच्या वेळी कोण गातंय? बंद करा ते गाणं. म्हणे 'स्वरभास्कराचा अस्त'. मूर्ख कुठले. ठाऊक नाही का, भास्कराचा अस्त झाला तरी तो पुन्हा येतोच, मधली एक रात्र सुखरूप पार पडावी लागते इतकंच. तसा तो येईलच. 'कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा' असे विचारताना कदाचित 'पहा उदेला दिव्य गोल हा' असे म्हणत ते सूर पुन्हा सणाणत येतील नि आसमंत पुन्हा उजळून जाईल. हे घडेलच कधीतरी, नक्कीच घडेल. पण तोपर्यंत आता त्या रस्त्याने जाणे नाही. त्या देवालयात देव नाही, निव्वळ रिकामा गाभारा आहे तिथे दर्शन तरी कशाचे घ्यावे, नाही का?

.

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

24 Jan 2011 - 3:41 pm | छोटा डॉन

धन्यवाद रमताराम !
ह्या लेखाद्वारे आपण पंडितजींना उत्तम आदरांजली वाहिली आहे असे म्हणतो, लेखातील भावनांशी सहमत.

- छोटा डॉन

पंडीतजींना विनम्र श्रद्धांजली!

एके काळी 'सवाई'च्या रात्री सरू नयेत असं वाटायचं, आणि शेवटच्या दिवशी पहाटे पंडीतजींच्या मैफिलीची उत्सुकताही असायची! 'सवाई' म्हणजे पंडीतजींची सुरांची खाण! ज्या ताकदीने आणि समर्पणभावनेने त्यांनी आणि त्यांच्या सुहृदांनी 'सवाई गंधर्व महोत्सव' नावाचा जो स्वरांचा महायज्ञ चालवला त्याबद्दल त्या सर्वांचेच आपण कायमचे ऋणी राहू!

लेखातील भावनांशी सहमत असलो तरी सखेद नमूद करु इच्छितो की आता सवाईच्या रात्रीही राहील्या नाहीत आणि पंडीतजीही, आणि हे सत्य अतिशय कटू आहे.

--असुर

आज सकाळीही आम्ही देवळात गेलो, अखेरचे! मैफल संपवून निवांत पहुडलेल्या देवाच्या चेहर्‍यावर मैफलीची एक सफल सांगता झाल्याची चित्कळा पसरली होती.

ररा, अंगावर काटा आला. खरंच उत्तम आदरांजली वाहिलीत.

म्हणे 'स्वरभास्कराचा अस्त'. मूर्ख कुठले. ठाऊक नाही का, भास्कराचा अस्त झाला तरी तो पुन्हा येतोच, मधली एक रात्र सुखरूप पार पडावी लागते इतकंच. तसा तो येईलच.

लेखातील भावनांशी सहमत.

तेजोनिधीस आदरांजली.

स्पा's picture

24 Jan 2011 - 4:28 pm | स्पा

र रा

__/\__

धन्यवाद

स्वानन्द's picture

24 Jan 2011 - 4:04 pm | स्वानन्द

धन्यवाद, रमताराम!

आमोद's picture

24 Jan 2011 - 4:05 pm | आमोद

बातमी एकल्या नंतर मनात अनेक भावना ऊचंबळून आल्या होत्या. सेरभेर झालेल्या मनाला तुम्ही लिहिलेले वाचून थोडी शांती मीळाली.

धन्यवाद

स्वरयोगी भक्त
आमोद

विकास's picture

24 Jan 2011 - 6:32 pm | विकास

बातमी एकल्या नंतर मनात अनेक भावना ऊचंबळून आल्या होत्या. सेरभेर झालेल्या मनाला तुम्ही लिहिलेले वाचून थोडी शांती मीळाली.

धन्यवाद

अगदी हेच म्हणावेसे वाटले. धन्यवाद!

बाकी सुर्याचा अस्त होत नसतो, तो स्थिरच आहे. आपण (पृथ्वीबरोबर) त्याच्या भोवती फिरत असतानाचा तो नसण्याचा एक काळ असतो इतकेच काय ते वास्तव. मात्र आपण आणि पंडीतजी तंत्रज्ञानाच्या युगात जन्माला आल्याने, आपण सुदैवी आहोत. कारण, हे लिहीत असताना देखील मागे त्यांचा आवाज आणि सकाळच्या प्रहरी "जय जय राम कृष्ण हरी" हे ऐकू शकत आहे.

अतिशय प्रसंगोचित, हळवी श्रद्धांजली.

धन्यवाद..

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. ते पुन्हा तो स्वर्गीय आवाज घेऊन येवोत. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी..

योगी९००'s picture

24 Jan 2011 - 4:21 pm | योगी९००

पंडीतजींना श्रद्धांजली!

हा लेख म्हणजे पंडितजींना उत्तम आदरांजली ..!!

देव देव्हारात नाही...देव नाही देव्हार्‍यात.. हे आठवले..

र रा

हा लेख म्हणजे पंडितजींना उत्तम आदरांजली ..!!

विसोबा खेचर's picture

24 Jan 2011 - 5:34 pm | विसोबा खेचर

रमताराम, आपल्या भावनांशी सहमत..

खूप आठवणी आहेत अण्णांच्या. त्यांचं गाणं, त्यांचा लाभलेला सहवास.. सर्व काही खूप सुख-समाधान देऊन गेलं. आता फक्त आठवणी आहेत..

पोरकेपण आलं एवढं मात्र निश्चित..

अजून बरंच काही लिहिण्यासारखं, परंतु या क्षणी शब्द नाहीत..

अण्णा, आठवण असू द्या आमची..

तुमचाच,
तात्या.

टुकुल's picture

24 Jan 2011 - 5:44 pm | टुकुल

धन्यवाद रमताराम..

योग्य शब्दात पंडितजींना श्रद्धांजली वाहिली.. वाचता वाचता अंगावर काटा आला.

--टुकुल

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jan 2011 - 6:39 pm | बिपिन कार्यकर्ते

पंडितजींच्या तोलामोलाची श्रद्धांजली!

धन्यवाद रमताराम.

-रंगा

स्वाती दिनेश's picture

24 Jan 2011 - 7:58 pm | स्वाती दिनेश

अतिशय भावपूर्ण श्रध्दांजली.
हेच म्हणते,
स्वाती

गणपा's picture

24 Jan 2011 - 9:04 pm | गणपा

अतिशय भावपूर्ण श्रध्दांजली.

असच म्हणतो.

अवलिया's picture

25 Jan 2011 - 8:30 am | अवलिया

असेच म्हणतो

५० फक्त's picture

24 Jan 2011 - 8:04 pm | ५० फक्त

स्वरभास्कराला अतिशय भावपुर्ण श्रद्धांजली या पेक्षा जास्त लिहुच शकत नाही.

हर्षद.

सकाळी उठल्या उठल्या बातमी वाचली...आणि मन सुन्न झालं.....
'सवाई'च्या अनेक रात्री आणि पंडितजींचं गाणं आठवलं......पुन्हा तो मारवा श्री (बंगरी मोरी मूरत)....भैरव...सारंग... .जोगकंस...मल्हार (सखी शाम मन)...दरबारी...पूरिया....मालकंस(पग लागन..., रंग रलिया करत) आणि भैरवी (जमुना के तीर.., कान्होबा तुझी घोंगडी...) आठवले.....पंडितजींनी अजरामर केलेल्या अनेक चीझा आठवल्या...गाणं सुरू होण्याआधी एका सुरात लावलेले सहा तंबोरे आणि मैफिलीच्या पहिल्या दहा सेकंदात लाखो श्रोत्यांना जिंकून घेणारा सामर्थ्यशाली स्वर आठवला......
माझ्या वडिलांची आणि तशीच पुण्यातल्या असंख्य लोकांची वर्षानुवर्ष न चुकता सवाई-वारी आणि 'भीमसेन-भक्ती' आठवली.....
'पुर्वीचं पुणं' वगैरे लिहिण्याएवढं माझं वय नाही, पण ज्या लोकांमुळे पुण्याला स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरच्या काळात 'सांस्क्रुतिक राजधानी'चं स्वरूप आलं असे जवळपास सगळेच थोर लोक काळाने आपल्यापासून ओढून नेल्याचं दु:ख झालं...

प्राजु's picture

24 Jan 2011 - 8:42 pm | प्राजु

काय बोलू!!
____/\_____

सुचत नाहीये....
खूप.. खूप.. सुरेख श्रद्धांजली.. अगदी मनापासून.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jan 2011 - 8:06 am | llपुण्याचे पेशवेll

रमतारामा सर्वांच्या भावना नेमक्या पकड्ल्यास बघ शब्दांमधे.
:(

गुंडोपंत's picture

25 Jan 2011 - 11:12 am | गुंडोपंत

सुंदर आदरांजली.