पॅराडाइज नाऊ

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
5 Sep 2010 - 4:36 pm

नॅब्लूस हे पॆलेस्टाईनमधील एक शहर. सैद आणि खालेद हे त्या शहरात एकत्र वाढलेले जिवाभावाचे मित्र. सुहा ही सैदची मैत्रीण. तिचे वडील इस्रायलविरुद्धच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेले. परंतु पॅलेस्टाईनबाहेर वाढलेली सुहा आहे मध्यममार्गी!

मूळात मोटर मेकॅनिक असलेल्या सैद आणि खालेद यांची तेल अवीववर आत्मघातकी हल्ला करण्याच्या मोहिमेवर निवड होते. मोहिमेला निघण्यापूर्वीचा शेवटचा दिवस ते आपल्या कुटुंबियांसमवेत घालवतात, त्यांना ह्या मोहिमेबद्दल कसलीही चाहूल लागू न देता! सैदला सुहाच्या शांतताप्रिय, मध्यमार्गी विचारांचा अंदाज येतो. त्याच्या मनात किंचित चलबिचल होते पण तो तसे दाखवून देत नाही.

सरहद्द ओलांडून ते पलीकडे जातात. परंतु, इस्त्रायली सुरक्षादलांना सुगावा लागल्यामुळे त्यांची पहिली मोहिम फ़सते आणि त्यांना परत यावे लागते.

खालेद आपल्या अड्ड्यावर परततो पण सैदचा पत्ता लागत नाही. त्यामुळे त्यांच्या म्होरक्यांचा गैरसमज होतो की, सैद पळपुटा आहे. पण खालेदला सैदबद्दल विश्वास आहे. तो सैदला शोधायला निघतो. आणि त्यात त्याची भेट होतो सुहाशी. सुहा त्यालादेखिल हिंसाचार हाच एकमेव मार्ग आहे काय असा प्रश्न विचारते.

दुसया दिवशी ते पुन्हा जातात. पण आता सैदचा हल्ला करण्याचा विचार पक्का आहे तर खालेदला सुहाचे म्हणणे पटले आहे!

आपल्यावरील अन्यायाची तड लावण्यासाठी आत्मघातकी हल्ला हे उत्तर नाही, हे त्याला कळते. तो सैदला समजावण्याचा प्रयत करतो. परंतु, सैद ऐकत नाही. अर्ध्या मोहिमेवरून खालेद परत येतो आणि सैद तसाच पुहे जातो. अंगावर, कपड्याखाली स्फ़ोटके भरलेली. त्यांचा रिमोट कंट्रोल हातात घेऊन सैद तेल अवीवमधील बसमध्ये चढतो.

चित्रपटाचा शेवट मोठा आगळा!

सैद बसमध्ये बसला आहे. बसमध्ये आजूबाजूला सर्वत्र इस्रायली नागरीक आणि सैनीक आहेत. त्याच्या अंगावर स्फ़ोटके आहेत. हातात रिमोट कंट्रोल आहे. कॅमेरा हळू हळू त्याच्या नजरेवर स्थिर होतो. तसाच काही काळ जातो आणि चित्र हळू हळू धूसर होत होत चित्रपट संपतो.

सैद ती बस उडवतो की पकडला जातो, याचे उत्तर चित्रपट देत नाही. उत्तर शोधण्याची जबाबदारी दिग्दर्शकाने प्रेक्षकांवर सोडली आहे!

***

चित्रपट पाहून झाल्यावर लक्षात येते की, अजूनही बर्‍याच प्रश्नांचा भुंगा डोक्यात फ़िरतो आहे. अन्यायाची तड लावण्यासाठी कोणते मार्ग अधिक श्रेयस्कर आहेत? हिंसेचा अवलंब हाच एकमेव मार्ग आहे का? चित्रपट संपतो पण हे प्रश्न संपत नाहीत.

चित्रपटाचे सहनिर्माते अमिर हरेल हे इस्रायली ज्यू. त्यांच्याच शब्दात -
"First and foremost the movie is a good work of art," Harel said. "But if the movie raises awareness or presents a different side of reality, this is an important thing."

अनेक अनुत्तरीत प्रश्न डोक्यात भरवून घ्यायचे असतील तर, हा २००६ चा गोल्डन ग्लोब विजेता चित्रपट जरूर पहा.

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Sep 2010 - 4:42 pm | विसोबा खेचर

क्या बात है..

सुनीलशेठ, तुझी चित्रपरिक्षणं मस्त असतात.. हेही आवडले..थोडक्यात परंतु चांगलं व नेमकं..!

तात्या.

श्रावण मोडक's picture

5 Sep 2010 - 5:07 pm | श्रावण मोडक

छान परिचय.
अवांतर: स्टोरीची बैठक पटतीये का? मला ती पूर्ण पटत नाही. प्रचारकी शैलीतील वाटते आहे. कारण या प्रश्नातील आत्मघाती हल्ल्यांचा विषय इतका सीमीत नाहीये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 8:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'गोष्टी'ला शेवट न दिल्यामुळे चित्रपट बराच वरच्या दर्जाचा असावा असं वाटत आहे.

मी-सौरभ's picture

5 Sep 2010 - 11:31 pm | मी-सौरभ

नावाचा असाच एक चित्रपट पाहिला होता

शिल्पा ब's picture

6 Sep 2010 - 6:32 am | शिल्पा ब

ह्म्म्म. . जरुर बघेन.

सुनील's picture

6 Sep 2010 - 8:58 am | सुनील

जालावर ऊंडारताना मिळालेला हा दुवा - " alt="" />