विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - २ : फ्रान्स - दी ब्ल्युज ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in विशेष
11 Jun 2010 - 12:25 pm
फिफा२०१०

अंगाची लाहीलाही करणार्‍या कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या अशाच एका रणरणत्या दुपारी अचानक आभाळ दाटुन बरसलेल्या पावसाचे थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

आयुष्यात मिळालेल्या पहिल्या स्व-कमायीच्या पगाराच्या पैशाचे मोल आणि त्यातुन आपल्या आप्तजनांना भेटी देण्यातले थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

बराच काळ वाट पाहुन व त्यासाठी कठोर परिश्रम करुन जेव्हा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच जेव्हा आपल्या 'प्रिय' बरोबर एखाद्या छानशा संध्याकाळी कॉफीसाठी भेटण्यासाठी जाता व ती समोर येते तेव्हा हृदयात होणार्‍या धकधकीची वर्णन शब्दात कसे करतात हो ?

अवघड आहे ना ?

नक्कीच अवघड आहे, मग मला सांगा ह्या फुटबॉल वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचच्या 'किकऑफ'चे वर्णन व त्याचा तो रोमांच ह्याचे वर्णन मी शब्दात कसे करु ?

६ तास, केवळ ६ तास ... काउंटडाऊन सुरु झाले आहे.

आकडे फार फसवे असतात नाही?

अहो ६ तास वाट पहातो कोण?

प्रेक्षकांच्या दॄष्टीने ऑलरेडी ह्या मॅचचा किकऑफ झाला आहे, आपापल्या देशाचे झेंडे आणि आपल्या संघाचे पोषाख वगैरे घेऊन ऑलरेडी लाखो पाठिराखे जोहान्सबर्गमध्ये डेरेदाखल झाले आहेत. ज्यांना तिकडे जाणे जमले नाही त्यांनी ऑलरेडी संध्याकाळचे प्लानिंग केले आहे, आज करोडो डोळे टीव्हीसंचाला चिकटतील, हजारो हॉटेल्स आणि पब्ज खचाखच भरतील व लाखो लिटर उत्साहवर्धक द्रव्याच्या कैफात दिलेल्या आरोळ्यांनी अजुन ६ तासानंतर सर्व फुटबॉलप्रेमी एकाच नशेत धुंद होतील.

सॉकर ... सॉकर ... सॉकर !!!
सॉकर ... सॉकर ... सॉकर !!!

घड्याळाप्रमाणे सांगायचे तर ह्या क्षणाला अजुन ६ तासानंतर एक दिमाखदार सोहळ्यानंतर ह्या स्पर्धेचे यजमान 'दक्षिण आफ्रिका' आणि अमेरिकन उपखंडातील 'मेक्सिको' हे जोहान्सबर्ग इथे तब्बल ९०००० प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या 'सॉकर सिटी स्टेडियम' वर एकमेकांशी भिडणार आहेत. जेव्हा ह्या सामन्याच्या सुरवातीची सुचना देणारी शिट्टी वाजेल तेव्हा केवळ ह्या दोन संघातल्या सामन्याची सुरवात होणार नसुन आख्ख्या जगाचे लक्ष लागुन राहिलेल्या एका महान संग्रामाचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

ह्या सामन्याचा कैफ उतरतो न उतरतो तोच तिकडे 'केप टाऊन'मध्ये फुटबॉलचे २ दिग्गज व पुर्वाश्रमीचे विजेते असे 'फ्रान्स' आणि 'उरुग्वे' भारतातल्या मध्यरात्रीच्या वेळेला आपापल्या देशाच्या राष्ट्रध्वज आपल्या अंगावर घेऊन स्टेडियमला विजयी फेरी मारण्यासाठी सज्ज झाले असतील.

हे दोन्ही सामने खेळले जाणार आहेत ते जगातल्या सर्वोत्कृष्ट अशा ३२ संघातल्या ८ गटांपैकी "गट-अ" ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या समुहात. तेव्हा आम्ही आमच्या विश्लेषणाचे प्रथम पुष्प ह्या 'गट-अ' च्या पायी अर्पण करतो.

* गट - अ :
संघ : फ्रान्स, उरुग्वे, मेक्सिको आणि यजमान दक्षिण आफ्रिका

ह्यातला प्रत्येक संघ एकमेकाशी प्रत्येकी १-१ सामान खेळेल व पुढच्या फेरीत प्रवेश करणार्‍या अंतिम २ संघात आपली वर्णी लावण्यासाठी व जमल्यास झळाळत्या विश्वचषकावर आपले नाव कोरुन आपल्या राष्ट्रातल्या पाठिराख्यांना एक अनोखी भेट देण्यासाठी प्राण पणाला लाऊन मैदानात उतरेल.

फ्रान्स :

मॅन्चेस्टर युनायटेड सारख्या दिग्गज क्लबचा अ‍ॅटॅकिंग डिफेंडर आणि साईड-बॅकचा कणा असलेल्या 'पेट्रिक इव्हरा' च्या नेतृत्वाखाली ह्यावेळी फ्रान्स संघ ह्या विश्वचषकासाठी आपला डाव मांडतो आहे. अनेक जागतीक क्लब्स गाजवणारे भरमसाट स्टार आणि त्यांची अफाट कौशल्ये ह्यांनी हा संघ संपुर्ण समतोल वाटतो आहे.
१९९८ साली एकहाती विश्वचषक जिंकुन देणार्‍या व २००६ साली फायनलमध्ये इटलीच्या माटेराझ्झीच्या छातीवर डोक्याने धक्का देऊन व नंतर 'रेड कार्ड' घेऊन मैदानाबाहेर जाणार्‍या व त्या धक्क्यातुन संपुर्ण संघ न सावरल्याने केवळ 'उपविजेते' ह्या पदावर समाधान मानावे लागलेल्या 'झिनादेन झिदान' चा फ्रान्स संघ.
१९९८ साली विश्वचषक जिंकल्यानंतर पुढच्या वेळी २००२ मध्ये ह्यांना 'फेव्हरिट' मानले जात असताना आश्चर्यकारकरित्या पहिल्याच फेरीत बाद होणारा हाच तो झिनादेन झिदानचा फ्रान्स संघ, पण ह्यावेळी तो खेळणार आहे झिदानच्या अनुपस्थितीत. झिदान ह्या टीममधुन बाहेर गेले आणि ह्यांचे नशिबही फिरले, यशाचा प्याला काठोकाठ भरुन जल्लोश साजरा करणार्‍या ह्या फ्रान्सला झिदाननंतर यशाचा एक थेंब घेण्याकरता खुप झगडावे लागत आहे.
पण १९५४ पासुन अगदी मोजके अपवाद वगळता युरोप सारख्या कठिण गटातुन नेहमीच 'पात्र' ठरणारा हा संघ.
लोकल फुटबॉलही जोरदार आहे, अनेक हुशार खेडाळु देशोदेशीचे क्लब्ज गाजवत आहेत, ह्यावेळच्या चॅम्पियन्स लीगमध्ये फ्रान्सच्याच 'लियॉन' संघाने स्पॅनिश जायंट 'रियाल माद्रिद' ह्या संघाला पाणी पाहुन त्यांना नॉक-ऑट करण्याचा भीमपराक्रम केला.

संघ

गोलरक्षक : सेड्रिक कॅरासो, ह्युगो लॉरिस

बचावफळी : ईरिक आबिदाल, पेट्रिक इव्हरा, विल्यम गॅलास, गायल क्लिची, मार्क प्लॅनस, अ‍ॅन्टानियो रिव्हेलेरी, सॅग्ना.

मिडफिल्डर्स : डैबी, डिएरा, फ्लॉरेंट मलुडा, फ्रँक रिबेरी, जेरमी टॉलॉन, योहान गॉर्कुफ्फ

फॉर्वर्ड्स : थियरी हेन्री, निकोलस अनेल्का, सिडने जियेवु, आन्द्रे सिग्नॅक

प्रशिक्षक : रेमंड डॉमनिक ( फ्रान्स )


ह्यावेळी फ्रान्सची मुख्य मदार आहे ती झिदानचा वारसदार म्हणुन नावारुपाला येत असलेल्या व सध्या जर्मनीतल्या बायर्न म्युनिक ह्या क्लबच सुपरस्टार असलेल्या 'फ्रॅंक रिबेरी' ह्याच्यावर, हा फ्रान्सचा 'प्ले मेकर' आणि आघाडीचा मिडफिल्डर आहे. कमालीच्या वेगवान हालचाली, बेघडक टॅकल्स, फ्री-किकचा बादशाह आणि फोर्वर्डसना क्रॉस पासेस देण्यात हातखंड असलेला एक अत्यंत 'तापट' खेडाळु असे रिबेरीचे वर्णन करता येईल.
आत्तापर्यंतच्या ४५ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७ गोल मारलेल्या व ११ गोलांना मदत केलेल्या रिबेरीने आत्तापर्यंत एकुण ८ वर्ल्डकप सामने खेळले आहेत व आपला एकमेव गोल हा २००६ ला स्पेन विरुद्ध मारुन फ्रान्सला १-१ बरोबरी साधण्याचा चमत्कार करणार्‍या व उरलेला वर्ल्डकप बेंचवर बसुन झिदानचा खेळ पहात घालवणार्‍या रिबेरीकडुन ह्यावेळी फ्रान्सला भरपुर अपेक्षा आहेत.


ह्यानंतर फ्रान्सच्या आक्रमणाचा भार संभाळेल तो चेल्सीचा सुपरस्टार 'निकोलस अनेल्का', दिदियर ड्रोग्बाच्या बरोबरीने ह्याने इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये गोलांचा रतिब घातला आहे. मिडफिल्डर्सबरोबर अत्यंत सुरेख ताळमेळ व पेनल्टीच्या वेळी खात्रीशिर 'हेडर' मारण्याची ख्याती असलेला अनेल्का नक्कीच फ्रान्ससाठी आशेचा किरण ठरु शकतो. आर्सनेल, रियाल माद्रिद, चेल्सी, लिव्हरपुल अशा दादा क्लबमधुन खेळलेल्या अनेल्काकडे अनुभवाची कमी नाही, फक्त आता त्याला तोच अनुभव इथे देशासाठी पणाला लावायचा आहे.
फ्रान्सकडुन ३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या अनेल्काच्या नावावर ८ गोल आहेत, ह्यावेळी फ्रान्सला नक्कीच जास्तीची अपेक्षा आहे.


चेल्सीच्या ईपीएल विजयाचे शिल्पकार जरी लँपार्ड आणि ड्रोग्बा असले तरी त्यांना मदत झाली ती "फ्लॉरेन्ट मलुडा" ह्या फ्रान्सच्या विंगरची. मैदानाच्या एका कोपर्‍यातुन नेत्रदिपक ड्रिबलिंक करत बॉल जाळ्यापर्यंत न्हेणारा व बचावपटुला चकवुन जाळ्याकडे सुरेख क्रॉस देणारा मलुडा बॉल लगदी स्ट्रायकरच्या पायात आणुन ठेवतो, तो जाळ्यात सारणे हे केवळ काम उरते. जरी मलुडाचा वैयक्तिक गोल स्कोअर कमी असला तरी त्याने क्रॉस देऊन असिस्ट केलेल्या गोलांची संख्या अफाट आहे. फ्रान्सच्या आघाडीला बॉल चारण्यासाठी मलुडासारखा 'विंगर' फार महत्वाचा ठरणार आहे.


थियरी हेन्रीसारख्या महारथ्याकडुन व रिबेरी, अनेल्का, गलास सारख्या अतिरथ्यांच्या स्पर्धेत संघाची कॅप्टनशिप पटकावणारा व मॅन-युचा फुल बॅक डिफेंडर असणारा "पेट्रिक इव्हरा" हा फ्रान्सच्या प्ले मेकिंगमध्ये नक्कीच मोठ्ठी भुमिका बजावेल. डिफेंडर लाईनपासुन थेट प्रतिस्पर्ध्याच्या गोलपर्यंत धडका मारणे, अचुक लाँग पासेस देण्याचे कौशल्य, प्रतिस्पर्धी विंगरला रोखण्याची कामगिरी आणि बॉल थ्रो इनवेळी करेक्ट पासेस ही इव्हराची वैशिष्ठ्ये.


विल्यम गॅलास हा फ्रान्सच्या बचावफळीचा मुख्य मोहरा, गोल समोरच्या बॉक्समध्ये भिंतीसारखा उभा राहणारा गॅलास. त्याच्या अवाढव्य शरिरयष्टीचा उपयोग करुन प्रतिस्पर्धी स्ट्रायकरकडुन बॉल काढुन घेण्याचे व तो क्लियर करण्याचे निर्विवाद कौशल्य. त्याच्या बेधडक स्लायडिंग टॅकल्स, चपळाईच्या हालचाली, परफेक्ट मार्किंग आणि बॉलचा अचुक अंदाज ह्या गोष्टी त्याला जगातला एक बेस्ट डिफेंडर बनवतात. गॅलासची जादु जर चालली तर त्याला ओलांडुन फ्रान्सच्या गोलपर्यंत पोहचणे ही प्रत्येक टीमची डोकेदुखी ठरणार आहे. हा सध्या 'आर्सनेल' ह्या इंग्लिश क्लबच्या बचावफळीचा महत्वाचा मोहरा म्हणुन ओळखला जातो, आता त्याच्याकडुन फ्रान्स हीच अपेक्षा ठेवणार हे नक्की.


सेड्रिक करॅसो हा फ्रान्सचा नंबर १ चा गोलरक्षक. चित्याची चपळाई, हवेत उड्या घेण्यात प्रभुत्व, पेनल्टीच्या वेळी बचावपटुंची भिंत उभी करण्यातला अभ्यास, गोलसमोर बिनधास्त धावत येऊन स्ट्रायकरला टॅकल करुन बॉल काढुन घेण्याची क्षमता.
करॅसोची सगळ्यात मोठ्ठी ताकद म्हणजे एखादा फटका त्याच्याकडुन अर्धवट अडवला गेला आणि बॉल पुन्हा प्रतिस्पर्ध्याच्या ताब्यात गेला तर पटकन योग्य पोझिशन घेऊन पुन्हा डिफेंडला उभे राहण्याची क्षमता. ह्याचा आणि बचावफळीचा योग्य ताळमेळ जमला तर फ्रान्सवर गोल चढवणे हे प्रतिस्पर्ध्यांसाठी नक्कीच आव्हान असेल.

फ़्रान्सची ताकद :

अफाट अनुभव असलेली आघाडीची फळी आणि मिडफिल्डर्सचा संच तसेच रिबेरीसारखे नवे युवा टॅलेंट. थियरी हेन्रीसारखा अनेक पावसाळे बघितलेला नेता अजुन संघात आहे. वेगवान खेळ करण्याकडेचा कल आणि आता रिबेरीसारख्या प्लेमेकरचा गवगवा.
गॅलास, इरिक अबिदाल आणि कॅरासो ह्यांचे त्रिकुट जमले तर गोल भेदणे प्रतिपक्षाला अवघड जाणार.
मलुडा आणि अनेल्का हे एकाच क्लबकडुन खेळत असल्याने समन्वयात होणारा फायदा.

फ्रान्सचे कच्चे दुवे :

अनुभव जरी प्रचंड असला तरी थियरी हेन्रीसारखा खेडाळु सध्या वय वाढल्याने तितकासा खेळ करु शकत नाही, दुखापतीची चिंता आहेच, गॅलास अजुन संपुर्ण तंदुरुस्त नाही. सराव सामन्यात चीनकडुन १-० ने मात खावी लागल्याचाही धक्का आहेच. रिबेरीचा भडकुपणा कधीही त्याला बाहेरचा रस्ता दाखवु शकतो व त्यामुळे टीम अडचणीत येऊ शकते.
प्रशिक्षक डोमनिक ची स्ट्रॅटेजी अजुन क्लियर वाटत नाही व नेतृत्वही प्रभावी वाटत नाही.
इव्हराकडे कप्तानी आल्याने टीमच्या आत किंचित नाराजी असु शकते व त्यातच त्याने 'रेसिझम'चा सुर आळवल्याने मामला बिकट झाला आहे.
प्रक्षिक्षक डॉमनिकचा रियाल माद्रिदचा स्ट्रायकर "करिम बेंझामा" ह्याला वगळण्याचा निर्णय सगळ्यांनाच धक्का देऊन गेला, आता थिररी हेन्रीच्या अनुपस्थितीत आक्रमणाची ताकद बेंझामा नसल्याने काही अंशी कमजोर होणार हे निश्चित.
शिवाय अपेक्षांचे ओझे हा फार मोठ्ठा फॅक्टर फ्रान्सला टॅकल करावा लागेल ...

आमचा अंदाज :

फ्रान्स मुश्लिलीनेच सेमीफायनलपर्यंत जाऊ शकते. फायनलचा ड्रॉ आणि चषकाचे स्वप्न अवघड आहे असे दिसतेय. पहिली फेरी मात्र विनासायास पहिल्या नंबराने पार करतील.

प्रतिक्रिया

सहज's picture

11 Jun 2010 - 12:53 pm | सहज

अवघड आहे ना ?
नक्कीच अवघड आहे, मग मला सांगा ह्या फुटबॉल वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचच्या 'किकऑफ'चे वर्णन व त्याचा तो रोमांच ह्याचे वर्णन मी शब्दात कसे करु

क्या बात है!

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 1:08 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त ओळख आणि मांडणी पण छानच. फोटोमुळे मजा वाढतेय.

घाना / नायजेरिया मधे नेहमी जाणे होते. आत्ता या क्षणी तिथे असायला हवे होते असे सारखे वाटू लागले आहे. साधी चेल्सी व्ह. मॅन यु मॅच असली तरी तिथे भयानक दंगा चालतो पब्लिकचा. आता वर्ल्डकप म्हणजे काय विचारूच नका. सगळं पब्लिक जर्स्या घालूनच असेल रस्त्यांवरून. आयव्हरी कोस्ट, घाना, नायजेरिया म्हणजे तिथल्या स्थानिक फुटबॉल मधले दादा आणि अगदी भारत पाकिस्तान टाईप चुरस. पण आता तरी तिथे आयव्हरी कोस्टला प्रचंड पाठिंबा असणार. द्रोग्बा तर प्रचंड फेमस आहेच तसाही.

बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा's picture

11 Jun 2010 - 4:56 pm | मेघवेडा

>> पण आता तरी तिथे आयव्हरी कोस्टला प्रचंड पाठिंबा असणार. द्रोग्बा तर प्रचंड फेमस आहेच तसाही.

येस्स 'दादाए' द्रोग्बा! ;)

डानराव, सुंदर ओळख! लेखमालेला उत्तम सुरूवात केलीये तुम्ही! अजून येऊ दे! :)

मदनबाण's picture

11 Jun 2010 - 1:34 pm | मदनबाण

वा...सुरेख वर्णन. :)
आत्ता पासुनच माझे "पाय" शिवशिवायला लागले आहेत... ;)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

गणपा's picture

11 Jun 2010 - 1:49 pm | गणपा

हे लै बेस चालवलय यार तुम्ही मित्रांनी.
आयला फोटु सकट प्रत्येकाची माहिती कळतेय.
आजवर बरीच नाव ऐकुन होतो पण कधी त्यांना प्रत्यक्ष पाहिल नव्हत.
प्रत्येक संधांचे कच्चे पक्के दुवे कळतायत.
मजा येतेय वाचायला..

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते

लेका गणप्या... तुलाच खरडणार होतो आत्ता. तुमच्या तिथल्या फुटबॉल फिव्हरवर लिही ना थोडंसं... पब्लिक तर एकदम चेकाळलेलं असेल आता तिथे.

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

11 Jun 2010 - 2:36 pm | गणपा

हॅ हॅ हॅ.. आमचा लिखाणाचा आणंद है भौ.
पर पर्वाच्याला जेव्हा वॉर्मप मॅच मध्ये नायजेरीया जिकली तेव्हा पब्लीक वेड झालतं.
सध्या सगळ आफ्रिकाच फुटबॉलमय झालय.
इकडेही लोकांत प्रचंड उत्साह भरुन र्‍हायलाय.
या विकांती एखांद्या पब वजा क्लब मध्ये जाउन लुफ्त घ्यायचा विचार आहे. पाहु कस जमतय ते.

निखिल देशपांडे's picture

11 Jun 2010 - 1:50 pm | निखिल देशपांडे

डॉण्या भारी लेख रे...
फ्रान्स चा काही भरवसा देता येत नाही

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

विदुषक's picture

11 Jun 2010 - 2:47 pm | विदुषक

माझ्या सारख्या फुटबॉल मध्ये आडणी असणाऱ्या माणसाला(?) खुपच छान माहिती मिळते आहे .आता मजा येणार माच पाहायला

मजेदार विदुषक

प्रभो's picture

11 Jun 2010 - 6:38 pm | प्रभो

लै भारी डॉन्राव......जहबहरा !!!!!
स्पेनवरच्या लेखाची आतुरतेने वाट पाहतोय रे...!!!

भारद्वाज's picture

11 Jun 2010 - 8:45 pm | भारद्वाज

डानराव...लगे रहो...!
-
जय हिंद जय ब्राझील

विनायक पाचलग's picture

11 Jun 2010 - 8:50 pm | विनायक पाचलग

लय भारी डॉनराव...
असेच लिवा ,आम्ही वाचतो मग
(कोल्हापुरकर फुटबॉलप्रेमी)
विनायक पाचलग
वाँट टु टॉक

( सध्या इथे जर्स्यांच्या खपाला उधाण आले आहे ,त्यात पीटीएम ( स्थानिक संघ)आणि ब्राझील ची जर्सी बर्यापैकी सेम आहे ,दुकानदार खुषीत आहेत..)

शुचि's picture

12 Jun 2010 - 1:56 am | शुचि

पण फुट्बॉल आणि सॉकर एकच का नक्की??
फुट्बॉलचा बॉल लांबट असतो अमेरीकेत.
लेख मस्त.
सुरुवात तर खलास झाले मी वाचून.
>> बराच काळ वाट पाहुन व त्यासाठी कठोर परिश्रम करुन जेव्हा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच जेव्हा आपल्या 'प्रिय' बरोबर एखाद्या छानशा संध्याकाळी कॉफीसाठी भेटण्यासाठी जाता व ती समोर येते तेव्हा हृदयात होणार्‍या धकधकीची वर्णन शब्दात कसे करतात हो ? >>
=D> =D>

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

छोटा डॉन's picture

12 Jun 2010 - 2:06 am | छोटा डॉन

>>पण फुट्बॉल आणि सॉकर एकच का नक्की?? फुट्बॉलचा बॉल लांबट असतो अमेरीकेत.
अहो पण ते अमेरिकेत.
अमेरिकन फुटबॉल ( लांबट बॉलवाला) फक्त अमेरिका आणि कॅनडातच खेळतात ( बहुतेक ).

बाकी सर्व जग ज्याला फुटबॉल म्हणते त्याला अमेरिका "सॉकर" म्हणते.
असो, आम्ही बोलत आहोत ते "गोल फुटबॉलबद्दल' :)

------
(गोलमटोल)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 2:21 am | शानबा५१२

लेख चित्रांनी छान सजवला आहे.मी वाचला नाही फक्त चित्र बघितली :D

भारत जेव्हा ह्या स्पर्धेत नियमीतपणे दीसु लागेल तेव्हा आम्ही बघु आवडीने............म्हण्जे असा योग युगायुगानंतर येइल अस वाटत.

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jun 2010 - 1:15 pm | ब्रिटिश टिंग्या

फ्रान्स व्हर्चुअली आउट ऑफ वर्ल्ड्कप :)

जे.पी.मॉर्गन's picture

18 Jun 2010 - 1:45 pm | जे.पी.मॉर्गन

जवळपास फ्रान्सला श्रद्धांजली वाहण्याचीच येळ आली आहे... पण सालं ह्यांचं नशीबही असं आहे ना... म्हातारे १-० नी पुढची मॅच जिंकतील आणि कसेबसे पोचतील पुढच्या फेरीत. आणि मग रडत - खडत सेमीफायनल्सपर्यंत जातील. एरवी ह्यांच्याइतका रटाळ खेळणारा संघ नाहिये ह्या वर्ल्डकप मध्ये.

ह्यावर एक जोक आहे -

फ्रान्स - इंग्लंड फ्रेन्डलीवर बेकहम सोडून सगळे इंग्लिश खेळाडू बहिष्कार घालतात. इंग्लंडकडून बेकहम एकटाच खेळतो. तरी अगदी ८८ व्या मिनिटाला गोल मारून फ्रान्स १-० असंच जिंकतं. तेव्हा इंग्लिश खेळाडू बेकहमचं अभिनंदन करायला जातात. तर बेकहम म्हणतो "च्यायला तरी मला ४३ व्या मिनिटालाच रेड कार्ड दाखवून हाकललं म्हणून... नायतर दाखवला असता इंगा ह्यांना."

जे पी

सहज's picture

18 Jun 2010 - 1:49 pm | सहज

लै भारी जोक!

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 2:00 pm | छोटा डॉन

>>तर बेकहम म्हणतो "च्यायला तरी मला ४३ व्या मिनिटालाच रेड कार्ड दाखवून हाकललं म्हणून... नायतर दाखवला असता इंगा ह्यांना."

=)) =)) =)) =))
अशक्य !!!
हा सीन डोळ्यासमोर इमॅजीन करुन अक्षरशः वारलो ...

------
बेंड इट लाईक बेकहम

गणपा's picture

18 Jun 2010 - 1:30 pm | गणपा

पार आग आग केली वो काल मेक्सिकन करीने ;)

नील_गंधार's picture

18 Jun 2010 - 2:23 pm | नील_गंधार

इथे भावी विश्वविजेते म्हणून प्रबळ दावेदार म्हणवणारे संघ पहिल्या फेरित गटांगळ्या खाताना दिसत आहेत.
स्पेन झाला अन आता फ्रान्स.
दोघेहि पहिल्या फेरीत लुप्त होणार काय?

नील.

जे.पी.मॉर्गन's picture

18 Jun 2010 - 5:20 pm | जे.पी.मॉर्गन

इतक्यात का हो स्पेनला घोंगड्यावर घेताय? हा फ्रान्सच्या नावानी पिंड वळायला घेतलीत ते एकवेळ ठीके. पण स्पेनची धुगधुगी आहे की राव शिल्लक ! थोदे दिवस थांबा... स्पेन सेमीजला जातंय की नाही बघा!

जे पी

मी-सौरभ's picture

18 Jun 2010 - 6:36 pm | मी-सौरभ

>>स्पेन सेमीजला जातंय की नाही बघा!

जायलाच पाहिजे

-----
सौरभ :)

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 8:11 pm | धमाल मुलगा

जाणार..जाणार!! फिकीर नॉट!

गो स्पेन गोऽऽ.......

A por ellos oe
A por ellos oe
A por ellos oe
A por ellos oe oe

मी-सौरभ's picture

25 Jun 2010 - 7:31 pm | मी-सौरभ

:H

-----
सौरभ :)