शोध - एका हरवलेल्या प्रश्नाचा

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
26 Dec 2010 - 12:15 am

नितीननं तारवटलेल्या डोळ्यानी घड्याळाकडं बघितल. सकाळचे सहा वाजून गेले होते. प्रोग्रॅमचे रिझल्ट परत एकदा तपासले, खूष झाला, दोन नाइटऑउटस सार्थकी लागल्या होत्या. असाइनमेंट सबमिट केली. मनातल्या मनात विचार केला. थोडी झोप घेवूयात आता, बाकीच्या विषयांचा सबमिशनही येइल एक दोन दिवसात. असा विचार करून लॅबमधून बाहेर पडू लागला तोच कॅलेंडरवर नजर गेली. आज तारीख २६ जानेवारी २००१. लगेच लक्षात आला अजून दिड एक तासानी झेंडावदन असेल. प्लॅन बदलला. हॉस्टेलवर गेला. छान आंघोळ केली. थोडा वेळ टीव्ही रूममध्ये काढला. साडेसातला मेसमध्ये जावून नाष्टा केला आणि ७:५५ ला स्वारी स्वारी कार्यक्रमाला हजर.
डायरेक्टरच भाषण : " This is one of the finest research institutes in country. We have supported and continue to support many scientific projects for the government and industry. Though the institute offers you the freedom and resources to explore frontiers of your interest, we need to keep in mind that our work should also help in resolving impending problems around us!" गेल्या कित्येक वर्षात भाषण देणारे आणि ऐकणारे बदलले आहेत पण भाषणाचा सारांश काहीसा असाच राहिला आहे.
कार्यक्रम आटपून नितीन रूमकडे जावू लागला. रस्त्यात त्याला "भारत माताकी जय" अशा घोषणा देत चाललेल्या लहान वीरांचा एक घोळका दिसला. इनस्टीट्युटच्या परीसरातच एक सरकारी शाळा आहे. त्यांचा झेंडावदनाचा कार्यक्रम संपला होता. म्हणून ही बच्चे मंडळी खूष होवून निघाली होती. पण इथं एक विरोधाभास होता. त्यातली बरीच मुलं अनवानी चालली होती. काही जणांचे कपडेही धड नव्हते. रूमवर आला. गादीवर अंग टाकलं. थकवा तर प्रचंड आला होता. पण डायरेक्टरच्या भाषणातलं शेवटच वाक्य आणि ती शाळकरी मुल डोक्यात धुडगुस घालत होती. बराच वेळ विचार केला. शेवटी ठरवलं उद्या एकदा त्या शाळेत जावून यायचच. आणि कसाबसा झोपी गेला.
दुसर्या दिवशी शाळेत जावून थोडी माहीती काढली. बहुतांशी इनस्टीट्युट्च्या नानटीचिंग स्टाफची मुलं आणि आजूबाजूची गरिब मुलं त्या शाळेत येत होती. शाळेत शिक्षकही पुरेश्या संख्येत नव्हते. प्रयोगशाळा नव्हती. एकीकडे सर्व सुविधांनी परीपूर्ण रीसर्च इनस्टीट्युट तर दुसरीकडे त्याच आवारात अशी ही केविलवाणी शाळा. हे काही त्याला सुखासुखी पटेना. झटपट लॅबमध्ये गेला. एक ब्रॉडकास्ट मेल केली. काही प्रिंटआवूट्स काढून मेसच्या बाहेर लावल्या. रात्रीच्या जेवणानंतर त्यानं एक मीटींग बोलावली होती. चांगले चाळीस लोक आले अर्थातच सगळेच इंटरेस्टेड होते अस नाही. आणि बरेच लोक एकमेकांना ओळखतही नव्हते. त्यामुळे पाच एक मिनिट ओळख संमारंभात गेली. नितीनने त्या शाळेबाबतची त्याची निरिक्षणं सर्वांना सांगितली. सर्वांना त्या मुलांबद्दल सहानुभुती होती. नितीननं घोषणा केली- " आपण ह्या संदर्भात काही तरी केलं पाहिजे. तुम्हाला काही सुचतय का बघा. उद्या विचार करून या. मग चर्चा करून काय ते ठरवू". दुसर्या दिवशी अर्ध्याहून अधिक लोक गायब झाले होते. बर्याच जणांच्या हे लक्षात आलं की शिक्षक असन गरजेच होत पण आणनार कोठून? नितीन म्हणाला- " आपणच जर त्यांना शिकवायला चालू केलं तर?" अनिलनं नापसंती दाखवली -" बर्याच वेळा आपल्या स्वत:च्या असाईन्मेन्ट्साठी वेळ मिळत नाही, मग ही लाँग टर्म कमीट्मेंट कशी करणार. आणि समजा आज आपण तयार झालो पण पुढच्या वर्षी हा उपक्रम बंद पडला तर त्याचा काय फायदा?" त्याच म्हणन खरं होतं पण एकाचवेळी सर्वजण व्यस्त असतात अस मात्र नव्हत. काही लोकांचं कोर्सवर्क संपल होतं. त्यामुळे कामाचे तास वाटून घेता येणार होते. मग आठवड्यात फार तर दोन तास काम करायला लागल असतं प्रत्येकाला. आणि गाईड्ला विचारून कधी कधी मुलांना इनस्टीट्यूट्च्या प्रयोग शाळेतही आणायला परवानगी काढता आली असती. शेवटी अनिलही तयार झाला.
विचार पक्का झाला, पाच एक लोक शेवटी तयार झाले. दुसर्यादिवशी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून आले. त्यांनी शाळा संपल्यानंतर संध्याकाळी एक तास मुलांना त्यांच्याबरोबर रहायची परवानगी दिली. आणि काम चालू झाल. पण सगळ्च सुरळीत होत होतं अस नाही. दोन मोठ्या अडचणी होत्या. लहान मुलांना शिकवण ही महाकठीण काम असत हे लक्षात आलं आणि दोन शाळा संपल्यानंतर एक तास रोज थांबण त्यांच्या जीवावर येत होत. ह्याला एकच उपाय होता ते म्हणजे शि़कण्याची पद्धत सोपी करायची, पण त्याचा फारसा अनुभव कुणाला नव्हता. हेड फेकिंग वर जी काही माहिती इंटरनेटवर मिळेल त्याचा उपयोग करून जमेल तशी सुधारणा होत गेली. मुलांना सायन्स म्युझियमला नेणं, कधी कधी त्यांच्या बरोबर खेळण अशी चालढकल करत हा उपक्रम राबवला जाउ लागला. आणि थोडीफार सुधारणा झाली. दोन एक महिन्यात स्वयंसेवकांची संख्याही वाढली.
सहा महिने संपले. निकाल लागले. नितीनच्या गटातले काही स्वयंसेवक पासआउट होवून निघून गेले. मग नवीन आलल्या विद्यार्थ्यांमधून नवीन स्वयंसेवक मिळाले. त्यामुळे आता उपक्रम बंद होण्याची शक्यता नव्हती. पण अजून काही अडचणी होत्या. एकतर बर्याच मुलांकड लिहायला वह्या पेन नव्हती. आणि ह्यावार काही तरी तोडगा काढण गरजेच होतं. पण परत तेच प्रश्न समोर होते. ह्यात किती वेळ द्यायचा आणि जे काही करू ते सस्टेनेबल आहे का? ह्यावेळी अनिलन पुढाकार घेतला. परत प्रिंटाआवूट्स काढल्या गेल्या. स्वयंसेवक बोलावण्यात आले. आणि ठरल की मेसच्या बाहेर बसून वर्गणी गोळा करायची. योजना दोन दिवस राबवण्यात आली. बर्यापैकी पैशे जमले होते. बाजारात जावून त्या पैशात जे काही मिळेल ते ट्रक मध्ये भरून सामान आणलं आणि मुलांना वाटलं. हव ते सर्व मिळालच अस नाही. पण काहीच नव्हत, त्यापेक्षा बर. आता हा कार्यक्रम इनस्टीट्यट्मध्येच बराच लोकप्रिय झाला होता.
पुढच्या वर्षी गरजेपेक्षा जास्ती वर्गणी मिळाली. त्याचं काय करायचा हा प्रश्न होता. थोडी चर्चा केल्यावर अस लक्षात आलं की शहरात आणि आजूबाजुला काही गरजू शाळा असतील त्यांना वह्या पुस्तक द्यायची. मग काही शाळांना भेट देवून त्यातला काही शाळा निवडण्यात आल्या. त्यांना मदत पोचवली गेली. त्यानंतर दरवर्षी वर्गणीचा आकडा फुगत गेला आणि शाळांची संख्याही वाढत गेली. पण तेवढे स्वयंसेवक आणि वेळ नसल्यामुळे इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली. आज हा उपक्रम जवळपास वीस शाळांना मदत करतो आणि इनस्टीट्युटमधील शाळेत शिकवणही चालू आहे.
उपक्रम चालु करणारे आज इनस्टीट्युट्मधून निघून गेले, पण योजना चालू आहेत. आपल्या अवती भवती असे अनेक प्रश्न असतात. त्याबद्द्ल आपण चर्चा करतो, उत्तरही माहित असतात बर्याचवेळा. पण एक प्रश्न विचारायचा राहून जातो -" मी काय करू शकतो?"

अवांतर : लेखातल्या लोकांची नाव काल्पनिक आहेत, पण नावान काय फरक पडतो. नावापेक्षा संकल्पना म्हत्वाची नाही का? अशा ह्या अनामिक नितीन आणि अनीलला सलाम करून मिपाचा निरोप घेतो. मिपाकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा :)

कथालेख

प्रतिक्रिया

शुचि's picture

26 Dec 2010 - 12:28 am | शुचि

खूप छान कथा.
_________________________
मी एक पाहीलं आहे, आपण काय करू शकतो हे जितकं महत्त्वाचं तितकाच आपला जनसंपर्क (नेटवर्कींग) महत्वाचं असतं. जर आपल्यात नेतृत्व गुण असतील तर त्याचा उपयोग करून जरूर लोकं जमवून दिशा द्यावी.
मला १० वर्षापूर्वी खूप काही करावसं वाटत असे - पण एकटं करणार काय आणि किती? मी प्रयत्न केला मग सोडून दिलं. शेवटी फक्त रोज एक पोळी-भाजी प्लास्टीकच्या पिशवीत घालून न्यायचे आणि रस्त्यात आलेल्या पहील्या भुकेल्या भिकार्‍याला द्यायचे.
____________________________
रन्गराव मिपाचा निरोप का बरं घेता?
आपल्यालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

राजेश घासकडवी's picture

26 Dec 2010 - 12:31 am | राजेश घासकडवी

एका उत्तम उपक्रमाची ओळख करून दिल्याबद्दल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे " मी काय करू शकतो?" हा प्रश्न विचारण्याची आठवण करून दिल्याबद्दल. हा प्रश्न विचारला व त्यातून थोडी हालचाल सुरू केली तर मोमेंटम वाढून कसं व्यापक स्वरूप निर्माण होऊ शकतं याचं छान उदाहरण आहे. नितीन व अनिलला सलाम.

मला वाटतं की मिपावर होणाऱ्या अनेक चर्चांत काही वेळ जरी या प्रश्नाला दिला तरी खूप लोकांच्या विचार करण्यात बदल होईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Dec 2010 - 6:17 am | निनाद मुक्काम प...

कथा कल्पना आवडली .
मग एकदा अमेरिकेतील लहान अनिवासी मराठी मुलीने आपल्या वडिलांच्या स्वतः न पाहिलेल्या कोकणातील गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही व त्यांना पाण्यासाठी वण वण भटकावे लागते .असे वर्णन आपल्या वडिलांकडून एकले तेव्हा .त्यामुळे तिने पैसे जमा करून भारतात येऊन गावात कुपनलिका बसवली .खरच असे काही कार्य करताना पहिले कि देव देव्हार्यात नाही ...ह्या गाण्यातील बोलाची सत्यता उमजते .

नगरीनिरंजन's picture

26 Dec 2010 - 6:39 am | नगरीनिरंजन

उत्तम विचार. मी काय करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारला आणि मिळालेल्या उत्तराप्रमाणे कृती केली त्या लोकांना अभिवादन!

स्वानन्द's picture

26 Dec 2010 - 9:17 am | स्वानन्द

छान. उत्तम आणि संयत मांडणी.

>>बर्याच वेळा आपल्या स्वत:च्या असाईन्मेन्ट्साठी वेळ मिळत नाही, मग ही लाँग टर्म कमीट्मेंट कशी करणार. आणि समजा आज आपण तयार झालो पण पुढच्या वर्षी हा उपक्रम बंद पडला तर त्याचा काय फायदा?

खरं आहे. मुळात काही करावं असं वाटणारे कमी, त्यातून ज्यांना करावंसं वाटतं त्यांना सगळ्यांनाच काय करावं हे सुचत नाही, ज्याना सुचतं त्या सगळ्यांनाच कसं करावं हे समजतंच असं नाही आणि ज्यांना काय आणी कसं करावं हे सुचतं त्यातले बरेच जण हा वरचा long term commitment चा प्रश्न उभा राहिल्याने माघार घेण्याचे चान्सेस फार !

सूर्यपुत्र's picture

26 Dec 2010 - 1:17 pm | सूर्यपुत्र

काहीतरी करावेसे वाटणे आणि त्याप्रमाणे कॄती करणे हे महत्त्वाचे.
'मी काय करू शकतो' या प्रश्नाला खूप छान उत्तर दिले आहे. या संकल्पनेला आणि अशा अनामिक नितीन आणि अनीलला अभिवादन.

लेखकालाही (आणि या मिपातलावरील सर्वांना) नववर्षाच्या भरपूर शुभेच्छा.

डावखुरा's picture

26 Dec 2010 - 11:06 pm | डावखुरा

छान कल्पना आहे रंगराव...
स्वदेश सुद्धा अशाच कल्पनेवर आधारित आहे असे वाटते...

तुम्ही मिपावरुन निरोप का घेत आहात?

प्राजु's picture

27 Dec 2010 - 12:20 am | प्राजु

कथा सुंदर आहे , माडणी ही उत्तम आहे.

या नितिन आणि अनिल ला खरंच सलाम!