माझे गाव श्रीवर्धन , श्रींचे वरदान असलेली भूमी
चारी बाजूनी हिरव्यागार वाड्या ( वाडी - नारळ , सुपारी ची बाग ) नारळाचे माहेरघर म्हणाल तरी चालेल , कोणाच्याही घरी गेलात आणि नारळ आहेत का विचारलेत तर नाही असे उत्तर मिळणार नाही ......असो
मूळ पाकृ कडे वळूया
लहानपणी जेव्हा नारळी पोर्णिमा जवळ आली कि ( म्हणजे कॅलेंडर मध्ये दिसायला लागली ) कि आमची धमाल चालू व्हायची , नारळांचे खेळ सुरु व्हायचे आणि ज्याचा नारळ जिंकेल त्याला प्रतिद्वंदी चा फुटलेला नारळ मिळायचा तो किवा अधिक तुटलेले नारळ मग घरी आई किंवा आजी कडे नेऊन द्यायचा मग कधी प्रक्टिस म्हणून उकडीचे मोदक ,कधी पातोळे,ओल्या नारळाच्या -कधी गुळाच्या कधी साखरेच्या करंज्या , आळिव घालून लाडू , कधी नारळीपाक ,आणि पौर्णिमेला नारळीभात
आमच्या गावी नारळी पौर्णिमेला नारळाचे खेळ होतात , अगदी अबाल वृद्ध हे खेळ खेळतात आणि छोट्यांना शिकवतात कसे ते नंतर सांगेन केव्हातरी.......
जेव्हा खूप नारळ जमायचे ( आम्ही जिंकायचो ) तेव्हा मात्र घरच्या ना प्रश्न पडायचा आता यांच कराव तरी काय , आणि मग वर सांगितल्याप्रमाणे नवनवीन पदार्थ बनवायला सुरवात व्हायची आणि त्या जिंकलेल्या नारळाच्या वाट्याची विल्हेवाट लावली जायची ....... असच जास्तीत जास्त नारळ वापरून केलेली डिश म्हणजे कोळाचे पोहे
पोह्यांचा बाप आयटम , खास आजीला मस्का लाऊन हा करायला लावायचो , पण आजीच्या हातची ग्रेट टेस्ट कधीच विसरू शकत नाही , या साठी लागणारे कोळ म्हणजे साक्षात नारळाचे खोऊन , पाट्यावर वाटून ( आता मिक्सर वर)) काढलेले घट्ट दुध. तर आता हे दुध हा महत्वाचा घटक वापरून त्याचा पोह्यांवर कसा काय वापर करायचा ते पाहू
साहित्य :-
अर्धा किलो जाड पोहे, एक - दोन मोठे नारळ, मीठ, एक-दोन हिरव्या मिरच्या, दोन सुक्या मिरच्या, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, अर्धी ते पाऊण वाटी गूळ, कोथिंबीर, तूप, जिरे, हिंग.
आता कसं करायचं ते पाहूया , प्रथम नारळ खोवून, त्यात पाणी घालून वाटावे व खोबऱ्याचे दूध काढून घ्यावे. हे दूध सहा ते सात वाट्या होईल इतके करावे. (त्याकरिता पाणी घालून परत परत वाटावे) जितके दुध घट्ट तितकी चव भरते , चिंच भिजत घालून चिंचेचा अर्धी वाटी दाट कोळ या दुधात घालावा. काळी चिंच असेल तर तिचा छान दाट कोळ निघतो , तसेच या दुधात अर्धी वाटी ते पाऊण वाटी गूळ घालावा. मीठ व हिरव्या मिरच्या वाटून लावाव्या व कोथिंबीर बारीक चिरून घालावी. दमदार हिंग, जिरे घालून तुपाची ( साजूक / डालडा ) त्यातल्या त्यात साजूक तूप असेल तर त्याचा फ्लेवर मस्त येतो , फोडणी करावी. फोडणीत सुक्या मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब घालावा व वरील दुधास ती फोडणी वरून द्यावी.
पोहे हे जाड असावेत , ताजे असावेत
सुखे पोहे घेतले तर कोळ जास्त लागतो , आणि तयार केलेला कोळ थोडा थोडा पुरवून खायचा असेल तर
खावयास घेण्यापूर्वी पोहे पंधरा मिनिटे धुऊन ठेवावेत व खावयास देताना ते एका खोलगट डिशमध्ये घालून त्यावर वरील तयार केलेले दूध घालावे. देताना कोळ चांगला ढवळून घ्यावा जसा पाणीपुरी वाला पाणी डावेने हलवतो तसा ..... हे पोहे फार रूचकर लागतात. ह्या पोह्यास दुधाकरिता जितके जास्त खोबरे घ्यावे, तितके चांगले. नारळाचे दूध जास्त घातल्यास पोहे जास्त चांगले लागतात.
हि पाकृ माझी आजी करायची तशी लिहली आहे , काही थोडे बदल करून चालतील पण हिंग , चिंच आणि गुळ यांचा योग्य मेळ झाला नाही तर हि डिश गेली कामातून
माझी सर्वात आवडती डिश आहे
फोटो आता तरी उपलब्ध नाहीयेत पण लवकरच श्रीवर्धन ला फेरी होणार आहे , तेव्हा एकदा होतीलच , स्टेप बाय स्टेप काढेन आणि लोड करेन
प्रतिक्रिया
1 Aug 2017 - 6:27 pm | पिलीयन रायडर
फारच सुंदर! पाकृ पेक्षा आठवणी जास्त आवडल्या. कोकणी पद्धतीचे कोणतेही पोहे जास्त चांगले लागतात असं मला वाटतं.
फक्त इतक्या सुंदर पाकृ मध्ये डालड्याचे नाव पण काढु नका बुवा. साजुक तुपच हवे नारळ म्हणला की.
1 Aug 2017 - 6:54 pm | सूड
मी कुठेतरी वाचलं होतं की कोळाच्या पोह्यांना पोहे वरचेवर भाजून घेतात.
1 Aug 2017 - 7:36 pm | दिपक.कुवेत
तरी पेशवे साहेब एक घटक राहिलाच.....पोह्याचा तिखट पापड. तो चूलीवरच्या निखार्यात (असेल तर) भाजून वरुन चूरा करुन खायला द्यायचा. आंबट, गोड आणि तिखट अशी फर्मास चव जमून येते कि काय विचारता सोय नाही. हा घ्या हा फोटो अपलोडवा.....छे आता ह्या विकेंड ला करावेच लागणार. मस्त पाकृ
1 Aug 2017 - 7:45 pm | पिलीयन रायडर
वा!!!
2 Aug 2017 - 9:46 am | II श्रीमंत पेशवे II
फोटो पाहून मस्त वाटलं ...........
प्रतिक्रिये बद्दल आभार ..........
3 Aug 2017 - 11:28 am | केडी
बेश्ट, करून बघणार..... पाकृ बद्दल आभार...!
3 Aug 2017 - 1:07 pm | भ ट क्या खे ड वा ला
मस्तच ..
करुन पाहतो .
3 Aug 2017 - 11:54 pm | babubobade
मस्त
4 Aug 2017 - 1:13 am | रुपी
मस्त.. नक्की करुन पाहणार..
दिपक भाऊंनी दिलेला फोटोही मस्तच.
4 Aug 2017 - 12:47 pm | एकविरा
मस्त आता सोमवारीच करणार . ताज्या पोहयांचि आठवण का काढलीत हो .आता तसे पोहे मिळत नाहि अगदी पेण चे आणले तरिहि . आमच्या गावी खास जन्माष्टमी साठी ताजे पोहे कुठले जायचे . मोठ मोठ्या डेगी मध्ये भात भिजत घातला जायचा नंतर पोहे कूटले जात घरभर ताज्या पोहयांचा मस्त खमंग वास पसरलेला असायचा .
4 Aug 2017 - 4:54 pm | यशोधरा
अरे काय आठवण करुन दिलीत! आता करायलाच हवेत!
4 Aug 2017 - 5:35 pm | त्रिवेणी
आज नारळाच दूध आणलं डाबरवाल्यांच. रविवारी करणार आता. पण मुळात औठेंटिक चव माहीत नसल्याने कळणार नाही जमले त की नाही ते.
7 Aug 2017 - 6:47 pm | पैसा
ताज्या दुधाची चव नाही त्याला.
7 Aug 2017 - 10:35 pm | त्रिवेणी
हो ग ताई पण जर नारळ खवून करायच म्हटलं तर कधी होईल शंकाच आहे. एक डब्बा आज नारळीभात ला संपवला.
6 Aug 2017 - 2:17 pm | कंजूस
अगदी शॅाटकट मारायचा झाला तर दडपे पोहे खायचे.
6 Aug 2017 - 2:23 pm | babubobade
पण मिसळायचे मटेरियल भिन्न आहे
7 Aug 2017 - 6:49 pm | पैसा
विसरत चाललेल्या पाकृपैकी एक.
7 Aug 2017 - 7:03 pm | सविता००१
फार सुरेख आणि अत्यंत आवडता पदार्थ आहे माझा.
बाकी दमदार हिंगाची फोडणी हे मस्ट च.शब्द खूप आवडला.
21 Aug 2017 - 9:41 pm | गम्मत-जम्मत
8 Sep 2025 - 11:25 am | II श्रीमंत पेशवे II
वा
21 Aug 2017 - 10:05 pm | गम्मत-जम्मत