मी प्रमोद काळे. पुण्यात राहतो. पुण्यातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर या सांस्कृतिक संस्थेबरोबर काम करतो. नाट्य लेखन, दिग्दर्शन आणि प्रशिक्षण यात विशेष रस. नुकतेच मी "न येती उत्तरे" नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले. त्याचे आजवर सात-आठ प्रयोगही झाले. हे सर्व घडत असताना आलेले विविध अनुभव कुठेतरी नोंदणे महत्त्वाचे वाटले. म्हणून हा एक प्रयत्न.
नाटकाची संकल्पना अनेक दिवस मनात होती. पण विषय समलैंगिकता असल्याने या विषयाचा अभ्यास, जाणकारी असणे महत्त्वाचे होते. हा विषय आपल्या समाजात मोकळेपणाने चर्चिला, बोलला जात नाही. त्याला सामाजिक कारणे खूप आहेत. पण याचा अर्थ तो आपल्या समाजात नाहीच असा मात्र निश्चितच नाही. पुरेशी माहिती न करून घेता त्याला हात घालणे चुकीचे वाटत होते. मी लहान मुलांसाठी अनेक एकांकिका लिहिल्या आहेत. पण तेव्हासुद्धा गरज पडेल तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधून, त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवूनच लेखन केले. आजवर या विषयावर गांभिर्याने लिहिलेली तेंडुलकरांचे "मित्राची गोष्ट", चेतन दातारचे "१, माधवबाग", सचिन कुंडलकरचे "छोट्याशा सुट्टीत" अशी काही नाटके पाहण्यात आली होती. पण नको असलेल्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे किंवा त्याची टिंगल उडवायची अशी साधारण सामाजिक रीत असल्याने या नाटकांतील या विषयाची पुरेशा सुजाणपणे दखल घेतली गेली नाही असे वाटत होते. आपले नाटक अधिक थेट असावे, या विषयासंबंधात जनमानसात असलेले गैरसमज आणि प्रश्न दूर व्हायला त्याने मदत करावी असे वाटत होते. आता यासाठी अभ्यास करणे आलेच. अनोळखी प्रांतात हिंडायचे होते. अनेक पुस्तके, नेटवरील अनेक संकेतस्थळे, काही चित्रपट आणि काही गे मित्रांशी चर्चा अशा अनेक मार्गांनी समज वाढत गेली, आणि शेवटी मनाची तयारी झाल्यावर लिहायला सुरुवात केली.
पहिली दोनेक पाने लिहिली आणि जवळच्या नाटकवाल्या मित्रांना वाचून दाखवली, त्यांना एकूण नाटकाचा विषय, प्रवासही सांगितला. त्यांची मते अत्यंत अनुकूल अशी आली, आणि मग मात्र झपाट्याने सगळ्या दीर्घांकाचा पहिला खर्डा लिहून काढला. मग पुन्हा चर्चा, पुन्हा नवा खर्डा.... यानंतर मात्र प्रत्यक्ष नाटक बसवायला लागायचे आणि तेव्हाच सुचेल तसे आणि योग्य वाटतील असे बदल करत जायचे असे ठरविले.
नाटक लिहायला घेतले, तेव्हापासूनच माझ्याबरोबर गेली काही वर्षे काम करत असलेले मंदार आणि हर्षद हे दोघे अनुक्रमे रणजीत आणि आशुतोष या व्यक्तिरेखांसाठी हवेत असे वाटत होते. पैकी मंदार हा ललितकलाचा नाट्यशास्त्रात एम. ए. केलेला प्रशिक्षिअत आणि उत्तम नट आहे. हर्षदही माझ्याबरोबर गेली दोनेक वर्षे काम करत असलेला माझाच नाट्यविद्यार्त्याच्यात्याने मोठ्या नाटकात आजवर एवढा मोठा रोल केलेला नसला, तरी मला त्याच्याबद्दल खात्री होती. प्रश्न होता त्यांनी हो म्हणण्याचा. शेवटी ते दोघे याच समाजाचे घटक आहेत. "असले" रोल करायला त्यांनी नाही म्हटले तर, त्यांच्या घरच्यांनी काही हरकत घेतली तर, या व्यक्तिरेखा आत्मसात करताना, उभ्या करताना त्यांना काही मानसिक प्रश्नांना तोंड द्यावे लागले तर... अनेक शंका. पण मी विचारले, आणि त्यांनी हो म्हटले. थँक्स हर्षद आणि मंदार. माझ्यावर केवढा विश्वास दाखवलात! कारण मी काही तसा नाववाला नाटकवाला नाही, आणि तरीही.....
तर आम्ही तिघांनी रोज जमून बोलायला सुरुवात केली. विषय अवघड होता. थोडीफार ऐकीव माहिती, एवढीच शिदोरी होती. मग रोज चर्चा. गे असणे म्हणजे काय, ते जगणे कसे असेल, आज समाजातील त्यांचे स्थान, जगभरातील गे चळवळी, धर्म आणि समलैगिकता...., गे असण्यातून निर्माण होणारे प्रश्न... कौटुंबिक, व्यक्तिगत आणि सामाजिक प्रश्न.... अनेक..... आम्ही बोलत गेलो. विचार देत घेत गेलो. भांडतही राहिलो. माझ्या त्यांच्या वयात मोठे अंतर असूनही मोकळेपणाने लैंगिक विषयांवर बोलत राहिलो. नाटक त्याच्या विषयामुळे आणि त्या विषयाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे अवघड आहे हे आम्हाला माहीत होते. पण गंभीरपणे हे करायचे आहे हे ठरले होते. माझ्या एका गे मित्राशी माझ्या दोन्ही नटांची गाठ घालून दिली. त्याच्याशी झालेल्या इंटरअॅक्शनमुळे खूपच फायदा झाला. दोघांची, खरे तर तिघांचीही मानसिक तयारी होत होती. मग त्या मित्राने एक प्रश्न विचारला. "या दोघांच्या हालचाली, हावभाव कसे असणार आहेत ?"
हा प्रश्न महत्त्वाचा होता. आजवर हिंदी - मराठी चित्रपटांमध्ये आणि काही मराठी नाटकांमध्येही स्त्रैण, बायकी असणारे पुरूष म्हणजे गे असे चित्र दाखवले जात आहे. तो एक विनोद निर्मितीची वस्तू म्हणून वापरला गेलेला विषय आहे. (अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेतच.) पण सर्व गे असेच असतात हा मात्र गैरसमज आहे. आमच्या नाटकातून हे नक्कीच वगळायचे हे पक्के ठरले. पण मग असे लक्षात आले की काही प्रमाणात असे असते. तेव्हा एकाच्या बाबतीत तरी ही छटा दाखवायला हवी, पण अगदी छटाच, असे ठरले. हे आव्हान होते. थोडा जरी तोल ढळला, तरी नको ते निर्माण होणार होते. मंदारने हे आव्हान किती समर्थपणे पेलले आहे हे समजायला नाटकच पाहायला हवे.
आणखी एका बाबतीतही तोल सांभाळणे अत्यंत आवश्यक होते. विषय असा असल्याने दोन्ही पात्रांच्या समीप दृष्यात खूपच भान ठेवणे गरजेचे होते. शेवटी लैंगिक आकर्षण तर दिसलेच पाहिजे, पण कामुकतेचे दर्शन मात्र टाळायला हवे, हा तो तोल. आम्ही खूप काळजीपूर्वक हे सांभाळले आहे.
नटांची ही कसरत आणि कष्ट सुरू असताना नाटकाच्या नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना या तांत्रिक अंगांकडे ध्यान देणेही महत्त्वाचे होते. या बाबतीतही मी पुन्हा एकदा नशीबवान ठरलो. नेपथ्याची जबाबदारी सचिन भिलारेने घेतली. हाही ललितकलाचाच विद्यार्थी. स्वतः उत्तम नट आणि चित्रकलेचीही जाण उत्तम. "विहीर" या सध्या चर्चेत असलेल्या चित्रपटाचे नेपथ्य त्याने केले आहे. त्याने केलेले "वर्ख" या नाटकाचे नेपथ्य मी पाहिले होते. प्रश्न पैशांचाही होताच. याच वेळी आमच्या संस्थेच्या "काटकोन त्रिकोण" या महत्त्वाच्या नाटकाची निर्मितीही सुरू होती. आर्थिक तंगी होतीच. त्यामुळे शक्यतो उपलब्ध असलेल्या जुन्याच वस्तूंमधून थोड्याफार खर्चात नेपथ्य उभारणे गरजेचे होते. सचिनने खूप कष्टाने आणि हुशारीने हे काम केले. नाटकात दोन स्थळे आहेत. पहिली सुमारे वीस मिनिटे कॉलेजमधील एक बाजूची जागा, जिथे या दोघांची ओळख होते आणि वाढते हे स्थळ, आणि उरलेले नाटक रणजीत या पात्राचे घर अशी दोन स्थळे. सलग चालणार असलेल्या नाटकात एका ब्लॅक आउटच्या मर्यादित वेळात हा बदल दाखवणे आणि करणे अवघडच होते. पण सचिनने त्याच्या हुशारीने हा प्रश्न सहज सोडवला. आज आमच्या नाटकचे नेपथ्य खूप सुंदर आणि हवे तसे नेमके झाले आहे. या बाबतीत माझे ज्येष्ठ स्नेही, प्रसिद्ध चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी केलेली मदतही फार मोलाची आहे. रणजीतच्या घरात एक चित्र हवे होते, आणि ते नाटकाच्या विषयाला समर्पक असेच हवे होते. डॉ. पटवर्धनांवरील एका पुस्तकात "बाल्कनी" नावाचे एक चित्र पाहिले, आणि शोध संपला. डॉ. पटवर्धनांना ते चित्र (अर्थात त्याची प्रतिकृती) वापरण्याची परवानगी मागितली, आणि त्यांनी ती फोनवरच ताबडतोब दिली. या चित्राचे नाटकातील काँट्रिब्यूशन किती मोलाचे आहे ते पुढे लक्षात आले. त्याबद्दल पुढे लिहीनच.
संगीत. ही जबाबदारी माझ्या या आधी दिग्दर्शित केलेल्या "नेव्हर माइंड" या नाटकाचे संगीत केलेल्या अक्षय कुलकर्णीलाच दिली. का कोण जाणे, पण या काळात त्याच्या डोक्यात पियानोने घर केले होते. मला मात्र संपूर्ण नाटकभर प्रत्येक ब्लॅक आउटला फक्त पियानो मान्य होईना. पियानोचा नाद तुटक असतो. त्याला सलगता नसते. यावर मार्ग सुचवला माझ्या मुलाने. आस्तादने. आस्ताद आज नट म्हणून लोकांना माहीत असला तरी तो बाकायदा शिक्षण घेतलेला चांगला गायकही आहे. त्याने सुचवले की पियानोचा नाद पार्श्वभागी ठेवून आलापी घेतली तर छान वाटेल. अक्षयनेही हे करून पाहायला तयारी दाखवली, आणि आज आमच्या नाटकाचे संगीत खरोखर अत्यंत भावपूरक झाले आहे.
प्रकाशयोजना हेही नाटकाचे महत्त्वाचे अंग आहे. नाटकातून व्यक्त होणारे आणि सतत बदलणारे विविध भाव व्यक्त करायला प्रकाशयोजना महत्त्वाचा हातभार लावत असते. माझा जुना मित्र (हाही ललितकलाचाच!) अपूर्व साठे उत्तम प्रकाशयोजनाकार आहे. या विषयात त्याने गेल्या काही वर्षात पारितोषिकेही मिळवली आहेत.अपूर्व असल्याने नाटकाचे हे महत्त्वाचे अंगही भक्कम झाले आहे.या सर्व बाबी तांत्रिक म्हटल्या जात असल्या तरीही त्यात खूप मोठी क्रिएटिव्हिटी असतेच. ही सगळी जुळवाजुळव सुरू असताना नटांचे काम तर अखंड सुरूच होते. आमच्यातला प्रत्येकजण आपापला अभ्यास, माझी नोकरी, सगळ्यांची इतर अनेक कामे हे सगळे सांभळून पुन्हा नाटकासाठी सर्वस्व देत होता. यात किती आनंद मिळतो हे ते केल्यावरच कळेल! सुमारे दोन महिन्यांच्या या सगळ्या धडपडीनंतर नाटक बसले. खरे तर चांगले भक्कम उभे राहिले. पहिल्या प्रयोगाची तारीख ठरली होती. २६ जानेवारी. आमच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या यंदाच्या नाट्यमहोत्सवात पहिला प्रयोग.
पहिला प्रयोग ही काय चीज असते ते कळायला आधी केलेचि पाहिजे!
पण त्याआधी नाटकाचे कथासूत्र सांगतो : आशुतोष (हर्षद राजपाठक) आणि रणजीत हे दोघे एकाच कॉलेजमध्येस्पणवेगवेगळ्या वर्षांना शिकणारे अनु. २० व २४ वर्षांचे तरूण. हे दोघेही गे आहेत; पण रणजीतने स्वतःचे गे असणे स्वतःपुरते मान्य केले आहे. त्यच्या घरच्या आणि जवळच्या काही माणसांना हे माहीत आहे. आशुतोष मात्र भांबावलेला आहे. त्याला आपले वेगळेपण जाणवलेले आहे, पण त्याला ते स्वतःशीसुद्धा मान्य करणे अवघड जात आहे. त्याच्या मनात स्वतःबद्दल, स्वतःच्या लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यामुळे आणि काही अप्रिय अनुभवांमुळे तो मनातून घाबरलेला आहे.
आशुतोष आणि रणजीतची कॉलेजमध्ये भेट होते, आणि त्यांच्यामधील एका नव्या नात्याला सुरुवात होते. रणजीतमुळे आशुतोष स्वतःला मान्य करतो. मोकळा होतो. स्वतःलाच सापडत जातो. त्यांच्यातील नाते अधिकाधिक दृढ होत जाते, आणि तरीही प्रश्न संपतच नाहीत.
जगाला फारशा मान्य नसलेल्या या नात्याचे अणि त्यातून निर्माण झालेल्या विविध वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्नांचे हे नाटक.
तर झाला पहिला प्रयोग...... कित्येकजण, ज्यांना नाटकाविषयी काहीच माहीत नव्हते, ते जरा बिचकलेले दिसले. विषय हा असा!
पण तरीही तो विषय मांडण्यातली तळमळ, उथळपणाचा संपूर्ण अभाव आणि संतुलित मांडणी यामुळे प्रयोगानंतर कित्येकजण भेटून कौतुक करून गेले. एक महत्त्वाचा अनुभव. आमच्या संस्थेचे सचिव, डॉ. रवीन्द्र दामले हे तालीम पहायला पहायला आले नव्हते. त्यांना विषयाचे अर्थात माहिती होती. वाचन त्यांनी ऐकले होते. समलैगिकतेविषयी त्यांचे आणि माझे विचारही भिन्न आहेत. पण प्रयोगानंतर ते स्वत: स्टेजजवळ आले. त्यांचे डोळे चमकत होते. माझा हात हातात घेऊन म्हणाले,"सुंदर. फारच उत्तम जमले आहे सगळे." संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. कुलकर्णींना तर नाटकाविषयी काहीच माहिती नव्हते. पण तेही इतके भारावून गेले होते, की सुमारे तासभर थिएटर बाहेर मी मोकळा होऊन बाहेर पडेपर्यंत माझे अभिनंदन करायला ते थांबून राहिले. इतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तर चांगल्या येतच होत्या; पण या दोन घरच्या प्रतिक्रिया फार मोलाच्या होत्या.
पुढे मग आणखी प्रयोग. हे लोकांना आवडतय असे वाटत होते. पण पहिल्या काही प्रयोगांना आपले जवळचे लोकच जास्तकरून येतात. आम्ही त्यांना 'सिम्पथॅटिक प्रेक्षक' म्हणतो. ते प्रेमानेच सगळ्या प्रकाराकडे पाहतात. पण त्यातही आमचे कठोर परीक्षण करणारे ( असे लोक हवेतच. नुसते "छान छान" म्हणणारे काय कामाचे!) होतेच. त्यांनी काही गोष्टी सुचवल्या. त्यातल्या योग्य वाटल्या, आवडल्या त्या पुढच्या प्रयोगांमध्ये करायच्या ठरवल्या. असे तीन प्रयोग झाले आणि नाटक आता धरतय असे वाटू लागले तोच...... आमच्या एका नटाला स्वाईन फ्लू झाला!
या रोगाची लार्जर दॅन लाइफ दहशत हल्ली पुण्यात आहे. त्यामुळे आम्ही सगळेच चिंताग्रस्त. काय होणार आता या मुलाचं म्हणून. पण सुदैवाने त्याचा स्वाइन फ्लू खूप लवकर डिटेक्ट झाला, आणि त्यामुळेच तो काही काळातच बरा झाला. अर्थात पुढे पुन्हा ताकद यायला वेळ लागणार होता, पण तो फक्त वेळाचा प्रश्न होता. आणि त्या नटानेही (मी नाव मुद्दम लिहीत नाही.) आणि त्याच्या घरच्यांनीही खूप लवकर उभारी धरली. नाटकाच्या प्रयोगात काही काळ खंड नक्कीच पडला. खरे तर असे नुकतेच 'धरू' लागलेले नाटक दीर्घ कालावधीसाठी बंद ठेवणे घातक मानले जाते. पण आमच्या बाबतीत ते चक्क फायद्याचे ठरले. झाले असे, की आधीचे तीन प्रयोग पाहिलेल्या लोकांनी त्याविषयी इतके बोलून ठेवले होते, की कधी पुढचा प्रयोग होतोय आणि आपण तो पहातोय अशी एक उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा सुमारे दीड महिन्याने प्रयोग सुरू झाले तेव्हा प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. नाटकवाल्यांना अशी गर्दी किती महत्त्वाची असते! अर्थात गर्दी म्हणजे हजारो वगैरे नव्हे! पण आमचे 'सु-दर्शन रंगमंच' नावाचे समीप नाट्यगृह शंभरच्या आसपास प्रेक्षक आले, तरी भरून जाते! आणि अशा समांतर नाटकांना ही गर्दीच मानली जाते!
या परिस्थितीने लादलेल्या 'सेकंड रन'मध्ये मी आणखी एक गोष्ट करून पहायची ठरवली. या विषयासंदर्भात असलेले गैरसमज किती आहेत, ते माहीत असल्याने प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षकांशी थेट संवाद साधायचे असे ठरवले. माझ्या नटांनीही याला होकार दिला, आणि अनुभवांचे एक वेगळेच दालन आम्हाला व प्रेक्षकांनाही खुले झाले.... पण तो मोठा विषय आहे.
मुळात हे नाटक लिहिले आणि बसवले तेव्हा आम्हा सर्वांच एकच हेतू होता.... एक छान नाटक करायचे! कोणत्याही 'कॉज'साठी, कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कार करण्यासाठी वगैरे आम्ही नाटक करत नव्हतो. कोणताही झेंडा हातात घेऊन आम्हाला मोर्चे वगैरे काढायचे नव्हते. अर्थात नाटकाच्या विषयाबद्दल किंवा प्रामाणिकपणाबद्दल कोणी आक्षेप घेतला, तर आवश्यक तो लढा द्यायची तयारी अर्थातच होती - आहे. पण हा चर्चेचा उपक्रम सुरू केला आणि त्यानंतरच्या पाच-सहा प्रयोगातच जाणवायला लागले आहे की आपल्याला वाटत होते त्यापेक्षा काही वेगळे घडते आहे. अर्थात यालाही आमची तयारी आहेच.
माझे असे मत आहे की शास्त्रीय संगीत - आपले वा पाश्चात्य - किंवा पूर्ण अमूर्त चित्र-शिल्पकला असे काही अपवाद सोडले तर इतर सर्व कलाप्रकारांना, त्यातही विशेषत्त्वाने कथा, कविता, नाटक अशा शब्द हे अर्थवाही, भाववाही मूलद्रव्य वापरणार्या कलाप्रकारांना काही एक निश्चित सामाजिक संदर्भ असतोच असतो. अशा कलाप्रकारांनी आमची फक्त शुद्ध कला अशी भूमिका घेणे मला तरी चूक, किंबहुना दांभिक वाटते. भाषा आली, शब्द आले की त्यांना चिकटून सामाजिक संदर्भ येणारच. ते नाकारता कसे येतील. कदाचित तसा आपला हेतू नाही असे म्हणावे हवे तर, पण इतर कोणाला ते तसे दिसले वा सापडले तर त्याला आक्षेप घेणे चूकच.
न येतीच्या बाबतीत असेच काहीसे घडते आहे. आणि आम्ही तेही मान्य करत आहोत. आमचे अनुभवविश्व या सगळ्यामुळे समृद्ध होत आहे. नवे मित्र मिळत आहेत, आणि त्यांना व आम्हालाही खूप काही मिळत आहे.
मला वाटते एवढे प्रास्ताविक खूप झाले. पण जे घडते आहे, त्यासाठी ते आवश्यकही आहे. घडले ते असे.
अनुभव १ : एका रविवारी सकाळी ११ वाजता आमचा प्रयोग होता. सकाळ असल्याने कदाचित प्रेक्षक संख्या कमी होती. चर्चेमध्ये एका प्रेक्षकाने 'हे असल्या विषयाचे नाटक का लिहिले?' असा प्रश्न केलाच. त्यावर एक साधासा दिसणारा पोरगेलासा तरूण पुढे आला, आणि 'काय हरकत आहे ? मला अभिमान वाटतो या लोकांचा.... आणि मी काही एकटा नाही...' असे बरेच काही तावातावाने बोलला. पुढे इतरही अनेक मुद्दे निघाले.... चर्चा सुरू राहिली. गे असणे विषयी एकूणच किती अज्ञान आणि गैरसमज आहेत हे लक्षात येत होते, आणि लेखक दिग्दर्शक म्हणून मिळवलेल्या माहितीच्या जोरावर मी त्यांना उत्तरे देत होतो. काहींना पटत होते, काहींना नाही... पण कोणी वाद घालत नव्हते.
त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता प्रयोग होता. मी प्रेक्षागृहात पाऊल टाकले, आणि एक सावळा उंच तरूण पुढे आला आणि माझा हात हातात घेऊन म्हणाला."थँक यू" मला काही कळेना. विचारलं, "कशाबद्दल थँक यू?" तर तो बोलत सुटला. म्हणाला, "सकाळच्या प्रयोगाला आम्ही काही मित्र आलो होतो. आम्ही सगळे गे आहोत. एकमेकांना अर्थात हे माहीत आहे, घरी नाही. पण सकाळी माझ्या बरोबर मझी एक मैत्रीणही आली होती. ती माझ्या प्रेमात आहे. तिला कितीही समजावून सांगितले तरी हे सारे पटत नव्हते. लग्न करू म्हणजे मग सगळे ठीक होईल म्हणत असे. सकाळी प्रयोग पाहिल्यावर बाहेर पडलो आणि ती म्हणाली,"I'm sorry. मला आता समजलय सगळं. तुला खूप त्रस झाला असेल माझ्या वागण्याचा. पण आता आपण चांगले मित्र होऊ या." म्हणून थँक यू."
त्या नंतरच्या एका प्रयोगात चर्चा संपली. ज्या कोणाला आमच्याशी अधिक काही बोलायचे होते ते रंगमंचाजवळ आले. मी त्यांच्याशी बोलत असतानाच एक तिशीची स्त्री जवळ आली, हात पुढे केला. मी हात हातात देताच किती वेळ धरून उभी राहिली. म्हणाली ,"थेंक्स." हात सुटेना. आणि तिचे डोळे भरून आले. मी मोकळ्या हाताने तिच्या खांद्यावर थोपटले... आणि ती झटकन वळून रडत निघून गेली. कोण कुठली स्त्री. ओळ्ख ना पाळख. पुन्हा भेट होईल - नाही. तिच्या मनाच्या कोणत्या दुखर्या तारेवर नकळत आमचा हात पडला असेल? काय काय सोसले असेल तिने? हे बरं की वाईट? कुणाला असा त्रास द्यायचा काय अधिकार आहे आपल्याला ? आजही तिचे भरून आलेले डोळे आठवतात. वाटतं कधीतरी पुन्हा भेट व्हावी तिची. कळावं तिचं दु:ख.
एक जुना प्रसंग आठवतो. मी नेवाशाला गेलो होतो. तिथे पैसाच्या खांबाचे मंदीर आहे. या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. अगदी लहानसा गाभारा आहे. मध्यभागी तो खांब. त्याला हार, फुले वाहिलेली. भोवती अगदी एका माणसापुरता प्रदक्षिणा मार्ग. मी प्रदक्षिणा घालत असताना गाभार्याच्या बाहेरची घंटा वाजली, आणि पाठोपाठ "माउली..." अशी हाक. उभ्या जन्माचं सोसलेपण होतं त्या हाकेत. आजही त्या आवाजाच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं माझ्या. या दोन स्त्रियांची दु:खं वेगवेगळी असतील. पण त्यांची जातकुळी एकच असेल का ?
एक गंमत म्हणून सांगतो. नाटकाचा दुसरा खर्डा लिहून झाला आणि तो मी माझ्या एका गे मित्राला वाचायला दिला. दोन चार दिवसांनी आम्ही भेटलो. तो नाटकवालाच असल्याने त्याने काही सूचना आणि काही प्रश्नही विचारले. त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली. काही नोंदी मी करून घेतल्या. आम्ही निघालो. मी माझी स्कूटर काढत असताना त्याने विचारले," एक विचारू ? तू हे नाटक का लिहिलस ?" मी क्षणभर थबकलो. नक्की अर्थ काय या प्रश्नाचा? जोर 'तू'वर की 'हे'वर? तो गे प्रश्नांशी निगडित असल्याने 'हे'वर जोर असणे शक्य नाही असे वाटले. पण म्हणजे 'तू'वर? हा प्रश्न अनेक अनोळखी वा ओळखीच्या लोकांच्या मनातही येणार की! आपल्याकडे याचे उत्तर हवे. विचार करायला हवा. त्या मित्राला मी म्हटले,"कारण तुम्ही लिहीत नाही. म्हणून." ही वेळ मारून नेण्याची चलाखी होती. पण आज खरे उत्तर मला माहीत आहे.![broken image]()

Drop Box " width="8"" alt='broken image' alt='broken image' height="6"" alt='broken image' alt='broken image' alt="ek snap" />
आज आता या नाटकाचे दहा प्रयोग झाले आहेत. मध्यंतरी मुंबईचे समांतर रंगभूमीवरील एक प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील शानबाग यांचे "ड्रीम्स ऑफ तालीम" हे सचिन कुंडलकर लिखित नवीन नाटक आणि ना येती उत्तरे यांचे संयुक्त प्रयोग सु-दर्शन रंगमंचावर आयोजित केले होते. या प्रयोगांमध्ये एक समान धागा म्हणजे दोन्हीच्या केंद्रभागी समलैंगिकता हा विषय आहे. "ड्रीम्स"चे एकूण तीन प्रयोग केले. ते तीनही प्रयोग आणि ना येतीचा एक असे चार प्रयोग तुडुंब गर्दीत सादर झाले. नंतरच्या चर्चेलाही गर्दी होती. मी हा चर्चा उपक्रम प्रत्येक प्रयोगानंतर करतोच, पण मुंबईच्या लोकांना हा नवा अनुभव होता. एवढा प्रतिसाद पाहूनच ते भांबावले होते. शिवाय त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाटकांच्या 'नाटक' म्हणून असणार्या अंगांवर चर्चा केन्द्रित न होता त्यांच्या विषयांकडे सातत्याने झुकत होती. लैंगिकतेकडे. या कार्यक्रमात डॉ. भूषण शुक्ल हे मानसतज्ज्ञ, विद्याताई बाळ या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि समर नखाते हे ज्येष्ठ नाट्य अभ्यासक अशा तिघांचा मोलाचा सहभाग होता. प्रेक्षकांच्च्या अनेक प्रश्नांना या तिघांनी समर्पक उत्तरे दिली.
आमच्या प्रत्येक प्रयोगानंतरच्या चर्चा हाही एक नाटकाचा महत्त्वाचा भाग बनत आहे. खरोखर या प्रश्नाबाबत घनघोर अज्ञान आहे हे प्रश्नोप्रश्नी जाणवते. गे म्हणजेच तृतीयपंथी का, गेंना मुले होणे शक्य आहे का, भिन्नलिंगी, उभयलिंगी म्हणजे काय अशा अनेक शंका आणि गेंच्या जगण्याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. (याची एक झलक याच लेखाला आलेल्या उपाशी बोका यांच्या प्रतिक्रियेत पहायला मिळते.) काम करणारे दोघेही नट गे आहेत का असे वैयक्तिक पातळीवरचे प्रश्नही विचारले गेले. जॉनी वॉकर यांनी आयुष्यात दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता हे कदाचित लोकांना माहीत नसावे.
अनेक गे मुलांचे पालकही प्रयोगांना येतात. चर्चेला थांबतात. सहभागी होतात. त्यांपैकी कित्येकांनी आपापल्या मुलांची लैंगिकता मान्य केलेली असते, पण त्यांना काळजी असते त्या मुलांच्या भविष्याची. गे मुलेतर भेटतात. म्हणतात नाटक पहाताना आम्हाला आम्हीच दिसत होतो रंगमंचावर. आमचे खरे प्रश्न मांडले आहेत नाटकात. आम्हाला तुम्हा सगळ्यांशी बोलायला आवडेल सविस्तर. आम्ही सगळे जवळपास त्याच वयाचे आहोत. पण आणखी दहा-पंधरा वर्षांनी आमची, आमच्या आज जमलेल्या नात्यांची परिस्थिती काय असेल हे आम्हीही सांगू नाही शकत. हे सगळेही नाटकातून यावे असे वाटते. मी त्यंना सांगतो मग त्यासाठी वेगळे नाटक लिहावे लागेल. आशुतोष अणि रणजीतचेच दहा-पंधरा वर्षांनंतरचे नाटक. त्यांना भेडसावणारे तेव्हाचे प्रश्न, इतक्या वर्षांनंतर आलेली प्रगल्भता, आणि कदाचित तेव्हा बदललेली सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती यांचे नाटक. पण त्यासाठी पुन्हा अभ्यास, भेटीगाठी आणि चर्चा आल्याच. तेव्हा थोडा वेळ द्या. तुम्हा सगळ्यांच्या सहभागाने, सहकार्याने तेही करू आपण!
तर ही आमच्या नाटकाची कहाणी. यापुढेही प्रयोग सुरू राहतीलच. पुणे सोडून इतर ठिकाणी प्रयोग करायला आम्ही आतूर आहोत. पण त्याचे आर्थिक गणित जमले पाहिजे. वाचकांपैकी कोणाची याबाबत काही सूचना, मदत होणार असेल तर हवीच आहे. यापुढेही काही वेगळे अनुभव आले तर शेअर करेनच. तोवर नमस्कार.
आता काही नवे अनुभव : आमची महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही संस्था सातत्याने नवनवीन नाटकांची निर्मिती करत असते. न येती उत्तरेच्याच आगेमागे आमची काटकोन त्रिकोण आणि खिडक्या ही दोन अप्रतीम नाटके रंगभूमीवर आली. अशा उपक्रमशीलतेमुळे नेहमीचबाहेरगावाहून आम्हाला विविध महोत्सवात इ.नाटके सादर करण्यसाठी निमंत्रित केले जाते. नुकतेच असे एक निमंत्रण नागपूरहून आले. काटकोन त्रिकोण आणि खिडक्या ही दोनही नाटके कलाकारांच्या अडचणीमुळे सादर करणे शक्य नसल्याने मी त्यांना न येतीची माहिती, विविध वर्तमानपत्रांतून आलेली परीक्षणे, लेख इ. सर्व काही मेल केले. गंमत म्हणजे संयोजकांनी कळवले की नाटक म्हणून आम्हाला तुमचा प्रस्ताव आवडला, पण "नागपूर सारख्या" ठिकाणी अशा विसयावरचे नाटक करणे म्हणजे..... तुमच्याकडे काही वेगळे, हलके फुलके असेल तर कळवा.....
आता नागपूरसारख्या महानगरात अशी परिस्थिती असेल तर काय करावे !
दुसरा अनुभव बंगलोरचा. तेथील महाराष्ट्र मंडळाला एक नाट्यप्रयोग हवा होता. मी पुन्हा उत्साहाने सगळी माहिती पाठवली माझ्याशी संपर्क साधणारी व्यक्ती तरूण होती. मिळालेले उत्तर असे : आमच्या एज ग्रुपच्या लोकांना हे नाटक पहायला नक्की आवडेल, पण मंडळाचे बहुसंख्य मेंबर्स वरिष्ठ वयाचे असल्याने नाइलाज आहे. शिवाय अशा गंभीर विषयावरचे नाटक आमच्या समारंभातही फिट होणार नाही, तेव्हा काही विनोदी आहे का ?
आता आम्ही आमचे "नेव्हर माइंड" हे हलके फुलके नाटक तेथे सादर करणार आहोत.
बाकी न येती चे प्रयोग सुरूच आहेत. एका प्रयोगानंतर दोन दिवसांनी एक फोन आला. एका तरुणाचा फोन होता. म्हणाला, "माझ्या गे असण्याची जाणीव मला अनेक वर्षे आहे. पण तुमचे नाटक बघितले आणि मला धाडस आले. मी कालच आईला सर्व खरे काय ते सांगून टाकले. नाऊ आय हॅव कम आउट..."
खरे तर आम्हाला मुंबई आणि इतर काही शहरात हे नाटक घेऊन जाण्याची खूप इच्छा आहे. काय, आहे का कुणी मदतीचा हात देणारा ?????

| From Drop Box |
वाचने
22755
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
जरा जास्त
चुकीचे सामान्यीकरण
In reply to जरा जास्त by शुचि
आहेच मुळी
In reply to चुकीचे सामान्यीकरण by अक्षय पुर्णपात्रे
सँपल स्पेस
In reply to आहेच मुळी by शुचि
एकूण ४ जण
In reply to सँपल स्पेस by अक्षय पुर्णपात्रे
त्यांना
In reply to एकूण ४ जण by शुचि
म्हणजे काहीच नाही
In reply to एकूण ४ जण by शुचि
फार माहिती
In reply to म्हणजे काहीच नाही by अक्षय पुर्णपात्रे
अहो पण हा
In reply to म्हणजे काहीच नाही by अक्षय पुर्णपात्रे
शुचि,
In reply to अहो पण हा by शुचि
अजिबात गैर नाही
In reply to अहो पण हा by शुचि
माझ्या
In reply to अजिबात गैर नाही by अक्षय पुर्णपात्रे
एकदम
In reply to माझ्या by शुचि
तुम्ही आता
In reply to एकदम by गोगोल
म्हणजे
In reply to म्हणजे काहीच नाही by अक्षय पुर्णपात्रे
रोचक विधान
In reply to जरा जास्त by शुचि
श्री. काळे,
वाचनोत्सुक
Dear Pramod, First congrats
http://www.youtube.com/watch?
कार्यक्रम
In reply to http://www.youtube.com/watch? by समीर गोखले
शुचि,
धन्यवाद
In reply to शुचि, by समीर गोखले
Good to hear that Shuchi.
!!!! शुभं भवतू !!!!
In reply to Good to hear that Shuchi. by समीर गोखले
For last 6 years I am in a
In reply to Good to hear that Shuchi. by समीर गोखले
अहो गोखले,
अप्पा असे का बोलता तुम्ही ?
In reply to अहो गोखले, by अप्पा जोगळेकर
वाहीदा,
In reply to अप्पा असे का बोलता तुम्ही ? by वाहीदा
खर आहे.
In reply to वाहीदा, by समीर गोखले
तुम्ही गे
In reply to वाहीदा, by समीर गोखले
पलायनवादी नाही तर धैर्यशील
In reply to तुम्ही गे by अप्पा जोगळेकर
पुर्णतः
In reply to पलायनवादी नाही तर धैर्यशील by अक्षय पुर्णपात्रे
सहमत...
In reply to पलायनवादी नाही तर धैर्यशील by अक्षय पुर्णपात्रे
गोखले, मी
In reply to पलायनवादी नाही तर धैर्यशील by अक्षय पुर्णपात्रे
हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते ...
In reply to गोखले, मी by अप्पा जोगळेकर
प्रश्न
In reply to हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते ... by वाहीदा
धन्यवाद !
In reply to प्रश्न by अप्पा जोगळेकर
कुराणामध्
In reply to धन्यवाद ! by समीर गोखले
हम्म्म ...
In reply to कुराणामध् by अप्पा जोगळेकर
स्वागत
मिपावर स्वागत
In reply to स्वागत by प्रकाश घाटपांडे
कार्यक्रम
काळे
धन्यवाद!
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
स्वागत आहे
अर्धसत्य...
In reply to स्वागत आहे by मुक्तसुनीत
अरे व्वा !!
In reply to अर्धसत्य... by प्रमोद काळे
नाटकामागचे नाटक..
छानच !
न येतीचा शेवट
In reply to छानच ! by समीर गोखले
धन्यवाद प्रमोद !
In reply to न येतीचा शेवट by प्रमोद काळे
लेख आणि चर्चा
वाचतोय...
न येती उत्तरे ....
लेख गायब...
In reply to न येती उत्तरे .... by सुधीर१३७
समलैंगिकता
हा कोणत्या स्वरूपाचा लढा....
In reply to समलैंगिकता by उपाशी बोका
समाज मान्यता
In reply to हा कोणत्या स्वरूपाचा लढा.... by प्रमोद काळे
गोंधळ
In reply to समाज मान्यता by उपाशी बोका
धन्यवाद
In reply to गोंधळ by चिंतातुर जंतू
>> लहान
In reply to समलैंगिकता by उपाशी बोका
शक्यतो टाळावे असेही वाटते
नाटकाबद्द
वाशीत ? हा! हा!!
In reply to नाटकाबद्द by अमोल केळकर
हं कठीण आहे खरे !
Drop Box" width="12cm"
हा विशय
उत्तम चर्चा
In reply to हा विशय by झुम्बर