अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
11 Mar 2008 - 10:12 pm

अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला
अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग दुसरा

विठ्ठल मंदिरातील गणोरकर बुवांचे (अमरावतीचे) कीर्तन नेहमीप्रमाणे रंगले. गणोरकरबुवांचे सुरांवर अप्रतिम प्रभुत्व. त्यामुळे बुवांचे कीर्तन म्हणजे बोधप्रद उपदेश आणि गाण्याची मैफिल असा टु इन वन मामला.

तबल्यावर आमचे घैसासबुवा आणि पायपेटीवर बडेकाका. दोघेही आपापल्या वाद्यातले दर्दी.

कीर्तनाची सांगता करतांना बुवांनी पायाखालची सतरंजी दूर सारली. सर्व श्रोते ती खूण समजून नेहमीसारखे उभे राहिले. तुकाराम महाराजांच्या,

"झाले समाधान | तुमचे धरिले चरण||
आता उठावेसे मना| येत नाही नारायणा||"

या अभंगाच्या ठेक्यावर सगळे तल्लीन झालेले. पुंडलिक वरदा चा गजर झाला. आम्हीही तल्लीन झालेलो. एवढ्यात बाजूनी आवाज आला, "प्रसाद!!!!"

आमची ब्रह्मानंदी लागलेली टाळी भंग झाली म्हणून जरा त्रासिकपणे आम्ही डोळे उघडून पाहिले. एक खादीचा झब्बा आणि लेंगा घातलेले गृहस्थ हातात पेढ्यांचा लहानसा खोका घेऊन उभे होते.

उंची सव्वापाच फुटाच्या आसपास, काहीसा स्थूल देह, डोक्यावर तेल थापून बसवलेले अर्घवट पिकलेले केस साठीच्या खुणा दाखवणारे, डोळ्यावर चष्मा, कपाळाला कीर्तनाच्या पूर्वरंगात लावलेला बुक्का, चेहर्‍यावर स्मित हास्य म्हणता येईल एवढी विस्तारलेली जीवणी.

आम्ही हात पुढे केला. त्यावर एका लहान पेढ्याचे चार भाग केल्यावर जेवढा तुकडा होईल तेवढा प्रसाद त्या गृहस्थांनी आमच्या हातावर ठेवला आणि पुढच्या माणसाला हळी दिली "प्रसाद!!!"

आम्हाला त्यांचे एकंदरीत ध्यान पाहून जरा हसायला आले. मंदिरातून लोक बाहेर पडू लागले. चपलांच्या खचात आपला जोड शोधू लागले. विठ्ठलमंदिराचे सभागृह मोकळे वाटायला लागले.

घैसासबुवांची तबला,चुंबळीची आवराआवर सुरू झाली. बडेकाका पेटी बंद करायला लागले. गणोरकरबुवांभोवती काही भक्तमंडळींचा गराडा. आम्ही आपले मजा बघतोय.

तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!" आम्ही उभ्या असलेल्या सतरंजीचे एक टोक त्या "प्रसाद!!!" देणार्‍या गृहस्थांच्या हाती होते आणि "आता निघा हो! संपलंय कीर्तन" अशा अविर्भावात ते आम्हाला सतरंजीवरून दूर व्हायला सांगत होते. आम्ही बाजूला झालो. पाच मिनिटात त्यांनी सर्व सतरंज्या उचलून त्याच्या घड्या करून कोपर्‍यात ठेवल्या. कोपर्‍यातली त्यांची शबनम खांद्याला लावली आणि "पांडुरंगा!!!!!!!!!!" अशी जोरात हाक देऊन आपण निघत असल्याची वर्दी देवाला दिली.

हा माणूस कोण, कुठला आम्हाला माहित नव्हते. तो काही फार मोठा म्हणजे उच्चशिक्षित किंवा श्रीमंत वर्गातला तर निश्चित दिसत नव्हता. पण तो निराळा होता हे निश्चित. असेल कोणी का? आम्ही घरी यायला निघालो.

दोन दिवसांनी भिकोबा निवास समोरून आम्ही जात होतो. त्या इमारतीत कोणीतरी गेलेलं असावं. फुटपाथवर तिरडी बांधण्याचे काम चालू. असे काही दिसले की आपण आपल्या ओळखीतले कोण त्यात दिसताय का म्हणून जरा चौकसपणे पहातो.

हेच "प्रसाद!!!!!"वाले गृहस्थ तिथे तिरडी बांधण्याच्या कामात लागलेले होते. ओळखीचे कोणी दिसेना. त्यामुळे कोण गेलाय हे कळत नव्हतं. तेवढ्यात त्याचे तिरडीचे काम झाले असावे. तो उठला आणि कोपर्‍यात उकिडवा बसून गोवर्‍यांवर घासलेट ओतून त्या पेटवायच्या खटपटीला लागला. अरे वा! हे समाजसेवकही दिसतात, असे म्हणून आम्ही आपल्या वाटेला लागलो.

दोन दिवसांनी - वेळ सकाळी ७.०० ची. लवकर उठलो होतो. पान खावेसे वाटले म्हणून आमच्या पानवाल्याकडे निघालो. वाटेत सहस्रबुद्ध्याच्या पेपर स्टॉलवर उभा राहून हा माणूस इकॉनॉमिक टाईम्स चाळतोय. आयला.... हा शेअर्स वगैरे पण घेतो की काय?

स्थळ -एन.एम. कॉलेजचे सभागृह. मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे गुंतवणूकदार मार्गदर्शन शिबीर. प्राध्यापक लिमये ( सेबीने जे लिमये कमिशन नेमले होते ते यांच्या अध्यक्षतेखाली) आणि आमचे स्नेही चंद्रशेखर टिळक( एनएसडीएल चे व्हाईस प्रेसिडेंट) हे दोघे दिग्गज वक्ते म्हणून आलेले. आम्ही टिळक साहेबांच्या सांगण्यावरून म्हणा आमंत्रणावरून म्हणा तिथे गेलेलो.

तिथे हा गृहस्थ स्वयंसेवकाचा बिल्ला त्याच्या खादीच्या झब्ब्याला लावून धावपळ करतोय!!!!

हे अती झालं. हे अती झालं. विठ्ठलमंदीर आणि ती अंतयात्रेची तयारी ठीक आहे. पण हा इथेही????

च्या मायला कोण आहे हा नक्की? आणि काय करतो? जिथे तिथे कसा असतो?

स्थळ ब्राह्मण सहाय्यक संघाचे कार्यालय. विजू दिक्षिताच्या मुलीचे लग्न. अर्थात सकाळपासून आमंत्रण. सकाळी आठ वाजता आम्ही नटून थटून कार्यालयात.

तिथे हा लोकांच्या हातात उपम्याच्या बशा देतोय.

याचा शोध घ्यायलाच हवा. प्रतिज्ञा. हा कोण आहे हे जाणून घेण्यात आम्हाला कमालीचे औत्सुक्य आहे. आता लग्नात तो कोणाशी बोलतोय ते पहायचं आणि आपल्या ओळखीच्या कोणाशी हा बोलला तर त्याला गाठून याची माहिती काढायचीच.........

उर्वरीत पुढील भागात

आपला,
(हैराण) धोंडोपंत

हे ठिकाण

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

11 Mar 2008 - 10:21 pm | केशवसुमार

पंत..
झकास लेख.. उस्तुक्ता मस्त ताणली आहे..
उद्या लगेच पुढचा भाग टाका.. नाहितर डोस्क्याचा भुगा होईल..
(हौराण)केशवसुमार

विद्याधर३१'s picture

11 Mar 2008 - 10:21 pm | विद्याधर३१

आलेला दिसतोय सध्या मिपा वर..

पन्त तात्यानी बत्ती लावली ..

छान आहे.

मला नारायण दिसायला लागला..

विद्याधर

वरदा's picture

11 Mar 2008 - 10:35 pm | वरदा

उत्सुकता खूप ताणलेय्...मस्त आहे...

छोटा डॉन's picture

11 Mar 2008 - 10:58 pm | छोटा डॉन

च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं...
[ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?]

हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 12:42 am | विसोबा खेचर

धोंड्या,

सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस!

तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!"

हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं!

कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय!

पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही...

अवांतर -

मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी.

सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :)

तुझा,
तात्या.

प्राजु's picture

12 Mar 2008 - 12:59 am | प्राजु

कधी कळणार आम्हाला?? पुढचा भाग लवकर येऊदे..
- (सर्वव्यापी)प्राजु

बेसनलाडू's picture

12 Mar 2008 - 6:49 am | बेसनलाडू

उत्कंठा लावून ठेवणारे चित्रण. पुढचे भाग लवकर येऊ द्यात.
(वाचनोत्सुक)बेसनलाडू

नंदन's picture

12 Mar 2008 - 9:19 am | नंदन

म्हणतो. छान झालाय हा भाग.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

12 Mar 2008 - 8:03 am | चतुरंग

हे असं वाचून कसं वाटलं सांगू?
लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत.
आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":(
अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:)

चतुरंग

सृष्टीलावण्या's picture

12 Mar 2008 - 9:21 am | सृष्टीलावण्या

दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी.

अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात.

दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली.

ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली.

फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 9:50 am | विसोबा खेचर

धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्‍याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :)

मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली.

अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :)

पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं!

असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा!

माझ्या मते त्यामुळे लिहिणार्‍या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही!

आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :)

असो...

आपला,
(सुसंबद्ध!) तात्या.

सृष्टीलावण्या's picture

12 Mar 2008 - 10:31 am | सृष्टीलावण्या

प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्‍या भागात.

दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती).

अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र).

असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय?

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 11:05 am | विसोबा खेचर

दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत

असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा!

आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज.

ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :)

एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र).

इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल!

असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील.

कबूल आहे...

त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय?

विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे...

असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे...

धन्यवाद...

तात्या.

मनस्वी's picture

12 Mar 2008 - 10:09 am | मनस्वी

धोंडोपंत - पहिला भाग आवडला.
ज्या frequency ने तुम्हाला "तो" इसम दिसला, त्याच frequency ने पुढचे भाग येउद्यात.

मनस्वी

आनंदयात्री's picture

12 Mar 2008 - 10:33 am | आनंदयात्री

म्हणतो, लिखाण वेगळे वाटले, बायेसड अजिबात नाही वाटले.

मनस्वी's picture

12 Mar 2008 - 11:24 am | मनस्वी

धोंडोपंत

ज्यांना अस्वस्थ आणि कंटाळवाणे वाटते त्यांसाठी २रा भाग लवकर येउद्यात.
असे हलकेफुलके वाचून मन प्रफुल्लित होते.
:)
(प्रफुल्लित) मनस्वी

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2008 - 12:54 pm | स्वाती दिनेश

पहिला भाग आवडला ,पुढचा लवकर येऊ दे.
स्वाती