फिताधारी कुत्री

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
12 Jul 2010 - 9:04 am

फिताधारी कुत्री

एका शेतकऱ्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, बैल, शेती वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच ते काम करून ती कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले मामुले काम आहे आपले! अशा वातावरणात ती कुत्री काम व्यवस्थीत करीत नसत. त्यांना कामामधे रस यावा, आणि अभिमान वाटावा म्हणून शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्यातल्या त्यात चांगल्या कुत्र्यांना कामाचे कौतूक म्हणून गळ्यात बांधायला रंगीत फ़िता दिल्या. त्या फ़ितांना छान छान किणकिण आवाज करणाऱ्या घंटा देखील होत्या. फ़िताधारी कुत्री मोठ्या दिमाखात आपापल्या फ़ितांचे प्रदर्शन करीत सगळी कडे फ़िरायची. काम संपल्यावर देखील ती फ़िता सगळ्यांना गर्वाने दाखवित मिरवायची. ज्यांना रंगीत फ़िता मिळाल्या नाही, ती कुत्री ईतरांचा हेवा करायची आणि आपल्यालाही फ़ीत मिळावी म्हणून जोमाने काम करीत. गळ्यात फ़ीत असणे ही जणू सामाजीक प्रतिष्ठेची गोष्ट झाली.
शेतकऱ्याला फ़ितांमधील घंटांच्या आवाजाने, कुत्र्यांवर चोवीस तास नजर ठेवणे शक्य झाले. त्यामुळे फ़ार थोड्या खर्चात त्याला चोवीस तासांचे गुलाम मिळाले. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.

एकदा विश्रांतीच्या वेळात माळरानावर जमून कुत्री मौजमजा करीत होती. त्यात एकच फ़िताधारी होता. तो अर्थातच आपल्या फ़ितेचे प्रदर्शन करीत इतरांना जळवीत होता. आपल्या फ़ितेमधून कसे वेगवेगळे मधूर आवाज निघतात, ती फ़ीत वजनाला किती हलकी आहे इत्यादी अप्रुप ऐकून कुत्री मनामधे त्याचा हेवा करीत, वरवर "कित्ती छान, कित्ती आधुनिक" वगैरे म्हणत जिभल्या चाटीत होती. सर्वांची गाणी, गप्पा, खेळणे रंगात आले होते. इतक्यात शेतकऱ्याचा नोकर घंटेच्या आवाजाने माग काढीत तिथे आला. काहितरी महत्वाचे काम ह्या फ़िताधारी कडून करवून घ्यायचे होते, कारण तो एक उत्तम कामगार म्हणून माहिती होता. नोकर फ़िताधारीला साखळीला पकडून आपल्याबरोबर ओढून नेऊ लागला.

खरं तर इतकी मौज मजा सोडून कामासाठी जाणे फ़िताधारीच्या अगदी जिवावर आले होते. पण तसे न दाखवता, शेतकऱ्याच्या साम्राज्यात आपण किती महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकिच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणून ऐटीत तो तिथून जाऊ लागला. तेव्हा त्यातली काही बिनफ़िताधारी कुत्री त्याच्याकडे मत्सराने पाहू लागली. त्यानंतर आजुबाजुला चाललेल्या दंगामस्तीचा आस्वाद घेणे देखील त्यांना जमले नाही.

बोध-
१) चैनीचा आभास आणि आभासाची तृष्णा निर्माण करून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
२) निर्भेळ सुख व्यावहारीक जीवनात क्वचितच लाभते. प्रत्येक सुखासोबत काही दु:खे देखील स्विकारावी लागतात.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

12 Jul 2010 - 9:27 am | मुक्तसुनीत

कथा रोचक आहे. विशेषतः कुत्र्यांचे प्रतीक. ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल.

पण असो. रूपके वापरतानाची काळजी घेतली नाही तर ती अंगावर शेकू शकतात असेही एक तात्पर्य यातून काढता येईलच.

मला वाटते अशा स्वरूपाची सुंदर सुंदर प्रतिके वापरून कथानके लिहिण्याकरता एक विशिष्ट ब्लॉग राखीव आहे. लवकरच ही कथा तिथे येईलच. तिथेच ती जास्त चांगली शोभून दिसेल असेही वाटते.

श्रावण मोडक's picture

13 Jul 2010 - 11:02 am | श्रावण मोडक

ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल.

हाहाहाहा... ऑर्वेलला फक्त कम्युनिझ्मच अपेक्षीत होता असं नाही हेच खरं मास्तर.

ओढताण करुन ,इकडचा पाय तिकडे जोडण्याचा केविलवाणा दुसरा एक प्रयत्न असेच ह्या कथेबाबत म्हणता येईल.
वेताळ

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Jul 2010 - 9:35 am | llपुण्याचे पेशवेll

कथा आवडली.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

हापुस आम्बा's picture

13 Jul 2010 - 10:04 am | हापुस आम्बा

कथेचा बोध अत्यन्त समर्पक आहे.

आणि तिच वस्तुस्थिति आहे.

अवलिया's picture

13 Jul 2010 - 1:51 pm | अवलिया

कथा आवडली.

--अवलिया

मितभाषी's picture

13 Jul 2010 - 2:07 pm | मितभाषी

असेच म्हणतो.

अवांतर : गळयात फिती आहेत म्हणुन बरे नाहीतर आपापर्यंत मुन्सिपाल्टीवाल्यांनी उचलुन नेले नसते का??? :D