चोरटा मुरारी - गौळण

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Dec 2010 - 10:54 am

चोरटा मुरारी - गौळण

शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी
सांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥

शेला पागोटा काठी हातात
अवचित येवुनिया घुसतो घरात
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी
बांधा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥

यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी
पकडाया जाता, होतो फ़रारी
चव हा चाखी, ओठ हा माखी
टांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥

व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी
अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी
कमरेशी बांधा, पायाशी टांगा
कोंडा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥३॥

गंगाधर मुटे
............................................................
१९८०-८५ च्या सुमारास लिहिलेली गौळण
...........................................................

कविता

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 2:53 pm | मेघवेडा

वा! मस्तच!

मस्तच वाटले गीत गायला ..
आताच पाषाणभेदांचे गाणे गुनगुनलो आणि त्याच चालीवर हे पण म्हंटले

आवडले एकदम जबरदस्त

प्राजु's picture

9 Dec 2010 - 9:02 pm | प्राजु

सुंदर आहे गवळण!

खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी

इथे खिडक्या आणि काचा?? .. थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं!

गंगाधर मुटे's picture

10 Dec 2010 - 8:17 am | गंगाधर मुटे

खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी

गवळणीच्या घरात कृष्ण खिडक्या तोडूनच घुसायचा.
पण त्याकाळी खिडक्यांना काचा होत्या की नाही, माहीत नाही.

पण ही गौळण मी वयाच्या १५-१६ व्या वर्षी लिहिली. तेव्हा तेवढा विचार केलाच नाही.
यासारख्याच अनेक चुका या गौळणीगीतात असणारच.
म्हणूनच मी '१९८०-८५ च्या सुमारास लिहिलेली गौळण' असा उल्लेख करतो आहे.

नितिन थत्ते's picture

9 Dec 2010 - 9:20 pm | नितिन थत्ते

हिंदूंच्या एका महत्त्वाच्या देवाला चोरटा म्हटल्याबद्दल तीव्र निषेध.

हिंदूंच्या देवाला नावे ठेवणारे कवी "विचारवंत" दिसतात. ;)

भगवान श्रीकृष्णांना बांधा, टांगा, कोंडा वगैरे म्हणणार्‍या कवीलाच उलटे टांगून मिरचीची धुरी द्यायला हवी.

गंगाधर मुटे's picture

9 Dec 2010 - 10:44 pm | गंगाधर मुटे

भगवान श्रीकृष्णांना बांधा, टांगा, कोंडा वगैरे .

हे काही मी पहिल्यांदा म्हटलेले नाही. संत एकनाथ तर बरेच काही बोलून गेले. त्यांना धुरी कशी देणार?

पण साक्षात श्रीगणेशाला कविंनी वाकड्या तोंडाच्या, ढेरपोट्या वगैरे बरेच काही म्हटले हो. संदर्भ- वक्रतुंड महाकाय किंवा लंबोदर वगैरे.

घ्या उठाव. हम तुम्हारे साथ है. :)

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 6:30 am | नरेशकुमार

गंगाधर सायेब दिलपे मत लेयो. ये तीर कहि और फेकेला लगताय मेरेको. तुमी काय टेन्शन घेउ नका.

स्पंदना's picture

10 Dec 2010 - 8:56 am | स्पंदना

मागच्या ही गौळणीत ' अरविंद' हा उल्लेख होता.

दोन्ही रचना छान आहेत.

गंगाधर मुटे's picture

10 Dec 2010 - 9:36 am | गंगाधर मुटे

मागच्या ही गौळणीत ' अरविंद' हा उल्लेख होता

आणि पुढच्या पण गौळणीत तो असणार आहे. :)

गौळण छानच!
पण द्वारकेचा उल्लेख खटकतो. :)

गंगाधर मुटे's picture

10 Dec 2010 - 12:10 pm | गंगाधर मुटे

या सर्वच गौळणींमध्ये बरेच शब्द असे आहेत की ते खटकतात. मी ज्या वयात हे लिहिले त्याचा तो परिणाम असावा.
पण बालवयातील रचना म्हणुन मी त्या आहे तश्याच ठेवल्या. कदाचित गरज भासलीच तर पुढे-मागे त्यात बदल करू.

धन्यवाद.