मिल्क: एक चळवळ

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
3 May 2010 - 5:10 pm

माणसाने माणसांवर इतक्या प्रकारे अन्याय केला असेल की त्यापुढे कोणतीही गोष्ट फिकी पडावी.. माणसाला गोष्टि इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वर्गीकृत करता येतात हे मनुष्यप्राण्याचे वैशिष्ट्य समजले जाते. मात्र या गुणामुळे माणसाने माणसाला केवळ वर्गीकृतच केले नाहि तर आपल्या भोवती ही वर्गीकरणाची कुंपणे घालून घेत स्वतःला संकूचिततेच्या सीमेपार ढकलले.. काळा, गोरा, तपकीरी असे रंगांवरून वर्गीकरण करून तो थांबला नाहि तर गोरा श्रेष्ठ, काळा कनिष्ट हे ही त्यानेच ठरविले.. स्त्री-पुरूष हे वर्गीकरण तर निसर्गाने केलेले.. म्हटल्यास तुल्यबळ.. पण त्यातही माणसाने पुरुषाला श्रेष्ठ ठरविले.. पुढे भाषा, वंश, विचार, आचार, धर्म, जाती इत्याही पायदाने ओलांडत माणूस इतका वर्गीकृत झाला होता/आहे की त्याचा वेळ आपले समाजातील स्थान ठरविण्यात व ते सांभाळण्यातच जाऊ लागला/जातो. श्रेष्ठ-कनिष्ठ आले की मान आला.. त्यामुळे कनिष्ठावर होणारा अन्याय आला.. पुढे जग जसजसं एकमेकाला ओळखू लागलं तसं जाणवू लागलं की हा अन्याय एका प्रांताची , समाजाची, धर्माची, वर्गाची मक्तेदारी नसून तो प्रत्येक माणसात भिनला आहे. जगाला अन्यायाची इतकी सवय झाली आहे की बर्‍याचदा आपल्यावर अन्याय होतो आहे हेच त्याला कळत नाहि.. जाणवत नाहि.. त्यातही ज्यांना ते जाणवतं त्यांच्यात ते बदलायची धमक असतेच असे नाहि.. आणि त्यामुळेच त्यातही जे अन्यायविरूध केवळ लढत नाहित तर लढून जिंकतात त्याचे कार्य केवळ उठून दिसत नाहि तर ते प्रेरणादायी असते.

तसा मी भरपूर चित्रपट पाहतो.. वेगवेगळ्या भाषेतले, प्रांतातले, प्रकारचे. यात अनेक चित्रपट आवडतात अनेक आवडत नाहित.. मात्र काहि असे असतात जे मनावर गारूड करून जातात.. भरपूर काळ लोटला तरी चित्रपट मनातून पुसलाच जात नाहि.. असाच गेल्या विकांताला बघितलेला चित्रपट "मिल्क".. माणसाने आपल्या वर्गीकरणाच्या गुणामुळे केलेले अजून एक वर्गीकरण भिन्नलिंगी आणि समलिंगी संबंध ठेवणार्‍या व्यक्ती. अन इथेही माणूस केवळ वर्गीकरण करून थांबला नाहि तर केवळ भिन्नलिंगी संबंधाने प्रजोत्पादन होते ह्या कारणाला पुढे करून तुलनेने अल्पसंख्य असलेल्या समलिंगींवर अन्याय सूरू केले.

कथेची सुरूवात होते हार्वी मिल्क याने काढलेल्या फोटोजच्या दूकानापासून. एका खुलेआम समलैंगिक माणसाने सूरू केलेले दूकान हे त्याचे वैशिष्ट्य असतेच पण त्याच बरोबर ते दूकान हळूहळू समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांचा एक भेटायचा अड्डा होऊ लागतो. आणि बघता बघता "लोग आते गये और कारवाँ बनता गया" ह्या न्यायाने एक धडाडीचा "कंपू" जमू लागतो. अंगभूत गुणांमुळे त्याच्याकडे आपोआपच नेतेपद येते. सूरवातीला केवळ एकत्र जमताना तो अख्खा एरियाच "त्यांचा" म्हणून ओळखला जाऊ लागतो व हार्वीला "कॅस्ट्रो स्ट्रीटचा महापौर" म्हणूल लोक म्हणू लागतात

दूसरीकडे समाजाची अन्याय करण्याची नैसर्गिक प्रकृती काहि राजकीय व्यक्तींमधे जोमाने उसळते व समलैंगिकांना नोकरीवरून काढायचे असा ठराव मांडला जावा अशी सूचना पुढे येते. आणि इथेच कथेला सूरवात होते.. हार्वी मिल्क इथे "ती" प्रसिद्ध सभा घेतो.."मित्रांनो मी तुम्हाला नोकरी देण्यासाठी आलो आहे" हे त्याचे उद्गार सार्‍या अमेरिकेत खळबळ माजवतात. पुढे तो सुपरवायजरच्या निवडणूकीला उभा रहातो.. व सलग दोनदा हरतो.. इथे तो प्रयत्न सोडून देणार तेव्हाच एका मुलाचा त्याला फोन येतो तो सांगतो "मी आता आत्महत्या करणार आहे. मला हे (त्याचे कुटुंबिय) उपचारासाठी घेऊन चाललेत. त्यांच्यामते माझ्यात काहितरी कमी आहे." हार्वी सांगतो काहितरी करू नकोस "आपण लढू.. अशी आशा सोडू नकोस. तू इथे ये इथे रहा".. तो मुलगा अपंग असतो आणि त्यामुळे तो येऊ शकत नाहि. त्यामुलाला आलेले नैराश्य त्याला तिसर्‍यांदा लढण्यास प्रवृत्त करतं.. आता मात्र त्याचा पार्टनर त्याला सोडतो.. तरीही हा न्याय्य हक्कांसाठी लढतो.. व शेवटी अमेरिकेचा पहिला खुलेआम समलैंगिक संबंध ठेवणारा घटनादत्त प्रशासकीय पद भुषविण्यासाठी निवडला जातो. निवडणूकीचा व त्याही पुढचा सॅनफ्रांसिस्को मधे "गे राईट" ऑर्डिनन्स संमत करून घेण्याचा त्याचा हा संघर्षपूर्ण प्रवास म्हणजे हा चित्रपट "मिल्क".इथे हा चित्रपट केवळ समलैंगिकांवरील अन्याय अथवा समलैंगिकांचा लढा इतकाच सिमीत नाहि. त्यामागची भावना, हार्वीचे उत्तम तर्कशुद्ध मुद्दे, सार्वजनिक वाद वगैरेनी चित्रपट रंगत जातो.

तरीही, हार्वीला हेही माहित असतं की आपल्यावर कधी ना कधी हल्ला होणार आहे.. आपल्याला कोणीतरी मारणार आहे म्हणून तो त्याची कहाणी रेकॉर्ड करून ठेवतो त्यातील मला आवडलेल्या शेवटाच्या परिच्छेदाचे हे स्वैर भाषांतरः
"तुम्हाला एका गे माणसाला निवडून दिलंच पाहिजे.. कारण एका तरूण मुलाला.. आणि त्याच्याचसारख्या हजारो मुलांना गरज एक गोष्ट मिळेल ती म्हणजे "आशा".. त्यांना आशा मिळेल ती एका उद्याची, एका चांगल्या आयुष्याची, एका चांगल्या भविष्याची...
जर माझा कधी खून झाला तर मला पाच, दहा, शंभर, हजार व्यक्ती उभ्या दिसल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. जर एखादी गोळी माझ्या डोक्यात मारली गेली तर त्या गोळीने प्रत्येक बंद दरवाजा नष्ट झाला पाहिजे. ही चळवळ अशीच चालू राही पाहिजे कारण ती माझी चळवळ नाहि. ही चळवळ माझ्या स्वार्थासाठी नाहि, पॉवरसाठी-सामर्थ्यासाठी नाहि, ती तिथे असलेल्या "आमच्यासाठी"ची चळवळ आहे.. ही चळवळ फक्त समलिंगींसाठी नाहि तर ही ब्लॅक्सची चळवळ आहे, ही आशियायींची चळवळ आहे, वृद्धांची चळवळ आहे, अपंगांची चळवळ आहे.. ह्या "आम्ही"ची चळवळ!
आशा नसली की हे "आम्ही" प्रयत्न सोडून देतो.. आणि मला माहिती आहे की "आम्ही" केवळ आशेवर जगू शकत नाहि पण आशा नसेल तर ह्या आयुष्यात जगण्यासारखे काय आहे? तेव्हा तू, तू आणि तूसुद्धा.. उठ.. तुमच्या प्रत्येकाला त्या "आम्हीं"ना आशा द्यायची आहे.. तुम्हाला त्यांना आशा द्यायचीच आहे
"

थोडक्यात ही कथा आहे एका बंडखोरीची, एका चळवळीची.. माणसाने फक्त माणूसकीसाठी माणसाविरूद्धच उभारलेल्या एका चळवळीची! प्रत्येकाने पहावी, समजून घ्यावी अशी चळवळ!

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2010 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम ओळख!!!

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 May 2010 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बघायलाच पाहिजे असा चित्रपट!

अदिती

स्वाती२'s picture

3 May 2010 - 6:17 pm | स्वाती२

सहमत!

चित्रा's picture

4 May 2010 - 5:09 am | चित्रा

पण बघेन म्हणते. धन्यवाद.

सुमीत भातखंडे's picture

3 May 2010 - 6:31 pm | सुमीत भातखंडे

बर्याच दिवसांपासून म्हणतोय बघायचा म्हणून.
आता बघायलाच हवा. इतकी छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

राजकारणाचा उपयोग कसा करावा - तडजोडी करता-करताही दूरगामी ध्येय कसे सोडता कामा नये, वगैरे गोष्टींचेही कथन चित्रपटाने प्रभावीपणे केलेले आहे.

उत्तम चित्रपट, उत्तम ओळख

स्पंदना's picture

3 May 2010 - 7:56 pm | स्पंदना

माझ्या क्लायन्ट मध्ये एक 'गे' जोडप होत.
पहिल्यन्दा मला खुप ऑकवर्ड वाटायच त्यान्च्या शी डील करताना.
पण जशी ओळख वाढेल तस तस त्यान्च नात समजायला लागल.
काही जातीची पाखर जन्मात एकच जोडीदार निवडतात तस काहीस मी या जोडी बाबतीत पाहिल.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

प्राजु's picture

3 May 2010 - 10:02 pm | प्राजु

सुरेख परिचय!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

ऋषिकेश's picture

4 May 2010 - 10:51 pm | ऋषिकेश

सगळ्यांचे लेख वाचल्याबद्दल / प्रतिक्रीयेबद्दल अनेक आभार

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.