स्वच्छतेच्या बैलाला...

नीधप's picture
नीधप in जनातलं, मनातलं
8 Mar 2010 - 2:09 pm

२००८ च्या हितगुजच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा लेख. दिवाळी अंकाचा म्हणून इथे टाकला नव्हता. तो आज कुणीतरी वेगळ्या शीर्षकाने इथे टाकला. प्रकरण मिटले पण लेखातली समस्या मिटलेली नाही. तेव्हा महिलादिनाच्या निमित्ताने परत तोच लेख इथे टाकतेय.
-------------------------------------------------------

"इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?"
प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता. अत्यंत त्रासिक चेहर्‍यापासून सुरू करून मग थोबाडावर एक गलिच्छ हसू घेऊन मुस्कटात मारल्यासारखं उत्तर जयंतने फेकलं.
"मला इतर कामं आधी करू देत."
'तुम्हा पोरींचे नखरेच जास्त, काम कमी..' इत्यादी सगळं तो मनात बडबडला असणारच. नखशिखांत घाण वाटली मला. थोडक्यात लेडीज टॉयलेट ही गरज नसून चैन होती. गरजेला कुठलाही आडोसा जवळ करणे हे अपेक्षित होते. स्टारच्या सगळ्या मागण्या अजिजीने झेलणार्‍या प्रोड्युसरला युनिटमधल्या बायांसाठी फिरते टॉयलेट किंवा जास्तीची व्हॅनिटी मागवणे परवडण्यासारखे नव्हते, असेही नाही. पण प्रॉडक्शन मॅनेजरचा हा घाणेरडा ऍटिट्यूड मला तसाही नवा नाही. कामाच्या निमित्ताने मी बरीच फिरते. शहरात आणि शहराबाहेरही. सगळीकडे हेच.

रेल्वे किंवा विमानाचा प्रवास असेल तर काही प्रश्न नसतो पण बस किंवा कारने जाणार असू तर प्रवासात पाणी पिणं हे संकट होऊन बसतं. पाण्याच्या एकेका घोटाबरोबर एकेक प्रश्न उगवत असतात. वाटेत टॉयलेट मिळेल ना? कमोड असेल की इंडियन? कमोड असेल तर निदान लेडीज वेगळं असेल ना? जे काही मिळेल ते स्वच्छ असेल ना? तिथल्या खिडक्या तुटलेल्या नसतील ना? तिथे हात धुवायला पाणी मिळेल ना? हजार गोष्टी. मग पाणी पिणं टाळायचं. 'खूप वेळ कंट्रोल आहे माझा' असं अभिमानानं म्हणायचं आणि अनेक रोगांना निमंत्रण द्यायचं.

सुरूवात कधी झाली बरं या सगळ्याची?? बरोबर.. शाळेपासून.
"बाई गच्चीला जाऊ?"
असं रूपालीने विचारल्यावर सगळा वर्ग फिसफिसला होता. आपण विचारलं तर आपल्यालाही हसतील त्यापेक्षा नकोच ते. सुट्टीपर्यंत थांबू. असं म्हणत पहिल्यांदा पायावर पाय ठेवून पुढचा तास काढला होता.
'गच्चीपाण्याच्या सुट्टीत खूप मोठी रांग असते.'
'खूप घाण वास येतो.'
'तिथे पाणीच नाहीये.'
'तिथे अंधार आहे. अंधारात काही असलं तर?'
अश्या अनेक कारणातून हळूहळू 'शाळेतून घरी गेल्यावरच काय ते बघू' हे अंगवळणी पडलं.

मग थोडंसं मोठं झाल्यावर शाळेच्या वेळातही पर्याय उरेना, डाग पडण्याची भिती असे. तेव्हा मनात दाटणारी सगळी घाण, सगळी मळमळ घेऊन आत जायचं. तिथला अंधार, तिथली जळमटं, तिथे पाणी नसणं किंवा असलं तरी ते डबडं घाण असणं, नापास होणार्‍या मोठ्ठाड मुलींनी कर्कटकानी कोरून ठेवलेलं विचारवाङ्मय आणि चित्र असं सगळं सगळं सहन करत आपला कार्यभाग उरकायचा. आईकडून तिच्या लहानपणी बाजूला बसण्याबद्दल ऐकलं होतं ते बरं असं वाटायचं. "हे जे काय तुमच्या शरीरात घडतंय ते काही घाण नाहीये. ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं शरीर आई होण्यासाठी तयार होऊ लागलंय." असं 'त्या' लेक्चर्समधे सांगितलं होतं खरं पण त्या लेक्चर्सच्या बाईंना कुठे त्या टॉयलेटमधे जावं लागतं बदलायला. असं काय काय डोक्यात येऊन मग ते दिवस नुसतं घाण घाण वाटायचं.

लहानपणी आईबाबांच्या बरोबर प्रवासाला जाताना शक्य असेल तिथे रेल्वे असायची सुदैवाने. कारण मी नी बाबा दोघेही मोठ्ठे 'वकार युनूस!' त्यामुळे एसटीच्या भानगडीत आम्ही पडत नसू. पण आईबरोबर कोकणात जायचं तर एसटीनंच जावं लागायचं. एकदा तिसरी चौथीतली गोष्ट असेल. बरेच नातेवाईक मंडळी एकत्र कोकणात जात होतो. रात्रीचा खूप वेळाचा प्रवास. तोही एसटीने. आपापल्या आयांबरोबर एसटी स्टॅण्डवरच्या टॉयलेटमधे जायला आम्ही दोघी बहिणींनी नकार दिला. तिथली अवस्था काय वर्णावी. तिथे जायच्या रस्त्यावर बरंच आधी पुढे काय असणार आहे हे वासावरनंच कळत होतं. साधारण जिथून आडोसा सुरू होतो तिथे रात्रीचा मिणमिणता दिवा. खाली बघितलं तर जमीन सगळी ओली आणि कुठे कुठे साचलेलं पाणी नि त्यावर टाकलेली माती. पण एकाही नळाला पाणी नाही. आतली टॉयलेट्स फुटलेली नी कोरडी ठाक. आतमधे भरपूर जळमटं नि माती. त्यात एक बाई आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या बाहेरच काम उरकून मोकळी झालेली दिसली. तेव्हा ओली जमीन आणि साचलेल्या पाण्याचं गणित अगदी नीट कळलं. अश्या ठिकाणी जायला नकार दिल्यावर मग साधारण लहानपणी जे शक्य होतं ते म्हणजे पूर्णपणे बाहेर साधारण कडेचा भाग बघून सर्व भावंडांना एका लायनीत बसवलं होतं. एसटीच्या प्रवासातला हा सगळ्यात भीषण प्रकार तेव्हापासून डोक्यात बसला तो बसलाच.

शाळेनंतर कॉलेजमधे गेल्यावरही फार काही फरक नाही पडला. शाळा निदान फक्त मुलींची होती. भल्या मोठ्ठ्या शाळेच्या कुठल्याही दिशेचं टॉयलेट हे आमच्यासाठीच होतं. आता कॉलेजमधे झालं असं की क्षेत्रफळ वाढलं. वर्ग लांब लांब आणि आमच्यासाठी एकुलती एक एलआर(लेडीज रूम) ज्यात आत बरीच टॉयलेटस होती. म्हणजे दोन लेक्चर्सच्या मधे जाउन यायचं तर पुढच्या लेक्चरची पाचदहा मिनिटं गेली. नपेक्षा बंक मारलेला काय वाईट. त्यामुळे कधी टॉयलेटला जाण्यासाठी लेक्चर बंक तर कधी लेक्चरसाठी एलआरला जाणं बंक.

कॉलेजच्या काळातच नाटकासाठी दौरे, एनसीसी चे कॅम्पस इत्यादी सुरू झालं. मग 'हाल कुत्रे खात नाही' या म्हणीचा अर्थ चांगलाच लक्षात आला. दौर्‍यांना श्रीमंती थाट अर्थातच नसायचा. जिथे थांबू तिथे जसं असेल तसं टॉयलेट वापरायचं आणि निमूट पुढे जायचं. हेच अंगवळणी पडायला लागलं. अगदी त्या दिवसात सुद्धा. परत वर माझा आठ आठ तासाचा कंट्रोल आहे हे अभिमानानं मिरवायचं आपापसात. हीच गोष्ट कॅम्पची. १०-१२ दिवस ४००-५०० मुली जिथे रहाणार तिथे निदान बर्‍या टॉयलेट्सची, आंघोळीची सोय असावी असं त्यांना कधी वाटलं नाही. बहुतेक 'सैन्यात का घेत नाही तुम्हाला कळलं?' असं काहीतरी सांगायचं असेल त्यांना. पाणी कमी प्यायची सवय अशीच लागत गेली असावी.

शिक्षण संपलं. परदेशातलं शिक्षणही उरकलं आणि मुंबईत कामाला सुरूवात झाली. लग्नही झालं होतं. तेव्हा व्यवस्थित पाणी पिणे आणि एकुणात या सगळ्याच गोष्टींचा awareness, गांभीर्य इत्यादि कळून चुकलं होतं. पण म्हणून नष्टचर्य संपतं का? तर मुळीच नाही.

हल्ली प्रवास करताना वर म्हणल्याप्रमाणे by road असेल तर चिंताच चिंता असतात. अजूनही छोट्या ठिकाणची एस्ट्यांची टॉयलेट्स त्याच भयाण अवस्थेत असतात. अजूनही गावंढळ बायका आतल्या टॉयलेटमधे न जाता बाहेरच्या आडोश्याच्या भागातच बसतात. छोटेमोठे धाबे भरपूर असतात. पण तिथे टॉयलेट असतंच असं नाही. असलं तर एकच जे अंधारं, इकडनं झाकलं तर तिकडे उघडं पडतंय अश्या स्वरूपाचं आणि अतीव घाण असं असतं. चकचकीत हॉटेल शोधण्याशिवाय आणि तिथल्या माजोरीला तोंड देण्याशिवाय पर्याय नसतो. बर एवढं करूनही तिथे लेडीज टॉयलेट वेगळं असेलच आणि ते स्वच्छ असेलच याची खात्री नाही. पेट्रोल पंपावर लेडीज टॉयलेट वेगळं असतं ते बर्‍याचदा तिथे काम करणारी पोरं स्वत:चं खाजगी टॉयलेट म्हणून वापरतात. आडवळणाच्या प्रवासात असल्या ठिकाणी जाण्यापेक्षा झाडाझाडोर्‍याचा, दगडांचा आडोसा शोधून तिकडे जाणे हे जास्त स्वच्छ वाटतं.

'प्रवासात कुठे थांबायचं?' यावरून आमच्या दोघांच्यात (मी आणि नवरा) एकतरी प्रेमसंवाद ठरलेला असतो. आजवरच्या अनुभवाने मी paranoid असते की हा कुठेतरी भयाण जागी थांबवणार गाडी. किंवा ड्रायव्हरने थांबवली अश्या कुठल्याही जागी तर त्याला काही म्हणणार नाही. मग होतं miniature World War III. नवरा बरोबर नसेल आणि बरोबर केवळ ड्रायव्हर असेल किंवा असे लोक असतील की ज्यांना योग्य टॉयलेट हवं असं मी सांगू शकत नाही किंवा सांगितलं तरी त्यांच्या स्वच्छच्या व्याख्या वेगळ्या असतात तर मग मी केवळ देवाची प्रार्थनाच करू शकते. सगळा प्रवास याच टेन्शनमधे. कधी निर्लज्जपणे याबद्दल बोललेच तर मग वरती शूटवरचा जो अनुभव दिलाय त्याची पुनरावृत्ती. अगदी ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर फिरतानाही यात काही फरक नाही.

हा प्रवासातला अनुभव पण मुंबईतल्या मुंबईत फिरताना होणारी फरपट काही कमी नसते हो. कापडाचं, कपड्याचं मार्केट एका ठिकाणी तर टेलर दुसर्‍या ठिकाणी, डाय करणारा अजून तिसर्‍या ठिकाणी. प्रॉडक्शनचं ऑफिस अजून एका ठिकाणी. अशी त्रि च नाही तर अनेकस्थळी यात्रा मला एका दिवसात पार पाडायची असते. पाण्याची बाटली बरोबर ठेवलेली असते पण पुढच्या दोन तासात टॉयलेट मिळेलच याची खात्री नसतेच. सुलभची अवस्था काही ठिकाणी बरी म्हणावी इतपतच आहे. पण तिथेही माझ्या हातातली खरेदीची (कामाच्या खरेदीची) बोचकी ठेवायची कुठे हा प्रश्न असतोच. लोकलच्या स्टेशन्सवरची टॉयलेटस हा एक मोठ्ठा विषय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सने चर्चेला घेतला होता, तेव्हा त्या लेखातून मिळालेलं चित्र भयाण होतं. अर्धवट फुटलेल्या भिंती, पाणी नसणं, लेडीज टॉयलेट हे सगळ्यांच्या नजरेसमोर असणं, खिडकीच्या जागी फक्त रिकामा चौकोन, लेडीज टॉयलेटमधे छक्के, गर्दुले, दलाल, बेघर कुटुंब यातल्या कुणाचं तरी राज्य असणं हे सगळं सगळं त्यात फोटोसहित होतं. कुणीतरी विषयाला तोंड फोडलं यावर बरं वाटलं होतं पण नंतर काहीच नाही. रेल्वे प्रशासन किंवा अजून यासंदर्भातले इतर विभाग यातल्या कोणालाच त्याविषयी काही करावं असं वाटलं नाही. माझ्यासारख्या अनेक जणींच्या रोजच्या hygiene शी संबंधित असलेला हा विषय कुणालाच लक्ष घालावं इतका महत्त्वाचा वाटला नाही.

मॉल्स, मॅक्डोनाल्डस, सिसिडी, बरीस्ता इत्यादी यांचा चंगळवादाशी संबंध जोडा तुम्ही पण त्यांनी आमची किंचित का होईना सोय बघितलीये हे विसरता कामा नये. कारण फिरत असताना अधेमधे कुठे खावं आणि तिथेच टॉयलेट वापरावं तर अनेक छोटी छोटी हॉटेल्स तर बिना टॉयलेटचीच असतात. मॉल्स सोडा पण या बाकीच्या ठिकाणचं टॉयलेट वापरण्यासाठी मला एका वेळेला किमान ५० रूपये त्या त्या ठिकाणी खर्चावे लागतात त्याचं काय! दिवसाला केवळ टॉयलेटला जाता यावे म्हणून दिडशे दोनशे (किंवा गरजेनुसार जास्त) रूपये खर्च करणे हे कुणाला नि कसं परवडावं? गरोदर बाया काय करत असतील अश्या वेळेला? हे सगळे प्रश्न चिवचिवत रहातातच.

बर मॉल्स सोडून या इतर ठिकाणी लेडीज आणि जेन्टस अशी वेगळी टॉयलेटस नसतात. आणि त्यातून तो कमोड असतो. डिस्पोजेबल टॉयलेट सीट कव्हर ही आपल्याकडे अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे. आणि टॉयलेट पेपर बहुधा संपलेलाच असतो. कमोडची सीट वापरताना वर ठेवावी हे बहुतांशी भारतीय पुरुषांना माहीत नसतं किंवा ते तसं करणं हे त्यांच्या इगोला झेपण्यासारखं नसतं. त्यामुळे अश्या ठिकाणी जाणं हे अनेक रोगांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. "शेवटी आपल्याला तिथे बसायचं असतं. कसलंही infection आपल्यालाच आधी होणार ना!" एका मैत्रिणीचं वाक्य सतत पटत रहातं. सीसीडी वा बरिस्ताच नव्हे तर अनेक मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्स मधे नियमानुसार असायला हवे म्हणून एक टॉयलेट असते, जे कुक, साफसफाई करणारी पोरे, इतर स्टाफ आणि ग्राहक असे सगळ्यांसाठीच असते. आता हे असे कमोडवाले टॉयलेट बायकांनी वापरायच्या लायकीचे असेल का याचा तुम्हीच अंदाज घ्या. आणि हे केवळ उडपी टाइप्सच्या हॉटेल्सबद्दल नाही तर दादर, पार्ला, जुहू, लोखंडवाला अश्या ठिकाणची 'अपमार्केट' म्हणता येईल अशी रेस्टॉरंट्स पण आहेत जिथे टॉयलेट मात्र एकच आहे. त्यामुळे चांगल्या कॉफीशॉपमधे बराच वेळ बसायचं असेल तर मग मेरियाट किंवा ऑर्किड किंवा तशी ४-५ तारेवाली हॉटेल्स बरी पडतात. कारण तिथे वेगळी वेगळी टॉयलेटस असतात आणि एकदम स्वच्छही असतात. पण हे ज्याला परवडेल त्याला. सामान्य उत्पन्न असलेल्या बाईने बाहेर 'जाऊच' नये का मग? आणि गेली तरी पाणी पिऊ नये, प्यायलंच तर भरपूर चालावं उन्हातून म्हणजे घाम येउन जाईल आणि जायची गरजच भासणार नाही? आणि पिरीयडच्या दिवसात तर घराच्या बाहेर पडूच नये?

पॅथोलॉजीवाली डॉक्टर मैत्रिण माझ्याशी गप्पा मारत होती.
"मधे एक केस आली होती. २०-२५ वर्षांची मुलगी. युरिन एकदम व्हाईट. पासिंगच्या वेळेला जळजळ प्रचंड. मी तिला विचारलं की पाणी पितेस का भरपूर तर म्हणे कसं पिणार? फिरण्याचा जॉब माझा. जाणार कुठे? ती मुलगी सकाळी घरून निघायच्या आधी जायची ते पार संध्याकाळी घरी येईपर्यंत तशीच. पण एकुणातच अश्या कारणांनी युरिन इन्फेक्शन असण्याचं प्रमाण खूप वाढलंय."
"काय करणार गं. नसतंच शक्य कुठे जाणं. थांबावंच लागतं. कंट्रोल ठेवावाच लागतो."
"पण याचे परिणाम काय होतील कळतंय का? एकतर हे असलं इन्फेक्शन म्हणजे त्रास. बर तेवढ्यावर भागत नाही. उद्या या मुलीचं लग्न होणार. सगळ्या गोष्टी शेवटी एकाच जागी. किती त्रास? आणि pregnant राहिल्यावर हे असं न जाणं म्हणजे तिच्या आणि बाळाच्या आरोग्याशीही खेळच की गं."
"पण मग करायचं काय नि कसं? सगळं सोडून घरी बसणं हा तर उपाय होत नाही ना!"
या वाक्याशी सगळं संभाषण संपलं. अनुत्तरितच.

नाही, हे नखरे नाहीत किंवा अतिस्वच्छता नाही. पंचतारांकित सोयींची अपेक्षाही नाही. किमान सुविधांची गरज आहे.
पूर्वीच्या बायका कसं करायच्या हा युक्तिवादही उपयोगाचा नाहीये. कारण, पूर्वीच्या बायका पण प्रवास करायच्या आणि हे सगळं सहन करायच्या. पण एकतर त्यांनी लाजेकाजेपोटी हे सहन केलं असेल आणि कदाचित आम्ही आज जितक्या फिरतो तितक्या त्या सगळ्या फिरत नसणार त्यामुळे ह्या समस्या तेव्हा काहीजणींच्याच असणार.

एवढा त्रास होतो तर बसा घरातच असं काही मध्ययुगीन मानसिकतेची माणसं म्हणतीलच पण तेही उत्तर नाही, निश्चितच नाही. गरजेच्या वेळेला लेडीज टॉयलेट मिळणं ही एक बेसिक गोष्ट आहे. हा बेसिक हक्क आहे. आणि दुर्दैवानं हे आपल्या विविध व्यवस्थांपैकी कुठल्याच व्यवस्थेत महत्त्वाचं मानलेलं दिसत नाही. कुणालाच त्याचं महत्त्व जाणवत नाही.

मग काय करायचं? आपण आपलं भरपूर पाणी प्यायचं नि आपले आपल्याला परवडतील आणि झेपतील असे उपाय शोधायचे हे नक्की. मग ते मॉल मधे घुसणे, प्रत्येक उपनगरात एक तरी ओळखीचं घर मॅनेज करणे, सगळी किळस बाजूला ठेवून सुलभमधे शिरणे, हॉटेलमधे किंवा ऑफिसेसमधे गेल्यावर निर्लज्जपणे टॉयलेट विचारणे, टॉयलेट विचारल्यानंतर उत्तर देणार्‍याच्या चेहर्‍यावरचे सगळे घाणेरडे भाव दुर्लक्षित करणे, प्रवासात/ बाहेरगावच्या शूटवर योग्य टॉयलेटसाठी भांडण करणे यातले काहीही असो... आणि त्यातूनही चिडचिड उरलीच तर असा लेख लिहायचा...

तेव्हा (हातामधे प्यायच्या पाण्याची मोठ्ठी बाटली घेऊन) स्वच्छता आणि आरोग्याच्या नावाने.... चांगभलं...! चिअर्स...!!

- नी

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Mar 2010 - 2:23 pm | विसोबा खेचर

उत्तम लेख आहे..

पुरुषाचं एक वेळ ठीक आहे, ते कुठेही आडोश्याला उभं राहून धार मारू शकतात परंतु आपल्याकडील स्वच्छ प्रसाधनगृहांची वानवा ही महिलांकरता मात्र खरंच तापदायक गोष्ट आहे..

बाकी, 'गच्चीला जाणे' हा वाक्प्रचार फार आवडला! :)

आपला,
(सुलभ शौचालय 'गच्ची' प्रेमी) तात्या.

मेघवेडा's picture

8 Mar 2010 - 2:45 pm | मेघवेडा

उत्तम लेख!

स्वच्छ गच्ची झालीच पाहिजे!!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2010 - 2:39 pm | प्रकाश घाटपांडे

हा लेख म्हणजे एक चळवळ आहे हे आम्ही जाणतो. याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे. मी वैयक्तिक रित्या करीतच असतो. परवा म्हण्जे माध्यमाईटस च्या ग्रुपचा कार्यक्रमाला मी गेलो होतो. मराठवाडा कॉलजे मधे होता कार्यक्रम. तिथे कचरा, पिण्याचे पाणी व टॉयलेट पाहिल्या. निकृष्ठ स्थिती होती. एकाला हे सांगितले याविषयावरील जागृतीचा जालावरील संदर्भ दिला मिपावर त्याची माहिती इथे आहेच. याविषयालाच वाहिलेला एखादा स्वतंत्र ब्लॉग असावा अशी सुचना त्याने दिली.
प्रत्येकाने जरी वैयक्तिक पातळीवर कुठेही गेल्यावर तेथील वरील बाबी पहाव्यात व त्याबाबत आग्रह धरावा. मी एका टॉयलेट चालकाशी (उत्तराखंडला गेलो होतो तेव्हा) गप्पा मारल्या होत्या त्याने टॉयलेटची सुविधा केल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले. मी त्या तपासल्यावर वापरण्यायोग्य स्थितीत होत्या असे आढळले.
कुठल्याही संस्थेची लायकी तेथील टॉयलेटवरुन समजते. इमर्जन्सी कॉलच्या वेळी टॉयलेटची गरज किती याचा ताजा अनुभव मी दिल्लिला गेलो होतो त्या प्रवासात घेतला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Mar 2010 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही दिवस विचार केला आणि लगेच माझ्याही लक्षात आलं, भारतात आल्यावर फिरायला जावंसं का वाटत नाही ते!
अदिती

राजेश घासकडवी's picture

8 Mar 2010 - 3:02 pm | राजेश घासकडवी

स्त्रीजन्मा तुझी कहाणी, ओठी अमृत, पोटी पाणी...
(हे मी थट्टेने लिहिलेले नाही. मूळ भावनिक गाण्याचं वास्तव रूप काय आहे हे लेखाआधारे सांगण्याचा प्रयत्न)

राजेश

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Mar 2010 - 7:24 pm | बिपिन कार्यकर्ते

हा लेख मागे वाचला होता... आज परत वाचतोय... परिस्थितीत काहीच सुधारणा नाही हे जाणवतंय. आपल्याच आया-बहिणी-मैत्रिणी असल्या समस्यांना तोंड देत जगत आहेत हे क्वचितच जाणवले या आधी... :(

नी, तुझ्या उपक्रमाचे काय झाले? यथाशक्ती सहभागाची तयारी आहे.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

8 Mar 2010 - 8:26 pm | चतुरंग

पुन्हा वाचतोय. परिस्थितीत काही बदल नसावा हे नक्की.
बायकांचीच नव्हे तर पुरुषांचीही पंचाईत व्हावी इतकी घाण टॉयलेट्स मी बघितली आहेत! तुमची इच्छाच एका सेकंदात मरुन जाते! :(

(एक सूचना - ह्या वर्षीचा गणेशोत्सव त्या त्या भागातल्या मंडळांनी चांगली स्वच्छतागृहे सुरु करून का साजरा करु नये? ह्या वर्षी मंडप, म्यूझिक, लायटिंग इ.वर थोडा कमी खर्च करा, मूर्ती थोडी छोटी बसवा. लोकांचे पैसे लोकांच्याच कामाकरता खर्ची पडले तर फार मोलाची गोष्ट होईल.)

चतुरंग

विकास's picture

9 Mar 2010 - 9:12 am | विकास

एक सूचना - ह्या वर्षीचा गणेशोत्सव त्या त्या भागातल्या मंडळांनी चांगली स्वच्छतागृहे सुरु करून का साजरा करु नये? ह्या वर्षी मंडप, म्यूझिक, लायटिंग इ.वर थोडा कमी खर्च करा, मूर्ती थोडी छोटी बसवा. लोकांचे पैसे लोकांच्याच कामाकरता खर्ची पडले तर फार मोलाची गोष्ट होईल.

कल्पना छानच आहे. एकदम आवडली.

बाकी स्वच्छतागृहे हा खूप महत्वाचा विषय आहे. भारतात सर्वत्रच प्रश्न आहे. अमेरिकेत देखील जर "हँडी टॉयलेट" चा वापर जत्रा, पब्लीकपार्क्स मधे वगैरे करायची वेळ आली तर पंचाईतच होते. स्त्रीयांची तर विशेष करून जास्तच.

मधे आमच्या ओळखीचे एक जोडपे सौदी अरेबियात कामा निमित्त गेले होते. त्या वेळेस तेथील काही प्रयोगशाळा/कार्यालयात या जोडप्यातील स्त्रीने देखील नवर्‍याबरोबर जायचे ठरवले. टॉयलेट वापरायची वेळ आली तेंव्हा लक्षात आले की तेथे लेडीज टॉयलेट हा प्रकारच नव्हता (कारण स्त्रीया तेथे जातच नाहीत मग टॉयलेट्स वेगळी कशाला हवीत?).

विविध ठिकाणी असले प्रकार होऊ शकतात. मात्र भारतात यातील स्वच्छता सर्वत्र वाढवायची खूपच गरज आहे असे वाटते. कदाचीत ही कामे जितकी यांत्रिक पद्धतीने कुठेही स्पर्श न करता आणि स्वच्छता कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत करायला लागल्यास त्यांची देखील त्यांच्या या कामात टाळाटाळ कमी होऊ शकेल असे वाटते. मुंबई विमानतळावरील टॉयलेट्स ही नव्वदच्या दशकातील आणि आत्ताची यात बराच फरक आहे असे याच मुळे जाणवते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

संदीप चित्रे's picture

9 Mar 2010 - 8:04 pm | संदीप चित्रे

>> हा लेख मागे वाचला होता... आज परत वाचतोय... परिस्थितीत काहीच सुधारणा नाही हे जाणवतंय. आपल्याच आया-बहिणी-मैत्रिणी असल्या समस्यांना तोंड देत जगत आहेत हे क्वचितच जाणवले या आधी...

नी, तुझ्या उपक्रमाचे काय झाले? यथाशक्ती सहभागाची तयारी आहे.

उपक्रमासाठी यथाशक्ती सहभागाची तयारी कळवली होतीच.
नक्की सांग.

शुचि's picture

9 Mar 2010 - 4:19 am | शुचि

परखड लेख आवडला

मला आलेला वाईट अनुभव - (जाऊ द्या कॉलेज च नाव महत्वाचं नाही)मधे , मेन लायब्ररीच्या रेस्टरूम मध्ये, अरशात बघत असताना डोळ्याच्या कोपर्‍यात हालचाल जाणवली. ..... एका मोरीच्या कप्प्याला खिडकी होती अणि कोणीतरी चोरून पहात होतं.
अंगावर सरसरून काटा आला. धावत बाहेर गेले. वॉचमन ला सांगीतल. पहीली प्रतिक्रिया - "शक्यच नाही" ..... त्यानी जाऊन पाहीलं - एक २०/२५ शीचा तरूण होता. ..... तो मुलगा जीवानिशी धावत पळून गेला.
तिथे मागे जायला पॅसेज होता जो की नंतर बंद करण्यात आला असावा.
__________

मुलीला माझा नेहेमीचा सल्ला - कधीही सार्वजनीक रेस्टरूम मधे जाताना मैत्रीणीला बरोबर घेऊनच जायचं आणि तिला बहेर थांबवायचं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 8:12 pm | अरुंधती

नी,
तुझा हा परखड लेख अतिशय आवडला. आजही एस.टी.स्टॅन्ड, हॉटेल्स, ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस आणि सर्व सार्वजनिक इमारतींमधील स्त्रियांसाठीच्या स्वच्छतागृहांची अवस्था किळसवाणी व दयनीय असते. माझ्या काही नोकरी करणार्‍या मैत्रिणींना स्वच्छतागृहाच्या अभावी पाणी न पिणे, नैसर्गिक आवेगांना दाबणे अशा प्रकारामुळे किडनी स्टोनचा त्रास, महागडी ट्रीटमेन्ट व क्वचित प्रसंगी ऑपरेशनलाही सामोरे जावे लागले आहे. हा फक्त बायकांच्याच नव्हे तर घरादाराच्या आरोग्याचा प्रश्न आहे. कारण घरातील स्त्रीचे आरोग्य धोक्यात आले की पर्यायाने बाकी कुटुंबालाही त्याची झळ सोसावी लागते. लहान गावांमध्ये अजूनही हागणदारीचीच प्रथा सरकारच्या वेगवेगळ्या सेवा योजना असल्या तरी दिसते. घरात शौचालय असूनही घरातील लोक त्याचा वापर न करता हागणदारीत जाणे पसंत करतात. आणि अजूनही अनेक घरांमध्ये शौचालय तर नाहीच! घरातील स्त्रियांना पहाटेच्या अंधारात किंवा रात्री उशीरा आपली नित्यकर्मे गावाबाहेर जाऊन उरकावी लागतात. साहजिकच त्यांना पोटाचे विकार जडतात. वेळोवेळी ह्यावर त्यांना मार्गदर्शन करूनही अनेकदा निराशाजनक चित्रच पहावयास मिळते. अनेक ठिकाणी गावकर्‍यांची अपेक्षा असते की त्यांना घरात शौचालय बांधून देण्याचा खर्च शासनाने करावा. त्यामुळे ते स्वतः पदरमोड करून शौचालय बांधण्यास नाखूश असतात. बांधलेली शौचालये ओस पडण्याचे अजून एक कारण म्हणजे पाण्याची टंचाई.

असो. इतका महत्त्वाचा विषय तू उत्तम प्रकारे मांडला आहेस! अजूनही याबाबत जागृती, उपाय व हा प्रश्न गंभीरपणे घेऊन काम करण्याची इच्छाशक्ती दिसून येत नाही. स्त्रियांसाठीचे मेळे, सभा, संमेलने, कार्यक्रम यांत ह्याविषयाबद्दल अधिक जागृती निर्माण केल्यास स्त्रियाच ह्यातून मार्ग काढू शकतील असे वाटते.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अजुन कच्चाच आहे's picture

8 Mar 2010 - 8:23 pm | अजुन कच्चाच आहे

षंढपणे वाचतील, फिदीफीदी हसतील पण दुर्दैवाने याबाबत काही करणारे किती निघतील कोणजाणे.
अशी सुधारणा सुचवून मी कुचेष्टेचा बळी ठरलेलो आहे. मात्र माझ्या अधीकारात असताना मी ऑफीस बांधण्या अगोदर संडास बांधून घेतला आहे.

नी, तुझ्या उपक्रमाचे काय झाले?

कोणता ? काही मदत होऊ शकेल का आमच्याकडून ?
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

अक्षय पुर्णपात्रे's picture

8 Mar 2010 - 9:02 pm | अक्षय पुर्णपात्रे

नीधपतै, परखड लेख. या विषयावर प्रसारमाध्यमांनी व्यापक चर्चा घडवून आणायला हवी. स्वछतागृहांचा अभाव (विशेषत: महिलांच्या) ही प्राथमिक समस्या आहे. आपल्याकडे याबाबत आनंदी आनंद आहे. सुलभ शौचालयांनी थोड्याफार प्रमाणात का होईना ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय पण अजुन खूप काम व्हायला हवे. मी खूप पुर्वी पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना मानव विकास निर्देशांकाच्या (ह्युमन डेवलपमेंट इंडेक्स) धरतीवर 'सॅनिटेशन इंडेक्स' विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. नाशिक जिल्ह्यातील विदा गोळा करता नाकी नऊ आले आणि मी तो प्रयत्न सोडला.

तुम्ही लिहिलेला लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. बर्‍याच लोकांना महिलांच्या म्हणून वेगळ्या गरजा असतात याची काडीचीही जाणीव नसते. हेच चित्र सार्वजनिक पातळीवर आढळते.

(वर श्री चतुरंग यांनी गणेशोत्सवांच्या माध्यमातून या समस्येचे निराकरण करण्याचा सुयोग्य पर्याय सूचवला आहे. स्वछतागृहे बांधता येत नसली तरी कमीत कमी देखावे तरी या समस्येला वाचा फोडणारे करता येतील. जागोजागी मंदिरे बांधणार्‍या लोकांनी जर स्वछतागृहे बांधली तर केवढा मोठा बदल घडू शकेल.)

प्राजु's picture

8 Mar 2010 - 9:04 pm | प्राजु

एका उत्तम विषयावर लेख.
परखड असल तरी सत्य आहे हे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

अभिषेक पटवर्धन's picture

8 Mar 2010 - 10:04 pm | अभिषेक पटवर्धन

वर म्हणल्याप्रमाणे लेख परखड आहेच..पण तमाम भारतीयांना लाजेने खाली बघायला लावणारा आहे. मुतारी साफ नसणं एवढ भयंकर असु शकत हे आजे कळलं आणि मग स्वत:ची भारतीय म्हणुन, आणि पुरुष म्हणुन लाज वाटायला लागली. प्रवासात तर संडासाची सोय बघण माझ्या गावीही नसायचं. जीथे जेवण छान मिळेल तिथेच थांबायचं हाच नियम. डोळे उघडणारा लेख. मनापासुन धन्यवाद!!

प्रमोद देव's picture

8 Mar 2010 - 10:52 pm | प्रमोद देव

नीरजा, तू म्हणते आहेस ते दूर्दैवाने अगदी खरं आहे. सार्वजनिक स्वच्छता हा विषय आपल्या भारतीयांच्या लेखी अगदीच नगण्य असाच आहे. त्यात नजिकच्या भविष्यात तरी काही लक्षणीय बदल होईल अशी आशा बाळगण्यासारखी परिस्थिती नाहीये हे मोठ्या खेदाने नमूद करावेसे वाटते.
आपल्याकडे खेड्यात नैसर्गिक विधीसाठी बाहेर जाण्याची प्रथा अजूनही आहे...त्याची जी काही कारणे असतील त्यातील प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा तुटवडा. जिथे रोजच्या गरजेइतकेही पाणी नाही तिथे संडास वगैरे साफ ठेवण्यासाठी पाणी कुठून आणणार असा प्रश्न असल्यामुळे जी काही घाण होईल ती बाहेरच असावी हाच हेतू मुख्यत्वे असावा. त्यामुळे तिथे कुणी प्रवासी गेल्यास त्यालाही नाईलाजाने तशाच मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यातूनही जिथे कुठे संडासची सोय असते तिथेही वापरणार्‍यांची संख्या जास्त आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे हवी तेवढी स्वच्छता ..खरं तर किमान स्वच्छताही राखणे कठीण असावे.

शहरातही ज्या काही सोयी सुधारणा होत असतात तिथे सार्वजनिक शौचालये वगैरेंची बांधणी अभावानेच होते त्यामुळे ती गरजवंतांच्या तुलनेत नगण्य असते. इथेही वापर जास्त आणि स्वच्छतेसाठी लागणार्‍या पाण्याचा तुटवडा ही दोन्ही कारणे जशीच्या तशी आ वासून उभी असतात. अशा परिस्थितीत स्त्रिया काय आणि पुरुष काय दोघांचीही कुचंबणा होणारच. तरीही वेळप्रसंगी पुरुष लघवीसाठी आडोसा शोधू शकतो,मात्र लोकलज्जेस्तव स्त्रियांना ती सोय देखिल नसल्यामुळे त्यांची तर विलक्षण कुचंबणा होते...हेही वास्तव आहे.

ह्यावर तोडगा शोधायचा असेल तर मुळात आपली नगरपालिका आणि तिच्या संबंधित सर्व अधिकारी,नगरसेवक वगैरे सगळे ह्याबाबत जागरूक व्हायला हवेत जेणेकरून ते ह्यासाठी काहीतरी भरीव योगदान देऊ शकतील.

मात्र तरीही ह्या सगळ्याशी निगडीत असलेला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी जरी झाली तरी त्यांना किमान स्वच्छ ठेवण्यासाठी लागणार्‍या पाण्याची व्यवस्था कशी होणार? कारण सगळं घोडं तर तिथेच पेंड खातंय.

माझा ताजा वैयक्तिक अनुभव सांगतो....गेले ६-७ दिवस आमच्या विभागात जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे महापालिकेकडून येणारे पाणी नेहमीच्या तुलनेत जवळपास नगण्यच होते. त्यात आमच्या इमारतीची कूपनलिकाही सुकल्यात जमा आहे. अशा अवस्थेत हे दिवस आम्ही कसे काढले हे आम्हाला माहित...एक वेळ पिण्याचे पाणी बाहेरून विकत आणता येते..पण संडास साफ ठेवण्यासाठी लागणार्‍या पाण्याची व्यवस्था कशी करायची... जे काही जमले ते करत होतो पण तरीही नेहमीप्रमाणे स्वच्छ्ता राहात नव्हती...सुदैवाने हा काल आज नाहीतर उद्या संपणार आहे ह्या आशेवर कशीतरी वेळ मारून नेली... हा अनुभव एवढ्यासाठी नमूद केला की पुरेशा पाण्याअभावी घरगुती अथवा सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ कशी ठेवणार?

सर्वात आधी हा पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल...मग कदाचित त्या अनुषंगाने इतर प्रश्नही सुटतील अशी आशा करूया.

नीधप's picture

9 Mar 2010 - 12:08 am | नीधप

सरकारने सोयी करणे याबरोबरच शालेय शिक्षणामधे स्वच्छतागृह कसे वापरावे याचे ट्रेनिंग सक्तीचे करायला हवे.
इयत्ता पहिली दुसरीपासूनच.
घरी आईबाप शिकवत नाहीत का हा प्रश्न आपसूक येईल यानंतर पण प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नाही सगळेच नाही शिकवत हे आहे. तसं नसतं तर असलेल्या तुटपुंज्या सोयी इतक्या भयाण झालेल्या नसत्या.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

चित्रा's picture

9 Mar 2010 - 8:56 am | चित्रा

असेच म्हणते.

मुलांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून अगदी बालवाडीपासून शाळेतूनच शिकवले गेले पाहिजे.

मंगेशपावसकर's picture

9 Mar 2010 - 10:55 am | मंगेशपावसकर

to be honest a clean artical

हर्षद आनंदी's picture

9 Mar 2010 - 11:06 am | हर्षद आनंदी

दुर्दैवाने या विषयाकडे लक्ष द्यावे असे कुठल्याही संस्थेला वाटत नाही.
सरकार कडुन अपेक्षा करणे फोलच आहे, किमान महाराष्ट्र एस. टी. डेपोने अशी सुविधा दिल्यास बराच फायदा होईल.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

आपला अभिजित's picture

9 Mar 2010 - 11:34 am | आपला अभिजित

ही समस्या फारच भीषण आहे, अगदी `स्वाइन फ्लू' पेक्षाही. पण तिच्याकडे पुणे, मुंबईसारख्या शहरातही कुणी विशेष लक्ष देत नाहे, हे त्याहून भीषण आहे.
गणपती च्या मिरवणुकीतही तासंतास लक्ष्मी रस्त्यावर फिरताना किंवा देखावे पाहायला जातानाही मला हा प्रश्न भेडसावतो. पुरुषांचीच जर धड सोय नाही, तर स्त्रियांचे काय होत असेल?

नीधप's picture

9 Mar 2010 - 11:49 am | नीधप

प्रत्येक कार्यालयामधे (work place) स्त्रियांसाठी आणि पुरूषांसाठी संख्येच्या प्रमाणात वेगवेगळी स्वच्छतागृहे असणे कायद्याने बंधनकारक आहे आपल्या भारत देशात आणि तसे नसेल तर काम करणार्‍या स्त्रिया याबद्दल sexual harrassment खाली न्यायालयात दाद मागू शकतात ही नवीन मिळालेली माहीती.

आधी या कायद्याच्या बंधनाची बहुतांशी स्त्रियांना माहीती नसते. चुकून माहीती झालीच तर आवाज उठवण्याची लाज वाटत असते कारण आपल्या महान संस्कृतीत बाईने या विषयाबद्दल उघडपणे बोलणे हे उठवळपणाचे मानले जाते. त्या बाईचीच टर उडवली जाते. अगदी तिच्या चारित्र्याबद्दलही बोलले जाते. याच विषयावरच्या डॉक्यूसंदर्भातल्या माझ्या लिखाणावर एका व्यक्तीच्या ज्या गलिच्छ आणि अपमानास्पद प्रतिक्रिया आल्या होत्या त्यावरून ही मानसिकता अगदीच स्पष्ट झाली होती. हे सगळं दुर्लक्षित करून एखाद्या बाईने पाठपुरावा करायचा ठरवलाच तर तिला तिच्या पुरूष आणि स्त्री सहकार्‍यांकडून पाठींबा मिळेलच असं काही नाही. कारण शेवटी प्रत्येकाला आपली नोकरी महत्वाची असते.

असो अजून एक सुखद धक्का म्हणावी अशी घटना/ वस्तुस्थिती.. सिंधुदुर्गातल्या नेरूर या गावात (कलेश्वराचं मंदीर जिथे आहे ते नेरूर. हळदीचे नेरूर नव्हे.) बाजारपेठेत हायस्कूल आहे. कामाच्या निमित्ताने फिरत फिरत या शाळेत आम्ही पोचलो. सुट्टीचा दिवस असल्याने शाळेत कोणीच नव्हतं. शाळेतल्या मुलींच्या स्वच्छतागृहाला भेट दिली (शिक्षिकांसाठी कुलूप वगैरे लावून ठेवलेल्या अश्या नाही तर सर्व मुलींसाठी खुल्या असणार्‍या) नळाला पाणी होते, ज्यात पाणी भरायचे ती बादली स्वच्छ, आतमधे सिमेंटनेच लिंपलेली जमीन होती पण त्यावर काहीही केरकचरा नव्हता, भिंतींवर कुठलेही आचरट साहित्य लिहिलेले नव्हते, घाण वास येत नव्हता, कधीही आपल्यावर पडतील अश्यापद्धतीने तरंगणार्‍या जळमटांचा मागमूसही नव्हता, खिडकीच्या काचा गायब नव्हत्या.
ज्या ज्या कुणाचा हातभार असेल हे असं ठेवण्यात आणि बांधण्यात त्याला सलाम.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

चिंतातुर जंतू's picture

9 Mar 2010 - 12:01 pm | चिंतातुर जंतू

या दुव्याचा उपयोग होऊ शकेल. मूळ दुव्यावर असलेली रचनेविषयीची माहिती वाचून अशीच कल्पना व्यक्तिगत पातळीवर राबविणे सहज शक्य होईल असे वाटले. अर्थात त्यासाठी 'पेंडिंग पेटंटच्या बैलाला...' हे तत्त्व मान्य करावे लागेल.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धनंजय's picture

10 Mar 2010 - 12:06 am | धनंजय

लेख आवडला, वाईट वाटले

मंगेशपावसकर's picture

10 Mar 2010 - 1:05 am | मंगेशपावसकर

आपला ऑर्कुट आयडी आहे का हो आपल्या बद्दल अजून जाणायच आहे

नीधप's picture

10 Mar 2010 - 10:33 pm | नीधप

काय करणार जाणून घेऊन?

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:34 am | मंगेशपावसकर

वाटत तुम्ही मुंबईतल्या दिसत नाही नको रे बाबा तुम्हाला ताईच म्हणतो

नीधप's picture

11 Mar 2010 - 3:07 pm | नीधप

कधीही ताईच म्हणा.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

नीधप's picture

10 Mar 2010 - 9:29 am | नीधप

उपक्रमाबद्दल अधिक माहीती इथे
http://www.misalpav.com/node/10175

उपक्रमाचे अजूनतरी काहीही झालेले नाही. सध्या केवळ अनुभवखात्यात भर पडणे चालू आहे. कामानिमित्ताने ग्रामीण भागात फिरणे खूप चालू आहे आणि योग्य तो झाडझाडोर्‍याचा आडोसा शोधण्यात मी पटाईत झालेली आहे.

चित्रपटाच्या प्रोजेक्टमधे माझ्यावर खूप जास्त जबाबदार्‍या असल्याने मी पूर्ण बांधली गेलेली आहे त्यामुळे वेळेची प्रचंड चणचण आहे. चित्रपटाचे शूट संपल्यावर या विषयाच्या कामाला वेग येईल. तूर्तास मी संशोधन पातळीवरचे निदान pointers तरी जमवून ठेवते आहे.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

अप्पा जोगळेकर's picture

11 Mar 2010 - 9:38 am | अप्पा जोगळेकर

पुरुषाचं एक वेळ ठीक आहे, ते कुठेही आडोश्याला उभं राहून धार मारू शकतात परंतु आपल्याकडील स्वच्छ प्रसाधनगृहांची वानवा ही महिलांकरता मात्र खरंच तापदायक गोष्ट आहे. - मीदेखील हेच म्हणतो .

नीधप ताई,
अतिशय चांगला लेख आहे. 'गाव गाव सवरता है, अपना भारत बनता है' या पद्धतीने पुरुष एकवेळ मॅनेज करु शकतात. तासनतास थांबून राहण कसं जमतं बायकांना देव जाणे. खरं तर अशी वेळ कुणावरचं येऊ नये. तुमच्या उपक्रमाकरता शुभेच्छा. अतिशय चांगला उपक्रम .

कमोडची सीट वापरताना वर ठेवावी हे बहुतांशी भारतीय पुरुषांना माहीत नसतं किंवा ते तसं करणं हे त्यांच्या इगोला झेपण्यासारखं नसतं.

- स्वतःला कावीळ झाली म्हणून सगळं जग पिवळं आहे असं समजू नये इतकंच सांगेन.

इंटरनेटस्नेही's picture

12 Mar 2010 - 5:04 am | इंटरनेटस्नेही

नीधप यांनी एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार. आपण या साठी काहीच करू शकत नसल्याबद्दल एक पुरुष म्हणून लाज वाटते.

स्वतःला कावीळ झाली म्हणून सगळं जग पिवळं आहे असं समजू नये इतकंच सांगेन.

-- सहमत.

पुणेरी's picture

12 Mar 2010 - 7:03 am | पुणेरी

ह्याच समस्येवर काहीच दिवसांपुर्वी बातम्यांमध्ये पाहिलेला हा उपाय. :)

मायबोलीकर's picture

12 Mar 2010 - 10:33 am | मायबोलीकर

as no toilets are provided,many times I see 2 LADIES PULL 2 SIDES SHUTTERSand 1 uses PORTION INBETWEEN AS TOILETS,
when 33 takke fight is on it;s tme ladies lock the horns with Mamataa,
and writer of this ARTICAL,needhap,
SHOULD TAKE THE LEAD,writting articals is hust not enough,as follo up action alone has key to this problem.
Regards.

शेखर's picture

12 Mar 2010 - 10:49 am | शेखर

मायबोलीकर ,

कृपया मराठीत लिहा...