लास वेगास!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
21 Apr 2008 - 8:10 am

लास वेगास - सिन सिटी (पापांचं शहर)!!

...
...

गेल्या आठवड्यात लास वेगासला गेलो होतो. तसा मी तिथे पूर्वी गेलो आहे. एकतर ते एल्.ए. पासून जवळ (म्हणजे ड्रायव्हिंग करून जाण्यासारखं) आहे, आणि दुसरं म्हणजे तिथे बर्‍याच कॉन्फरन्सेस होत असतात. यावेळी असाच एका कॉन्फरन्सला तिथे गेलो होतो. परत आल्यावर सहज कुतुहलाने पाहिलं तर मिपावर या शहरावर काही लेखन केलेलं आढळलं नाही. अमेरिकेत रहाणारे बहुतेक भारतीय कधी ना कधी लास वेगासला जातातच. तेंव्हा त्यांच्यासाठी नव्हे तर आपल्या भारतातील ( एकूणच अमेरिकेबाहेर रहाणार्‍या) मित्रांसाठी या नगरीची ओळख देणारा हा लेख!!

लास वेगासचे पहिले वैशिष्ट्य हे की शहर अगदी भर वाळवंटात वसलेले आहे. सामान्यतः गांवे/ शहरे ही एखाद्या जलाशयाच्या जवळ वसलेली असतात. लास वेगास हे त्याला अपवाद! या शहराच्या चोहोबाजूंना रेताड, वैराण वाळवंटाशिवाय दुसरं काहीही नाही!! तपमान उन्हाळ्यात ४५ डिग्री आणि थंडीत ४ डिग्री सेल्सिअस असं बदलत असतं. इथे काहीही पिकत नाही, काहीही वस्तू तयार करायचे कारखाने नाहीत. पाण्यासकट प्रत्येक गोष्ट इथे दूरवरून वाहून आणावी लागते. त्यामुळे इथे महागाई प्रचंड आहे! पण गंमत अशी की इथे कुणी त्याबद्दल फारशी तक्रार करतांना दिसत नाही!!:)

लास वेगास हे जुगार्‍यांचं शहर म्हणून जगप्रसिद्धच आहे. पण अगदी खरं म्हणजे हे "पैशाच्या पुजार्‍यांचं" शहर आहे. पैसा हा इथला देव! इथे "सर्वदेव नमस्कारः डॉलरंप्रति गच्छती"!! इथे पैसे उधळायलाच माणसं येतात. असं म्हणतात की फार पूर्वी मिडवेस्ट (शिकागो वगैरे) भागातून जेंव्हा कॅलिफोर्नियाला घोडागाडीतून वाहतूक चालायची तेंव्हा रॉकी पर्वताची रांग ओलांडल्यानंतर घोड्यांना थोडा विसावा म्हणून एक स्पॅनिश लोकांनी चालवलेला छोटा चारा-पाण्याचा थांबा इथे होता. नंतर माफियाने इथे पाय रोवले आणि जुगाराचे अड्डे निर्मांण केले. जुगाराबरोबरच इतरही अनैतिक धंद्यांचे हे आगर बनले. त्यानंतर इथे मोठया-मोठ्या बँका आणि गुंतवणूक करणार्‍यांनी (इन्व्हेस्ट्मेंट बॅन्कर्स) शिरकाव केला. त्यांनी लगेच ओळखले की लास वेगासला येणारा माणसांचा लोंढा जर अबाधित ठेवायचा असेल तर हे शहर गुन्हेगारीपासून अगदी मुक्त ठेवले पाहिजे. तेंव्हा सरकार आणि इन्वेस्टर्स यांनी एकत्र येऊन अनेक भल्या (आणि कधीकधी बुर्‍या) मार्गांचा अवलंब करून माफियाला इथून हाकून लावले. जगात अधिकॄत उद्योगाने माफियाला पळवून लावायचे हे एक दुर्मिळ उदाहरण!!

वेगासमध्ये वेगवेगळ्या असंख्य प्रकारचे जुगार खेळायची व्यवस्था आहे. जगभरचे लोक इथे येऊन नशीब अजमावत असतात. प्रत्येक हॉटेलच्या अनेक मजल्यांवर इथे अतिप्रचंड कॅसिनो आहेत. त्यापैकी काहींचे फोटो इथे जोडले आहेत. इथे सोडतीचे जुगार आहेत, पत्त्यांचे निरनिराळे (पोकर, ब्लॅकजॅक वगैरे) जुगार आहेत, काहीच जुगारी कौशल्य अंगी नसणार्‍यांसाठी मग स्लॉट मशिन्स आहेत. अतिगरीब ते अतिश्रीमंत अशा सगळ्या खिशांची इथे सोय आहे. कमीतकमी २५ सेंट/ पैज पासून >१०,००० डॉलर/ पैज असे दर मी पाहिले आहेत. त्याहीपेक्षा महागडे खेळ असतील तर मला कल्पना नाही, पण मला आश्चर्य मुळीच वाटणार नाही! हे जुगार बारा महिने- चोवीस तास चालू असतात. खेळून तुम्ही थकलात तर तुमच्या बसल्या जागेवर खाद्य-पेय आणून देणार्‍या अर्धवस्त्रांकित मदनिका/ मदन असतात. तुमच्याबरोबर लहान मुलं असली तर त्यांना सांभाळण्यासाठी बेबी-सिटिंगची सोय असते (अठरा वर्षांखालील मुलांना जुगाराच्या कॅसिनोत प्रवेश नसतो. माझ्या पहाण्यात हे पथ्य अगदी कटाक्षाने पाळले जाते!). थकलेल्या म्हातार्‍या नातेवाईकांना सोबत करण्यासाठी माणसं असतात, इतकंच काय पण जर तुम्ही ड्राईव्ह करून आला असाल आणि सोबत तुमच्या कुत्र्या-मांजरांना आणलं असेल तर त्या प्राण्यांना फिरवून आणण्याचीही सोय(!) उपलब्ध आहे!! "आम्ही बाकीची सगळी चिंता करतो, तुम्ही फक्त खेळा" हा इथला मंत्र आहे!!! माणसं इरेला पडून खेळतात! काही जिंकतातही, पण बरीचशी खिसा हलका करूनच परत जातात!! पण गंमत अशी की त्याबद्दल तक्रार करतांना मी कोणालाच ऐकले नाही. वेगासला पैसे जिंकून श्रीमंत होण्यासाठी जायचं नसतं तर एक धुंद, अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी जायचं असतं!! "व्हॉट एव्हर हॅपन्स इन वेगास, स्टेऽज इन वेगास" अशी यांची मुळात घोषणाच आहे!!!

वेगासचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली होटेल्स!! येणार्‍या प्रवाशांच्या सोईसाठी इथे अतिप्रचंड होटेल्स बांधलेली आहेत आणि ती बहुतेक सर्व एकाच मध्यवर्ती रस्त्याच्या (लास वेगास स्ट्रीप) दोहोबाजूला उभारलेली आहेत. याखेपेला मी मँडले (मंडाले) बे या होटेलमध्ये राहिलो होतो. हे होटेल इतके मोठे आहे की त्याच्या आंतमध्ये त्यांनी कॄत्रिम समुद्राचा डोह (लगून) आणि चौपाटीसारखा कॄत्रिम समुद्रकिनारा केलेला आहे. आणि गंमत म्हणजे बाहेरून होटेलला प्रदक्षिणा जरी घातली (मी येड्यासारखी इरेला पडून घातली, सव्वा तास लागला आणि रात्री पाय जाम दुखले!!) तरी त्या डोहाचा आणि बीचचा कुठेही मागमूससुद्धा लागत नाही!! मोठ्या हॉटेलांमध्ये सरकते जिने असणं यांत अमेरिकेत तरी काही नाविन्य नाही. पण या होटेलात त्याच्या लगतच्या इतर दोन हॉटेलांमध्ये जाणासाठी लहानशी आगगाडी आहे. ही आगगाडी स्वयंचलित असून हॉटेलात रहाणार्‍या प्रवाशांसाठी एक्सक्लूजिव्ह आणि फुकट आहे! सांगितलं ना मघाशी, "चालण्यात वेळ फुकट घालवू नका, त्यापेक्षा त्या वेळात चार गेम जास्त खेळा!!!":))

मात्र लास वेगासची मजा लुटायला माणूस जुगारी असण्याची मुळीच आवश्यकता नाही. मला स्वतःला जुगार तर सोडाच पण साधी रमी सुद्धा नीट खेळता येत नाही. मला वेगास भावतं ते वेगळ्या गोष्टींबद्द्ल!! इथे अनेक उत्तमोत्तम रेस्टॉरंटस व बार आहेत! जगातील कुठलेही पेय इथे मिळण्याची सोय आहे. ते अल्कोहोलिकच असायला पाहिजे असे नाही, अगदी भारतीय चहा सुद्धा इथे उत्तम मिळतो. नाहीतर अमेरिकेत आपला चहा मिळणं किती दुरापास्त आहे ते माझ्यासारख्या कामानिमित्त भटकंती करणार्‍यालाच माहिती!! तसेच खाद्यपदार्थांच्या बाबतीत! इथे न्यूयॉर्क, पॅरिस इथले जगप्रसिद्ध शेफ येऊन आपापली पाकक्रिया सादर करीत असतात. पदार्थांची चव (आणि किंमती!) अगदी स्वर्गीय असतात!! आपल्या विजुभाऊ, पेठकरकाकादि पाककलानिपुण लोकांना इथे जबरदस्त स्कोप आहे!!:)))

करमणुकीचे सगळे प्रकार इथे उपलब्ध आहेत. उत्तम नाटकं आहेत, पाश्चात्य संगीताचे (क्लासिकल आणि इतरही) शोज आहेत. सलीन डिऑन चा शो तर वर्ष-वर्ष आधी हाऊसफुल असतो!! जादूगारांचे शोज आहेत!! खास शौकिनांसाठी स्ट्रीपक्लब्ज आहेत!! त्यांच्यामध्ये देखिल निरनिराळी 'थीम्स' आहेत. गंमत म्हणजे इथे स्त्रीनर्तकी व पुरुषनर्तक या दोघांचेही क्लब्ज आहेत आणि दोन्ही ठिकाणी स्त्रिया व पुरुष या दोन्ही प्रेक्षकांची गर्दी असते. नमुन्यादाखल एक-दोन फोटो इथे दिले आहेत. (पण पूर्ण लेख वाचल्याखेरीज ते उघडणार नाहीत अशी सोय मी केली आहे. नाहीतर धावाल लगेच फोटो बघायला!! तुम्हाला काय मी ओळखत नाही काय, लेको!!:)) पुन्हा हे सगळे शोज अश्लील असतातच असे नाही. कधीकधी तर त्या नर्तक-नर्तकींचं शरीरसौष्टव पाहून ते कमवायला आणि टिकवायला त्यांना किती मेहनत पडत असेल, किती संयमित आयुष्य जगायला लागत असेल असा विचार मनात येऊन त्यांच्याविषयी आदरच वाटतो.

आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे अमेरिकेतल्या या एका नेवाडा राज्यात वेश्याव्यवसाय अधिकॄत आहे. त्यामुळे (असं म्हणतात, की) वेश्याव्यवसाय करणार्‍या जगातील सर्वात सुंदर-सुंदर स्त्रियांची ही राजधानी आहे. माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे १०० पासून २०,००० डॉलर्सपर्यंत त्यांचे दर आहेत. त्यामुळे इथे पार्किंग लॉटमध्ये आपल्या गाडीच्या शेजारी पार्क असलेल्या मर्सिडिझ किंवा पोर्शाची सुंदर मालकीण ही धंदेवाली असू शकते आणि आपल्यासारखे दहा एग्झिक्युटिव्ह्ज ती पदरी नोकरीवर ठेवू शकते!!! तेंव्हा होतकरूंनी लाईन मारण्यापूर्वी जरा जपून!!! "वेश्याव्यवसाय हा स्त्रिया आर्थिक/ लैंगिक शोषणामूळे हतबल होऊनच स्वीकारतात" या आपल्या पारंपारिक भारतीय समजुतीला तडा जाणारी अनेक उदाहरणे इथे आढळतात. "केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे" म्हणतात ते असे!!:)

पण एक मात्र आहे की या बहुरंगी, बहुढंगी स्ट्रीपवरच्या वेगासपेक्षा आणखीही वेगास आहे. विमानातून वेगासला जातांना याची कल्पना येते. वर वर्णन केलेले झगझगीत वेगास हे एकंदर वेगासच्या १०.-१५% आहे. बाकीचे वेगास हे या वेगासला सेवेचा पुरवठा करणार्‍या स्थानिक लोकांचे आहे. या स्थानिक लोकांना त्यांचे जीवन पुर्णपणे प्रवाशांवर अवलंबून आहे याची विलक्षण जाणीव आहे. हे शहर चोवीस तास जागे असते आणि मुख्य म्हणजे इथला वेगास स्ट्रीप आणि जवळचे रस्ते चोवीस तास कधीही चालत फिरण्यासाठी सुरक्षित असतात. तसे न्यूयॉर्कही चोवीस तास जागे असते, पण न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून रात्री आठनंतर पायी फिरायला स्पेशल धैर्य लागते. कधी मगिंग होईल ते सांगता येत नाही. इथे मात्र लास वेगास "सिन सिटी" असूनही ती भीती नाही. रात्रभर अगदी महिला-महिला प्रवाशांचे घोळकेही निर्धास्तपणे चालत फिरतांना दिसतात. एकतर इथली सुरक्षा यंत्रणा अतिशय जागरूक आहे आणि दुसरं म्हणजे इथल्या रहिवाशांना आपले उत्पन्नाचे एकमेव साधन इथे येणारे प्रवाशी आहेत याची एव्हढी जाणीव आहे की तेच जागरूक राहून अशा प्रकारची लुबाडणूक होऊ देत नाहीत. अर्थांत या शहरात घरफोड्या, खूनखराबा नाही असे मुळीच नाही. पण ते इतरत्र, स्ट्रीपवर असे काही घडतांना दिसणार नाही. स्ट्रीपवरचा मुख्य गोंधळ हा प्रवाशांचाच!!

कुणी म्हणेल गेले डांबिसकाका परत आपल्या वळणावर!!:) एका जुगारी शहराचं काय मोठं कौतुक? मला त्याचं कौतुक अशासाठी वाटतं की विकण्यासारखं काहीही टँजिबल प्रॉडक्ट नसतांना केवळ सर्व्हिस इंडस्ट्रीच्या जोरावर त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. हल्ली भारतात आपण सॉफ्टवेअरची सर्व्हिस इंडस्ट्री उभारण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण त्यात यश मिळवूही. पण आपण त्याच वेळेला खर्‍या अर्थाने यशस्वी होऊ जेंव्हा कॉल सेंटर्स आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांत काम करणारे लोकंच नव्हेत तर समाजातील सगळेच घटक या गोष्टीचे महत्त्व जाणून त्याप्रमाणे वागतील. वेगासमध्ये नुसती हॉटेल-कॅसिनो आणि बार-रेस्टॉरंट्-क्लब्जच नव्हे तर इतर सर्व क्षेत्रे सर्व प्रकारची सुविधा देण्याची पराकाष्ठा करतात. शॉपिंग, मसाज, हेअर ड्रेसर्स, लहान मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून राईडस, सर्कस, सर्व सर्व आहे. थोडासा अतिरेकच म्हणता येईल पण इथे जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर हॉटेलांमधून चर्चेस आहेत. अनेक लोक इथे लग्नाची गाठ बांधतातही! तेथील सरकारही आपल्या परीने सहाय्य करण्याचा प्रयत्न करीत असते. अमेरिकेत इतरत्र सगळीकडे लग्न करायचे असेल तर आगावू नोटिस द्यावी लागते, पण वेगासमध्ये (नेवाडात) नोटिस न देता तात्काळ लग्न करता येते. अर्थांत त्यामागे तिथे लग्नसमारंभ झाला तर होणारा खर्च तिथल्याच बिझीनेसला मिळणार हा पूर्ण कमर्शियल विचारच आहे. पण सुविधांची पातळी लक्षात यावी! अलिकडच्या भारतातील ट्रीपमध्ये मला स्वत:ला संध्याकाळी फक्त साडेसात वाजता दूरचे (म्हणून जास्त पैसे देणारे सुद्धा) भाडे घेण्यास टॅक्सीवाल्याकडून नकार मिळाल्याची आठवण अजून ताजी आहे. त्या पार्श्वभूमीवर मला वेगासच्या सुविधांची पातळी अधिकच जाणवली. अहो, मी तिथे १५ एप्रिलला होतो. १५ एप्रिल अमेरिकेत विशेष महत्त्वाचा दिवस आहे कारण हा दिवस म्हणजे तुमच्या आधल्या वर्षाच्या प्राप्तीकराचा रिटर्न भरण्याची डेड्लाईन असते. सर्व अमेरिकाभर या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पोस्ट ऑफिसे चालू असतात (टॅक्स-रिटर्न पोस्ट करण्यासाठी व ती पोस्ट्मार्क तारीख मिळवण्यासाठी!). तेंव्हा त्यात विशेष काही नाही. पण लास वेगासमध्ये प्रत्येक मोठ्या हॉटेलांमध्ये त्यांनी तात्पुरती पोस्ट ऑफिसे उघडली होती. प्रत्येक खोलीत त्याची जाहिरात (फ्लायर) पाठवली होती. का तर तुम्ही वेगळ्या शहरांत आहांत, तिथले पोस्ट ऑफिस कुठे असेल हे तुम्हाला माहिती असण्याची शक्यता कमी! तेंव्हा तुम्हाला शोधायला लागू नये, त्रास पडू नये म्हणून!! आणि ती तात्पुरती ऑफिसेही मध्यरात्रीपर्यंत चालू होती! आता बोला!!!:)))

मी या खेपेला काढलेले वेगासचे काही फोटो खालील दुव्यावर मिळतील.

देशांतरलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Apr 2008 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लासवेगासची सुंदर सफर झाली आहे. अनेक नव-नवीन गोष्टींची माहिती मिळाली. तसेच दुव्यावरील फोटोही झकास आले आहेत.
ते डान्सरचे एक दोन फोटो आणखी काढायला हवे होते, जरा अंदाज आला असता अशा कार्यक्रमाच्या स्वरुपाचे :)
कॅसीनो वर जुगार खेळावासा वाटला. हॉटेलही काय मोठी आहेत राव !!! लै भारी ओळख करुन दिली या लासवेगासची.
वाळवंटातील हिरवळ - लास वेगास असाच एक सुंदर लेख प्रियाली यांनी उपक्रमवर लिहिला होता.

पुढील लेखनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा !!!

आनंदयात्री's picture

21 Apr 2008 - 10:34 am | आनंदयात्री

सुंदर लेख, लास वेगास मधे पटकन एक चक्कर टाकुन आल्यासारखे वाटले.

मनस्वी's picture

21 Apr 2008 - 11:11 am | मनस्वी

लेख आवडला.

सहज's picture

21 Apr 2008 - 9:36 am | सहज

पैसा ये पैसा !!!!

डांबिसकाका खेळ्ळे का निदान स्लॉट मशीन? बुफेपण लई फेमस आहेत ना?

लेख आवडला.

"लास वेगासवर" अजुनही लेख यावेत. प्रत्येकाच्या नजरेने, अनुभवाने दरवेळी एक नवीच ओळख होत जाईल या मायानगरीची.

धमाल मुलगा's picture

21 Apr 2008 - 10:59 am | धमाल मुलगा

डांबिसकाका,
आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली मात्र हो मात्र !
(छ्या: सगळं मात्रं करून टाकलं मी !)
अहो आमच्यासारख्या कार्ट्यांबरोबर दंगा काय घालता, दारू विषयावर अधिकारवाणीने काय बोलता, एकदम झुप्पकन यु टर्न मारून "दुरावा!" सारखा भावनिक प्रकार काय हाताळता आणि आता हे...प्रवासवर्णन-ए-लास वेगास !!!! धन्य आहात बॉ!

लेखाबद्दल मी पामर काय बोलणार? आवडला!

आणि

आपल्या विजुभाऊ, पेठकरकाकादि पाककलानिपुण लोकांना इथे जबरदस्त स्कोप आहे!!:)))

:-))))
बाकी आम्हाला काही स्कोप हाय का हो तिथं? :-))))

फोटू पण झकास...पण ते बाया नाचतानाचे फोटू काय मुद्दाम ब्लर केलेत काय? ;-)

आनंदयात्री's picture

21 Apr 2008 - 11:04 am | आनंदयात्री

>>फोटू पण झकास...पण ते बाया नाचतानाचे फोटू काय मुद्दाम ब्लर केलेत काय? ;-)

असेच म्हणतो, हिरमुसलो ना आम्ही !

अवांतरः बाकी डांबिसकाका एवजी डांबिसकाक हे संबोधन आवडले :)))))

एकदा तरी या स्वप्न नगरीची यात्रा घडावी ही माझी मनिषा (इच्छा) आहे.....

मात्र लास वेगासची मजा लुटायला माणूस जुगारी असण्याची मुळीच आवश्यकता नाही. मला स्वतःला जुगार तर सोडाच पण साधी रमी सुद्धा नीट खेळता येत नाही.
सेम विथ मी.....
वेश्याव्यवसाय करणार्‍या जगातील सर्वात सुंदर-सुंदर स्त्रियांची ही राजधानी आहे. माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे १०० पासून २०,००० डॉलर्सपर्यंत त्यांचे दर आहेत.
मग नक्की इथ आल्यावर स्त्री-राज्यात आल्यासारख वाटत असणार.....
तिथले पोस्ट ऑफिस कुठे असेल हे तुम्हाला माहिती असण्याची शक्यता कमी! तेंव्हा तुम्हाला शोधायला लागू नये, त्रास पडू नये म्हणून!! आणि ती तात्पुरती ऑफिसेही मध्यरात्रीपर्यंत चालू होती! आता बोला!!!:)))
आपल्या इथे वेळ (कामाची) संपली म्हणजे संपली.....

मायानगरीचे फोटो फारच छान आहेत.....

(या मायानगरीने संमोहित)
मदनबाण

नंदन's picture

21 Apr 2008 - 11:04 am | नंदन

लेख आवडला. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, जास्तीत जास्त वेळ लोकांनी कॅसिनोज मध्ये काढावा अशीच सोय केलेली दिसते. कुठल्याही कॅसिनोमध्ये खेळाच्या मशिन्सच्या दर्शनी भागात घड्याळ नसते आणि तुम्हांला झोप येऊ नये, उत्साही वाटावं म्हणून कॅसिनोतल्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक राखलेले असते, असेही काही प्रवाद ऐकलेले आहेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

21 Apr 2008 - 11:57 am | विसोबा खेचर

डांबिसा,

सुंदर रे! त्या मायानगरीची फार छान सैर घडवली आहेस..

साला, आपण पण एकदा केव्हातरी नक्की जाणार लास वेगासला आणि या शहराचे सगळे भोग अगदी यथेच्छ भोगणार! ;)

खेळून तुम्ही थकलात तर तुमच्या बसल्या जागेवर खाद्य-पेय आणून देणार्‍या अर्धवस्त्रांकित मदनिका/ मदन असतात.

वा वा! मग तर फारच छान! ;)

माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे १०० पासून २०,००० डॉलर्सपर्यंत त्यांचे दर आहेत.

अरे वा! बरं आहे की मग! ;)

असो, डांबिसा, तुझे असेच झकास लेख अजूनही येऊ देत...

आपला,
(बाईलवेडा बाहेरख्याली) तात्या.

शितल's picture

21 Apr 2008 - 5:22 pm | शितल

लास वेगास ह्या शहरावर डॉ. लाभसेट्वार या॑चे अमेरिका पाप नगरी - एक वारी, लास वेगास हे पुस्तक आहे. लास वेगास ह्या शहरा बद्द्ल छान माहिती दिली आहे.
लेख खुप छान आहे.

वरदा's picture

21 Apr 2008 - 5:43 pm | वरदा

मी कधीची ठरवतेय तिथे यायचं आता नक्कीच येणार्....काही गोष्टी अगदी नवीनच कळल्या..झकासच्...काय सहि लिहीता काका तुम्ही....

भाग्यश्री's picture

21 Apr 2008 - 10:58 pm | भाग्यश्री

आम्ही मागच्याच महीन्यात जाऊन आलो.. बेस्ट आहे वेगास.. आणि पाणी सुद्धा आणावं लागतं तिथे असं शहर उभं केलंय ते फारच भारी.. आणि कितीही नाही म्हटलं तरी ते कॅसिनो वगैरे वातावरण चढतं .. आम्ही शेवटच्या दिवशी रुले ट्राय केला, आणि जिंकायला लागलो... सोडवत नव्हतं वेगास त्यामुळे! हेहे.. पण पैसा जसा येतो तसा जातो पण.. त्यामुळे "व्हॉट एव्हर हॅपन्स इन वेगास, स्टेऽज इन वेगास" हे अगदी खरं!
फोटोज मस्तच आलेत.. टांबा ला जेवलात की नाहीत? काय बुफे होता त्यांचा.. अप्रतिम जेवण.. मी अमेरीकेमधे पहील्यांदा इतकं चांगलं भारतिय जेवण जेवले इथे..
* बाकी आयुष्यात एकदा तरी इथली 'स्ट्रॅटोस्फीअर' ची ही आणि ही राईड घ्यायची आहे... यावेळेस तिथेच राहीलो, पण राईड मधे बसायची हिंमत नाही झाली!

वात्रट's picture

22 Apr 2008 - 10:28 am | वात्रट

डांबिस राव , लय भारी लिहिता तुम्ही.....
आपन अमेरिका नामक देशी असता तर.....
असेच इतर शहरे आणि राज्यन बद्दल महिती लिहावित ही प्रेमल विनंती......

मारलेला फेरफटका आवडला!
ऐकून होतोच, आता वाचूनही आहे तेव्हा बघून येणे क्रमप्राप्तच;))
तुम्ही दिलेल्या अवतरणात थोडा बदल करुन म्हणेन "सर्वबार नमस्कारा: डॉलरंप्रति गच्छंती!"

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

22 Apr 2008 - 10:09 pm | प्रकाश घाटपांडे


गंमत म्हणजे बाहेरून होटेलला प्रदक्षिणा जरी घातली (मी येड्यासारखी इरेला पडून घातली, सव्वा तास लागला आणि रात्री पाय जाम दुखले!!) तरी त्या डोहाचा आणि बीचचा कुठेही मागमूससुद्धा लागत नाही!!


निस्त्या यका हाटेलला प्रदक्शिना घालायला सव्वा घंटा. येवढी मोठाली हाटेलं. अन अशी किति हाटेल? तिथ कुबेर गेला त मंग भिकारि होउनच बाहेर पडत आसनं.

अमेरिकेत इतरत्र सगळीकडे लग्न करायचे असेल तर आगावू नोटिस द्यावी लागते, पण वेगासमध्ये (नेवाडात) नोटिस न देता तात्काळ लग्न करता येते.


मंग काडीमोड बी झटक्यात होतो का?
हे लास वेगास डोक्याउन जानार ब्वॉ. अहो हित गोव्यात गेल्याव आमच याड पळाल व्हतं. समजा आम्ही गेलो तिकड आन याड लागल तं मंग मेंटल हास्पीटल हाय का?
प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2008 - 10:55 pm | प्रभाकर पेठकर

वेश्याव्यवसाय करणार्‍या जगातील सर्वात सुंदर-सुंदर स्त्रियांची ही राजधानी आहे. माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे १०० पासून २०,००० डॉलर्सपर्यंत त्यांचे दर आहेत.

अरे! पण, हे दर रुमचे भाडे धरून आहेत की ते वेगळे भरावे लागतात?

नुसते हॉटेलात राहायचे म्हंटले तर राहू देतात नं!

इनोबा म्हणे's picture

27 Apr 2008 - 1:03 am | इनोबा म्हणे

अरे! पण, हे दर रुमचे भाडे धरून आहेत की ते वेगळे भरावे लागतात?
काय काका,लई चवकशा करताय :?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2008 - 1:26 am | पिवळा डांबिस

अरे! पण, हे दर रुमचे भाडे धरून आहेत की ते वेगळे भरावे लागतात?

हे दर बायांचे असावेत. त्यात रूम इन्क्लूड होते की नाही याची मी अधिक चौकशी केली नाही. ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्याची......:)
बाकी बायांशिवायही रूम मध्ये राहू देतात.:))
रूमचे दर हॉटेलां-हॉटेलांप्रमाणे वेगवेगळे आहेत. एकाच हॉटेलात सुद्धा मजला, व्ह्यू, सुखसोई याप्रमाणे दर बदलत असतात. एकाच रुमचे रेटस वीकडे/वीकएंड प्रमाणेही बदलतात. मी यावेळी राहिलेल्या हॉटेल मँडले बे मधल्या रूमचे भाडे ३५६ डॉलर/रात्र असं होतं. मला वाटतं ही त्या हॉटेलातली मिड-रेंज असावी.
-पि.डा.
अधिक माहिती: http://www.mandalaybay.com/

प्रभाकर पेठकर's picture

27 Apr 2008 - 8:41 am | प्रभाकर पेठकर

काय काका,लई चवकशा करताय
अरे उगाच आपला एक किडा वळवळला डोक्यात. कोणी लासवेगासला जाणार्‍या शौकीन मित्राने चौकशी केली तर आपल्या जवळ माहिती तयार असावी.

बाकी खालील वाक्यात आमचे चारित्र्य सामावलेले आहे.

नुसते हॉटेलात राहायचे म्हंटले तर राहू देतात नं!

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2008 - 9:07 am | पिवळा डांबिस

शौकिन मित्र कशाला, तुम्हीच या इथे!
मी स्वतः तुम्हाला लास वेगासला घेऊन जाईन!
अहो, माझ्यासारखा अनुभवी गाईड दुसरा मिळणार नाही तुम्हाला!!!:))
अहो लास वेगासला आपले चारित्र्य सांभाळूनही त्याचा आस्वाद घेता येतो हो!!!
आम्ही कुठं चारित्र्य गमावलंय! पण या नगरीची खासियत ही आहे की ती तिच्या प्रत्येक टूरिस्टला काहीनकाही संस्मरणीय मिळवून देते!!!!:))
कधी येताय ते सांगा!!!
आपला,
पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर's picture

27 Apr 2008 - 6:26 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. पिवळा डांबिस,

आपल्या निमत्रणाने हुरुप आला आहे परंतु तरीही नजीकच्य भविष्यात शक्य दिसत नाहीए.पण लक्षात ठेवीन.

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Apr 2008 - 8:32 pm | डॉ.प्रसाद दाढे

खूप छान वर्णन केले आहेत डा॑बिसराव. पण खोलीचे वगैरे भाडे वाचल्यावर 'छे, हे आपले काम नाही' असे वाटले :)