पुढच्या वाटचालीत, अर्थात "गोइंग फॉरवर्ड"

विकास's picture
विकास in काथ्याकूट
24 Sep 2010 - 8:40 pm
गाभा: 

राष्ट्रकूल स्पर्धेसंदर्भात अनेक चर्चा येथे आणि इतरत्र, तसेच वास्तव जगात चालू आहेतच. त्यातील सगळा सूर केवळ हुकमी एक्क्यामुळे अर्थात कलमाडी मुळे अथवा इतर काही हुकमांच्या पानामुळे पक्षी: सत्ताधारी राजकारण्यांमुळे झाले असा आहे. त्यात काहीच चुकीचे नाही. त्याच्याशी सहमत देखील आहे. त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा जर कायद्याने होऊ शकली तर इतरांना देखील चांगला संदेश मिळू शकेल असे वाटते. मात्र पत्यांमधील हात केवळ हुकुमाची पानेच करत नाहीत. तसेच या संदर्भात देखील अनेक "हात" आहेतच - राजकीय, बाबू, कंत्राटदार आणि शासकीय अधिकारी...

राष्ट्रकूलकांडाच्या (हा शब्द मी आत्ताच कॉइन केला आहे ;) ) मुळाशी जशी कलमाडी आणि राजकारणी कंपनी आहे तसेच अजून एक दुर्लक्षिलेली गोष्ट आहे. ती म्हणजे: "जेणो काम तेणो थाय" अशा पद्धतीने योग्य प्रोफेशनल्सना त्यांची कामे प्रोफेशनली करून देण्याची वृत्ती आणि ती असली तरी तसे काम करायला लागणारे प्रोफेशनल्स.

या संदर्भात सिव्हील इंजियर्स, पण तेच इतर क्षेत्रांतील व्यवसायिकांच्या संदर्भात देखीलः योग्य पैसा, काम, बढत्या या सर्व संबंधात सिव्हील इंजिनियर्स मागे पडत आहेत. परीणामी शिकलेसवरलेले पदवीधर इंजिनियर्स त्या क्षेत्रातून बाहेर पडून माहीती तंत्रज्ञानात जातात. मग ज्यांना पर्याय नसतो, ते कामाला राहतात खरे, पण त्यांना वाटते की "चलता है" अ‍ॅटीट्यूडला पर्याय नाही आणि मग क्वालीटी, तंत्रज्ञान सगळेच दुर्लक्षिले जाते. कंत्राटदारांना तर काय शिक्षणाची किंमत असते का हा मोठ्ठा प्रश्न आहे...

मॅनेजमेंट शिकणारे वाढत आहेत. पण त्याचा वापर केला जात आहे का? ब्रिज पडलेल्या कंपनीतील डायरेक्टर मॅनेजमेंट शिकलेला, सिईओ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधे तज्ञ. मग अवाजवी उशीर, क्वालीटी डायल्यूशन, वगैरे कसे घडू शकले?

सरकार मध्ये (आणि खरे म्हणजे खाजगी क्षेत्रातही) कामे मिळवताना ओळखीने मिळतात, काही अटी-नियम सोप्या पद्धतीने पाळले जातात वगैरे सर्व मान्य. पण डिपिडब्ल्यू आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांनी नक्की निवीदा तयार करताना आणि कंत्राट देताना अटीं कशा द्यावा याचा विचार केला होता का? त्यांनी ते ज्ञान कधी (आत्ताच्या काळात) वापरले आहे का? का आता ते वापरायचे असते हेच विसरून गेलेत. (या कंत्राटदाराकडे प्रत्यक्ष ब्रिज बांधण्याचा एक्स्पिरीयन्स पटकन तरी दिसला नाही!)

सुरवातीस म्हणल्याप्रमाणे हा प्रश्न केवळ सिव्हील इंजिनियर्सचा नसून इतर क्षेत्रातला देखील आहे. स्वतःचे क्षेत्र सोडून माहीती-तंत्रज्ञान-संगणक यात पैसे जास्त मिळतात तसेच वरील पदे पण मिळू शकतात हे ध्यानात घेऊन जर कोणी जात असेल तर त्यात त्या व्यक्तींचा देखील दोष नाही आणि माहीती-तंत्रज्ञान-संगणक क्षेत्राचा देखील दोष नाही.

पण मग हे कसे बदलायचे? कारण तज्ञ आणि शिकलेले /अनुभवी पदवीधर अनेक क्षेत्रात नसतील अशी अवस्था जेंव्हा होणार तेंव्हा त्याचे परीणाम हे केवळ राष्ट्रकूलकांडापुरते मर्यादीत नसणार तर तुमच्या-आमच्या राहत्या घरासंदर्भात, ज्याच्यावर गाडी चालवतो त्या पुलासंदर्भात असणार... हवेसंदर्भात, पाण्यासंदर्भात, वगैरे वगैरे असणार आणि भोगावे लागणार...

जर (कुठल्याही प्रकारच्या) इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये क्वालीटी हवी असली तर सर्वप्रथम ते तयार करणार्‍या टिममध्ये क्वालीटी लागेल, त्या टिममधे रहावेसे वाटण्यासाठी त्यांच्या आयुष्यात क्वालीटी लागेल, आणि त्यांना तज्ञ करण्यासाठी शिक्षणामध्ये (अगदी बिग्रीपासून) क्वालीटी लागेल...

हा प्रश्न एक काय पाच वर्षात पण सुटणार नाही. मात्र जर योग्य पावले उचलली तर दहा वर्षांनी किमान आशादायी चित्र दिसू शकेल... पण त्याच्यासाठी नक्की उपाय काय?

प्रतिक्रिया

स्वप्निल..'s picture

24 Sep 2010 - 8:48 pm | स्वप्निल..

>>त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा जर कायद्याने होऊ शकली तर इतरांना देखील चांगला संदेश मिळू शकेल असे वाटते.

खरी गोम इथेच आहे ..

व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व च्च्च्च्च्च्च्च्च्च च्च्च्च्च्च्च्च झाले मिळलि =रिक्षा चला लौकर

राष्ट्र्कुलच्या बाबत जे काही झाले ते बांधकाम क्षेत्रात भारतात नेहमीच चालते. आता या प्रकरणाने अगदी परदेशातही नाचक्की झाली एवढेच. पक्का रस्ता दर पावसाळ्यात वाहुन जातो तसेच हे ही. मुळात भारतात इंजिनियर्स कितीही तज्ञ असले तरी वरुन जशी ऑर्डर येइल त्या प्रमाणे खराब काम करणे/ खराब काम पास करणे हे करावे लागते. नकार दिल्यास प्रसंगी जीवावरही बेतते. जिथे भ्रष्टाचारच शिष्ठाचार आहे तिथे कसली आलेय क्वालिटी.

>> त्यांना तज्ञ करण्यासाठी शिक्षणामध्ये (अगदी बिग्रीपासून) क्वालीटी लागेल...>>
मान्य आहे. अगदी खरं आहे हे.
भारतात बरचसं पुस्तकीच शिक्षण दिलं जातंसं वाटतं. परीक्षेत घोकंपट्टी करून पहीला नंबर आणण्यात इतिकर्तव्यता मानली जाते. व्यवहारी जगात उपयोगी पडेल असं शिक्षण द्यायला हवं.
इथे (अमेरीका) बघते जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वगुणाला खूप महत्व दिलं जातं. मग ती स्पिरीचुअल लीडरशिप असो की कॉर्पोरेट. आणि त्यातही इन्टिग्रीटी, सचोटी, खंबीरपणा, धडाडी, संवादकौशल्य, स्फिनीक्स पक्षासारखी स्वतःच्या राखेतून परत भरारी घेण्याची जिद्द अशा प्रवृत्तींना खतपाणी घातलं जातं, त्याविषयी पुस्तकं निघतात.
व्यक्तीला लहानपणापासून "ग्रूम" केलं जातं यशाकरता, एक भौतिकदृष्ट्या तरी परीपूर्ण आयुष्य जगण्याकरता.
"कर्टसी" (सौजन्य) हा अतिशय मोहक गुण , मी तर म्हणेन सर्वात सुंदर अलंकार आहे या लोकांकडे. त्यामुळे निदान समोरच्या व्यक्तीची चांगली बाजू बाहेर येण्यास, फुलण्यास मदत तर होते. मग अपोआपच सर्वांकडून भरीव कार्य होतं.

दोष पुस्तकी शिक्षणाचा नाहिये. तसे असते तर त्याच सिस्टिम मधुन शिक्षण घेऊन इथे येणारे आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले नसते. इथे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सुरवातीपासूनच बरीच काळजी घेतली जाते. इथिक्स रुल्स मुळे भ्रष्टाचार रोखण्यास मदत होते. इथेही भ्रष्टाचार होतो पण तो रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात.
साधी शिक्षणाचीच गोष्ट घेतली तर इंजिनियरिंग/मेडिकल कॉलेजला जे मान्यता/दर्जा देण्याचे काम चालते त्यात खुलेआम भ्रष्टाचार होतो. गुणवत्ता नसलेल्या पाल्याला डिग्री विकत घेऊन देताना पालकांनाही काही वाटत नाही. इथे आपल्या सामान्य कुवतीच्या मुलाला डॉक्टर करायचा विचार अगदी स्वतः डॉक्टर असलेले पालकही करत नाहीत.

शुचि's picture

24 Sep 2010 - 11:23 pm | शुचि

खरं (अगदी मनातलं = अवांतर) सांगायचं तर - माहौल म्हणजे आसपासच्या वातावरणाने/माणसां मुळे, पॉप्युलेशन डेन्सिटीमुळे खूप फरक पडतो स्वातीताई. मी जेव्हा भारतात काम करायचे तेव्हा रात्री ९-९ वाजेपर्यंत राबायचे तेव्हाही चिकाटी/धडाडी/पॅशन होती पण जे पॉलीटीक्स होतं ना ते नकोसं वाटायचं. नंतर गर्दीतून अंग चोरत चोरत, रस्त्यांवरची थुंकी /घाण टाळत टाळत घरी जाण्यात जीव अर्धा होऊन जायचा.

अमेरीकीत खूप पर्सनल स्पेस मिळाली आणि व्यक्तीमत्व फुललं. कामात नेहेमी 'ऑन द टॉप" असावं हा ध्यास होताच पण त्याला अतोनात पोषक वातावरण मिळालं म्हणजे पॉलीटीक्स नसणं, प्रोत्साहन मिळणं, ट्रेनिंग मिळणं. रस्त्यांवर गर्दी नसणं. त्यामुळे जी शक्ती नाहक नको त्या गोष्टींमधे जायची ती विधायक कामात लागली, स्वतःच्या प्रगतीकडे, कुटुंबाच्या स्वास्थ्याकडे वळली. भारतात पॉप्युलेशनवर हुकमी तोडगा अजून तरी काही नाही.

पण थोडक्यात काय तुमचं म्हणणं मान्य आहे फक्त पुस्तकी ज्ञान हे कल्प्रिट नाही. पण अनेक फॅक्टर्स आहेत. जे अतिशय "लक्षात न येणारे (सटल)" आहेत.

विजुभाऊ's picture

27 Sep 2010 - 11:42 am | विजुभाऊ

इथे (अमेरीका) बघते जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वगुणाला खूप महत्व दिलं जातं.
मी जेव्हा भारतात काम करायचे तेव्हा
भावना पोचल्या.

मस्त कलंदर's picture

24 Sep 2010 - 11:15 pm | मस्त कलंदर

कारण तज्ञ आणि शिकलेले /अनुभवी पदवीधर अनेक क्षेत्रात नसतील अशी अवस्था जेंव्हा होणार तेंव्हा त्याचे परीणाम हे केवळ राष्ट्रकूलकांडापुरते मर्यादीत नसणार तर तुमच्या-आमच्या राहत्या घरासंदर्भात, ज्याच्यावर गाडी चालवतो त्या पुलासंदर्भात असणार... हवेसंदर्भात, पाण्यासंदर्भात, वगैरे वगैरे असणार आणि भोगावे लागणार...

जर (कुठल्याही प्रकारच्या) इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये क्वालीटी हवी असली तर सर्वप्रथम ते तयार करणार्‍या टिममध्ये क्वालीटी लागेल, त्या टिममधे रहावेसे वाटण्यासाठी त्यांच्या आयुष्यात क्वालीटी लागेल, आणि त्यांना तज्ञ करण्यासाठी शिक्षणामध्ये (अगदी बिग्रीपासून) क्वालीटी लागेल...

नव्या मुंबईत सिडकोने घरे बांधली आहेत. आणि सिडकोमध्ये आयआयटी मधून आलेले सिव्हिल इंजिनिअर्स आहेत. तरीही कोणत्याही प्रकारच्या घरामध्ये (B-10, C-5,C-6, JN-1 आणि तत्सम) अगदी दिवसाही सूर्यप्रकाश येत नाही. दिवसभर सतत विजेचे दिवे जाळत राहावे लागते. वायुवीजन(व्हेंटिलेशन) कडेही लक्ष दिल्याचे मी पाहिलेल्या घरात मला जाणवले नाही. जर आयआयटी की जो आपल्याकडच्या गुणवत्तेचा मानदंड मानला जातो, तिथल्या लोकांनी ही असली क्वालिटी दिली, तर इतर लोकांच्या क्वालिटीबद्दल काय बोलावे?

चित्रा's picture

25 Sep 2010 - 12:09 am | चित्रा

एक समजूत सुधारू इच्छिते.
सिव्हिल इंजिनीअरांच्या चुका असतातच, त्या नसतात हे म्हणता येत नाही.
पण बिल्डिंगच्या प्लॅनिंगचे काम आर्किटेक्टांचे असते. लाईट कुठून कसा येतो, व्हेंटिलेशन इ. या गोष्टी आर्किटेक्ट लोकांच्या अखत्यारीत येतात. हे काम इंजिनीअरांचे नाही.

रेसिडेन्शियल बिल्डिंगांमध्ये आर्किटेक्ट लोक मटेरियल कुठचे वापरायचे ठरवतात, परमिशन्सही तेच आणतात. सिव्हिल वर्क सोडले तर परमिशनचे काम इंजिनीअरांचे नसते. आर्किटेक्ट लोक हे बिल्डिंगचे खांब कुठे असतील याचे टेन्टेटिव्ह प्लॅनिंग करतात. स्ट्रक्चरल इंजिनीअर हे प्लॅनिंग रिफाईन करतात, सुधारतात, बीम-कॉलमचे साईझ ठरवतात, आत कुठे, किती लोखंडी सळ्या (रीइन्फोर्समेंट) घालायची हे ठरवतात. सिव्हिल इंजिनीअर ते बांधतात.

पण खिडक्या कुठे, किती कशा असाव्यात हे इंजिनीअर ठरवत नाहीत, ते काम आर्किटेक्ट लोकांचे असते.

अनामिक's picture

25 Sep 2010 - 1:09 am | अनामिक

अगदी हेच लिहिणार होतो.

मस्त कलंदर's picture

25 Sep 2010 - 2:12 am | मस्त कलंदर

ह्म्म.. डिझाईन आर्किटेक्ट्स करतात, इंजिनिअर्स नाही. मी घाईत असाच इन जनरल इंजिनिअर हा शब्द वापरला. यावर एकदा चर्चा झाली होती तेव्हा , प्लॅनिंग टीममध्ये-मग त्यात आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्स दोन्ही आले- ही आयआयटी मधले असतात. तरीही संरचना अशी का हा चर्चेचा विषय होता.

माझी चूक जाणवून दिल्याबद्दल आभार. :)

चित्रा's picture

25 Sep 2010 - 3:45 am | चित्रा

माझी चूक जाणवून दिल्याबद्दल आभार

जाणवून नाही, समजून! आणि चूक नाही, समजूत. :)

बरेचदा मी पाहिले आहे, लोक आर्किटेक्ट आणि इंजिनीअरांचे काम सरमिसळ करतात. सिव्हिल इंजिनीअर रस्ते बांधतात असे म्हणतात. आणि आर्किटेक्ट बिल्डिंग. तरी दोष येताना आर्किटेक्टकडे बहुदा येत नाही. दोषाचे धनी इंजीनीअर आणि कॉन्ट्रॅक्टर होतात. खरेतर हल्ली जास्तीत जास्त एफ एस आय वापरण्याच्या नादात प्लॅनिंगला धाब्यावर बसवले जाते. याला सर्वचजण जबाबदार आहेत - कॉन्ट्रॅक्टर, मालक, आणि आर्किटेक्टही.

मस्त कलंदर's picture

25 Sep 2010 - 10:42 am | मस्त कलंदर

माझा एक मित्र आहे, सिटी प्लॅनिंगमध्ये काम करतो. त्यानेही चारेक वर्षांपूर्वी माझे हेच बौद्धिक घेतले होते . पण मीच घाईघाईत इंजिनिअर्स म्हणून गेले. :)
लोकांचे असे समज असतात, किंबहुना माझेही होते, हेही तितकेच खरे!!!
असो.. खूपच अवांतर केलं मी इथे..

अनिल २७'s picture

25 Sep 2010 - 6:33 pm | अनिल २७

चित्राताई, सिव्हिल ईंजिनीअर व आर्किटेक्ट यामधील फरक अगदी चपखलपणे लक्षात आणून दिल्याबद्दल खूप खूप आभार.. लोकांची कायमच गल्लत होते व सिव्हिल ईंजिनीअर बरेचदा बदनाम होतात..

वाटाड्या...'s picture

25 Sep 2010 - 2:02 am | वाटाड्या...

नुकतीच भारताची त्यातही पुण्याची चक्कर टाकुन आलो नी पहिल्यांदा उघड्या डोळ्यांनी आपला भारत पाहीला. आजपर्यंत जाज्वल्य भारत अभिमानी होतो (तसा अजुनही आहे, पण त्याला आता कुठेतरी जबरदस्त ठेच लागली आहे). असं का झालं याची कारणं शोधताना मला काही गोष्टींचा उलगडा झाला तो असा..(कदाचीत त्यामधे तुम्हाला काही उत्तरं मिळायची शक्यता आहे)...

१. भारतीय लोकांकडे उत्तमाचा का काय तो म्हणतात ध्यासच नाहीये...(Stephen Covey म्हणतो त्या प्रमाणे आपले लोक फक्त reactive असतात Proactive नसतात..) त्यामुळे आपण खराब काम केलं तर आपली जी इज्जत का काय म्हणतात ती आपल्या व इतरांच्या डोळ्यांत राहणार नाही याची जराही खंत नसते,

२. आत्मसन्मान वगैरे आता फक्त भारतीयांनी दुसर्‍याला सांगायच्या गोष्टी झाल्या आहेत,

३. सध्याच्या (भारतातील) धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना एकापरीने इतक्या समस्यांचा सामना रोजी करावा लागतो की चांगले विचार, चांगले आचार, चांगली कर्म यांचा कोणाला साधा विचार सुद्धा करवत नाही,

४. भारतात एखादा चुकीचा वागतो म्हणुन आपण त्याला शह द्यायचा म्हणुन आपण त्याच्या दुप्पट चुकीचं वागायचं असा एक चुकीचा पायंडा पडला आहे,
माझा अनुभव पहा: वैद्य खाडीवाल्यांच्या दवाखान्यात रात्रीची वेळ. दवाखाना बंद होण्याची वेळ. प्रचंड गर्दी. काहीही शिस्त नाही गर्दीला. एक साधारण ४५-५० चे एक काका तावातावाने मला म्हणाले की 'हम भारतीय कभी नही सुधरेंगे'.
मी म्हटलं, काका काय झालं?
तर म्हणाले, बघा काय गर्दी आहे, मी इतका वेळ इथे उभा आहे नी माझ्या मागुन आलेली मंडळी पुढे निघुन गेली.
तर म्हटलं, काका चला आपण रांग सुरु करु, तुम्ही पुढे नी मी तुमच्या मागे. बाकीच्या मंडळींना मी आपल्या मागे यायला सांगतो.
तर म्हणाले नाही, मी नाही करणार. म्हट्लं का? तर म्हणे इतका वेळ थांबलो आत १० मिनीटाने काय फरक पडणार आहे?
४५-५० वर्षांचा एक सिनियर माणुस माझ्यापुढे हा आर्दश ठेवत होता त्याच्या हे लक्षातही आलं नाही.

शितावरुन भाताची परिक्षा करुयात का? दिल्लीमधे जे काय झालं ह्या मुळे भारताची काय इमेज राहीली जगात? आधीच जग आपल्या भारतीयांना 'चिप' म्हणतं. स्विकारा अथवा नका स्विकारु पण सत्य तेच बोलतोय. ह्या गोष्तींचा आपण भारतीय कधीतरी थोडं थांबुन विचार करणार आहोत का? ३००० फुटांवरुन एखादा प्रश्न पहाणार का ३०००० फुटांवरुन पहाणार ?

जाता जाता एक किस्सा ह्या निमीत्तानं आठवला तो देतो..
पुण्याच्या युनिवर्सिटीला आपल्या कडेचे लोक 'oxford of east' असं बिरुदावली मिरवत असत. त्यावर जयंत नारळीकर म्हणाले होते, की 'let West say that you are oxford of east', नुसतं तुम्ही म्हणुन काय उपयोग?

मला वाटतं की नारळीकरांच्या ह्या वाक्याचा अर्थ समजणार्‍याला जास्त काही सांगायची गरज नाही..
माझे हे उत्तर कदाचीत तुमच्या विषयाला सोडुन आहे असं वाटेल पण मुळ प्रवृत्तीचा प्रश्न असल्यामुळे ह्या विषयाला अनुसरुन प्रतिसाद द्यावासा वाटला.

धन्यवाद..

- वाटाड्या...

प्रदीप's picture

25 Sep 2010 - 11:21 am | प्रदीप

भारतात सध्या आय. टी. क्षेत्राचे इतके महत्व आहे की त्यातच बराच पैसा मिळू शकतो, त्यामुळे अनेक जण इतर काहीही शिकून शेवटी आय. टी. मधे जातात. हे कॉमनवेल्थकांड होण्यापूर्वी इथे ह्याच विषयावरील लेख वाचनात आला होता. त्यातील काही आकडेवारी बोलकी आहे. १९९० साली सिव्हील इंजिनीयरींगच्या कोर्सेससाठी भारतभर १३,५०० जागा उपलब्ध होत्या तर आय. टी. व कॉम्प्युट सायन्सच्या कोर्सेससाठी १२,१००. २००७ साली ह्याच जागा अनुक्रमे २२,७०० व १९३,५०० इतक्या झाल्या होत्या. २००८ साली जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताच्या तत्कालिन इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याच्या प्रयत्नास विचार घेता, तेव्हा भारतात जेव्हढे सिव्हील इंजिनीयर्स होते त्याच्या तिप्पट असावयास हवे होते. सरकारातच नव्हे तर अगदी खाजगी बांधकाम क्षेत्रातील कंपन्याही सिव्हील इंजिनीयर्सना चांगले पगार देत नाहीत, असे हा लेख नमूद करतो.

वरील लेखात म्हटले आहे की सरकार ३० युनिव्हर्सिटीज निर्माण करीत आहे, तसेच बाहेरील युनिजनाही भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही जोंवर आपले इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्याचे कार्य खर्‍या अर्थाने वेग घेत नाही, तोंवर त्या क्षेत्रातील पगार तुटपुंजेच रहाणार.

चीनशी तुलना करण्यावाचून राहावत नाही. तेथे सरकारने पुढाकार घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्यावर ऐंशीच्या दशकापासूनच भर दिला. त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे. नुसते रस्ते, हायवेज, पूल, धरणे इतकेच नव्हे तर रेल्वेचे जाळे पसरवण्यावर व आहे हे अधिक वेगवान व आधुनिक करण्यावर त्यांनी बराच भर अलिकडील काळात दिला आहे. ह्यायोगे आता केवळ त्यांच्या देशातच नव्हे तर इतरस्त्र (अगदी अमेरिकेतही) ते रेल्वे बांधण्यासाठी तयार झालेले आहेत. रेल्वे इंजिनीयरींगचेही तेथे खास कोर्सेस आहेत असे वाचनात आले होते.

लवकरच आपणासही इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत शिक्षणाविषयी व त्या क्षेत्रातील इंजिनीयर्सच्या आर्थिक परिस्थितीबद्दल ठोस पावले उचलावी लागतील.

विकास's picture

25 Sep 2010 - 7:10 pm | विकास

आकडेवारीबद्दल धन्यवाद.

त्या आकडेवारीपेक्षा जरी तिप्पतीने अधिक हवे असले तरी अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या आकडेवारीतील ३३% तरी स्थापत्यशास्त्रात रहातात का हा देखील संशोधनाचा विषय होऊ शकेल.

हाच मुद्दा मांडायचा होता. हे केवळ स्थापत्यशास्त्रच नाही तर इतर अनेक क्षेत्रांना त्याचे परीणाम भोगायला लागू शकतात.

सरकारातच नव्हे तर अगदी खाजगी बांधकाम क्षेत्रातील कंपन्याही सिव्हील इंजिनीयर्सना चांगले पगार देत नाहीत, असे हा लेख नमूद करतो.

प्रश्न केवळ पगाराचाच नाही आहे. असा एक काळ होता जेंव्हा बँकेत तुलनेने अधिक पगार मिळत. तरी देखील प्रत्येकाची बँकेत जाण्याची धडपड नसायची. कारण जॉब सॅटीसफॅक्शन आपल्या आवडत्या क्षेत्रात होऊ शकत असायचे.

रेवती's picture

25 Sep 2010 - 7:13 pm | रेवती

आपले इन्फ्रास्ट्रक्चर बळकट
तसे करणे सरकारला महागात पडणार. इंफ्रास्ट्रक्चर चांगले असल्यास त्याचा लाभार्थी असलेला तो नोकरदार वर्ग आपोआप कार्यक्षम होवून पगारवाढीचा धोका संभवतो. जो कागदोपत्री नोंद झालेला कायमस्वरूपी खर्च निर्माण होउन बसेल. त्यापेक्षा सध्यातरी लोकांना त्यांच्या शक्तीचा (मानसिक, शारिरीक) पूर्ण वापरच करू न देणे व एकमेकांत चिडचिड करत ठेवणे (त्यामुळे आपल्या पोराबाळांचे व आपले धंदे चालवणे) असे फायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना अगदीच सगळे हवे आहे ते जातील परदेशात! त्यामुळे जोपर्यंत चालले आहे तसे चालू देणे परवडते.
मला वर्षा दिडवर्षापूर्वीपर्यंत हरित देशात काही चांगले पाहिले कि आपल्या देशात असे असायला हवे असे सारखे वाटत असे पण आजकाल खरोखर आठवणही येत नाही. हे वाईट आहे पण शेवटी आपणही बघतो आणि विचार करतो कि हे सगळे निर्माण होण्यास लागणारी जिद्द, मेहनत आणि सरकारचे पाठबळ (त्यांच्या फायद्यासाठी का होइना) लागते ते आपल्याकडे नाही. चांगल्या, शिस्तीच्या सवयींचा आभाव हेही कारण आहेच. चांगले ते शिकण्याची इच्छा आपल्याकडे नाही. त्यांचे अनुकरण आम्ही का करू? असे म्हणताना आपण चांगल्या सवयींचे अनुकरण करण्याबद्दल विचार करण्याऐवजी 'ते लोक' याचा विचार करून आपल्या देशाच्या प्रगतीच्या आड येतो हे लक्षात येत नाही. मिपावरच या विषयावर पूर्वी झालेल्या अनेक चर्चांमधून कितीतरी सदस्यांनी 'आमचं ते आमचं, तिकडचं काही सांगू नका' असा सूर लावला होता. सुशिक्षित म्हणवणार्‍यांनी असे करायचे तर अविकसीत राज्यांबद्दल बोलायलाच नको.

विकास's picture

25 Sep 2010 - 7:28 pm | विकास

ह्यायोगे आता केवळ त्यांच्या देशातच नव्हे तर इतरस्त्र (अगदी अमेरिकेतही) ते रेल्वे बांधण्यासाठी तयार झालेले आहेत. रेल्वे इंजिनीयरींगचेही तेथे खास कोर्सेस आहेत असे वाचनात आले होते.

ह्यावरून कोकण रेल्वेची आठवण झाली. कोकण रेल्वे हे स्वप्न अनेक दशके राहीले होते. व्हिपीसिंगांच्या (का त्यानंतरच्या अजून एका तिसर्‍या आघाडीच्या) मंत्रीमंडळातील रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी एक आश्वासन दिले की आमचे सरकार टिको अथवा न टिको, कोकण रेल्वे पाच का अशाच ठरावीक काळात पूर्ण होईल असे निर्णय घेण्यात येतील. त्यातून निमसरकारी(?) कोकण रेल्वे कॉर्प. स्थापण्यात आली. त्याला अर्थातच बर्‍यापैकी स्वायत्त निर्णय घेता आले आणि स्वप्नपूर्ती झाली. आज कोकण रेल्वे पण इतरत्र कंत्राटे घेत आहे अथवा तसे प्रयत्न करत आहे. स्वायत्तेमुळे ज्यांना पैसे खायचे असतील त्या मंत्री-संत्र्यांना मिळाले असतील ही पण प्रोफेशनल्सच्या कामात ढवळा ढवळ होऊ शकली नाही/झाली नाही. (काही चूका नक्की झाल्या असतील पण गलथानपणा झाला नाही). असे वाटते की किमान अशा पद्धतीने स्वायत्त बोर्ड राष्ट्रकूलासाठीपण तयार करायला हवे होते. अर्थात तसे (स्वायत्त बोर्ड) असूनही झाले असले तर बोलणेच खुंटले!

प्रदीप's picture

25 Sep 2010 - 8:01 pm | प्रदीप

चे चेयरमन मला वाटते श्री. राजाराम नावाचे अत्यंत कार्यक्षम अधिकारी होते. मला आठवते त्यानुसार त्यांनी नंतर दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापन त्याच नेटाने केले.

कोकण रेल्वे इतरस्त्र कितपत बांधकामाची व व्यवस्थापनांची कामे घेत आहे, हे नक्की माहिती नाही. चिनी मात्र एकतर त्यांच्या देशातच रेल्वे प्रकल्प अत्यंत नेटाने राबवित आहेत. नुसतेच आहे ते रेल्वे जाळे दूरवर पसरवणे इतकेच नव्हे, तर वेगवान गाड्यांचे जाळेही ते शीघतेने उभारत आहेत. त्यातील उपकरणे व सामग्री त्यांनी आता स्वतःहून तयार केली आहे व इतरस्त्र ह्यासाठी ते जपान, फ्रान्स व जर्मनी ह्यांच्याशी स्पर्धा करीत आहेत, असे वाचून आहे. चिनी आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर पाय रोवत आहेत, त्यात तिथे रेल्वे प्रकल्प मिळवणे हा एक मोठा भाग आहे. पण असेही वाचले आहे की अमेरिकेतीलही काही संभाव्य रेल प्रकल्पात त्यांनी बराच रस दाखवला आहे. लॉस एंजलिस ते सॅन फ्रांसिस्को ह्या दोन शहरांना जोडणार्‍या रेल- प्रकल्पात ते उतरणार असल्याची चिन्हे आहेत. ह्यात अगदी आर्थिक गुंतवणूक करण्याची तयारीही चीनने दर्शवली आहे, अशी बातमी आहे. अशा तर्‍हेची आर्थिक गुंतवणूक आपल्याला करता येणे शक्य नाही. पण भारतीय रेल्वेने असे प्रकल्प इतरस्त्र कुठे मिळवले का, ह्याविषयी काही माहिती मिळावी. पुढील एक दोन दशकांमधे दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेचे महत्व वाढणार आहे, अशी लक्षणे दिसत आहेत.

मैत्र's picture

27 Sep 2010 - 12:26 pm | मैत्र

http://en.wikipedia.org/wiki/E._Sreedharan

मेट्रो मॅन... कोकण रेल्वे जवळ जवळ अशक्य मानलेला प्रोजेक्ट होता... असंख्य प्रतिकूल गोष्टी असताना अतिशय अवघड प्रोजेक्ट पूर्ण केला...

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Sep 2010 - 11:34 am | llपुण्याचे पेशवेll

आली कोकण रेल्वे आणि गेली पांडू गुरवाच्या परसातून म्हणून थोट्या पांडूला काय हाताचे खुंट फुटणार आहेत का? :)
कोकण रेल्वे झाली खरी पण कोकणाला उपयोग किती त्या कोकण रेल्वेचा? चिपळूण सावंतवाडी पॅशेंजर फुल्ल नाईट घेते प्रवासाला कारण काय? तर या मार्गावरून जाणार्‍या राजधानी, गोवा-निजामुद्दीन अशा गाड्यांना वाट द्यायची असते ना. मुंबईतून दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्यांमधे आख्ख्या कोकणालात असणार्‍या जागांची आरक्षणे किती? १० आख्ख्या गाडीमधे चिपळूणला १० आरक्षणे फक्त.
त्यामुळे कोकण रेल्वेत आम्ही जमिन घालवून बसलो याचे आम्हाला हल्ली वाईट वाटते आहे . कोकण रेल्वेच्या बहुतांश मोठ्या शहरांची स्टेशने शहराबाहेर. मूळात कोकणातली शहरे कितीशी मोठी? तिथेही रेल्वे स्टेशने शहराबाहेर. कोकण रेल्वे ही कोकणासाठी नसून दक्षिणेत जाणार्‍या गाड्यांना झटकन वाट मिळावी म्हणूनच बनलेली आहे.

नितिन थत्ते's picture

25 Sep 2010 - 1:06 pm | नितिन थत्ते

>>चीनशी तुलना करण्यावाचून राहावत नाही. तेथे सरकारने पुढाकार घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्यावर ऐंशीच्या दशकापासूनच भर दिला. त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे.

अरेच्चा !!!!

आम्हाला तर गेली १९ वर्षे सांगितले जात आहे की सरकारने सगळे खाजगी उद्योगांवर सोडावे. सरकारने फक्त फॅसिलिटेटर* म्हणून काम करावे.

*फॅसिलिटेटर = उद्योगांना हवी असलेली जमीन कमी दराने संपादित करून देणे. त्यांच्या सोयीप्रमाणे कायदे वाकवून/बदलून देणे, त्यांना स्थानिक लोकांनी विरोध केल्यास तो बळाचा वापर करून मोडून काढणे वगैरे कामे करणे.

सहज's picture

25 Sep 2010 - 3:50 pm | सहज

ये लगा सिक्सर!

फक्त तोट्यातले धंदे, जर नफ्यात आणता येत नसतील तर विकावे असे म्हणता म्हणता १९ वर्षात.....

प्रदीप's picture

25 Sep 2010 - 6:23 pm | प्रदीप

चीनमधेही सरकारच सर्व काही इंफ्रास्ट्रक्चर स्वतःच बांधते व त्याची म्यॅनेजमेंट करते असे नाही. तिथेही अनेक खाजगी कंपन्याच पोर्ट्स, हायवेज वगैरे बांधतात व ते म्यॅनेज करतात. बीजिंगच्या एयरपोरर्टपासून बर्‍याच विमानतळांची मॅनेजमेंटही खाजगी कंपन्यांच्या ताब्यात आहे. निमसरकारी विमान कंपन्या तर अनेक आहेत (प्रांतिय, पण एकमेकांशी स्पर्धा करणार्‍या). तेथील सरकारांचा (केंद्रीय व प्रांतिय) त्यात हात असला तरी त्या कंपन्या १००% सरकारी नसतात. सरकारांनी ह्या प्रकल्पात फॅसिलिटेशन केलेले असते .

आपण दशकांनू दशके साम्यवादाची पताका खांद्यावर घेऊन चालण्यात आनंद मानला. त्याचवेळी त्या देशाने साम्यवाद आपणास हवा तसा व हवा तिथे वापरला व इतरस्त्र भांडवलशाही राबविली.

मैत्र's picture

27 Sep 2010 - 12:37 pm | मैत्र

आदिवासी जमिनी ताब्यात घेणे कारण तसेही ते त्याचं फारसं युटिलायझेशन करत नाहीत. शेकडो हेक्टर जमिनीतून फारसं उत्पन्न घेत नाहीत. तिथलं पाणी कोणी वापरत नाही म्हणून वाया जातंय. इथे राहायला जागा नाही लोकांना आणि हे लोक इतकी जमीन वाया घालवतात..

नवीन भारतात एकही 'हिल स्टेशन' वसवण्यात आलं नाही ही भारताच्या प्रगतीला खीळ घालणारी गोष्ट आहे. कार शिवाय जाता येणार नाही असं आणि दक्षिण मुंबईत राहणार्‍यांनाच परवडेल असं हिल स्टेशन उभं करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हातभार लावत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर गुंतवलेला पैसा आणि प्रयत्न वाया जाणे हे भारताच्या अर्थकारणाला उपयोगाचं नाही. म्हणून थोडे पैसे मूळ मालकांना देऊन (शक्य झाल्यास) इन्फ्रास्ट्रक्चर ची ग्रोथ टिकवून ठेवण्याचा सरकार सर्वतो परी प्रयत्न करत आहेच की...

या सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे, ते म्हणजे भारतीयांमधील 'देशप्रेमाचा' आभाव.. सामान्य भारतीय समाज ईतर अनेक प्रकारच्या अस्मितांनी बांधला गेलाय कि त्यास 'देशप्रेम' या विषयावर विचार करण्याची गरजच वाटत नाही. ज्याच्या हातात अधिकार येतात तो त्याचे अधिकार वापरून केवळ स्वतःचा विकास (!) करून घेतो.. अगदी कुठल्याही प्रकाराने. मग देशाचे काय होईल, जगापुढे देशाची काय ईज्जत रहील, पुढच्या पिढिसमोर काय आदर्श उभा राहील यासारख्या प्रश्नांना त्याच्यादृष्टीने काडीचेही महत्त्व नसते..
"सिव्हिल ईंजिनीअरींग" ही एक अशी शाखा आहे कि जिचा सामान्य जनतेशी अतिशय जवळून संबंध येतो.. त्या शाखेचे प्राथमिक ज्ञानही अगदी कुणीही थोड्याशा अनुभवानंतर मिळवू शकतो.. मग तेवढ्या ज्ञानाचेच भांडवल करून एखादा अल्पशिक्षितही पैसा वापरून कॉन्ट्रॅक्टर बनतो. मग असा कॉन्ट्रॅक्टर ईंजिनीअरला काय ईज्जत देऊ शकणार आहे? आतातरी बरे दिवस आहेत म्हणाव ईतकी भीषण परीस्थिती ५ वर्षांपूर्वी होती. मी ईंजिनीअरींगची डिग्री हातात पडल्यानंतर कधीकाळी रु. १५००/- प्रती महिना ह्या पगारावर काम केले आहे. सर्वच हुशार ईंजिनीअर्सनी करीयर स्विच केले आही असेहि नाहीये. अजूनही खुप चांगले ईंजिनीअर्स ह्याच क्षेत्रात काम करत आहेत. पण एकंदरीत भ्रष्ट व्यवस्थेमुळे तो हतबल झालेला आहे. नंतर त्यालाच मिळणार्‍या शिव्यांनी तो पार खचलेला आहे.
असो... मला मात्र कुठेतरी आशेचा किरण दिसत आहे, भारत हळूहळू कूस बदलत आहे. हि सर्व परीस्थिती स्थिंत्यतराची आहे. हे स्थित्यंतर होण्यास किती कालावधी जाईल हे सांगता येत नाही, पण ते होणार हे नक्की.

ह्या प्रश्नांपर्यंत पोचता येईल असे वाटत नाही. आत्तापर्यंत जे उपाय झाले आहेत आणि पुढेही होतील त्यात वरवरच्या मलमपट्ट्यांनी फारसे काही साध्य होणार नाही कारण मुळापासून विचार आणि मानसिकता बदलणे, वैयक्तिक स्तरावर सवयी बदलणे हे फार गरजेचे आहे.

१ - लोकसंख्या नियंत्रण - हे भारतासाठी अत्यंत गरजेचे पाऊल आहे. लोकजागृती करणे ह्यात लोकांनी आपली कुटुंबे नियंत्रित ठेवणे गरजेचे आणि मुख्य म्हणजे सरकारने हा उपक्रम ठोसपणे हाती घेऊन लोकांमधे ह्याचा प्रसार करायला हवा. खूप मोठा विषय आहे. किमान १० वर्षे जोमाचे प्रयत्न आवश्यक.
२ - एकूणच वैयक्तिक आणि पर्यायाने सामाजिक शिस्तीत वाढ होणे गरजेचे - हे सुद्धा घरापासूनच सुरु होते. आपल्या नेहेमीच्या वागण्यात, रोजच्या जगण्यात आपल्या स्वतःला आणि मुलांना शिस्तीचे धडे देणे आणि गिरवून घेणे अत्यावश्यक. कुटुंबाचा घटक आणि पर्यायाने समाजाचा एक घटक म्हणून प्रत्येकाने कणभर वाटा उचलला की मणभर काम सहज होते हे लक्षात येणे गरजेचे.
३ - शारीर श्रमांचे महत्त्व - श्रमव्यवस्थेचे महत्त्व आपल्या उदाहरणातूनच मुलांना पटू शकते. काहीएक कष्ट केल्याशिवायच काही मिळणे हे ऐदी बनवण्यातले पहिले मोठे पाऊल असते.
४ - किमान दोन वर्षे अनिवार्य लष्करी शिक्षण - ११ वी आणि १२ वी च्या वयात प्रत्येकाला शाळा/कॉलेजात हे शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे. कोणा एकाचे नेतृत्त्व मानणे, आज्ञांचे पालन करणे, ह्या सवयींचे महत्त्व अंगी बिंबणे महत्त्वाचे. आपल्या वैयक्तिक शिस्ती-बेशिस्तीमुळे आजूबाजूच्या गोष्टीत केवढा फरक पडतो हे समजणे गरजेचे.
५ - सामाजिक काम अनिवार्य - सगळ्या महाविद्यालयीन शिक्षणात कोणते ना कोणते सामाजिक काम (झोपडपट्टी स्वच्छता, नदीची स्वच्छता, डोंगरांची स्वच्छता, पाणी साठवण्याचे प्रयोग, गरीब मुलांच्यासाठी मोफत शिक्षणाचे प्रयोग असे अनेक प्रकार अंतर्भूत होऊ शकतात.)
६ - भ्रष्टाचार नियंत्रण - ह्याचीही सुरुवात स्वतःपासूनच होते. आधी आपण छोटे छोटे भ्रष्टाचार घरापासून ऑफिसपासून आजूबाजूच्या परिसरापासून सुरु करतो, कधी इच्छेने कधी अनिच्छेने त्यात सहभागी होतो ते कमी करत थांबवले पाहिजे. मुलांना जाणीवपूर्वक ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. ह्याचाही परिणाम दिसायला किमान १० वर्षे लागतील.

आणखीही बर्‍याच गोष्टी आहेत पण विस्तारभयास्तव सगळे मुद्दे इथे आणणे अवघड आहे.
एकूण प्रयत्न २० ते २५ वर्षांचे आहेत - एक संपूर्ण पिढी ह्यातून गेली तर पुढल्या पिढीत काही बदल निश्चित दिसतील. त्यातून मग इतर गोष्टी सुचत जातात आणि करणेही शक्य होते.

चतुरंग

शुचि's picture

25 Sep 2010 - 8:44 pm | शुचि

उत्तम प्रतिसाद

चिरोटा's picture

25 Sep 2010 - 9:05 pm | चिरोटा

हेच म्हणतो.

पण भारतीय रेल्वेने असे प्रकल्प इतरस्त्र कुठे मिळवले का, ह्याविषयी काही माहिती मिळावी

कोकण रेल्वे प्रकल्प अर्थातच कमी वेळात यशस्वी रित्या पूर्ण(माझ्यमते १९९६ साली) झाला. पण अजूनही पावसाचा जोर जरा वाढला की कोकण रेल्वे बंद पडतेच. इतरत्र,विशेष करुन भारताबाहेर प्रकल्प मिळवताना ह्या मुद्द्याचा विचार होणारच.
बाकी भारतिय सिविल ईंजिनियरिंग/आर्किटेकचर बद्दल खास बोलण्यासारखे काही आहे असे त्या क्षेत्रातले लोकही म्हणणार नाहीत!!.
वर चतुरंगानी मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेतच पण चाकोरीबाहेर जावून विचार करण्याची क्षमता हे कारण जास्त महत्वाचे वाटते.भारतात संगित्/कला/साहित्य ह्या क्षेत्रांमध्ये जे innovation दिसते ते विज्ञान्/अभियांत्रिकी क्षेत्रांत त्यामानाने खूपच कमी दिसते.

मधे उत्तम प्रकल्प पार पाडण्याची क्षमता आहे. कोयना धरणाच्या ज्या चार स्टेजेस आहेत त्या सगळ्या भारतीय अभियंत्यांच्या कामाचीच कमाल आहेत. मी स्वतः कोयनेचा चौथा टप्पा आतून पाहून आलो होतो - लेक टॅपिंग ह्या नॉर्वेजियन तंत्राचे काम संपूर्णपणे आपल्याच तज्ञांनी पूर्ण केले. प्रकल्पाचे अत्यंत अवघड खोदकाम सुद्धा बेळगावच्या पाटील इंजिनिअरिंग (चूभूदेघे) ह्या कंपनीने अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेले आहे. माझ्या अतिशय जवळच्या अशा दोन नातेवाइकांनी कोयना प्रकल्पावर काम केलेले आहे. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की तंत्रज्ञानाच्या उच्च क्षमतेची किंवा क्रिएअटीविटीची आपल्याक्डे कमतरता नाही.
मुक्तपणे निर्मितीक्षमतेला वाव देण्याची कमी आणि राजकीय हस्तक्षेपाने काम मोडीत निघणे ह्यामुळे माणसे नवीन काही करायलाच कचरतात कारण मेहेनत वाया जाण्याचा धोका.

चतुरंग

चिरोटा's picture

25 Sep 2010 - 10:54 pm | चिरोटा

मुक्तपणे निर्मितीक्षमतेला वाव देण्याची कमी आणि राजकीय हस्तक्षेपाने काम मोडीत निघणे ह्यामुळे माणसे नवीन काही करायलाच कचरतात कारण मेहेनत वाया जाण्याचा धोका

भारतातल्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पात राजकिय हस्तक्षेप होतो असे वाटत नाही.शिवाय जेथे खाजगी बांधकामे दिसतात तेथेही खास निर्मितीक्षमता दिसते अशातलाही भाग नाही.अर्थात काही कोयनासारखे अपवाद असतीलही.पण क्रीएटीवेटीच्या आपले तंत्रज्ञ पाश्चिमात्य तंत्रज्ञांच्याच तोडीचेच आहेत हे तरी पटत नाही.

परंतु संख्या रोडावते आहे आणि त्याचे कारण माझ्या खाली दिलेल्या प्रतिसादात आहे! :)

हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. निर्मितीक्षमतेचे मूळ ह्यात आहे. सुरुवात बालपणातच असते. 'हे कर आणि असेच कर' ह्या विद्यार्थ्यांवरच्या हडेलहप्पीने ती क्षमता हळूहळू कमी होत जात असावी. मराठी, हिंदी, इंग्लिश भाषांकडे जेमतेम गुणांसाठी बघणे, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र शिकून काय होणार आहे असे विचारणे, त्यातच सुमार पाठ्यपुस्तके आणि कंटाळवाणे अभ्यासक्रम, पुन्हा गणित, शास्त्र ह्यातली गुणांची वेडी स्पर्धा - इथे सुद्धा मूळ तत्त्व समजण्यापेक्षा घोकंपट्टी आणि प्रश्नपत्रिकांच्या सरावातून परीक्षा 'क्रॅक' करणे ह्यावरच भर. असा सगळा मामला असताना क्रिएटीविटी टिकावी ती कशी?
"आधी काय ते इंजिनिअर, डॉक्टर व्हा मोठ्या पगाराची नोकरी मिळवा आणि म्ग काय ते छंद वगैरे जोपासा!" हा किंवा अशा पठडीतला विचार असेल तर व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र कसे आणि कधी होणार? विचारांना धुमारे कसे फुटणार? वेगळा विचार कधी होणार?
असो. हा सुद्धा फार मोठा विषय आहे.

मस्त कलंदर's picture

26 Sep 2010 - 12:26 am | मस्त कलंदर

मुद्दा पटला. दुर्दैवाने त्यावर विचार केला जात नाही याचीही खंत वाटतेय.

Pain's picture

26 Sep 2010 - 2:09 am | Pain

मराठी, हिंदी, इंग्लिश भाषांकडे जेमतेम गुणांसाठी बघणे, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र शिकून काय होणार आहे असे विचारणे

ज्ञान, व्यक्तिमत्व विकास आणि करमणूक यापलिकडे किंवा मुख्यत्त्वे नोकरी मिळवण्यासाठी यांचा काय उपयोग होउ शकतो ?
परदेशी भाषा शिकल्या तर अनुवादक, दुभाषा वगैरे तरी नोकर्‍या आहेत पण आपल्याच भाषा, उदा. एखाद्याने मराठीतील, उदा. बहिणाबाईंच्या कविता यावर पी. एच्.डी केली तर त्याला तुम्ही बदनाम करत असलेल्या डॉक्टर्/इंजिनीयर (विषेशतः संगणक अभियंते) या पेशातल्या लोकांप्रमाणे पगार मिळेल ?
तुम्ही म्हणता तसे बालपणी इतरच गोष्टींचे महत्त्व अमेरिकेतल्या मुलांना इतके पटते की ती १२ वी नंतर शाळाच सोडतात. अमेरिकेत असलेल्या किमान वेतनामुळे ते चालूनही जाते. पण असे भारतात अपेक्षित आहे का ? झाले तर ती मुले एका किमान पातळीचे जीवन जगू शकतील ?

त्यातच सुमार पाठ्यपुस्तके आणि कंटाळवाणे अभ्यासक्रम,
आत्ता जी काही पाठ्यपुस्तके आहेत त्यापेक्षा चांगली/ अद्ययावत आली तर उत्तमच पण जी आहेत त्यातले मूलभूत ज्ञानही कित्येक लोक आचरणात आणत नाहीत. मग अद्ययावत काय कामाचे ?
उदा. फळे, भाज्या, जीवनसत्त्वे, कमतरतेने/अती सेवनाने होणारे आजार, इतर रोग यांची इत्यंभूत माहिती प्राथमिक आणि माध्यमिक पुस्तकात आहे. आपल्यापैकी किती लोक बाहेरून घरात आल्यावर हात धुणे, रस्त्याच्या कडेला उघड्यावरील अन्न न खाणे, पुन्हा पुन्हा तळले जाणारे तेल वगैरे गोष्टी टाळतात ? उलट हातगाडीवाला जितका अस्वच्छ तितकी त्याकडील भेळ्/पाणीपुरी चवदार ( भले तो त्याच पाण्यात हात का धुवत असेना) असे ऐकवून गप्प करण्यात येते. इथे मिपावरही अभिमानाने दारू सिगरेटचा मोठ्या प्रमाणात प्रचार, गौरव चालतो. माझे व्यसनी रूममेट्स तर फळांपासून कटाक्षाने दूर राहतात. अशांना नव्या किंवा जुन्या कुठल्याच ज्ञानाचा उपयोग नाही.

पुन्हा गणित, शास्त्र ह्यातली गुणांची वेडी स्पर्धा
लोकसंख्या जास्त व जागा कमी असे असताना स्पर्धा तीव्र होणारच. माझ्या शाळेन तुमच्या सारखाच विचार करून आम्हाला स्पर्धांपासून दूर ठेवले होते त्याचा मला पुढे तोटा झाला. ( हा एकच. बाकी सर्व निर्णयांचे फायदे झाले, इतर कुठेही ते मिळाले नसते, कृतज्ञ आहे)
स्पर्धेशिवाय इतक्या कमी जागा भरायचा "फेअर" उपाय तुम्ही सुचवू शकता का ?

चतुरंग's picture

26 Sep 2010 - 6:13 am | चतुरंग

भाषा शिकणे म्हणजे फक्त भाषाच शिकणे असे माझे मत नाहीये. मला असे म्हणायचे आहे की विषयांची पुरती ओळख व्हायच्या आधीच आपण फांद्या कापूण टाकतो आणि मग त्याचं बॉन्साय होतं! भाषेच्या शिक्षणामुळे समजुतीचा आवाका वाढतो. तांत्रिक विषय समजताना सुद्धा भाषेवर प्रभुत्व असेल तर विषयातल्या संकल्पना समजायला मदत होते. विचार समजणे आणि आपल्याला पडलेले प्रश्न योग्यप्रकारे सांगणे हे भाषेमुळे सोपे होते.
फक्त भाषा विषयात पीएचडी करुन नोकरी मिळेल का? उत्तर अवघड आहे, तज्ञांना विचारायला हवे! (प्रा.डॉ. वाचताय ना? ;) )
मी डॉक्टर आणि इंजिनिअर क्षेत्रे बदनाम करत नाहीये. मी स्वतः एक इंजिनिअरच आहे. माझाही मुलगा मोठा होतोय तेव्हा माझ्यासमोर हाच प्रश्न आहे की त्याला त्याच्या आवडीची ओळख कशी करुन देता येईल? त्याची करिअर त्याला सापडेल असे मी काय देऊ शकेन?

अमेरिकेतली मुले १२ वी नंतर शिक्षण सोडतात त्याची कारणे वेगळी आहेत. इथे एकतर उच्चशिक्षण हे बरेच महाग आहे. शिवाय आईबापांनी मुलांना पैसे भरुन शिकवणे हे फारच थोडे लोक करतात/करु शकतात. त्यामुळे मुलांना त्यांचे पैसे कमवा आणि शिका असेच बर्‍याचदा करावे लागते. त्यात आयुष्याची बरीच वर्षे कष्ट करत राहणे सर्वांनाच जमते असे नाही त्यामुळे शिक्षण कमी घेतले जाते. इथल्या सामाजिक परिस्थितीमुळे लोकांना काही ना काही कामे मिळून ते जगू शकतात आणि त्यांना ते चालते हे बरोबर आहे. आपल्याकडे हे शक्य नाही. परंतु आत्ता तरी काय अवस्था आहे? ढिगारभर लोक नि:सत्त्व शिकून बाहेर पडताहेत आणि नोकरीच्या शोधात वणवण भटकताहेत. व्यवसाय शिक्षण, हाताला काम मिळेल असे शिक्षण नसल्याचे हे तोटे आहेत. त्यावर उपाय म्हणजे तसे शिक्षण घेणे आणि काम मिळवणे.

आत्ताची ताजी पाठ्यपुस्तके माझ्या बघण्यात नाहीत त्यामुळे कदाचित माझे मत चुकीचे असू शकेल. परंतु त्यातल्या माहीतीपेक्षा ती कशाप्रकारे मुलांसमोर मांडली जाते ह्याबद्दल माझा आक्षेप आहे. विषयाची मनोरंजक हाताळणी ही मुलांना शिकायला उद्युक्त करते ह्याबद्दल दुमत होऊ नये आणि जितक्या लवकर हे आपण करु तितक्या लवकर मुले विषय नीट शिकू शकतील हे लक्षात घ्यावे. आणि लोक वापरत नाहीत म्हणून ज्ञानाचा उपयोग नाही असे असेल तर लोकांपर्यंत कसे पोचायचे याचे कल्पक मार्ग शोधून काढले पाहिजेत ज्ञान निरुपयोगी नसते!

गुणांची स्पर्धा हीच मुळात एक चूक असल्याने त्याला तोंड द्यायच्या पद्धती ह्या चुकीच्याच वाटेने बर्‍याचदा जातात. तोंड कसे द्यायचे ह्याची निराळी पद्धत विकसित करायला हवी. फक्त घोकंपट्टी आणि पाठांतर ह्यावर भर देऊन मुले बर्‍याचदा रेटली जातात. उच्च संस्थांमधून प्रवेश मिळवून आयायटी झालेले असे काही इंजिनिअर माझ्या बघण्यात आहेत की ज्यांच्या कॉमनसेन्स बद्दल प्रश्न पडावेत!
कुठच्याही तंत्र विषयात शिक्षण फार थोडे असते परंतु रोबस्ट कॉमनसेन्स जास्त असणे गरजेचे असे माझे मत आहे. एखाद्या विषयातले मर्म समजण्यासाठी ह्याची नितांत आवश्यकता असते असे तुम्हाला वाटत नाही का? हां, आता मर्म समजून काय करता जास्त पगाराची नोकरी त्याने मिळणार आहे का असे विचाराल तर माझ्याकडे उत्तर नाही! तुम्हीच वर म्हटले आहे की शाळेने जे तुम्हाला दिले त्याने एक गुणांची स्पर्धा सोडली तर बाकी तुम्हाला मिळालेले फायदे कुठे मिळाले नसते - ह्याला काहीच महत्त्व नाही का?

आपल्याला काय आवडते ते करायला मिळणे आणि त्यात पुरेसा पैसा मिळवता येणे ह्यावाटेने जाणे अवघड आहे हे नक्की परंतु तशा दिशेने जाण्याचा प्रयत्नसुद्धा करु नये का? ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतलेल्या आहेत की एकचएक उत्तर अवघड आहे परंतु त्यामुळे प्रयत्न सोडता कामा नयेत हे नक्की!

Pain's picture

29 Sep 2010 - 10:43 am | Pain

बर्‍याचश्या बाबतीत एकमत आहे. काही गोष्टींबद्दल अजून बोलायचय.

भाषेचे शिक्षण म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे ? शाळा-कॉलेजात मूलभूत बाबी शिकवल्या जातात, त्यापुढे प्रत्येकाने स्वत: मेहनत घेतली पाहिजे उदा. अवांतर वाचन, संवाद, नाटके, चित्रपट वगैरे. बहुसंख्य लोक जेमतेम पाठ्यपुस्तके वाचतात.

अमेरिकेतली मुले १२ वी नंतर शिक्षण सोडतात त्याची कारणे वेगळी आहेत. इथे एकतर उच्चशिक्षण हे बरेच महाग आहे. शिवाय आईबापांनी मुलांना पैसे भरुन शिकवणे हे फारच थोडे लोक करतात/करु शकतात. त्यामुळे मुलांना त्यांचे पैसे कमवा आणि शिका असेच बर्‍याचदा करावे लागते. त्यात आयुष्याची बरीच वर्षे कष्ट करत राहणे सर्वांनाच जमते असे नाही त्यामुळे शिक्षण कमी घेतले जाते

पालक मदत करत नाहीत हे माहिती आहे. शिक्षण खूप महाग आहे त्यामुळे लोक तो मार्ग सोडतात तर काही वेळेला मुली वाममार्ग पत्करतात हे खूप वेळा वाचले/ ऐकले आहे. याबाबत मी जमा केलेली माहिती अशी :
मध्यम दर्जाच्या युनिव्हर्सिटीत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यास एका विषयाची फी $२८०० तर स्थानिक (अमेरिकन) मुलास $८००. त्यात त्यांना इतक्या शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत की प्रत्येकाला एकतरी मिळतेच, शिवाय वर्क्-स्टडी आहे, तर कधी कंपनी काही भार उचलते. फक्त नागरिकांसाठी राखीव (किंवा गेला बाजार प्राधान्य) अशा अक्षरश: अगणित नोकर्‍या असतात. सैन्यात प्रवेश मिळाल्यास ते सर्व भार उचलतात वर उत्तम स्टायपेंड देतात. (हे आपल्याकडेही आहे)
त्यांच्याकडे पालकांची मदत नसते पण अमेरिकन नागरिकत्व असते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना जिथे किमान वेतनावर जास्तीत जास्त २० तास काम करायला मिळते तिथे हे लोक दुप्पट वेतनावर कितीही तास काम करू शकतात. प्रत्येक सेमिस्टरमध्ये अ‍ॅडमिशन नाही घेतली तरी चालते, जसे पैसे मिळेल तस तसे येउन विषय संपवता येतात.

गुणांची स्पर्धा हीच मुळात एक चूक असल्याने
हे तुम्ही आधीही म्हटला आहात. गुण्/मार्क किंवा तत्सम मूल्यमापनाची पद्धत नसल्यास तुलना कशी करणार ? तुमच्याकडे काही नविन कल्पना आहे का ?

परंतु त्यातल्या माहीतीपेक्षा ती कशाप्रकारे मुलांसमोर मांडली जाते ह्याबद्दल माझा आक्षेप आहे. विषयाची मनोरंजक हाताळणी ही मुलांना शिकायला उद्युक्त करते ह्याबद्दल दुमत होऊ नये आणि जितक्या लवकर हे आपण करु तितक्या लवकर मुले विषय नीट शिकू शकतील हे लक्षात घ्यावे. आणि लोक वापरत नाहीत म्हणून ज्ञानाचा उपयोग नाही असे असेल तर लोकांपर्यंत कसे पोचायचे याचे कल्पक मार्ग शोधून काढले पाहिजेत ज्ञान निरुपयोगी नसते!

ज्ञान निरुपयोगी असे मी कुठेच म्हटलेले नाही, लोकांना त्याची किंमत नसते. विषयाची हाताळणी आणि शिकवण्याची पद्धत महत्त्वाची आहे हे खरेच. पण बहुदा शि़क्षक हा फारसा आवडता पेशा नाहीये. दुसर काहीही होता आल नाही की मनुष्य मास्तर होतो अस आमचे एक सर म्हणायचे !

कुठच्याही तंत्र विषयात शिक्षण फार थोडे असते परंतु रोबस्ट कॉमनसेन्स जास्त असणे गरजेचे असे माझे मत आहे
याविषयी दुमत नाही, संजीवनी विद्या आणि ४ पंडितांची गोष्ट मलाही ठाऊक आहे :D

चन्द्रशेखर सातव's picture

26 Sep 2010 - 1:09 am | चन्द्रशेखर सातव

सुंदर चर्चा !

अभियांत्रिकी हे मुख्यतः उपयोजित शास्त्र (Applied science) आहे.मूलभूत शास्त्र(Pure sciences) मध्ये जे शोध लावले जातात त्याचेच उपयोजन (Application & Optimisation) हे अभियांत्रिकी मध्ये केले जाते.त्या अर्थाने दोन्ही शास्त्रे एकाच रथाची दोन चाके आहेत पण आपल्याकडे मुळातच मूलभूत शास्त्र शिक्षणाकडे अक्ष्यम्य असे दुर्लक्ष्य झाले आहे त्यामुळे आजही कोणत्याही प्रथम क्रमांक आलेल्या मुलाला विचारले तर तो पुढे जाऊन मी अभियंता होणार( सध्या I.T) असे उत्तर देतो,भौतिक किवा रसायन शास्त्र मध्ये काम करीन असे उत्तर फार कमी वेळा येते.त्याचीच फळे आज आपल्या देशाला मिळत आहेत.

जड अभियांत्रिकी (Heavy engineering ) मध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच भारतीय कंपन्या आहेत,त्यामुळेच I.T च्या कामांमुळे जो पैसा भारतात येतो पण तो या basic engineering मधील माहिती च्या अभावाने बाहेर पण जातो.वाहन अभियांत्रिकी क्षेत्रा मध्ये भारत हे पुढील महत्वाचे केंद्र असणार आहे अशी आत्तापासूनच चर्चा आहे,पण भारतात जे काम चालते ते नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने दुय्यम स्वरूपाचे असते. या बाहेरील देशा मधील कार कंपन्या त्यांना लागणारे तंत्रज्ञान हे त्यांच्याच देशात विकसित करतात आणि आपल्या देशात ते विकून त्यावर नफा कमवतात.या मूलभूत तंत्रज्ञानावर प्रचंड अश्या किमतीचे मूल्यवर्धांकन होते जो पैसा बाहेरच्या देशात जातो,इथे मुख्यतः उत्पादन (manufacturing), जुळणी (Assembly) आणि (Service) केले जाते.

विकास's picture

27 Sep 2010 - 7:26 am | विकास

या चर्चेत सहभागी होणार्‍या सर्वांचेच आभार.

चतुरंगच्या विस्तृत प्रतिसादातील सर्वच मुद्दे महत्वाचे आहेत. त्यात एकदम बदल होऊ शकणार नाही हे तो देखील म्हणत आहे आणि ते वास्तव देखील आहे.

जीव घेण्या स्पर्धेत आणि त्याच्यासाठी परीक्षा देण्याच्या भानगडीत आपण चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करत नाही हे जितके सत्य आहे तितकेच जेंव्हा कायदा मोडायची अथवा गेला बाजार वाकवायची वेळ येते तेंव्हा डोके नक्कीच आउट ऑफ बॉक्स विचार करत "खोक्यांचा "देखील विचार करताना दिसेल... :-)

भेंडीबाजार म्हणतात तसे प्रत्येक कामात हस्तक्षेप होत नाही असेच वाटते. आता ह्यात "हस्तक्षेप न होणे" हे थोडे सोप्या अर्थाने घेत आहे. पण अनेक ठिकाणचे काम हे गुणात्मक रीत्या देखील चांगले होत असावे असे वाटते.

जस जशा संध्या उपलब्ध होतील तशी क्रिएटीव्हीटी वाढणे आणि इतर वाटा चोखाळणे हे कसे होऊ शकेल याचे (प्रत्येक वेळेस आदर्श नसेलही कदाचीत, पण) प्रसिद्धी माध्यमांतील कामे - विविध मालीकांपासून ते वृत्तनिवेदन ते पडद्यामागची अनेक महत्वाची कामे यात पुर्वीपेक्षा नक्कीच जास्त जण जाऊ लागले आहेत. तेच इतर क्षेत्रातही घडण्याची गरज आहे. असे वाटते....

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Sep 2010 - 11:42 am | llपुण्याचे पेशवेll

माझा एक मित्र मिशलीन टायर्स मधे काम करतो. सध्या मिशलीन चे सर्व टायर इंपोर्ट होतात. त्यातले बहुतांश थायलंड का मलेशिया बनलेले असतात आणि अर्थमूव्हर्सचे टायर युरोपात बनलेले इंपोर्ट केले जातात. टिकाऊपणामुळे मिशलिन टायरांना अर्थमूव्हर्ससाठी मोठी मागणी आहे. त्यासाठी चेन्नई मधे फॅक्टरी चालू करून तिथून पुरवठा करण्याचे कंपनीने ठरवले. त्यावर त्याच कंपनीच्या ग्लोबल मार्केटींग टीमचे असे म्हणणे होते की तसे केल्याने क्वालिटी कमी होईल कारण भारतीय उद्योगांमधे पर्यायाने लोकांमधे दर्जाशी तडजोड करण्याची वृत्ती फार आहे. त्यामुळे भारतात उत्पादन चालू केले की क्वालिटी आणि पर्यायाने सेल कमी होईल.
कुठेही दर्जाच्या बाबतीत आग्रही नसणे हीच भारतीय मनोवृत्ती या सर्व गोष्टींचे कारण आहे. ज्या ज्या कंपन्या या वृत्तीच्या बाहेर पडल्या त्या त्या जगात यशस्वी झाल्या आहेत.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 12:57 pm | मिसळभोक्ता

कुठेही दर्जाच्या बाबतीत आग्रही नसणे हीच भारतीय मनोवृत्ती या सर्व गोष्टींचे कारण आहे.

स ह म त !

मुख्यतः, स्वतःच्या दर्जाबद्दल !