पांढर्‍यावर 'काळे' संजोपराव हे पुस्तक प्रकाशित करत आहेत म्हणून अप्रकाशित. नीलकांत.

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
19 Sep 2010 - 7:49 am

शिरवळकरांनी हातातल्या सिग्रेटीचा एक दमदार झुरका घेतला आणि हळूहळू धूर सोडत ते अवकाशाच्या पोकळीत बघत राहिले. आपले रोड पाय एकमेंकावर टाकून एखाद्या राजपुत्रासारखे ते ऐटीत बसून राहिले. एखादी नवीन कल्पना सुचत असली की त्यांचे डोळे असेच काचबाहुली होत असतात हे आतापर्यंत सर्वांच्या ध्यानात आले होते. आपण वापरायला काढलेला नवीन परफ्यूम कसा आहे हे त्यांना विचारायला आलेले वपु बाकी हिरमुसल्यासारखे झाले होते. त्यांनी मग शेजारी बसलेल्या दळवींकडे मोर्चा वळवला. दळवी आकंठ जेवण झाल्यावर माणसाच्या चेहर्‍यावर जी एक नैसर्गिक परिपूर्तीची भावना येते ती पांघरुन हातांना येणारा बोंबिलाचा वास हुंगत बसले होते. त्यांच्या चष्म्यातून त्यांचे घारे, कोकणस्थी बेडूकडोळे हळूहळू बारीक होताना दिसत होते. वपुंच्या परफ्यूमचा सुगंध दरवळला तसे दळवी एखाद्या सडक्या उंदराचा दर्प यावा तसे दचकले.
"काय दळव्यांनु, कसा काय वाटला माझा नवा परफ्यूम?" काळे म्हणजे सुहागरातीला माणसाने 'तयार' व्हावे तसे सजून आले होते.
" वसंता, माणसाला दुपारी झोपूपण देता येत नाही काय रे तुला? फुकट रे तू, फुकट. मायझयां, तिथे जिवंत असतांना काय कमी छळलंस म्हणून इथे पण सूड उगवायला आलास काय रे? " दळवी वस्स्कन ओरडले. वपुंचा चेहरा पडला. त्यांच्या विरळ केसांना लावलेला कलप थोडा फिकुटल्यासारखा झाला. वास्तविक "छान आहे हो, नवा परफ्यूम तुमचा...." हे वाक्य कुणाकडून येते याची ते वाट बघत होते . 'नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो' हे उत्कट वाक्य त्यांना नुकतेच सुचले होते आणि ते कुणाला तरी ऐकवलेच पाहिजे या उत्कट भावनेने ते अस्वस्थ झाले होते. एकंदरीत आपले सगळे जे काही आहे, ते उत्कट आहे अशी त्यांची ठाम म्हणजे अगदी फारच ठाम खात्री होती. त्यांचे हक्काचे श्रोते शिरवळकर असे तुर्यावस्थेत गेले असल्याने त्यांना नाईलाजाने दळवींकडे वळावे लागले होते. एरवी ते स्वतः, शिरवळकर, कदम आणि पिंगे यांच्या बैठकीच्या बाहेर जाण्याची त्यांना गरज भासत नसे. पिंग्यांचे आणि त्यांचे तर काय 'एक हाथ से दो, एक हाथ से लो' असेच नाते होते. पण आज पिंगे सकाळपासूनच दिसत नसल्याने आणि कदम अगदी पहाटे पहाटे उठून आपली दुनळी बंदूक साफ करण्यात गुंतले असल्याने काळे नाईलाजाने शिरवळकरांकडे वळले होते. 'कदम, आता इथे तुमच्या बंदूकीचे काय काम हो? निशाण सांभाळण्यापेक्षा स्वतःची शान सांभाळाल तर काय जान जाईल?' हेही वपुंना सुचले होते. पण ते कदमांना सुनावण्याचे धाडस काही त्यांना झाले नव्हते. कदमांना एकूण ते जरा टरकूनच असत. एकतर माणूस कोल्हापूरचा. त्यातून वकील. बाकी त्यांचे डाकबंगले, मटणपार्ट्या, धबधब्याच्या काठावर परदेशी स्त्रीबरोबर रोमान्स करणारा त्यांचा तो पोलीशी नायक, त्यांचे ते कोर्टातले वाद-प्रतिवाद हे त्यांच्या ठाणे- मालाड- अंबरनाथ अनुभवांच्या पलीकडे न गेलेल्या नायक नायिकांना जरा जडच जात असे. आता दळवींकडूनही असा तेजोभंग झाल्यामुळे ते पुन्हा एकदा हिरमुसले. आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्‍या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले तोच त्यांना हातातले शुभ्र कागद एखाद्या बावट्यासारखे फडकावत धावत येणारे पिंगे दिसले. पिंग्यांची एकंदरीत 'एंट्री'ची हीच स्टाईल असे. 'लेखणीचं टोक सुकू न देणारा सारस्वताचा पुजारी' अशी स्वतःची ओळख करुन देणारे पिंगे 'कुठल्याही क्षणी सत्यसाईबाबांचे स्मरण करुन मी एकटाकी मजकूर लिहितो' असे दिवसातून पाचसात वेळा तरी म्हणत असत. वपुंना नाही म्हटलं तरी पिंग्यांच्या सह्वासात जरा कॉप्लेक्सच येत असे. त्यातून पिंग्यांचा इतिहास वपुंपेक्षा जबरा. वपुंनी फोर्टातल्या जुन्या आठवणी काढल्या की पिंगे लगेच आपण तिथे पुलंबरोबर मटणप्याटीस खायला कसे जायचो, ते सांगणार. वपुंनी सामान्यांचे म्हणून पिवळ्ये गंजिफ्राक आणि त्याची पर्वा न करता नवर्‍याच्या कुशीत शिरणारी वहिदा असले मध्यमवर्गीय आड्यन्सला अपील होणारे काहीतरी काढले की पिंगे शांतादुर्गेच्या एका नजरेने मनात सुखाचे आणि शांततेचे कसे डोह उमटले असला डबलबार काढणार. त्यामुळे 'आपलं मार्केट खातो हा साला..' असं कधीकधी वपुंच्या मनात येत असे, आणि साहित्यिकाला असला मनाचा कद्रूपणा शोभत नाही, मग जर आपल्या मनात असे कद्रू विचार येत असतील, तर आपण साहित्यिक आहोत की नाही, अशीही शंका त्यांच्या मनात येऊन जात असे. पण आता पिंगे तर पिंगे, पण कुणाकडून तरी आपल्या नव्या परफ्यूमवर टाळ्या घेतल्याच पाहिजेत या उत्कट भावनेने त्यांनी पिंग्यांकडे बघून हात हलवला. धापा टाकत आलेले पिंगे काही वेळ आपण लिहून आणलेल्या कागदांकडे अत्यंत कौतुकाने बघत राहिले. वपु तोवर खोलवर मोठमोठे श्वास घेऊन पिंग्यांना काहीतरी सुचवायचा प्रयत्न करत होते. पिंग्यांची धाप कमी झाली आणि त्यांनी एक मोठा श्वास घेतला. आता हे नक्की आपल्या परफ्यूमबद्दल बोलणार या खात्रीने वपुंचा चेहरा उजळला.
"ऐका वसंतराव." पिंगे म्हणाले.
"शुद्धबुद्धी श्रीचरण मला मंतरलेल्या अक्षता देतात, श्रीफळ देतात आणि तृप्त आशीर्वादही देतात. बळेच सांभाळून आणलेला सगळा बुद्धिवाद आणि सगळी पोकळ अहंता अशा वेळी नकळत गळून पडते. मन भरुन येते. हात आपोआप जुळतात आणि नियतेने प्रवर्तित केलेल्या योगायोगांच्या नित्यनूतन ऋतूचक्रापुढे तर त्याहूनही लीन व्हायला होते..."
"वाहव्वा! क्या बात है! ब्राव्हो!" वपु उसन्या अवसानाने म्हणाले. पिंग्यांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ काय याबाबत जरा त्यांच्या मनात गोंधळ होता, पण ते वाक्य टाळीखेचक आहे याबाबत बाकी त्यांना शंकाच नव्हती. "तिसर्‍याच्या सुक्यासारखं झणझणीत वाक्य आहे, रवी.." ते म्हणाले. सारस्वतांशी बोलताना मासळीबिसळीचा उल्लेख केलेला बरा, हेही त्यांना नुकतेच सुचले होते. एरवी तिसर्‍या ही काय भानगड आहे, याबाबत त्यांच्या मनात जरा गोंधळच होता. पिंगे बाकी सोलकढीत झुरळ तरंगताना दिसावा तसे दचकले. 'मासळीभात - सोलकढी- सारस्वतांचं परब्रह्म ' हा लेख लिहिण्यासाठी आपण सगळी कोकण किनारपट्टी पालथी घातली आणि गावांची आणि माशांची नावे जमवून जमवून अनुभवसिद्ध लेख लिहिला, पण अजून मासळीविषयक लेख म्हटला की लोक दळवींच्या 'दादरचे दिवस' चीच आठवण काढत मिटक्या मारतात याची पिंग्यांना पापलेटातल्या काट्यासारखी सल लागून होती. त्यांनी दचकून दळवींकडे पाहिलं, पण दळवींची छान ब्रह्मानंदी टाळी लागली होती.
"हा तलत शांतपणे सिग्रेटही ओढू देणार नाही, साला..." अचानक कुणीतरी ओरडले आणि वपु आणि पिंगे दोघेही दचकले. शिरवळकरांनी हातातली सिग्रेट चुरडून टाकली होती आणि तांबारलेल्या डोळ्यांनी ते इकडेतिकडे बघत होते. "तलत साला.... धड सिग्रेटही ओढून देणार नाही" ते पुन्हा म्हणाले.
"काय झालं काय, सुहासराव?" पिंग्यांनी सुसंस्कृतपणे विचारलं. वपुंसारखं धाडकन एकेरीवर येणं त्यांना जमतही नसे आणि आवडतही नसे. शिवाय एक सुसंस्कृत रसिक लेखक ही ओळख असणं हे एक 'निश मार्केट' आहे, हेही त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नव्हतं.
"दम भर के लिये मेरी, दुनिया में चले आओ, तरसी हुई आंखो़ं को, फिर शक्ल दिखा जाओ' शिरवळकर आता गायलाबियला लागले होते. "प्रश्न असा आहे वॅप्स..." शिरवळकरांचं हे संबोधन वपुंना मुळीच आवडत नसे. पण इलाज नव्हता. 'तडजोडीच्या डिपॉझिट स्लिप्स जोडल्याशिवाय यशाचे चेक्स एन्कॅश होत नाहीत' हे उत्कट वाक्यही त्यांना अलीकडेच सुचले होते.
"तर प्रश्न असा आहे वॅप्स, की माझा नायक कोर्टात हे गाणं कसं म्हणेल?"
"कोर्टात?"
"येस, कोर्टात. पब्लीक प्रॉसिक्यूटर आहे माझा नायक. पण हळुवार हृदयाचा. त्याच्या प्रेयसीला त्याच्या सख्ख्या मित्रानं पळवलं पण ती ओली जखम लपवून दुनियादारी बघत चेहर्‍यावर स्मितहास्याचा मुखवटा लावणारा. आता तिच्यावर आरोप आहे तिच्या नवर्‍याच्या खुनाचा. आणि हा पब्लीक प्रॉसिक्यूटर. मग काय करेल हा? कोर्टात गाणं म्हणायला परवानगी असते? काय कदम?"
'क्लिक' असा आवाज आला. कदमांनी बंदूक बंद केली. एक दीर्घ श्वास घेतला आणि ते बोलायला तोंड उघडणार, तेवढ्यात 'आयायाया..." असा आवाज आला. मंडळींनी मागे वळून बघीतलं. दळवी उठून उभे राहिले होते.
"जातो, बराच वेळ झाला. चहाची वेळ झाली जवळजवळ. मंडळी थांबली असतील, माझ्यासाठी" ते जिन्याकडे जात म्हणाले. वरच्या मजल्यावरुन "दळवी, अहो दळवी... चहाला येताय ना?" अशी दणकट हाक ऐकू आली. "आलो, आलो.. आण्णा, कर्नेलराव.. आलो" दळवी घाईघाईनं म्हणाले. सशासारखे दात असलेल्या कुणीतरी खोडकरपणाने चष्म्यातून खाली बघीतले. दळवी निघाले. जिन्यात त्यांच्यापुढे कुणीतरी एक जाडजूड माणूस दुसया दोघांच्या खांद्यावर हात ठेवून वर जात होता.
"खानोलकर काय हो ते? आणि दुसरे कोण? पानवलकर?" पिंग्यांनी वपुंना विचारले.
वपु काहीच बोलले नाहीत. परफ्यूमचे शल्य अद्याप त्यांचा मनाला टोचत होते. त्यांना नवीन काही सुचतही नव्हते.

विनोदप्रकटन

प्रतिक्रिया

अडगळ's picture

19 Sep 2010 - 8:14 am | अडगळ

पण ते सश्यासारखे दात असणार्‍याबरोबरचे पानवलकरच का नक्की ?
नाही म्हणजे ही जोडी म्हणजे पांढर्‍या रश्यात रसगुल्ला .

सन्जोप राव's picture

19 Sep 2010 - 11:19 am | सन्जोप राव

सशासारखे दात असणारे वेगळे आणि पानवलकर व खानोलकरांबरोबर असणारे जाडगेले वेगळे. यापुढे 'पैचान कौन!'

शुचि's picture

19 Sep 2010 - 7:41 pm | शुचि

पहीले पु ल दुसरे जी ए :) (अर्थात सहज यांना दिलेल्या प्रतिसादात धारवाडकरांचा उल्लेख आहे म्हणून मला कळलं अन्यथा आमची कुठली एवढी धाव?)

प्रदीप's picture

19 Sep 2010 - 8:51 am | प्रदीप

ह ह व पु.

रविवार सकाळ छान गेली!

आजानुकर्ण's picture

19 Sep 2010 - 9:54 am | आजानुकर्ण

झकास टर उडवली आहे.

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2010 - 9:46 am | भडकमकर मास्तर

कदमांना एकूण ते जरा टरकूनच असत. एकतर माणूस कोल्हापूरचा. त्यातून वकील. बाकी त्यांचे डाकबंगले, मटणपार्ट्या, धबधब्याच्या काठावर परदेशी स्त्रीबरोबर रोमान्स करणारा त्यांचा तो पोलीशी नायक, त्यांचे ते कोर्टातले वाद-प्रतिवाद हे त्यांच्या ठाणे- मालाड- अंबरनाथ अनुभवांच्या पलीकडे न गेलेल्या नायक नायिकांना जरा जडच जात असे.

वावा.. मजा आली...
:)
अवांतर : कालिजात वाईट कंटाळवाण्या तासाला मित्राबरोबर वहीचे एक एक मागचे पान भरून वपु, दळवी,बाबा कदम, ममंकर्णिक, रणजित देसाई, बाबुराव अर्नाळकर अशा लेखकांच्या स्टाईलने लिहायचे अशी टूम काढल्यावर वेळ उत्तम जाऊ लागला... त्या वह्या आता शोधल्या पाहिजेत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 9:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगायायाया ... लैच बेक्कार आहे हे 'काळे' प्रकरण!

मास्तर, वह्या शोधाच तुम्ही तुमच्या ...

वेताळ's picture

19 Sep 2010 - 10:03 am | वेताळ

एलदम जबरा......... खुपच मार्मिक....
सन्जोपरावाचे निरिक्षण एकदमच खतरा आहे.

>> वपुंनी सामान्यांचे म्हणून पिवळ्ये गंजिफ्राक आणि त्याची पर्वा न करता नवर्‍याच्या कुशीत शिरणारी वहिदा असले मध्यमवर्गीय आड्यन्सला अपील होणारे काहीतरी काढले की पिंगे शांतादुर्गेच्या एका नजरेने मनात सुखाचे आणि शांततेचे कसे डोह उमटले असला डबलबार काढणार. त्यामुळे 'आपलं मार्केट खातो हा साला..' असं कधीकधी वपुंच्या मनात येत असे, आणि साहित्यिकाला असला मनाचा कद्रूपणा शोभत नाही, मग जर आपल्या मनात असे कद्रू विचार येत असतील, तर आपण साहित्यिक आहोत की नाही, अशीही शंका त्यांच्या मनात येऊन जात असे. >>

वरचा पॅरीग्राफ ताबडतोब अपील झाला. विशेषतः साहीत्यिक कद्रूपणा आणि त्या अनुषंगाने आलेली विनोदी शंका =))

जसजसा लेखाचा शेवट जवळ येऊ लागतो घालमेल होते,असे खुसखुशीत लेख संपू नयेत असं वाटतं.

सहज's picture

19 Sep 2010 - 10:07 am | सहज

खुसखुशीत!

>जिन्यात त्यांच्यापुढे कुणीतरी एक जाडजूड माणूस दुसया दोघांच्या खांद्यावर हात ठेवून वर जात होता.

कोणी तरी सांगा बॉ लवकर, पेरुची बी.......

अवांतर - धारवाडकरांना चहा आवडायचा नाही का?

सन्जोप राव's picture

19 Sep 2010 - 11:08 am | सन्जोप राव

चहा धारवाडकरांना अतिप्रिय. म्हणून तर ते दळवींच्या अगोदर रांगेत. तेही त्यांच्या आवडत्या खानोलकराबरोबर.

सहज's picture

19 Sep 2010 - 11:18 am | सहज

सही! धन्यवाद.

अर्धवट's picture

19 Sep 2010 - 10:14 am | अर्धवट

मस्त वो..

राजेश घासकडवी's picture

19 Sep 2010 - 10:50 am | राजेश घासकडवी

डिपॉझिट स्लिपशिवाय चेक एन्कॅश्ड.

'नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो' हे उत्कट वाक्य त्यांना नुकतेच सुचले होते

जबरदस्त. त्यांची एक कथा मला आठवते, त्यात लेखकाच्या मुलाच्या मास्तरीणबाई असली वाक्यं बोलत असतात. (कल्पनेच्या जेटने कितीही उंच भरारी मारली तरी रनवे म्हणून सत्याची धावपट्टीच हवी) वपुंनी बहुतेक आपली (त्यांच्या मते) ग्रेड २ वाक्यं तिच्या तोंडी घातली होती.

पैसा's picture

19 Sep 2010 - 1:02 pm | पैसा

साहित्य संमेलन कधी होणार मिपा वर?

नितिन थत्ते's picture

19 Sep 2010 - 11:24 am | नितिन थत्ते

मस्त खुसखुशीत लेखन.

अवांतर : लेखाचे शीर्षक आणि त्यात अ‍ॅपॉस्ट्र्फीमध्ये काळे हा शब्द पाहून काळेकाका आणि गांधीवादी यांचे पांढरे दहशतवादी यांबाबत काही लिहिलं आहे असं वाटलं होतं.

प्रदीप's picture

19 Sep 2010 - 4:41 pm | प्रदीप

तुमच्या (तथाकथित) पांढर्‍या पक्षास आता जळीस्थळी, काष्ठीपाषाणी, जकार्तावाले काळे दिसू लागलेत तर!

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Sep 2010 - 2:45 pm | llपुण्याचे पेशवेll

आणि पांढरे गांधीवादी सुधा. :)

नंदन's picture

19 Sep 2010 - 11:34 am | नंदन

लेखाच्या फॉर्मवरून वर्षापूर्वी रंगलेली मैफल आठवली. बाकी गंध/श्वास, सत्याची धावपट्टी इ. उत्कट वाक्यं क्लासच! (प्रा. दवण्यांचे लेखन आठवले :))

सहज's picture

19 Sep 2010 - 11:37 am | सहज

गरिबांचे वपु - प्रा. दवणे ? :-)

नितिन थत्ते's picture

19 Sep 2010 - 11:38 am | नितिन थत्ते

आणि गरिबांचे दवणे - संजोप राव?

हा रावांचा अपमान आहे. गेला बाजार गरिबांचे जीए किंवा नेमाडे चालतील.

मस्त लेखन !

नितिन थत्ते's picture

19 Sep 2010 - 2:09 pm | नितिन थत्ते

बरं बरं

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गरिबांचे दवणे - नंदन!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:20 pm | अवलिया

गरीबांचा नंदन - सहज

(देत असतो लिंका अधुन मधुन ;) )

शहराजाद's picture

19 Sep 2010 - 11:44 am | शहराजाद

ह ह पु वा.
मस्त. उत्तम निरिक्षण आणि चुरचुरीत सादरीकरण.
फार आवडले.

चिगो's picture

19 Sep 2010 - 11:59 am | चिगो

झक्कास लिहीलंय..

उत्कटता मस्तच जमुन आलीए. दळवी पण भारी!

दत्ता काळे's picture

19 Sep 2010 - 5:09 pm | दत्ता काळे

एकदम 'ठणठणपाळ' मधल्या लेखांची आठवण आली.

स्वाती२'s picture

19 Sep 2010 - 5:13 pm | स्वाती२

लै भारी!

ज्ञानेश...'s picture

19 Sep 2010 - 5:40 pm | ज्ञानेश...

"एकंदरीत आपले सगळे जे काही आहे, ते उत्कट आहे अशी त्यांची ठाम म्हणजे अगदी फारच ठाम खात्री होती..."

"आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्‍या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले ..."

हे भलतेच आवडले ! :)

चतुरंग's picture

19 Sep 2010 - 5:50 pm | चतुरंग

लै भारी. एकेकाच्या टोप्या उडवल्याहेत मस्त! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, बाकी टर उडवतानाच रावांच्या प्रतिभेला धुमारे फुटतात नै? ;))

चतुरंग

श्रावण मोडक's picture

19 Sep 2010 - 6:30 pm | श्रावण मोडक

मजा आली.

बेसनलाडू's picture

20 Sep 2010 - 10:49 pm | बेसनलाडू

(करमणूकप्रेमी)बेसनलाडू

सुवर्णमयी's picture

19 Sep 2010 - 7:45 pm | सुवर्णमयी

जोरदार! लेख आवडला.

निस्का's picture

19 Sep 2010 - 7:52 pm | निस्का

लय भारी लिवलंय.

तिमा's picture

19 Sep 2010 - 8:25 pm | तिमा

मस्त फोडणी दिलेले लेखन.
पण मेलेल्यांविषयी वाईट बोलू नये असे म्हणतात.

मस्त कलंदर's picture

19 Sep 2010 - 10:37 pm | मस्त कलंदर

मस्त चुरचुरीत लेख... आवडला!!!!

गणेशा's picture

20 Sep 2010 - 2:22 pm | गणेशा

आवडले

गणपा's picture

20 Sep 2010 - 2:50 pm | गणपा

:) आवडले.

विसुनाना's picture

20 Sep 2010 - 3:43 pm | विसुनाना

स्वातंत्र्योत्तर मध्यमवर्गीय लेखकांची स्वर्गातली की (नरकातली?) काल्पनिक चर्चा आवडली.
कोणी आधी तर कोणी नंतर.. तरी सगळ्यांना संध्याकाळच्या चहाच्या (एकाच) रांगेत उभे केलेत की 'राव'!

भाऊ पाटील's picture

20 Sep 2010 - 3:44 pm | भाऊ पाटील

हहपुवा. मस्तच जमलाय लेख.

"आपण जे हिरमुसले आहोत ते ऑफिसमधून सेंडॉफच्या दिवशी मिळालेली लाल गुलाबाची फुले दुसर्‍या दिवशी हिरमुसतात तसे, की शेणाने सारवून घेतलेल्या जमीनीवर सकाळी घातलेली रांगोळी संध्याकाळी हिरमुसते तसे यावर विचार करत ते मागे वळाले ..."

हा सिक्सर तर पार स्टेडियमबाहेर हाणलाय !

मुक्तसुनीत's picture

20 Sep 2010 - 5:11 pm | मुक्तसुनीत

एकेक वाक्य वाचताना गालातल्या गालात हसत होतो. खुमासदार लिखाण. ठणठणपाळाने वीसेक वर्षानंतर पुन्हा एकदा अवतार घेऊन लिहावे तसे.

एकेकाळी बहुप्रसव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकांची पीढी तर काळाआड गेलीच , पण हे मागचे एक दशक उलटल्यावर त्यांच्या आठवणी काढणारी पीढीसुद्धा बॅकसीटवर जाऊन बसली आहे. या खुसखुशीत लेखाच्या निमित्ताने या सर्व "अडगळीत" गेलेल्या "समृद्ध"तेला थोडा उजाळा मिळाला खरा :-)

एकदम खमंङ फोडणीचा लेख.
आवडला. प्रतिभा अगदी चौफेर उधळते आहे.. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2010 - 9:43 am | प्रकाश घाटपांडे

दळवी आकंठ जेवण झाल्यावर माणसाच्या चेहर्‍यावर जी एक नैसर्गिक परिपूर्तीची भावना येते ती पांघरुन हातांना येणारा बोंबिलाचा वास हुंगत बसले होते.

बोंबला इथही बोंबीलचा वास आलाच का?

विसोबा खेचर's picture

21 Sep 2010 - 2:33 pm | विसोबा खेचर

मस्त रे संजोपा.. मौज आली! :)

(बाबा कदम प्रेमी) तात्या.

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 6:54 pm | धमाल मुलगा

गाडी जोरात है की राव.

>>"हा तलत शांतपणे सिग्रेटही ओढू देणार नाही, साला..."
गल्ली चुकलं काय वो? जनरली सुशिचे क्यारेक्टर रफीला श्या द्यायचे.
पण जाऊ द्या, कधीतरी दिली तलतला शिवी, आपल्या बाचं काय गेलं :)

>>नाकात आहे, तोवर तो गंध असतो, छातीत गेला की तो श्वास होतो'
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं......
_/\_

भट्टी काय पेटलीये, काय पेटलीये! व्वा!

मद्यं सत्यं जगन्मिथ्या:
जिवो गांडुळैव न परः |
:D

सन्जोप राव's picture

22 Sep 2010 - 7:34 am | सन्जोप राव

गल्ली चुकलं काय वो? जनरली सुशिचे क्यारेक्टर रफीला श्या द्यायचे.
पण जाऊ द्या, कधीतरी दिली तलतला शिवी, आपल्या बाचं काय गेलं Smile
सुशिंची एक कादंबरी वाचली होती, त्यात तलतची सलग दोन गाणी ऐकून तो नायक असाच 'उदय विहार' मधून तिरिमिरुन बाहेर पडतो. तपशीलात घोळ असेल तर 'पोएटिक लायसन्स' म्हणून सोडून द्या....

ऋषिकेश's picture

21 Sep 2010 - 7:46 pm | ऋषिकेश

म्हणूनच म्हणतो तुमचे लेखन म्हणजे पर्वणी असते!
क्या बात है रावसाहेब!!

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Sep 2010 - 3:41 am | बिपिन कार्यकर्ते

फ र मा स

धनंजय's picture

22 Sep 2010 - 5:02 am | धनंजय

मजा आली.

उल्लेखलेले बरेच लेखक वाचलेले नाहीत (आणि कदाचित पुढेही वाचणे होणार नाही). म्हणून बरेच विनोद समजले नसतील, अशी थोडीशी खंत वाटते. पण ते विनोद न समजूनही मजा आली.

सन्जोप राव's picture

22 Sep 2010 - 7:38 am | सन्जोप राव

उल्लेखलेले बरेच लेखक वाचलेले नाहीत (आणि कदाचित पुढेही वाचणे होणार नाही).
नशीबवान आहात. वपु , कदम, सुशि (थोडेफार पिंगेही) यांची पारायणे करणारे आणि सर्वात आवडता लेखक सिडने शेल्डन असणारे यांच्यात तत्वतः फरक नाही.