चिकन फहिटा

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
9 Dec 2009 - 10:40 pm

इथे आल्यावर पहिल्यांदी चाखलेला मेक्सिकन पदार्थ म्हणजे चिकन फहिटा. स्पॅनिशमधे 'J' चा उच्चार 'ह' होतो हे महित नसल्याने ' हे फजिटा काय आहे' अस विचारुन स्वतःची फजिती करुन घेतलेली आजही आठवते. मात्र माझ्या फजितीला कारण झालेला हा फहिटा त्याच्या चटकदार चवीमुळे माझा लाडका आहे. खरा फहिटा हा बीफचा स्कर्ट स्टेक हा भाग येतो त्या पासून करतात. पण माझ्या सारख्या बीफ न खाणार्‍यांसाठी चिकन फहिटा हा प्रकार आहे.

या चिकन फहिटा साठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे चिकन मुरवायला लागणारे मॅरिनेड. तुम्ही बाजारात मिळणारे तयार मॅरिनेड वापरू शकता पण घरी बनवलेल्या मॅरिनेड सारखी चव नाही मिळणार.

माझ्याकडे मॅरिनेडच्या दोन कृती आहेत. तेव्हा पसंद अपनी अपनी

मॅरिनेड -1
१/४ कप बीअर
१/३ कप लिंबाचा रस
१ टे. स्पून तेल
२-३ मोठ्या लसणाच्या पाकळ्या(देशी असल्यास जास्त), पेस्ट करुन
१ टे. स्पून वुस्टरशर सॉस
१ टी स्पून जीरे पावडर
२ टे. स्पून चिरलेली कोथिंबिर
१ टी स्पून ब्रऊन शुगर
१/२ टी स्पून तिखट
१/२ टी स्पून मिरे पावडर
चवीप्रमाणे मीठ
सर्व एकत्र करुन मिक्स करा

किंवा

मॅरिनेड -२
१/४ कप वुस्टरशर सॉस
१/४ कप सायडर विनेगर
१ टी स्पून जिरे पावडर
२-३ मोठ्या लसणाच्या पाकळ्या(देशी असल्यास
जास्त), पेस्ट करुन
१/२ टी स्पून तिखट
१/२ टी स्पून मीठ
१ टी स्पून मिरे पावडर
२ टे. स्पून बारीक चिरुन कोथिंबीर
सर्व एकत्र करुन मिक्स करा.

फहिटा

साहित्य

२ बोनलेस चिकन ब्रेस्ट
१ कांदा उभा चिरुन
१ लाल किंवा हिरवी ढब्बू मिरची उभी चिरुन
१-२ टे स्पून तेल

मॅरिनेड-१ वापरणार असाल तर
१ टे. स्पून वुस्टरशर सॉस
१/२ टी स्पून लिंबाचा रस
१/२ टी स्पून तिखट
२ टी स्पून पाणी
एकत्र करुन

मॅरिनेड-२ वापरणार असाल तर त्यातलेच निम्मे मॅरिनेड त्यात १ टी स्पून तिखट घालून बाजूला ठेवा.

६ ६- इंच वाल्या टॉटिया

जोडीला आवडी प्रमाणे
चिरलेला लेट्युस
१/२ कप किसलेले चिज
१/२ कप सॉवर क्रिम
ग्वाकोमोल
साल्सा किंवा पिको डे गायो

कृती
चिकन तुमच्या आवडीच्या मॅरिनेड्मधे २ तास मुरवत ठेवा.

पुरेसे मुरले की ग्रील करुन घ्या. किवा कास्ट आयर्न च्या पॅन मधे १ टे. स्पून तेल घाला. चांगले तापले की त्यात चिकन घाला.

४-५ मिनिटे एकाबाजुला शिजले की उलटा ४-५ मिनिटे शिजू द्या. कापून मधे चिकन गुलाबी नाहियेना ते बघा. असल्यास अजून थोडा वेळ शिजवा. बाजूला काढुन ठेवा.

मोट्या पॅन मधे १ टे. स्पून तेल तापत ठेवा. चांगले तापले की त्यात उभा चिरलेला कांदा घाला. ३-४ मिनिटे परता. आता त्यात चिरलेली ढब्बु मिरची घालून ४-५ मिनिटे परता.

एकीकडे चिकनच्या पातळ पट्ट्या कापा. पॅन खालची आच वाढवा. बाजुला ठेवलेले मॅरिनेड किंवा सॉस्,लिंबू रस, पाणी हे मिश्रण घाला. पॅन चांगले गरम असेल तर सिझल होईल. लगेच चिकन घाला आणि २ मिनिटे परता.

मायक्रोव्हेव मधे ओलसर पेपर नॅपकिन मधे गुंडाळून टॉर्टिया २५-३० सेकंद गरम करा.

टॉर्टिया मधे चिकनचे मिश्रण आणि आवडीप्रमाणे लेट्युस, चिज, सॉवर क्रिम वगैरे घालून फहिटा बनवा.

प्रतिक्रिया

jaypal's picture

9 Dec 2009 - 10:53 pm | jaypal

बघुन तरी एकदम चमचमीत वटते आहे.
नक्की करुन बघेन पण मुंबईत १.वुस्टरशर सॉस २.टॉर्टिया ३.ग्वाकोमोल
४.साल्सा किंवा पिको डे गायो हे सर्व मिळतात का? ही सर्व नावे प्रथमच वाचतोय. खालुन २ -या फोटो मधे डाव्या वाटितील पिवळा जिन्नस कोणता आहे?

विंजिनेर's picture

10 Dec 2009 - 4:40 am | विंजिनेर

साल्सा घरी ताजा करता येतो(आणि करावा). जेवणाच्या आधी १/२ करून फ्रिज मधे ठेवावा म्हणजे मस्त मुरतो.
पिवळा पदार्थ म्हणजे चीज असणार.

स्वाती२'s picture

10 Dec 2009 - 6:52 pm | स्वाती२

Worcestershire sauce मुंबईत मिळायला हरकत नसावी. नाहीच मिळाले तर जवळपास जाणारे म्हणजे तेरियाकी. फक्त मीठ घालायचे नाही. टॉर्टिया बद्दल माहित नाही पण हेच मिश्रण पिझा वर वापरुन पिझा पण छान लागतो. मी तर होल व्हिट टॉर्टिया आहे सांगून फुलकेही वापरलेत. अवाकाडो मिळत असेल तर ग्वाकोमोल घरी करता येते. नसली तरी चालते. मी सॉवर क्रिम आणि चिज वापरलं तर ग्वाकोमोल करत नाही.पिको डे गायो म्हणजे आपली कांदा-टोमॅटो कोशिंबिर. फक्त दाण्याच कुट, दही आणि साखर घालायची नाही. ते पिवळ्या रंगाच आहे ते शार्प चेडर चिज.

शेखर's picture

9 Dec 2009 - 11:12 pm | शेखर

मस्तच... माझी पण आवडती डिश आहे..... कधी बोलवताय ?

बाय द वे...तुम्ही ग्वाकोमोल टाकायचे विसरले का?

गणपा's picture

10 Dec 2009 - 1:57 am | गणपा

स्वाती ताई कसली भन्नाट पाककृती दिसतेय.
बर झाल जेवल्यावर मिपा उघडल , नाहीतर काही खर न्हवत आज.

-माझी खादाडी.

विंजिनेर's picture

10 Dec 2009 - 4:29 am | विंजिनेर

जबर्‍या हो तै. आपल्याला एन्शिलाडा जास्त आवडतात बॉ.
(सॅन 'जोसे')विंजिनेर

गरमागरम तव्यावरुन वाफाळत आलेला फहिटा आठवला. घरी कधी करुन नाहि पाहिला.. पिट्टापॉकेट मध्ये घालून सॅडविचपण छान लागेल..

सहज's picture

10 Dec 2009 - 9:03 am | सहज

फहिता छान!

तसेच स्टेप बाय स्टेप सचित्र मांडणी बद्दल अभिनंदन! बल्लवाचार्य पांथस्थ यांनी घालून दिलेला व गणपा यांनी जोपासलेला हा आदर्श आता एक परंपरा बनत चालला आहे. :-)

प्रभो's picture

10 Dec 2009 - 11:44 am | प्रभो

मस्तच....मझ्या आवडत्या पदार्थांपैकी एक..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

स्वाती२'s picture

10 Dec 2009 - 7:09 pm | स्वाती२

धन्यवाद!

@शेखर
ग्वाकामोल केलीच नव्हती. बाकी चव घ्यायला केव्हाही या!
@विंजिनेर
एन्शिलाडा मलाही आवडतात पण मग सॉस लावा, ओवन मधे टाका वगैरे माझं काम वाढतं. हे कसं बाप-लेक बनवू शकतात. माझी फक्त देखरेख. :)
@लवंगी
आमच्याकडे नेहमी डबल बॅच करतो. दोन दिवसांनी पिटा मधे किंवा पिझावर टॉपिंग म्हणून. पिल्सबरीच्या डोवमधे भरून कलझोन पण मस्त होतात.

निमीत्त मात्र's picture

11 Dec 2009 - 12:08 am | निमीत्त मात्र

आमच्याकडे नेहमी डबल बॅच करतो. दोन दिवसांनी पिटा मधे किंवा पिझावर टॉपिंग म्हणून. पिल्सबरीच्या डोवमधे भरून कलझोन पण मस्त होतात.

इटलीच पिज्झा, अरबस्तानातला पिटा आणि मेक्सिकोचा फहिता
थोडक्यात, कशातही काहीही घातले की चांगलेच लागते! अन्न हे पूर्णब्रह्म!!

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Dec 2009 - 12:13 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मात्र, एक सुधारणा.

थोडक्यात, कशातही काहीही घातले की चांगलेच लागते! अन्न हे पूर्णब्रह्म!!

कशात/वरही (पित्झावरमुळे)

निमीत्त मात्र's picture

11 Dec 2009 - 12:16 am | निमीत्त मात्र

दुरुस्तीबद्दल धन्यवाद श्री पुर्णपात्रे!

आमच्याकडे तर आम्ही तीन ब्याचेस करतो ना! पहिल्या दोन दिवशी वरील प्रमाणे आणि तिसर्‍या दिवशी आमटी भातात कालवून..आहाहाहा

निमीत्त मात्र's picture

11 Dec 2009 - 12:17 am | निमीत्त मात्र

दुरुस्तीबद्दल धन्यवाद श्री पुर्णपात्रे!

आमच्याकडे तर आम्ही तीन ब्याचेस करतो ना! पहिल्या दोन दिवशी वरील प्रमाणे आणि तिसर्‍या दिवशी आमटी भातात कालवून..आहाहाहा

संदीप चित्रे's picture

10 Dec 2009 - 8:29 pm | संदीप चित्रे

सचित्र पाकृसाठी धन्स स्वातीताई !
अमेरिकेत नवीन असताना 'फजिता'सारखाच अजून एक चुकणारा उच्चार म्हणजे 'टॉर्टिया' ! स्पेलिंगप्रमाणे उच्चार ह्या शिकवणीनुसार हमखास चुकीचा उच्चार होणार 'टॉर्टिला' :)

बाकी फहिता म्हणजे खासच प्रकार असतो. मस्तपैकी 'चिलीज'मधे जावं -- चांगली मार्गारिटा किंवा मोहितो मिळाली तर बघावं -- बफेलो विंग्ज, साउथ वेस्टर्न एग रोल्स ह्यांना पोटात सामावून घ्यावं -- मग फहिता / केसडिया (हा अजून एक उच्चार ! स्पेलिंगप्रमाणे उच्चार म्हटल्यावर 'कॅसाडिला' (किंवा चक्क 'कसा दिला' !!) असा चुकवणारा) वगैरे झालं की -- सर्वात शेवटचा टप्पा 'मोल्टन चॉकलेट केक' :)

अर्थात 'चिलीज' हे रेस्टॉरंट एकट्या-दुकट्याने जाण्यापेक्षा मित्रमंडळीच्या घोळक्याने जाण्याचे आणि गप्पा झोडत जेवण्याचे आहे !!

निमीत्त मात्र's picture

11 Dec 2009 - 12:05 am | निमीत्त मात्र

अर्थात 'चिलीज' हे रेस्टॉरंट एकट्या-दुकट्याने जाण्यापेक्षा मित्रमंडळीच्या घोळक्याने जाण्याचे आणि गप्पा झोडत जेवण्याचे आहे !!

बरोबत्र. मित्रमंडळींनी आग्रह केल्यासच असल्या ठीकाणी जावे. चवीने खायचे असल्यास अ‍ॅपल बीज, चिलीज, टीजीआय फ्रायडे, ऑलीव गार्डन असली चेन रेस्तारंते शक्यातो टाळावीत. त्यातल्या त्यात पीएफ चँग बरे.

चित्रा's picture

11 Dec 2009 - 9:18 am | चित्रा

सोपी आणि छान आहे पाककृती.

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Dec 2009 - 12:28 pm | श्रीयुत संतोष जोशी

झकास झकास झकास झकास

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.