राजगड... गुंजवणे दरवाज्याने

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
28 Feb 2010 - 7:09 pm

गोनीदा म्हणतात तसं "राजाचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड"

राजगडावर जायला वाटा अनेक...
पालीहून पाली दरवाज्याने...
वाजेघरहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने...
गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने...
गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने...
गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने...
भुतोंड्याहून अळू दरवाज्याने...

पैकी पाली दरवाजा, अळू दरवाजा आणि पद्मावती माचीवरचा चोर दरवाजा ह्या वाटा आता वापरात आहेत... सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने तर आता कुणीच चढत नाही आणि गुंजवणे दरवाज्याने सुध्दा फारसं कुणी जात नाही...

रंगाची उधळण करत नारायण रोजच्या कामाला लागला आणि आम्ही चौघे राजगडाच्या वाटेला लागलो...

सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हावून, गुंजवणीच्या पाण्यात स्वताचं रुप निरखत राजगड बसला होता...

हवा खूपच स्वच्छ होती... मित्राशी गप्पा मारण्यासाठी आपली रोजची जागा सोडून तोरणा राजगडाच्या अगदी जवळ येऊन बसल्याचं जाणवत होतं... डोंगररांगा आणि त्यांचे पदर फारच सुंदर दिसत होते... झाडांच्या फांद्यामधे अडकलेल्या धुरामुळे धुक्याचा भास होत होता... आपले अनेक हात पसरवून राजगड आम्हाला त्याच्या कुशीत बोलवत होता...

गुंजवण्यात पोहचलो, थोडं खाल्लं आणि गावाच्या मागे राजगडाच्या दिशेने निघालो...

"गडावर जायचयं ना?... मग वाट चुकलात... ही वाट जंगलात जाते..." गावकरी
"आम्हाला गुंजवणे दरवाज्याने गडावर जायचयं" आम्ही
"गुंजण दरवाजा! आता कुणी जात नाही त्या वाटेनं... नुसतं जंगल आहे... तुम्ही गडावर पोचणार नाही..." गावकरी
"तो काय! गुंजवणे दरवाजा दिसतोय की... जातो जंगलातून त्याच्या दिशेनं..." आम्ही

घोटवलेली वाट नसणार ह्याची कल्पना होती... काट्या-कुट्यातून वाट काढत जावं लागणार हे पण माहिती होतंच... आणि गुंजवणे दरवाज्यानेच आज गडावर पाऊल ठेवायचं हे पण मनाशी ठाम केलं होतं... मग गावकऱ्याचा निरोप घेतला आणि जंगलात शिरलो... गुंजवणे दरवाज्या पासून गडाची एक सोंड खाली जंगलात उतरली आहे... त्या दिशेने चालायला लागलो... रानात शाल्मलीची झाडं बहरली होती... झाडावर पानं नव्हती मात्र झुंबरासारख्या दिसणाऱ्या शाल्मलीच्या लाल फुलांनी झाडं सजली होती आणि त्यातला मध खाण्यासाठी पक्ष्यांनी गर्दी केली होती... झाडं, फुलं आणि पक्षी बघण्यात इतके दंग झालो की पायाखालची वाट कधी संपली हे कळालच नाही... झाडांच्या फांदोऱ्यामधून डोकावून बालेकिल्ला आम्हाला साद घालत होता...

रान खूपच दाट होतं... गुरांची वाट सुध्दा नव्हती... कारवीचं जंगल तुडवत आम्ही पुढे सरकत होतो... अंगभर काटे टोचत होते आणि कारवीच्या फळांमुळे अंग चिकट झालं होतं... चालायचे थांबलो की अंगभर खाज सुटायची... थोड्यावेळात एका ओढ्यात पोहचलो आणि ओढ्यातूनच वर चढायला लागलो... बरंच वर गेल्यावर जाणवलं की गुंजवणे दरवाजा आणि त्याची सोंड उजवी कडे आहे आणि हा ओढा सुवेळा माचीवरच्या नेढ्याकडे जातोय... मग ओढा सोडला आणि उजव्या हाताला रानात घुसलो... वाट नव्हतीच... काट्या-कुट्यातून वाट काढत चढू लागलो... सोंडेवरुन पावसात पाणी अनेक वाटांनी ओढ्यात कोसळतं, त्यापैकी एका वाटेने आम्ही वर चढत होतो... चढ खूपच जास्त होता आणि उन्हामुळे माती वाळून घसरडी झाली होती... बऱ्याचदा थोडं वर गेलं की घसरुन आधी होतो त्या पेक्षा खाली पोहचायचो... वाळलेलं गवत आणि कारवीचा आधार घेत जरा बसता येईल अश्या जागी पोहचलो... एक-मेकांकडे पाहिल्यावर कळालं की आमचे अवतार बघण्यासारखे झाले होते... सगळं अंग चिकट झालं होतं... कपड्यांमधे काटे, कुसं अडकली होती, काही जागी शर्ट-पँट फाटले होते... पण इथून खालच्या जंगलाचा फारच सुरेख देखावा दिसत होता...

(ह्या वाटेने चढलो...)

उन्हं वाढली होती आणि चढ अजून जास्त तीव्र झाला होता... आता ‘वाटच नाहिये... काटे टोचतायतं... घसरायला होतयं...’ ह्याचं काही वाटेनासं झालं होतं... गवत हातात आलं तर ठिक नाहीतर दोन्ही हात मातीत रुतायचे आणि जरा वर सरकायचं असं करत चढलो आणि शेवटी सोडेंच्या माथ्यावर पोहचलो...

(अजित, स्वानंद आणि तेजस... सोंडेच्या उतारावर...)

इथून गुंजवणे दरवाजा आणि बालेकिल्ल्यावरचा महा-दरवाजा अगदी स्पष्ट दिसत होते...

आता सोडेंच्या माथ्यावरुन गुंजवणे दरवाज्याच्या दिशेने चढायला लागलो... हा चढ अगदी छातीवर येतो, पण चढायला तेवढीच मजा पण येते... कातळात खणलेल्या काही खोबण्यांच्या मदतीने एक कातळ टप्पा पार केला आणि शेवटी काही पायऱ्या चढून गुंजवणे दरवाज्यात पाय ठेवला... एका नंतर एक अश्या ३ दरवाज्यातून गेल्यावर गडावर पोहचलो...

खरंतर गुंजवण्याहून गुंजवणे दरवाज्या पर्यंत वाट आहे... मळलेली नाही पण वाट नक्कीच आहे, पण आम्ही मात्र वाट शोधायचा प्रयत्नच नाही केला... सरळ रानातून दरवाज्याकडे चढायला लागलो, म्हणून जंगलातून वाट काढत वर पोहचायला साधारण ४ तास लागले...

गुंजवणे दरवाज्याच्या इथून सुवेळा माचीचा विस्तार छान दिसतो...

राजगडाला तीन दिशेला तीन माच्या... पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी... ह्या तीन माच्यांच्या मध्यभागी बालेकिल्ला... पद्मावती माचीवर भरपूर जागा, म्हणून ह्या माचीवर मोठ्ठ तळं, देऊळ, सदर, दारु कोठार असं बरंच बांधकाम आहे... बालेकिल्ल्या पासून निमुळत्या होत गेलेल्या सोंडावर सुवेळा आणि संजीवनी माच्या आहेत...

गुंजवणे दरवाज्याच्या इथून सदर, दारुकोठार मागे टाकून पद्मावती तलावा जवळ आलो... हातपाय धुतले, थोडंफार खाल्लं आणि थोडावेळ देवळात आराम केला...

( पद्मावती तलाव)

ह्यापूर्वी गडावर आलो तेव्हा बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघितली होती... मग भर दुपारी २ वाजता संजीवनी माचीकडे निघालो... तोरण्यावर जे धन सापडलं होतं त्याचा वापर करुन राज्यानं राजगड बांधून घेतला... दुर्गनिर्मितीच्या बाबतीत राजगड खरोखरच अजोड आहे... राज्यानं फार मनापासून हा गड उभारलायं... राजगडाचे तट, बुरुज आणि माच्या बघितल्यावर आपण केवळ हरखून जातो...

(संजीवनी माची कडे जाताना...)

(संजीवनी माची)

संजीवनी माचीला दोन ते तीन माणूस खोल चिलखत आहे... ह्या चिलखतीच्या, माचीवरल्या बुरुजांच्या, चोरवाटांच्या बांधकामाला तुलना नाही... माचीवर पाऊल ठेवल्यावर झपाटल्यागत होऊन जातं... हे पाहू की ते असं होतं...

आम्ही पार संजीवनी माचीच्या टोकाला जाऊन बसलो... इथून भाटघर धरणाचं पाणी दिसतं... धरणाच्या काठावर वसलेली लहान-लहान गावं दिसतात... दूरवर वरंध घाटात उभा असलेला कावळ्या किल्ला दिसतो... तोरण्याचा संपुर्ण विस्तार दिसतो आणि त्याला प्रचंडगड का म्हणतात हे पण कळतं...

(तोरणा)

परतताना माचीच्या चिलखती मधून आलो... पुन्हा पद्मावती तलावाच्या काठावर थोडावेळ बसलो आणि साधारण ५ वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने उतरायला लागलो... ही वाट फारच नीट आणि सोपी आहे... साधारण दिड तासात गुंजवण्यात उतरलो...

(राजगड... संधीप्रकाशात)

"सध्या राजगडावर बऱ्याचदा गर्दी असते... लोक मुक्कामी येतात आणि पद्मावती माचीवर खूप कचरा करतात... प्लास्टीकची ताटं, पेले, पीशव्या, दारुच्या बाटल्या ह्यांचा ढीगच झालायं... पीण्याच्या पाण्याच्या टाक्यात देखील बराच कचरा टाकलाय... प्रत्येकजण थोड्या जवाबदारीने वागला तर तीर्थक्षेत्रा प्रमाणे पवित्र असणारे गड-किल्ले तरी निदान स्वच्छ राहतील"

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

प्रवास

प्रतिक्रिया

jaypal's picture

28 Feb 2010 - 7:20 pm | jaypal

मित्रा फोटो आणि लि़खाण दोन्ही आवडल. असाच भटकत रहा हीच सदिच्छा

"प्रत्येकजण थोड्या जवाबदारीने वागला तर तीर्थक्षेत्रा प्रमाणे पवित्र असणारे गड-किल्ले तरी निदान स्वच्छ राहतील" १०,०००% सहमत

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शुचि's picture

28 Feb 2010 - 7:23 pm | शुचि

संजीवनी माची अप्रतिम : )
लेख मस्तच.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चाणक्य's picture

28 Feb 2010 - 8:42 pm | चाणक्य

बर्‍याच दिवसांनी राजगड चं दर्शन झाल्याचा आनंद झाला. संजीवनी माची वरून अगदी समोर रायगडाचे ही अप्रतिम दर्शन होते. फोटोतल्या वातावरणावरुन वाटतय की या दिवशी ही रायगड नक्की दिसला असेल.
बाकी छाती वरल्या चढावरून कातळ ला बिलगत आणि घामाघूम होत गड चढण्याचा आनंद काही औरच. त्याची सर कशालाच नाही राव

टारझन's picture

28 Feb 2010 - 9:26 pm | टारझन

मस्त रे ...
नुकताच राजगडावर मुक्कामी जाऊन आलो .. ते हत्तीचं भोक आहे ना .. त्यात बसुन फोटो काढले होते ;) लै मजा आली :) काही णिवडक फोटू :)

हेच ते लांबुन दिसणारे राजगडाचे भोक .. आम्ही जाऊन आलोय तिथे :)

धोक्याची सुचणा : राजगडावर जर मुक्कामी जाणार असाल , तर आपले कोटे उजाडण्याआधीच साफ करून घेणे. आमच्यातल्या एकाने अंमळ लेट केलं .. त्याच्यामगे माकडं लागली होती आणि त्याची चांगलीच पंचायत झाली. नंतर आम्ही हसुन हसुन लोटपोट झालो होतो.

-(गिर्यारोहन प्रेमी) टारोबा ट्रेकर

संताजी धनाजी's picture

3 Mar 2010 - 12:02 pm | संताजी धनाजी

छान फोटो. त्या भोकाला "नेढं" म्हणतात!

- संताजी धनाजी

मदनबाण's picture

1 Mar 2010 - 5:00 am | मदनबाण

नेहमी प्रमाणेच मस्त लेख आणि सुंदर फोटो... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

बेसनलाडू's picture

1 Mar 2010 - 5:59 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

गणपा's picture

1 Mar 2010 - 7:14 am | गणपा

अप्रतिम प्रकशचित्र आणि तितकच जोरदार लिखाण.
संजीवनी माची मस्तच दिसतेय.

@टारु तुझा तो राजगडाचे भोक आणि माचीचा फोटो पण लै भारी

प्राजु's picture

1 Mar 2010 - 7:32 am | प्राजु

तुझी भटकंती पाहिली की, मन सुखावतं.
वाटच बघत असते तुझ्या भटकंतीच्या वृतांताची आणि फोटोची.
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

विसोबा खेचर's picture

1 Mar 2010 - 7:35 am | विसोबा खेचर

नेहमीप्रमाणेच सुंदर भटकंती, सुंदर फोटो..! :)

शिवरायांना आणि त्यांच्या राजगडाला मानाचा मुजरा!

तात्या.

बज्जु's picture

3 Mar 2010 - 10:00 am | बज्जु

;;) फोटो आणि लिखाण दोन्ही सुरेख ;;)

गडप्रेमी बज्जु :H

Manish Mohile's picture

3 Mar 2010 - 10:00 am | Manish Mohile

विमुक्त,

छायाचित्रे आणि वर्णन नेहमीप्रमाणेच अफलातून. ह्या लेखाने तर जुन्या स्म्रुती चाळवल्या. आम्ही तिघा मित्रान्नी पावसाळ्यात राज्गडचा ट्रेक केला होता. लेख वाचून आणि छायाचित्रे पाहून पुनर्भेटीचा आनन्द मिळाला. त्याबद्दल आभार.

राजगड बघितला की महाराजान्चे सर्वव्यापी मोठेपण अधिक प्रकर्षाने प्रतीत होते. त्या गडाच्या स्थानावरून, बान्धणीवरून त्यान्ची दूरद्रुष्टी लक्षात येते. रायगडाआधी जवळ जवळ २५ वर्षे स्वराज्याची राजधानी होता ते स्वाभाविकच होते असे गड बघून वाटते.

असेच आम्हाला सह्याद्रीचे आणि महाराज्यान्च्या दुर्गान्चे दर्शन घडवत राहा.

प्रचेतस's picture

3 Mar 2010 - 11:40 am | प्रचेतस

विमुक्ता,
डोळे तृप्त केलेस.

संताजी धनाजी's picture

3 Mar 2010 - 12:04 pm | संताजी धनाजी

छायाचित्रे फारच सुंदर आली आहेत!
एरवी धुरामुळे फार खराब फोटो येतात.

- संताजी धनाजी