उकडांबा

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
14 May 2017 - 10:33 am

ही पारंपरिक रेसिपी आहे, माझी आजी, आजेसासूबाई करायच्या. पूर्वी कोकणात पावसात फार भाज्या मिळत नसत. तेव्हा या बेगमीच्या पदार्थांचा उपयोग व्हायचा. हे करायला ठराविक झाडाचे रायवळ आंबे वापरले जायचे. फक्त आंबे उतरून काढायचे, पडलेले नको.
aambe
साहित्यः
दहा रायवळ आंबे थोडे पिकलेले, एक वाटी मोहोरी, 300ग्रॅम गूळ, दोन चमचे मीठ, दोन चमचे मेथी पावडर, दोन चमचे हिंग, चार चमचे लाल तिखट, अर्धी वाटी तेल, थोडी हळद
aambe
कृती:
थोडे पिकायला लागलेले आंबे स्वच्छ धुवावेत. पाण्यात घालून दहा मिनिटे उकडावेत. पाण्यातून काढून गार करायला ठेवावेत. 300 ग्रॅम गूळ एका पातेल्यात घ्यावा, त्यात पाऊण ली पाणी घालून पाक करावा. एक वाटी मोहोरी बारीक करून घ्यावी. अर्धी वाटी तेलाची मोहोरी, हिंग, हळद, थोडे तिखट घालून फोडणी करावी, गार करायला ठेवावी. गुळाचा पाक गार करावा. त्यात मेथी पावडर, मोहोरी पावडर, मीठ, तिखट नीट घुसळून घ्यावे. गार झालेली फोडणी मिसळावी. आंब्याची साल देठाकडून सोडवून घ्यावी. काचेच्या बरणीत आंबे ठेवावेत, त्यावर तयार मिश्रण घालावे. हे लोणचं छान मुरलं की खायला घेताना आंबा सोलून खारात कुस्करून खायला घ्यावा. मुरलेला आंबा छान लागतो.aamba

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

14 May 2017 - 12:36 pm | पद्मावति

वाह! मस्तच.

दिपक.कुवेत's picture

14 May 2017 - 12:39 pm | दिपक.कुवेत

काय हा अत्याचार सकळी सकाळी......आता काम करणं अशक्य झालायं. शेवटचा फोटो तर पारच टेम्टींग आलाय. एखाद्या सुटिच्या दिवशी भात/उकडांबा खाउन मस्तपैकी ताणून द्यावी ह्या पेक्षा आनंद तो काय!!! ऑर्डर घेशील काय.....लगेच देतो. नाहीतरी जूनमधे भारतवारी आहेच.

अनन्न्या's picture

14 May 2017 - 3:03 pm | अनन्न्या

घेऊन येते.

सविता००१'s picture

14 May 2017 - 1:34 pm | सविता००१

इतका आवडतो उकडांबा...........
पण आता रायवळ आंबे पुण्यात कुठे शोधू?

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2017 - 8:30 pm | अत्रुप्त आत्मा

लै वरील खाल्ल्यालं नाय ह्ये प्रकरण. अताही पाहूनच समाधान! :)

पिलीयन रायडर's picture

14 May 2017 - 8:39 pm | पिलीयन रायडर

काही म्हणा पण कोकणातले लोकच हुषार! काय एक एक पदार्थ असतात तुमच्याकडे. वाह!

देवा पुढचा जन्म कोकणात होऊ दे रे बाबा!

अनन्न्या's picture

14 May 2017 - 9:49 pm | अनन्न्या

हे खरय, एकच पीक आंबा पण तो गोड आणि तिखट कोणत्याही चवीत अप्रतिम लागतो. मग काय आम्ही त्याचे इतके प्रकार बनवतो की प्रत्येक पदार्थ म्हणजे आहाहा!

रेवती's picture

15 May 2017 - 3:31 pm | रेवती

ग्रेट पाकृ व फोटू.

पैसा's picture

15 May 2017 - 3:42 pm | पैसा

मस्त!

वा मस्त. ह्याला मेथांबाही म्हणतात आणि आंब्याचे रायतेही म्हणतात.

अनन्न्या's picture

16 May 2017 - 7:32 am | अनन्न्या

आमच्याकडे मेथांबा म्हणजे मेथी दाण्यावर आंबा फोडी फोडणीत घालतात, आणि रायते मी दिलेय बघ भाजलेल्या आंब्याचे, उकडांबा वर्षभर टिकतो. अर्थात प्रत्येक भागात शब्द वेगळे!

सूड's picture

15 May 2017 - 4:20 pm | सूड

वर्षभर टिकतो का हा?

अनन्न्या's picture

16 May 2017 - 7:33 am | अनन्न्या

त्यासाठीच करून ठेवतात, आयत्यावेळचे तोंडी लावणे

मंदार कात्रे's picture

15 May 2017 - 8:26 pm | मंदार कात्रे

आमच्या घरात व शेजारी देखील पूर्वी हा प्रकार आवर्जून दर मे-जून महिन्यात केला जायचा ...
घराशेजारी एक आम्ब्याचे झाड होते ज्याचे तुरट चवीचे आम्बे उकडाम्बा आणि लोणच्यासाठी वापरले जायचे , त्या झाडाचे नावच उकडाम्बा होते ... २ /३ वर्षापूर्वी तोडले गेले

म्हणजे उकडांबा करण्यासाठी त्याच झाडाचे आंबे वापरतात.

नूतन सावंत's picture

16 May 2017 - 6:49 pm | नूतन सावंत

जीभ चाळवलीस खरी, पण डायरेक्ट बालपणातही पोचवलंस,आता उकडांब्याचे झाड नसल्यामुळे, 'नो उकडांबा..'

अनन्या फारच मस्त वाटल पाककृती बघून.. ३रा फोटो तर व्वाह क्या कहना..
सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास.. माझ्या आईला आणि बाबांना हा प्रकार प्रचंड आवडायचा.. चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीमध्ये आई भरपूर उकडांबा करून वरून पातळ धोतराच फडकं दोरीने बांधून ठेवायची. कोणी पाहुणे आले की त्या बरणी तून थोडे आंबे एका सटा मधे काढून त्यांना वाढले की मंडळी खुश. त्यानंतर सगळ्या कोकणातल्या च आठवणी हमखास निघायच्या.

विशाखा राऊत's picture

17 May 2017 - 4:57 pm | विशाखा राऊत

तोंपासु.. मस्त मस्त मस्त
आंबा क्वीन आहेस तु :)

मनिमौ's picture

17 May 2017 - 5:37 pm | मनिमौ

बघितले नाहीत. पाकृ वाचली नाहि. म्हणून तोंडाला पाणी पण सुटले नाही