फुलांच्या थव्यांनी..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
1 Mar 2010 - 11:28 pm

फ़ुलांच्या थव्यांनी तुला गं पहावे
तुझा गंध लेऊन गंधीत व्हावे..

तुझे पाहुनी लाजणे गोजिरे हे
वसंतास वाटे, 'पुन्हा मीच यावे'

जसा चंद्र अवनीस बिलगून जावा
तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे

सुरांना तुझा साज मंजूर व्हावा
तुझे गीत ओठावरी या सजावे

तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे
नि साकार ते, जीवनी मी करावे

निशाणी तुझी गे प्रिये आज दे तू
जगी सर्व, मी आज श्रीमंत व्हावे..

- प्राजु

वृत्त : भुजंगप्रयात
लगागा, लगागा , लगागा, लगागा

शृंगारकविता

प्रतिक्रिया

शेखर's picture

1 Mar 2010 - 11:48 pm | शेखर

व्वा !!! अप्रतिम.....

तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे
नि साकार ते, जीवनी मी करावे

हे खासच....

प्रभो's picture

1 Mar 2010 - 11:51 pm | प्रभो

तुझे पाहुनी लाजणे गोजिरे हे
वसंतास वाटे, 'पुन्हा मीच यावे'

१ नंबर

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2010 - 12:13 am | राजेश घासकडवी

कोवळ्या भावनांना शब्दबद्ध करताना - छंदबद्ध करताना एकाही स्वराची, व्यंजनाची ओढाताण झालेली नाही. एखाद्याच अक्षराचा ऱ्हस्व दीर्घ बदलावा लागलेला आहे. आणि शब्द खूप सहज आलेले आहेत. याला कौशल्य लागतं.

फुला...तुला, सुरांना...साज, अशा रचनांनी ओळी अंतर्गत नादमाधुर्य वाढलेलं आहे.

बेसनलाडू's picture

2 Mar 2010 - 1:26 am | बेसनलाडू

खूप आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

मीनल's picture

2 Mar 2010 - 1:54 am | मीनल

क्या बात !क्या बात! क्या बात!
मीनल.

मदनबाण's picture

2 Mar 2010 - 5:36 am | मदनबाण

झकास... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

sur_nair's picture

2 Mar 2010 - 6:56 am | sur_nair

दुसरं कडवं एकदम पसंतीस उतरले. 'मना सज्जना' च्या चालीवर न म्हणण्याचा प्रयत्न केला पण फिरून तेच होते.

संदीप चित्रे's picture

2 Mar 2010 - 7:48 am | संदीप चित्रे

>> सुरांना तुझा साज मंजूर व्हावा
तुझे गीत ओठावरी या सजावे

तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे
नि साकार ते, जीवनी मी करावे >>

ही कडवी खूप आवडली प्राजु !

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Mar 2010 - 11:45 am | फ्रॅक्चर बंड्या

तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे
नि साकार ते, जीवनी मी करावे

फारच छान...
binarybandya™

राघव's picture

2 Mar 2010 - 12:14 pm | राघव

छान कल्पना.

राघव

सुरेख गं. छान आहे कविता!!

तुझ्या भावनांनी तुझे गीत गावे
तुझे शब्द वाचून मीही रमावे

आपले http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

2 Mar 2010 - 12:21 pm | अविनाशकुलकर्णी

भावपुर्ण ,,मस्त आवडली...

मेघवेडा's picture

2 Mar 2010 - 3:56 pm | मेघवेडा

आवडली कविता.. मस्तच! भावना इतक्या सोप्या शब्दांत व्यक्त करण्याच्या तुझ्या कौशल्याला सलाम प्राजुतै! म्हणजे उगाच कुठेतरी शब्द बळेच घातलाय असले प्रकार नाहीत. तुझ्या सर्वच कविता दर्जेदार असतात! तुझ्या लेखणीतून काव्यांच्या बरसातीची, त्या शब्दसरींची आतुरतेने वाट पाहणारे बरेच चातक असतीलच, आज मीही त्यांत सामील झालोय!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अक्षय पुर्णपात्रे's picture

2 Mar 2010 - 8:08 pm | अक्षय पुर्णपात्रे

प्राजुतै, शब्द छान आहेत. हल्ली तुमच्या कवितेतील 'तू' इतक्या वेळा पाहिल्यासारखा वाटतो की त्यात कोवळेपणा न जाणवता निगरघट्ट निबरपणा जाणवतो.

१.
सुरांना तुझा साज मंजूर व्हावा
तुझे गीत ओठावरी या सजावे

२.

दिठीमध्ये भाव तुझे अन
गीत तुझे या ओठावरी

३.
शब्द रंगणे, मनी गुंफ़णे
कविते, हे तर तुझेच देणे..!

४.
'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते'
अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे?

५.
मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..

Manish Mohile's picture

3 Mar 2010 - 10:38 am | Manish Mohile

छान कविता. सहजसोपी शब्दयोजना. सुन्दर भावचित्रण. माझा कवितान्चा एवढा अभ्यास नाही पण कवितेची जात थोडीशी सुरेश भटान्च्या जवळ जाणारी वाटली. श्रुन्गारभावना फार सुन्दर रीत्या प्रकट केली आहे.

"निशाणी तुझी गे प्रिये आज दे तू
जगी सर्व, मी आज श्रीमंत व्हावे.." ----- अप्रतिम.

छान कविता. अश्याच लिहीत्या रहा.

शानबा५१२'s picture

3 Mar 2010 - 10:55 am | शानबा५१२

लगागा, लगागा , लगागा,

हे काअय??(कायआहे??)

विसोबा खेचर's picture

3 Mar 2010 - 6:25 pm | विसोबा खेचर

कविता नेहमीप्रमाणेच छान!

तात्या.

प्राजु's picture

3 Mar 2010 - 8:00 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/