सोंगाड्या

जागु's picture
जागु in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
सोंगाड्या कुठेही दिसताच मुलांच्या चेहर्‍यावर हसू आणि डोळ्यात चमक आल्याशिवाय राहायची नाही. सोंगाड्या म्हणजे एक मुलखावेगळे व्यक्तिमत्त्व. कधी वेडेवाकडे हातवारे, चेहरे करून मुलांना हसवणारा, तर कधी डोळ्यात अचानक पाणी येणारा, कधीही न बोलणारा - मुका आणि विशेष म्हणजे लहान मुले ज्या कार्यक्रमात असतील त्या कार्यक्रमात वेगवेगळ्या वेषभूषा करून त्यांना हसवणारा, वेडा म्हणून ओळखला जाणारा सोंगाड्या कुठे राहतो, काय करतो याचा कुणालाच थांगपत्ता नव्हता. विशेष म्हणजे त्यांचा खरा चेहरादेखील कोणी कधी पाहिला नव्हता आणि तो वेडा आणि तसा काही अपाय न करणारा असल्याने कोणी ह्या बाबीकडे लक्षही देत नसे.

एक दिवस शाळेची शिवजयंतीची मिरवणूक निघून रस्त्यावर आली आणि अचानक अंगात मावळ्यांचा पोषाख, डोक्यावर फेटा, रंगाने काळाकुट्ट केलेला चेहरा, पिळलेल्या झुबकेदार मिशा, वर हातात खेळण्यातली ढाल आणि तलवार घेऊन वेडेवाकडे लढाईचे हातवारे करतच तो धावत आला. दोन्ही पाय फाकवून त्याने एक उंच उडी मारली आणि लढाई केल्याचा वेडावाकडा आव आणू लागला, त्याबरोबर मुलांमध्ये हास्यकल्लोळाची एकच लाट पसरली. शिक्षकांच्या "जय भवानी जय शिवाजी" नार्‍यासोबत ओरडताना मुलांचे लक्ष विचलित झाले. खरे तर शाळेतील शिक्षकांनाही हसू येत होते, पण मुलांची शिस्त भंग होऊ नये म्हणून त्यांना मुलांना दम भरावा लागला. पण दम भरताच सोंगाड्याचा चेहरा विलक्षण करुण झाला. त्याचा उत्साही चेहरा क्षणात कोलमडून लावलेल्या रंगापेक्षा काळाठिक्कर दिसू लागला. पाणीदार झालेले डोळे त्या पोषाखाला विचित्र वाटू लागले. लांबूनच त्याने शिक्षकांना हात जोडून नमस्कार केला आणि नको नको अशी खूण करत आणि धूम ठोकून निघून गेला. हे धूम ठोकून निघून जाणेही इतके मजेशीर होते की पुन्हा मुले खळखळून हसू लागली.

जमलेल्या शिक्षकांना आणि रस्त्यावर असलेल्या लोकांना वाटले की पैसे मागण्यासाठी हा कोणीतरी सोंगाड्याचे रूप घेऊन आला असेल. आता तो घरोघरी जाईल आणि पैसे मागून आपल्या गावाला निघून जाईल.

रामजन्मोत्सव, हनुमान जयंती देवळात अगदी थाटामाटात साजरा करत. दुपारी जन्मोत्सवाच्या वेळी देवळाभोवती जत्राच भरायची. जत्रेत वेगवेगळ्या लहान-मोठ्या मुलांच्या वस्तू, खेळणी विकायला असायची. त्यामुळे मुलांचीही भरपूर रेलचेल असायची. रामनवमीला रामाच्या पोषाखात अंग पूर्णं निळ्या रंगाचे करून आलेला सोंगाड्या धनुष्य-बाण घेऊन फिरत असे. आपल्याजवळचा बाण घेऊन तो स्वतःच्या नाकावर चिकटवून वेगवेगळे चाळे करून मुलांना हसवत असे. तर हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीचा पोषाख परिधान करून उड्या मारत गदा फिरवत मुलांना खो-खो हसवत असे. अशी मुले हसली की सोंगाड्याला खूप आनंद व्हायचा. त्याच्या रूपातले फक्त स्पष्ट दिसणारे डोळे होते, त्यात त्याच्या भावना रेंगाळलेल्या दिसायच्या.

कोणाचा वाढदिवस, बारसे असले की बर्‍याचदा सोंगाड्या विदूषकाचा पोषाख घालून 'बिनबुलाये मेहमान'प्रमाणे हजर असायचाच. बारशाच्या निमित्ताने आला की आपल्या हातात फुगे घेऊन यायचा आणि सगळ्या छोट्या मुलांना वाटायचा.
वाढदिवसासाठी येताना खांद्यावर एक चॉकलेटची झोळी घेऊन यायचा आणि मुलांना वाटायचा. ही चॉकलेट्स आणि फुगे हा कुठून आणतो ह्याबद्दल बर्‍याचदा इतर गावकर्‍यांना प्रश्न पडे. पण चौकशी करता गावात कोणत्याही दुकानदाराकडून त्याने चॉकलेट घेतल्याचे किंवा पळवून नेल्याचे कानावर यायचे नाही.

सोंगाड्याला अशा समारंभात येण्यापासून कोणी अडवायचेही नाही, कारण लहान मुलांना आवडत असल्याने आणि बिचारा कधी त्रास देत नसल्याने, तसेच नित्याने सगळीकडे वावरत असल्याने सगळ्या गावकर्‍यांना तो आपल्यातलाच वाटायचा. त्याच्यावर दया येऊन लोक त्याला खायला, जेवायला द्यायचे, पण तो ते कधीच घेत नसे.

सोंगाड्या वेडा असला, तरी तो कधी कोणाच्या अंगावर धावून गेला नाही की कोणाशी वाईट वागला नाही. मुलांनाही तो लांबूनच हसवीत असे. कधीच कुठल्या मुलाला त्याने उचलून घेतले नाही. म्हातार्‍या माणसांना तो आदराने नमस्कार करत असे, तर इतरांच्या वाटेला जात नसे. कोणी त्याला त्याच्याबद्दल विचारले तर तो काहीतरी हातवारे करी, पण कोणालाच काही कळत नसे. त्याच्यासोबत कधी कोणी दिसले नाही, त्यामुळे तो एकटाच राहत असणार हे नक्की होते, पण तो आपल्या उदरनिर्वाहासाठी काय करत असेल, हे वेगवेगळे पोषाख कुठून आणत असेल? बरे, त्याचा पोषाखही कधी किळसवाणा नसे, तर अगदी स्वच्छ नेटनेटका. त्यामुळे कधी कोणाला त्याची घृणा वाटली नाही.

एकदा शाळेचा आनंद मेळावा होता. अशा कार्यक्रमात तर सोंगाड्याची हजेरी हवीच. मुलेही वाट पाहतच होती त्याची. सोंगाड्या येऊन मुलांना चॉकलेट्स वाटतच होता, तेवढ्यात पहिल्या इयत्तेतील गौरीला भोवळ येऊन ती खाली पडली. ते पाहताच सोंगाड्या "गौरी गौरी" असे ओरडत धावत गौरीजवळ गेला आणि तिला मांडीवर घेऊन "कोणीतरी पाणी आणा पटकन" असे घाबरून ओरडला. कोणीतरी पाणी आणून दिले, ते सोंगाड्याने गौरीच्या डोळ्यावर मारले. तो "गौरी, बाळा, ऊठ. बाळा माझ्याकडे बघ" सोंगाड्या डोळ्यात पाणी आणून जिवाच्या आकांताने बोलत होता. मेळाव्यासाठी आलेल्या पालकांना हा दुहेरी धक्का होता. एक धक्का गौरीच्या भोवळीचा आणि दुसरा सोंगाड्याच्या आवाज फुटण्याचा आणि तो आवाजही ओळखीचा असण्याचा. तो आवाज होता हीरो कृष्णा कॉन्ट्रॅक्टरचा.

कृष्णा हा गावातील नामवंत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होता. कृष्णा आपल्या कामासोबत समाजसेवेतही गुंतलेला असायचा आणि त्याचा आणखी एक छंद होता नाटकांत काम करायचा. तो एक उत्तम कलाकार होता. लहानपणापासून त्याला अ‍ॅक्टिंगची सवय होती आणि शाळेतील स्नेहसंमेलनात, नाटकात काम करता करता तो व्यावसायिक नाटकांतही हौसेखातर आपली कलाकारी सादर करत होता. त्यामुळे त्याला गावात सगळे 'हीरो कृष्णा कॉन्ट्रॅक्टर' म्हणून ओळखायचे. त्याच्या नाटकांमुळे त्याच्या आयुष्यात त्याला अनेक मित्र मिळाले होते, तर ठेकेदार ह्या व्यवसायामुळे त्याच्या हाताखाली अनेक कामगार काम करत होते. त्यांच्यासाठी तो कृष्णा शेठ, तर मित्रांसाठी कृष्णा हीरो आणि त्याची ओळख होती कॉन्ट्रॅक्टर कृष्णा हिरो. व्यवसाय, समाजातील स्थान, मान-सन्मान अव्वल होते. संपत्तीही समाधानकारक होती. घरात लक्ष्मी नांदत होती, पण कौटुंबिक स्वास्थ्य मात्र हरवले होते. घरातील लक्ष्मी घराला पाठ फिरवून गेली होती.

कृष्णा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. दोन बहिणींची लग्ने झाली होती. नाटकात काम करता करता त्याची ओळख मेघा या गोड मुलीबरोबर झाली. मेघा एका कंपनीत कामाला होती व अभिनयाची आवड असल्याने आणि तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने थोड्या आर्थिक प्राप्तीसाठी ती नाटकांच्या प्रयोगांना हजर असायची. नाटकात कृष्णा प्रमुख नायकाचे, तर मेघा प्रमुख नायिकेचे काम करायची. रंगमंचावर नाटकातील प्रेम रंगवताना ते कधी एकमेकांच्या प्रेमात गुंतले हे त्यांचे त्यांना कळले नाही. सुसंस्कृत मुलगी आणि हरहुन्नरी, नकार देण्यासारखे काहीच नसणारा मुलगा मिळाल्याने दोन्ही घराच्या संमतीने कृष्णा आणि मेघा यांचे प्रेम विवाहबंधनात एकरूप झाले.

मेघा सासू-सासर्‍यांना हवे नको ते पाहत घराच्या इतर जबाबदार्‍याही यशस्वीपणे पार पाडत होती. कृष्णा आणि मेघा यांच्या वैवाहिक आयुष्यालाही चांगलीच गोडी आली होती. एकमेकांच्या आवडी-निवडी पुरवणे, एकमेकांना वेळ देणे, काळजी घेणे सारे काही दृष्ट लागू नये असे चालू होते ह्या नवदांपत्याचे. असेच सहा महिने गेले आणि कृष्णा आणि मेघाला मातृत्व प्रदान करून घरात दुडुदुडू चालणार्‍या पावलांची चाहूल लागली. कृष्णाने आणि घरातील सगळ्यांनीच मेघाला हातांच्या तळव्यावर जपले आणि दिवस भरताच नवचैतन्य घेऊन गौरी जन्माला आली. कृष्णाचा आनंद द्विगुणित झाल्याने त्याने पूर्ण गावाला मिठाई वाटली. मेघाचे बाळंतपण आणि गौरीचे आगमन हा जणू दीपावलीचा सोहळाच. असेच आनंदात दिवस चालले होते गौरीच्या लक्ष्मीच्या पायगुणाने आणि कृष्णाच्या प्रामाणिक कामामुळे कृष्णाला आणखी मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स मिळू लागली. त्यातूनच इतरांसाठी धावणार्‍या कृष्णा हीरोकडे सामाजिक कार्यकर्त्यांची रेलचेल वाढून त्याच्या सामाजिक कार्यातील जबाबदार्‍याही वाढल्या. अनेक सामाजिक संस्थांचा तो पदाधिकारी बनला होता. आता मेघा नाटकात नसल्याने म्हणा की सवडच मिळत नाही म्हणून म्हणा, त्याने आपला अभिनयाचा छंद बाजूलाच ठेवला होता. मेघानेही त्याला त्यासाठी प्रोत्साहन दिले नाही, कारण आता तिच्याच वाट्याला कृष्णा फार कमी येत होता. रात्रीचे झोपायला येणे, सकाळी उठून आपल्या कार्यात मग्न होणे, कधी जमलेच तर जेवायला येणे, नाहीतर बाहेरच त्याची व्यवस्था व्हायची. त्यामुळे मेघाला त्याचा दुरावा जाणवू लागला. कृष्णा घरी येई, तेव्हा गौरीचे मात्र फार लाड करायचा. त्याच्या काळजाचा तुकडा होता गौरी. घरी आला की सर्वप्रथम तिला डोळ्यात साठवण्यासाठी त्याची तगमग असायची.

मेघाच्या कृष्णावरील प्रेमात गौरी वाटेकरू आली होती आणि आपसूकच मेघाकडे कृष्णाचे थोडे दुर्लक्षच व्हायला लागले. मेघाला हे जाणवू लागले. तिला थोडी एकटेपणाची भावना वाटू लागली. ती थोडी उदास राहू लागली. तरी ती कृष्णाला समजून घेत होती म्हणूनच आपला एकाकी पणावर मात करण्यासाठी ती मार्ग शोधत होती. गौरी एक वर्षाची झाल्यावर मेघाने कृष्णाकडे आपले व्यक्तिस्वातंत्र्य जपण्यासाठी पुन्हा नोकरीवर रुजू होण्याची मागणी केली, पण कृष्णाने तिला साफ नकार दिला. कारण होते गौरीचे पालनपोषण आणि घरच्या जबाबदार्‍या. गौरीला सासू सांभाळण्यासाठी तयार होती, पण तिची तब्येत अधूनमधून बिघडत होती, त्यामुळे कृष्णाला तिचीही काळजी होती. मेघाने घरी गौरीसाठी एक बाई ठेवू या असे सांगितल्यावर तर कृष्णाचा संतापच झाला. दुसर्‍यांच्या हातात आपले बाळ द्यायचे नाही ह्या मतावर कृष्णा ठाम होता. आता त्यांच्यात ह्या विषयावरून अधूनमधून बाचाबाची चालू झाली. कृष्णा मेघाला म्हणे, "तुला कशाला नोकरी करायला हवी? आपल्या घरात काय कमी आहे? तुला काय हवे अजून? तुला काय हवे ते मिळते, मग बाळाला सोडून तुला कशाला जायला हवे?" मेघाही मग कृष्णावर आग पाखडत असे. "पूर्वी तू किती माझ्यावर प्रेम करायचास, मला वेळ द्यायचास. मी तुला सर्वस्व मानलं आणि माझे सर्वस्वच आता दूर दूर जात आहे म्हटल्यावर मी कसे दिवस काढायचे? गौरीवर मीपण तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करते आणि मी तिला जन्म दिला आहे. मलापण तिची काळजी आहे. पण याचा अर्थ मी घरच्या जबाबदार्‍यांत बुडून जाऊन माझे व्यक्तिस्वातंत्र्य घालवायचे असे नाही ना? घर माझे एकटीचेच आहे का? मी पण एक कर्तबगार मुलगीच होते. मी घेतलेल्या शिक्षणाचा, माझ्या कर्तबगारीला मला न्याय नको का द्यायला? आणि गौरीचे पालन तर आपल्याच घरात होणार आहे ना?" असे रोज रोज दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि हे वाद इतके विकोपाला गेले की कृष्णा आता फक्त झोपण्यापुरता घरात येऊ लागला, मेघाला टाळू लागला. गौरीची मात्र तो बरोबर खबरबात ठेवायचा. रात्री यायचा तेव्हा तिला मांडीवर झोपवायचा आणि तिला हवे-नको ते सगळं आणून ठेवायचा.

दिवस असेच जात होते. गौरी आता ३ वर्षांची झाली होती व नर्सरीत जाऊ लागली होती. घरांतील ह्या वादामुळे कृष्णाचे आई-वडीलही दोघांना समजावता समजावता हतबल झाले. मेघा कंटाळून आता घरच्या जबाबदार्‍यांबाबतही टाळाटाळ करू लागली. त्यावरून तिचे आणि सासूचेही थोड्या प्रमाणात खटके उडू लागले. गौरी आता ३ वर्षांची झाली होती व नर्सरीत जाऊ लागली होती. दिवसात मेघाला सगळे असह्य झाले आणि तिने कृष्णाकडे विषय काढलाच. तिला गौरीला घेऊन वेगळे राहायचे होते आणि त्यासाठी ती घटस्फोट घ्यायलाही तयार होती. "मला तुझी प्रॉपर्टीही नको. मी माझे कमावीन आणि गौरीचा सांभाळ करीन, पण आता ह्या घुसमटीत राहणार नाही" हा ठाम निर्णय मेघाने कृष्णाला सांगितला आणि कृष्णावर जणू वीजच कोसळली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि मेघाचा संताप इतक्या पराकोटीला गेला की तिने तडक आपली गौरीच्या सामानासकट बॅग भरली आणि गौरीला घेऊन माहेरी निघून गेली. जाताना तिने कृष्णाला कडक धमकी दिली. मला आणि गौरीला भेटण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. जर तसे केलेस, तर मी घटस्फोटाची मागणी करीनच आणि गौरीला घेऊन कुठेतरी लांब राहायला जाईन.

मेघाचे माहेर बाजूच्याच गावात होते. तीन गावांची मिळून अशी एकच शाळा असल्याने घर बदलण्याने गौरीच्या शिक्षणात काही फरक पडणार नव्हता. शिक्षणात फरक पडत नसला,तरी गौरीच्या मनावर आपले आजी-आजोबा, बाबा दूर गेल्याचा मनावर विपरीत परिणाम होऊ लागला. ती सारखी त्यांची आठवण काढून रडू लागली व आजारी पडू लागली. मेघाही कामावर रुजू झाल्याने तिला आणखी एकाकी वाटू लागले. नवीन आजीआजोबांबरोबर रुळायला तिला खूप वेळ गेला. शिवाय पहिल्या घरांतील सुखसुविधा ह्या घरात नसल्याचाही तिच्यावर परिणाम होत होता. गौरी शांत शांत राहू लागली होती. मेघाने तिला खुलवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा एकच हट्ट असे - पप्पांच्या घरी जायचे आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर असे मेघाचे झाले होते.

आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून लांब गेल्याने कृष्णा पूर्ण खचून गेला होता. त्याचे ना कामात लक्ष लागत होते, ना समाजकार्यात. आई-वडिलांनाही ह्या परिस्थितीमुळे वरचेवर आरोग्याच्या तक्रारी चालू झाल्या होत्या. कृष्णाला हा आघात सहन होत नव्हता. मेघा दूर गेल्याने कृष्णाला तिचीही आठवण आता येऊ लागली. पण तिचा घराबाहेर पडण्याचा निर्णय मानण्यास त्याचे मन तयार होत नव्हते. आता उठावे आणि तडक गौरीला भेटावे, तिला घेऊन यावे हा विचार वारंवार त्याच्या मनात येत असे. पण मेघाने शेवटी जाताना कानात घुमलेल्या धमकीच्या घटस्फोटाच्या कटू शब्दांच्या लाटा वारंवार मनावर उसळत होत्या. कृष्णाने मेघाबरोबर कितीही भांडण केले असले, आकांडतांडव केले असले, तरी त्याच्या मनात मेघाबद्दलचे मनात असलेले बेशुद्ध अवस्थेतील प्रेम जिवंत होते आणि ते पडलेल्या दुराव्याने शुद्धीत येऊ पाहत होते. त्यात घटस्फोट झाला तर गौरी कायद्याने आपल्यापासून दूर होईल आणि जनसामान्यात बदनामी होऊन आई-वडीलही पूर्ण खचून जातील, ह्या विचारांनी कृष्णाच्या मनात थैमान घातले होते. काय करावे हे काहीच सुचत नव्हते त्याला. त्यातच एक दिवस नाटकाचे डायरेक्टर त्याला भेटायला आले. त्यांना त्यांच्या नाटकासाठी योग्य नायक मिळत नव्हता. त्पांच्या मनात असलेल्या पात्रासाठी कृष्णाच फिट बसत होता. त्यांनी कृष्णाला नाटकात काम करण्याची विनंती केली, पण आपली मानसिक स्थिती चांगली नसल्याने सध्या तो हे काम करू शकत नाही, हे त्याने त्यांना सांगितले. डायरेक्टर थोडे नाराजच झाले. बाकी हालहवालीच्या गोष्टी करता करता कृष्णाच्या लक्षात आले की हे नाटक गौरी असलेल्या गावातच होळीच्या मुहूर्तावर करायचे आहे. कृष्णाच्या काळजात एक मंद तारा चमकला. गौरीला डोळे भरून पाहण्यासाठी कृष्णाची कोणत्याही थराला जायची आता तयारी झाली होती. कृष्णा डायरेक्टरांना म्हणाला, "मी काम करीन, पण मला कोणी ओळखणार नाही असा माझा मेकअप करूनच मी रंगमंचावर उतरेन. शिवाय आवाजही बदलेन. आणि मी ह्या नाटकात आहे हे आपल्या टीमशिवाय इतर कोणालाही कळणार नाही." डायरेक्टर म्हणाले, "मला अट मान्य आहे आणि आवाज बदलण्याची गरज नाही, कारण नायक मुका आहे." आता तर कृष्णाने हा रोल पक्काच करून टाकला आणि इथूनच तयार झाला मुका सोंगाड्या.

होळीला रंगमंचासमोर पुष्कळ गर्दी जमली होती. पडदा उघडला, नाटक चालू झाले आणि कृष्णा रंगमंचावर आला. कृष्णाने नाटकात एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडलेल्या मुक्या विदूषकाची भूमिका साकारली होती, जी भूमिका भावनाप्रधान असली तरी विदूषकाच्या वेषामुळे लहान मुलांना फार गमतीशीर वाटली. मुलांच्या गर्दीतच मेघा गौरीला घेऊन बसलेली कृष्णाच्या नजरेला पडली आणि काही क्षण कृष्णा स्तब्धच झाला. त्याने पटकन स्वतःला सावरले. गौरी विदूषकातल्या वेषातील आपल्या बाबाकडे पाहून हसत होती. मेघा गौरीच्या चेहर्‍यावरचे हसू पाहून आनंदी झाली होती आणि तिला ती काम करत असलेल्या नाटकाची टीम समोर पाहताना आनंद होत होता आणि कृष्णाबरोबर नाटकातील सहवासाचे क्षणही आठवत होते. नाटक संपल्यावर मेघा गौरीला घेऊन पडद्यामागे सगळ्यांना भेटायला गेली. विदूषक झालेला कृष्णा मेघाला काही कळणार नाही याची काळजी घेऊन लगेच गौरीजवळ गेला आणि तिला डोळे भरून पाहून तिचे मनोरंजन करत होता. सगळ्यांना झाला प्रकार माहीत असल्याने त्यांनी तिची चौकशी केली असता मेघाला गहिवरून आले व तिने थोडक्यात गौरीवर होत असलेल्या मानसिक कुचंबणेची माहिती त्यांना दिली. विदूषकाच्या रूपातील कृष्णा हे सगळं ऐकून हळहळत होता. शेवटी ती म्हणाली की आज ह्या नाटकातील विदूषक पाहून ती खूप महिन्यांनी हसली आहे. हे ऐकताच कृष्णाने ठरवले की आता आपण गौरीला भेटण्यासाठी आणि तिला खूश ठेवण्यासाठी सोंगाड्या व्हायचे.

गौरी जिथे जाण्याची शक्यता असेल तिथे - म्हणजे गौरीच्या मैत्रिणींच्या वाढदिवसाच्या पार्टीला, गावातील सार्वजनिक कार्यक्रमांना व शाळेतील सार्वजनिक कार्यक्रमांना कृष्णा वेष बदलून जाऊ लागला. तो आपल्या गाडीतच वेष बदलू लागला आणि कोणी आसपास नाही अशा आडमार्गाने जाऊ लागला. गौरीबरोबर इतर मुलांनाही चॉकलेट्स वाटून आणि गमतीशीर नकला करून हसवू लागला. सुरुवातीला शाळेतील शिपायांनी त्याच्यावर नजर ठेवली, पण ह्याच्यापासून मुलांना कोणताच अपाय नाही याची त्यांना खातरी पटून ते त्याला बिनधास्त वावरू देऊ लागले. गौरीलाही सोंगाड्याची गंमत वाटत होती व ती आपल्या आईला हीच एक गंमत धावत जाऊन सांगायची. त्यामुळे सोंगाड्यामुळे का होईना, पण गौरी आता जरा रुळू लागलीआहे, याची मेघाला खातरी पटू लागली.

आज अचानक गौरीला आलेल्या भोवळीमुळे सगळेच शिक्षक-पालक गौरी भोवती जमले होते. त्यातच गौरीबरोबार असलेले गौरीचे आजोबा थक्क होऊन हे सारे पाहत होते. कॉन्ट्रॅक्टर कृष्णा हीरो आपल्या मुलीसाठी अशा वेषात फिरत होता, ह्यावर - कुणी हे पाहिले नसते, तर - कुणाचा विश्वासच बसला नसता. आजोबांनी झाला प्रकार मेघाला फोन करून सांगितला व ताबडतोब तिथे निघून यायला सांगितले. मेघा धावत पळत गौरीच्या काळजीने आणि वडिलांनी सांगितलेल्या कृष्णाच्या आश्चर्यकारक लीला पाहण्यासाठी धडधडत्या काळजाने आली. मेघाने पाहिले - कृष्णाने गौरीला जवळ घेतले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहत होते. गौरीनेही आपल्या पप्पांना ओळखल्याने ती त्याला घट्ट बिलगली होती व तिच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहत होते. मेघा हे दृश्य पाहून विरघळली आणि ती दोघांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली " गौरी, चल आता पप्पांच्या, म्हणजे आपल्या घरी. तुझ्या आनंदासाठी मी सगळे त्याग करायला आता तयार आहे." मेघाचा आवाज ऐकताच कृष्णाने वर पाहिले. दोघांची नजरानजर झाली आणि त्याच नजरेत ते पुन्हा एकरूप झाल्याची ग्वाही मिळाली. कृष्णानेही मेघाची पूर्वी घडल्या प्रकाराची माफी मागितली व ह्यापुढे तुला नोकरी व जे आवडेल ते तुझ्या मर्जीप्रमाणे खुशाल कर हे दिलदारपणे सांगितले. गौरी निरागस अश्रू, तर कृष्णा आणि मेघा पश्चात्तापातून गाळून निघालेले आनंदाश्रू ढाळत होते. भोवताली सगळे जमलेल्यांनाही आश्चर्यकारक आनंद झाला होता. सगळ्यांनी मेघा आणि कृष्णाला भावी सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गौरीला तिचा कायमचा सोंगाड्या पप्पा मिळाला, जो आता फक्त आणि फक्त गौरीसाठीच बिनवेषातील सोंगाड्या बनतो आणि मेघासाठी तिच्या आयुष्यातील खराखुरा नायक मिळाला.
Footer

प्रतिक्रिया

शलभ's picture

19 Oct 2017 - 3:56 pm | शलभ

सुंदर कथा..

धन्यवाद शलभ. मी आतापर्यंत लेखच जास्त लिहीले आहेत. ही माझी पहिलीच कथा आहे.

बबन ताम्बे's picture

23 Oct 2017 - 10:55 am | बबन ताम्बे

आवडली कथा .

नरेश_'s picture

24 Oct 2017 - 1:24 pm | नरेश_

सुखांत म्हणून आवडली

एस's picture

25 Oct 2017 - 1:19 pm | एस

कथा आवडली.

कपिलमुनी's picture

25 Oct 2017 - 2:27 pm | कपिलमुनी

आवडली

मित्रहो's picture

26 Oct 2017 - 12:45 pm | मित्रहो

सुखांत आहे.

पद्मावति's picture

26 Oct 2017 - 2:28 pm | पद्मावति

आवडली.

जागु's picture

27 Oct 2017 - 10:19 am | जागु

बबन, नरेश, एस, कपिलमुनी, मित्रहो आणि पद्मावती मनापासून धन्यवाद.

कऊ's picture

27 Oct 2017 - 10:45 pm | कऊ

सुरेख कथा..
आवडली

नाखु's picture

27 Oct 2017 - 11:24 pm | नाखु

असल्याने फार आवडली

बापाचं मन आपल्या पिल्लांना सुखी ठेवण्यासाठी सदोदित धडपडत असते, पण ते दिसत नाही

त्यासाठीच तर त्याने एवढा आटापिटा केला ना.

पैसा's picture

28 Oct 2017 - 6:41 pm | पैसा

साधी सरळ गोष्ट

जुइ's picture

1 Nov 2017 - 8:23 am | जुइ

कथा आवडली!

स्वाती दिनेश's picture

2 Nov 2017 - 12:26 am | स्वाती दिनेश

गोष्ट छान आहे,
स्वाती

जागु's picture

2 Nov 2017 - 10:11 am | जागु

कऊ, नाखु, पैसा, जुई, स्वाती धन्यवाद.