योगसाधना कुणाकडून आली आहे?

विकास's picture
विकास in काथ्याकूट
3 Dec 2010 - 10:58 pm
गाभा: 

गेल्या आठवडाभरात आधी न्यूयॉर्क टाईम्स मधे आणि पाठोपाठ टाईम्स ऑफ इंडीया मधे योगसाधना, ज्याला इंग्रजीत "योगा" असे म्हणले जाते त्याचे मूळ कुठले आहे आणि त्यावरून चालू झालेल्या "टेक बॅक योगा" चळवळीबद्दल बातम्या आल्या आहेत.

१८९३ साली विवेकानंद अमेरिकेत पहील्यांदा आले आणि त्यांनी योगसाधनेची ओळख या नवीन जगास करून दिली. त्यानंतर ज्याला चेटूक म्हणत हिणावले गेले होते, दुर्लक्षित केले गेले होते त्या "योगा" मधील आरोग्यसंवर्धनाचा उपयोग समजल्यावर त्याचा आरोग्यासाठी आणि धंद्यासाठी उपयोग करण्याचे प्रमाण तेजीत आले. आरोग्यविमाच्या कंपन्या आता योगाक्लब मधे जाणे हे preventive medication समजून त्यांच्या सभासदांना त्यासाठी प्रोत्साहन देऊ लागल्या आहेत. त्यात काही नवल देखील नाही.

कदाचीत स्वामी विवेकानंदांनंतर बिट्ल्सच्या योगसाधनेतील आकर्षणाने अमेरिकेचे लक्ष वेधले गेले. असे शिकवत असताना कधी कोणी "गर्वसे कहो योगा हिंदू है" असे देखील म्हणले नाही कारण तसा या संत-महर्षी-गुरूंचा आणि भारतीय संस्थांचा उद्देश देखील नव्हता. "आपणास जे जे ठावे, ते ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन" ह्या उक्तीप्रमाणे, अनेक अधुनिक योगमहर्षींनी आणि भारतीय संस्थांनी येथे योगसाधनेच्या प्रचारात योगदान केले. हे सर्व चांगलेच होते...

मात्र त्यानंतर दोन गोष्टी घडू लागल्या:

यातील धंदेवाईक काही योगासने पेटंट करण्याचा प्रयत्न करू लागले. त्याला उत्तर म्हणून भारत सरकारने देखील योग्य पाऊले उचलून १०० च्या वर योगासने पेटंट करणे चालू केले... (टाईम्स ऑफ इंडीयाच्या वरील दुव्यात ४००० योगासने म्हणले आहे)

दुसरा भाग हा धर्मकारण-राजकारणाशी संबंधीत आहे. आता काही जण टूम काढू लागले ज्याप्रमाणे थोडक्यात योगसाधना भारतातील नाहीच, असली तर त्याचा धर्माशी संबंध नाही आणि असला तर तो बुद्ध धर्माशी असेल... म्हणजे काही झाले तरी ह्याचा हिंदू संस्कृतीशी संबंध नाही हे दाखवण्याचा हा आटापिटा...

या संदर्भात न्यूजवीकच्या लिसा मिलर यांचा, "The Clash of the Yogis - Do the Hindu roots of yoga matter?" हा लेख पण वाचनीय आहे.

आता एक लक्षात असुंदेत की हे केवळ अमेरिकेपुरतेच मर्यादीत राहील का? अर्थातच नाही... बर्गर संस्कृती असुंदेत अथवा आयपॉड संस्कृती, ती विश्व व्यापणार असे किमान गेल्या शतकापासुनचे पुढच्या काही शतकांपर्यंतचे तरी चित्र रहाणारच आहे. म्हणजे आज अमेरिकन्स म्हणतात म्हणून उद्या तुम्ही आम्ही देखील "योगा योगा " करत नकळत मुळं विसरणार

योगाचे मुळ हिंदू संस्कृतीत आहे म्हणजे योगसाधना केवळ हिंदू आहे, अथवा हिंदूंचीच आहे अथवा पाव टाकलेल्या विहीरीतील पाणी प्यायल्याप्रमाणे त्यामुळे धर्मांतर घडणार आहे असे कोणी म्हणू इच्छित नाही. केवळ हिंदू मुळं म्हणून योगसाधना नाकारायची उद्या हिंदू म्हणणवर्‍या माणसास देखील दुर्लक्षयाचे असे होऊ शकते. म्हणजे आधी हळद, मग योगसाधना आणि नंतर अजून काही करत आपले चांगल्याचे श्रेय काढून लाटण्याचे प्रकार आहेत.

रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे योगासाधना करायाला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण्हून माहीती विचारली तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण योगसाधनेचे मूळ हिंदू संस्कृतीत आहे असे म्हणणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Dec 2010 - 11:17 pm | रेवती

कधीकधी वाय एम सी ए मध्ये योगासनांच्या वर्गाला मी हजेरी लावत असते.
९ वाजताची वेळ ही सांध्यांच्या दुखणेकरींसाठी ठरून गेल्यासारखी झाली आहे.
सगळे ७० च्या आसपासचे आजीआजोबा सुजलेली बोटे, न वाकणारी पाठ अश्या अवस्थेत येतात.
मेरीअ‍ॅनबाई ७० च्या आसपास असूनही तरूणांना लाजवतील अशी योगासने करतात व हा मुळचा भारतीय व्यायामप्रकार असल्याने शेवटी ओमकार म्हणून घेतात. "नमस्ते" म्हणून सांगता होते.
कधीतरी पिलाटेज लाही जाते. तो क्लास सुरु होण्याआधी त्याच खोलीत झुंबा नाच + व्यायाम चालू असतो. ते लोक पंजाबी गाण्यांचे संगीत वापरुन व्यायाम करताना पाहिले आहेत.
जर कुणी विचारले (बोलण्यात आले) तर मी सांगीन कि योगा हा भारतीय व्यायाम आहे. त्यांनी शंका उपस्थित केल्यास मी पटवून द्यायला जाणार नाही.

व्हरमाँट च्या चर्च स्ट्रीटवर एक योगसाधना शिकवणारी माझी मैत्रिण होती. ती एक अनवट वस्तूंचे दुकानही चालवत होती. तिच्या समजूतीप्रमाणे योगा हा ही भारतीयांची देण होती तिला हिंदू धर्माची विशेष आवड होती. तिच्याकडे नटराज, गणपती आदि मूर्ती होत्या ज्यात मी दत्तात्रेय आणि अतिशय सुरेख विठ्ठल-रखुमाईची भर तिला प्रेमाची भेट म्हणून घातली होती. ती योगा विशेषतः तिच्या युनिपोलर का बायपोलर डिसॉर्डरवर उपचार म्हणून शिकली होती. जेव्हा इतर दुकानदार बुद्ध धर्माच्या जास्त वस्तू ठेवत तेव्हा ती एकटी हिंदू धर्माच्या वस्तू ठेवत होती.

बाकी मला योगाबद्दल जास्त अनुभव नाही. हं मी कुंकू लावते त्याबद्दल प्रचंड कुतूहल आढळतं. मी शक्यतो अति खोलात जाऊन सांगत बसणं टाळते आणि फॅशन या नावाखाली वेळ मारून नेते.

पण जर कमी समूह असेल, वातवरण मैत्रीपूर्ण अथवा न्यूट्रल असेल तर मी प्रयत्न जरूर करेन हे ठसवण्याचा की योगसाधना ही चीन आदि देशांमध्ये एकाच वेळी अस्तित्वात आली असू शकेल (कारण जोपर्यंत मी पूर्ण अभ्यास करत नाही मी दुसर्‍या शक्यता कशा फेटाळू?) , पण माझ्या माहीतीनुसार भारतात तिचा उगम आहेच आहे. पातांजली योगसूत्रे म्हणून ग्रंथदेखील आहे.

बुद्ध धर्माचे म्हणाल तर , बुद्ध स्वतः हिंदू होता. पुढे त्याने नवा धर्म वाढवला. तेव्हा बुद्ध धर्माचा पाया हा हिंदू धर्मातच आहे असं मला वाटतं.

पंगा's picture

5 Dec 2010 - 12:59 pm | पंगा

बुद्ध धर्माचे म्हणाल तर , बुद्ध स्वतः हिंदू होता. पुढे त्याने नवा धर्म वाढवला. तेव्हा बुद्ध धर्माचा पाया हा हिंदू धर्मातच आहे असं मला वाटतं.

पाकिस्तानचे म्हणाल तर, मुहम्मद अली जीना हे स्वतः हिंदुस्थानी होते. पुढे त्यांनी नवा देश स्थापन केला. तेव्हा पाकिस्तानचा पाया हा हिंदुस्थानातच आहे, असे म्हणता येईलही कदाचित. (आणि per se त्यात निश्चित काही चूक आहेच, असेही नाही.)

मग?

आज या विधानाला काही अर्थ, त्याचा काही उपयोग आहे का?

'तुम्ही' भले काहीही म्हणा, 'त्यांना' जर 'तुमच्या'बद्दल 'एकत्वा'ची तर जाऊचद्या, 'बंधुत्वा'/'ममत्वा'चीही सोडा, पण 'समान पाया'चीही भावना नसेल, तर 'तुमचे' म्हणणे कोणत्या भावाने?

हां, आता 'त्यां'च्या प्रतिदाव्यांना 'तुम्ही' किती भाव द्यायचा, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. पण 'ते'ही 'आमच्या'तूनच उद्भवलेले (पक्षी: 'आमच्या'तलेच, किंवा 'आमच्या'सारखेच), अशा मूर्खांच्या नंदनवनात राहून आपलीच फसवणूक करण्याचेही काही कारण दिसत नाही. ('त्यां'नाही 'तुमच्या'बद्दल तशाच भावना आहेत का? आणि का असाव्यात? 'त्यां'च्याबद्दल - फरकांसहित - आदर राखणे ही एक गोष्ट. पण 'त्यां'ना 'तुमच्या'तलेच मानणे ही 'तुमची'च एकतरफी मानसिक गरज तर नाही ना? असली पाहिजे का? का असावी?)

शिल्पा ब's picture

4 Dec 2010 - 2:35 am | शिल्पा ब

हम्म, बर्याच गोष्टींवरून भारताचा हक्क नाकारण्याचे प्रयत्न जरी होत असतील तरी आपणच विरोध केला पाहिजे...जिथे कुठे असे दिसते तिथे मी स्वतः अशा लोकांशी बोलते अथवा इमेल पाठवून मत व्यक्त करते...आणि बहुतेक वेळा लोकांना समजते किंवा समजल्यासारखे दाखवतात किंवा प्रश्न विचारतात हे सुद्धा कमी नाही.

गम्मत म्हणजे ओर्कुटवर मी अशा विषयावर लिहिते तेव्हा प्रतिसाद खूपच कमी असतो. असो.

धनंजय's picture

4 Dec 2010 - 3:12 am | धनंजय

मूळ आसने पेटंट करू नये.

त्यात जर कोणी बदल केले असतील, किंवा वेगळीच कुठली आसने बनवली असतील, तर ते बदल पेटंट करता येतात की नाही? त्याबद्दल बहुतेक देशांत कायदे असावेत. त्यांच्यात खोट असली तर बदलले पाहिजेत.

हळदीवर पेटंट घ्या (दुवा). या पेटंटने हळदीचा "जखमा बरे करण्यासाठी उपयोग" पेटंट केला. हे तसे वाईटच. पेटंट ऑफिसरचे अज्ञान. त्याहून वाईट असे : पेटंटनुसार हळद विकायचा किंवा वितरित करायचा अधिकार फक्त पेटंटधरकाला होता. भारतीयांनी तक्रार नोंदवली, आणि दोन वर्षांत पेटंट रद्द झाला हे विशेष.

(आता या लोकांनी हळदीवर विवक्षित नवी रासायनिक प्रक्रिया करून फक्त त्या उत्पादनावर अधिकार गाजवला असता, तर मला तरी काही दोष दिसत नाही. नाहीतर याचा अतिरेक केला तर संख्यांचे आकडे "हिंदू" आहेत म्हणून संगणकाचे पेटंट नाकारावे लागतील!)

पेटंटच्या बाबतीत हळद हिंदू की भारतीय की काय याबद्दल काहीच विशेष नाही. हळदीचा हा उपयोग आधीच ठाऊक असलेला आहे - ते कुठे का असेना - हे इतकेच महत्त्वाचे आहे.

"आधी ठाऊक होते" (तांत्रिक संज्ञा : प्रायर आर्ट) म्हणून पेटंट रद्द करायची प्रक्रिया आहे. पण विकसनशील देशांतल्या लोकांना तो खर्च जमणार नाही.

म्हणून वाटते - मूळ योगासने पेटंट करता येऊ नये. याबद्दल विविध देशांतल्या पेटंट ऑफिसरांना माहिती असली पाहिजे. योगासनात काय बदल केले, हे अर्जात सांगून तितके बदल फक्त पेटंट करण्याची मर्यादा घातली पाहिजे.

बाकी मुद्दे नीट समजले नाही. (बौद्ध विरुद्ध हिंदू, वगैरे. श्रेय लाटणे, वगैरे प्रकारही कळला नाही. जुन्यामध्ये फक्त जे काय नवीन घातले, त्याचे श्रेय घेता आले पाहिजे.)

शिल्पा ब's picture

4 Dec 2010 - 3:24 am | शिल्पा ब

<<<जुन्यामध्ये फक्त जे काय नवीन घातले, त्याचे श्रेय घेता आले पाहिजे.

+१

विकास's picture

4 Dec 2010 - 3:36 am | विकास

मूळ आसने पेटंट करू नये.

सहमत.

मला वाटते जरी बातम्यांमधे भारतसरकारचा पेटंट करण्याचा प्रयत्न अशा अर्थाने लिहीलेले असले तरी वास्तवात योगासनांच्या अधिकृत चित्रिकरणाने कोणी इतर पेटंट करू शकणार नाहीत इतकाच उद्देश असावा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर झाला की माणसे ताक पण फुंकून पितात. मला वाटते पेटंटच्या बाबतीत एकंदरीतच असे होत असावे. म्हणून आता हा मार्ग काढला असावा.

खरे म्हणजे "योगसाधनेस" ओपन सोअर्स म्हणून जाहीर केले तर काय होईल आणि ते आंतर्राष्ट्रीय कायद्यात कसे बसवता येईल हे बघितले पाहीजे.

बौद्ध विरुद्ध हिंदू,
असे कोणी हिंदू धर्मिय म्हणत नाही अथवा बौद्ध धर्मीय पण म्हणतो असे म्हणायचे नाही. मात्र संदर्भ अशाप्रकारे तयार केले जातात त्यावरून पुढे तेच काय ते बरोबर ठरू लागते असे म्हणायचे होते. बाकी बीबीसीवरची ही ख्रिश्चन योगाची चित्रफीत प्रातिनिधिक आहे. अजून असे बरेच काही आहे ज्यामुळे असे बोलावे लागते. असो.

श्रावण मोडक's picture

4 Dec 2010 - 5:17 pm | श्रावण मोडक

मूळ आसने पेटंट करू नये.

यातील मूळ शब्दाची व्याख्या काय? भारतात सर्वत्र ­ए­खादे आसन विशिष्ट पद्धतीनेच ­शिकविले, केले जाते का­? कार­ण, ये­थील युक्तिवादानुसार त्यात थोडे जरी बदल असतील तर मूळ कोणते मानायचे? ­किंवा त्यासा­­ठी काही प्रमा­ण ग्रां­थीक ­आधार ­आहे का?
हा प्रश्न जिज्ञासेपोटी विचारलेला आहे. आव्हानात्मक सूर नाही.

विकास's picture

4 Dec 2010 - 5:45 pm | विकास

विचार करायला लावणारा मुद्दा... प्रतिसादाशी सहमत!

अवलिया's picture

4 Dec 2010 - 5:48 pm | अवलिया

लै भारी मुद्दा!

आता मी एक काम करतो, योगासनाचा क्लास काढतो. अंगठा आणि बोटाने नाक बंद करुन प्राणायाम करण्याऐवजी कपडे वाळत अडकवायचा चिमटा नाकाला लावुन प्राणायम, योगासने असे क्रियेचे स्वरुप ठेवतो. पेटंट घेतो. हाय काय अन नाय काय ! कसे ?

श्रावण मोडक's picture

4 Dec 2010 - 6:24 pm | श्रावण मोडक

आता मी एक काम करतो, योगासनाचा क्लास काढतो. अंगठा आणि बोटाने नाक बंद करुन प्राणायाम करण्याऐवजी कपडे वाळत अडकवायचा चिमटा नाकाला लावुन प्राणायम, योगासने असे क्रियेचे स्वरुप ठेवतो. पेटंट घेतो. हाय काय अन नाय काय ! कसे ?­

हाहाहाहा... घेतो? ­अहो, ­घ्या. मिळेलही. कार­ण ­इथं ­­­चिमटा ­आलाय. म्ह­णजे ही योगसा­धना निव्व­ळ ­शारीर न राहता थोडी ­आर्टि­फि­शियल - मेकॅनिकल ­अशी ­झालेली ­आहे. एकूण इम्प्रोव्हायजे­शन झालेलं ­आहे परंपरागत ­ज्ञान किंवा विद्येचं. त्यामुळं ­­पेटंट मिळेलही. ­(हे गां­भीर्याने लिहिले ­आहे. कार­ण हे ­शक्य ­आहे.)
­आता या­लाच थोडी तात्विक - अध्यात्मिक जोड देऊया. या प्राणायामातून मानसीक शांती-समाधी क­शी ­मिळते त्याची. बास्स. या क्लासच्या कोचिंग क्लाससारख्या शाखा दिसू लागल्या मला तरी... ­:­) ­(हे ह.­घ्या.­)­
माहिती का­ढू का तप­शिलांची? टक्केवारी बोला... ;) ­(गं­भीर मोड)
आता बाकी खवत बोलू. धागा योगासनांपुरताच राहू द्यावा म्हणतो...

सुनील's picture

4 Dec 2010 - 5:50 pm | सुनील

मूळ आसन म्हणजे केवळ त्या आसनांतर्गत असणारी शेवटची शारिरीक स्थिती की त्या स्थितीला पोहोचेपर्यंत केली गेलेली प्रत्येक शारिरीक हालचाल?

थोडक्यात Final Product की Procedure देखिल?

असो, बराच कीस काढता येईल.

त्याऐवजी आसनांच्या नावांना (ग्रंथात आढळणार्‍या मूळ संस्कृत आणि त्याचे अधिकृत इंग्रजी भाषांतर) यांना जियोग्रफिकल इन्डिकेशन (GI) अंतर्गत पेटंट द्यावे.

श्रावण मोडक's picture

4 Dec 2010 - 6:12 pm | श्रावण मोडक

थोडक्यात Final Product की Procedure देखिल?

­­अगदी...
योगासने किंवा ए­कूणच पारंपरिक ­(सरसकट पौर्वात्य म्ह­णूया का?) ­ज्ञान किंवा ­विद्यांसंदर्­भात हे द्वैत कितपत, ­आणि खोलवर­चे, आहे हेही तपास­ण्याजोगे. कार­ण, ­अ­शी प्रोसिजर वेग­ळी ­आणि प्रॉडक्ट वेग­ळे ­अ­शा स्वरूपाची ­द्वैतात्मक मांड­णी ­असावी, ­असे ­एकू­ण तत्व­ज्ञान ­(इ­थं मी द्वैत किंवा ­अद्वैत तत्त्व­ज्ञान ­यावि­षयी बोलत नाहीये, तर त्या त्या परंपरागत ­ज्ञान किंवा विद्या यांच्या तत्व­ज्ञानावि­षयी बोलतोय­) पाहता वाटत नाही. ­या दोन्ही गोष्टी त्या विषयात अंग­भूतपणे ­­एकच मानल्या ­असाव्यात ­असे दिसते.
­ज्ञानी सदस्य काय लिहितात ते वाचायचे ­आहे. ­
जीआयचा मुद्दा विचारात ­घे­ण्याजोगा. ­:)

धनंजय's picture

4 Dec 2010 - 6:47 pm | धनंजय

मला वाटते की पुस्तक किंवा प्रथा, यांच्यापैकी कुठलेही "प्रायर आर्ट" (पूर्वज्ञात तंत्र) म्हणून दाखवता येते.

पेटंटच्या अर्जात "नेमके नवीन काय" ते सुस्पष्ट सांगावे लागते. त्या "अर्जातील नवीन गोष्टीचा" उल्लेख पुस्तकात असला तर अर्जकर्त्याने ते नवीन शोधलेले नाही. (पुस्तक प्राचीनच असले पाहिजे असा काही नियम नाही. अर्जकर्त्याच्या आधीचे असले म्हणजे पुरे.) किंवा अर्जकर्त्याहून स्वतंत्र असे ते तंत्र पूर्वीच वापरले जात होते असे दाखवले म्हणजे पुरे. (किती प्राचीन आहे, याबद्दल पेटंट ऑफिसला फारसे गम्य नसते.)

यात सरसकट पौर्वात्य विद्यांबाबत कुठले विशेष द्वैत आहे, असे मला समजू येत नाही. पाश्चिमात्यांत कुठले व्यायामाचे जुने प्रकार आहेत - उदाहरणार्थ गोळाफेक, ग्रीक-रोमन पद्धतीची कुस्ती वगैरे. अशीच पारंपरिक शरीरसौष्ठवाची "आसने" आहेत. यांच्याबाबत वरील सर्व विवेचन तितकेच लागू आहे. आता कमरेत वाकून पायाचे आंगठे पकडून कंबर-मांड्यांची लवचिकता वाढवतात. असे योगासनही आहे, पण जगाच्या अनेक भागात हा प्रकार दिसतो. समजा या प्रकाराबद्दल मी पेटंम्टसाठी अर्ज केला. याला "पादांगुष्ठासन" म्हणून भारतीय पुस्तकात उल्लेख आहे, किंवा अन्य कुठल्या देशातले लोक लवचिकपणासाठी हेच करतात, इतके दाखवले तर पुरे. पेटंट अर्ज बाद होतो.

अंतिम फलित प्रोडक्ट किंवा प्रोसीजर मध्ये नाविन्याचा अंश अविभाज्य असेल, तर पेटंटची व्याप्ती त्या प्रोडक्ट किंवा प्रोसीजरवर जाईल. नाहीतर मी उद्या किराणाविक्रेत्याला जाऊन सांगेन - "तुझ्या दुकानातील साखर विकायचा अधिकार तुझ्याकडे आहे, पण साखर वापरलेल्या पाकावर अधिकार नाही. हे माझे पाणी आणले, त्यात तुझ्या दुकानातली साखर विरघळून घेतली, आता तुला पैसे न देता पाक घेऊन चाललो मी!" दुकानदार म्हणेल - "तुमचे पाणी आणि आणि पाक बनवायचे कौशल्य तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण एकदा का माझ्या दुकानातली साखर पाकात अविभाज्य अंश म्हणून टाकली, तर पाक नेण्यापूर्वी मला साखरेची किंमत द्यावीच लागेल."

पेटंटच्या वादांमध्ये-दाव्यांमध्ये खूप गुंतागुंत असते यात काही शंका नाही. पण तुम्ही म्हणता तितकी मूलभूत गुंतागुंत नाही.

पौर्वात्य/पाश्चिमात्य हा प्रकार नसून पेटंटऑफिसरच्या देशातले/देशाबाहेरचे ज्ञान/तंत्र असा एवढाच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. वेगळ्या देशातील ज्ञानाबद्दल किंवा तंत्राबद्दल पेटंट कार्यालयातील अधिकार्‍याला माहिती फार कमी असते. म्हणून अमेरिकेतल्या पेटंम्ट अर्जात "हळद जखमेवर वापरतात हे आम्ही नवीनच शोधले, आणि हळदीच्या कंदापासून त्याची पूड करता येते हे आम्हीच शोधले" असे एखाद्या अर्जदाराने म्हटले, तर अधिकार्‍याला खर्‍या-खोट्याचा निर्णय करता येत नाही. भारतातल्या पेटंट अधिकार्‍याला अमेरिकेतल्या कुठल्या तंत्राबद्दल माहीत नसेल.

सरसकट काही म्हणायचे असेल तर "पौर्वात्य" नव्हे तर "पेटंट अधिकार्‍याच्या देशाच्या बाहेरचे" असे म्हणावे.

श्रावण मोडक's picture

5 Dec 2010 - 7:29 pm | श्रावण मोडक

काही गोष्टी समजल्या, काही बाकी ­आहेत. काही नवे प्र­श्न ­आहेत. प­ण ­थोडा वे­ळ मि­ळाल्यानंतर लिहीन.
पौर्वात्य हा ­उल्लेख पूर्णपणे ­अवांतर ­आ­णि ­एकू­णच ­अक­ॅडेमिक स्वरूपाचा ­आहे. पेटंटसंदर्­भात नव्हे. पेटंटसंदर्­भात ­धनंजय म्ह­णतात ते बरोबर­ आहे.
नवा प्रतिसाद -
प्रायर आर्ट या अंगाने पेटंटचा मुद्दा ध्यानी आला. पण मूळ प्रश्न कायम आहे. एखाद्या आसनाच्या प्रक्रियेत छोटा बदल केला तर त्याचे पेटंट होऊ शकते का? मा­­झ्या ­मते, स­ध्याच्या व्यवस्­थेनुसार,­ ­हो­ऊ ­­शकते. ते योग्य की ­अयोग्य हा मुद्दा आहे. कार­ण, ­आ­सनांसंदर्­भात ­असे ­­छोटे-­छोटे बदल खुद्द ­भारतातच गुरूगणीक सं­भवतात. ­असे बदल नोंदवले गेले ­­असतीलच­ असे नाही. ­अशा ­एखादा बदल ­उद्या दुस­ऱ्याच कोणीही पेटंट केला तर त्याचा ­अर्­थ आधीपासून, प­ण नोंद नसलेला ­असा बदल ­अवलंबलेला असूनही, त्याचा पु­ढे ­अवलंब करण्यावर बंदी ये­ईल किंवा त्यापोटी ­आर्­थीक ­भरपाई द्यावी लागेल. ­अ­शा किती बदलांची नोंद करावयाची? ­अशा स्थितीत ­"बदलांची नोंद केली नाही ना, मग ­भोगा नुकसान­" ­असा पवित्रा ­घ्यावयाचा काय? ­पारंपरिक ­ज्ञान, विद्या, तंत्रे याबाबत ­असे पवित्रे ­असावेत काय?
हे तुम्हाला केलेले प्रश्न, ­असे नाही. तर माझ्या मनात ­उमटलेले प्रश्न ­आहेत. त्यामु­ळे ­अर्­थातच ­उत्तरांचे बंधन नाही.

नितिन थत्ते's picture

5 Dec 2010 - 7:44 pm | नितिन थत्ते

पेटंट मिळण्याच्या तीन अटी असतात.

उत्पादन/उत्पादनाची कल्पना नवी असावी. (पूर्वी अस्तित्वात नसावे)
उत्पादनाचा (पदार्थाचा) नव्या कामासाठी वापर केलेला असावा. परंतु येथे काड्यापेटीतील काडीचा कानकोरणे म्हणून उपयोग करणे हे पेटंटेबल नसते. पियानोचा हिंदुस्तानी संगीतासाठी उपयोग पेटंटेबल नसतो. वियाग्रा या औषधाचा कामोत्तेजक म्हणून नवा उपयोग मात्र पेटंटेबल असतो.

हे पाहता योगासने ही पेटंटेबल नसावीत. नुसता एखादा बदल केला म्हणून ते पेटंटेबल होणार नाही. त्या बदलाने नवा उपयोग होतो हे दाखवावे लागेल.

(मात्र योगासने कॉपीराइटेबल असू शकतील).

पंगा's picture

4 Dec 2010 - 8:00 pm | पंगा

नाहीतर याचा अतिरेक केला तर संख्यांचे आकडे "हिंदू" आहेत म्हणून संगणकाचे पेटंट नाकारावे लागतील!

द्विचिन्ह पद्धतीचे मूळ "हिंदू" आहे???

त्यामुळे (बाकी चालू द्या, पण) या दाव्यात तरी फारसा दम राहीलसे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)

मदनबाण's picture

4 Dec 2010 - 10:33 am | मदनबाण

जग बदलयं... इथे ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यापेक्षा, त्यावर स्वामित्व प्रस्थापित करुन त्याद्वारे नफा मिळवणे ही वॄत्ती बळावली आहे.
हिंदूस्थानाकडे तर ज्ञानाची अशी अमाप संपत्ती आहे,पण उद्या त्या ज्ञानाचे जनक ते नाहीत असा दावा जर कोणी करु लागला तर ते का म्हणुन सहन करायचे ?
पिढ्यां न पिढ्या जे ज्ञान आपल्या पूर्वजांनी प्रसारित केले त्यावर अधिकार सांगणारे हे फिरंगी कोण ?
आज अनेक फिरंगी लोक भारतीय तंत्र,मंत्र आणि यंत्र यावर प्रचंड अभ्यास करत आहेत... अगदी टर्बो कॅडने गणेश यंत्र / श्रीयंत्र कसे काढावे असे व्हिडीयो बनवणारे फिरंगीच आहेत... संदर्भ :--- http://www.youtube.com/watch?v=9nHcGHmUrK4( अर्थात त्याचा आधार ही Yantra: The Tantric Symbol of Cosmic Unity by Madhu Khanna किंवा Tools for Tantra by Harish Johari यांची पुस्तके असोत...)
उद्या कोणी ॐवर पेटंट भरेल तर कोणी श्रीयंत्राच्या डिझाइनचे पेटंट घेइल !!!
आपल्या देशाने जगाला इतके भरभरुन दिले आहे तितके ज्ञान बहुधा जगातील कोणत्याच देशाने दिले नसावे...
आज २५० पेक्षा जास्त योगासनांवर फिरंगी माकडांनी आपला दावा लावला आहे हे कशाचे द्योतक आहे ? जे पतंजली योगसुत्राने सांगितले त्यावर स्वता:चे स्वामित्व सांगणीरी ही मंडळी कोण ?
ज्याप्रमाणे हळद, बासमतीवर दावा लागला त्याप्रमाणेच कडुलिंबावर देखील दावा लावला गेला आणि त्यासाठी बरीच लढाई लढावी लागली... संदर्भ :--- http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/4333627.stm

माझ्यामते ही तर फक्त सुरुवात आहे,भविष्यात हा जाच अधिक होणार हे निश्चीत...स्वार्थ आणि स्वार्थच साधायचा असेल तर परमार्थाचा देखील बाजार भरवता येइल.

जाताजाता :--- शून्याचा शोध आर्यभट्टांनी लावला, मग उद्या आम्ही शून्याचे पेटंट फाइल केले तर हिंदूस्थानाला किती पैसा मिळेल ? ;)

बेभान's picture

4 Dec 2010 - 5:33 pm | बेभान

|स्वार्थ आणि स्वार्थच साधायचा असेल तर परमार्थाचा देखील बाजार भरवता येइल.
हे वाक्य मी माझ्या जी-टॉकच्या स्टेटसला टाकू शकतो काय..? (intellectual property theft चा प्रकार घडू नये यासाठी पूर्वपरवानगी) :)

हे वाक्य मी माझ्या जी-टॉकच्या स्टेटसला टाकू शकतो काय..? (intellectual property theft चा प्रकार घडू नये यासाठी पूर्वपरवानगी)
हो... परवानगी आहे. :)

अवलिया's picture

4 Dec 2010 - 11:45 am | अवलिया

वाचत आहे.... :)

मेकॉले आणि त्याच्या शिष्यांनी रोवलेल्या झाडांना आलेली विषवल्ली पण पहात आहे. वसाहतकालीन आणि स्वातंत्र्योत्तर साम्यवादी इतिहासकारांनी केलेल्या फेरफाराचे परिणाम आता दृश्य स्वरुपात दिसु लागले आहेत हे नक्की. असो. सध्या कुंभकावर नियंत्रण मिळवत आहे... !

नितिन थत्ते's picture

4 Dec 2010 - 2:30 pm | नितिन थत्ते

ठराविक क्लिशे असलेले रूदन. :)

सिद्ध करा माझे म्हणणे खोटे आहे.
जाहिर आव्हान. २४ तास.

धनंजय's picture

4 Dec 2010 - 7:10 pm | धनंजय

श्री. विकास यांनी दिलेल्या दुव्यांमध्ये पुढील लोकांचे/संस्थांचे उल्लेख आलेले आहेत :
१. हिंदू अमेरिकन फाउंडेशन (हे म्हणतात की योगासनांवर हिंदूधर्माचा ब्रँड हवा)
२. दीपक चोपड़ा (हे म्हणतात की जागतिक ठेवा आहे, त्यांचे स्वतःच्या शिकवणीत मात्र भारतीय मुळे स्पष्ट उल्लेखतात)
३. आर. आल्बर्ट मोलर (हे अमेरिकेतल्या एका चर्चमधील धर्मगुरू आहेत, हे म्हणतात की योगासने हिंदूच आहेत, आणि ख्रिस्तधर्मास विटाळणारी आहेत)
४. बिक्रम चौधुरी - यांनी नवीनच आसने बनवली, आणि त्या नवीन आसनांवर कॉपीराईट सांगितला
५. डेबी डेस्मंड (अमेरिकन स्त्री, ही म्हणते योगावर कोणाची पैशाच्या दृष्टीने मालकी नाही, पण योगाचे मूळ हिंदू आहे)
...

आता या सर्व लोकांचा मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीशी काय संबंध आहे, आणि साम्यवादी इतिहासकारांशी काय संबंध आहे ते कळलेले नाही. आता डेबी डेस्मंड या अमेरिकन बाईचे उदाहरण समजावून सांगा. हिचे शिक्षण अमेरिकेत झाले. मेकॉलेच्या शिष्यपरंपरेने तिला शिकवले? ती "कोणाची मालकी नाही" म्हणते म्हणजे बहुधा साम्यवादी आहे, असे कोणी म्हणेल. (अमेरिकन लोकांबद्दल अतिशय अज्ञान असले तर कोणी असे म्हणेल, पण ते सोडा.) तर भारतीय साम्यवाद्यांकडून ती भारताचा इतिहास शिकली म्हणावे काय? मग "योगासनांचे मूळ भारतातल्या हिंदूंचेच आहे" असे ती म्हणते, ते तिला साम्यवाद्यांकडून कळलेले दिसते. मात्र तुमचा अभिप्राय तसा नसावा, असे वाटते. तुमचा अभिप्राय आहे तरी काय?

आता श्री. विकास यांच्या पेटंट मुद्द्याबाबत. मेकॉले-शिक्षणपद्धतीचे आणि साम्यवाद्यांचे पेटंट-कायद्याविषयी काय मत आहे? त्या मताचा योगासनांशी काय संबंध आहे? याबाबत मी घोर अज्ञानात आहे, हे मी कबूल करतो. तुम्ही याबाबत समजावून सांगाल अशी आशा आहे.

तुमची मूळ सिद्धताच कळलेली नाही, मग श्री. नितिन थत्ते यांना काय सिद्धता करून दाखवायला सांगितलेली आहे, तेसुद्धा कळलेले नाही. तुम्हा दोघांच्या उत्तम संवादातून आम्हाला काही शिकू द्या, या आशेने विनंती करत आहे.

विकास's picture

4 Dec 2010 - 8:11 pm | विकास

योगसाधने वरून पाच गोष्टी वर धनंजय यांनी योग्य मांडल्या आहेत त्या प्रातिनिधीक स्वरूपाच्या आहेत आणि त्या संदर्भात...

मूळ चर्चा सुरु करतानाचा उद्देश हा जेंव्हा पुरातन संदर्भ हे धर्म/राज/समाज-कारण जे कुठले असेल त्याच्या नावाखाली दुर्लक्षिली जातात तेंव्हा त्याला त्या पुरातन समाजाचे आजचे अधुनिक वंशज म्हणून अथवा केवळ नितीमान (एथिकल) व्यक्ती कसे वागावे हा आहे. ज्या युगामधे वाड्मयचौर्य/plagiarism हा पापासारखा मानला जातो त्याच युगात केवळ पुर्वीच्या काळात झाले म्हणून अथवा अजून कुठल्याही कारणाने त्या स्त्रोताला वाली नाही म्हणून काही खपवले जाऊ शकते त्यावर उपाय काय, हा प्रश्न आहे.

मॅकॉलेने काय अथवा त्याही आधी बाबरापासून ते गांधी-नेहरू-सावरकरांनी काय केले हे प्रश्न चर्चिण्यासारखे नक्कीच असू शकतात आणि मला देखील त्यावर चर्चा करायला आवडेल... पण येथे आत्ता जे होत आहे त्याला आत्ता प्रतिबंध कसा करावा अथवा त्यात सकारात्मक बदल कसा घडवून आणावा हा मुद्दा आहे.

एका ओळीत - माझ्या दृष्टीने कधी कधी हिंदू म्हणणे गरजेचे आहे तर बहुतांशी वेळेस भारतीय म्हणणे योग्य वाटेल. हा प्रश्न ब्रँडींगचा अथवा मालकी हक्काचा नाही आहे.

अतिशय वाईट आहे हे..
खुप संताप होतो...पण उपाय काय करु शकतो...
आपण भारतीय खुप मुर्ख आहोत...

बेभान's picture

4 Dec 2010 - 5:01 pm | बेभान

इथे योगसाधनेच्या मालकीच्या बाबतीत पाश्च्यात्यांनी केलेल्या विधानांवर ब-याचजणांना राग येत आहे. मुळात इथले कितीजण ही अमुल्य गोष्ट जपण्याचा प्रयत्न करतात. कमीत कमी त्या लोकांना याचे महत्व समजले आहे. पण आपल्यकडे सामान्य भारतीयांपासून, केंद्रसरकारपर्यंत याबाबतीत उदासिनता दिसून येते. बी.के.एस. अय्यंगार सारख्या महापुरूषाला वयाच्या ९२व्या वर्षीही 'शाळांमध्ये योगसाधना आवश्यक करण्यासाठी' दिल्लीला हेलपाटे घालावे लागतात. फिरंगी हजारो डॉलर्स खर्च करून एका महीन्याकरिता योगसाधना शिकण्यासाठी सर्व व्याप बाजूला ठेवून इथे येतात.(हा इथे तुम्ही म्हणाल की ते त्यावर कमवतात ही तेवढे. याला मी सहमत नाही, कारण अमेरिकेतल्या योगशिक्षकांचे जीवन कसे आहे ते मी जवळून पाहिले आहे.) पण भारतीयांना वर्षाला हजार रूपये एवढी कमी फी असतानासुद्धा लोकांमध्ये त्याबाबतीत उदासिनता दिसून येते.
हं आपली संस्कृती (नष्ट होत चाललेली )किती श्रेष्ठ आहे (होती!) त्यासाठी चिन्मय युवा केंद्राचे 'अवेकनिंग इंडियन्स टू इंडिया' हे पूस्तक जरूर वाचा. Awakening Indians to India
आणि आपण इकडे अतिशय वेगाने प्रगती करत आहोत ही दुर्दैवाची पण खरी गोष्ट आहे.
हं पेटंट वगैरे याला विरोध झालाच पाहीजे. पण ना ज्ञानेश्वरांनी ना पतंजलीनी आम्ही जे काही दिले आहे ते फक्त ठरावीक या धर्मासाठीच उपयुक्त आहे असे कुठेही सांगीतले नाही.
जसे मनात आले तसे लिहीले. लेखनात ब-याचवेळा भरकटल्याबद्दल क्षमस्व..!!

[चांगले वागणे, चांगले असणे, सुसंकृत असणे हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा मक्ता नाहीये. सर्व जातीत, धर्मात, देशात चांगली माणसे आहेत, नीचसुद्धा आहेत. गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी! 'जातीसाठी माती खावी' या म्हणीसारखा आपल्या जातीच्या लोकांचा वाईटपणा झाकून ठेवण्याचा दांभीकपणा आणि हिनपणा कुठेही नसेल.]

गांधीवादी's picture

5 Dec 2010 - 7:00 am | गांधीवादी

'योग' संदर्भात जास्त माहित नाही, पण आपण भारतीय पेटंट घेण्याबाबत खूप उदासीन असतो. हे मला कायम माझ्या कामावर जाणून येते.

आम्ही अमेरिकेतील एका नामांकित कंपनीसाठी पुण्यात काम करतो. 'गाड्यांना लागणाऱ्या नवनवीन कल्पना सुचवून' किंवा 'आहे त्यात नवीन बदल घडवून आणण्याचे काम' आमची कंपनी करते. मात्र ज्या काही नवनवीन कल्पना आम्ही मांडलेल्या असतात, त्याच्यावर भारतातील आमची कंपनी आहे तिचा हक्क नसतो (तसे अगोदरपासूनच ठरविलेले असते). काही उत्तम कल्पना सुचविल्यामुळे आम्हाला केवळ ३०००-५००० रुपयाची रोख बक्षिसे मिळतात आणि अमेरिकन मात्र त्याचे पेटंट 'त्याच्या' नावावर चढवून घेतात. ह्या बाबत मी कित्येक वेळा माझ्या मॅनेजर ला छेडले असतात मला एकच उत्तर मिळते, 'आपण इथे केवळ त्याचे काम करण्यासाठी आलेलो आहोत, हे पेटंट वगेरे आपल्याला परवडणार नाही, त्याचा खर्च येतो. आपल्याला जी काही दर महिना रक्कम त्यांच्याकडून मिळते, त्यातच आपण खुश राहायला पाहजे'

इथे एक बाब नमूद करुशी वाटते कि, आज जरी पेटंट सांभाळण्यासाठी लागणारे पैसे खूप वाटत असले तरी उद्या जेव्हा भारत त्यांच्याशी बरोबरी करायला जाईल तेव्हा मात्र त्यांच्याकडे भारतापेक्षा १०० पटीने जास्त पेटंट असतील, आणि एखादी कल्पना आम्हीच बनविली असली तरी सुद्धा ती कल्पना आम्हाला आमच्या उत्पादनात वापरता येणार नाही, ह्याचे खूप दु:ख होते.

माझ्या मॅनेजरला हे सर्व माहित असून त्याला सुद्धा वरून काही मदत मिळत नाही. त्यामुळे सध्या इथे अनेक सुपीक डोक्यातून रोज काही कल्पना ते आपल्या डोळ्यादेखत नेत आहेत आणि आम्ही मात्र चिडीचूप.

पंगा's picture

5 Dec 2010 - 11:25 am | पंगा

रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे योगासाधना करायाला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण्हून माहीती विचारली तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण योगसाधनेचे मूळ हिंदू संस्कृतीत आहे असे म्हणणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?

आज भारतात 'तुमच्या अमेरिकन पिझ्झासंस्कृती'च्या नावाने खडे फोडणारे महाभाग पुष्कळ सापडतात. (नाही सापडत?)

आता रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे पिझ्झा खायला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण होऊन माहीती विचारली (अथवा कोणी खडे फोडू लागले), तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण 'पिझ्झ्याचे मूळ इतालियन संस्कृतीत आहे' असे ठणकावून सांगणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्त्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?

बर्गर संस्कृती असुंदेत अथवा आयपॉड संस्कृती, ती विश्व व्यापणार असे किमान गेल्या शतकापासुनचे पुढच्या काही शतकांपर्यंतचे तरी चित्र रहाणारच आहे. म्हणजे आज अमेरिकन्स म्हणतात म्हणून उद्या तुम्ही आम्ही देखील "योगा योगा " करत नकळत मुळं विसरणार

पिझ्झासंस्कृतीचे असेच नाही काय? म्हणजे आज आम्ही अमेरिकन्स म्हणतो म्हणून तुम्ही देखील "पिझ्झा पिझ्झा" करत नकळत (इतालियन) मूळ विसरणार... (सोनियाचे नव्हे (काश!). पिझ्झ्याचे.)

मग अशा वेळी इतालियनांनी बोंब मारायची, की (शेवटी पिझ्झ्याची मूळ कल्पनासुद्धा मार्को पोलोने की कोणीशीशी चिन्यांकडून उचलली, म्हणून) चिन्यांनी?

पिझ्झा मुळात कोणाचा का असेना, आज त्याचा जगभर प्रसार, लोकप्रियता, फार कशाला, निकटची ओळख कोणामुळे आहे? डॉमिनोज़, पिझ्झाहट वगैरे असल्याच मंडळींमुळे ना? मग 'कोणाचा आहे' याने फरक काय पडतो?

(फार कशाला, हल्लीच्या दिवसांत क्रिकेटचा खेळसुद्धा हिंदुस्थानइतका इतर कुठे प्रस्थापित नसेल. आजकाल जगभरचे खेळाडू येऊन हिंदुस्थानातल्या लीग्ज़मध्ये खेळू पाहतात. पूर्वी आपले देशी खेळाडू इंग्लिश कौंटीज़च्या वतीने खेळू पाहात, तसे. मग आता साहेबाने बोंब मारावी काय, की 'आमचा' खेळ या इंडियनांनी ढापला म्हणून?)

शेवटी एखाद्या गोष्टीचा खप जो सर्वाधिक घडवून आणतो, तो त्याचे श्रेय घेणारच. मग भले ती गोष्ट बनवलेली कोणी असो. इतालियनांच्या मते डॉमिनोज़चा पिझ्झा भलेही 'त्यांच्या' पिझ्झ्यापुढे सबस्टॅंडर्ड असेल. (आणि ते मत योग्यही असेल बहुधा.) पण इतालियनांचा आपल्या या 'चीज़'वस्तूचा खप जगभर वाढवण्यात जोपर्यंत फारसा हातभार नसेल (आणि उलट डॉमिनोज़चा तो असेल), तोपर्यंत इतालियनांनी हवे तर 'ह्यँ:! आमच्या पिझ्झ्याची सर त्या डॉमिनोज़च्या पिझ्झ्याला कध्धीकध्धी येणार नाही! शेवटी तेथें पाहिजें जातीचें!' असे भले ('तुई मुख फुटे तोर मोनेर कोथा अ‍ॅकला बोलो रे'च्या धर्तीवर) तोंड फाटेस्तोवर जगाला सांगावे आणि आपलीच (पाठ) थोपटून घ्यावी. पण त्यांना रडण्याचे काहीच कारण नाही. (आणि इतालियनांना कधी रडताना ('हे अमेरिकन्ज़ घाऊक भावात पिझ्झे खायला लागल्यापासून मोत्झारेलाचे भाव अवाच्यासवा वधारले!' किंवा 'डॉमिनोज़ने ताबा घेतल्यापासून पिझ्झ्याची पडझड सुरू झाली', वगैरे वगैरे) पाहिलेलेही नाही. ते आपले शांतपणे आपला तो काय तो पिझ्झा-पाष्टा वगैरे खातात, ती कियांती की काय ती पितात, आणि एकंदरीत मजा करतात*. ते डॉमिनोज़ वगैरे सगळे जाऊ द्यात तेल लावत - तेल ऑलिवचे, की आणखी कसले, हा प्रश्न गौण आहे.)

निदान, डॉमिनोज़ / पिझ्झा हट वगैरे मंडळी जोपर्यंत पिझ्झ्याचेच पेटंट घेऊन इतालियनांच्या पिझ्झा बनवण्यावरच घाला घालत नाहीत, तोपर्यंत त्यांनी का रडावे? तसे काही होऊ लागले, तर विरोध अर्थातच समजण्यासारखा आहे, नव्हे योग्यच आहे. पण सहसा डॉमिनोज़ पिझ्झ्यावर पेटंट घेत नाही, फार फार तर डॉमिनोज़ बनवत असलेल्या एखाद्या विशिष्ट क्रस्टवर नाहीतर घटकांच्या प्रमाणाच्या फॉर्म्युल्यावर / रेसिपीवर घेते. आणि तस्सा क्रस्ट / तश्शी रेसिपी जर कोणा सुगरणीने / बल्लवाने कधी योगायोगाने घरी बनवलीच, आणि आलेल्या पाहुण्यांना कधी खाऊ घातलीच, तर त्याला बहुधा काही अडचण येत नसावी. म्हणजे याचा अडथळा जर कोणाला आलाच, तर व्यापारी तत्त्वावर ती वस्तू (पिझ्झा / विशिष्ट क्रस्ट / विशिष्ट रेसिपी) बनवून विकून नफा कमावू पाहणारास यावा.

अर्थात असा अडथळाही आक्षेपार्ह आहेच, नाही अशातला भाग नाही. शेवटी कोणाकडून लुबाडले जायचे (आणि लुबाडणारा देशी असावा की विदेशी) याचा निवाडा करण्याचा हक्क ग्राहकाजवळ असलाच पाहिजे. आणि लुबाडणार्‍यांमधील पर्याय जितके कमी, तितकी ग्राहकाची लुबाडणूक अधिक होण्याची शक्यता जास्त (एकाधिकारशाही घातक!), हे अर्थशास्त्रीय तत्त्व येथे लागू आहेच. याबद्दल वाद नाही, आणि म्हणून असे काही घडत असेल तर त्याचा विरोध झालाच पाहिजे. मात्र, याव्यतिरिक्त येणारे 'श्रेय कोणी घेतले', 'राष्ट्रीय अस्मिता' वगैरे मुद्दे अतिशय गौण आहेत, असे वाटते.

(तसेही, आज अमेरिकन्स जर आपलाच असल्याच्या थाटात सर्रास पिझ्झा खात असतील, तो खाताना 'परकीय संस्कृतीचे अतिक्रमण' वगैरे विचार आमच्या मनाला शिवत नसतील, या असल्या 'म्लेंच्छांच्या पाककृती'चे आमच्या अन्नातून उच्चाटन करून** त्या जागी 'मेफ्लॉवर'वरील पिल्ग्रिमांच्या कोण्या अज्ञात रेशिपीचे ओढूनताणून पुनरुज्जीवन करू पाहणारी एखादी 'अन्नशुद्धी चळवळ' काढावीशी आम्हांस वाटत नसेल, नव्हे हा पदार्थ मुळात कधीतरी 'परकीय' होता याची आठवणही येत नसेल, इतका जर तो आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होऊन गेला असेल, तर तो मुळात कोठूनही आलेला असो, तो अमेरिकनच. इंग्रजी भाषेसारखा. मग भले आमच्या अंगीकारण्याने त्याचे मूळ स्वरूप - पुन्हा इंग्रजी भाषेसारखे - पूर्णपणे पालटले, तरी - किंवा कदाचित म्हणूनच - तो आमचा. इतालियनांना पिझ्झा, इंग्रजांना इंग्रजी भाषा आणि भारतीयांना/हिंदूंना योग वगैरे आपली मालमत्ता वाटत असेल, तर वाटो बापडी. तो त्यांचा प्रश्न आहे - त्याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. तसेही आमच्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी शेअर करू की, आम्हाला वाटले तर... ;-)

'आसिंधुसिंधुपर्यंत**** अमेरिकन जे काही चरतात, ती अमेरिकन खाद्यसंस्कृती' अशी आमची बॉ 'सांस्कृतिक अमेरिकनत्वा'ची - खाद्यापुरती तरी - साधीसोपी व्याख्या आहे.)
===================================================================
तळटीपा:

* असे निदान आपले तरी बॉ इंप्रेशन आहे - चूभूद्याघ्या. तज्ज्ञांनी खुलासा करावाच. पण एकंदरीत अतिशय छान लोक, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघा.)

** मेक्सिकन स्थलांतरित मंडळी आमच्या देशात घुसलेली आम्हांस खपत नसतीलही कदाचित***, पण मेक्सिकन जेवणाशी आमचे वाकडे नाही. सर्रास आणि आवडीने हादडतो.

*** (म्हणजे, मला व्यक्तिशः काहीही अडचण किंवा आक्षेप नाही, पण अनेक अमेरिकनांना खपत नाही. अनेक महाराष्ट्रवासीयांना महाराष्ट्रात बिहारी घुसलेले खपत नाहीत ना, अगदी तस्से! असो.)

**** यातील दोन सिंधु हे अनुक्रमे प्यासिफिक आणि अतलान्तिक महासिंधु गणावेत.

आजानुकर्ण's picture

5 Dec 2010 - 11:29 am | आजानुकर्ण

प्रतिसाद आवडला.

पंगा's picture

5 Dec 2010 - 11:37 am | पंगा

आभारी आहे.

(स्वाक्षरी जुनीच, ती अपघाताने, की योजनेने? ;-))

आजानुकर्ण's picture

5 Dec 2010 - 11:39 am | आजानुकर्ण

अपघाताने जुनी स्वाक्षरी दिसत आहे. ;)

सुनील's picture

5 Dec 2010 - 5:41 pm | सुनील

प्रतिसाद आवडला!

विकास's picture

5 Dec 2010 - 7:08 pm | विकास

चर्चेचे शिर्षक आणि मूळ मुद्दा परत लिहीतो:

"योगसाधना कुणाकडून आली आहे?"

रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे योगासाधना करायाला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण्हून माहीती विचारली तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण योगसाधनेचे मूळ हिंदू संस्कृतीत आहे असे म्हणणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?

मी "श्रेय" हा शब्द चर्चा प्रस्तावात,

"म्हणजे आधी हळद, मग योगसाधना आणि नंतर अजून काही करत आपले चांगल्याचे श्रेय काढून लाटण्याचे प्रकार आहेत. "

- ह्या वरील वाक्यात पेटंट संदर्भात वापरला होता.

आता आपला प्रतिसाद पाहूया:

शेवटी एखाद्या गोष्टीचा खप जो सर्वाधिक घडवून आणतो, तो त्याचे श्रेय घेणारच. मग भले ती गोष्ट बनवलेली कोणी असो.

म्हणजे आपल्याला त्यांनी पेटंट घेणे योग्य वाटते असा अर्थ घेयचा का? तसे आपल्याला वाटत असल्यास अवश्य सांगा.

अमेरिकेने पिझ्झा लोकप्रिय केला अथवा भारतामुळे क्रिकेट लोकप्रिय झाले. पण अमेरिकन्स अथवा भारतीय क्रिकेटला आम्हीच शोधले असे म्हणत नाहीत.

मात्र मला, 'योगसाधनेचे मूळ हिंदूसंस्कृतीत आहे असे म्हणताना सध्याच्या लोकप्रियतेचे श्रेय अमेरिका अथवा इतरत्र अजून कोणी घेऊ नये असे वाटते', असे आपल्याला माझ्याबद्दल म्हणायचे असेल तर मात्र "आग रामेश्वरी... " असेच म्हणावे लागेल.

kamalakant samant's picture

9 Dec 2010 - 12:26 pm | kamalakant samant

योग ही भारताची विश्वाला दिलेली देणगी आहे.योग, भक्ती इत्यादिचे पेट॑ट कोणिही कसे काय घेउ शकते?
प्रत्येक मानवी जीवाच्या कल्याणासाठीच त्या॑ची निर्मिती आहे.अमेरिकाच काय भारताने तरी या वैश्विक ठेव्याचे
पेट॑ट घ्यावे का?भौतिक व आत्मिक असा भेद करावा का?
शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.त्याचे सुद्धा पेट॑ट घ्यावे का?मिळेल का?
माझा थोडा गो॑धळ होतो आहे.
आत्मीक उन्नतीच्या कोणत्याही गोष्टी॑चे पेट॑ट असू नये.
क्रुपया खुलासा करावा.

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 12:31 pm | शिल्पा ब

<<<योग ही भारताची विश्वाला दिलेली देणगी आहे.योग, भक्ती इत्यादिचे पेट॑ट कोणिही कसे काय घेउ शकते?

पैशासाठी लोक स्वतःच्या लेकीलासुद्धा विकतात इथे तर फक्त दुसऱ्या देशातील व्यायाम प्रकारच आहे.