बालपण !!! आमच ही !!!

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
23 Apr 2010 - 10:31 pm

माझे पाय मी स्वत:च पाळण्यात पाहिले होते.
एक तर आमच्या पिताश्रीना गलेलठ्ठ मिश्या नव्हत्या ज्यावर त्यांनी ताव मारावा, आणि दुसरे म्हणजे जन्म सुपुत्राचा नसून; आता "आणि किती हुंडा द्यावा लागणार?" या लागोपाठच्या दुसरया प्रश्नाचा होता. या साऱ्या गोंधळात आमचे पाय कोण पाहणार हो! असो.

झाले असे ; की दिवस सुगीचे होते. रात्रभर मळणी चालली होती. भाताची ! तर जस जस भात बदललं जाईल तस तस खळ्याभोवतालच्या माळावर पिंजर पसरून वाळवण्यासाठी टाकले जाई. आम्हाला लवकर उठण्याची खोड होती. त्यामुळे श्रमकर् यानि रात्रभराच्या मळणी ने थकलेली गात्र जमिनीला टेके पर्यंत, आम्ही तेथे हजर!
सकाळचा तो धूसर दव भरला आसमंत!! दूर रानात "उठा उठा, चिऊताई! सारी कडे उजाडले" अस सांगणारे कावळे! कावळ्यांना तस बिझी बघून काय करू न काय नको अस झालेली कोकीळ !!
काय वर्णन करू मी त्या सकाळचे ! माझे शब्द तोकडे पडतात. नाही; तशी माणसांचीही चाहूल होती, पण ती थोडीशी लपंडावाशी नात जोडणारी होती. जो तो लगबगीन आडोसा शोधीत होता, अन त्या आडोश्याला बसलेला दुसरा कोणी दिसला की "हात तिच्या **!" अशी शिवी देत; अन आडोश्यावाल्याची शिवी खात माणस पळत होती.

तर अश्या सुप्रभाती; कायमच ताजी तवानी असणारी मी,(लिरील ,लिरील ,लिरील) खळ्यावर टपकले.

अवर्णनीय असं दृश्य माझ्यासमोर पसरलं होत. मळणी नंतर भाताच पिंजर काठीन मोकळ करीत सारी कडे पसरले होते. माझी उंची तेंव्हा कमी असल्याने, माझ्या नजरेच्या टप्प्या पर्यंत पिंजरच पिंजर पसरले होते . पिवळसर सोनेरी रंगाचं, भाताचा ओलसर वास उधळणार, अन काठीने ढोसलून ढोसलून पसरल्यामुळे आलेला त्यांना ढगासारखा फुलदारपणा! मी क्षणात भान विसरले. असं वाटलं दूर रानात पसरलेले अन हळू हळू वर चढणारे ते ढगांचे डोंगर माझ्या पायाशी लोळण घेताहेत. आधीच बाल वय, वर स्वप्नाळू पिंड !! झाले; अस्मादिक त्या ढगांवर स्वार होण्याच्या कल्पनेने वेडावले ! दिल झोकून मी क्षणात स्वतः:ला त्या पिंजराच्या अच्छादनावर !! एका क्षणी मी कल्पनेच्या वारू वर स्वार होते अन दुसऱ्या क्षणाला कपाळ मोक्षाने कळवळत धराशायी !!
त्या पिंजरा खालील अस्सल माळ चांगलाच खडकाळ होता हो! झोकून देताना डोक आधी येत असल्याने, प्रथम कपाळ, मग छाती अन पोट, सार खरवडून निघाल. आता दगड फेकून मारला काय? अन स्वतः:ला दगडावर फेकल काय? मार तसा सेमच बसतो. स्वानुभव आहे हा.

तर त्या वेदनेन कळवळत, स्वप्नातून डायरेक्ट माळावर landing झालेली मी, स्वतः:ला सावरीत उठून बसले. डोक हातात धरून ती कळ जिरवित, अधोवदन बसलेल्या मला , माझ्या पायापलीकडे काही दिसण शक्यच नव्हत. तर तेंव्हा मी माझे पाय पाळण्यात पहिले! आणि अस्मादिकांना स्वतः:ची पहिली वहिली ओळख पटली!! आम्ही साहित्याच्या प्रांगणात अगदी दिवटी, वां ज्योत नाही पण निदान उदबत्ती वां एका काड्या पेटीच्या , काडी एव्हडा तरी प्रकाश नक्कीच पडू अशी खात्री मनाला पटवीत; पुढे कित्येक दिवस ती टेंगळे दुखत राहिली. पुढ जाऊन कधीतरी एकदा "असावे सुंदर अपुले घर" या कल्पनेने पछांडलेल्या charlie chaplin ने घरा मागच्या stream मध्ये ; घोटाभर पाण्यात उडी मारलेली पाहताना, हसता हसता माझा हात पुन्हा त्या टेंगळांवर अवचित फिरला. अजून ती तशीच दुखतात!!!

मोठ होण ही सुद्धा एक किचकट बाब असते. झालं काय की आम्हाला फुटले पाय! आता त्या नव्यान फुटलेल्या पायांचा आम्ही अगदी मनसोक्त वापर सुरु केला.
गावात एक शाळा होती. आमची घरात होणारी अडचण आम्हाला शाळेत पाठवून कमी करायचा प्रयत्न आमच्या पालकांकडून केला गेला.
मला आठवणारी शाळा सांगू का? अहो हे मोठ्ठी मोठ्ठी धेंड त्या शाळेत होती. शाळेच वेळापत्रक लय भारी.
पहिला सकाळी सकाळी मास्तर वर्गावर नजर फिरवायचे. एका छप्परा खाली अधी मधी एक ही भिंत न घालता चार वर्ग भरायचे. गुरुजी म्हणजे; माझा भाऊबंदातला मोठ्ठा भाऊ.
तर हे गुरुजी चारी वर्गांना शिकवायचे. पहिला परिपाठ काय तर कोण आल नाही! मग जी कोण धडधाकट पोर आली असतील त्यांना घेऊन गुरुजी बाहेर पडायचे. गाव तस लहान. त्यामुळे कोण ****** चा आलाय आणि कोण नाही ते एका नजरेत ताडल जाई. मग प्रत्येक घरात जाऊन तो जो कोणी ह्या तुरुंगात भरती व्हायला तयार नसे त्याला पकडून , हात पाय धरून लोंबकळत शाळेत आणलं जाई. आज ही त्या पकड पकडीचा खेळ सुरु असताना होणारा ठो बाजा मला तसाच ऐकू येतो. तर अशी गाव भर फिरून पोर पकडून शाळेत आणली जात. दार लाऊन त्यांना मुकाट केल जाई. लहान लहान आम्ही; हे सार डोळे विस्फारून पाहत असू.
मला तर कोणी शाळेत न्यायला वां घ्यायला आलेल आठवत नाही. खेळत बागडत टाईम पास करायला मी कायमच शाळेत असायचे. कस कुणास ठाऊक पण पहिलीत सुद्धा न बसता चौथी पर्यंतची सारी पुस्तक मी खाऊन टाकली होती. मास्तर हात जोडून मला गप बस म्हणून सांगत. तर ती एवढी मोठ्ठी मोठ्ठी पोर, क !, क ला काना का! करत तिथ बसून असायची. ही च पोर शेतावर कामाला अगदी वाघ असत. पण शाळा म्हंटल की पार शेळी होऊन जात. मास्तर फार आग्रही होते शिक्षणाच्या बाबतीत!!
काही पोर तर आणि पोरी सुद्द्धा त्या उन्हाळ्यात बोहोल्यावर चढलेली मी पाहिलेत.
तर लवकरच त्या शाळेत बसण मला कंटाळवाण वाटू लागल. मग परत भटकंती सुरु.
छोट्या गावात लोक फक्त रात्रीच दाराला आडणा (कडी च प्रायमरी रूप) लावतात. दिवस भर घर तशी उघडीच असत. दार उघड असे वां घरात कोणी थोड्या प्रायव्हसीची अपेक्षा करत असेल तर तसंच पुढ ढकललं जाई. घरातली सारी मंडळी बहुतेक शेतावर असत. तर अश्या मोकळ्या वातावरणात हुंदडत हुंदडत आम्ही एक दोनदा नको तिथ दार ढकलून घुसलेल मला लक्ख आठवतंय. अनुभवातून माणूस शिकतो या न्यायाला पकडून मग मी लोटलेली दार न उघडायचे म्यानर्स शिकले.

पण आमचा शाळेत न बसता गाव भर फिरून घरी जाण्याचा हा उच्छाद बंद करण्यासाठी आम्हाला जवळच्या थोड्या मोठ्या गावातील शाळेत घालण्यात आल.
बहुतेक जण या गावी पायीच जात असत. होत एक दीड किलोमीटर अंतर! मलाही तस पायी जायला आवडायचं. पण प्रोब्लेम होता तो आमच्या जेष्ठ भगिनींचा! या बाई साहेब सूर्यवंशी होत्या. उठवायला गेल की थडाथड लाथा मारीत. त्या मूळे शाळेला कायम उशीर. इतका; की शनिवार ची शाळा मला आठवतच नाही. तर तीच रडण, मग उठण आणि तयार होण संपे पर्यंत माझा तर जीव टांगणीला लागत असे.
मग पिताश्री शेतावरच्या कोणाला तरी आम्हाला 'शायकल' वरन सोडून यायला फर्मावत.
तशी फार लोकांना सायकल येत नसे. एक दोघ जे चालवीत ते हिरो लोक होते गावचे.
तर अशी 'शायकल' चालवायची हौस असलेला मारुतीदादा एकदा आम्हाला घेऊन जातो असं म्हणाला. मालकांच काम आणि आपली थोडी प्रक्टिस असे दोन पक्षी पठ्ठ्याला एका दगडात मारायचे असावेत. तर जेष्ठ भगिनी पुढे नळी वर आणि आम्ही द्वितीय म्हणून मागे कैरीयरवर असे बसवलो गेलो. या मारुती रायाला तशी सायकल चालवता येत असे फक्त जरा ष्टारटिंगला आणि ष्टोपिंग ला प्रोब्लेम होता. तो काय करायचा मैलाचा दगड असतो ना; त्याला तिथ नंबर म्हणत; तर त्या दगडावर पाय ठेवून सायकल वर चढायचा . असा तो स्वार झाला की मग माग पुढ आम्ही दप्तर घेऊन बसवले जायचो. असा हा निघालेला मारुतीदादा शाळा दिसू लागली तसा थांबायच्या विचारानं लड्बडू लागला. त्याची नजर कदाचित तो नंबरचा दगड शोधीत असावी. तसा दगड दिसल्या बरोबर त्यान कचकन ब्रेक लावला. समोर बेसावध म्हणा वां पेंगत असलेल्या आमच्या बहिणाबाई त्या धक्क्यान हान्दल वरून समोर फेकल्या गेल्या. तिला तशी पडलेली बघून मारुतीराव बावचळ ले असावेत त्यांनी गडबडीने सायकल वरून पाय मागे फिरवून खाली उतरायचा प्रयत्न केला. मागे कैरियर वर अस्मादिक!! अशी जोर दार लाथ बसली म्हणता ... एका क्षणात पानिपत!! मारुतीरायांनी आपल नावं झटक्यात सिद्ध केल. पुरी शाळेला जाणारी लंका धुळीला मिळवली त्यांनी.
तर शाळेसमोर धुळीन भरलेले आम्ही, दप्तर घेऊन रडत असलेल चित्र अजूनही ह.ह.पु.वां. करत.
ती शाळा भारी होती हो! तिथ रोज सकाळी ( जर ज्येष्ठ भगिनींच आवरलं तर) प्रार्थना असे. प्रत्येक वर्ग वेगळ्या खोलीत बसे. माझ्या गुरुजींच नावं होत ओतारे गुरुजी. वर्गात सगळ्यात लहान मी. माझ्या वर्गातल्या मुली त्याच वर्षी लग्न होऊन सासरी गेल्या. शेतात काम करून काळवंडलेला रंग उतरवायला आणि त्याच बरोबर लगे हाथ चार अक्षर लिहायला वाचायला शाळेचा उपयोग केला जात असावा. तर हे ओतारे गुरुजी मला त्यांच्या टेबलावर बसवत आणि विचारत ," अपर्णा शिकणार का?" हो म्हंटल की तपकीर नाकासमोर धरीत, अन मागच्या अनुभवान शहाण होऊन नाही म्हंटल की," मग इथ कशाला आलीस?"
यांनी पहिल्यांदा रामायणातली मारुतीच्या शेपटीला बांधलेल्या कपड्यांची गोष्ट रंगवून रंगवून सांगितली." राजवाड्यातले सारे कपडे संपले! माग काय रावणान सारया प्रजेचे फक्त कपाटातले नव्हे तर अंगावरचे सुद्धा कपडे काढून शेपटीला बांधले. जो तो पुढे आणि मागे हात धरून हनुमानाकडे पाहतोय. आणि हनुमान काय सारे नंगु पाहून हसतोय!!" व्वा रे व्वा!!.
ते लोचन की लोणच? असं विचारीत. प्रत्येक गोष्टीत त्यांची स्वत:ची अशी एक फोडणी असे.

तर गाव छोट होत हे मी सांगितलच आहे. कोणत्याही सुखदुख:त सारे जण सामील असत. मला 'एक मे' ला महाराष्ट्र बंद असतो हे कधी कळल सांगू?
एका सकाळी खाटक्याची जना आज्जी उठून सूनेन दिलेल्या वैलावरच्या गरम पाण्यान तोंड धुता धुता कोसळली. झालं! सार गाव काम धंदा सोडून तिथ जमल. नाका समोर सुत धरून मेल्याची खात्री केली गेली! गावात कुणीही गेल ( मेल म्हणायचं नाही! नाही तर धपाटा मिळतो) की काम बंद केल जाई. प्रथम सारया नातेवाईकांना कळवण्यासाठी माणस पाठवली जात. मग सरणाची व्यवस्था. हे सार न सांगता गावातली मोठी मंडळी पटापट करत.
तर सारे बोलू लागले. आज महाराष्ट्र बंद आहे. (अजून असतो का?) आता एसटी बंद तर नातेवाईक कसे गाठायचे? जवळच्या शहरात ज्याला टाऊन म्हणता येईल तिथ taxi मिळण ही अवघड. आता काय करायचं? सकाळी सातला खपलेली ही आज्जी.माणसांना चहा सुद्धा नव्हता मिळाला. गावात प्रेत असे तोवर माणस पाणी सुद्धा पीत नसत. जेवण तर दहन दिल्यावर अंघोळ करून बनविल जाई. चला सगळी पटापट गावाबाहेर पडली. त्या वेळी बंद म्हणजे दगडफेक होई. या साऱ्यांनी काय काय सोसलं असेल याची मला काहीही कल्पना नाही. आम्ही कुणी मे...च च च.. गेल की तिथ जाऊन गुढग्यावर हात ठेऊन वाकून सारे सोपस्कार पाहत असू. नंतर रात्री घाबरून जी काय हालत होई ती पुढची पुढे! तर तश्या निरीक्षण फेर्या मारून आम्हाला कंटाळा आला. कोणी मेल की गावात हेल काढून सुरात रडल जाई. बायका एकीच संपल की दुसरी असं फेरी फेरीन रडत. बहुतेक शब्द .." आग माझी बाई ती.... " आणि काही काही.
आम्ही कार्टून! जी कोण मोठ्ठ्यान रडे तिच्या अगदी जवळ जाऊन टक लाऊन पाहत असू. मग ती थांबे आणि "ए पोरांनो बाहेर जावा" असं सूर बदलून खेकसत असे. परत सूर बदलून " माझी बाई ती..."
तर ह्या जना आज्जीला तिच्या लेकी बाळी, पाहुणे रावणे यायला संध्याकाळचे पाच वाजले. बंद मूळे सरण अजून सुद्धा मिळाल नव्हत. शेवटी कस बस सार सामान आणलं गेल आणि शेवटची आंघोळ घालण्यासाठी जना आज्जीला बाहेर आणलं गेल. तिच्या डोक्यावर रडत रडत तेल घालून चोळायला लागल्यावर जना आज्जीन डोळे उघडले. आत्तापर्यंत कलंडणारी ती एकदम उठून बसली!! सार गाव पळायला लागल . माणसांनी घरात जाऊन दार लाऊन घेतली. आत्तापर्यंत " माझी आई मला आणून द्या " म्हणून गडबडा लोळणारी लेक ती पकडू पाहणारा हात झटकत ओरडत पळत सुटली.
जना आज्जीला आपल्या भोवतीच ते तिरडी, ते दगडावर उकळणार पाणी काहीही उमजत नव्हत. माणस का पळताहेत? ही कसली तयारी आहे ? कशाचाही उमग तिला पडत नव्हता. ती दार वाजवू लागल्यावर माणस आतून तिला " तू भूत आहेस म्हणून सांगू लागली" अरे नाही रे मी जिवंत आहे !! मी भूत नाही रे म्हणून गयावया करणारी जना आज्जी मला दोन घरांच्या फटीतून पाहिलेली आज ही आठवते!! हळू हळू माणस एकमेकाला आवाज देत धीर गोळा करत बाहेर आली. सकाळी सात ते संध्याकाळी पाच पर्यंत तिला नक्की काय झालं होत आणि ती परत उठून कशी बसली हे बघायला मग डॉक्टर बोलवला गेला.
इतकंच आठवत मला माझ बालपण अन माझ गाव. ते गाव सुटल अन तो निरागस बाल भोळा आनंद ही सुटला.

जीवनमान

प्रतिक्रिया

प्राजु's picture

23 Apr 2010 - 11:00 pm | प्राजु

बर्‍याच ठिकाणी वाचताना खुद्कन हसू आले.
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

पिंगू's picture

23 Apr 2010 - 11:09 pm | पिंगू

>>> कोणी मेल की गावात हेल काढून सुरात रडल जाई. बायका एकीच संपल की दुसरी असं फेरी फेरीन रडत. बहुतेक शब्द .." आग माझी बाई ती.... " आणि काही काही.
आम्ही कार्टून! जी कोण मोठ्ठ्यान रडे तिच्या अगदी जवळ जाऊन टक लाऊन पाहत असू. मग ती थांबे आणि "ए पोरांनो बाहेर जावा" असं सूर बदलून खेकसत असे. परत सूर बदलून " माझी बाई ती..."

ह्यो तर माजा बी अनुभव हाय अर्पणाताय!!!!!!!!!

(सरणावरुन उठलेला) पिंगू

नेत्रेश's picture

23 Apr 2010 - 11:14 pm | नेत्रेश

आवडले.

सुधीर१३७'s picture

23 Apr 2010 - 11:48 pm | सुधीर१३७

लय भारी................ ह. ह. पु. वा.......... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 11:59 pm | विसोबा खेचर

छान आठवणी..! :)

तात्या.

Pain's picture

24 Apr 2010 - 12:11 am | Pain

हेहेहे =)) दोन्ही किस्से आवडले.
खूपच छान आहे लेख. अजुन लिहा.

अनामिक's picture

24 Apr 2010 - 1:21 am | अनामिक

खूप सुंदर लिहिलं आहे. वाचताना बरंच हसू आलं. अजूनही असेच अनुभव येऊ द्या!

-अनामिक

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 2:10 am | मदनबाण

छान लिहलं आहे...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

अरुंधती's picture

24 Apr 2010 - 2:35 am | अरुंधती

मस्त लिहिलं आहे.... अपर्णा, वाचताना खुदुखुदू हसू येत होतं....

खूपच छान.... अजून लिही ना गावाबद्दल! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मन१'s picture

16 Jul 2012 - 8:58 pm | मन१

मधूनच हसवणारं लेखन.

रेवती's picture

16 Jul 2012 - 9:17 pm | रेवती

हा हा हा. अज्जीचा किस्सा भारी.

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2012 - 11:26 pm | स्वाती दिनेश

छानच लिहिलं आहेस अपर्णा,
हा धागा कसा काय नजरेतून सुटला?
मन१, खोदकामाबद्दल धन्यवाद,:)
स्वाती

बहुगुणी's picture

17 Jul 2012 - 3:43 am | बहुगुणी

खरंच, हा धागा कसा काय सुटला? काय खुमासदार वर्णन आहे!

नंदन's picture

17 Jul 2012 - 4:05 am | नंदन

वर्णन मस्तच :). शेवटचा किस्साही एकदम मिरासदारी शैलीतला आहे.

अर्धवटराव's picture

17 Jul 2012 - 4:25 am | अर्धवटराव

लई झ्याक :)

अर्धवटराव