मला भावलेल्या नायिका

सपे-पुणे-३०'s picture
सपे-पुणे-३० in लेखमाला
8 Mar 2017 - 6:27 am

.

कोकण ही माझी जन्मभूमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात माझं बालपण गेलं. नंतरचं शिक्षण पुण्यात, काही काळ होस्टेलवर आणि मग लग्नानंतर आता पुण्यात स्थायिक झाले. ह्या आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप वेगवेगळ्या स्वभावाचे, पार्श्वभूमी असलेले लोक भेटले. त्यांपैकी विशेषकरून स्त्रिया माझ्या कायमच्या लक्षात राहिल्या. अगदी चारचौघींसारख्या असलेल्या ह्या बायका त्यांच्या स्वभावातील एखाद्या विशेष चांगल्या पैलूमुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या त्यांच्या धडाडीमुळे आजही माझ्या मनात घर करून आहेत. 'जागतिक महिला दिनाचं' औचित्य साधून त्यांना हा 'मानाचा मुजरा'!!

निसर्गसौंदर्याने नटलेल्या आमच्या गावात सपाटी जवळजवळ नाहीच. कुठेही जायचं असेल तरी दहा पायऱ्या चढायला किंवा उतरायला लागतात. तालुक्याचं ठिकाण असलेल्या गावात त्या वेळीही बऱ्याच सोई होत्या. आजूबाजूच्या गावातल्या लोकांसाठी तर ही मोठी बाजारपेठ होती. आसपासच्या गावातले लोक कधी बाजारासाठी, कधी स्वतःकडचा भाजी-पाला, फळं-फुलं विकण्यासाठी सकाळच्या पहिल्या एस.टी.ने येत आणि जाताना वाणसामान वगैरे घेऊन जात. शिमग्यानंतर आमच्याकडे सुभद्रा येत असे. आमच्या गावातल्याच एका लांबच्या वाडीत सुभद्राचं घर. बेताचीच उंची, तुकतुकीत कृष्णवर्ण, काळ्याभोर केसांचा व्यवस्थित चापून-चोपून घातलेला आंबाडा, त्यात किमान एक तरी फूल, स्वच्छ गुडघ्यापर्यंत येणारी नऊवारी, साडीला मॅचिंग ब्लाऊज, कपाळावर रुपयाएवढं मोठ्ठ कुंकू आणि डोक्यावर हा भलामोठा हारा. साकट भाजीला फणस, पन्ह्यासाठी कैऱ्या, खोबरी आंबे, पडीचे आंबे, साखरबिटक्या, जांभळं, करवंदं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सुरंगीच्या वेण्या असा माल तिच्या हाऱ्यात असे. बाजाराचा रस्ता आमच्या घरावरून जात असल्याने जाताना, "गो वैनी" अशी रस्त्यावरूनच हाक मारून ती सरळ फाटक उघडून येत असे. आल्यावर "वैनीनू... " म्हणून ती अस्सल कोकणीत सुरू व्हायची. बोलण्यात तिला भेटलेली चांगले लोक आणि त्यांचे अनुभव हाच विषय असायचा. मात्र बोलताना ती जे वाक्प्रचार आणि म्हणी लीलया वापरायची, ते ऐकताना आम्ही अवाक व्हायचो. कधीही शाळेची पायरी न चढलेल्या सुभद्राच्या जिभेवर अक्षरशः सरस्वती विहरत असायची. बरं नुसत्या म्हणी वगैरे नाही, तर अध्यात्मातले दाखले, वेगवेगळ्या देवदेवतांच्या कथा हे सगळं त्यांत अतिशय सुरेखपणे गुंफलेलं असायचं. लांबून चालत येते म्हणून आई तिला चहा द्यायची. त्यावर "माझी बाय म्हणजे अन्नपूर्णा जणू", असं बोलून आणखी एक पुराणकथा सांगायची. खरं तर आम्ही तिच्याकडून कधीतरीच काही विकत घेत असू, पण तिला त्याचं काहीच वाटायचं नाही. जणू काही मनातलं बोलून मोकळं होण्यासाठीच ती आमच्याकडे येऊन जायची. तिच्या त्या बोलण्यात इतकी सकारात्मकता असायची! अजूनही सुभद्रा आहे. फक्त वयोमानानुसार इतक्या लांब चालत बाजारात येत नाही.

आमच्या घरापासून तीन घरं सोडून सगळी लेल्यांची घरं आहेत. त्यांच्यातल्या सर्वांत थोरल्या आजींना 'मोठ्या मामी' म्हणून ओळखलं जायचं. दिसायला अतिशय सुंदर, गोरा केतकी वर्ण, ब्राह्मणी पद्धतीचं नऊवारी लुगडं, आंबाडा आणि मोठ्ठं कुंकू अशा ह्या मोठ्या मामी त्या वेळच्या मॅट्रिक होत्या. घरी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाती पाठवायचं नाही ही कोकणातली पद्धत. पण आसपासच्या वाडीत कोणीही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालं की मामी निरोप पाठवून त्यांना घरी बोलावून घ्यायच्या आणि चहा, गोडाचा शिरा आणि दहा रुपये बक्षीस देऊन त्या मुलांचं कौतुक करायच्या. त्यांच्या ह्या कौतुकाच्या थापेमुळे कितीतरी मुलांना पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असेल.

माझ्या एक मामी आहेत. उत्तम शिवणकाम करतात. त्यांना सख्खं असं कोणीच नाही. काही कारणामुळे मूलबाळ होऊ शकलं नाही आणि जो एक सावत्र भाऊ होता तोही वारला. घरचं एकत्र कुटुंब. सगळे जण वडिलोपार्जित व्यवसायात होते. आणीबाणीनंतर एका रात्रीत व्यवसाय बुडाला. शिक्षण नसल्याने घरातील सगळे पुरुष घरी बसले. त्या वेळी आपल्या शिवणकामाच्या जोरावर मामींनी घर सावरलं आणि जिद्दीने पुतण्यांना शिकवलं. घराच्या ओसरीत बालवाडी सुरू केली. त्यासाठी जिल्हा पातळीवरचा पुरस्कारही त्यांना मिळाला. पण पैशाची चणचण काही कमी होत नव्हती. मला आठवतंय, पुण्याजवळ राहत असलेल्या मामींना आम्ही जेव्हा लोकलने भेटायला जायचो, तेव्हा गेल्यागेल्या आई त्यांना पैसे घालून पाकीट द्यायची. मग त्या आम्हाला घेऊन बाजारात जायच्या आणि मला फ्रॉकचं कापड, माझ्या भावाला आवडतात म्हणून बटाटेवड्यांचं सामान असं घेऊन यायच्या. घरी येऊन जेवण झाल्यावर मला फ्रॉक शिवून द्यायच्या. इतकी वर्षं पाहतेय, पण कधीही स्वतःच्या नशिबाला बोल लावत रडगाणं गायलेलं मी त्यांना पाहिलेलं नाही, नेहमी आनंदी आणि हसतमुख. आता सगळे पुतणे शिकून स्थिरस्थावर झालेत. आता बाहेरचं शिवणकाम आणि बालवाडी सगळं बंद झालंय. पण आजही नात्यातल्या कोणाकडे बाळंतपण, लग्न वगैरे असेल तर मामी धडपडत मदतीला म्हणून येतात. जे पुढ्यात वाढून ठेवलंय ते स्वीकारून पुढे जात राहण्याची, नेहमी आनंदी आणि हसतमुख राहण्याची, परिस्थितीवर मात करण्यासाठी कष्ट करण्याची, माणसं धरून ठेवण्याची त्यांची वृत्ती मला खूप ऊर्जा देऊन जाते.

आमच्या कोणाहीकडे काहीही कार्य असलं की स्वयंपाकघराचे सगळे अधिकार माझ्या 'माई मावशी'कडे आपोआपच जायचे. खरं तर माझी ही मावशी आईची सख्खी मोठी बहीण, दोघींच्या वयात जवळजवळ १५ वर्षांचं अंतर. मावशी जुन्या काळची SNDTतली द्विपदवीधर. एकाच वेळी नोकरीबरोबर स्वतःच्या सासू-सासऱ्यांना, वडिलांना, मामांना - सगळ्यांची वयं ८०च्या पुढची - कॉलेजात शिकणाऱ्या दोन मुली आणि पाहुणे अशा सर्वांना मावशी सांभाळायची. प्रत्येकाचं पथ्यपाणी, आवडीनिवडी सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं जायचं. उन्हाळ्यात सकाळी मार्केटयार्डला जाऊन आमरसासाठी पायरीच्या करंड्या लूनावरून घेऊन यायची. मी माझ्या एकाही आजीला पाहिलेलं नाही, त्यामुळे आजीची माया कशी असते याचा मला अनुभव नाही. मला माझ्या माई मावशीतच माझी आजी दिसते. डॉक्टरांनी आशा सोडलेली असताना दोनदा मावशी वरचं दार ठोठावून आली ते केवळ तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरच! अपघातानंतर अधू पडलेल्या शरीराच्या एका बाजूवर आणि गेलेल्या स्मरणशक्तीवर यशस्वीपणे मात करून मावशी ५८ वर्षांपर्यंत नोकरी करून रीतसर सेवानिवृत्त झाली. आजही मी घरी भेटायला गेले की आवर्जून माझ्या आवडीचे पदार्थ करून ठेवलेले असतात. धडाडी, आत्मविश्वास, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा स्वभाव आणि नि:स्वार्थी प्रेम करणं हे मावशीचे स्वाभाविक गुण मला आकर्षित करतात.

ऑनर्सला आम्हाला 'Real Algebra'चा पेपर होता. अतिशय 'व्हेग' असा हा विषय सुरुवातीला अगदीच डोक्यावरून गेला. पण फायनलपर्यंत इतका आत्मविश्वास आला होता की ह्याच पेपरात परीक्षेत ७८/१०० मार्क मिळाले. ह्याचं एकमेव कारण म्हणजे आम्हाला मिळालेलं मार्गदर्शन आणि आमच्या मार्गदर्शकाचं नाव होतं - डॉ. सौ. मंगला नारळीकर. अतिशय उत्साही, चटपटीत, निगर्वी आणि प्रचंड बुद्धिमान असं हे व्यक्तिमत्त्व. त्या वेळी आयुकामुळे डॉ. नारळीकर सरांचं नाव पुण्यात गाजत होतं. त्यामुळे मॅडमच्या पहिल्या भेटीत आमच्या मनावर दडपणच होतं. पण मॅडमच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते दडपण कुठल्या कुठे पळून गेलं. जे गणित अडलं असेल त्याबद्दल आमची थॉट प्रोसेस त्या अगोदर विचारायच्या. साहजिकच प्रत्येकाचा विचार वेगळा असायचा. मग मॅडम प्रत्येकाच्या विचाराचा धागा पकडून तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारे ते गणित सोडवून दाखवायच्या. खरं तर हुशार आणि एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान असलेली व्यक्ती उत्तम प्रकारे शिकवू शकेलच असं नसतं. पण त्यांच्या बरोबर शिकलेली Convergenceची व्याख्या अजून तोंडपाठ आहे. एखादा विषय आनंद घेऊन कसा शिकायचा हे मला मॅडमनी शिकवलं.

1

गणिताशिवाय मॅडमच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरीही एक बाजू होती. त्या एक उत्तम गृहिणी होत्या आणि त्यात त्यांना काहीही कमीपणा वाटायचा नाही. अजूनही मॅडम तशाच आहेत. तशाच लाईट रंगाच्या कॉटनच्या साड्या नेसतात, कोठेही भेटल्यावर मनमोकळेपणाने गप्पा मारतात.

आजकाल मनःशांतीसाठी कोणत्या ना कोणत्या तरी बाबांचा अनुनय घेण्याची पद्धत आहे. मग त्यांच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे, किती सहवास आहे, हे सगळे प्रश्न त्यापुढे गौण ठरतात. पण ज्या व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा त्याग केला आहे ती व्यक्ती आपले सांसारिक प्रश्न सोडवायला कशी मदत करणार, हे कोडं काही मला उलगडत नाही. दैनंदिन जीवनात अशा अनेक अडचणी येतात की ज्यांना आपल्याला स्वतःलाच तोंड द्यावं लागतं. किंबहुना बऱ्याच वेळा आपण बाहेरच्या कोणाही जवळ त्यांची वाच्यताही करू शकत नाही. अशाच काही प्रसंगी किंवा जेव्हा एखाद्या दिवशी रोजच्या ताणतणावामुळे उदासवाणं वाटतं, तेव्हा ह्या सगळ्या नायिकांच्या आठवणी मनाला उभारी देतात आणि मरगळ कुठच्या कुठे पळून जाते. अशावेळी प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरी फोनवर बोलल्याने काम करायला उत्साह येतो. त्यांच्यातील सकारात्मकता, आनंदी वृत्ती, कष्टाळू वृत्ती, हाती घेतलेले काम पूर्णत्वाला नेण्याची आग्रही वृत्ती, न डगमगता आलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं धैर्य, निगर्वीपणा आणि दुर्दम्य आत्मविश्वास मला नव्या जोमाने काम करण्याची ऊर्मी देतात.

(डॉ. सौ. मंगला नारळीकर यांचे छायाचित्र http://cmscollege.ac.in येथून साभार)

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Mar 2017 - 7:21 am | पैसा

साध्या सरळ स्त्रियांची सुरेख शब्दचित्र. खूप आवडली.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 7:38 am | प्रीत-मोहर

तुझ्या नायिकांची ओळख खूप आवडली. मीही त्यांच्याकडून थोडंफार स्वीकारायचा प्रयत्न करेन

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 11:26 am | सविता००१

खूप मस्त लिहिलं आहेस. मलाही वाचता वाचता अशा अनेक नात्या-गोत्यातल्या आणि ओळखीच्या नायिका भेटल्या गं. किती गृहित धरलेलं असतं आपण यांना की ही आजी अशीच आहे, ती मावशी अशीच आणि लाडपण करून घेतो आपण. पण त्यांचं खरच कौतुक करावस वाटतंय हे वाचून.

गिरिजा देशपांडे's picture

10 Mar 2017 - 1:15 pm | गिरिजा देशपांडे

+१

साध्या सरळ स्त्रियांची सुरेख शब्दचित्र. खूप आवडली. हेच म्हणते.

पियुशा's picture

9 Mar 2017 - 1:19 pm | पियुशा

अशा खुप नायिका आप्लयाला लाभतात हेच थोर भाग्य आपले :)

खूप छान ओळख. आणि इतके उत्तम शिक्षक लाभणं हे भाग्यच. अजून विस्ताराने लिहा. नोंद राहू द्यावी म्हणून.

पलाश's picture

9 Mar 2017 - 4:34 pm | पलाश

लेख आवडला.

लेखन आवडले. एकदा कोणत्याश्या लेखात उल्लेख होता की आजकालच्या मुलांना पुढे आयुष्यात सहजी न मिळणारी एक गोष्ट असेल. ती म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांचे आदर्श! पूर्वी आपण पाहिलेल्या इतक्या व्यक्ती आदर्श म्हणाव्यात अश्या होत्या व आपले जीनव सुसह्य केले त्यांनी. आपल्या मुलांसाठी एका दोघांनी आदर्श म्हणून उभे राहणे फार अवघड काम आहे.

पुष्करिणी's picture

10 Mar 2017 - 2:35 am | पुष्करिणी

छान लेख, आवडला

सुचेता's picture

10 Mar 2017 - 12:40 pm | सुचेता

खुप जणींची मन्नात नोंद होत गेली, आपोआप

अजया's picture

10 Mar 2017 - 4:22 pm | अजया

फार छान लेख ,सपे. आवडला.

विभावरी's picture

10 Mar 2017 - 5:06 pm | विभावरी

आपल्या आसपास अशी लोक असतात बर्याचदा फक्त त्यांना ओळखण्याची नजर पाहिजे .सुंदर व्यक्ती चित्रण आहे .

एवढ्या सकारात्मक लेखासाठी धन्यवाद :)

खरोखर अशा अनेक जणी आठवल्या.
गृहीत धरण्या बाबत सविता आणि आदर्शाबाबत रेवतीताईशी अगदी सहमत !

स्वाती दिनेश's picture

11 Mar 2017 - 1:45 pm | स्वाती दिनेश

आवडल्या. सुचेता म्हणते तसे अशा अनेक जणींची मनात आपोआप नोंद होत गेली.
स्वाती

खूपच सुरेख शब्दचित्र...अनेक अशा स्त्रिया आठवल्या...हे किती खरंय ना की आपण आदर्श मानण्यासाठी त्या व्यक्ती कोणीतरी नावाजलेल्याच किंवा वलयांकीतच असायला हव्यात असे नाही. सपे बारकावे खूप छान टिपले आहेस गं !

दर वेळेला अहिल्याबाई नी मारी क्युरीच आठवायला लागतात असं नाही. आपल्या आजूबाजूला, कुटुंबात सुद्धा अशी माणसं असतात. गुणांचा ठेवा बाळगून असतात. अहिल्याबाई नी मारी क्युरीचं स्मरण जरूर करावं पण रोजच्या जीवनात या अशा आपापल्या "सुभद्रा" आणि "मामी"च उभारी देतात हे नि:संशय.

आणि शेवटचा परिच्छेद

आजकाल मनःशांतीसाठी .............................. मला नव्या जोमाने काम करण्याची ऊर्मी देतात.

हा रोज वाचावा - सगळं व्यवस्थित चालू असताना लक्षात ठेवावा आणि कसोटीचा प्रसंग आल्यावर डोकं शांत ठेउन परिस्थितीला जिद्दिने तोंड देण्याची उर्मी मिळवण्यासाठी वाचावा - असा आहे.

(खरं तर लेखाचं शीर्षक वाचून, नायिका = सिनेनायिका समजून, उघडणार नव्हतो. एका सुंदर लेखाला मुकलो असतो!)

मंजूताई's picture

12 Mar 2017 - 2:07 pm | मंजूताई

लेख! शेवटचा परिच्छेद खासच!

नूतन सावंत's picture

13 Mar 2017 - 10:24 am | नूतन सावंत

सपे,सुरेख,सरळ भाषेतला,पण मनाला भिडणारा लेख.आपल्या आजूबाजूच्या लोकांंमध्ये अशी कितीतरी व्यक्तिमत्वं दडलेली असतात,ती फक्त पाहता आली पाहिजेत.

जुइ's picture

13 Mar 2017 - 8:31 pm | जुइ

रोजच्या जीवनातील नायिकांचे व्यक्तिचित्र अतिशय प्रेरणादायी.

इडली डोसा's picture

14 Mar 2017 - 4:49 am | इडली डोसा

सगळ्यांच्या प्रतिक्रियांशी सहमत. अंकाचा उद्देश अधोरेखीत करणारा लेख.

इशा१२३'s picture

14 Mar 2017 - 10:30 am | इशा१२३

सर्वसामान्य वाटणार्या पण आयुष्यात लक्षात रहाणार्या अनेकजणी आठवल्या.छान शब्दचित्रे सपे.

आरोही's picture

16 Mar 2017 - 9:20 pm | आरोही

+1 अनेक जणी आठवल्या. लेख आवडला.

पिशी अबोली's picture

16 Mar 2017 - 10:12 pm | पिशी अबोली

छान ओळख आणि लेख. खूप आवडला. :)

मधुरा देशपांडे's picture

18 Mar 2017 - 11:44 am | मधुरा देशपांडे

लेख खूप आवडला. अशा आजूबाजूच्या अनेक प्रेरक स्त्रिया आठवल्या.

अभिजीत अवलिया's picture

18 Mar 2017 - 8:57 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला ...

त्रिवेणी's picture

20 Mar 2017 - 1:08 pm | त्रिवेणी

छान झालाय लेख.खरच आपल्या भोवती असणार्या लोकांकडे पाहून कसे वागावे आणि वागु नये याचे शिक्षण मिळत असते आपल्याला.

रुपी's picture

8 Apr 2017 - 12:26 am | रुपी

छान लेख. नात्यातल्या, ओळखीतल्या अश्या काही स्त्रिया आठवल्या. शेवटचा परिच्छेदही खूप छान!