आजी-माजी संमेलनाध्यक्षांची ग्रंथनगरीकडे पाठ..

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
30 Dec 2010 - 10:04 pm

आजपर्यंत मराठी साहित्यिकाच्याच बाबतीत जे विधान केले जात होते ते आता संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतही करावेसे वाटते. दिनांक २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३०वाजता ग्रंथदिंडी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचली. त्यावेळी सपट परिवार लोकमानसचा चर्चेचा कार्यक्रम मुख्य मंडपात नुकताच संपला होता. चर्चेत डॉ. द.भि. कुलकर्णी हेही सहभागी होते. त्यामुळे ते त्याच मंडपात होते. ते ग्रंथप्रदर्शनासाठी येणार आहेत काय हे पहायला मी गेलो. तोपर्यंत त्यांना कोणी चहा दिला नव्हता. म्हणून चहाची ऑर्डर द्यायला मी मंडपाच्या बाहेर आलो खरा...! पण त्याचवेळेस श्री. उत्तम कांबळेसाहेब ग्रंथदिंडी घेऊन पोहोचले सुद्धा. द.भि. कुलकर्णींना बोलावले गेले. ते तसेच मंडपातून त्यास्थळी आले. कांबळे आणि कुलकर्णी मिळून लाल फीत सोडून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करणार होते. मिडियावाल्यांचे कॅमेरे सरसावले गेले. फीत सोडून उद्घाटन झाले. टाळ्या वाजल्या. पटापट शंभरएक फोटो निघाले. चला, आता दोघेही प्रथेप्रमाणे ग्रंथप्रदर्शनात येणार अशी माझी भावना होती. मात्र, बाहेरच असलेल्या एका स्टॉलवरच्या एका पुस्तकाचे प्रकाशन दभिंनी त्या स्टॉलवरच केले. १० फोटो झाले. त्यानंतर त्या गर्दीतून वाट काढत श्री. कांबळे कसेबसे त्या स्टॉलमध्ये पोहोचले. मात्र, सर्व फोटो झाल्यामुळे सर्वजण बाहेर पडले. चला, आता पुढील स्टॉलवर दोघे जातील असे वाटले. पण, झाले भलतेच!
महिला साहित्यिकांनी दभि आणि कांबळे यांना प्रकाशन मंचावर बोलावले. तेथे काही भाषणे झाली. पुन्हा फोटोसेशन. सर्वांनी आपापली हौस भागवून घेतली. आता त्यानंतर तरी ज्या ग्रंथनगरीचे उद्घाटन केले तेथे हे दोघे जातील असे वाटले. पण नाही. मंचावरून कांबळे खाली उतरले. मात्र दभि वरच होते. तेथे त्यांची मुलाखत सुरू झाली. एक चॅनल झाले कि दुसरे. दुसरीकडे कांबळे एक-दोन मिनिटे एकटेच दिसले. त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी मी गेलो. तेवढ्यात एक चॅनलवाला पुन्हा आडवा आला. त्याने श्री. कांबळे यांना बाजूला बोलावले. कॅमेरा सरसावला. मुलाखत सुरू झाली. जशी मुलाखत सुरू झाली तसे गुळाभोवती मुंगळे जमा व्हावेत तसे लोक कांबळे यांच्या आजुबाजूला जमा झाले. अधून-मधून टाळ्याही पडत होत्या. त्या नेमक्या का पडत होत्या हे पहायला मी तेथे थांबलो नाही. कारण, पुढे काय होणार आहे हे मला माहीत होते. दभिंच्या मुलाबरोबर मी तेथेच पायरीवर गप्पा मारत बसलो. कांबळे यांची मुलाखत झाल्यावर ते निघून गेले. दभिंची मुलाखत झाल्यावर मी उठलो. आता दभि मोकळे झाले असे वाटले. पण पुन्हा ते कोणाबरोबरतरी निघाले. तोही चॅनलवालाच होता. त्याने मला सांगितले की दभिंची आता लाईव्ह मुलाखत आहे. त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. त्यावेळी साडेसात झाले होते. साडेनऊ वाजेपर्यंत सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते की काय करीत होते माहीत नाही.
मात्र, ज्या ग्रंथनगरीचे उद्घाटन या (सा)मान्यवरांच्या हस्ते झाले ते फक्त आपल्या प्रसिद्धीशिवाय दुसरे काहीच बघू शकत नाहीत की काय असे वाटते. साहित्यिकांना आपली पुस्तके काढायला प्रकाशक लागतात. मात्र त्या प्रकाशकांसाठी थोडा वेळ द्यावासाही त्यांना वाटत नाही.
दुसरीकडे दुकान मांडून बसलेल्या प्रकाशकांना साहित्याशी काहीच देणेघेणे नसते. फक्त आपली पुस्तके कशी प्रसिद्ध होतील एवढेच त्यांना हवे असते असे दिसले. एकंदरीतच अशी संमेलने भरतातच कशाला? असे वाटल्याखेरीज राहिले नाही.
संमेलनात आणखी बर्‍याच उणीवा दिसल्या. त्या नंतर सांगेन.

साहित्यिकअनुभव

प्रतिक्रिया

आता इ संमेलन होणार आहे ज्याचा प्रमुख उद्देश इ सारस्वतांना मार्गदर्शन व व्यासपीठ मिळणे हा आहे.
.मतकरी बहुदा अध्यक्ष आहेत .तेव्हा चिंता कार्यशी गरज नाही
.भले सर्व इ साहित्यिक हे प्रस्थापित सारस्वतांच्या इतके प्रगल्भ नसतील हि
.(प्रस्थापित असतात प्रगल्भ हे गृहीत धरायचे असते )
पण त्यांचे साहित्य हे सामान्य माणसाचे अनुभव /इच्छा/ आकांशाची फलश्रुती असते .
त्यामुळे भविष्यकाळात इ स्वरास्वतांना पर्याय नसणार .

मीही एक दिवस या साहित्य संमेलनाला उपस्थित होतो.
एक दिवसात प्रकर्षाने जे जाणवले ते सांगू इच्छितो -
१. पहिला मुद्दा हाच की ठाणेकर/ मुंबईकरांची या संमेलनाच्या तीनही दिवसात असलेली अनुपस्थिती. एकीकडे मराठीच्या नावाने गळे काढायचे आणि द्सरीकडे मात्र सहभागाच्या नावाने बोंब... सर्व चैनलवाले याच मुद्द्यावरून खासगीमध्ये शंख करीत होते.. क्यामेरा फिरवायचा कुणावरून? लोकच नाहीत..
२. दुसरी गोष्ट अशी जाणवली की मराठी साहित्य विश्व हे अत्यंत छोटेसे आहे; कदाचित नसेलही, पण या साहित्य संमेलनातून ते नक्कीच जाणवले... नामवंत साहित्यीकांना निमंत्रण पत्रिकाच पोहोचल्या नव्हत्या.. त्यामुळे बरेच लोक अनुपस्थित होते..
३. तिसरी गोष्ट हीच की या प्रकाराला "संमेलन" म्हटले जात असले तरी त्यात काहीही जान नव्हती - प्रकाशकांना साहित्यीकांशी काही देणे-घेणे नाही - उपस्थितांनाही स्टेजवर जे काय चालू आहे त्याच्याशी काही देणे घेणे नाही.. प्रत्येकजण फक्त टाईमपास साठी आल्याचे दिसत होते.. इव्हन मुख्यमंत्रीदेखील..
४. मूळ ठाण्यातील संमेलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते सोडले तर इतर सामान्य लोकांना असा काही प्रकार ठाण्यात चालू आहे हेच माहित नव्हते - एका शुध्द मराठी बोलणार्या पोराला दादोजी स्टेडीयम कुठे आहे, तिथे साहित्य संमेलन सुरू आहे ते स्टेडियम कुठे आहे असे विचारले तर त्याला साहित्य संमेलन म्हणजे काय तेच माहित नव्हते ... एक रिक्षावाला पकडला तर तो म्हणे, "इधर क्या आज बडी शादी है क्या? बहोत पुलिस दिख रही है.. " ... आमचा एक मित्र त्याला म्हणाला " उत्तम कांबळे की शादी है... तीन दिन की.."

नगरीनिरंजन's picture

31 Dec 2010 - 9:08 am | नगरीनिरंजन

ग्रंथनगरीकडे पाठ फिरवली तर काय झाले? आजी-माजी अध्यक्ष काय पुस्तके वाचण्यासाठी अध्यक्ष झाले? अध्यक्ष होऊनही चमकोगिरी करायची नाही तर कधी करायची?
शिवाय तंबी दुराईंचे एक हाफ वाचून ग्रंथनगरीत नेहमीप्रमाणेच कोणत्या 'ग्रंथांची' चलती असणार याची कल्पना आलीच होती.

चिरोटा's picture

31 Dec 2010 - 11:05 am | चिरोटा

आजचा मेनु काय आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

31 Dec 2010 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार

या संमेलनांना 'सहित्य संमेलन' का म्हणत असावेत ?

वेताळ's picture

31 Dec 2010 - 11:14 am | वेताळ

अश्या बातम्या वाचल्या कि मनाला खुप क्लेष होतात. बातमी वाचल्यामुळे ३१ डिसेंबरचा मुड गेला.

मराठीचे भवितव्य अंधारात आहे ह्याची जाणीव झाली.

अवलिया's picture

31 Dec 2010 - 12:22 pm | अवलिया

अध्यक्ष होणारी साहित्यिक मंडळी माणसेच असतात. त्यांच्यातला पत्रकार आणि राजकारणी त्यांच्यातल्या साहित्यिकावर मात करतो हे आपले दुर्देव !