चेरी टोमॅटोची पिशवी.

लतिका धुमाळे's picture
लतिका धुमाळे in जनातलं, मनातलं
1 Nov 2010 - 9:22 pm

चेरी टोमॅटोची पिशवी

५- ६ वर्षांपूर्वी आम्ही जर्मनीत एक छोट्या गावात रहात होतो. आमच्या घरा समोरच एक छोटेसे सुपर मार्केट होते, तेथे रोज लागणारया गोष्टी, भाजी व फळे मिळत. त्या दुकानासमोरच एक १२- १३ वर्षांचा मुलगा चेरी टोमॅटोच्या अर्ध्या किलोच्या पिशव्या विकत होता. जरासा गबदुलच होता.जर्मन नव्हता, अतिपूर्वेकडिल कोणत्यातरी देशातील होता. उन्हाळा खूपच असल्याने घामाने थबथबत होता. हातातील बास्केटवर "चेरी टोमॅटो २ युरो पिशवी" असा बोर्ड लावून त्या विकायचा प्रयत्न करत होता. निदान ७-८ बायकांना तरी विचारून झाले, पण पदरी निराशाच येत होती. भाजीच्या दुकानासमोर टोमॅटो विकणारया त्या मुलाचे मला कौतुक वाटले. आता हा करतो तरी काय हे मी बघत होते.

रस्त्याच्या कडेला बास्केट ठेऊन तो जरा बाजूला जाऊन बसला, पण कोणीच फिरकले नाही. आयडिया सुचुन एकच पिशवी हातात घेउन येणारया प्रत्येकाला विचारू लागला. २ पिशव्या विकल्या गेल्या. एका गाडीवाल्याने गाडी थांबवून तिसरी पिशवी घेतली. मुलाला आत्मविश्वास आला. अजून दोघीनी दोन पिश्व्या घेतल्या आणि त्याच्या सर्व पिशव्या विकल्या गेल्या.

मुलाला किती पैसे मिळाले हे महत्वाचे नव्हते. आपल्या पिशव्या विकल्या जात नाहीत तर आपली विक्रीची पद्धत बदलली पाहिजे हे जाणवून त्याने तसा विचार केला. परक्या लोकांशी बोलतांना त्याचा वाढत जाणारा आत्मविश्वास व काहीतरी मिळविल्याचा आनंद हे महत्वाचे. प्रत्येकशी बोलताना आदराने बोलत होता.पिशवी विकत घेतल्यावर आभार मानत होता. मुलगा अस्खलीत जर्मन भाषा बोलत होता. मला त्या मुलाचे खूपच कौतुक वाटत होते.

वरचा प्रसंग मी आमच्या खिडकीतून बघत होते. गेली १९-२० वर्षे मी महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील ३-४ शाळांमधून शिकवले आहे.असाच एक प्रसंग आठवला. वर्गातल्या एका मुलाच्या वडिलांचे बाजारात भाजीचे दुकान होते. तो मुलगा मिरच्या, लिंबे, कोथिंबीर एका छोट्या टोपलीत घेउन विकत असे.एक दिवस वर्गातील कोणीतरी त्याला ते विकताना पाहिले. दुसरया दिवशी वर्गात तो मुलांच्या चर्चेचा विषय होता. मी त्याना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व मुले "उच्चभ्रू" समाजातील असल्याने, आपल्या वर्गातील एक मुलगा बाजारात भाजी विकतो हे काही त्यांना रुचत नव्ह्ते. पालकांच्या प्रतिक्रियाही साधारणपणे मुलांसारख्याच होत्या.

शिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

1 Nov 2010 - 9:30 pm | प्रियाली

समाजाची मानसिकता अशा गोष्टींना कारणीभूत असते असे वाटते. अन्यथा, माझ्या वर्गातील एका वर्गमित्राची आई लोकांकडे धुणीभांडी करत असे परंतु माझ्या पूर्ण वर्गाने या मुलाला दिलेला पाठिंबा (अभ्यास, आपुलकीची भावना, खर्चातून वगळणे वगैरे) अद्यापही आठवतो. आजही माझे वर्गमित्र त्याच्याशी उत्तम संबंध ठेवून आहेत.

पण आपण म्हणता तोही किस्सा खराच वाटतो. एखाद्या गटाची मानसिकता जशी बनेल तसाच प्रतिसाद येतो असे वाटते.

खरंच आहे... समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत असच होत राहणार.

लतिका धुमाळे's picture

1 Nov 2010 - 9:52 pm | लतिका धुमाळे

तो मुलगा वडिलान्चाच व्यवसाय चालवत होता. दुकान असते तेथे मदत केली तर ते प्रतिष्टेचे.

निरीक्षण आवडले. शेवटच्या दोन ओळींतील प्रतिसाद ओळखीचा.

सुनील's picture

1 Nov 2010 - 10:21 pm | सुनील

दोन्ही प्रसंग उद्बोधक. परंतु, ते एकाच लेखात गुंफण्याएवढे परस्परसंबंधी वाटले नाहीत.

पहिल्या प्रसंगात आपले विक्रीचे तंत्र बदलून यशस्वी होण्यात त्या मुलाची हुशारी दिसते. तर दुसर्‍या प्रसंगात आपल्याकडील मध्यमवर्गात सहसा दिसणारी श्रमाच्या कामाविषयीची तुच्छता दिसते.

लेख आवडला.

अनुभव तर छान आहेच पण आपले निरिक्षणही अचूक!
मुलाने विक्रीची पद्धत बदलल्याने रिझल्टसही बदलले. किती छान!
माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा अभिमानाने सांगायचा कि त्याच्या वडिलांचा कांदेबटाटे विकण्याचा गाळा मार्केटयार्डात आहे आणि तो पहाटे उठून इतर भाज्या उतरवून घेण्यासाठी मार्केटयार्डात जातो आणि त्याला इंजिनियर होवूनही वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवण्याची इच्छा आहे.

मुलगा फारच हुषार आहे. आपलं नीरीक्षण अचूक आहेच आहे रेवतींनी म्हटल्याप्रमाणे.

चिगो's picture

1 Nov 2010 - 11:43 pm | चिगो

भारतीय बाहेरच्या देशातील लोकांच्या भौतिक सुख-समृध्दी च्या कल्पनांचे अनुकरण करतो, पण श्रमाला महत्त्व आणि किंमत देण्याची वृत्ती नाही आपली...

नेत्रेश's picture

2 Nov 2010 - 2:04 am | नेत्रेश

परवाच ऑफिसातिल सहकार्यांशी गप्पा मारताना कॉलेजचा विषय निघाला आणी एक एक जण सहज पणे सांगत होता, 'मी या या हॉटेल मघ्ये वेटर चे काम केले आहे', 'मी घरोघरी पेपर टाकले' 'मी बर्गर फ्लिप केले'. या मध्ये अगदी डायरेक्टर पासुन डेव्हलपर पर्यंत सगळयांनी ही कामे केली होती. बहुतेक सगळ्यांनी वेटरचे काम केले होते. ही कामे त्यांनी बॅचलर आणी मास्टर्स डिग्री कॉलेज मध्ये असताना केली होती. कुणाच्याही बोलण्यात अजीबात न्युनगंड / अहंगंड अजीबात नव्हता.

खुप बरे वाटले ऐकुन. मी कॉले़जला असताना माझ्या काही मित्रांची आठवण झाली. त्यातील एक जण सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावातील होता. तो उन्हाळ्याच्या सुटीत घरी जायचा नाही. ३ महीने हॉटेलमध्ये दिवसभर वेटरचे, लादी पुसायचे वगैरे काम करुन पुढील वर्षांची फी जमा करायचा. कॉलेजमध्ये त्याने हे अजीबात कुणालाही कळुदिले नव्हते. पण ते हॉटेल माझ्या नातेवाईकाचे असल्याचे त्याला समजल्यावर त्याने हे मला सांगितले होते. मी ते ३ महीने त्या हॉटेलकडे चुकुनही फिरकायचो नाही. आणखी एकजण रोज ४ वाजता उठुन पेपर टाकायला जायचा. त्यानेपण हे गुपितच ठेवले होते. ही मुले घरी गेली तर घरी आधीच अपुर्‍या असलेल्या अन्नात एक खाणाते तोंड वाढायचे, त्यामळे सुटीत हॉस्टेल आणी मेस बंद असताना रेक्टरला मस्का मारुन हॉस्टेलच्या रुम मध्ये रहायची आणी काम करत असलेल्या हॉटेल मध्ये रहायची.
ही मुले नेहमी आमच्या ग्रुपमध्ये यायची. सगळे घाटावरची 'अशुद्ध' मराठी बोलत आणी तोंडात नेहमी शिव्या असत. कधी कधी काही मित्र त्यांच्या अशुद्ध उच्चारांची आणी शिव्यांची थट्टा करीत. पण ही मुले नेहमी गप्पा मारयला यायचीच. नंतर समजले की ते आमच्या संगतीत राहुन स्वतःची भाषा 'सुधारण्यासाठी' आमच्याशी मुद्दाम बोलायला येतात. त्यानंतर त्यांचि कुणी थट्टा केली नाही. खुप कष्ट केले त्यांनी, व्यसनांपासुन स्वतःला लांब ठेवले. आता काही काँटॅक्ट नाही, पण नाक्कीच चांगल्या ठीकाणी, चांगल्या परिस्तितीत असतील.

चला, लेखापेक्षा प्रतिसाद मोठा (आकाराने) होण्याआधी आवरते घेतो.

सुहास..'s picture

2 Nov 2010 - 2:03 am | सुहास..

लेट , बट ऑन टाईम !!

सेम बट.........कान्ट राइट !!

चालु द्यात !!

शिल्पा ब's picture

2 Nov 2010 - 2:42 am | शिल्पा ब

आपल्याकडे श्रम प्रतिष्ठा वगैरे प्रकारच नाहीत हे खरे आहे..मला असं वाटतंय कि कोणतही काम करणे आणि ते सांगण्यात कमीपणा न वाटणे हि अमेरिकेचीच मानसिकता आहे...इतरांना झेपत नाही.

लेख छान...पण दोन प्रसंगांची सांगड घालण्यासारखे काही वाटत नाही.

लतिका धुमाळे's picture

2 Nov 2010 - 11:02 am | लतिका धुमाळे

सर्व प्रतिक्रियान बद्द्ल आभारी.

इंटरनेटस्नेही's picture

2 Nov 2010 - 4:48 pm | इंटरनेटस्नेही

चांगला लेख.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 4:54 pm | परिकथेतील राजकुमार

इंट्या लेका नुसता चांगला लेख म्हणुन गप्प बसु नकोस.

आपल्या पिशव्या विकल्या जात नाहीत तर आपली विक्रीची पद्धत बदलली पाहिजे हे जाणवून त्याने तसा विचार केला.

हे वाक्य लक्षात घे आणि ह्या लेखनातुन काहितरी शिक आणि तुझी कौल विकायची पद्धत बदल बघु ;)

इंटरनेटस्नेही's picture

2 Nov 2010 - 5:08 pm | इंटरनेटस्नेही

धन्यावाद दादा.. :) मी लवकरच काही धमाकेदार कौलं आणेन बाजारात..

-
इंटया (सदस्य, राजकुमार खरडविद्या संशोधन मंडळ, उणे.)